हवामानासोबत बदलतोय माणूसही - निरंजन घाटे
हवामानबदलाची चर्चा करताना मानवाच्या उत्क्रांतीवर आणि वर्तणुकीवर झालेल्या परिणामांना दुर्लक्षून चालत नाही. जगभरात यासंदर्भात बरंच संशोधन झालं आहे, अजूनही सुरू आहे. त्याचा हा आढावा.
हवामान बदलाचा मानवी वर्तणुकीवर परिणाम होतो, हे वर्तणूक शास्त्रज्ञांनी
वेळोवेळी सांगितलं आहे. जागतिक हवामानबदलाचा तर मानवी वर्तणुकीवर निश्चितच परिणाम होईल,
असंही
ते म्हणतात. सध्या हवामान बदलाचा मुद्दा पुढे येतो, तेव्हा वाढणारं सरासरी
तापमान हा त्यातला कळीचा मुद्दा असतो. त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामुळे
मानवी उत्क्रांतीवर होणारा परिणाम. ही शक्यता देखील बर्याच वर्तणूक शास्त्रज्ञांनी
पडताळून पाहिली आहे. इतर प्राण्यांची शरीरं आणि त्यांच्या डोक्याची व्याप्ती यांच्या
प्रमाणापेक्षा नैसर्गिकरीत्या मानवी डोक्याची व्याप्ती मोठी असते. कारण मानवी मेंदू
इतर प्राण्यांच्या शारीरिक तुलनेत बर्यापैकी मोठा असतो. मेंदू मोठा असल्यामुळेच आपण
अमूर्त विचार करू शकतो, बोलू शकतो आणि भविष्याचा अंदाज घेण्यासाठी इतिहासाची मदत घेतो. आपल्या
बर्याच जाणिवा इतर प्राण्यांपेक्षा तीव्र असतात. त्यामुळे आपण कसे वागतो हे बरेच वेळा
भावनांवर अवलंबून असतं.
मानवी मेंदूबद्दलचा वैज्ञानिक अभ्यास खर्या अर्थाने सुरू झाल्यानंतर
त्याबद्दलच्या आख्यायिका आणि गैरसमजुती हळूहळू मागे पडत गेल्या. मेंदूच्या कार्याचं
विश्लेषण, तसंच अभ्यास करून मेंदूचं कोडं सोडवण्यासाठी संशोधन सुरू झालं. मेंदूचा
अभ्यास विविध प्रकारे केला गेला. त्यातून एक नवा विचार पुढे आला- आपला मेंदू असा अपवादात्मक
बनण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे वेळोवेळी झालेले जागतिक हवामान बदल. हा विचार २००९
मध्ये मार्क मस्लिन यांनी सर्वप्रथम मांडला. मस्लिन तेव्हा युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ
लंडनमध्ये भूगोलाचे प्राध्यापक होते. या विषयाने त्यांना पछाडलं होतं, असं
म्हटलं तर वावगं ठरू नये. पुढे त्यांनी त्यांच्या या म्हणण्याला अधिक नेटकं स्वरूप
दिलं. गेली काही कोटी वर्षं पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेत हळूहळू बदल
होत आहे. त्याचा परिणाम पृथ्वीतलावरील जलवायूमान बदलण्यात झाला. या जागतिक जलवायूमान
बदलाचा परिणाम सजीवांच्या उत्क्रांतीवर झाला. मानवी उत्क्रांतीसुद्धा यातून सुटली नाही.
शेवटी माणूसही एक प्राणीच आहे.
हवामान बदल हे सातत्याने होत नाहीत. खरं तर ते स्पंदनांप्रमाणे अगदी नियमित
मध्यंतरानेही होत नाहीत. तरीही त्यांना ‘स्पंदनात्मक हवामान बदल’ असं म्हटलं जातं.
(पल्स्ड क्लायमेट चेंजेस) याचं कारण ते थांबून थांबून पण अधून मधून घडत आले आहेत आणि
पुढेही घडत राहणारच. पृथ्वीचा इतिहासच तसा आहे आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते,
हे अनुभवसिद्ध
ज्ञान भविष्यकाळात काय घडेल याची जाणीवही करून देतं. मस्लिन यांच्यामते, आधुनिक
मानव म्हणजे आपले पूर्वज (होमोसेपियन्स) ही या हवामान बदलांची देणगी आहे.
याचं कारण हवामान बदलादरम्यान दुष्काळ आणि सुकाळ हे आळीपाळीने अनुभवायला
मिळतात. भूशास्त्रीय पुराव्यांनुसार पूर्व आफ्रिकेतील ही आंदोलनं टोकाची होती. काही
वेळा तिथे पाण्याची कमतरता नसे. नद्यानाल्यात भरपूर पाणी असे. परिणामत: वनाच्छादनही
भरपूर असे. तर काही वेळा तो भाग जलविहीन वाळवंट बनत असे. त्याचा परिणाम म्हणजे आदिमानवांच्या
नवनव्या जाती इथे जन्माला येत होत्या. त्यामुळे आदिमानवांच्या अधिकाधिक प्रगत आणि मोठ्या
आकाराचा मेंदू असलेल्या जाती अस्तित्वात आल्या. (आफ्रिकेच्या खचदरीच्या (रिफ्ट व्हॅली)
भूप्रदेशात याचे पुरावे विखुरलेले आहेत.) त्यांचं अंतिमत: आधुनिक मानवात रूपांतर झालं.
त्या आधुनिक मानवाला या परिस्थितीला तोंड देण्यापेक्षा हा भूभाग सोडून इतरत्र स्थलांतर
करणं योग्य वाटलं.
या अभ्यासाच्या सहसंशोधिका सुझान शुल्झ यांनी एका शोधनिबंधात लिहिल्यानुसार
त्यांच्या चमूला १९ लाख वर्षांपूर्वी या भागात अनेक नव्या जाती अस्तित्वात आल्याचे
पुरावे मिळाले. त्यात त्या म्हणतात, ‘हे परिस्थितीतील तीव्र बदलांमुळे घडलं असावं,
असं
आम्हाला वाटतं. त्या काळात पूर्व आफ्रिकेच्या खचदरीच्या प्रदेशात गोड्या पाण्याची बरीच
तळी होती. ती भरलेली असत. या वेळी ज्या विविध आदिमानवी जाती होत्या, त्यातल्या
काहींपासून ‘होमो इरेक्टस’ ही आदिमानवी प्रजाती अस्तित्त्वात आली. आदिमानवाची ही प्रजाती
दोन पायांवर ताठ उभी राहून आपले सर्व जीवनव्यवहार पार पाडत असे. ताठ उभा राहणारा आदिमानव
(मानवी कुळातील प्राणी) असा ‘होमो इरेक्टस’ या नावाचा अर्थ आहे. या मानवी प्रजातीचा
मेंदू या आधीच्या सर्व आदिमानवी प्रजातींपेक्षा आकाराने किमान दीडपट तरी अधिक मोठा
असावा.’ सुझान शुल्झ मँचेस्टर इथे मानवशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
गेल्या एक कोटी वर्षांमध्ये आफ्रिकेच्या जलवायुमानात जे बदल सातत्याने
घडत होते, त्यामुळे हळूहळू त्या मानवाच्या मेंदूचा आकार वाढत गेला असावा,
याचं
कारण त्याच्याजवळ स्वसंरक्षणाची कोणतीच साधनं नव्हती. सतत बदलत्या आव्हानांना तोंड
देण्यासाठी त्याच्याकडचं एकमेव साधन म्हणजे त्याची बुद्धी. त्यामुळे त्याला सतत मेंदूचा
वापर करावा लागत होता. याचा परिणाम त्याच्या मेंदूच्या वाढीत झाला. वाढलेल्या मेंदूचे
त्याला फायदे झाले, त्याचबरोबर त्याच्या स्वभावातही बदल घडू लागला. यातला एक महत्त्वाचा बदल
म्हणजे तो संयम गमावू लागला. मेंदूच्या वाढीच्या समप्रमाणात त्याचा संतापी स्वभाव वाढू
लागला. मानवी स्वभाव वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो. शीतकटिबंधात अतिथंडीत आत्महत्यांचं
प्रमाण वाढतं, तर जास्त तापमानात माणूस अति आक्रमक बनतो, असं दिसतं.
प्रिन्स्टन विद्यापीठ आणि बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील वर्तणूक
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार जलवायुमानातील बदल आणि मानवी वर्तणूक यांचा निकटचा
संबंध आहे. तापमान आणि पाऊस यांच्यात थोडी जरी वाढ झाली तरी वैयक्तिक/कौटुंबिक हिंसाचारात
किमान चार टक्के वाढ होते, तसंच सार्वजनिक हिंसेच्या घटनांत १४ टक्क्यांनी
वाढ होते, असं या संशोधनाची आकडेवारी सांगते.
बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापिठातील डॉ. मार्शल बर्क म्हणतात,
‘जलवायुमान
आणि मानवी वर्तणुकीमधील संबंध पृथ्वीवर सर्वत्र जवळजवळ सारख्याच प्रमाणात आढळतो. जलवायुमानातील
बदलांशी संबंधित हिंसाचाराचं प्रमाण त्यांच्या परस्पर संबंधांबद्दल संशय घ्यायला जागा
नाही, इतकं मोठं आहे.’ हा निष्कर्ष काढताना वेगवेगळ्या देशांमधील अशा प्रकारच्या
६० संशोधन प्रकल्पांची आकडेवारी तपासण्यात आली होती. त्यात गेल्या काही शतकांमधील पुरावे
एकत्र केलेले होते. यामध्ये भारतातील दुष्काळी वर्षांतील घरगुती हिंसाचारापासून अमेरिकेतील
उष्णतेच्या लाटेदरम्यान घडलेले बलात्कार आणि हिंसाचार यांच्या आकडेवारीचाही समावेश
आहे.
कुठल्याही एका विशिष्ट घटनेचा आणि जलवायुमानातील बदलाचा परस्पर संबंध
जोडता येत नसला तरी एकूण विविध हिंसाचारी घटनांचा आणि जलवायुमानातील बदलांचा निश्चितच
संबंध आहे, असं बर्क म्हणतात. विशेषत: एखाद्या भूप्रदेशातील सरासरी तापमानापेक्षा
झालेली तापमान वाढ आणि विविध प्रकारचे हिंसाचार यांचा निश्चित संबंध अजून उलगडलेला
नाही, जलवायुमानातील बदलांमुळे एक तर कोरडा दुष्काळ पडतो किंवा पावसाचं प्रमाण
वाढून महापूर येतात. या दोन्ही प्रकारांमुळे अन्नधान्याची कमतरता जाणवते. पेयजल दुर्मिळ
होतं किंवा दूषित होतं. दोन्हीमुळे रोगराईत वाढ होते. मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचं
स्थलांतर होतं. दरडोई उत्पन्न घटतं. त्यामुळे असुरक्षिततेची भावना वाढीस लागते. त्याचा
परिणाम गुन्हेगारीमध्ये वाढ होण्यात होतो, असं या अभ्यासकांना वाटतं. ते पटण्यासारखं
आहे.
मॅथ्यू रॅन्सन या अर्थशास्त्रज्ञाने जागतिक हवामान बदल आणि हिंसाचाराचा
परस्पर संबंध यांचा अभ्यास करायचं मनावर घेतलं. त्यांनी एफबीआयकडून (अमेरिकेची अंतर्गत
सुरक्षा संस्था) दर महिन्यात घडलेल्या गुन्हेगारीची आधीच्या काही वर्षांची माहिती मिळवली.
अमेरिकेच्या सुमारे एक हजारांहून अधिक काऊंटींमधील पोलीस ठाण्यांत नोंदवलेल्या गुन्ह्यांची
माहिती एफबीआयकडे जमा होत असते. १९८० ते २००९ या तीस वर्षांमधील या आकडेवारीचा आणि
त्या त्या भागातील रोजच्या हवामानाचा काही संबंध लावता येतो का याचा त्यांनी प्रयत्न
केला. विशेषत: त्यांनी त्या काळातील कमाल तापमानांवर लक्ष केंद्रित केलं. या अभ्यासाचे
निष्कर्ष ‘जर्नल ऑफ एनव्हायर्नमेंट, इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट’ या नियतकालिकात
प्रसिद्ध करण्यात आले. या निष्कर्षांनुसार हा संबंध निश्चित आहे.
गुन्हेगारीसाठी इतरही अनेक घटक जबाबदार असतात. त्यात आर्थिक कारणांप्रमाणेच
सांस्कृतिक, सामाजिक तसेच मानसशास्त्रीय घटकही महत्त्वाची भूमिका बजावतात. या सर्व
घटकांच्या संदर्भात जलवायुमान पार्श्वभूमीला राहून माणसाला या घटकांच्या साहाय्याने
गुन्हेगारीकडे ढकलतं, असं रॅन्सन म्हणतात. तापमानवाढ, दुष्काळ,
अतिवृष्टी,
अतीव
थंडी, हवेतील आर्द्रता, अतीव शुष्कपणा या सर्वांचा गुन्हेगारीशी
या ना त्या प्रकारे संबंध असतो, असं त्यांना वाटतं. या घटकांमुळे सामाजिक
दुरावा वाढतो; तसंच समाजातील विविध घटकांमधली दरी रुंदावते; असंही ते म्हणतात.
थोडक्यात, जागतिक जलवायुमान बदलाचा आपल्या जगण्याच्या सर्व बाबींवर परिणाम होणार
आहे. तो विपरित असण्याची शक्यता जास्त आहे, याचं कारण अर्थातच
लोकसंख्येची भरमसाठ वाढ. पाण्याचा प्रश्न तर खूपच तीव्र बनणार आहे. रोजच्या गरजांसाठी
पाणी, शेतीसाठी पाणी की उद्योगधंद्यांसाठी पाणी, असा हा तिढा आहे.
याची तीव्रता कशी असेल याची झलक आपल्याला दुष्काळी वर्षांमध्ये आजही अनुभवायला मिळते.
बेकारी दूर करून रोजगार वाढवायचा तर त्यासाठी अधिकाधिक धंदे आवश्यक ठरतात, त्यांना
पाणी पुरवायचं असेल तर मग शेती आणि पिण्यायोग्य पाण्याच्या पुरवठ्यात घट करावी लागते.
मात्र वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून भागणार नाही, कारण त्यामुळे रोगराईत
वाढ होण्याची भीती असते.
रोगराईतील वाढ हा जागतिक हवामान बदलाचा आणखी एक परिणाम. मात्र यासाठी
केवळ वैयक्तिक स्वच्छता जबाबदार असणार नाही. जगात वेगवेगळ्या ठिकाणी काही जुने,
तर काही
नवे रोग पसरताना दिसताहेत. जलवायुमानातील बदल, पर्जन्यमानातले बदल,
आर्द्रतावाढ
तसंच शुष्कता वाढ यांचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या भूभागात निरनिराळे कीटक, सूक्ष्मजीव
आणि विषाणू यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होतं. यामुळे पूर्वी ते जिथे आढळत नसत
अशा ठिकाणी सुद्धा त्यांचा प्रादूर्भाव होतो. त्यामुळे अनेक आजारांची व्याप्ती वाढताना
दिसते. हाडमोड्या ताप (डेंग्यु) हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. एकेकाळी फक्त विषुववृत्तीय
प्रदेशात आढळणारा हा आजार आता कर्कवृत्ताच्या उत्तरेस युरोप-अमेरिकेतही पोहोचला आहे.
डासांची वाढ होण्यास उबदार वातावरण मदत करतं. तापमान वाढलं की डासांची प्रौढावस्थेतील
वाढ जलद गतीने होते. त्यांच्या माद्या अधिक प्रमाणात, पण कमी कालावधीत
अंडी घालू लागतात. त्यामुळे त्यांची संख्यावाढ झपाट्याने होते. त्यातच जेव्हा हिवाळ्यातही
तापमान वाढलेलं असतं, त्यावेळी एरवी हिवाळ्यात न आढळणारे डास दिसू लागतात. एवढंच नाही तर या
काळात त्यांचं प्रजननही चालू राहतं. अंड्याच्या संख्येत वाढ झाल्याने मादीला इतर वेळेपेक्षा
जास्त अन्न लागतं. तिचं अन्न म्हणजे रक्त. एवढंच नव्हे तर डासाच्या माद्यांच्या पोटात
असणारे रोगकारक सूक्ष्म जीव आणि विषाणूही जास्त तापमानात नेहमीपेक्षा कमी वेळात वाढतात.
त्यामुळे डासांच्या माद्या नेहमीपेक्षा जास्त धोकादायक बनतात.
केवळ हिवताप आणि डेंग्यूच नव्हे, तर जास्तीचं तापमान
इतरही आजारांना आमंत्रण देतं. नायग्लेरिया (एन) फॉलेरी या जातीच्या अमिबाला उष्ण तापमान
खूप मानवतं. सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या अमेरिकी संस्थेने
या अमिबाला ‘हीट लव्हिंग अमिबा’ असं म्हटलंय. पाण्याचं तापमान जास्त झालं की या अमिबाची
अमर्याद वाढ होते. त्यामुळे जागतिक हवामान बदलात ज्या ज्या भूभागाचं तापमान वाढणार
आहे, तिथे तिथे एन. फॉलेरीमुळे होणारा मेंदूज्वर तसंच त्यामुळे होणार्या मृत्यूमध्ये
वाढ होणार आहे, असं भाकीत सीडीसीने केलं आहे.
हा एन.फॉलेरी अमिबा खूप धोकादायक असतो. पोहताना किंवा अशुद्ध पाण्याने
चेहरा धुताना, तसंच ज्या पाण्यावर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया केलेली नाही, अशा
पाण्यातून हा नाकात शिरतो. तिथून थेट मेंदू गाठतो. मेंदूतील करडा मगज (ग्रे मॅटर) हे
त्याचं आवडतं खाद्य. मुख्य म्हणजे या प्रकारचा आजार उघड व्हायला बराच वेळ लागतो. तोपर्यंत
अशी व्यक्ती उपचारापलीकडे गेलेली असते. बदलत्या जलवायुमानामुळे अशा रोगकारकांना संचारासाठी
नवनवे भूभाग उपलब्ध होणार आहेत. तेथील रहिवाशांमध्ये अशा रोगजंतूंशी लढण्यासाठी आवश्यक
प्रतिपिंडं नसतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होईल.
जे माणसांचं तेच इतर सजीवांचं. त्यात वनस्पती आल्याच. पूर्वी ज्या भागात
ज्या वनस्पती नव्हत्या तिथे त्या वनस्पतींचं अतिक्रमण होईल. त्यांच्याबरोबर त्यांच्यावर
उपजीविकेसाठी अवलंबून असलेले कीटक आणि इतर काही प्राणीसुद्धा येतील. स्थानिक वनस्पतींकडे
यांना तोंड देण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांचा र्हास होईल. याचा परिणाम त्या भागातील
पिकांवर आणि फळबागांवर होईल. चार्ल्स सी. डेव्हिस या वनस्पतीतज्ज्ञाचे हे विचार आहेत.
डेव्हिस हार्वर्ड विद्यापिठात प्राध्यापक आहेत. ‘हवामान बदलाचे वनस्पतींवर होणारे परिणाम’
हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. ते या विषयाच्या अभ्यास प्रकल्पाचे संचालक
आहेत. ‘परक्या जाती मूळ जीववैविध्याची वाट लावतात. स्थानिक परिस्थितीचा समतोल बिघडवतात.
एवढंच नव्हे तर या वनस्पतींच्या स्थलांतरांमुळे दरवर्षी एक अब्ज वीस कोटी डॉलर्सचं
नुकसान होतं. जलवायुमान बदलामुळे हे स्थलांतर अधिक वेगाने होणार, तेव्हा
हे नुकसान कमी करण्यास आमच्या संशोधनाची कशी मदत होऊ शकेल, यावर आमचा विचार
सुरू आहे,’ असंही ते म्हणतात.
उत्क्रांतीचे तज्ज्ञ जलवायुमान बदल आणि मानवी उत्क्रांती यांच्या परस्परसंबंधांबद्दल
विचार करतात. वेगवेगळ्या रोगकारकांना तोंड देण्यासाठी मानवात जी जननिक उत्क्रांती झाली
आहे, त्यात काही जनुकांमध्ये झालेल्या उत्परिवर्तनांच्या अभ्यासात वेगवेगळ्या
संशोधन संस्था सहभागी झालेल्या आहेत. विस्कॉन्सिन विद्यापीठातले जॉन हॉक्स यांच्या
संशोधनाची काही माहिती आपण घेतलीच आहे. उदा. अति उत्तरेकडच्या अक्षांशात कृष्णवर्णीयांना
सूर्यप्रकाशात डी जीवनसत्त्व निर्माण करण्यात अडचण होते. त्यामुळे त्यांची त्वचा गोरी
झाली ती जननिक बदलांमुळे. दहा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर गौरवर्णी, निळ्या
डोळ्यांची आणि वेगवेगळ्या रंगाच्या केसांची माणसं शोधूनही सापडली नसती. डी जीवनसत्त्वाची
कमतरता असेल तर हाडांमध्ये विकृती निर्माण होते. साधारणपणे २४ ते २५ जनुकं उत्परिवर्तित
झाल्यामुळं त्वचेचा रंग बदलला. तो बदल घडताना त्यातल्या काही जनुकांचा डोळ्यांच्या
रंगांशी संबंध होता. त्यामुळे त्वचेबरोबर डोळ्यांचा रंग बदलला. तसंच केसांचंही झालं.
जीवनशैलीत झालेल्या बदलांचा माणसाच्या उत्क्रांतीवर परिणाम होतो, याचे
अनेक पुरावे आता उपलब्ध झाले आहेत.
हिवताप हा आजार ३५ हजार वर्षं जुना आहे. सहाराच्या दक्षिणेस असलेल्या
आफ्रिकेत तो कायमस्वरूपी त्रास आहे. तिथल्या फार मोठ्या लोकसंख्येत २० ते २५ जनुकं
उत्परिवर्तीत झाली आणि या लोकांना हिवतापाचा त्रास होणं बंद झालं. भारतात आपण शेंगदाणे
आरामात खातो. मात्र कॉकेशियन वंशाच्या मोठ्या लोकसंख्येत शेंगदाणे किंवा त्यापासून
केले जाणारे पदार्थ खाऊन प्रचंड त्रास होतो.
रोगकारक जीवाणू-विषाणू विरुद्ध मानव या सातत्याने चाललेल्या लढ्यात एका
महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करणं आवश्यक आहे, तो म्हणजे मानवी
शुक्रजंतूंमध्ये अलीकडच्या काळात झालेली उत्परिवर्तनं. लग्नबंधनं शिथिल आहेत,
अशा
भूप्रदेशात ही उत्परिवर्तनं मोठ्या प्रमाणात आढळतात. याचं कारण, मुक्त
स्त्री-पुरुष संबंध असलेल्या दोन किंवा अधिक
पुरुषांच्या शुक्रजंतूंत असते. वाळवंटात आणि हिमाच्छादित प्रदेशात बरेच वेळा आलेल्या
पाहुण्याला जनुकांचा दाता म्हणून वापरण्यात येतं. त्यामुळे आप्तसंबंधांमुळे निर्माण
झालेले दोष कमी होण्यास मदत होते. तिथेही अशा प्रकारची उत्परिवर्तनं स्त्री आणि पुरुष
या दोघांमध्येही सापडतात.
जॉन हॉक्स आणि त्याच्या सहकार्यांनी युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेच्या
दोन्ही खंडात तसंच पूर्व आणि अग्नेय आशियातल्या वेगवेगळ्या जमातींमध्ये सर्वेक्षण केलं.
त्यातून ते शुक्रजंतूंमध्ये झपाट्याने उत्परिवर्तनजन्य बदल होत आहेत, या निष्कर्षाप्रत
पोहोचले आहेत. यातून दुसरा एक अर्थ निघतो, तो म्हणजे मानवी जोड्या या पृथ्वीवर कुठेच
कायमस्वरूपी नसतात. परिस्थितीचा मानवी उत्क्रांतीवर होणारा परिणाम आणखी एका नातेसंबंधात
दिसून येतो. अलीकडच्या काळात माणसं दीर्घायुषी होतील अशा जनुकांची चलती आहे. म्हातारी
माणसं जनुकसाठ्यात काही उपयुक्त भर घालू शकतील, असं उत्क्रांतीवादी
जीवशास्त्रज्ञांना वाटत नसे; पण अलीकडच्या काळात त्यांचं मतपरिवर्तन
होऊ लागलं आहे. जिथे अजूनही एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात आहे, अशा
भूभागांतून केलेल्या सर्वेक्षणांमधून निघालेल्या निष्कर्षांनुसार नातवंडांचे लाड करणारी
आजी ज्या घरात असते त्या घरातली मुलं जास्त काळ जगतात आणि आजीची दीर्घायुष्याची जनुकं
पुढील पिढ्यात पोहोचवण्याचं काम करतात. आजोबा क्वचितच नातवंडांच्या संगोपनात सहभागी
झाल्याचं आढळतं. त्यामुळे याला ‘द ग्रँड मदर इफेक्ट’ असं म्हटलं जातं. वयस्कर पुरुष
त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान मुलीशी विवाह करतो, तेव्हाही पुढच्या
पिढीत दीर्घायुष्याची जनुकं पोहोचवली जातात.
जलद गतीने होणार्या उत्क्रांतीचा एक स्फोटक पैलू म्हणजे शारीरिक घटकांबरोबर
मेंदूची होणारी उत्क्रांती. अगदी अलिकडच्या जनुक उत्परिवर्तनांचा मेंदूशी थेट संबंध
आहे, असं दिसून आलं आहे, असं रॉबर्ट मॉयझेर हे इर्विन इथल्या कॅलिफोर्निया
विद्यापिठातील मानवशास्त्रज्ञ म्हणतात. साधारणपणे १०० च्या आसपास जनुकांची उत्परिवर्तनं
चेताप्रक्षेपकांशी संबंधित आहेत. यामध्ये मानवी मन:स्थितीचं नियंत्रण करणारं संप्रेरक
सेरॉटोनिन, ग्लुटामेट्स (उत्तेजित करणारी संप्रेरकं) आणि डोपामाइन हा मानवी लक्ष
केंद्रित करणारा मेंदूतील स्राव, यांच्या निर्मितीला जबाबदार जनुकांचा समावेश
होतो. या बदलांना सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी सुरुवात झाली, पण दहा
हजार वर्षांपूर्वी या बदलांचा वेग वाढला. असा वेग वाढायचं कारण म्हणजे वेगवेगळ्या जलवायुमानातील
मानवी वसाहती.
हाण-वेच (हंटर गॅदरर्स) पद्धतीने जगणार्या टोळ्यांमध्ये वाद व्हायचे,
तेव्हा
त्या टोळीतले विरोधी गट एकमेकांपासून फारकत घ्यायचे आणि नव्या टोळ्यांची स्थापना करायचे.
माणूस शेती करायला लागला आणि त्याच्या स्वभावात फरक पडायला सुरुवात झाली. याचं कारण
आता त्याला एकाच ठिकाणी राहून सर्व प्रकारच्या वातावरणाला तोंड द्यावं लागत होतं. दुसरं
म्हणजे भांडण झाल्यावर वस्ती सोडून जाण्यापेक्षा आक्रमक वृत्तीला लगाम घालून सर्वांशी
जुळवून घेणं, हा टिकून राहण्याचा (सर्व्हायव्हल) सोपा मार्ग होता. त्यामुळे मेंदूत
बदल घडणं अपरिहार्य होतं. तसंच शेतीचा पूरक उद्योग म्हणजे प्राणीपालन. यामुळेही मानवी
स्वभावात बदल घडला. त्याच बरोबर त्याला प्राणीजन्य आजारांची लागण होऊ लागली आणि त्याच्या
शरीरात या आजारांविरुद्ध प्रतिपिंडं तयार होऊ लागली.
शेतीमुळे आणखी एक गोष्ट घडून आली. माणसांचे त्यांच्या कौशल्यातील वैशिष्ट्यांनुसार
गट तयार होऊ लागले. भारतात त्यातून जाती निर्माण झाल्या. युरोपात वैशिष्ट्यानुसार आडनावं
तयार झाली. ‘स्मिथ’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. शेतीमाल आणि गुरं, तसंच
रानमेवा यांची देवाणघेवाण करत माणूस व्यापाराकडे वळला. यामुळे दोन कला विकसित झाल्या.
वस्तुविनिमय करायचा तर आकडेमोड करता आली पाहिजे, त्याचबरोबर त्या
देवाणघेवाणीची नोंद ठेवणंही आवश्यक होतं. यासाठी प्राथमिक स्वरूपातील लेखनकला अस्तित्वात
आली आणि त्याकरिता स्मरणशक्ती सुधारली गेली. हे सुद्धा जनुकांच्या उत्परिवर्तनाशिवाय
शक्य नव्हतं. याची सुरुवात पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे झाली. विशेषत:
चांगल्या हिशोबनिसांना राजदरबारी मान होता. त्यामुळे त्यांची शरीरकष्टातून मुक्तता
होऊ लागली. यामुळे स्थिर आयुष्यातील व्याधींमध्येही वाढ झाली. मानवाने भटकं आयुष्य
सोडून स्थैर्य स्वीकारल्यावर त्याच्यात झपाट्याने जननिक बदल झाले.
हार्पेंडिंग आणि कोक्रान यांनी पूर्वी काही वादग्रस्त संशोधन केलं होतं.
त्यांनी केलेल्या अश्केनाझी ज्यू म्हणजे उत्तर युरोपातले ज्यू आणि त्यांचे वंशज यांच्याबद्दलच्या
संशोधनाच्या निष्कर्षांनुसार या ज्यूंमध्ये अनेक जागतिक बुद्धिबळपटू, नोबेल
पारितोषिक विजेते आणि १४० पेक्षा जास्त बुद्ध्यांक असलेले लोक आहेत. त्याचं कारण त्यांच्या
धार्मिक आणि सांस्कृतिक बंधनांमुळे त्यांनी कधीच शेतमजुरी आणि हमाली केली नाही आणि
त्यांच्या समाजाबाहेर शरीरसंबंधही ठेवले नाहीत. इ.स. ८०० पासून उत्तर आणि मध्य युरोपातील
ज्यू हे फक्त बुद्धीचा उपयोग करणारे उद्योग करत जगले. त्यांनी उपजीविकेसाठी लोकांच्या
इस्टेटी सांभाळणं, सावकारी, आयात निर्यातीचा व्यवसाय असे बौद्धिक व्यवसाय केले. त्यामुळे त्यांची
बौद्धिक प्रगती झाली. फायदा हवा असेल तर येणार्या संधी हुकवून चालत नाही. त्याचबरोबर
व्यावहारिक धोकेही ओळखावे लागतात. ज्यूविरोधी वातावरणात त्यांना हे सर्व करावं लागत
असल्याने, त्यांची बुद्धी अधिक धारदार बनली. त्यामुळे जगण्यासाठी त्यांच्या मेंदूची
उत्क्रांती ही अधिक बुद्धिमत्तेच्या दिशेने झाली. या संशोधनाचे टीकाकार हे मान्य करत
नाहीत. त्यांच्या मते हे निष्कर्ष परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहेत. मेंदूत पडलेला
फरक
हार्पेंडिंग किंवा त्यांच्या सहसंशोधकांना सिद्ध करता आलेला नाही. असा
ठोस निष्कर्ष मेंदूच्या बाबतीत काढणं जवळ जवळ अशक्यच आहे, कारण त्यासाठी किमान
शंभर ज्यू आणि शंभर इतर धर्मीय मेंदूंचा तौलनिक अभ्यास करावा लागेल. तोही जिवंत व्यक्तींचा.
तो कसा करणार? कितीही आधुनिक तंत्रज्ञान वापरलं तरी १०० टक्के बिनचूक निष्कर्ष काढता
येणार नाही.
एडीएचडी (अटेन्शन डेफिसिट हायपर अॅक्टिव्हिटी डिसॉर्डर) म्हणजे अति चळवळी
आणि मन कुठल्याही गोष्टीवर केंद्रित करू शकत नाहीत, अशी व्याधी असलेली
मुलं, तसंच मोठी माणसं यांच्यामध्ये डीआरडी४ नावाचं उत्परिवर्तित जनुक असतं.
अशा व्यक्तींमध्ये डोपामाईन ग्रहण क्षमता कमी होते. डोपामाईनमुळे मनोवृत्ती स्थिर बनायला
मदत होते. यामुळेच अशा व्यक्तींची वर्तणूक स्थिर होण्यास ‘रिटॅलीन’ या रसायनाची मदत
होते. रिटॅलीनमुळे मेंदूतील चेतापेशींदरम्यानच्या जागेमध्ये डोपामाईनचं प्रमाण वाढतं.
माणसात सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी हे उत्परिवर्तन घडून आलं असावं. पण
आफ्रिकेत हवामान बदल होऊ लागताच या अस्वस्थ माणसांमुळे काही मानवी टोळ्या आफ्रिकेतून
बाहेर पडून जगभर पसरल्या, असं काही शास्त्रज्ञांना वाटतं. त्यामुळे
ते या जनुकाला ‘स्थलांतर प्रेरक जनुक’ (मायग्रेशन इंड्युसिंग जीन) असंही म्हणतात. दक्षिण
अमेरिकेतील ८०% जनतेमध्ये या जनुकाची प्रत आढळते. उत्तर अमेरिकेतील मूळ रहिवाशांमध्ये
ते जनुक ४०% जनतेत आढळतं. तर युरोप आणि आफ्रिकेतील फक्त २०% जनतेत या जनुकाची उपस्थिती
असते असं दिसून येतं. आफ्रिकेपासून जितकं दूर जावं, तितकं या जनुकाचं
प्रमाण वाढतं, असं दिसतं.
या चंचल प्रवृत्तीच्या मुलांना उत्क्रांतीत काय फायदा झाला, हा प्रश्न
अलिकडच्या काळात उद्भवतो. या संबंधात झालेल्या संशोधनानुसार अशा मनोवृत्तीची मुलं सरासरीने
इतर मुलांपेक्षा सरस बुद्धिमत्तेची असतात. आज त्यांची वर्तणूक वेगळी वाटली तरी झपाट्याने
हवामान बदल झाले त्यावेळी या वृत्तीच्या लोकांनी माणसांना स्थलांतर करायला प्रवृत्त
करून मानवजातीला नष्टप्राय होण्यापासून वाचवलं, हे विसरून चालणार
नाही. मुख्य म्हणजे अज्ञात भूप्रदेशात ओढवणार्या अनोख्या संकटांची चाहूल लागताच तिथून
पळून जाणं या प्रवृत्तीच्या टोळी सदस्यांमुळेच माणसाला शक्य झालं, हेही
विसरून चालणार नाही.
हा विचार मांडला गेल्यानंतर याला खूप विरोधही झाला आहे. हे सिद्ध व्हायला
आणखी ठोस पुराव्यांची गरज आहे, हे या पक्षाच्या लोकांनाही मान्य आहेच;
पण म्हणून
त्यांनी हार पत्करलेली नाही. त्यांच्यामते अलीकडे नवनव्या ठिकाणी बरेच नवीन पुरावे
मिळताहेत, त्याशिवाय नव्या तंत्रज्ञानामुळे अगदी अस्पष्ट गोष्टी स्पष्ट करणं शक्य
होऊ लागलं आहे. त्यामुळे आपल्या विचारांच्या सत्यतेबद्दलच्या सर्व शंका दूर करणं शक्य
होईल असं त्यांना वाटतं.
हे विचार खरे ठरले तर वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या भूप्रदेशातील
माणसांमध्ये मेंदूची वाढ वेगवेगळ्या प्रकारे झाली, हे मान्य करावं लागेल.
त्यामुळे माणसांमधली फूट आणखी वाढेल, असं विरोधकांना वाटतं. बघू या काय होतं
ते!
निरंजन घाटे
०२०-२४४८३७२६
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा