लॉकडाऊनमधले शिक्षणप्रयोग - संतोष मुसळे

 


लॉकडाऊनमुळे यंदा शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. ऑनलाइन वर्ग सुरू झाले असले तरी गावखेड्यांमध्ये ऑनलाइन शिक्षणात अनेक अडथळे येताहेत. कुठे स्मार्ट फोन घेण्यासाठी पालकांकडे पैसे नाहीत, तर कुठे गावात इंटरनेट आणि फोनची रेंज नाही. अशा अडथळ्यांवर छोटे छोटे उपाय शोधून शिक्षणगंगा वाहती ठेवणार्‍या प्रयोगशील शिक्षकांबद्दल. 

मार्चमध्ये पहिली ते नववीची मुलं द्वितीय सत्र परीक्षेच्या अभ्यासात दंग असतानाच अचानक कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झालं. शाळांना सुट्टी देण्यात आली. परीक्षा न देताच मुलं उत्तीर्ण होऊन वरच्या वर्गात गेली. पण जून महिना जवळ येऊ लागला तरी कोरोनासंकट न हटल्यामुळे पुढच्या शैक्षणिक वर्षात शाळा कशा सुरू करायच्या यावर खल सुरू झाला. अचानक डिजिटल आणि ऑनलाईन शिक्षणाला महत्त्व आलं. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण देण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. विद्यार्थ्यांकडे स्वतःचेच काय, पण आई-वडिलांचेही स्मार्ट फोन नाहीत. फोन असतील तर ब्रॉडबँड कनेक्शन नाहीत, विनाअडथळा ऑनलाइन तास चालू शकेल एवढी रेंज नाही. शांतपणे तास ऐकायला-सहभागी होण्यासारखी खासगी जागा नाही. असे अनेक प्रश्‍न. पण गावागावात, तांड्यापाड्यावरचे अनेक शिक्षक अशा अडथळ्यांवर मार्ग काढत विविध प्रयोग करत आहेत.  

गावातील तरुण देताहेत शिक्षण!

भंडारा जिल्ह्यातील सोरणा या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. गेल्या वर्षी कॉन्व्हेंटमधल्या १९ विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला होता.


लॉकडाऊन काळात ही मुलांना शिक्षण मिळत राहवं, यासाठी या शाळेतले शिक्षक कैलास चव्हाण यांनी गावातील  उच्च शिक्षित तरुणांच्या मदतीने ‘माय स्कूल-माय स्टुडंट्स’ नावाचा गट तयार केलाय. पाच-पाच विद्यार्थ्यांचे गट करून ही तरुण मंडळी त्यांना रोज व्हॉट्सॅप वरून शिक्षण देताहेत. पालक-शिक्षक आणि ही तरुण मंडळी यांच्या एकत्रित प्रयत्नाने हे काम सुरू आहे. त्यासाठी तरुणांचे दोन गट काम करतात. एका गटातील तरुण पाच-पाच विद्यार्थ्यांच्या गटाला प्रत्यक्ष शिकवतात. तर दुसर्‍या गटातील तरुण व्हाट्सॅपवर आलेला गृहपाठ त्यांच्या घराजवळील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवतात. ज्या पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत, त्यांची मुलांपर्यंतही प्रत्यक्ष गृहपाठ पोचत असल्याने तीही या उपक्रमात सहभागी होऊ शकताहेत.

शेती करता करता शिकवणी

पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी येथील महात्मा फुले विद्यालयात काम करणार्‍या मंगल आहेर गावडे यांनी या काळात ऑनलाइन शिक्षणासाठी केलेलं काम कौतुकास्पद आहे. पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊन सुरू होताच त्या कुटुंबासह गावी राहाण्यास आल्या. त्यावेळी गावाकडे शेतीची कामे सुरू होती. गावडे पाचवीच्या शिष्यवृत्ती वर्गाला गेल्या २३ वर्षांपासून शिकवताहेत. शिष्यवृत्तीसाठी ग्रामीण जीवनाशी संबंधित बराचसा पाठ्यभाग आहे. त्यामुळे शेतीची कामं करता- करता त्यांनी पाठ्यभागाशी संबंधित माहितीचं मोबाईलच्या साहाय्याने शूटिंग करून पाठ तयार केले आहेत. हे पाठ त्या यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन या  यूट्यूबवर चॅनेलद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताहेत. खते व बियाण्यांची माहिती, सिंचनाच्या पद्धती, नद्या व धरणे,  नद्यांची उगमस्थाने, वनस्पतींचे प्रकार, वनस्पतींचे अवयवानुसार वर्गीकरण, प्राण्यांचे अधिवास, शेती अवजारे, सुधारित शेतीच्या पद्धती याबद्दल माहिती देण्यासाठी त्यांनी शेतावर, माळरानात प्रत्यक्ष वनस्पती, प्राणी आणि नद्या दाखवून त्याचे व्हिडीओ बनवले. त्यासोबत स्वाध्याय द्यायलाही सुरुवात केली. मुलांची उत्तरं त्या व्हॉट्सॅपवरून मागवतात आणि तपासतात.

शेतातील आंब्याच्या डेरेदार झाडाला व्हाईटबोर्ड लावून त्यावर गणिताच्या पाठांचा व्हिडीओही गावडे यांनी तयार केले. घरातल्या एका खोलीचा स्टुडिओसारखा वापर करूनही त्यांनी अनेक व्हिडिओ बनवले आहेत. या व्हिडिओ-पाठांना राज्यभरातल्या शिक्षक-विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मुलांसाठी मोफत इंटरनेट

जालना जिल्हातील परतुर तालुक्यातील दहिफळ भोंगाणे हे गाव. गावातील नागरिकांची परिस्थिती जेमतेमच. पाचशे ते सहाशे लोकसंख्या असणार्‍या या छोट्याशा गावात चौथी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे मुलांचा पट २१, तर शिक्षक संख्या दोन. शिक्षणाविषयी गावात उदासीनचा आहे. बहुतेक लोक पोटापाण्यासाठी हंगामी स्थलांतर करणारी. त्यामुळे शिक्षणासाठी लागणारी स्थिरता आयुष्याला नाही. त्यामुळेच की काय, अद्याप गावामधून कोणीही शासकीय सेवेत उच्च पदापर्यंत पोहोचलेलं नाही. 

लॉकडाऊननंतर शालेय शिक्षणाचं भविष्य अधांतरी झालं, तेव्हा या गावातल्या शाळेत शिकवणारे पिंटू मैसनवाड गुरुजी आणि गायकवाड मॅडम यांनी पुढाकार घेतला आणि गावात ऑनलाइन शिक्षण सुरू करायचं ठरवलं. त्यांनी पालकांना मुलांसाठी टॅब घेण्यास राजी केलं. ज्यांची परिस्थिती नव्हती, त्यांच्यासाठी दर महिन्याला १०० रुपये फेडण्याची सोय करून मैसनवाड सरांनी स्वतः पैसे भरले. पण मुख्य प्रश्‍न होता तो इंटरनेटसाठी दर महिन्याला पैसे भरण्याचा. त्यावर मैसनवाड सरांनी शक्कल लढवून गावात दोन तीन ठिकाणी इंटरनेटचे डोंगल बसवले. त्यामुळे संपूर्ण गावात नेट सुरू झालं. फक्त ४०० रुपयात गाव नेटयुक्त झालं. त्यामुळे प्रत्येक पालकावरचा खर्च कमी झाला. आणि शाळां बंद झाल्यावरही मुलांचं शिक्षण सुरू राहिलं.

स्वतः तयार केलेले यू ट्यूब व्हिडिओ, राज्यातील इतर शिक्षकांनी केलेले व्हिडिओ, दीक्षासारखे शैक्षणिक अ‍ॅप असं सारं मुलांसाठी खुलं झालं. शिवाय व्हॉट्सॅपद्वारे शिक्षक गृहपाठ देऊन त्याची तपासणी करत असल्यामुळे सुकाणू शिक्षकांच्या हातात राहिलं. या उपक्रमासाठी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखीळ, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख या सर्वांचं मार्गदर्शन मिळाल्याचं मैसनवाड सांगतात.

साध्या फोनवरूनही चालते शाळा

सगळीकडे डिजिटल शिक्षणाचे वारे वाहत असले तरी स्मार्ट फोन नसलेल्या वंचित घटकांमधल्या विद्यार्थ्यांचं काय हा प्रश्‍न उरतोच. यावर दौंड तालुक्यातील नांदूर शाळेतील शिक्षिका रोहिणी लोखंडे यांनी यावरही मार्ग काढला. या शाळेत ऊसतोड कामगारांची मुलं शिकतात. शाळा बंद झाल्यामुळे त्यांच्या शाळेतली सातवीतली दोन मुलं ऊसतोडणीसाठी जाऊ लागली. ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यावर या मुलांबरोबर संपर्क साधणं रोहिणीताईंना जमत नव्हतं. एकतर या मुलांकडे स्मार्ट फोन नव्हता. जो साधा फोन आहे तोही लागत नव्हता. 

पण प्रयत्न सोडून न देता रोहिणीताईंनी गावातील रेशनदाराकडून या टोळीतील इतरांचे नंबर मिळवले. त्यातील एका नंबरवर फोन करून या मुलांच्या पालकांशी संपर्क साधण्यात त्यांना यश आलं. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने स्मार्ट फोन घेण्यासाठी त्यांनी पालकांंचं मन वळवलं. त्यासाठी पालकांनी बचत करायलाही सुरुवात केली. पण स्मार्ट फोन येईपर्यंत न थांबता त्यांनी साध्या फोनवरून मुलांचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली.

संध्याकाळी मुलं ऊसतोडणीवरून परतली की रोहिणीताई त्यांना फोन करतात. पाठ्यपुस्तकातल्या एकेक पानाचं वाचन करून त्यातला आशय समजावून सांगतात. प्रश्‍न विचारतात. त्यांना वहीत उत्तरं लिहायला सांगतात. मुलं दमलेली असतात, तरीही रोज तास-दीड तास ही अनोखी फोनशाळा चालते. दिलेला अभ्यास करूनच ती झोपतात.

अशा प्रकारे शिकवण्याला मर्यादा आहेत, याची रोहिणीताईंना जाणीव आहे. पण ही मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून तुटू नयेत, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याचे इतरही काही चांगले परिणाम जाणवताहेत. या दोघांमधला एक आकाश शाळेत असताना बुजरा होता. पण आता या नव्या पद्धतीमुळे त्याची भीड चेपून तो फोनवर बोलू लागलाय. आपलं म्हणणं सांगू लागलाय, असं रोहिणीताई नोंदवतात. अभ्यासाची फारशी गोडी नसणारा रामही आवर्जून अभ्यास करतोय. विशेष म्हणजे ऊसतोडणीच्या टोळीत असलेल्या इतर लहान मुलांचा अभ्यासही ही पोरं घेऊ लागली आहेत. रोहिणीताईंना या कामी त्यांचे मुख्याध्यापक ठोंबरे सर मदत करताहेत.

अनुभवा, शिका, मजा घ्या

नाशिक शहरात आनंदवल्ली परिसरात महापालिकेची एक शाळा आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या या शाळेत आजूबाजूच्या वस्तीत राहणारे बिगारी कामगार, वॉचमन, घरकामगार यांची मुलं तिथे शिकतात. बहुतेकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. घरातलं वातावरणही शिक्षणाला पोषक नाही. पालक चरितार्थाच्या चिंतेत असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे म्हणावं तेवढं लक्ष देऊ शकत नाहीत. अशा मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून शाळेतील उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव मॅडमनी लॉकडाउनच्या काळात जीवन कौशल्याला चालना देणारा ‘माझं घर-माझं अभ्यासकेंद्र’ हा उपक्रम सुरू केला.

पाठ्यपुस्तकी अभ्यासातून सुटका झाल्यामुळे मुलांनाही हा उपक्रम खूप आवडला आहे. काय घेतात कुंदा मॅडम या उपक्रमात? स्वतःच्या कपड्यांना बटणं लावणं, उसवलेले कपडे शिवणं, भाजी निवडणं, स्वयंपाकघरात आईला मदत करणं, आपल्या लहान भावंडांबरोबर विविध खेळ खेळणं, विविध विषयांवर विचार करून स्वतःचं म्हणणं लिहिणं किंवा बोलून दाखवणं, आई-बाबांच्या आवडीनिवडी आणि त्यांच्या कामाविषयीची माहिती घेणं, आजी-आजोबांकडून त्यांच्या काळातील गोष्टी समजून घेणं, घरातील ऐतिहासिक वस्तूंविषयी माहिती मिळवणं, आपल्या भावंडांना गोष्टी सांगणं, स्वयंपाकघरातील विविध पदार्थांंचं वर्गीकरण करून त्यांच्यातील पोषकतत्वं शोधणं, पाण्याचं बाष्पीभवनसारख्या कृतींचं निरीक्षण करणं, आंघोळीसाठी लागणार्‍या पाण्याचं  मापन व बचत, घरातील विविध वस्तूंचं भौमितिक आकाराच्या दृष्टीने निरीक्षण करणं, घरातील दरवाजांची, खिडक्यांची दिशा समजून घेणं, आकाशातील सूर्य,चंद्र, तारे यांच्या रोज बदलणार्‍या स्थानाचं निरीक्षण करणं आणि त्याच्या नोंदी ठेवणं, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणं अशा भरपूर कृती कुंदामॅडम विद्यार्थ्यांकडून करून घेताहेत. या कृती मजेशीर व नावीन्यपूर्ण असल्यामुळे मुलांनाही त्या करताना आनंद मिळतो आहे. त्यातून मुलांना विविध गोष्टींचं ज्ञान मिळत आहे. घरातील सदस्यांचासुद्धा या कृतीत समावेश करून घेतल्यामुळे त्यांनाही आपल्या मुलांबरोबर काहीतरी केल्याचा आनंद मिळतोय. शिवाय मुलांची घरकामामध्ये मदतही होऊ लागली आहे. कुंदा मॅडम आठवड्यातून एकदा मुलांची ऑनलाइन चाचणी घेतायत. त्यातून मुलांची निरीक्षण क्षमता, जिज्ञासा, चौकसपणा, वैज्ञानिक दृष्टीकोन, स्वावलंबन व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास वाढला असल्याचं लक्षात येतंय.

घरोघरी शिक्षक जाती

नंदुरबार या आदिवासी जिल्हातील नवापूर तालुक्यातील एक बोरवण गाव. गावात फक्त आदिवासी समाजाचे लोक राहतात. लोकांचा मुख्य व्यवसाय शेतमजुरी व बांबूच्या टोपल्या बनवणे. गावात पहिली ते चौथी जिल्हा परिषदेची शाळा आहे. तुटपुंज्या मजुरीवर जगणारे पालक आपल्या मुलांना ऑनलाइन शिक्षण कसं उपलब्ध करून देणार? शिवाय गावात इंटरनेट तर सोडाच, पण साध्या फोनलाही रेंज नाही, अशी परिस्थिती.

रायगड येथून बोरवणला बदली होऊन आलेले शिक्षक दिलीप नरशी गावित यांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी फिजीकल डिस्टन्सिंग पाळून मुलांच्या घरोघरी जाऊन शिक्षण पोहचवण्याचा उपाय शोधला. त्यासाठी आधी त्यांनी कोरोना विषाणू, त्याचा प्रसार कसा होतो, हात धुणं, फिजीकल डिस्टन्सिंग पाळणं, मास्क लावणं, नाकातोंडाला हात न लावणं कसं गरजेचं आहे, हे मुलांना आणि त्यांच्या पालकांना समजावून सांगितलं. आणि मग सुरू झालं ऑफलाइन शिक्षण.

गावित यांनी स्वतः तयार केलेल्या, तसंच राज्यातल्या विविध शिक्षकांनी तयार केलेल्या साधन सामुग्रीची प्रिंट काढून पुस्तक तयार केलं. त्याच्या झेरॉक्स काढून त्या विद्यार्थ्यांना दिल्या. मुलांना आठवड्याभरासाठी काम देऊन पुढच्या आठवड्यात ते काम तपासायला जायचं, अशी पद्धत त्यांनी आखली. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक नोंदवही ठेवून रोज काय केलं याची नोंद करण्याचीही सवय लावली. तसंच विद्यार्थ्यांना चित्रकला, मातीकाम, रंगकाम आणि इतर छोटे छोटे प्रयोग करण्यासाठी मार्गदर्शन-प्रोत्साहन देण्याचं कामही गावित सर करतात. यासाठी गटशिक्षणाधिकारी चौरे सर, विस्तार अधिकारी पवार मॅडम, केंद्रप्रमुख कदमबांडे सर व मुख्याध्यापिका यशोदा वसावे मॅडम यांचं उत्तम सहकार्य लाभल्याचं ते सांगतात.

संतोष मुसळे

९७६३५२१०९४

santoshmusle1515@gmail.com

 

 


 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी