काही नोंदी जगभरातल्या - निळू दामले
कमला हॅरिस : खऱ्याखुऱ्या अमेरिकेच्या खऱ्याखुऱ्या प्रतिनिधी
हिलरी क्लिटंन अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष जवळपास झाल्याच होत्या. त्यांना डोनल्ड ट्रंप यांच्यापेक्षा अडीचेक लाख मतं जास्त मिळाली होती. पण इलेक्टोरल मतांमधे त्या हरल्या.
आता कमला हॅरिस नावाची एक महिला अमेरिकेची उपाध्यक्ष होऊ पहात आहे. हॅरिस यांची आई शामला गोपालन भारतीय आणि वडील डोनल्ड हॅरिस जमेकन. वडील ख्रिस्ती, आई हिंदू. कमला ब्लॅक बॅप्टिस्ट चर्चमधे जातात. नवरा डग्लस एमहॉफ हा ज्यू आहे. सहा वर्षापूर्वी कमलाचं लग्न झालं, डग्लसच्या दोन मुली आता त्यांच्या मुली आहेत. त्या कमलाला मॉमला म्हणतात.
कमला हॅरिस खऱ्याखुऱ्या अमेरिकेच्या खऱ्याखुऱ्या प्रतिनिधी आहेत.
अमेरिका हा स्थलांतरितांचा देश आहे. अमेरिकेतला एक ट्रंपवादी गट स्वतःला
स्थानिक अमेरिकन, गोरे अमेरिकन म्हणवतो. परंतु गोरे अमेरिकनही मूळचे अमेरिकन नाहीत. काळाच्या
ओघात ते गोऱ्यांच्या देशांतून स्थलांतरित झाले आहेत.
कमला हॅरिसचे आईवडील भारत आणि जमेकातून आलेत आणि त्यांचा नवरा डग्लसचे
आईवडील ऑस्ट्रियातून स्थलांतरित झाले आहेत. श्रीमंत आणि सुखवस्तू
लोक नशीब काढायला बाहेरून अमेरिकेत पोचले. आफ्रिकन गुलाम वेठबिगार
म्हणून अमेरिकेत आणले गेले. चिनी, भारतीय,
मेक्सिकन लोकं आर्थिक विकास साधण्यासाठी अमेरिकेत गेले. सुरवातीला गोऱ्यांची संख्या जास्त होती पण हळूहळू इतरांचीही संख्या वाढत गेली आणि आता गोरे
आणि इतरांची संख्या लवकरच सारखी होऊ घातली आहे.
तरीही गोऱ्यांना वाटतं की देश त्यांचाच आहे, बाकीचे लोक उपरे आहेत. ट्रंप यांनी अमेरिकेतील विविधतेचं
रूपांतर विभागणीत करून टाकलंय आणि गोरे सोडता इतर सर्व लोक उपरे नव्हेत तर देशद्रोही
ठरवलेत. या ना त्या वाटेने त्यांना खच्ची करणं, त्यांना मतदान नाकारणं, त्यांना घालवून देणं असा उद्योग
ट्रंप यांनी चालवला आहे. कमला हॅरिस या काळ्याच नाहीत,
त्या किळसवाण्या आहेत असं ट्रंप म्हणू लागले आहेत.
कमला हॅरिस ठामपणाने सांगत आहेत की अमेरिका सर्वांचीच आहे, गोऱ्यांचीही आहे आणि काळ्यांचीही आहे. उपाध्यक्षपदासाठी पक्षाने
त्यांना निवडल्यावर त्यांनी केलेलं भाषण महत्वाचं आहे. त्या म्हणाल्या
की ट्रंप यांनी अमेरिकेची फाळणी केलीय. ही फाळणी केवळ वंशाच्या
आधारावर नाही तर गरीब आणि श्रीमंत अशीही आहे.
अमेरिकेत आज चार कोटी माणसं गरीब किंवा अति गरीब या वर्गात मोडतात. त्यात काळे आहेत आणि गोरेही आहेत. काळे गरीब गोर्या गरीबांपेक्षा जास्त आहेत. गरीबांना मिळणारं उत्पन्न जेमतेम पोट भरण्यापुरतंच असतं. चांगलं शिक्षण आणि चांगलं आरोग्य या दोन्हीपासून गरीब माणसं वंचित आहेत. चांगल्या शाळेत जाऊ न शकलेल्यांत काळे जास्त आहेत, पण गोरेही भरपूर आहेत. कॉलेजात शिकण्यासाठी कर्जबाजारी झालेल्या विद्यार्थ्यांत गोऱ्यांची संख्या जास्त आहे. आरोग्य विमा नसणं हे वास्तव काळे आणि गोरे दोघांमध्येही आहे.
मालक गरीब आणि मध्यमवर्गीयांना कमी वेतन देतात, कंपनीतल्या वरिष्ठ
गटातले लोक सगळे पैसे हाणतात. करांतून सुटका श्रीमंतांना मिळते.
साधनांचं पुनर्वाटप करायला सरकार तयार नाही, विषमता
दूर करण्यासाठी पुढाकार घ्यायला सरकार तयार नाही. गरीब असतील
तर त्यांचं त्यांनी पाहून घ्यावं, सरकार त्यांना मदत करणार नाही
असा पवित्रा उत्तरोत्तर सरकार घेतंय. २००७ सालचा सबप्राईम घोटाळा
अर्थसंस्थातल्या चिमूटभर लोकांनी केला, त्यांना सरकारने तुरुंगात
धाडलं नाही, लाखो मध्यमवर्गीय धुळीला मिळाले.
आज वरवर पाहता अमेरिकेत वस्तूंची रेलचेल दिसते, दुकानांचा चकचकाट
दिसतो, जाहिरातींतून ऐश्वर्य दिसतं. प्रत्यक्षात
हा झगमगाट समाजातल्या एका छोट्या वर्गाची मिरास झालीय, सामान्य
माणूस वंचित आहे.
कमला हॅरिस या स्थितीकडे लक्ष वेधत आहेत. काळी माणसं केवळ काळ्यांचीच नव्हे तर गरीबांचंही प्रतीक आहेत. काळ्यांचा लढा केवळ रंगाने काळ्या असणाऱ्या लोकांचा लढा राहिलेला नाही, तो संकटात असलेल्या बहुसंख्याक अमेरिकींचा लढा झाला आहे.
कमला हॅरिस यांनी कोव्हिडने उभ्या केलेल्या संकटाकडे लक्ष वेधलं आहे. कोव्हिडने पूर्ण
अमेरिकेची वाट लावलीय, त्यात काळ्यांना जास्त फटका बसलाय एवढंच.
कोव्हिड संकटाला ट्रंप यांचं क्रूर धोरण कारणीभूत आहे असं कमला हॅरिस
सांगत आहेत. माणसं मरत असताना काही कंपन्या औषधं आणि उपकरणांची
साठेबाजी करून फायदा कमवत आहेत; संकटग्रस्तांना सरकारने दिलेल्या
आर्थिक मदतीचा लक्षणीय वाटा श्रीमंत कंपन्यांकडे चालला आहे. ट्रंप
यांना केवळ आणि केवळ पैसे आणि फायदा मिळवणं एवढंच दिसतं, त्यांना
अमेरिकन समाजाच्या हिताशी काहीही देणंघेणं नाही या हॅरिस यांनी केलेल्या आरोपातलं तथ्य दाखवणारे अनेक पुरावे पहायला
मिळतात.
भारतात आज हॅरिस यांची आई भारतीय होती याच विषयावर भर दिला जातोय. तो मुद्दा अजिबातच
महत्वाचा नाही. कमला हॅरिस अमेरिकन आहेत आणि कर्तबगार आहेत इकडे
लक्ष द्यायला हवं. त्या कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल होत्या आणि आता खासदार आहेत. वकील या नात्याने
त्यांनी सेनेटमधे केलेल्या कामगिरीमुळे संसदीय राजकारण जाणकारांना चकीत केलं आहे.
जेफ सेशन्स आणि विल्यम बार हे दोन अॅटर्नी जनरल
आणि जस्टीस केवेनॉ यांची त्यांनी केलेली उलटतपासणी पाहून अमेरिकन सेनेट, जनता चकित झाली होती. त्यांना कायदा कळतो. त्यांना प्रशासन कळतं. उपाध्यक्ष न होत्या तर त्या अमेरिकेच्या
कायदे मंत्री, अॅटर्नी जनरल होऊ शकल्या
असत्या. कमला हॅरिस यांचा धर्म कोणता याला महत्व नाही.
म्हटलं तर त्यांच्या घरात हिंदू, ख्रिस्ती आणि
ज्यू असे तीनही धर्म आहेत. ट्रंप यांचे पाठिराखे त्यांचा धर्म
शोधण्याचा प्रयत्न करतील. ओबामांचा उल्लेख आजही ट्रंप बराक हुसेन
ओबामा असा करतात. ओबामांचे वडील आफ्रिकन होते आणि मुस्लीम होते
याकडे ट्रंप यांचं लक्ष असतं. ओबामा स्वतः ख्रिस्ती आहेत आणि
अमेरिकन आहेत हे त्यांना मान्य नाही.
वर्ण आणि धर्म या मुद्द्यावर जाऊन मुख्य प्रश्न टाळण्याची एक लाट अमेरिकेत
आणि जगात आली आहे.
कमला हॅरिस अमेरिकेच्या भल्याचं बोलत आहेत, आर्थिक
प्रश्नावर भूमिका घेत आहेत, अमेरिकेतल्या आरोग्य आणि शिक्षण या
प्रश्नांकडे लक्ष वेधत आहेत इकडे दुर्लक्ष करायचं आणि त्यांचा धर्म कोणता, त्यांची आई भारतीय होती आणि पिता जमेकन होता यावर भर द्यायचा हे आहे ट्रंप
यांचं राजकारण. भारतीय माणसंही त्यांच्याकडे त्या चेन्नईच्या
शामला गोपालन यांची मुलगी म्हणून पाहतात, एक कर्तबगार महिला म्हणून
पाहत नाहीत.
जगात इतरत्र जे घडतंय किंवा घडू घातलंय त्याची रंगीत तालीम अमेरिकेत
होतेय. अमेरिका हा देश कोणाचा आहे आणि तो कोणी चालवायचा आहे असं कमला हॅरिस विचारत
आहेत. माणसं महत्वाची की त्यांचा धर्म महत्वाचा, माणसं महत्वाची की त्यांचा वर्ण महत्वाचा असाही प्रश्न त्यांनी ऐरणीवर आणलाय.
...
एका राजपुत्राची गोष्ट
खाशोग्गी या सौदी पत्रकाराचा खून करण्याचा आरोप असलेल्या सौदी राजपुत्राचं,
महंमद बिन सलमान (एमबीएस) यांचं हे चरित्र आश्चर्य वाटण्यासारखं नसलं तरी खूप माहितीपूर्ण नक्कीच आहे.
पुस्तकातली एक हकीकत अशी-
लेबनॉनचे पंतप्रधान साद हरारी यांना रियाधहून फोन आला की प्रिन्स एमबीएसनी भेटायला बोलावलंय. हरारी रियाधमधे व्यवस्था केलेल्या ठिकाणी पोचल्यावर त्यांना सांगण्यात आलं की योग्य वेळी त्यांची आणि एमबीएसची भेट घडेल. वेळ सांगितली गेली नाही. मध्यरात्र उलटल्यावर एक वाजता त्यांना फोन आला की उद्या सकाळी आठच्या आधी त्यांनी एमबीएसना राजवाड्यात भेटायचंय, तिथून वाळवंटात फेरफटका मारायला जायचंय.
स्पोर्ट्स शूज, जीन्स, कॅज्युल शर्ट अशा वेशात
हरारी राजवाड्यात पोचले, कारण वाळवंटात फेरफटका मारायचं ठरलं
होतं. तिथे पोचल्यावर त्यांच्यासोबत असलेले रक्षक आणि हरारी यांचे
फोन काढून घेण्यात आले. एका दालनात त्यांना नेण्यात आलं.
तिथे त्यांना शिवीगाळ करण्यात आली, मारहाण करण्यात
आली. त्यांना सांगण्यात आलं की बर्या बोलाने
त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा नाही तर त्यांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावं
लागेल.
हरारीना हॉटेलच्या खोलीत पोचवण्यात आलं. तिथे एक कॅमेरा
तयार होता. हरारींसमोर एक कागद ठेवण्यात आला होता, त्यावर त्यांनी करायचं भाषण लिहिलेलं होतं. भाषणातलं
मुख्य वाक्य होतं- मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे.
भाषणात इराण आणि लेबनॉनमधले इराणचे हस्तक हेझबुल्ला यांच्यावर टीका होती.
हे निवेदन झाल्यानंतर हरारींना अरब अमिराती, इजिप्त या ठिकाणी
फिरवण्यात आलं, तिथे त्यांची भाषणं वगैरे आखण्यात आली.
एमबीएसचा डाव असा होता, की हरारींच्या राजीनाम्यानंतर लेबनॉनमधे
सुन्नी आणि शियांमधे हाणामारी सुरू होईल आणि त्याचा परिणाम म्हणून येमेनला असलेला पाठिंबा
इराण काढून घेईल. पण लेबनॉनमधली माणसं समजून होती. तिथे दंगलबिंगल काही झाली नाही. एमबीएसचा डाव फसला.
*
महमंदन बिन सलमाननी मध्यपूर्वेचं राजकारण आणि सौदी अरेबिया या दोन्ही
गोष्टी आमूलाग्र बदलायच्या,
इराणच्या विरोधात आखातातले देश उभे करायचे असं ठरवलं. इराणचा पाठिंबा असलेल्या येमेनवर त्यांनी बाँबहल्ले सुरू केले. इराणचे हस्तक हेझबुल्ला लेबनॉनच्या सत्तेत सामील होते म्हणून तिथली सत्ता उलथवायची
असा एमबीएसचा डाव होता.
*
एमबीएसचा आणखी एक किस्सा.
महंमद बिन नायेफ, एमबीएसचे भाऊ, क्राऊन प्रिन्स
होते. गृहमंत्री होते.
रमझान चालू असताना एके दिवशी त्यांना निरोप आला की राजे सलमाननी त्यांना
भेटायला बोलावलंय.
महंमद मोटारींचा काफिला घेऊन राजवाड्यात पोचले. राजवाड्यातल्या दारात त्यांच्या इतर सहकारी आणि रक्षकांना दूर ठेवण्यात आलं,
फक्त दोन रक्षकांसह त्यांना लिफ्टपर्यंत पोचवण्यात आलं. लिफ्ट वरच्या मजल्यावर उघडली तेव्हा सशस्त्र रक्षकांनी महंमद आणि त्यांच्या
रक्षकांना ताब्यात घेतलं. त्यांची शस्त्रं आणि फोन काढून घेतले.
त्यांना एका खोलीत नेऊन डांबण्यात आलं. राजांची
भेट वगैरे झालीच नाही.
खोलीमधे महंमदना शिवीगाळ करण्यात आली. ते व्यसनी आहेत,
भ्रष्ट आहेत, त्यांचे सर्व दुर्व्यवहार जाहीर केले
जातील असं सांगण्यात आलं. बर्या बोलाने
आपल्या राजपुत्रपदाचा राजीनामा द्या नाही तर बदनामी आणि अटक इत्यादीला तोंड द्यावं
लागेल असं सांगण्यात आलं. महंमदनी नकार दिला. मध्यरात्र उलटेपर्यंत त्यांना छळण्यात आलं. ते डायबेटिक
होते. त्यांना अन्न आणि औषधं नाकारण्यात आली. पहाटेपर्यंत महंमद पुरते कोलमडले होते. राजीनामा द्यायला
तयार झाले.
इकडे रात्रीतल्या रात्रीतच राजदरबारेकरींना म्हणजे सगळ्या राजपुत्रांना
सांगण्यात आलं होतं की राजे सलमान यांनी व्यसनी महंमद यांना त्यांच्या पदावरून हटवलं
आहे आणि त्यांच्या जागी महंमद बिन सलमान यांची नेमणूक केली आहे.
बिन सलमान ही काय चीज आहे आणि त्यांची वर्तणूक कशी असते हे एव्हाना
सर्वांना माहित असल्याने कोणीही हूं का चूं केलं नाही.
पहाटे तारवटलेल्या स्थितीत बिन नायेफ खाली इमारतीच्या बाहेर आले तर
समोर कॅमेरे सज्ज होते.
बिन सलमान समोर उभे होते. बिन नायेफ यांच्या अंगावर
काळ्या रंगाचा अंगरखा चढवण्यात आला. असा अंगरखा घालणं म्हणजे
निरोप देणं असं मानलं जातं. बिन नायेफनी बिन सलमानला वंदन करून
त्यांना यश चिंतिलं. बिन सलमाननी बिन नायेफना सांगितलं की भविष्यात
त्यांचा मान राखला जाईल, त्यांचा सल्ला घेतला जाईल. हे सर्व कॅमेर्यात चित्रित होत होतं.
नंतर काही मिनिटांतच जगाने पाहिलं की बिन नायेफ यांनी राजीनामा देऊन
बिन सलमान यांच्याकडे सत्ता सोपवली होती.
बिन नायेफची समुद्र किनार्यावरच्या एका प्रासादात पाठवणी करण्यात
आली. तिथे ते कायमचे स्थानबद्ध झाले. त्यांची
सर्व पदं, सर्व अधिकार काढून घेण्यात आले, त्यांची बरीचशी संपत्तीही जप्त करण्यात आली.
२०१७ च्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सौदी, येमेन,
अरब अमिराती, इजिप्त, लेबनॉन
इत्यादी ठिकाणच्या राजपुत्र, मंत्री, उच्चाधिकारी,
बँकर्स, उद्योगपती इत्यादी लोकांना फोन गेले की
त्यांनी ताबडतोब रियाधमधे यावं, त्यांच्याशी महत्वाची बोलणी करायची
आहेत. आपणहून आला नाहीत तर तुम्हाला धरून आणावं लागेल असा निरोप
होता. सर्वांची व्यवस्था रिट्झ कार्लटन या आलिशान संकुलात करण्यात
आली होती. या संकुलात नाना आकाराचे सूट्स होते, काही सूट्सचा आकार पाच हजार चौरस फुटांचा होता.
काही माणसं काय ते समजून आपणहून दाखल झाली, काही माणसांना
गठडी वळून आणण्यात आलं.
खोल्यांत दाखल झाल्यावर त्यांचे फोन काढून
घेण्यात आले. अणकुचीदार वस्तू, चाकू इत्यादी
घेण्यात आले, पेनंही काढून घेण्यात आली. सर्वांना नाना प्रकारच्या कपड्यांचे बारा सेट देण्यात आले. कोणालाही खोलीतून बाहेर पडायला परवानगी नव्हती.
प्रत्येकाशी वाटाघाटी करण्यात आल्या. प्रत्येकाला
सांगण्यात आलं की त्याने अमूक एक करोड डॉलरचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे तुरुंगवास, फाशी, दंड
अशी कोणतीही कारवाई होऊ शकेल. बर्या बोलाने
बिन सलमान सांगतील तेवढी रक्कम जमा केली तर सुटका होईल.
काही आठवडे हा उद्योग चालला होता. वर्षभरात २००० अकाऊंट्स गोठवण्यात
आले, सुमारे ८०० अब्ज डॉलरची संपत्ती गोठवण्यात आली. दंड म्हणून सुमारे १०७ अब्ज डॉलर सरकार जमा करण्यात आले.
सुमारे ३८१ व्यक्तींना फटका बसला. सर्वच्या सर्व बिन सलमान यांचे
शत्रू होते.
*
जमाल खाशोग्गी एके काळी बिन सलमान यांचे काहीसे मित्र होते. ते पत्रकार होते.
बिन सलमान यांच्या सुधारणांना त्यांचा पाठिंबा होता, पण सौदीमधे व्यक्तीस्वातंत्र्य असलं पाहिजे, लोकशाही
प्रस्थापित झाली पाहिजे असं ते म्हणत. ते अरब आणि अमेरिकन पेपरात
लिहीत असत, भटकत असत.
खाशोग्गी बिन सलमान यांना नकोसे झाले.
व्हिसाच्या कामासाठी खाशोग्गी लंडनहून इस्तंबूलला गेले. त्यांची हालचाल
सौदी इंटेलिजन्सने नोंदली होती. इंटेलिजन्स हे खातं बिन सलमान
यांच्या थेट हाताखाली होतं. खाशोग्गी इस्तंबूलला पोचण्याच्या
आधीच, आदल्या दिवशी सौदी पोलिस म्हणा, हस्तक
म्हणा, सुमारे पंधरा जण वेगवेगळ्या वाटांनी, चार्टर्ड विमानाने इस्तंबूलला पोचले. काही रियाधहून आले,
काही दुबईहून, काही कैरोहून. निरनिराळ्या ठिकाणी उतरले. आलेल्या माणसांत खाशोग्गी
यांच्यासारखीच ठेवण असणारा एक जाडगेला माणूसही होता.
इस्तंबूलच्या सौदी दूतावासातल्या स्टाफला रजा देण्यात आली होती. खाशोग्गी दूतावासात
पोचल्यावर त्याना बेशुद्ध करून ठार मारण्यात आलं. शवातलं रक्त
काढून शव सुकं करण्यात आलं. तुकडे बॅगात भरून दूतावासाच्या बाहेर
नेऊन नाहिसे करण्यात आले. खाशोग्गी दूतावासात प्रवेश केल्याचं
चित्रण कॅमेर्यात होतं. खाशोग्गींचा तोतया
बाहेर पडून शहरात गेल्याचं चित्रण मुद्दाम करण्यात आलं. घोटाळा
एवढाच झाला की खाशोग्गींचे दूतावासात जातानाचे बूट आणि नंतरच्या खाशोग्गीचे बूट वेगळे
होते.
सौदी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून दूतावासातले सीसीटीव्ही कॅमेरे हटवण्यात आले होते. परंतु दूतावासातली ध्वनीचित्रण करणारी यंत्रणा शिल्लक होती. त्या यंत्रणेने खाशोग्गीना मारताना झालेली संभाषणं नोंदली, ती संभाषणं तुर्की सरकारकडे होती.
सौदी सरकारने प्रथम खाशोग्गी नुसतेच नाहिसे झाले असं म्हटलं. नंतर बाचाबाचीत
ते मारले गेले असं सांगितलं. नंतर खून झाला हे कबूल केलं.
नंतर खुनात सहभागी झालेल्या लोकांना शिक्षा करणार असल्याचं जाहीर केलं.
इतकी माणसं, इतकी विमानं, इतक्या गाड्या,
इतक्या हॉटेलच्या खोल्या, दूतावास, इतकं सारं कोणी खाजगी माणूस करू शकतो काय? सरकारच्या
संमतीशिवाय, सरकारातल्या वरिष्ठांच्या सहमतीशिवाय ते कसं शक्य
आहे? बिन सलमान यांनी त्यात आपला हात असल्याच्या आरोपाचा इन्कार
केला. जगाने काही काळ कटकट केली, पण नंतर
श्रीमंत देशाच्या श्रीमंत मालकाबरोबर जुळवून घेतलं.
हब्बार्ड यांच्या पुस्तकात बिन सलमान यांचं चरित्र भरपूर तपशीलांसह
रेखाटलं आहे. सावधपणाने त्यांनी थेट आरोप करण्याचं टाळलं आहे, पण वाचणार्याला जे समजायचं ते समजतं.
सौदी अरेबियात अमाप पैसा आहे. हा पैसा सौदी घराण्याच्या खिशात जातो.
सौदी घराण्यातल्या वरिष्ठांच्या खिशात जातो. अमाप
पैसा मिळत असल्याने माणसं गप्प रहातात आणि तो पैसा वापरणारे सौदी राजे, सौदी राजपुत्र, सौदी मंत्री माफिया सत्ता चालावी तशी
सत्ता वापरत असतात. मानवी हक्क, मानवी स्वातंत्र्य
इत्यादी गोष्टींची फिकीर त्यांना नसते. स्वतःला ते इस्लामचे कट्टर
समर्थक म्हणवतात पण त्यांच्या वर्तणुकीत धर्म कुठेच नसतो. असं
असलं तरी त्यांच्याकडे असलेला पैसा पाहून जग त्यांच्याशी सलोखा ठेवत असतं.
प्रस्तुत पुस्तक वाचल्यानंतर वरील गोष्टी लक्षात येतात.
बिन सलमान फक्त ३५ वर्षं वयाचे आहेत. त्यांचे वडील
८५ वर्षाचे आहेत. त्यांच्या वडिलांची प्रकृती ठीक नसते.
लवकरच बिन सलमान स्वतः राजे होतील आणि पुढे ४०-५० वर्षं राज्य करतील. जगाने त्यांच्याशी जुळवून घ्यायचं
आहे.
...
शिरीष दाते आपल्याकडे? शक्य नाही!
‘‘गेल्या साडेतीन वर्षांत तुम्ही अमेरिकेन जनतेसमोर खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो का?’’ एका पत्रकाराने अमेरिकेचे रष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना विचारलं.
व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत सामान्यपणे समर्थक पत्रकार सुखकारक
प्रश्न विचारतात याची सवय असलेले ट्रंप गोंधळले. त्यांनी विचारलं, ‘‘कशाबद्दल?’’
‘‘खोटं बोललात, जी जी बेईमानी (डिसॉनेस्टी)
केलीत त्याबद्दल,’’ पत्रकार म्हणाला.
‘‘कोणी केलं ते?’’ ट्रंपनी विचारलं.
‘‘तुम्ही.’’ पत्रकार म्हणाला.
प्रश्न विचारणारा माणूस कोण आहे ते ढुंढाळण्याच्या प्रयत्नात ट्रंप
होते. यापूर्वी अनेक वेळा त्यांनी या पत्रकाराला प्रश्न विचारू दिला नव्हता.
पण या वेळी बेसावधपणे त्यांनी प्रश्न विचारू दिला होता.
त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता ट्रंप यांनी लक्ष दुसऱ्या पत्रकाराकडे वळवलं...
वॉशिंग्टन पोस्टने ट्रंप प्रेसिडेंट झाल्यापासून किती वेळा खोटं बोलले
याची तारीखवार नोंद ठेवली आहे. त्या नोंदीनुसार खोट्या वक्तव्यांनी २० हजारचा आकडा
पार केला आहे.
बराक ओबामा अमेरिकेत जन्मले नाहीत असं ट्रंप म्हणाले, म्हणतात.
ओबामा यांचा जन्माचा दाखला हज्जारो ठिकाणी अधिकृतरीत्या नोंदला गेला
असला तरीही ट्रंप त्यांच्या मतावर ठाम आहेत. आता तर ते कमला हॅरिस
याही अमेरिकेत जन्मलेल्या नाहीत असं पसरवत आहेत.
ट्रंप यांचा खोटेपणा पेपर सतत उघडा पाडत होते, पण कोणी पत्रकाराने
कॅमेर्यासमोर त्यांना बोचरा प्रश्न विचारला नव्हता. तो उद्योग शिरीष दाते यांनी केला.
शिरीष दाते पुण्यात जन्मले. वयाच्या तिसर्या
वर्षी आई वडिलांसोबत अमेरिकेत स्थलांतरित झाले. स्टॅनफर्डमधे
त्यांनी राज्यशास्त्र विषयाची पदवी घेतली. गेल्या पंचवीस वर्षांहून
अधिक काळ ते पत्रकारी करतात. सध्या ते हफिंग्टन पोस्टचे व्हाईट
हाऊस प्रतिनिधी आहेत.
कशी गंमत असते पहा. एखाद्याला विचारायचं, की तुम्ही पत्नीला धोपटणं बंद केलंत का? समजा त्याने
उत्तर दिलं ‘नाही’, तर तो अजूनही पत्नीला
धोपटतो असं सिद्ध होतं. समजा त्या व्यक्तीने उत्तर दिलं
‘होय’, तर त्याचा अर्थ होतो की तो आधी पत्नीला
धोपटत होता.
काहीही उत्तर दिलं तरी ती व्यक्ती संकटात सापडते.
नेमक्या याच संकटात ट्रंप सापडले. फक्त इथे लोचा असा होता,
की व्यक्ती खरोखरच पत्नीला धोपटत होती याची जाहीर नोंद आहे. ट्रंप यांचा खोटेपणा रीतसर नोंदला गेला आहे.
प्रेसिडेंटांच्या चिंध्या करण्यासाठी अमेरिकेतली पत्रकारी प्रसिद्धच आहे. खोटं बोलण्यातले उस्ताद रिचर्ड निक्सन लोकांसमोर जात तेव्हा पत्रकार आणि सामान्य जनताही त्यांना तोंडावर सांगत असे, की ते खोटं बोलतात. अनेक पत्रकार परिषदांच्या क्लिप्स तशी साक्ष देतील. निक्सन यांचे बेकायदेशीर उद्योग अमेरिकेतल्या मोठ्ठ्या पेपरांनी वेशीवर टांगले, पेंटॅगॉन पेपर्स प्रसिद्ध केले, वॉटरगेट घरफोडी चव्हाट्यावर आणली आणि पेपरांनी हा उद्योग एक-दोन दिवस नाही तर चारेक वर्षं केला. परिणामी विक्रमी बहुमताने निवडून आलेल्या निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला.
निक्सन यांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा केला तेव्हा एका गायकवृंदाला
गाणी गायला बोलावलं होतं.
गाणार्या तरुण मुलींपैकी एकीने एक कापडी फलक काढून
झळकवला, त्यावर ‘निक्सननी व्हिएतनाममधलं
अमानवी हत्याकांड थांबवावं’ असा मजकूर लिहिला होता. पोलिसांनी तो फलक हिसकावून घेतला. पण त्या घटनेचं व्हिडिओ
रेकॉर्डिंग शिल्लक राहिलं.
जेफ सेशन्स, विल्यम बार ही राजकीय माणसं अमेरिकेच्या कायदेमंत्री
पदावर बसायला निघाली होती तेव्हा पेपरांनी त्यांची कारकीर्द चव्हाट्यावर आणली.
केवाना या वादग्रस्त वकीलाला ट्रंप सर्वोच्च न्यायालयात बसवायला निघाले
तेव्हा पेपरांनी त्यांचा सगळा इतिहास चव्हाट्यावर मांडला, त्यांनी
एका स्त्रीशी कशी गैरवर्तणूक केली होती याचा पाढा पुराव्यानिशी वाचला.
एक न्यायाधीश पोलिसांशी संगनमत करून शेकडो मुलांना अगदीच किरकोळ कारणासाठी
नाहीतर विनाकारणच तुरुंगात पाठवत असे. कारण अमेरिकेतली तुरुंगव्यवस्था खाजगी
आहे, तिथे तुरुंगातली माणसं म्हणजे हॉटेलातली गिर्हाईकं आहेत असं मानलं जातं. तुरुंगात जेवढे जास्त कैदी
तेवढं तुरुंगाचं उत्पन्न जास्त. त्या न्यायाधीशाने असे करोडो
डॉलर कमवले. एका आईने तक्रार केली. पोलिसांनी
ती दडपली. हे प्रकरण पेपरांनी लावून धरलं. नेटाने सर्व पुरावे गोळा करून पेपरात छापले. नाईलाज झाला.
तो न्यायाधीश कोर्टात आरोपी म्हणून उभा राहिला. त्याला दीर्घ तुरुंगवासाची शिक्षा झाली.
अमेरिकेत नागरिक राज्यघटना आणि कायद्याला मान देतात. कायद्याने वागणार्या माणसाबद्दल आदर बाळगतात. मात्र हा आदर त्याच्या कायदेशीर
वागण्याला असतो, त्या व्यक्तीला नव्हे. व्यक्तीपूजा तिथे मान्य नाही. व्यक्ती बंडल असेल तर तिच्यावर
टीकेचा भडीमार होतो, इतका की त्या व्यक्तीला पद सोडायची पाळी
येते.
इथे?
भारतात?
शिरीष दातेंनी विचारला तसा प्रश्न आपल्याकडचे पत्रकार विचारू शकतात
की नाही हा मुद्दा लांबच. पण तसा प्रश्न विचारण्यासाठी आधी नेत्यांनी असं खुल्लमखुल्ला पत्रकारांसमोर यायला तर हवं.
आपल्याकडे परिस्थिती काय आहे? विविध पदांवर आणि संस्थांमधे योग्य आणि
कर्तव्यपालन करणारी माणसंही आहेत. पण पदांवर बसलेली गुन्हेगार,
सत्तापिपासू माणसं वाढलीत. गुन्ह्यांचा भरपूर रेकॉर्ड
असणारी माणसं सरकार, नोकरशाहीत पोचली आहेत. त्यांना जाब विचारायची भारतीयांची तयारी नाही. लोकांनी
एक तर नांगी तरी टाकलीय किंवा जे चाललंय त्यात वावगं आहे असं त्यांना वाटतच नाहीये.
वकील प्रशांत भूषण प्रतीकात्मक पद्धतीने सरकार आणि न्यायव्यवस्थेचं
रूप उघडं करू निघाले म्हणून त्यांना शिक्षा करायला न्यायालय पुढं सरसावलंय. पद, वय, श्रीमंती, जात या कसोटीवर माणसांना
आदर द्यायला भारतीय माणूस बांधलेला आहे. आदर आपल्या कर्तृत्वाने
मिळवायचा असतो असं फक्त पाठ्यपुस्तकात सांगितलं जातं. ‘बोले तैसा
चाले त्याची वंदावी पाऊले’ असं वचन सतत तोंडी बाळगणारी माणसं
करणी आणि कथनी यात तफावत असलेल्यांनाच वंदन करताना दिसतात. गुन्हे
केलेल्या माणसांना हा देश मोठमोठ्या पदांवर आणि मखरांत नेऊन बसवतो. गुन्हे करणारे लोक पोलीस होतात, सत्तेपुढे लाळ गाळणारेही
सेनाधिकारी होतात. पोलीस, सैन्यदल,
मंत्रिमंडळ, न्यायालय, शैक्षणिक
संस्था इत्यादी ठिकाणची प्रत्येक व्यक्ती आदरणीयच असते, तिच्याबद्दल
काहीही बोलायचं नाही, तिला प्रश्न विचारायचे नाहीत, तिची समीक्षा करायची नाही असं भारतीय माणसाला वाटतं. कोणी बोललं तर तो देशद्रोही, सैन्यद्रोही, धर्मद्रोही वगैरे ठरतो. सत्तेतला माणूस असो की न्यायालयातला,
त्याचं चुकत असतं हे एक तर भारतीय माणसाला कळेनासं झालंय किंवा तसं मुळात
त्याच्या डोक्यातच येत नाही.
आधीच परंपरागत दांभिकता आणि लाचारीकडे ओढ, त्यात व्हॉट्सअप
या शिक्षण व्यवस्थेतून देण्यात आलेलं ज्ञान.
*
शिरीष दाते यांचं उदाहरण समोर आलं, की लोक म्हणतात ती अमेरिका आहे,
हा भारत आहे, आमचा भारत हा असा आहे. अमेरिकेत काय चालतं त्याची अपेक्षा भारताकडून करणं फोल आहे.
तेही खरंच आहे म्हणा!
निळू दामले
९८२०९७१५६७
damlenilkanth@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा