कोरोना कथा - मुकेश माचकर
राजा को रानी से प्यार हो गया
तिचं नाव राणी नव्हतं.
त्याचंही नाव राजा नव्हतं.
लॉकडाऊन उठवला जाऊ लागला, त्या काळात त्यांची पहिली भेट झाली होती.
मुंबईच्या एका उपनगरातल्या रेल्वे स्टेशनावरच्या, पूर्व आणि पश्चिम बाजूला जोडणाऱ्या पादचारी पुलावर.
दोन्ही डोळ्यांत फुलं पडलेली, स्क्रू थोडा ढिला असलेली गलिच्छ कपड्यांमधली हडकलेली अधू डोळ्यांची भिकारीण होती ती. त्या पुलावर रोज भीक मागणारी. कोरोनामुळे लॉकडाऊन लागलाय हे तिला कळलं ‘तिचा पूल’ दोन्ही बाजूंनी अडसर लावून बंद करण्यात आला तेव्हा. ती रोज पुलापाशी यायची, अडसर चाचपायची आणि हे कृत्य करणाऱ्यांना शिव्याशाप देत उपनगराच्या अंधार्या सांदीकोपर्यांत परतायची.
एक दिवस अडसर निघाले आणि ती पुन्हा तिच्या हक्काच्या जागेवर विराजमान
झाली. रेल्वे सुरू झाली नव्हती, पुलावरून माणसांची ये-जा फारशी नव्हती. तिला भीकही फारशी मिळत नव्हती,
पण हक्काची जागा परत मिळाल्याचा आनंद होता.
त्याच काळात पुलावर काही गांजेकस पोरांचा मुक्काम पडला. अचकट-पाचकट बोलत चिलमीच्या कडक धुराचे झुरके मारत बसलेल्या या पोरांपैकी एकाला एकदा
तहान लागली. तो फिल्मी स्टायलीत ‘प्यासे
की प्यास बुझा दो’ म्हणत खाली आला आणि तिची बाटली घेऊन पळाला.
तिने त्याच्या खानदानाचा शेलक्या शब्दांत उद्धार केला. त्याने रिकामी बाटली तिच्या अंगावर फेकली. ती म्हणाली,
‘भरून कोण देणार, तुझा बाप?’ त्यावर तो खदखदा हसला खरा; पण दुपारी तिचा डोळा लागल्यावर
त्यानेच तिची बाटली भरून आणून दिली होती. सोबत बिस्किटचा अर्धा
पुडाही होता. संध्याकाळी त्याच्या दोस्तांनी आणलेल्या चहातला
थोडा चहा तिला मिळाला. ‘रात्री जेवायला आमच्यात ये’, असंही त्याने तिला सांगितलं. रात्री त्याच्याकडच्या क्वार्टरमधली
थोडी देशी तिला मिळाली. त्याने आग्रह करकरून पाजली. खूप दिवसांनी डोकं हलकं झालं आणि शरीरही.
सकाळी ती त्याच्या अंथरुणावरच जागी झाली.
तेव्हापासून राजा-राणीची प्रेमकथा सुरू झाली. ती चाळिशीला टेकलेली होती, तो तिच्यापेक्षा लहान होता.
त्याचा चेहराही तिला कधी धड दिसला नाही. दोघांनाही
फिल्मी गाण्यांची आवड होती. त्याला गांजाची किक बसली की तो जिन्याच्या
रेलिंगवरून घसरत गाणी गायचा, सगळी झंकार बीट्स टाइप गाणी.
पायर्यांवर उलटा आडवा व्हायचा आणि तिच्या कुशीत
डोकं टेकवून झोपी जायचा, ती त्याच्या केसांतून हात फिरवत गात
राहायची, ‘कितना प्यारा तुझे रब ने बनाया, दिल करे देखती रहूँ’
‘राजा, अब तू मुझे छोड के कभी जायेगा तो नहीं,’
प्रेमाने घास भरवताना ती त्याला विचारायची, तेव्हा
तो तेवढ्याच फिल्मी पद्धतीने म्हणायचा, ‘तुझे छोड दूँ,
उससे पहले मेरी जान चली जाएगी’ मग ती गायला लागायची,
‘मुझे छोडकर जो तुम जाओगे, बडा पछताओगे,
बडा पछताओगे’ सगळी नशेडी पोरं नाचायला लागायची.
शहरातल्या सगळ्यात मोक्याच्या जागी आंदण मिळालेला दहा हजार चौरस फुटाचा
आलिशान खुला हवामहल सार्थकी लावायची.
‘राजा गेला!’ एके दिवशी सकाळी शेराने तिला हलवून जागं
केलं आणि सांगितलं तेव्हा तिला काहीच सुधरेना. वस्तीत काहीतरी
लफडा झाला होता, पोलिसांनी रात्रीच राजाला उचलला आणि बेदम मारला.
लॉकअपमध्येच त्याचा जीव गेला, पण कोरोना डेथ दाखवली,
असं काहीतरी त्याने सांगितलं आणि तिची शुद्ध हरपली.
जागी झाली,
तेव्हा ती तिच्या नेहमीच्या जागेवर होती. पिशवीत
खाण्याचं साहित्य होतं, काही पैसे होते आणि पाण्याची भरलेली बाटली.
वरचा पूल आता शांत झाला होता.
तीन दिवस ती स्फुंदत, हंबरत, आरडत,
ओरडत होती. विरहाची फिल्मी गाणी गात होती.
हळुहळू स्वर क्षीण झाला आणि ती भानावर आली. बिस्किटं
खाऊन, घटाघटा पाणी पिऊन तिने ती बाटली रिकामी केली.
आता ती त्याच पुलावर पुतळ्यासारखी बसलेली असते. मध्येच तंद्री
लागते, तेव्हा ती भसाड्या आवाजात गायला लागते, ‘सपना मेरा टूट गया, तू न रहा, कुछ
ना रहा’ त्यात ‘देखो वो आ गया,’
असं म्हणत ती भेसूर हसते, तेव्हा तिच्या डोळ्यांतल्या
त्या निष्प्राण कवड्या विस्फारतात.
एका वेगळ्याच उपनगरात वेगळ्याच पुलानजीक दम मारत बसलेल्या कोंडाळ्यात
शेरा राणीची आठवण काढतो,
तेव्हा जोराचा झुरका घेऊन राजा काळीज पिळवटून गायला लागतो, ‘हम बेवफा, हरगीज न थे, पर हम वफा
कर ना सके’
मग तो खदाखदा हसतो, तांबड्यालाल डोळ्यांतून पाणी येईपर्यंत..
समाधान चहा, पिऊन तर पाहा!
“अरे यार, तुम्ही सापडलात का नेमके त्या खडूस म्हातार्याच्या तावडीत?” असं शरद म्हणाला, तेव्हा अजय आणि नितीन दोघांचेही चेहरे पडले. सकाळपासून
त्यांनी ज्या ज्या माणसाला दुकानाबद्दल सांगितलं होतं त्या त्या माणसाने त्यांना
‘अरे देवा, तुम्हाला नेमकं तेच दुकान सापडलं का?’
अशीच प्रतिक्रिया दिली होती. शरदसारख्या जिव्हाळ्याच्या
मित्राकडून वेगळी अपेक्षा होती;
पण तोही उखडला होता. “त्या म्हाताऱ्याचं आडनाव बनहट्टी नव्हे, नुसतंच हट्टी हवं होतं. हट्टी बनूनच जन्माला आलेला आहे तो.”
अजय म्हणाला, “पण ते दुकान ऐन नाक्यावरच आहे. शहरातली रहदारी तर तिथे आहेच, पण हायवेचीही रहदारी आहे.
व्यवसायाला उत्तम जागा आहे ती. ”
“त्यात शंकाच नाही,” शरदने पाठीवर थाप मारून सांगितलं, “पण दुकानाचा मालक इतका डेंजर आहे की तिथे दोनतीन महिन्यांच्या वर कुणी भाडेकरू टिकतच नाही. फार नियमांवर बोट असतं त्यांचं. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ फेऱ्या मारतो तो. कामच नाही दुसरं काही. वैतागतात मग भाडेकरू.”
नितीन म्हणाला, “आता बोलणी करून बसलोय, अॅडव्हान्सही दिलाय. आता माघार घेता येणार नाही.”
शरद बाइकला किक मारत म्हणाला, “मग ऑल द बेस्ट! मी जवळपासच दुसरं दुकान शोधून ठेवतो माझ्या एजंटला सांगून. तुम्हाला गरज पडणारच दोन-तीन महिन्यात. फार पर्मनंट स्ट्रक्चर तयार करू नका. नंतर उचकटायला लागेल.”
शरदची बाइक गेली त्या दिशेला पाहात नितीन अजयला म्हणाला, “आपण काहीतरी
चुकीचं करतोय, सगळी गणितं चुकतायत, असं
एक विचित्र फीलिंग येतंय रे.”
अजय म्हणाला, “अरे यार, दुकानाच्या शुभारंभाच्या
वेळेला असले विचार मनात आणू नकोस. आता माघार घ्यायची नाही.
फारतर नंतर दुकान बदलायला लागेल ना! बदलू की ते
गरज पडली तर. व्यवसाय म्हटलं की हे होणारच. तसंही लोकांना आपण मॅड आहोत, असं वाटतंच आहे की.”
मॅड तर ते दोघं होतेच. दोघंही चाळिशीतले. सुस्थापित नोकर्या करणारे. नोकर्या करत असतानाच एकमेकांना भेटलेले. पण दोघांनाही व्यवसायाची
खुमखुमी खूप. काहीतरी केलं पाहिजे, असं
दोघं चहा पिता पिता म्हणायचे आणि एके दिवशी एका इराण्याकडे बसलेले असताना नितीनला कल्पना
सुचली, ‘आपण चहाचंच दुकान सुरू केलं तर?’
“यू मीन टपरी?”
“नाही रे. नीट व्यवस्थित दुकान. एकदम वेगळ्या चवीचा चहा द्यायचा.”
“म्हणजे ते पुण्यातले फेमस चहावाले आहेत त्यांच्यासारखं? अरे पण त्यांची फ्रँचायझी घ्यायला १५-२० लाख पाहिजेत,
वर दुकानाचा खर्च, भाडं. परवडायचं कसं?”
नितीनचे डोळे चमकत होते, तो म्हणाला, “नाही,
आपण आपला चहा बनवायचा. आपल्या खास चवीचा.
आपलं समाधान होईपर्यंत प्रयोग करू आणि योग्य काँकॉक्शन सापडलं की ते
लॉक करू. तो आपला चहा.”
“समाधान चहा! ” अजय त्याच्या कपाला कप भिडवून म्हणाला
होता
त्यानंतर १५-२० दिवसांत सुमारे दीडशे लिटर दूध, पन्नासेक किलो साखर आणि वेगवेगळ्या प्रकारचे तीसेक किलो चहा खर्च केल्यानंतर
दोघांना इतरांसारखा नसलेला आणि दोघांच्याही मनाचं समाधान करणारा चहा गवसला आणि त्यांनी
हायवे पॉइंट नाक्यावरचं वीरेंद्र बनहट्टींचं दुकान भाड्याने घ्यायचं ठरवलं.
तिथेच गडबड झाली. तेव्हापासून प्रत्येक माणूस बनहट्टींच्या हट्टीपणाचे,
तिरसटपणाचे किस्से सांगत होता. बनहट्टींनी दुकान
देताना अनेक अटीशर्ती सांगितल्या होत्या, करारपत्राला मोठी पुरवणी
जोडली होती. पण असतात काही पुणेरी मालक, असं म्हणून अजय आणि नितीन गाफील राहिले होते. आता त्यांच्यावर
चिंतेत पडायची वेळ आली होती.
नेमका २२ मार्चच्या उद्घाटनाच्या आधीच चिंतेचा आणखी एक डोंगर कोसळला. आधी जनता कर्फ्यू आणि नंतर देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला. दुकान सुरू होण्याआधीच बंद पडलं. अजय-नितीनचे धाबे दणाणले. पैसे अडकले, भाड्याचा मीटर सुरू तर झाला. सेव्हिंग्ज मोडून व्यवसाय सुरू करताना अशा आघाताची कल्पनाही केली नव्हती. सगळ्यात वाईट म्हणजे, चांगल्या नोकऱ्या सोडून ‘चहाची टपरी’ टाकल्याबद्दल हिणवणाऱ्यांना नवं बळ मिळालं होतं. बनहट्टींनी तीन महिन्यांचं भाडं आगाऊ घेतलेलं होतं. डिपॉझिट वेगळंच आणि घसघशीत होतं. लॉकडाऊन सुरू होताच त्यांनी मेसेज पाठवला होता, दुकान बंद असलं तरी कराराप्रमाणे भाडं सुरू राहणार आहे, याची नोंद घ्यावी. सोबत करारातल्या त्या कलमाचा फोटो काढून पाठवला होता. करार असा की तो मोडला असता तरी डिपॉझिट जाणारच होतं आणि लॉकडाऊनमध्ये तो मोडणार तरी कसा?
अनलॉक सुरू झाल्यावर दोघांनीही ठरवलं, आता काहीही होवो, दुकान सुरू करू या. काही महिने प्रयत्न करू या. नाही जमलं तर मूर्खपणा केला म्हणून सोडून देऊ. आता पुन्हा नोकऱ्या मिळण्याची शक्यताही कमीच होती. हीच वाट चालण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
दुकान उघडण्यापूर्वीची तयारी सुरू झाल्यावर दोन दिवसांनी बनहट्टींच्या
फेर्या सुरू झाल्या. बोलायचे काही नाहीत, हे दोघं काय करतायत ते फक्त पाहायचे. चहा प्यायचे आणि
निघून जायचे. उद्घाटनाला अर्थातच बनहट्टींनाही बोलावलं होतं.
त्या दिवशी त्यांना जूनचं आगाऊ भाडंही द्यायचं होतंच.
घरातले लोक, जवळचे मित्र आणि बनहट्टी यांच्या उपस्थितीत
‘समाधान चहा’चा बोर्ड दुकानावर चढला. चहा-नाश्ता-मिठाईचे आणि पुष्पगुच्छांचे
सोपस्कार झाले आणि मंडळी पांगली. सगळे गेल्यावर अजयने बनहट्टींच्या
हातात पाकीट दिलं, “हे जूनचं अॅडव्हान्स
भाडं.”
बनहट्टींनी पाकिटातून नोटा काढल्या, मोजल्या. एक पाचशेची नोट मळकी होती, ती बदलून घेतली, पाकीट खिशात टाकलं. मग दुसर्या
खिशात हात घालून दुसरं पाकीट काढलं. नितीनलाही जवळ बोलावून घेतलं
आणि ते पाकीट दोघांच्या हातात ठेवलं.
दोघांनी विचारलं, “हे काय?”
बनहट्टी म्हणाले, “तुम्ही आगाऊ दिलेलं तीन महिन्यांचं भाडं.”
नितीन म्हणाला, “पण, करारात तर..”
बनहट्टी म्हणाले, “करारात खूप गोष्टी लिहिलेल्या आहेत. पण कोरोनाचा उद्रेक होईल, लॉकडाऊन होईल, याची ना तुम्हाला कल्पना होती, ना मला. तुमचं दुकान सुरू होण्याच्या आतच बंद पडलं, त्यात तुमचा
काय दोष? मी रोज तुमची मेहनत पाहात होतो. आपली माणसं मुळात व्यवसायाच्या भानगडीत पडत नाहीत. सपाट,
सुरक्षित आयुष्य शोधतात. तुम्ही हे धाडस केल्याबद्दल
तुम्हाला किती बोल लागले असतील, याचीही मला कल्पना आहे.
त्यात तीन महिन्यांचं भाडं वाया जाणं तुम्हाला परवडणारं नाही.
ही माझी शुभशकुनाची भेट समजा. या महिन्यापासून
मात्र भाडं चोख द्यायचं एक दिवसाचाही उशीर खपवून घेणार नाही.” पायर्या उतरता उतरता बनहट्टी वळून म्हणाले,
“आणि हो, तुमचा चहा फक्कड आहे. चहा प्यायल्याचं समाधान देणारा आहे. ती चव मात्र कायम
ठेवा. मी रोज येऊन पिणार आहे, पैसे देऊन.
ज्या दिवशी चव बदलेल त्या दिवशी भाडं दुप्पट होईल एवढं मात्र बजावून
सांगतो! ”
अजय आणि नितीन पाठमोऱ्या बनहट्टींकडे आणि हातातल्या त्या पाकिटाकडे
अवाक् होऊन पाहातच राहिले!
मुकेश माचकर
९३२६४७३३४४
mamanji@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा