आमटेवृक्षाच्या छायेत - सुहास कुलकर्णी
महाराष्ट्राचे आद्य
समाजसेवक बाबा आणि साधनाताई आमटे ही मराठी माणसांच्या मनात वसलेली नावं. त्यांची मुलं-सुना,
म्हणजे विकास-भारतीताई, प्रकाश-मंदाताई आणि
पुढच्या पिढीपर्यंतचा आमटे परिवार गेली सत्तर वर्षं विविध सामाजिक कामांत गुंतलेला
आहे. या सर्वांशी आलेला संबंध आणि त्यातून कळलेलं त्यांचं वेगळेपण टिपणारा लेख.
गेल्या साठ-सत्तर वर्षांच्या काळात आपल्याला महाराष्ट्रात काही कुटुंबं
अशी दिसतात, ज्यांनी पिढ्यांमागून पिढ्या सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान दिलेलं आहे.
आमटे कुटुंब त्यातलं एक. बाबा आमटे हा या कुटुंबाचा मूळ पुरुष.
बाबा आमटे! एका अर्थाने दंतकथा बनलेला माणूस. आधुनिक संत, महामानव
अशा नामाभिधानांनी गौरवला जाणारा. खुद्द गांधीजींनीच त्यांना ‘अभय साधक’ म्हटलं होतं.
त्यामुळे याऊपर त्यांची आणखी मोठी ओळख काय असणार? कुणी कुणी त्यांचं
वर्णन ‘इंडियाज ओन मदर तेरेसा’ असं केलं आहे. पण आपण तुलनेत कशाला जा? मदर
तेरेसा त्यांच्या ठिकाणी थोर, बाबा त्यांच्या ठिकाणी.
आपला ज्या नजीकच्या इतिहासाशी संबंध आहे, त्यातील महानायकांना
म्हणजे उदाहरणार्थ, महात्मा गांधींना किंवा जवाहरलाल नेहरूंना आमच्या पिढीने स्वत:च्या डोळ्यांनी
पाहिलेलं नाही. स्वातंत्र्य चळवळीतील पहिली फळी आम्हाला समज येण्याआधीच काळाच्या पडद्याआड
गेलेली होती. पण ज्यांना ‘याचि डोळा’ बघण्याचा योग आला, त्यातले बाबा आमटे
महत्त्वाचे. मी तर असा नशीबवान, की मला बाबांना आणि त्यांच्या पत्नींना-
साधनाताईंना बघता-भेटता तर आलंच, शिवाय त्यांची मुलं डॉ. विकास-डॉ. प्रकाश,
त्यांच्या
सुना डॉ. भारतीताई-डॉ. मंदाताई आणि नातवंडांसोबतही वावरता आलं. या तीन पिढ्यांना बघून
‘आमटे’ हे काय रसायन आहे हे मला थोडंफार कळू शकलं. कुष्ठरोगी, अंध-अपंग-विकलांग,
निराधार
आणि आदिवासी यांच्यासाठी हे कुटुंब आरोग्य-शिक्षण-रोजगार-शेती-पाणी-उद्योग-घरबांधणी
अशा विविध क्षेत्रांत एवढं मोठं काम कसं करू शकलं, हे मी जवळून समजून
घेऊ शकलो. आणि एवढं सारं करूनही पिढ्यांमागून पिढ्या ही माणसं इतकी साधी का राहू शकली
हेही प्रत्यक्ष बघू शकलो. ते जमेल तेवढं सांगतो.
मला आठवतंय त्याप्रमाणे मी १९७८च्या आसपास पहिल्यांदा आनंदवनात गेलो.
बारा-तेरा वर्षांचा शाळकरी मुलगा असताना. माझं कुटुंब आधीपासून आमटे कुटुंबाशी जोडलेलं.
माझी तीनही थोरली भावंडं बाबांच्या श्रमसंस्कार शिबिराची प्रॉडक्ट्स. शिवाय इतरही संबंध.
मी गेलो तेव्हा ऑलरेडी बाबा ‘लिव्हिंग लिजेंड’ बनलेले होते. तेव्हाचं आनंदवन आजच्याइतकं
विकसित नव्हतं. बाबांचं घरही छोटं, बंगलीवजा होतं. आमचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे
मला आठवतं, आमचा त्यांच्या घरातला वावर अगदी अनौपचारिक होता. एका खोलीत बाबा एका
भरभक्कम कॉटवर पहुडलेले होते. उशीवर डोकं आणि डोक्याखाली एक हात दुमडलेला. कंबरेला
त्यांचा आयकॉनिक पट्टा. आम्हाला पाहिल्यावर त्यांनी मान उंचावून पाहिलं आणि हसत विचारपूस
केली. मला झालेलं बाबांचं हे पहिलं दर्शन.
मग दिवसभर आम्ही त्यांच्या घरीच होतो. घराचा चार्ज साधनाताईंच्या हातात असणार. त्या स्वैंपाकपाण्यात गुंतलेल्या आठवतात. डॉ. भारतीताई यांचं दोन वर्षांपूर्वीच डॉ. विकासभाऊंशी लग्न झालेलं. त्या तेव्हा आनंदवनाचा दवाखाना सांभाळत. त्यांनाही ओझरतं पाहिल्याचं आठवतं. घरात-आसपास माझ्याहूनही छोटी मुलं होती. त्यांच्याशी खेळत मी दिवस काढला आणि आम्ही परतलो. बाबांच्या घरात दिवसभर असूनही त्यांच्याकडे जाऊन दोन शब्द बोलण्याची तेव्हा ना बुद्धी होती, ना हिंमत. पण त्या दिवशी पाहिलेले बाबा आणि साधनाताई मनावर कायमचे कोरले गेले.
आणखी दोन-चार वर्षानंतर मोठ्या भावासोबत आनंदवनात गेलो. तेव्हा विकासभाऊंनी
आनंदवन फिरवून दाखवलं होतं. पांढरा पायजमा आणि अंगात बनियन असा त्यांचा वेश होता. तेव्हा
त्यांनी बरंच काही दाखवलं असणार; पण मला प्रामुख्याने आठवतेय ती तिथली शेती
आणि पाण्याने भरलेली तळी. माझा भाऊ कॉलेजवयीन असल्याने विकासभाऊ त्याच्याशीच बोलत होते.
तेव्हा बाबांबद्दल पुण्या-मुंबईतील दैनिकांचं मत चांगलं नसावं. ‘हे पेपरवाले आनंदवनात
न येता वेडंवाकडं लिहितात’, असं विकासभाऊ उद्वेगाने म्हणत असल्याचं
अंधुकसं आठवतं. दूर पुण्या-मुंबईची दैनिकं, त्यांचे संपादक,
बाबांचं
काम आणि त्यांच्यातील मतभेद हे तेव्हा माझ्या समजेच्या बाहेरचे असल्याने माझं तिकडे
लक्षही नसावं. पण एक पक्कं आठवतं. खूप दूर गेल्यानंतर एका रस्त्याच्या टोकाला विकासभाऊ
उभे राहिले आणि म्हणाले, “या रस्त्याच्या डाव्या बाजूचा भाग आपला
आणि उजवीकडचा भाग सरकारचा.” बघितलं, तर डावीकडचा भाग नजर पोहोचेपर्यंत झाडांनी
आणि शेतांनी हिरवागच्च भरलेला होता आणि उजवीकडचा भाग वैराण नि पडीक. आनंदवनात पाण्याने
भरलेली तळी आणि सरकारी भागात पाण्याचा खडखडाट. कंबरेवर हात ठेवून विकासभाऊंनी आम्हाला
विचारलं, “काय, फरक दिसतो की नाही? पुण्या-मुंबईचे संपादक इथे आले तर त्यांना
आमचं काम दिसणार ना! पण न येताच आणि काम समजून न घेताच लिहितात...” आपली बाजू ठसवण्याची
त्यांची ही पद्धत.
चारच वर्षांनी बाबांनी ‘भारत जोडो’ सायकल यात्रा काढली. आधी कन्याकुमारी ते काश्मीर; मग गुजरात ते आसाम. ते साल १९८४ होतं. पंजाबचा प्रश्न पेटलेला होता. फुटीरता देशाला व्यापून होती. इतरही प्रश्न होते. लोकांना जागं करण्यासाठी आणि एकवटण्यासाठी बाबांनी ही यात्रा काढली होती. मी पुण्यात कॉलेजमध्ये शिकत होतो. साने गुरुजींची मुलं म्हणून जे लोक प्रसिद्ध होते, त्यांच्यातील यदुनाथ थत्ते यांच्या संपर्कात होतो. ते बाबांच्या कामाशी सुरुवातीपासून जोडलेले होते. बाबा त्यांचं वर्णन ‘माझ्या स्वप्नांचा सहोदर’ असं करत. यदुनाथजी मला म्हणाले, “बाबा भारत यात्रेवर निघालेत. तू या कामात ये. पुण्याचं कार्यालय तू पहा. लोकांना यात्रेविषयी माहिती दे. पुण्यातल्या कार्यकर्त्यांना लागेल ती मदतकर.” मला हे सगळं नवं होतं, पण बाबांबद्दलच्या आकर्षणापोटी मी ‘हो’ म्हटलं. पुण्यात त्या काळी प्रसिद्ध असलेल्या ‘पूनम हॉटेल’च्या दर्शनी भागात एक खोली मिळाली, तिथे मी माझं ऑफिस थाटलं. कॉलेजाकॉलेजांत जाऊन प्रचार केला. ऑफिसमध्ये आल्या- गेलेल्याला माहिती दिली. बाबांच्या ओढीने कोण कोण लोक तिथे भेटायला येत, माहिती घेत. एक दिवस काठी टेकवत चक्क लोककवी मनमोहन भेटायला आल्याचं आठवतं.
त्या महिना-दोन महिन्यांच्या काळात मला बरंच काही शिकायला मिळालं. विशेष म्हणजे ‘भारत जोडो’ यात्रा पुण्यात आली, तेव्हा शेकडो कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अनपेक्षितपणे माझाही सत्कार झाला. तोही थेट बाबांच्या हस्ते, गळ्यात हार वगैरे घालून. ते वयच असं होतं की मी त्याने पुरता भारावून गेलो होतो. भारतातील एका अव्वल माणसाच्या हातून कौतुक झाल्याने मी आनंदून गेलो होतो.
पुढे बाबा नर्मदा आंदोलनाच्या समर्थनार्थ नर्मदाकिनारी कसरावदला गेले.
आनंदवनाची जबाबदारी विकासभाऊंवर आली. त्यांनीही कार्यकर्त्यांची नवी फळी उभारून आनंदवनाच्या
कामाचा पसारा प्रचंड वाढवला, गाडून घेऊन काम केलं. या काळात चार-दोन
पत्रांपुरता तेवढा एकमेकांंशी संबंध राहिला. ते त्यांच्या कामात, मी माझ्या.
कुणी आनंदवनात आलं-गेलं तर तिकडची खबरबात कळायची एवढंच.
कट टु २००५. थेट २० वर्षांनंतर विकासभाऊंशी पुन्हा एकदा संपर्क झाला. नुकतीच आम्ही ‘समकालीन’ ही प्रकाशन संस्था सुरू केली होती आणि आनंदवन प्रयोगावर पुस्तक करण्याची कल्पना पुढे आली होती. त्यांना तसं पत्र लिहिलं; पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. मग फोनाफोनी करून त्यांना भेटायला जायचं ठरवलं. आनंदवनात जाऊन भेटलो. त्यांनी चक्क पुस्तकाला नकार दिला. ‘आनंदवनाची प्रतिमा फक्त कुष्ठरुग्णसेवेशी जोडलेली आहे. प्रत्यक्षात इथे अनेक क्षेत्रांत पायाभूत काम झालंय ते जगाला कळायला पाहिजे’, वगैरे त्यांना सांगून बघितलं; पण विकासभाऊ ऐकेनात. ‘पुस्तक - बिस्तक काही नको. आमच्यावर (कौतुकाची) फुलं टाकू नका. समाजातले प्रश्न लवकरात लवकर सुटू देत, जेणेकरून आनंदवन बंद करून टाकता येईल,’ असं बरंच काही ते बोलले.
डॉ. भारतीताई या सौम्य स्वभावाच्या आणि समजूतदार. दुसर्यांचं ऐकून घेणार्या,
त्यावर
विचार करणार्या. म्हणून मग त्यांना भेटलो. त्यांचा प्रतिसाद सर्वस्वी वेगळा होता.
त्या म्हणाल्या, “असं पुस्तक व्हायलाच पाहिजे. करूयात आपण पुस्तक.” एवढं बोलून त्या थांबल्या
नाहीत. त्यांनी लगोलग आनंदवनातल्या सर्व प्रमुख बारा-पंधरा ज्येष्ठ कार्यकर्त्यांना
बोलावणं धाडलं. लगेच एक बैठक झाली. सर्वांनी पुस्तक कल्पनेचं उत्स्फूर्त स्वागत केलं.
पुस्तकात काय काय असावं, कुठली माहिती, कुठले मुद्दे महत्त्वाचे,
अशी
सांगोपांग चर्चा झाली. पुस्तक करायचं ठरलं. विकासभाऊंच्या नकाराचं भारतीताई बघून घेतील,
असं
ठरलं.
पुण्यात परतल्यावर आम्ही पुस्तकाचं नियोजन करू लागलो. कोण लिहील,
केव्हा
लिहील, विकासभाऊ वेळ केव्हा देऊ शकतील, वगैरे ठरवू लागलो.
पण विकासभाऊ काही दाद लागू देईनात. चौकशी केली, की विकासभाऊ कधी
सोमनाथला गेलेत, कधी झरी जामणीला गेलेत, कधी कामात आहेत, असे निरोप मिळू लागले.
त्यातून विकासभाऊंच्या मनात पुस्तक नाही, असं स्पष्ट होऊ लागलं. बाबांच्या प्रेमापोटी
आपण पुस्तक करायचं म्हणतो आणि विकासभाऊ त्याला प्रतिसाद देत नाहीत, हे बघून
खट्टू झालो. आम्ही त्या पुस्तकाचा नाद सोडून दिला.
म्हटलं, विकासभाऊ नाही म्हणताहेत तर प्रकाशभाऊंना विचारून बघू. हेमलकसा प्रकल्पाचंही
काम बरंच विस्तारल्याचं आम्हाला माहीत होतं. ‘अनुभव’च्याच एका कार्यक्रमासाठी आम्ही
त्यांना आणि मंदाताईंना पुण्यात बोलावलं होतं. तेव्हा त्यांच्या कामावर पुस्तक करण्याची
कल्पना सांगितली. ते म्हणाले, “आमचं काम पुस्तक लिहावं एवढं मोठं नाही.”
त्यांना म्हटलं, “तुम्ही त्या कामात असल्याने तुम्हाला तसं वाटत असेल. प्रत्यक्षात काम
मोठं आहे. तीस-पस्तीस वर्षांच्या कामाची गोष्ट सांगितली तर चांगलं पुस्तक होईल. त्याचा
तुमच्या कामालाही उपयोग होईल.” त्यांना पटलं. त्यांनी होकार दिला. लगोलग आमची सहकारी
सीमा भानू हेमलकशाला गेली. तिथे जाऊन तिने सगळं काम बघून, समजून घेतलं. प्रकाशभाऊ-मंदाताईंसह
सर्वांशी ती बोलली आणि तिने पुस्तक लिहिलं. नाव- प्रकाशवाटा. या पुस्तकाला मराठी वाचकांनी
अक्षरश: डोक्यावर घेतलं. ‘एक होता कार्व्हर’नंतर सर्वाधिक वाचलं गेलेलं पुस्तक असेल
हे. या पुस्तकानिमित्ताने कळलेल्या आमटे कुटुंबातील दुसर्या शाखेबद्दल नंतर सांगतो.
त्याआधी आमटे कुटुंबाच्या मूळ स्त्रीबद्दलची एक आठवण सांगतो, जेणेकरून
साधनाताईंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडी कल्पना येईल. ‘प्रकाशवाटा’ पुस्तकाचं काम सुरू
व्हायच्या आधी आम्ही जेव्हा आनंदवनात गेलो होतो, तेव्हा भारतीताई
आम्हाला साधनाताईंकडे घेऊन गेल्या होत्या. त्यांनीच आमची ओळख करून दिली. साधनाताई माझी
विचारपूस करू लागल्या, तर त्यांच्या लक्षात आलं, की अरे, हा तर आपल्या कुटुंबातला
आहे. त्यांनी मला शेजारी बसवून घेतलं. हातात हात घेतला, धरून ठेवला. आठवतील
तेवढ्या लोकांची आठवण काढली, ख्यालीखुशाली विचारली. सगळ्यांना आठवण काढल्याचं
सांग म्हणाल्या. त्यांना म्हटलं, “आनंदवनाच्या कामावर पुस्तक लिहिण्याची कल्पना
आहे. विकासभाऊ तयार नाहीत. तुम्ही सांगा त्यांना.” साधनाताईंचं बोलणं अगदी थेट,
स्पष्ट.
म्हणाल्या, “आनंदवनावर खूप काही लिहिलं गेलंय. बाबांवरही लिहिलं गेलंय. माझं ‘समिधा’
आहे. विकास नको म्हणतोय, तर तुम्ही प्रकाशच्या कामावर पुस्तक लिहा.
तो इतकी वर्षं एकटा जंगलात राहून काम करतोय, त्याच्याकडे कुणाचं
लक्षच नाही...” मी त्यांना म्हटलं, “करतो. त्यांच्यावरही करतो आणि आनंदवनावरही
करतो.”
त्या हसल्या. म्हणाल्या, “चला, तुम्ही आता जेवून
घ्या. आनंदवनात आलेला माणूस जेवल्याबिगर जात नाही, माहीत आहे ना?’
त्यांनी
कुणाला तरी हाक मारली आणि त्या म्हणाल्या, “सगळ्यांच्या जेवण्याची
सोय बघा.” मी त्यांना म्हटलं. ‘तुम्ही थांबा. आम्ही जेवून घेतो.’ त्यांनी माझ्याकडे
तिरप्या नजरेने बघितलं. म्हणाल्या, “तुम्ही माझे पाहुणे आहात. मी काय करायचं
ते तू मला सांगू नकोस!” त्या उठल्या. खरं तर त्या थकलेल्या होत्या. आयुष्यभर खस्ता
खाऊन जीर्ण झालेलं ऐंशीपार शरीर त्यांचं, पण मन उत्साही. एका हाताने काठी धरलेली
आणि दुसर्या हाताने माझा हात धरून त्यांनी आमची वरात काढली. त्या एवढ्यावरच थांबल्या
नाहीत. आम्ही जेवताना त्या शेजारी पूर्णवेळ बसून राहिल्या. ‘हे घे, ते घे;
हे वाढ,
ते वाढ’
असं म्हणत आग्रह केला. आम्ही ‘नको नको’ म्हटलं, की म्हणत,
“कसे
रे तुम्ही जवान लोक? तुम्ही काही जेवतच नाही!”
प्रेम व्यक्त करण्याची आणि आतिथ्य करण्याची त्यांची ही पद्धत जुनी होती, पण याही वयात त्यांनी ती जपलेली होती हे विशेष. आनंदवनात आलेल्या कुणाची साधनाताईंकडून तशी अपेक्षाही कशी असेल? पण ‘तुम्ही पाहुणे आहात आणि ही माझी रीत आहे’ असा त्यांचा खाक्या होता. पुढे तीन-चार वर्षांनी साधनाताई गेल्या. आता जेव्हा केव्हा मी आनंदवनात जातो, तेव्हा बाबांच्या शेजारीच बांधलेल्या त्यांच्या समाधीवर जाऊन त्यांना नमस्कार करून येतो- त्यांच्यासोबतच्या दोन-चार आठवणींना उजाळा देऊन येतो.
मूळ मुद्द्याकडे येऊयात. ‘प्रकाशवाटा’नंतर प्रकाशभाऊंचंच ‘रानमित्र’ नावाचं पुस्तक आम्ही काढलं. एक दिवस अचानक भारतीताईंचा आमच्या ऑफिसात फोन आला. माझी सहकारी गौरी कानेटकर हिच्यासोबत त्यांचं बोलणं झालं. भारतीताई म्हणाल्या, “मी रानमित्र बघितलं, वाचलं. खूप छान पुस्तक तुम्ही काढलंयत, म्हणून अभिनंदन करण्यासाठी फोन केला फक्त.” याच फोनमध्ये विकासभाऊंच्या मागे पडलेल्या पुस्तकाबद्दल पुन्हा बोलणं झालं. आणि काय आश्चर्य, विकासभाऊंचं पुस्तक पुन्हा जागं झालं. त्या म्हणाल्या, “तुम्ही सगळे या आनंदवनात आठ दिवस काढून. या वेळेस आपण सुरूच करू पुस्तकाचं काम. मुन्नाला (म्हणजे मुलगा कौस्तुभ) सांगते मी. तो करेल सगळं व्यवस्थित. तुमची ट्रिप वाया जाणार नाही.”
झालं, आम्ही पुन्हा आनंदवनात! या वेळेस सगळी सूत्रं कौस्तुभने हातात घेतली होती.
विकासभाऊंना मुलाखतीसाठी तयार करणं, कार्यकर्त्यांना कल्पना देऊन ठेवणं,
आवश्यक
माहिती कमी पडू न देणं आणि मुख्य म्हणजे विकासभाऊंचा रिव्हर्स गिअर पडणार नाही याची
दक्षता घेणं, असं सगळं त्याने केलं. तोपर्यंत आमची कुणाची कौस्तुभशी साधी ‘हाय-हॅलो’चीही
ओळख नव्हती. पण हे पुस्तक व्हावं अशी भारतीताईंप्रमाणे त्याचीही इच्छा होती. तेव्हा
तो आनंदवनाचं सगळं व्यवस्थापन बघत होता, आणि आनंदवनात उभं राहिलेलं काम लोकांपर्यंत
जायला हवं, हे त्याला कळत होतं. आम्हीही आनंदवनच्या प्रेमापोटीच हे पुस्तक लिहिण्याचा
उटारेटा करतोय, हे त्याला समजत होतं. त्यामुळे आमच्या तिथल्या वास्तव्यात तो आणि त्याची
बायको पल्लवी यांच्याशी आमचे सूर जुळून गेले आणि पाहता पाहता आम्ही एकमेकांचे मित्रच
बनून गेलो.
त्या आठ दिवसांच्या वास्तव्यात आम्हाला आनंदवनाचं आतून दर्शन झालं, आनंदवनाच्या आत्म्याच्या समीप जाता आलं. पाहता पाहता आम्ही आनंदवनाचे होऊन गेलो. प्रेमाचा नुसता भडिमार! विकासभाऊंचं पुस्तक होणार या विचाराने सगळे प्रमुख कार्यकर्ते अगदी आनंदून गेले होते. हा आनंद आमच्यासाठी ‘काय करू नि काय नको’ अशा पद्धतीने व्यक्त होत होता. नारायणराव हक्के, सुधाकर कडू गुरुजी, अरुणभाऊ कदम, हरिभाऊ बडे, डॉ. विजय पोळ, गजाननभाऊ वसू या मंडळींनी पुस्तकासाठी आम्हाला जे जे हवं होतं ते ते सांगितलं. माहिती, आकडेवारी, अनुभव, गोष्टी, साहसकथा, अपयश कथा असं सारंच. त्या दिवसांत आम्ही आनंदवन-सोमनाथ-हेमलकसा-झरी जामणी-अशोकवन अशा सर्व प्रकल्पांशी संबंधित प्रमुख तीस-चाळीस लोकांशी बोललो. सोबत हवे तेव्हा विकासभाऊ होतेच. त्यांनी आनंदवनात सर्वत्र फिरवलं. खूप गोष्टी, आठवणी, किस्से सांगितले. कधी गाडी ते स्वत: चालवायचे. मध्येच थांबवायचे. एखादी गोष्ट दाखवायचे, समजून सांगायचे. आम्हाला अपेक्षित होतं, की खोलीत बसून त्यांनी आम्हाला रीतसर मुलाखत द्यावी; पण ऐकतील तर (आणि मुळात ऐकून घेतील तर) ते विकासभाऊ कसे? गाडी चालवताना ते बोलू लागले की आम्हाला धास्ती वाटे, की हे सगळं आमच्या लक्षात कसं राहणार? शेवटी आमच्याकडील डबीएवढा रेकॉर्डर त्यांच्या गळ्यात अडकवून टाकला आणि म्हटलं, “बोला आता किती बोलायचं ते?” अर्थातच, विकासभाऊ पुटपुटल्यासारखे बोलत राहिले. ते बोलणं वाहनाच्या आवाजात विरून जात राहिलं. त्यामुळे या रेकॉर्डिंगचा आम्हाला जवळपास काहीच उपयोग झाला नाही. पण मुळात विकासभाऊंना पुस्तकाविषयी काही पडलेलंच नव्हतं. आनंदवन समजून घ्यायला आलेली ही पोरं आहेत, एवढ्याच दृष्टीने ते आमच्याकडे तेव्हा पाहत असावेत.
पण आमच्या वास्तव्याच्या काळात विकासभाऊंसोबत जे शांतपणे बोलणं झालं, ते ऐकताना आणि त्यातले हजारो तपशील पन्नास-साठ वर्षांच्या इतिहासासह समजून घेताना पदोपदी जाणवत होतं, की हे पुस्तक लिहिणं मोठंच आव्हान ठरणार आहे. आनंदवनाचं काम त्यामागील विचारासह समजून घेणं, तिथे उभारलेल्या कामाची खोली आणि विस्तार समजून घेणं आणि या सर्व कामाच्या मानवी चेहर्यासह त्यामागील अर्थकारण समजून घेणं कुणालाच सहजी शक्य नाही, असं विकासभाऊंना का वाटत होतं हे तेव्हा कळू लागलं. आनंदवनावर अर्धं कच्चं पुस्तक त्यांना नको होतं; आणि भक्कम संपूर्ण पुस्तक तयार होऊ शकतं, यावर त्यांचा विश्वास नव्हता. पण आम्ही असं पुस्तक लिहू शकतो, असा विश्वास भारतीताई, कौस्तुभ-पल्लवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना होता. होती-नव्हती ती सामूहिक शक्ती लावून आम्ही हे पुस्तक फत्ते करू, हा विश्वास आमच्यात होताच होता. नसता तर आम्ही या आग्यामोहोळात हात घातलाच नसता!
सगळा आवश्यक ऐवज गोळा करून आम्ही पुण्यात पोहोचलो आणि पुढे वर्षभर पुस्तक
लेखनाचं काम चालू राहिलं. गरजेप्रमाणे आनंदवनातून माहिती मागवत असू, आणि
तिकडून ती येत असे. कौस्तुभने या बाबतीत कधी काही कमी पडू दिलं नाही. तो स्वत:ही वेळोवेळी
पुण्यात येत असे आणि पुस्तक रचण्यात मदत करत असे. विकासभाऊही येत, पण कुणी
मारून मुटकून आणल्यासारखे बसत आणि तुटक उत्तरं देत. संपूर्ण पुस्तक लिहून झालं,
भारतीताई-कौस्तुभ
आणि कुणी कुणी ते तपासून, दुरुस्तून दिलं तरी विकासभाऊ काही आम्हाला
पावेनात. पण जेव्हा त्यांच्या नावाने लिहिलेलं पुस्तकाच्या सुरुवातीचं मनोगत त्यांना
वाचून दाखवलं, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अनपेक्षित होती. आम्हालाही आणि खुद्द त्यांनाही.
शेवटचं वाक्य वाचलं गेलं आणि त्यांना भडभडून आलं. डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं.
मी-गौरी-कौस्तुभ सगळे अचंबित होऊन बघू लागलो. मी जागेवरून उठलो आणि विकासभाऊंच्या पाठीवर
जाऊन थोपटलं. त्यांनी माझा हात गच्च धरला आणि ओघळत्या डोळ्यांनीच ते म्हणाले,
“मला
जे सांगावंसं वाटतं आणि माझ्या मनात ज्या भावना आहेत, त्या तुम्ही नेमक्या
त्याच शब्दांत कशा काय लिहिल्या? तुम्हाला कसं कळलं की मी हाच विचार करतोय?”
आणि त्या क्षणानंतर ‘पुस्तक नको’ म्हणणार्या विकासभाऊंचा नूर बदलला.
पुस्तकात आणखी काय हवं, काय चुकलेलं आहे, क्रम कुठे बदलायला हवा, अमुकचा
उल्लेख हवाच हवा वगैरे गोष्टी ते बोलू लागले. पुस्तकासाठी फोटो लागतील वगैरे व्यावहारिक
गोष्टीही त्यांना कळू लागल्या. तोपर्यंतचे विकासभाऊ आणि या प्रसंगानंतरचे विकासभाऊ
यांच्यात मोठाच फरक पडला. त्यांच्या मनात आमच्याविषयी विश्वास निर्माण झाला,
आणि
तिथून नातं बनायला लागलं, बहरायला लागलं. पुस्तकामुळे ही किमया घडली.
पुस्तक तयार होण्याची ही गोष्ट एवढ्यासाठीच सांगितली, जेणेकरून विकासभाऊंचं विचार करणं, वागणं याचा थोडा अंदाज यावा. आता थोडं आनंदवनाबद्दल सांगायला हवं, कारण त्याशिवाय विकासभाऊ आणि इतरांच्या वैशिष्ट्यांचा थांग लागणार नाही.
पुस्तकानिमित्त समजून घेत होतो, तेव्हा लक्षात येत
होतं की, कागदोपत्री आनंदवन ही एक संस्था असली, तरी ती एखाद्या संस्थेसारखी
चालत नाही. ती गावासारखी चालते. एखाद्या आदर्श गावासारखी. आपल्याकडे जशा गेटेड सोसायटीज
असतात, तसं हे एक गेटेड गाव आहे. गावाला लागणारं जवळपास सगळंच या गावात तयार
होतं. सहाशे एकरहून जास्त जागेत हे गाव वसलेलं आहे. त्यातील जवळपास दोनशे एकरवर शेती
होते. वर्षातून तीन पिकं. कारण इथे पावसाचं पाणी साठवणारी मोठमोठी तळी आहेत. इथे हॉस्पिटल्स
आहेत. शाळा-कॉलेज-होस्टेल्स आहेत. स्पेशल मुलांसाठी स्पेशल शाळा आहेत. छोटे-मोठे कारखाने-वर्कशॉप्स
आहेत. इथे कापड तयार होतं, सतरंज्या तयार होतात. चपला-बूट-तीनचाकी
सायकली-लोखंडी वस्तू असं बरंच काय काय इथे तयार होतं. इथे रीतसर डेअरी आहे. कॉम्प्युटरपासून
बांधकामापर्यंतची प्रशिक्षणं इथे दिली जातात. इथे जुन्या कपड्यांपासून नव्या वस्तू
तयार केल्या जातात. लाकडी शिल्पकला इथे बहरते. इथे वृद्धाश्रमही आहे. सांगावं तितकं
कमीच. कुणाला आश्चर्य वाटेल पण एक अख्खी ग्रामपंचायतच आनंदवनात मावते. या ग्रामपंचायतीचे
सदस्य, सरपंच वगैरे आनंदवनातीलच कुणी कुणी होतात. निवडणुकीशिवाय. हे एवढं सगळं
खटलं चालवायचं तर ते सोपंय का? पण विकासभाऊंच्या नेतृत्वाखाली ते बिनधोकपणे
चालत होतं. त्यांचा आवाका त्यातून कळत होता.
आनंदवनात तीन-साडेतीन हजार लोक राहतात. त्यात जसे कुष्ठरुग्ण आहेत, तसेच अंध-अपंग लोकही आहेत. बर्या झालेल्या कुष्ठमुक्तांच्या वसाहती तिथे आहेत. शिक्षक-कार्यकर्ते-डॉक्टर्स-नर्सेस-विविध विभागांचे प्रमुख-किचन चालवणारे लोक-शेती कामातली माणसं आणि खुद्द आमटे कुटुंबीय असे सगळे लोक तिथे राहतात. या सगळ्यांचं दिवसभराचं शेड्युल ठरलेलं आहे. त्याप्रमाणे सगळे लोक आपापल्या कामात गुंतलेले असतात. कुठे देखरेख नाही, की कुठे रोकटोक नाही. शाळा, कॉलेज, शेती, उद्योग, जेवणखाण, सगळं वेळच्या वेळी आपोआप चालत असतं. आपण दिवसाच्या कुठल्याही वेळेला आनंदवनात फेरफटका मारला तर ठराविक वेळेस ठराविक गोष्ट घडताना आपल्याला दिसते. या अर्थाने हे एक कामात गुंतलेलं आणि कामात आनंद मानणारं गाव आहे. इथे राहणार्या प्रत्येकाला हे माहीत आहे, की इथल्यापेक्षा सन्मानाचं आणि सुरक्षिततेचं जगणं त्यांना आनंदवनाच्या कुंपणाबाहेर मिळू शकणार नाही. त्यामुळे हातात जोर आहे आणि जिवात जीव आहे तोवर इथली माणसं काही ना काही कामं करत असतात.
अशा कामसू लोकांच्या गावाला कामं पुरवत राहणं, त्यातून एक अर्थव्यवस्था
तयार करणं, त्यातील अर्थव्यवहार सांभाळत राहणं, आनंदवनाबाहेरील मार्केटला
वस्तू पुरवत राहणं, जमा-खर्चाचा मेळ राखत राहणं, अशी अनेक कामं एक ना अनेक माणसांना पुरून
उरणारी असणार. शिवाय आनंदवनात रोज चारपाचशे व्हिजिटर्स येत असतात. त्यापैकी शंभरेक
लोक तिथेच राहत असतात. त्यांची व्यवस्था पाहणं हेही एक कामच. आनंदवनाशिवाय हजारभर एकरांवर
पसरलेला सोमनाथ प्रकल्प आणि तेव्हा नव्याने सुरू झालेला यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी
प्रकल्प वेगळेच. आम्ही विकासभाऊंना ‘पुस्तक करूयात’ असं म्हणत होतो तेव्हा या सगळ्या
प्रकल्पांच्या जबाबदार्या विकासभाऊ पेलत होते. त्यामुळेच कदाचित एवढ्या सार्या कामांत
आणखी पुस्तकाचं खटलं गळ्यात नको, असं त्यांना वाटलं असणार.
आनंदवनाची दृष्टी बाबांची असली तरी ती प्रत्यक्षात आणण्याची हिंमत नि:संशय
विकासभाऊंची. अफाट ताकदीचा हा माणूस आहे. बाबांच्या स्वप्नांचा अर्थ समजून घेऊन त्याला
समकालीन संदर्भात जमिनीवर उतरवण्याची क्षमता असलेला हा माणूस आहे. काम करायचं तर ते
मोठंच, छोटं नाहीच. मुळात आनंदवन हे एक अगडबंब प्रकरण आहे. इथली शेती,
पाण्याची
तळी, डेअरी, वर्कशॉप्स, शाळा-कॉलेजेस, किचन या सगळ्यांचाच
आकार एखाद्या संस्थेच्या पोटात मावणारा नाही. मोठमोठे उद्योजक जसा विचार करत असतील
तसा विचार इथे होतो, असं इथे फिरताना जाणवतं. एरवी आपल्या स्वयंसेवी किंवा रचनात्मक काम करणार्या
संस्था किती छोटा विचार करतात, ही गोष्ट आनंदवनातील कामाचा ‘साइज’ आणि
‘व्हॉल्युम’ पाहून लख्ख कळतं. विकासभाऊंचं सोडा, इथले प्रमुख कार्यकर्तेही
छोट्या साइजचा विचार करू शकत नाहीत. सोमनाथची शेती पाहणार्या अरुणभाऊंना सहज विचारावं,
की यंदा
शेतीपाण्याची परिस्थिती काय? तर उत्तर असतं, “भाऊ, पाऊस
थोडा कमी आहे, पण यंदा दोनशे एकरवर तांदूळ घेतलाय...” आनंदवनातल्या शेतीत फिरावं तर
फळभाज्यांचे अक्षरश: ढीगच्या ढीग दिसतात. तळ्यांतून मोठ्याच्या मोठ्या आकाराच्या मासळ्या
मिळतात. तिथली धान्याची गोडाऊन पाहावी तर आपले डोळेच फिरतात. इथे डॉ. तात्याराव लहाने
मोतीबिंदूचं शिबिर घेत, तर एका वेळेस हजारभर पेशंट्सना दृष्टी देऊन जात. हे शिबिर कसलं... बाबांनी
या शिबिराचं नाव ‘लहानुबाबाची जत्रा’ असंच ठेवलं होतं.
या प्रचंड दृष्टीचा पाया बाबांनी खणला. त्यांना भव्यतेची ओढ नव्हती,
प्रचंडपणाची
मात्र होती. त्यांनी आनंदवनात कुठे मोठा पुतळा किंवा भव्य कमानी अथवा इमारती बांधल्या
नाहीत. मात्र, प्रत्येक कामाचा आकार प्रचंड असला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. एक
उदाहरण सांगतो. आनंदवन प्रकल्प उभारणीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर बाबांनी महाराष्ट्र
सरकारला ‘श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ’ उभारण्यासाठी जागा मागितली होती. बाबांची मागणी
किती होती माहिताय?-तीन हजार एकर. सरकारने दिली दोन हजार एकर. त्यातही वाद झाल्याने बाबांना
पाच-सहाशे एकर जमीन परत द्यावी लागली. उरली तेराशे एकर. पण बाबांच्या कल्पनेतलं विद्यापीठ
‘एवढ्याशा’ (!) जागेत मावणार नव्हतं. आधुनिक तंत्रविज्ञानाच्या साहाय्याने भारतीय कृषिप्रधान
समाजव्यवस्थेला परिपूर्ण कृषी-औद्योगिक व्यवस्थेचं रूप देण्यासाठी तरुणांना प्रशिक्षित
करण्यासाठी ही जागा अपुरी आहे, असं वाटल्याने त्यांनी तो प्रयोगच सोडून
दिला. एरवी कुणीही सरकारकडून मिळालेल्या तेराशे एकरांवर जमेल तसा प्रयोग उभा केला असता.
पण बाबांच्या स्वप्नांचा साइजच मोठा होता, त्याला कोण काय करणार?
बाबा आधी ‘भारत जोडो’ आणि नंतर नर्मदाकिनारी राहायला गेल्यानंतर त्यांच्याच
तालमीत तयार झालेल्या विकासभाऊंनी बाबांची भव्य स्वप्नं जमिनीवर उतरवण्याचा जो सपाटा
लावला, त्याचं मूर्त रूप म्हणजे आजचं आनंदवन. त्यातील दोन-तीन उदाहरणं बघा. आनंदवनात
पाण्याचे तलाव आधी होतेच, ते वाढवले गेले, खोल केले गेले. आनंदवनात
इतकं पाणी साठवलं जाऊ लागलं, की आसपासच्या पाच-पंधरा गावांतील पाण्याची
पातळी वाढली. फक्त ड्रिलिंग मशिन चालवण्याचा अनुभव असलेल्या अशोकभाऊंना (बोलगुंडेवार)
सोबतीला घेऊन त्यांनी प्रचंड विहिरी आणि तलाव खोदले. ड्रिलिंग मशिन कुठे आणि तलाव खुदाई
कुठे! पण प्रचंडपणाच्या वेडात असे प्रश्न फिज़ूल!
आनंदवनात सुरुवातीपासून गोठा होता. (आनंदवन सुरू झालं तेव्हा विनोबांनी
बाबांना एक गाय दिलेली प्रेमाने.) विकासभाऊंनी या गोठ्याचं रूपांतर भरभक्कम डेअरीत
केलं. त्याची सूत्रं कुणाकडे दिली माहीत आहे? गजानन वसू नावाच्या
कुष्ठमुक्ताकडे. या माणसाने जिवाचं रान करून दुधाचं उत्पादन ३५ लिटरवरून हजारभर लिटरपर्यंत
नेलं. पार हरियाणा-गुजरातपासून गाई-म्हशी आणल्या. उत्तम दर्जाचे वळू आणले. प्रजा वाढवली.
तिथल्या म्हशी म्हणजे छोटे हत्तीच जसे. प्रत्येक जनावर अगदी स्वच्छ आणि त्वचा अगदी
तुकतुकीत. तिथल्या गोठ्याला गाई-म्हशींचं ब्यूटी पार्लरच म्हटलं जायचं. एकेक जनावर
देखणं. कुणी म्हणेल, हा कॉस्मेटिक भाग झाला. पण दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी गजाननभाऊ-विकासभाऊ
दोघांनी हायप्रोटीन चारा लावण्याचा फंडा शोधून काढला, तो मात्र ‘ओरिजिनल’
होता. त्यातून प्राण्यांना भरपूर प्रोटीन्स मिळू लागली. आपल्याकडे हे सगळं संशोधन कृषी
विद्यापीठांमध्ये वगैरे होतं. पण आनंदवन स्वत:च एक विद्यापीठ आहे आणि तिथला कुठलाही
कल्पक कार्यकर्ता आपली प्रयोगशाळा चालवून नवीन शक्कल लढवू शकतो, असं
स्वातंत्र्य विकासभाऊंच्या सहकार्यांना होतं. अशा प्रत्येकावर विकासभाऊ विश्वास टाकत
आले आहेत आणि त्यातून नवनवे चमत्कार घडत आले आहेत.
या गजाननभाऊंना विकासभाऊ ‘सीरियल किलर’च्या चालीवर ‘सीरियल आंत्रप्रनर’
म्हणतात. या माणसाने विकासभाऊंच्या कल्पनेतले इतके प्रकल्प जमिनीवर उतरवले आहेत की
विचारू नका. त्यांचं शिक्षण फक्त चौथी की सातवी पास आणि शरीर नाना आजारांनी पोखरलेलं;
पण त्याने
कामं अशी करून दाखवलीत की कुणाला तो चमत्कारच वाटावा. म्हणूनच त्यांना तिथे गमतीने
‘गजानन महाराज’ असंही म्हटलं जातं. त्यांच्या डेअरीत गेलो की ते स्वत: तयार केलेला
खवा, पनीर, दही असं काय काय एका बैठकीत खायला लावतात. वेगवेगळ्या चवींचे पदार्थ एकाच
वेळी कसे खायचे, हा प्रश्न त्यांना विचारणं फिज़ूल. कारण त्यांच्यावरील प्रेमाची तीच पोचपावती
असते. पदार्थ चाखून झाले की आमच्यातला संवादही ठरलेला. त्यांना आपण म्हणायचं,
की
‘चला, गजानन महाराजांचा प्रसाद मिळाला!’ की त्यावर ते कसनुसे हसणार.
गजाननभाऊ हा कुणाचाही दोस्त व्हावा असा माणूस. आनंदवन प्रयोगवन पुस्तकाच्या
प्रकाशन कार्यक्रमात होणार्या मुलाखतीत गजाननभाऊ शेरोशायरी आणि डायलॉगबाजी करून सभागृह
गाजवत. हा विकासभाऊंचा ब्ल्यू-आईड कार्यकर्ता. नाना पाटेकरही आनंदवनात आले की गजाननभाऊंना
भेटणारच. त्यांना एवढं प्रेम मिळतं, कारण त्यांनी अजब काम करून दाखवलंय. प्लास्टिकच्या
कचर्यातून रस्ते काय केलेत नि प्लास्टिक-सिमेंट-बांबू आणि ट्रक टायर्स वापरून बंधारे
काय बांधलेत! ‘गजाननला रॉकेट लाँच करायला सांगितलं, तरी तो नाही म्हणणार
नाही’ असं विकासभाऊ अभिमानाने सांगतात.
आनंदवनातील एकेका कार्यकर्त्याबद्दल असं बरंच काही सांगता येईल. ही सगळी विकासभाऊंच्या जिवाभावाची माणसं. त्यांनी उभं केलेल्या कामाबद्दल त्यांच्यापैकी कुणाशीही बोललं, तर ते म्हणतात, “सर्व श्रेय विकासभाऊंचं. त्यांचं ९९ टक्के आणि आमचं एक टक्का.” हाच विषय विकासभाऊंकडे काढावा, तर ते म्हणणार, “सर्व श्रेय त्यांचं. ९९ टक्के त्यांचं, माझं एक टक्का.” असं नातं पाहताना आपण हेलावून जातो. माणसांमधली इतकी निर्मळ नाती बघून डोळ्यांत पाणी उभं राहतं.
आम्ही आनंदवनात गेलो की विकासभाऊ आपल्या कार्यकर्त्यांना गोळा करायचे.
सगळ्यांसाठी रात्री तळ्याकाठी जेवण ठेवायचे. हिवाळा असेल तर छान शेकोटी पेटवलेली. त्याच्याभोवती
सगळ्यांची गप्पांची मैफल. कुठले कुठले किस्से. हसाहशी, खिदळाखिदळी. एकमेकांच्या
हातावर जोरकस टाळ्या. असं मोकळं वातावरण. भाऊ फॉर्मात असले तर गप्पांना आणखीनच जोम
यायचा. जुन्या आठवणी निघायच्या. बाबा-साधनाताईंच्या गोष्टी सांगितल्या जायच्या. हे
सगळं चाललेलं असे तेव्हा विकासभाऊ आणि कार्यकर्ते यांच्यातला परस्पर स्नेह दिसत असेे.
मैफल आटोपली की जेवण. जेवण साधंच, पण पुण्याच्या पाहुण्यांसाठी एक तरी वेगळा
पदार्थ केलेला असणारच. पण तोही साधाच. कधी कुठल्या एखाद्या फुलाची भजी नाही तर आणखी
काही. विकासभाऊ आपल्याला हाताशी धरून शेजारी बसवणार आणि जेवू-खाऊ घालणार. ही त्यांची
आपलेपणा व्यक्त करण्याची पद्धत. साधीशीच.
स्वत: विकासभाऊंचं जेवण म्हणजे मात्र अजब काम. ताटातले सगळे पदार्थ एकत्र
करणार आणि गारा करून खाणार. ‘ही कुठली पद्धत जेवण्याची?’ असं विचारलं तर म्हणणार
“नाही तरी पोटात गेल्यानंतर सगळे पदार्थ एकत्रच मिसळणार. मग कशाला वेगवेगळं जेवायचं?”
म्हणजे
वेगवेगळ्या चवी यांच्या जीवनातून हद्दपारच म्हणायच्या. जिभेला ओळख एकाच चवीची- तिखटाची.
तीही भयानक म्हणावी अशी. जेवताना ताटात ‘आरडीएक्स’ हवंच! हा त्यांचाच शब्द. आरडीएक्स
म्हणजे नाना प्रकारची तिखटं-चटण्या-लाल-हिरवे ठेचे यांचं मिश्रण. त्याचा गोळा मटकावणार.
या तिखट खाण्याचा त्यांना मोठा अभिमान. ‘मला कोणताही आजार नाही ते या तिखटामुळे’ असं
सांगायलाही ते कमी करणार नाही.
आम्ही एकदा एकत्र दौर्यावर गेलो होतो. आयोजक त्यांची बडदास्त ठेवू पाहत
होते. ‘बाकी काही नको, तिखट ठेचा तेवढा असू देत’, असं त्यांना सांगितलं होतं. जेवण चालू असताना
आयोजक आले. म्हणाले, “भाऊ, जेवण आवडलं ना,’ भाऊ म्हणाले, “आवडलं ना!” आयोजकांनी
ताटात बघून हा प्रश्न विचारला नाही हे नशीबच, अन्यथा ते चक्कर
येऊनच पडायचे. कारण यांच्या ताटात असणार सगळ्या पदार्थांचा एकत्र गारा. हा समर प्रसंग
टळला म्हणून देवाचे आभार मानेपर्यंत आयोजक म्हणाले, “भाऊ, ठेचा
कसा आहे?” भाऊ म्हणाले, “छान, गोड आहे!” यावर कोण
काय बोलणार? असं त्यांचं तिखटप्रेम.
या तिखटप्रेमी माणसाचा स्वभाव मात्र त्याच्या खाण्याशी विसंगत आहे. किमान मला तरी त्यापेक्षा वेगळा अनुभव नाही. कधीही भेट झाली की हातात हात घेणार आणि धरून ठेवणार. त्यांचं मन भरेपर्यंत ते हात सोडणार नाहीत. हे हात धरून ठेवणं कितीही वेळ चालू शकतं. त्यांच्यासोबत कुठे आपण चालत जात असू, तर ते एक हात धरून ठेवणार. रस्त्यात कुणी भेटलं तरी हात सोडणार नाहीत. स्पर्शाची एक प्रकारची ओढ त्यांच्यात असावी. ही ओढ कुठून आली असावी? मला वाटतं, कुष्ठरुग्णांची गरज म्हणून आली असावी. कुष्ठरुग्णांपासून सर्वजण दूर राहतात. त्यांना स्पर्श करत नाहीत. पण बाबा ग्लोव्ह्ज वगैरे न घालता कुष्ठरुग्णांना तपासत. स्पर्श करत, हात धरत. त्यातून रुग्णांना सर्वांत अप्राप्य वाटणारी गोष्ट मिळत असणार. त्यातून नातं तयार होत असणार. विकासभाऊंचीही पद्धत हीच. त्यांनीही कधी ग्लोव्ह्ज वगैरे घातले नाहीत. आजही विकासभाऊ रुग्णांना, कुष्ठमुक्तांना किंवा वृद्धाश्रमातल्या आजी-आजोबांना भेटायला जातात, तेव्हा त्यांचा हात हातात धरतात. पाठीवर हात ठेवतात, डोक्यावर हात ठेवतात. त्यातून या सार्यांना सुरक्षित वाटत असणार. या सवयीतून त्यांना हात धरून ठेवण्याची सवय लागली असेल का? की मुळातच स्पर्शाची आणि माणसांची ओढ असल्याने ते असे वागत असावेत? माहीत नाही. कारण काहीही असो, त्यांचं असं हात धरून राहणं प्रेमाची ऊब देणारं असतं, हे खरं.
त्यांना माणसांची मोठी ओढ. कधीही भेटले की म्हणणार, “अरे,
तुम्ही
इतकं काम करता, धावपळ-दगदग करता... वर्षातून आठ दिवस सोमनाथला येऊन राहत जा. इथे येऊन
पूर्ण विश्रांती मिळवा.” त्यांचं हे निमंत्रण कोरडं नसतं. कारण जेव्हा जेव्हा आम्ही
त्यांच्या तावडीत सापडलो आहोत, तेव्हा तेव्हा त्यांनी आमच्यासाठी काही
करायचं ठेवलंय, असं झालेलं नाही. सोमनाथला असलो तर प्रश्नच मिटला, कारण
तिथे सगळेजण पूर्ण सुट्टीच्या मूडमध्येच असतात. ‘संध्याकाळी टेकडीवर जाऊ आणि रात्री
चांदण्यात जंगलाच्या बाजूला फिरून येऊ’, असे प्लॅन्स आखण्यात मश्गुल.
आनंदवनात असू तर सकाळी नाश्त्याला आमटेंच्या घरी जाणं कम्पल्सरी. नाश्त्याच्या
आगे-मागे विकासभाऊंचा ‘दरबार’ भरतो. एका कॉटवर डेस्कच्या मागे साहेब बसतात. आसपास वृत्तपत्रांचे
गठ्ठे. ते सकाळी वाचून ठेवलेले असतात. पुढे जे कार्यकर्ते, आमच्यासारखे पाहुणे,
भेटायला
येणारे नाना प्रकारचे लोक आलेले असतात, त्यांच्याशी ते सामूहिकपणे बोलणार. खासगीपणा
वगैरेला इथे थारा नाही. दुपारी कामं आटोपली की पुन्हा एकत्र जेवण्याचा आग्रह. हे जेवण
मात्र कॉमन किचनमध्ये, जिथे सगळं आनंदवन जेवतं तिथेच. सगळ्यांसाठी जे जेवण बनवलेलं असतं तेच.
रात्रीचं जेवणही एकत्रच. ते तुम्ही टाळू शकत नाही. तिथे पुन्हा विकासभाऊ हात पकडून
गप्पागोष्टी करणार. एकावर एक चढ किश्शांच्या भेंड्या चढवणार. कधी आगामी कल्पनांबद्दल
आणि प्रकल्पांबद्दल चर्चा. कुठल्या पुस्तकात काय म्हटलंय आणि कोणत्या शास्त्रज्ञाने
काय मांडलंय, इथपासून ते गांधी-कुमारप्पांच्या अॅप्रोप्रिएट टेक्नालॉजीपर्यंत काय
काय बोलणार. कुणाबद्दल ‘खास’ काही सांगायचं असेल, तर आणखी जवळ येऊन
अगदी पुटपुटल्यासारखं बोलणार- ‘तू अमुकला तमुक सांग, तुझं तो/ती ऐकेल’,
असं
खात्रीपूर्वक सांगणार. एकाच जेवणात हेही अनेक वेळा. प्रेम, विश्वास,
आपुलकी
या सगळ्याच्या एकत्र अनुभवाने तुम्ही तिथे चिंब भिजून जाता.
भरभरून प्रेम करण्याच्या बाबतीत आमटे कुटुंब हे अगदी अव्वल. त्यातही भारतीताई
आणखी पुढे. त्यांचं सौम्य, शांत आणि सोज्वळ रूपच तुम्हाला सुखावून
जातं. आमटे कुटुंबातील ही सौजन्यमूर्तीच. आपण भेटलो की अगदी आस्थेने सगळी विचारपूस
करणार. कुटुंबीयांचे आणि ओळखीपाळखीतील कॉमन मंंडळींचे हालहवाल विचारणार. विश्वासाने
अन् मोकळेपणाने मनातलं सांगणार. स्वत:च्या आई-वडिलांबद्दल बोलताना गहिवरून जाणार. त्या
देवभोळ्या म्हणाव्या इतक्या पूजा-प्रार्थना-गुरू महाराज वगैरेंत गुंतलेल्या. एरवी हा
माझ्या दृष्टीने कुतूहलाचा विषय. संधी मिळाली तर उलट-सुलट प्रश्न विचारून तपास घेण्याचाही.
पण भारतीताईंचं प्रेमळ आणि सर्वांची काळजी घेणारं रूप पाहून त्यांना या विषयावर कधी
टोकावंसं वाटत नाही.
आम्ही आनंदवनातून कुठे हेमलकशाला वगैरे निघालो, तर काहीही
न बोलता गाडीत जेवणाचा भरपूर सारा डबा ठेवला जातो. ही भारतीताईंची पद्धत. आनंदवन-हेमलकसा
हा पाच-सात तासांचा प्रवास. पूर्वीसारखा तो खडतर राहिलेला नाही, पण तरीही
पोळी-भाजीचा डबा दिला जाणारच. त्यावर नो अपील! रस्त्यात काही अडचण आली, गाडी
बिघडली वगैरे तर पोरांच्या खाण्याचे वांधे नकोत, ही त्यामागील मायेची
भावना. त्या रस्त्यावर निम्म्याच्या पुढे मानवी वस्ती अगदी विरळ आहे. जेवणा-खाणाची
काही सोयही नाही. त्यामुळे जंगलातून गाडी जाऊ लागली आणि पोटातले कावळे ओरडू लागले,
की रस्त्याकडेच्या
झाडांखाली किंवा एखाद्या तळ्याकाठी पेपर पसरून त्यावर भारतीताईंना दिलेला ‘प्रेमाचा
डबा’ उघडायचा आणि वनभोजन करायचं. हीच रीत त्यांचा मुलगा-सून कौस्तुभ-पल्लवी यांनीही
तेवढ्याच प्रेमाने अवलंबल्याचा अनुभव मी घेतलाय.
ही प्रेमाने करण्याची रीत कुणी ‘अॅक्वायर’ केलेली नाही. आनंदवनाच्या
रक्तातच ती आहे. आनंदवनात जाऊन आलेल्या कुणाशीही बोला. पहिली गोष्ट ते सांगतात : ‘आनंदवनात
प्रेमाचा ओलावा फार. माणसांचं वागणं मोठं सहज आणि आपुलकीचं असतं.’ कुणी मित्र,
ओळखीपाळखीचे
किंवा नातेवाईक आनंदवन बघायला जाणार असतील, आणि त्यांच्या समाधानासाठी
आनंदवनात फोन करून सांगितलं तर मग गोष्टच बोलायला नको. स्पेशल ट्रीटमेंटची खात्रीच.
वर म्हणणार, “हौ नं! भाऊंचा पुन्याहून फोन आल्तानं!”
आनंदवनातला आणि आमट्यांमधला प्रेमळपणा हा फक्त आदरातिथ्यापुरता किंवा
‘आपल्या’ माणसांपुरता नाही. मुळात ‘आपले आणि परके’ हे प्रकरणच आनंदवनात नाही. तिथे
जे येतील, त्यांच्या संपर्कात जे येतील आणि ज्यांना त्यांची गरज असेल ते सगळे ‘आपले’.
विषयांतर करून एक गंमत सांगतो. विकासभाऊंच्या मनात फक्त एक विभागणी आहे : आनंदवनात
‘आलेले’ आणि ‘न आलेले’. त्यांच्याशी कुणाबद्दलही बोला... त्यांच्या तोंडून तो माणूस
आनंदवनात येऊन गेलाय की नाही, हे ते पहिल्याप्रथम सांगणार. त्याशिवाय
त्यांची गाडी पुढे सरकूच शकत नाही. कुणी आयुष्यात एकदा जरी येऊन गेलेला असेल,
तरी
तो त्यांच्या गुड बुक्समध्ये जाणार. पण जो आलेला नाही त्यावर एकच प्रतिक्रिया- “नाही-
अजून ते आनंदवनात आलेले नाहीत.” बास!
तर सांगत होतो आपलेपणा-परकेपणाबद्दल. राष्ट्रीय पातळीवर कुष्ठरोगनिवारण
झालेलं आहे असं सरकार सांगत असलं, तरी आनंदवनात कुठून कुठून कुष्ठरोगी येत
असतात. सरकारी मदत मिळो न मिळो, अशा प्रत्येकाला आनंदवनात आसरा मिळतो. त्याला
दाखल करून घेतलं जातं, त्याची शुश्रूषा केली जाते, त्याच्यावर उपचार करून बरं केलं जातं. कुणाला
त्याहीपलीकडे मदत हवी असेल तर तीही केली जाते.
विकासभाऊ-भारतीताई, कौस्तुभ-पल्लवी आणि शीतल-गौतम |
मी बघितलंय, दु:खाला प्रतिसाद देण्याची आनंदवनाची पद्धतच
वेगळी आहे. जितक्या सहजतेने ते निराधार किंवा अन्य कुणाला आपल्याकडे आश्रय देत आले
आहेत, तितक्याच उत्स्फूर्ततेने ते आपल्या समाजातल्या मोठ्या प्रश्नांनाही भिडत
आले आहेत. १९९१ मध्ये जेव्हा किल्लारीत भूकंप झाला, तेव्हा विकासभाऊ
आपल्या टोलेजंग टीमसह तिथे पोहोचले होते. समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठमुक्तांनी भूकंपग्रस्तांची
आयुष्यं पूर्वपदावर आणून देण्यात पुढाकार घेण्याची त्यामागे कल्पना होती. ढिगार्यांखाली
अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं आणि त्यांना मदत करण्याचं काम तेव्हा अनेकांनी केलं.
पण विकासभाऊ तिथे पोहोचले ते भूकंपरोधक घरं बांधून देण्यासाठी. त्याआधी त्यांनी आनंदवनात
लोखंड किंवा लाकडाचा वापर न करता अर्धवर्तुळाकार छताची स्वस्त आणि टिकाऊ घरं बांधली
होती. तशी घरं लातूर-उस्मानाबाद परिसरात उपयोगी पडतील, या विचाराने ते तिथे
पोहचले. तिथे जाऊन त्यांनी मॉडेल घरं बांधूनही दाखवली. अनेक कारणांमुळे तिथे घरं बांधली
गेली नाहीत, तो भाग वेगळा.
असंच जेव्हा शेतीची अर्थव्यवस्था मोडकळीस येऊन महाराष्ट्रात शेतकर्यांच्या
आत्महत्या होऊ लागल्या, तेव्हा ‘आपण काय करणार?’ असं म्हणून विकासभाऊंनी हात-पाय गाळले नाहीत.
विकासभाऊ यवतमाळमधील मागास आदिवासी भागात गेले आणि तिथे जाऊन जमीन-पाणी-शेती यांत मूलभूत
काम करण्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर उतरले. पाणी अडव, जमीन सपाटीकरण कर,
चांगली
बियाणं-खतं आणि तंत्रज्ञान वापरून शेती करून दाखव, आवश्यक तिथे सल्ला
दे, असे नाना मार्ग वापरून त्यांनी तिथे एक मॉडेल उभारण्याचा प्रयत्न केला.
या प्रयत्नांतून तिथे काही भागाचा कायापालट झाला. प्रश्नाची खोली आणि परीघ यांचा अंदाज
असल्याने त्यांनी त्याला त्याच आकाराची प्रतिक्रिया दिली. ही त्यांची खासियतच म्हणायला
हवी.
मला आठवतंय विकासभाऊ, कौस्तुभ आणि तीन-चार प्रमुख कार्यकर्ते पुस्तकाचं काम चालू असताना पुण्यात आले होते. त्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील पाच-सात जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उच्छाद मांडला होता. आम्ही पुस्तकाच्या कामात गुंतलेलो आणि ही सगळी मंडळी अस्वस्थ. तिकडे गावाखेड्यांत गारपीट होत असताना आपण काही तरी करायला पाहिजे, हेच त्यांच्या डोक्यात... प्रभावित भागात दौरा करूयात, प्रश्न समजून घेऊयात, निधी गोळा करूयात, शेतकर्यांना घरोघरी जाऊन थेट मदत करूयात, असे प्लॅन्स जागेवर तयार झाले आणि मंडळी हातातलं पुस्तकाचं काम बाजूला ठेवून निघालीदेखील.
हीच उत्स्फूर्तता कौस्तुभमध्ये आली आहे. बाबांमधील सहवेदनेसह. २०१६-१७ मध्ये महाराष्ट्रात सलग दोन-तीन वर्षं दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा ‘आपण काही तरी करायला पाहिजे’ ही अस्वस्थता त्याच्या बोलण्यात अखंड दिसे. अखेरीस, आनंदवनाने शेती-पाणी-रोजगार या क्षेत्रात जे यशस्वी प्रयोग केले आहेत ते महाराष्ट्राला सांगूयात आणि जिथे गरज असेल तिथे लोकांना मदत करूयात, या विचाराने ‘आनंदवन समाजभान अभियान’ सुरू झालं. या अभियानांतर्गत मी कौस्तुभसोबत बराच फिरलो. त्या काळात त्यांचं वागणं-फिरणं-वावरणं मी पाहिलं. ‘बाबा आमट्यांचा नातू’ असं त्याच्याभोवती ग्लॅमर असे; माणसांचा गराडा पडलेला असे. हार-तुरे-पुष्पगुच्छ-ग्रुप फोटो-सेल्फी असं सारं काही घडत असे; पण असं सारं असूनही तो पूर्ण जमिनीवर असे. सहज आणि साधा. दुष्काळ आणि त्यावर कशी मात करता येईल यावरचा फोकस कुठेही ढळणार नाही, याची खबरदारी घेत. सगळ्यांशी वागणंही मित्रत्वाचं, मिसळून जाण्याचं. आपापल्या ठिकाणी मोठं काम केलेली ज्येष्ठ मंडळी भेटली की हा सहजपणे वाकून पाया पडणार. तरुण पोरं भेटली तर त्यांच्याकडून प्रश्न आणि त्यावरील उपाय समजून घेणार. त्या बदल्यात त्यांना ऊर्जा देणार. मनाने दिलदार असल्याने माणसं त्याच्याकडे ओढली जातात, त्याच्याशी जोडली जातात. महाराष्ट्रातील अनेक छोट्या-मोठ्या संस्थांशी कौस्तुभ जोडला गेला आहे, आणि येत्या काळात त्याच्या कामाचा मोठा विस्तार झालेला असेल, याची मला खात्री आहे.त्याची बायको पल्लवी अपंग मुलींच्या मेन्स्ट्रुअल हायजिनवर काम करते. ‘स्त्रीषु’ या उपक्रमांतर्गत. थेट लोकांमध्ये जाणं, सर्वेक्षण करणं, प्रश्नाचं स्वरूप समजून घेणं आणि त्यावर उत्तर शोधणं या पद्धतीने तिने आधी महाराष्ट्रभर फिरून अभ्यास केला आणि मग चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्यक्ष काम सुरू केलं. स्वस्त, पर्यावरणपूरक आणि तरीही उपयुक्त सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याची तिची धडपड मी जवळून बघितली आहे. अपंग, विकलांग व मानसिकदृष्ट्या कमकुवत मुलींच्या मेन्स्टुअल प्रश्नांबाबतची तिची अस्वस्थता आणि त्यावरील उपायांची दिशा शोधण्याची तळमळही अनुभवली आहे.
‘गूंज’ या दिल्लीतील संस्थेमार्फत जुन्या कपड्यांतून नव्या वस्तू करण्याचा तिचा उपक्रम चालू होता, तेव्हाही तिच्या कामाचा साइज बघून अचंबित व्हायला झालं होतं. खोल्यांमागून खोल्या जुन्या कपड्यांचे ढीग लागलेले आणि त्यातून नव्या वस्तू बनवण्याचा कारखाना चालू. हे सगळं करताना कुठे बडेजाव नाही की आत्मस्तुती नाही. तिचं आनंदवन-सोमनाथमधलं वावरणंही मोकळं-ढाकळं असे. पल्लवी ही बाळासाहेब भारदे या मागील पिढीतील गांधीवादी नेत्याची नात. ती आमट्यांच्या घरात आली आणि तिला ‘आमटे साइज’मध्ये काम करण्याची संधी मिळाली.
विकासभाऊंची मुलगी डॉ. शीतल आणि तिचा नवरा गौतम करजगी हे दोघं हल्ली आनंदवनाचं
व्यवस्थापन बघतात. स्मार्ट सिटीच्या धरतीवर आनंदवन हे मॉडेल स्मार्ट व्हिलेज बनावं,
या दृष्टीने
ते प्रयत्न करताहेत. स्वयंपूर्ण आणि पर्यावरणपूरक गावाचं हे स्वप्न आहे. आनंदवनात एक
प्रचंड मोठा बायोगॅस प्रकल्प कार्यरत आहेच. आता या दोघांनी एक मोठा सोलर एनर्जी प्रकल्प
उभारला आहे. आनंदवनाची नव्याने मांडामांड करून त्याला आजच्या काळाशी सुसंगत करण्याचं
काम त्यांनी हाती घेतलं आहे. कोणताही सांधाबदल आव्हानात्मक असतो, तसं
आव्हान आजच्या आनंदवनापुढेही उभं आहे.
आनंदवनाचा प्रवास असा आमट्यांच्या तीन पिढ्यांच्या खांदेपालटासह चालू
असताना जाणवणारी गोष्ट म्हणजे गेल्या पन्नास-सत्तर वर्षांत आनंदवनात जे गावपण आणि त्याची
जी वैशिष्टपूर्ण संस्कृती तयार झालीय, तिला धक्का बसलेला नाही. अलीकडे काही बातम्या
आल्या की आनंदवनात सर्व काही आलबेल नाही. वाद निर्माण झालेत, अस्वस्थता
आहे वगैरेही बोललं जातंय. गेल्या वर्ष-दीड वर्षात माझंही आनंदवनात जाणं झालेलं नाही.
त्यामुळे माझ्याकडेही ऐकीव माहितीच आहे. पण माझं जाणं-येणं होतं तोपर्यंत तरी नक्कीच
जाणवत होतं, की या गावातील भ्रातृभाव आणि एकत्वाची भावना अबाधित आहे. या गावात कृत्रिमता
आणि ओढून-ताणून एका शिस्तीत जगण्याचा ताण दिसत नाही. त्यामुळेच या गावाची जगण्याची
एक पद्धत तयार होऊन गेलीय. कोणत्याही नांदत्या गावात जशी त्या गावाची जगण्याची एक शैली
असते, त्यांची स्वत:ची अशी भाषा असते, तशी ती आनंदवनातही
विकसित झाली आहे. आनंदवनाचं हे रूप भलतंच लोभस आहे. या गावात एकच एक भाऊ आहेत,
ते म्हणजे
विकासभाऊ. एकच एक वहिनी आहेत, म्हणजे भारतीवहिनी. इथे शिक्षक अनेक आहेत,
पण
‘गुरुजी’ म्हटलं की सुधाकर कडूच. आमट्यांच्या घरासमोर जी पडवी आहे, तिचा
उल्लेख सर्व आनंदवनवासी ‘समोर’ असाच करतात. ‘समोर येतो तासाभराने’ असं कुणी कुणाला
म्हटलं, की कशाच्या समोर हे सांगण्याची गरज इथे नसते. इथल्या तलावांनाही नावं
आहेत. उदाहरणार्थ, चिवडा बोडी. का? तर म्हणे, चिवडा खात हे तळं
खणलं गेलं, म्हणून हे नाव. आनंदवनातील मैलापाणी ट्रीट करून ज्या तळ्यात सोडलं जातं,
त्या
तळ्यात मत्स्यपालन होतं. ‘इथले मासे एवढे सुदृढ कसे’, असं विचारलं तर उत्तर
येतं- कारण ‘शी’ व्हिटॅमिनवर ते पोसले गेले आहेत ना!” आनंदवन आपल्या हद्दीतल्या पोलिस
चौकीला ‘मॅटर्निटी होम’ म्हणतं. का? तर म्हणे- इथे गुन्हेच घडत नसल्याने पोलिस
इथे पोटं वाढवत बसलेले असतात! गजाननभाऊंच्या गोठ्याला ‘ब्यूटी पार्लर’ म्हटलं जातं,
ते मी
आधी सांगितलं आहेच. एक माणूस ‘आरटीओ’ या नावाने ओळखला जातो. का? तर म्हणे,
तो लोकांची
लायसन्स वगैरेंची कामं करून देतो. सगळ्यात गंमतीचं नाव साधनाताईंना सगळ्या खबरा देणार्या
लोकांना पडलेलं आहे. त्यांना ‘सीसीटीव्ही’ म्हटलं जायचं. त्यांच्यामार्फत साधनाताईंना
घरबसल्या आनंदवनातील खडा न् खडा माहिती ‘विदिन नो टाइम’ कळत असे. अशी अनेक नावं आणि
गंमती. कुणाच्या फजितीच्या, तर कुणी कुणाच्या काढलेल्या कुरापतींच्या.
आनंदवनातले जुने-जाणते लोक एकत्र बसले की त्यांच्या या गोष्टी ऐकून आपली हसून अक्षरश:
पुरेवाट होते. या सगळ्या किश्शांचा समावेश तिथे ‘आनंदवनाचा तिसरा डोळा’ असा केला जातो.
प्रश्न असा पडतो, की आनंदवनात ही सगळी अनौपचारिकता कशी काय रुजली असेल, फुलली असेल आणि टिकली असेल? कारणं अनेक असतील. संस्थाचालक आणि लाभार्थी असं नातं इथे नसणं, हे त्याचं एक प्रमुख कारण असणार. त्यापलीकडे मला जाणवलेलं कारण म्हणजे इथल्या वातावरणात हट्टीपणा, काटेकोर नियोजन, इनपुट-आऊटपुटचा व्यवहारीपणा वगैरेचा सुरुवातीपासून अभाव. याचा अर्थ इथे सगळा बेशिस्त कारभार चालतो, असं नक्कीच नाही. एकुणात आपली भारतीयांची जीवनशैली आणि जीवनमूल्यं ही खूप काटेकोरपणाची नाहीत. आपली मानसिक घडण ही जीवघेण्या स्पर्धेची किंवा काहीही करून लक्ष्य वगैरे गाठण्याची नाही. जमेल तसं करावं आणि जितकं होईल त्यात समाधान मानावं, हीच आपली सर्वसामान्य घडण आहे. ही घडण आनंदवनाने सुरुवातीपासून स्वीकारलेली दिसते. आनंदवन हे हजारो लोकांच्या कष्टांतूनच उभं राहिलेलं असल्यामुळे इथे आळश्यांना स्थान नाही. प्रत्येक सक्षम माणूस इथे काम करताना दिसतोच दिसतो; पण तरीही कामाचा ताण येणारी माणसं तुम्हाला इथे दिसणार नाहीत. कारण ज्याला जे काम येत असेल त्याने ते करावं, हा इथला पहिल्यापासूनचा नियम. याबाबत एक किस्सा प्रातिनिधिक आहे. दोन्ही पाय गमावलेला एक माणूस बाबांसोबत कोणतंच मेहनतीचं काम करू शकत नव्हता. त्याच्यासमोर प्रश्न होता, की आपण काय करायचं मग? बाबा त्याला म्हणाले, “तू शेतात झाडाखाली बसून डबा वाजव.” कुणी म्हणेल, हे काय काम झालं? पण बाबांनी त्याला हे काम दिलं, कारण एकतर तो ते बसल्या बसल्या करू शकणार होता, आणि त्याच्या डबा वाजवण्यामुळे पिकाचं नुकसान करणार्या पाखरांचा बंदोबस्त होणार होता. तू अमुकच कर, असा हट्ट न धरता, तो जे करू शकेल असं काम त्याला दिलं गेलं. आनंदवनात अशी डझनाने उदाहरणं आहेत. त्यामुळे माणसं ताण न घेता सहजपणे काम करत आली आहेत, आणि अगदी अशक्य वाटतील अशी प्रचंड कामंही त्यातून प्रत्यक्षात आली आहेत.
या अनौपचारिकतेचा वेगळा आविष्कार म्हणजे आमटेवृक्षाच्या दुसर्या शाखेचे
प्रमुख डॉ. प्रकाश आमटे. अनौपचारिकता हा त्यांचा स्वभाव असल्यामुळेच ते चाळीस वर्षं
भामरागडच्या जंगलात टिकून राहिले असणार. त्यांचा हा प्रवास त्यांच्या ‘प्रकाशवाटा’
पुस्तकात विस्ताराने आलेला असल्याने त्याची पुनरुक्ती इथे करत नाही. पण लोड घेऊन काम
करणारा माणूस त्या जंगलात टिकला नसता, हे तिथे गेलं की आपल्याला समजतं. गडचिरोली
किंवा चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणाहून हेमलकशाला जायचं म्हटलं तर चार-पाच तास लागतात.
आलापल्लीपासून पुढे संपूर्ण एकट रस्ता. पूर्ण जंगलातला. भामरागड हे महाराष्ट्राच्या
सीमेवरचं शेवटचं गाव. हेमलकसा हे त्याहूनही एक बारीक गाव. तिथून पलीकडे छत्तीसगडचा
दंतेवाडा, नारायणपूर, सुकमा हा नक्षवालवाद्यांच्या प्रभावाचा
भाग आहे. दुसरीकडे तेलंगण, जिथे नक्षलवाद्यांचं अस्तित्व सुरुवातीपासून
आहे. एकुणात कसोटी पाहणारा हा टापू आहे. या भागात नक्षलवादी आहेत, म्हणून
पोलिस-अर्धसुरक्षा बल-राखीव पोलिस दल- एटीएस वगैरेही आहेत. हा भाग त्यामुळे सतत दडपणाखाली
जगत असतो. या परिस्थितीत थोडी थोडकी नव्हे, चार दशकं आरोग्य
आणि शिक्षण या क्षेत्रांत काम करत राहणं, हे येरागबाळ्याचं काम नाही.
पण हे काम करणारा माणूस कसा आहे? प्रकाशभाऊंना भेटलं-बोललं
तर या माणसाने हे सगळं झेललं आहे आणि अशा बिकट परिस्थितीत त्याने हे काम उभं केलं आहे,
असं
अजिबात वाटत नाही. एकदम डाऊन टु अर्थ माणूस! पण जंगलात मुक्तपणे वावरताना प्राणी जसे
सावध असतात तसे हेही असतात. जंगलात राहणारी माणसं जशी पाऊस कधी पडेल, वादळवारं
केव्हा येईल, आसपास वाघ किंवा अन्य जनावर आहे का याचे आडाखे बांधून जगतात, तसंच
प्रकाशभाऊ आणि त्यांचं कुटुंब व कार्यकर्ते तिथे इतक्या वर्षांत विकसित झालेल्या आडाख्यांआधारे
जगताना दिसतात.
एक उदाहरण सांगतो. पुस्तकाच्या कामानिमित्त आम्ही हेमलकशात मुक्कामी असताना
परतण्याच्या दिवशी सकाळी बातमी थडकली, की नक्षलवाद्यांनी परिसरात बंद पुकारला
आहे. आम्ही हवालदिल झालो. सात-आठ तासांचा प्रवास करून आम्हाला संध्याकाळी नागपूरला
पोहोचायचं होतं. प्रकाशभाऊंना म्हटलं, “आता कसं करू आम्ही?” ते म्हणाले,
“थांबा.
तासाभरात सांगतो.” तासाभराने म्हणाले, “तुम्ही जाऊ शकता. काळजी करू नका.” आम्हाला
वाटलं, त्यांनी पोलिसांना किंवा प्रशासनाला फोन करून माहिती मिळवली असेल. त्यांना
विचारलं, तर म्हणाले, “त्याची काही गरज नव्हती. आम्हाला बरोबर
कळतं इथे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे का ते!” कसं? भामरागडला जाणार्या
रस्त्यावरून एसटी बसेस गेल्या का? किती गेल्या? हॉस्पिटलमध्ये पेशंट्स
आले का? कुठून आले? किती आले? येताना ते कोणत्या
वाहनाने आले? शाळेत कुणी बाहेरून आले का? या प्रश्नांच्या उत्तरांवरून माहिती मिळते
आणि त्यातून निर्णय केला जातो. ही पद्धत फक्त हेमलकशाहून नागपूरला जाण्यासाठीपुरतीच
वापरली जाते असं नाही, अनेक बाबतींत वापरली जाते. विविध निरीक्षणांवर विविध आडाखे बांधण्याची
अशी स्वतंत्र पद्धतच तिथे तयार झाली आहे. जंगलांचे जसे स्वत:चे नियम असतात,
तसे
या संघर्षग्रस्त भागाचेही काही नियम आहेत. ते समजून त्यात स्वत:ला अॅडजस्ट करण्याची
लवचिकता या मंडळींनी अंगी बाणवली आहे. म्हणून तर ते इथे इतकी वर्षं हाती-पायी धड टिकू
शकले.
१९७०च्या दशकाच्या सुरुवातीला बाबा आमटे इथे आले, तेव्हा
इथे फक्त जंगल होतं आणि माणसांना पाहून जंगलात पळून जाणारे आदिवासी होते. वर्षं-दोन
वर्षांनी खुद्द प्रकाशभाऊ आणि डॉ. मंदाताई त्यांच्या लग्नानंतर इथे आले, तेव्हाही
परिस्थिती तशीच होती. अशा परिस्थितीत तिथे थांबून राहायचं, लोकांचा विश्वास
कमवायचा, आपण त्यांच्या सेवेसाठी आलोय हे त्यांच्या गळी उतरवायचं, अत्यंत
अपुर्या साधनांनिशी दवाखाना चालवायचा आणि शारीरिक श्रम व मानसिक हेलकाव्यांवर मात
करत काम वाढवत न्यायचं, हे सारंच अशक्य कोटीतलं. आज हेमलकशात एक सुसज्ज हॉस्पिटल उभं राहिलं आहे
आणि पाहुण्यांना राहण्यासाठी एक विश्रामगृहही. पूर्वी तिथे स्वत: हातांनी उभारलेल्या
झोपड्या होत्या, बाकी काही नाही. अगदी दहा-बारा वर्षांपूर्वीही तिथे कार्यकर्त्यांची घरं,
शाळेची
जुनी इमारत आणि पडवीवजा इमारतींचं संकुल असलेलं जुनं रुग्णालय होतं फक्त. प्रकल्प बघायला
येणार्या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था आमट्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर होती.
अगदी जुजबी स्वरूपाची. आता प्रकल्पाच्या ठिकाणी बरेच बदल झाले आहेत.
अर्थात, चाळीस वर्षांत हे सर्व भौतिक बदल होत गेलेले असले, तरी प्रकाशभाऊ-मंदाताई मात्र आहेत तसे राहिले आहेत. त्यांच्याबद्दल त्यांचे पूर्वीपासूनचे सहकारी आणि ओळखीचे वगैरे जे सांगतात, ते ऐकलं तर असं लक्षात येतं, की ही मूळची साधी माणसं साधीच राहिलेली आहेत. मी स्वत: त्यांना दहा वर्षं ओळखतो आहे. या काळात त्यांच्या वागण्या-बोलण्यात तसूभराचाही फरक पडलेला दिसला नाही. याचं कारण प्रसिद्धी, वलय, सिनेमामुळे मिळालेलं ग्लॅमर, पुरस्कार, सन्मान अशा कशाचाही त्यांनी स्वत:वर परिणाम होऊ दिलेला नाही.
त्यांच्याकडे गेलं, दोन-चार दिवस त्यांच्यासोबत राहिलं की हा
माणूस आणि त्याचं कुटुंब कसं आहे ते कळतं. एका बंगलीवजा जुन्या घरात हे कुटुंब राहतं.
घरासमोर एक छोटीशी बाग आणि मागच्या बाजूला प्राण्यांचं गोकुळ. घराच्या आसपास हॉस्पिटल,
शाळा,
मुला-मुलींची
होस्टेल्स, कॉमन किचन, कार्यकर्त्यांची घरं असं सगळं. म्हटलं तर
स्वतंत्र, म्हटलं तर एकमेकांत मिसळून गेलेलं. हा सगळा प्रकाशभाऊ-मंदाताई-विलास मनोहर
आणि इतर कार्यकर्त्यांनी उभारलेला गोतावळाच. सकाळपासून रात्रीपर्यंत आपापल्या वेळा
सांभाळत चालणारा. पण तुम्ही प्रकाशभाऊंसोबत वावरत असाल, तर हे सगळं खटलं
या माणसाने उभारलंय आणि चालवलंय, असं वाटतही नाही. त्यांचा तिथला वावर अगदी
साधा असतो. खादीचा बिनबाह्यांचा बनियन आणि गुडघ्यापर्यंतची साधी पांढरी हाफपँट अशा
वेशात त्यांची तिथे कामं चालू असतात.
आणि कामं चालू असतानाही ते अगदी निवांत असतात. पेशंटला तपासता तपासता
केस काय आहे, असं आपल्याला सांगत असतात. जुन्या-नव्या केसेसबद्दल बोलत असतात. माणसांच्या
तर हजारो गोष्टी त्यांच्या पोतडीत भरलेल्या आहेत. ती पोतडी ते गप्पांच्या मैफिलीत झकास
मोकळी करत असतात. कोणताही संदर्भ न सांगता बोलण्याची त्यांची पद्धत. एका ओळीचंही प्रास्ताविक
न करता ते थेट एखाद्या घटनेबद्दल सांगणार, एखाद्या माणसाबद्दल कॉमेंट करणार. त्यांच्या
बोलण्याचा संदर्भ तुमच्या लक्षात आला नाही, तर तुम्हाला काहीही
अर्थबोध होणार नाही. पण आमच्याबाबत हा प्रश्न फारसा येत नाही. कारण त्यांचं पुस्तक
तयार करताना त्यांच्या आजवरच्या प्रवासाचे बरेच बारीकसारीक कप्पे-कोपरे आम्हाला कळलेले
आहेत. त्यामुळे जेव्हा केव्हा भेट होते, तेव्हा आमची गप्पांची मैफल छान जमते.
प्रकाशभाऊ-मंदाताई, दिगंत-अनघा आणि अनिकेत-समीक्षा |
प्रकाशभाऊ पुण्यात आले की कधी भेट होते. अर्थात तेही आपण त्यांना गाठलं
तर. अन्यथा, दुसर्या दिवशीच्या पेपरमध्ये फोटो छापून आल्यानंतरच कळतं की हे काल पुण्यात
होते! पण गाठलं-भेटलं, तर प्रेमाने बोलणार, घरच्यांची-ओळखीच्यांची आस्थेने विचारपूस
करणार. आणि हाताशी मोकळा वेळ असेल तर मैफल सुरू! मला आठवतं, मंदाताईंच्या कसल्याशा
तपासण्या करण्यासाठी त्यांना पुण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. तिथे
त्यांना भेटायला गेलो. आत तपासणी चालली होती आणि एका खोलीत प्रकाशभाऊ थांबले होते.
तास-दोन तास त्यांच्यासोबत होतो. ते निवांत होते. गप्पा सुरू झाल्या. सोबत हसाहशी आणि
ते ब्रँडेड कडकडाटी हास्य! आत मंदाताईंची तपासणी चालू आणि बाहेर यांची मैफल. त्यांना
म्हटलं, “तुमच्याकडे पाहून वाटत नाही की तुम्ही मंदाताईंना टेस्ट करण्यासाठी आणलं
आहे...”
त्यावर ते म्हणाले, “डॉक्टर त्यांचं काम करताहेत, आपण
आपलं. इथे आपण काळजी करून आतल्या टेस्ट्समध्ये काही बदल होणार आहे का! कशाला टेन्शन
घ्यायचं? जे होईल ते बघायचं.”
जगण्याविषयीची सहजता हीच या माणसाची सगळ्यात मोठी स्ट्रेंग्थ आहे आणि
त्यामुळेच कोणत्याही विपरीत परिस्थितीत हा माणूस खंबीर राहू शकतो. अस्वलाच्या हल्ल्यात
संपूर्ण चेहरा फाटलेला आणि नाक, डोळे, तोंड सगळंच गमावून
बसलेला माणूस जेव्हा त्यांच्यासमोर येतो, तेव्हाही ते स्वत:चं मन:स्वास्थ्य ढळू देत
नाहीत आणि कुठे पाड्यावर शेकोटीशेजारी झोपलेल्या बाळाचा जळून कोळसा झालेला हात बघूनही
हा माणूस भक्कम राहतो. कदाचित, डॉक्टरी पेशात प्रत्येकाची ही मानसिक तयारी
होत असेलही. पण अशा अनुभवांबद्दलचं वर्णन तुम्हाला स्पर्श करून जातं आणि नकळत त्यांचं
संपूर्ण अविर्भावांविरहित बोलणं ऐकून त्यांच्यातली करुणा, तिचा अंश तुमच्यातही
उतरतो.
जगण्याविषयीची सहजता आणि इतरांविषयीची करुणा याचं एक उदाहरण सांगतो. काही
वर्षांपूर्वी त्यांना एक विषारी साप चावला, तेव्हा मोठीच गंभीर
परिस्थिती उद्भवली होती. पण स्वत:वर ओढवलेल्या या प्रसंगाला प्रकाशभाऊ धीरोदात्तपणे
सामोरे गेले. उपचारांनंतर ते पूर्ण बरे झाले. गंमत अशी, की त्या प्रसंगानंतरही
ते त्या सापाला दोष देत नाहीत. म्हणतात, “तो विषारी आहे हे माहीत असूनही मी त्याला
नीट हाताळलं नाही. माझ्या चुकीच्या हाताळणीचा त्याला त्रास झाला असेल, म्हणून
त्याने डंख मारला. त्यात त्याची काय चूक?” एवढा सर्पदंश होऊनही त्यांच्या मनात सापाविषयी
करुणाच आहे. ते त्या सापाला दोष द्यायला तयार नाहीत. आणि एवढा मोठा प्रसंग स्वत:वर
गुदरूनही त्यांचं सर्पप्रेम अजिबात कमी झालेलं नाही. सापाला हाताळताना ते अधिक सजग
झाले, एवढाच काय तो बदल.
मुळात माणसाच्या जातीपेक्षा प्राणी हे जास्त विश्वासार्ह असतात, असं प्रकाशभाऊंचं म्हणणं आहे. या विश्वासाच्या जोरावरच ते जंगली प्राण्यांसोबत मोकळेपणाने वावरतात. हायना म्हणजे तरस हा वाघालाही भारी पडेल असा हिंस्र प्राणी! पण प्रकाशभाऊंशी त्याचं वागणं अगदीच विपरीत असतं. तो त्यांच्या छातीवर पुढचे पाय काय ठेवतो, त्यांना जमिनीवर पाडून त्यांच्याशी कुस्ती काय खेळतो, सगळं अजबच. हरणं, काळविटं, नीलगायी, माकडं, शेकरू यांच्यासोबत तर काय, त्यांची दोस्तीच! पण जंगलात माणसांना उभं फाडणारी आणि माणसाच्या दुप्पट-तिप्पट वजनाची अस्वलं जेव्हा प्रकाशभाऊंचे हात पकडून त्यांच्याकडून रोटी खातात किंवा प्रेमाने त्यांना मिठी मारतात तेव्हा अचंबित होण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो.
आणि सर्वांत चित्तथरारक प्रसंग असतो, जेव्हा प्रकाशभाऊ
बिबट्यांच्या पिंजर्यात असतात तेव्हा. एखाद्या मित्राला भेटायला जाण्याच्या ओढीने
सहजतेने ते पिंजर्यात जातात आणि त्यांच्यासोबत दंगामस्ती करतात. बिबट्यांसोबत बसतात,
त्यांच्याशी
खेळतात. बिबटे त्यांना चाटतात, जबडा उघडून दातांनी हात पकडतात. बिबटे आणि
प्रकाशभाऊ दोघंही एकमेकांना छान एन्जॉय करत असतात. त्यांचा हा खेळ पाहून वाघाबद्दल
वाटणारी भीती क्षणात लुप्त होऊन जाते आणि आपणही बिबट्यासोबत जाऊन खेळावं असं वाटून
जातं. त्या दोघांचं वागणं इतकं सहज असतं.
मी आजवर पाच-सात वेळा तरी प्रकाशभाऊंसोबत त्यांच्या प्राण्यांच्या गोकुळात
फिरलो आहे. मी बघितलंय, प्रकाशभाऊ बिबट्याच्या पिंजर्यात सहजपणे वावरत असले तरी इतर प्राण्यांपेक्षा
बिबट्यासोबत त्यांच्या हालचाली थोड्या सावध असतात. पिंजर्यात गेल्यावर त्यांची नजर
बदलते. सोबत त्यांचा नातू अर्णव असेल तर त्यांच्या बघण्या-वागण्यात आणखी बदल होतो.
मी एकदा प्रकाशभाऊंना म्हटलं, “बिबट्यासोबत असताना
तुम्ही इतर प्राण्यांपेक्षा कमी रिलॅक्स असता का?” ते म्हणाले,
“रिलॅक्स
न राहता तुम्ही बिबट्यासोबत वावरूच शकत नाही.” पुढे म्हणाले, “कोणत्याही
वन्य प्राण्याला तुमच्याबद्दल विश्वास वाटायला हवा. तुम्ही घाबरलात आणि तुमचे डोळे
मोठे झाले, हालचाली वाढल्या, श्वास वेगवान झाला, तर तुमच्यातील
बदल त्यांना बरोबर कळतात. तुमच्यापासून त्यांना धोका आहे अशी सूचना त्यांना जाते आणि
त्यातून ते हल्ला करण्याची शक्यता तयार होते. मी बिबट्यासोबत सावध असल्यासारखा तुला
वाटतो कारण मी घाबरलेलो किंवा आक्रमक झालेला आहे असं त्याला वाटणार नाही, यासाठी
स्वत:ला कंट्रोल करत असतो. त्यातून मी जास्त सावध आहे असं तुला वाटत असेल. प्रत्यक्षात
पूर्ण विश्वास ठेवल्याशिवाय तुम्ही बिबटे, वाघ किंवा सिंह यांच्यासोबत वावरू शकत नाही’
प्राण्यांचे स्वभाव लक्षात घेऊन, त्यांच्या कलाने वागण्याची त्यांची पद्धत
आहे, स्वरक्षणार्थ हातात काठी किंवा अन्य शस्त्र बाळगण्याची त्यांची पद्धत
नाही. ही गोष्ट त्यांच्याबद्दल बरंच काही सांगून जाणारी आहे.
आधी म्हटल्याप्रमाणे हेमलकशातही कुठल्याही गोष्टीचा हट्टीपणा नाही. इथे
आदिवासींना मारून मुटकून नव्हे, तर त्यांच्यात विश्वास व्यक्त करून आपलंसं
केलं गेलं आहे. त्यातून त्यांना आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली गेली आहे. ते
करतानाही त्यांनी आदिवासींची वैदू व्यवस्था नाकारली नाही, उलट त्यांच्या पारंपरिक
ज्ञानाचा उपयोग करून घेतला. आदिवासी विद्यार्थ्यांना शिकणं सोपं जातं म्हणून मराठीप्रमाणेच
त्यांच्या स्थानिक माडिया भाषेचाही आधार घेतला गेला. शाळा मराठी माध्यमाची असल्याने
‘आम्ही मराठीतच शिकवणार’ असा हेकेखोरपणा त्यांनी केला नाही. त्यांच्या या लवचिक धोरणामुळे
या शाळेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत चांगलं काम करू शकले. हल्ली
या मंडळींनी आणखी पलीकडे नेलगुंडा या गावी एक नवी शाळा सुरू केली आहे. ती इंग्रजी माध्यमाची
आहे. शाळेचं व्यवस्थापन बघणार्या अनिकेत आणि समीक्षाला विचारलं, तर त्यांचं
म्हणणं, “माडिया आदिवासींना मराठी काय आणि इंग्रजी काय, दोन्ही भाषा परक्याच.
त्यामुळे त्यांची मातृभाषा मराठी आहे आणि आम्ही त्यांना इंग्रजीतून शिकवतोय असं नाही.
इंग्रजीतून शिकून आदिवासी विद्यार्थ्यांना आणखी मोठं आकाश विहरायला मिळेल या आशेने
आम्ही हा निर्णय घेतलाय.” प्रकाशभाऊंमधील लवचिकता पुढच्या पिढीतही अशी झिरपतेय तर!
सहजता, अनौपचारिकता, लवचिकता, ताण न घेण्याची वृत्ती
या सर्व शब्दांचा एकत्रित अर्थ समजून घ्यायचा असेल, तर अलीकडे उलगडलेल्या
घडामोडीबद्दल सांगायला पाहिजे. प्रकाशभाऊंनी मंदाताई आणि विलास मनोहर यांच्यासारख्या
सहकार्यांसोबत तीस-पस्तीस वर्षं जे काम केलं, त्या कामातून ही
मंडळी किती अलगदपणे मोकळी झाली हे पाहण्यासारखं आहे. आपल्याशिवाय हे काम चालू शकणार
नाही, असा कोणताही आढ्यतेखोरपणा न करता त्यांनी हळूहळू सर्व कामं पुढच्या पिढीच्या
हाती सोपवायला सुरुवात केली. दिगंत डॉक्टर होऊन परतल्यानंतर २००३ साली त्याने प्रकल्पात
काम करायला सुरुवात केली. पुढे त्याचं लग्न झाल्यावर डॉ. अनघा या आणखी एका डॉक्टरची
भर पडली. अनिकेत हा शिक्षणाने इंजिनियर. त्याने संपूर्ण प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची
जबाबदारी स्वत:वर घेतली. त्याची बायको समीक्षा शाळेच्या कामात गुंतली. या दोन्ही जोडप्यांची
जवळपास दहा वर्षांची उमेदवारी चालू होती, तेव्हा मागची पिढी आघाडीवर राहून कार्यरत
होती. पण मुलांचा कामाचा झपाटा आणि आवाका बघून हळूहळू मागच्या पिढीने पुढच्या पिढीकडे
सूत्रं सोपवली आणि ‘मदत-सल्ला कधीही मागा, आम्ही उपलब्ध आहोत’ असं म्हणत निवृत्तीचा
मार्ग पत्करला. दैनंदिन कामातून मोकळे झाल्यानंतर निमंत्रणांनुसार ही मंडळी राज्यात,
देशात
आणि जगातही कुठे कुठे जातात आणि आपल्या कामाबद्दल आणि आदिवासींच्या प्रश्नांबद्दल लोकांशी
बोलून पुढच्या पिढीला मदत करतात.
वर्षभरापूर्वी मी हेमलकशाला गेलो होतो, तेव्हा संध्याकाळच्या
वेळी प्रकाशभाऊ आणि मंदाताई आपापल्या सायकली घेऊन चक्क फिरायला निघाले होते. मी म्हटलं,
“कुठे?”
तर म्हणाले,
“रोज
संध्याकाळी एक फेरी असते आमची नदीवर!” मी चकितही झालो आणि खूषही झालो. अनिकेत-दिगंतला
म्हटलं, “तुम्ही नशिबवान खरे! तुमचे आई-वडील किती समजुतदार! अन्यथा, मुलांना
काही करताच येत नाही असं मानणारे आणि म्हणणारे आई-वडीलच जास्त असतात.”
दिगंत आणि अनघा या डॉक्टर जोडप्यासोबत नव्याने उभारलेलं हॉस्पिटल समजून
घेण्यासाठी फिरत होतो. दिगंत हाफपँट-टी शर्टच्या वेशात आणि अनघा घरगुती वाटणार्या
पंजाबी ड्रेसमध्ये. डॉक्टर असण्याच्या दिखाऊ खाणाखुणांचा दोघांमध्येही पूर्ण अभाव.
हॉस्पिटलचे विविध विभाग, ओपीडी, आपॅरेशन थिएटर आणि
तिथली प्रचंड साधनसामग्री-यंत्र वगैरे ते दाखवत होते. त्यातील बर्याच यंत्रणा अत्याधुनिक
होत्या. त्यातील बहुतेक गोष्टी पूर्वीच्या दवाखान्यात नव्हत्या. त्या अनुषंगाने प्रकाशभाऊ-मंदाताईंशी
बोलणं झालं, तेव्हा ते म्हणाले, “यातली बहुतेक मशिनरी आम्ही बघितलेलीही नव्हती.
त्यामुळे वापरण्याचा प्रश्नच नाही. पण पुढच्या पिढीला या वस्तू आवश्यक वाटतात. कोणती
यंत्रं घ्यावीत, ती कुठे ठेवावीत, इमारतीची रचना कशी असावी अशा कोणत्याही
गोष्टीत आम्ही दोघं पडत नाही. त्यांच्यावर सोपवलंय सर्व. त्यांना आवश्यक असेल ते ते
करतील!”
या सुसज्ज नव्या हॉस्पिटलमध्ये आता दिगंत-अनघा आदिवासींवर उपचार करतात. वर्धा-नागपूरच्या जुन्या-नव्या डॉक्टर मंडळींना त्यांनी जोडून घेतलंय. त्यांनाही तिथे बोलावलं जातं. ऑपरेशन्स वगैरे केली जातात. नाना प्रकारच्या आजारांवरील ऑपरेशन्सची शिबिरं इथे भरवली जातात. तेलंगण-छत्तीसगडपर्यंतचे हजारो पेशंट्स त्याचा लाभ घेतात, आजारमुक्त होतात.
या हॉस्पिटलशिवाय दिगंत-अनघाने आता हेमलकशाच्या तीस-चाळीस किलोमीटर परिघाच्या
क्षेत्रात गावोगावी छोटी सेंटर्स सुरू केलीत. या सेंटर्समध्ये त्या गावातीलच सुशिक्षित
तरुणांना प्रशिक्षण देऊन बेअर फूट डॉक्टर्स बनवलं गेलंय. निर्णय घेण्यासाठी मदत होईल
असे तक्ते, मार्गदर्शनपर माहिती आणि एक मोबाइल अॅपही तयार केलंय. प्रत्येक गावात
अत्यावश्यक औषधांची बेगमीही करून ठेवलीय. गावातल्या पेशंटला या सेंटरमध्येच प्राथमिक
उपचार दिले जातात आणि आवश्यकतेप्रमाणे हेमलकशाला आणलं जातं. ही सर्व व्यवस्था या मुलांंनीच
उभी केली आहे. प्रकाशभाऊ-मंदाताई पाठीशी असतातच.
तिकडे अनिकेतनेही हेमलकशाचं व्यवस्थापन सांभाळत असताना आसपासच्या गावांत जलसंधारणाचं आणि ग्रामविकासाचं मोठं काम हाती घेतलं आहे. त्याच्यासोबत काही गावांमध्ये फिरलो, तेव्हा त्याच्या कामाचा धडाका आणि आवाका बघायला मिळाला. कुठे पूर्वीच्या तळ्याची खोली वाढव, कुठे बुजलेल्या तळ्याला पुनरुज्जीवित कर, कुठे घरोघरी पाणी योजना राबव, अशी बरीच अगडबंब कामं त्याने हाती घेतलीत. गावागावांत त्याचा वावर आत्मविश्वासाने भरलेला जाणवत होता. तो गावात पोहोचला की लोक त्याच्याभोवती गोळा होत होते, त्याला सांगत-विचारत होते, नमस्कार-चमत्कार घडत होते. हसर्या चेहर्याने अनिकेत पुढच्या गावाकडे रवाना होत होता.
आमट्यांच्या हेमलकसा शाखेतील पुढच्या पिढीसोबत फिरताना, त्यांचं
काम समजून घेताना या मुलांमध्ये अभ्यास आणि धडाडी या दोन्हीचा सुंदर मिलाफ झाल्याचं
लक्षात येत होतं. प्रकाशभाऊ आणि मंदाताईंनी मुलांना कर्तृत्व गाजवायची संधी आणि मोकळं
आकाश दिलं, त्यामुळे ऐन तरुणपणातच ही मुलं धडाकून कामं करू शकताहेत. आजी आजोबांचं
आणि आई-वडिलांचं काम पुढे नेऊ शकताहेत.
तर अशी ही कहाणी आमट्यांच्या डेरेदार वृक्षाची. मी असा नशीबवान, की बाबा-साधनाताई, विकासभाऊ-भारतीताई, प्रकाशभाऊ-मंदाताई आणि त्यांच्या पुढच्या पिढीच्या सर्वांसोबत माझी कमी-अधिक नाती तयार झाली आणि त्यामुळे या वृक्षाची शीतल छाया मी अनुभवू शकलो.
सुहास कुलकर्णी
suhas.kulkarni@uniquefeatures.in
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा