स्वत: पलीकडे - वृषाली जोगळेकर

 मी-माझं कुटुंब-माझे नातेवाईक या मर्यादित परिघाचं वर्तुळ ओलांडून दुसर्‍यांसाठी धडपडण्यात आनंद मानणार्‍या सामान्यांमधल्या कर्तबगारांची ओळख.

डॉ. रवींद्र कसबेकर

‘कुठल्याही देशातील समाजाची ओळख तिथले लोक पशुपक्ष्यांशी, प्राण्यांशी कसे वागतात यावरून ठरते, त्याबाबतीत आपल्या देशाची ओळख लाजिरवाणी वाटते.’ डॉक्टर रवींद्र कसबेकर सांगत होते. डॉ. कसबेकर पुण्यातील एक प्रख्यात अनुभवी सर्जन आहेत. ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराच्या रुग्णांवर उपचार आणि ऑपरेशन्स करतात. यातून मिळणार्‍या उत्पन्नामधला सर्वाधिक वाटा ते समाजाने उपेक्षा केलेल्या अनाथ कुत्र्यांना सांभाळण्यासाठी खर्च करतात. सध्या त्यांच्याकडे १०००-१२०० कुत्र्यांना निवारा मिळालेला आहे. 

अर्थात हे काम एकटे डॉक्टर करत नाहीत. पद्मिनी स्टम्प या त्यांच्या मैत्रीणीने कुत्र्यांचं शेल्टर होम स्वत:च्या बंगल्यात अगोदरच सुरू केलेलं होतं. पद्मिनी यांचा तरुण मुलगा एका अपघातात अचानक गेला. सैरभैर झालेल्या पद्मिनी यांना स्वत:ला सावरणं आवश्यक होतं. त्यासाठी त्यांची प्राणीप्रेमाची आवड त्यांच्या मदतीला आली आणि शेल्टर होमची सुरुवात झाली. या कामाला डॉक्टरांची भरभक्कम साथ मिळाली. लहानपणापासूनच डॉक्टरांना कुत्र्यांची आवड होती. इतकी की शाळेत शिकत असताना शाळेत जाण्यायेण्यासाठी बसचे पैसे मिळत त्यातले एकावेळचे पैसे चालत येऊन ते वाचवत असत आणि त्या पैशांमधून रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी बिस्कीटं घेत असत.

पद्मिनी आणि डॉक्टर यांच्या प्राणीप्रेमातून कुत्र्यांना निवारा देण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. रस्त्यावर फिरणार्‍या कुत्र्यांना इथे निवारा दिला जातो. त्यांना खायला प्यायला दिलं जातं. त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. अपघातात सापडल्यामुळे अथवा अन्य काही कारणांनी जखमी झालेल्या कुत्र्यांवर उपचार केले जातात. इथे येणार्‍या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बारा-तेरा कर्मचार्‍यांची नियुक्तीदेखील केलेली आहे. मात्र डॉ. रवींद्र आणि पद्मिनी स्टम्प या दोघांनी या कामात स्वत:ला झोकून दिलेलं आहे. पद्मिनी तर पूर्ण वेळ हेच काम करतात. डॉक्टर आपली प्रॅक्टिस सांभाळून पण तरीही नियमितपणे दिवसातले पाच-सहा तास या कामासाठी देतातच.

डॉक्टरांचा दिवस सुरू होतो सकाळी सहाच्या सुमारास, कुठल्यातरी पेशंटच्या कॉलने. पुढचे दीड-दोन तास कधी पेशंटचे तर कधी हॉस्पिटलचे फोन सुरूच असतात. त्यानंतर स्वत:चं सगळं आवरून डॉक्टर क्लिनिकला जातात. दोन तास तिथे पेशंट तपासल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्स आणि राउंडसाठी जातात. साडेपाच-सहाच्या सुमारास त्यातून मोकळे झाले की गाडी काढतात आणि शंकरशेट रोडवर असलेल्या कुत्र्यांच्या शेल्टर होमला जातात. तिथे प्रवेश केला की ते फक्त आणि फक्त कुत्र्यांचे पालक असतात. खरं तर तिकडे जातानाच त्यांचं हे पालकत्व सुरू होतं. जाताना ते कुत्र्यांची औषधं, खाणं अशा आवश्यक गोष्टी घेऊन जातात. कुत्र्यांना खायला घालणं, त्यांची शीशू, त्यांना फिरवणं या सगळ्या कामात डॉक्टर सक्रीय मदत करतात. त्यानंतर तिथून निघताना गाडीमध्ये दोन-तीन मोठ्या बादल्या भरून कुत्र्यांचं खाणं घेऊन निघतात. शंकरशेट रोड ते औंधमधलं त्यांचं घर, या प्रवासात रस्त्यात दिसणार्‍या प्रत्येक बेवारस कुत्र्याला ते खायला देतात. दररोज किमान शे-दीडशे कुत्री त्यांना वाटेत भेटतात. त्यामुळे अर्ध्या-पाऊण तासाच्या या प्रवासासाठी डॉक्टरांना चारेक तास सहज लागतात. रात्री दीड-दोनच्या आसपास ते घरी जातात. २००६ सालापासून आतापर्यंत डॉक्टरांचा हाच दिनक्रम आहे. ते पुण्याबाहेर असतील ते दिवस वगळले तर त्यात खंड पडत नाही. कोरोनाच्या काळात तर डॉक्टरांचं काम आणखीनच वाढलं. कारण कुत्र्यांना बाहेर काही खायला मिळण्याच्या शक्यता जवळपास संपुष्टात आल्या. ‘बायका जितक्या सहजतेने केसांचे भाग करून पेड गुंफत वेणी घालतात तितक्याच सहजतेने मी माझी दोन्ही कामं करतो, त्यात विशेष असं काही नाही.’ आपल्या व्यग्र दिनक्रमाविषयी डॉक्टर इतक्या सहजपणे सांगतात.

दिवसभरात डॉक्टरांना कोणी अमूक ठिकाणी एखादं जखमी कुत्रं आहे असं कळवलं तर ते तिथे जाऊन कुत्र्याला स्वत:च्या गाडीत घालून शेल्टर होममध्ये सोडतात. कुत्र्यांसाठी वेगळी गाडी नाही. ‘खरं तर ती गाडी कुत्र्यांचीच आहे, मीच माझ्या सोयीसाठी ती वापरत असतो’ असं ते म्हणतात. डॉ. जयभारत, डॉ. तुळपुळे असे काही व्हेटर्नरी डॉक्टर्स या शेल्टर होमशी जोडलेले आहेत. जखमी, आजारी कुत्र्यांवर ते उपचार करतात.

आपल्याकडे प्रत्येक धर्मात भूतदया सांगितलेली आहे, पण प्रत्यक्षात ती अवलंबणारे लोक तसे कमीच असतात. मोकाट फिरणार्‍या बेवारस कुत्र्यांना खायला घालणं तर सोडाच पण अनेकजण त्यांच्याशी अमानुष, विकृत पद्धतीने वागतात असं डॉक्टरांचा अनुभव सांगतो. कुत्र्याची शेपूट ओढणं, दगड मारणं आणि कहर म्हणजे त्याच्या गुदद्वारात, योनीमार्गात नळी, काडी असं काहीतरी खुपसणं यातून लोकांना कुठला आनंद मिळतो कळत नाही. प्रेमाने वागता येत नसेल तर किमान त्रास देऊ नका असं डॉक्टर कळकळीने सांगतात.

घरात कुत्रा पाळणार्‍या लोकांना बहुतेकवेळा विदेशी जातीचा कुत्राच हवा असतो. त्यामुळे गावठी कुत्र्यांना वाली उरत नाही. बर्‍याच वेळा हौसेने घरी नेलेल्या कुत्र्याचा, मग तो विदेशी असला तरी, कंटाळा येतो. त्याच्यासाठी द्यायला पुरेसा वेळ नसतो. कधी हा कुत्रा आजारी पडतो. अशा कारणांमुळे या कुत्र्यांना रस्त्यांवर सोडून दिलेलं असतं. घरात राहण्याची सवय झालेल्या बर्‍याचशा कुत्र्यांना बाहेर स्वत:चं संरक्षण नीट करता येत नाही. मग त्यांना अपघात तरी होतात किंवा ते आजारी तरी पडतात. ब्रीडिंग करुन कुत्र्यांची पिल्लं विकणारे काही जण मादी कुत्रीची प्रजननक्षमता संपली की तिला सोडून देतात. अशा सगळ्या कुत्र्यांचं पालकत्व पद्मिनी आणि डॉक्टरांनी घेतलेलं आहे. कुत्र्यांच्या सहवासात राहिल्याने काही आजार होतात ही एक अफवा आहे असं डॉक्टर ठामपणे सांगतात.

या कामाचा आर्थिक भार डॉक्टरांनी उचललेला आहेच पण वर म्हटल्याप्रमाणे कुत्र्यांची कुठल्याही प्रकारची सेवा करताना ते मागेपुढे बघत नाहीत. कुत्र्यांची संख्या वाढायला लागली तशी शंकरशेट रोडवरची जागा अपुरी पडायला लागली. याच दरम्यान सासवडच्या अण्णासाहेब जाधवराव या सद्गृहस्थांनी आपली जागा या कामासाठी देऊ केली. आता शंकरशेट रोड आणि सासवड अशा दोन ठिकाणी कुत्र्यांसाठी शेल्टर होम्स आहेत. या सगळ्या प्रवासात शेल्टर होमने आतापर्यंत सात ते आठ हजार कुत्री लोकांना दत्तक दिलेली आहेत. पण ती देताना त्या कुटुंबाची कसून तपासणी केली जाते. मूल दत्तक देताना ज्या पद्धतीने त्या कुटुंबाची माहिती घेतली जाते त्याच पद्धतीने ही प्रक्रिया घडते.   

वास्तविक कुठल्याही शहराची एकूण लोकसंख्या आणि त्या शहरात असणारी कुत्र्यांची संख्या यात खूप फरक आहे. शहरातल्या प्रत्येक कुटुंबाने अगदी आळीपाळीने जरी कुत्र्यांना खायला घालायचं ठरवलं तरी सगळ्या कुत्र्यांचं पोट भरेल. पण तसं होत नाही. धार्मिक दृष्टीने बघितलं तरी कुत्रा हा दत्तगुरुंबरोबर दिसणारा प्राणी आहे. आपल्या अडचणी, समस्या घेऊन लोक दत्ताच्या दर्शनाला जातात, त्याला साकडं घालतात. पण कुत्र्यांची मात्र उपेक्षा करतात. प्रत्यक्षात काही मनोरुग्णांसाठी कुत्र्यांचा सहवास हा प्रभावी उपचार ठरतो असा डॉक्टरांचा अनुभव आहे. तर परदेशात एक अंध महिला कुत्र्याच्या सोबतीने आणि मदतीने तिचे दैनंदिन व्यवहार करत असल्याचं डॉक्टरांनी बघितलं आहे. थोडक्यात आपण त्रास दिला नाही तर कुत्रा उपद्रवी न ठरता उलट उपयोगी पडणारा प्राणी आहे. शक्य असेल तिथे आणि शक्य असेल तेव्हा डॉक्टर लोकांना या बाबतीत मार्गदर्शन करत असतात. एकीकडे कॅन्सरच्या रुग्णांच्या वेदना कमी करण्याचं काम तर दुसरीकडे बेवारस कुत्र्यांना निवारा.. दोन्ही कामं तितकीच महत्त्वाची आणि मोलाची.

पद्मिनी स्टंप आणि डॉ. कसबेकर यांच्या कामातून प्रेरणा घेऊन पशुपक्षी आणि प्राण्यांशी वागण्याच्या पद्धतीत सगळ्यांनी जाणीवपूर्वक बदल केले तर याही बाबतीत आपल्या देशाची ओळख अभिमानास्पद व्हायला वेळ लागणार नाही. 

डॉ. रवींद्र कसबेकर

९८२२०३७३९३

missionpossiblepune.org

 प्रिया नहार   

सामाजिक काम सातत्याने करत राहणं वाटतं तितकं सोपं काम नाही. शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम असणार्‍या व्यक्तींनाही जगण्याच्या रोजच्या संघर्षात स्वत:पलीकडे जाऊन समाजासाठी काही करणं शक्य होतंच असं नाही. असं असताना स्वत:च्या शारीरिक मर्यादांचा बाऊ न करता, समाजातील दिव्यांग मुलांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचं आव्हान पेलणं हे विशेषच म्हणावं लागेल. यश क्लास आणि ओपल फाउंडेशन फॉर बेटर फ्युचर या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका प्रिया नहार यांनी हे आव्हान पेललं आहे. दिव्यांग आणि विशेष असलेल्या २० मुलांचं पालकत्व प्रियाताई स्वबळावर निभावत आहेत.

लहानपणी बहुतेक सगळ्या मुलांप्रमाणे डॉक्टर होण्याचं स्वप्न बघणार्‍या प्रियाताईंच्या आयुष्यात अचानकच प्रचंड उलथापालथ झाली. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांना पोलिओचा तीव्र झटका आला. आईवडिलांनी उपचारांमध्ये काही कसूर ठेवली नाही. पण उपयोग झाला नाही. पुढची दोन वर्षं प्रियाताई पलंगाला खिळून होत्या. त्यानंतर त्यांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्या त्या कायमच्याच. (अजूनही खाली पडल्या तर त्या आपल्या आपण उठू शकत नाहीत.) यानंतर अडखळत का होईना पण त्या चालायला लागल्या. आईवडिलांनी त्यांना परत शाळेत घातलं. शिक्षणात चांगलीच गती असल्याने शालेय शिक्षण त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडलं. यानंतर शारीरिक अपंगत्वामुळे विज्ञान शाखेला जाण्याचा प्रश्न निकाली निघाला. त्या वाणिज्य शाखेत दाखल झाल्या. पदवीनंतर नोकरीसाठी बाहेर जाणं शक्यच नव्हतं, म्हणून त्यांनी घरातल्या घरात मुलांचे क्लासेस सुरू केले. एकीकडे पोस्ट-ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं. प्रियाताईंच्या शिकवण्याच्या हातोटीमुळे त्यांच्या क्लासचा कधी विस्तार झाला हे त्यांनाच कळलं नाही. मुलांची संख्या वाढल्याने त्यांनी प्रभात रोडवर नवीन जागेत क्लासेस सुरू केले. कुठलीही जाहिरात न करता केवळ क्लासमधील मुलांच्या रिझल्टमुळे त्यांच्याकडच्या मुलांची संख्या वाढत गेली. आता ती शंभरच्या वर पोहोचली आहे. त्यासाठी काही तज्ज्ञ शिक्षक त्यांनी नेमले आहेत. प्रियाताई स्वत: अर्थशास्त्र आणि गणित शिकवतात.

हा व्यवसाय स्थिरस्थावर झाला आणि त्यांनी ‘ओपल फाउंडेशन फॉर बेटर फ्युचर’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. यासाठी बंधू अमोल नहार यांची मदत त्यांना मिळाली. प्रियाताई म्हणतात, “पोलिओ झाला तरी माझ्या बाबतीत सुदैवाने सगळं चांगलं घडत गेलं. आई-वडील, भाऊ, मित्र यांचा भक्कम पाठिंबा अणि प्रोत्साहन यामुळेच मी स्वत:ची प्रगती करू शकले. पण समाजातल्या बहुतांशी विशेष मुलांना बिकट परिस्थितीतून जावं लागतं. त्यांचं आयुष्य सोपं व्हावं, त्यांना प्रगतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ओपल फाउंडेशनच्या माध्यमातून मी प्रयत्न सुरू केले आहेत.”

प्रियाताई या मुलांची शासकीय स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी करून घेतात. ते करताना मुलांचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल या बाबतीतही त्या दक्ष असतात. या मुलांना सामान्य प्रवाहात आणून सोडायचं स्वप्न बघणार्‍या आणि त्यासाठी हरतर्‍हेने प्रयत्न करणार्‍या प्रियाताईंचा उत्साह कोणाही संवेदनशील व्यक्तीला लाजवेल असा आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांतील दुर्गम भागांतून प्रियाताईंकडे मुलं आली आहेत. यांपैकी बहुतेक मुलांनी फर्ग्युसन आणि गरवारे कॉलेजमधून कला शाखेत विशेष श्रेणीत पदवी संपादन केली आहे. या  मुलांचा जेवणखाण, शिक्षण आणि वैद्यकीय खर्च प्रियाताई आपल्या क्लासच्या उत्पन्नातून करतात. त्यांचं हे काम बघून आपटे रोडवरील डॉ. नारळकर यांनी मुलांना राहण्यासाठी प्रशस्त जागा उपल्ब्ध करून दिली आहे. काही मुलं शासकीय वसतिगृहातही राहतात. स्वत:ची दैनंदिन कामं करणं, स्वच्छता राखणं, कॉलेजला आणि क्लासला जाणंयेणं या बाबतीत ही मुलं स्वयंपूर्ण झाली आहेत. या मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करताना लेक्चर्स रेकॉर्ड करून ती गुगल ड्राइव्हवर सेव्ह केली जातात. आपल्या मेल अ‍ॅक्सेसवरून ते ऐकून ऐकून मुलं पाठ करतात. परीक्षेत लेखनिकाच्या मदतीने आपले पेपर सोडवतात. प्रियाताईंच्या नियमित क्लासचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि हे विशेष विद्यार्थी यांच्यात जिव्हाळ्याचे बंध निर्माण झाले आहेत. या मुलांना त्यातूनच लेखनिक मिळतात. हे बघून प्रियाताईंनाही अधिक काम करण्यासाठी बळ मिळतं. त्यातून नवनवीन उपक्रम जन्माला येतात.

यापैकीच एक उपक्रम म्हणजे दिव्यांगांसाठीचं फिटनेस सेंटर. विशेष मुलांसाठी सुरू झालेलं हे महाराष्ट्रातलं पहिलंच फिटनेस सेंटर आहे. या फिटनेस सेंटरमध्ये स्वत:ची जिम असलेले अतुल कुरपे, योग प्रशिक्षक चंद्रशेखर मांडके, डॉ. सागर पाटणकर हे प्रियाताईंचे मित्र सेवाभावाने मुलांच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन त्यांच्याकडून नियमित व्यायाम करून घेतात.

ही मुलं पणत्या, चॉकलेट्स, भेटकार्ड अशा वस्तू बनवतात. या वस्तूंच्या विक्रीसाठी ओपल फाउंडेशन प्रदर्शन भरवतं. या प्रदर्शनाची सगळी जबाबदारी मुलंच पार पाडतात. गेल्या दिवाळीत तीन दिवसांत त्यांनी पस्तीस हजार रुपये मिळवले. हे सगळे पैसे त्या त्या मुलांच्या खात्यावर जमा केले जातात. काही मुलं ग्राफिक डिझाइनमध्ये अव्वल आहेत, त्यांच्या पेंटिंग्जचं प्रदर्शन भरवून त्यातून मिळणारा पैसा त्या मुलांना दिला जातो. या मुलांसाठी शासकीय नोकर्‍यांमध्ये राखीव जागा आहेत, पण त्या पुरेशा नाहीत. शिवाय सगळीच मुलं या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतात असंही नाही. प्रियाताई त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी खासगी नोकर्‍या मिळवून देणं किंवा त्यांच्यातल्या क्षमता ओळखून त्यांना व्यवसाय सुरू करून देण्याच्या प्रयत्नांत असतात. बाजारात कागदी पिशव्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रियाताईंनी रद्दी पेपरच्या पिशव्या बनवण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. मुलांना त्यातून एक उद्योग मिळाला आहे.

भविष्यात सामान्य मुलांबरोबर दिव्यांग आणि विशेष मुलांना एकाच वर्गात शिक्षण मिळेल अशा पद्धतीचं ओपन स्कूल सुरू करण्याचं प्रियाताईंचं स्वप्न आहे. त्यासाठी परदेशातील काही शाळांबरोबर त्यांची बोलणी सुरू आहेत. प्रियाताईंची आतापर्यंतची वाटचाल बघितली तर त्यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात येईल याबाबत खात्री वाटते.    

प्रिया नहार 

९६०७८२७८६८

yashclasses.in

 

सूर्यकांत भांडे पाटील

सूर्यकांत भांडेपाटील यांचं काम अगदी वेगळ्या स्वरूपाचं आहे. ते अपहरण झालेल्या लहान मुलांना सुखरुप सोडवतात त्या पीडित कुटुंबाला आधार देतात, मदत करतात, न्याय मिळवून देतात, ते देखील पूर्णपणे मोफत. आतापर्यंत त्यांनी सव्वाशेच्या आसपास अपहृत मुलांना सोडवलेलं आहे.

मूळचे शिरवळचे असलेले सूर्यकांत पुण्यात बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करायचे. त्यांचं कुटुंब शिरवळलाच राहात होतं. २९ नोव्हेंबर १९९९ हा दिवस त्यांच्यावर दुःखाचं सावट घेऊन आला. त्यादिवशी त्यांचा तीन वर्षांचा लहान मुलगा संकेत याचं अपहरण झालं. अपहरणकर्त्याने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस तपास सुरू झाला. महिन्यांवर महिने पुढे सरकत होते. पोलिसांना काहीही धागेदोरे सापडत नव्हते. पोलिस स्टेशनला हेलपाटे घालण्याखेरीज सूर्यकांत यांच्या हाती काहीही नव्हतं. मात्र धीर सोडून चालणार नव्हतं. या हतबल पित्याने अखेर स्वतः तपासकार्यात सहभाग घेतला. दोन वेळा सापळा लावून अपहरणकर्त्याला खंडणी घेण्यासाठी बोलावलं. मात्र पोलिसांसमक्ष अपहरणकर्ता पैसे घेऊन पसार झाला. त्याच दरम्यान पुण्यामध्ये आणखी एक अपहरणाची घटना घडली. या दोन्ही घटनांमधील साम्य पाहून सूर्यकांत यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. तब्बल आठ महिन्यांच्या तपासानंतर अपहरणकर्त्यापर्यंत पोहचण्यात ते यशस्वी झाले. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. अपहरणकर्त्यांनी संकेतची हत्या केली होती.

या घटनेने भांडेपाटील कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला. नातेवाईक आणि परिचितांनी त्यांना मानसिक आधार दिला. त्यानंतर त्यांनी अशा घटनांमध्ये लोकांना मदत करायचं ठरवलं. त्यासाठी ‘स्पायसंकेत’ नावाची डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केली. या एजन्सीमार्फत ते पोलिस आणि पीडित कुटुंबीयांना आरोपीपर्यंत पोहोचण्यास मदत करतात. विशेष म्हणजे त्यासाठी ते एकही पैसा घेत नाहीत.

स्पायसंकेत एजन्सीकडून पोलिसांना इतर गुन्ह्यांच्या तपासामध्येही मदत केली जाते. खंडणी, अपहरण, ब्लॅकमेलिंग यासारखे गुन्हे, आर्थिक घोटाळे, जमिनीशी निगडीत वादविवाद, कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांशी संबंधित तक्रारी, वाहनचोरी यासारख्या अनेक प्रकरणांत स्पायसंकेत काम करते.

सूर्यकांत यांच्या पत्नी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. त्यांचा दुसरा मुलगा सौरभ हाही आईवडिलांच्या सामाजिक कार्यात हातभार लावत असतो. अलीकडेच सूर्यकांत आणि सौरभ यांनी एकत्रितपणे समुद्रातील अनुक्रमे ३६, ५७ आणि ८१ कि.मी एवढं अंतर पोहून पार केलं आहे. पितापुत्रांनी एकत्र केलेला असा हा जगातला पहिला उपक्रम आहे. तर आणखी एक ५ कि.मी. पोहण्याचा उपक्रम सौरभने आईवडिलांसमवेत केला आहे. आई, वडील आणि मुलगा यांनी एकत्र पोहोण्याच्या या विश्वविक्रमाची नोंद लिम्का रेकॉर्ड बुकने घेतलेली आहे. हे तिघंही काही मुलांना पोहोण्याचं आणि पाण्यात पडलेल्या लोकांचे जीव वाचवण्याचं (लाईफ गार्ड) प्रशिक्षण देतात. तसंच हे कुटुंब परिसरातील लोकांच्या कौटुंबिक आणि इतर समस्या सोडवण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतं. युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचीही त्यांची धडपड सुरू असते.

सूर्यकांत यांच्या या आगळ्यावेगळ्या कामावर आधारित ‘दृश्यम-अदृश्यम’ नावाचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यावर चित्रपटाचं कामदेखील सुरू आहे. सूर्यकांत यांचं काम अनेक संस्थांनी सन्मानित केलेलं आहे.

सूर्यकांत भांडे पाटील

९८२२२२३६८३

spysanket.com

 ...

वृषाली जोगळेकर

९८८१७१९८५२

vrushali.jogalekar@uniquefeatures.in

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

दोस्त गुरुजी - अनिल अवचट : सुहास कुलकर्णी