अस्वस्थ वर्तमान ! - जयंत पवार
नाटककार, लेखक जयंत पवार यांचं नुकतंच निधन झालं. जयंत पवार यांनी 'अनुभव' मासिकासाठी वेळोवेळी भरपूर लिखाण केलं. देशाने स्वातंत्र्यकाळात केलेल्या प्रगतीकडे लेखक कसं पाहतात, हे समजून घेण्यासाठी 'अनुभव'ने २०१३ साली अनेक लेखक-कवींना या विषयावर लिहिण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्या लेखमालिकेसाठी जयंत पवार यांनी लिहिलेला 'अस्वस्थ वर्तमान' हा लेख वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. फ्रान्झ काफ्काच्या ग्रेगर साम्साला झोपेतून जागं झाल्यावर आपलं एका मोठ्या कीटकात रूपांतर झालंय हे कळलं, त्याला जवळपास शंभर वर्षं होतील. मी काल-परवा एका दशकाच्या प्रदीर्घ निद्रेतून जागा झालो आणि माझ्या लक्षात आलं, आपलं असंख्य छोट्या कीटकांत रूपांतर झालंय. जाग येता येताच मला जाणवलं होतं की आपलं शरीर एका लगद्यासारखं झालं आहे. ते हलत नाहीये पण आतून प्रचंड वळवळ जाणवते आहे. मग हळूहळू त्या लगद्याचं विघटन झालं आणि त्यातून लहान लहान तुकडे बाहेर पडले, ज्यांना अनेक पाय, इवलंसं डोकं आणि पातळ पापुद्य्रासारखं शरीर होतं. ते अनेक दिशांनी सरकण्याचा प्रयत्न करत होते. प्रयत्नांती ते त्यांना जमत होतं; पण त्याच व