मुक्काम कात्रीतलं काबुल - निळू दामले

 अनुभव दिवाळी २००८

२००३ साली काबूलला गेलो होतो तेव्हा अमेरिकन सेना आणि अफगाणिस्तानमधल्या विविध गटांनी तयार केलेला उत्तरी मोर्चा या दोन सैन्यांनी तालिबानचा पराभव केला होता. अमेरिकेच्या मदतीनं अफगाणिस्तानमधे अहमद करझाईंचं एक अस्थायी सरकार तयार झालं होतं. अमेरिका आणि दोस्त देशांच्या दबावाखाली करझाई यांनी आश्वासन दिलं होतं, की मी अफगाणिस्तानात लोकशाही स्थापन करेन आणि अफगाणिस्तानाची व्यवस्था लावून प्रगती करेन. काबूल विमानतळावर माझं विमान घिरट्या घालत होतं तेव्हा खाली विमानतळाच्या आसपास मोडकी विमानं, लष्करी गाड्या, रणगाडे, जीप्स दिसत होत्या. विमान आणखी थोडं खाली आलं तेव्हा काबूल शहरातल्या उद्ध्वस्त इमारती, पडलेली घरं दिसत होती.


आता २००७ साली मी पुन्हा काबूलला निघालो होतो. मधल्या काळात करझाई यांनी एक लोया जिरगा म्हणजे महासभा भरवली. सर्व अफगाण राजकीय गट, जमातींचे प्रमुख, मुल्ला-मौलवी, ज्येष्ठ नागरिक एकत्र केले. त्यांच्या संमतीनं निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला. तालिबान आणि टोळीवाले यांचा विरोध असूनही  मतदारनोंदणी करून निवडणूक घेतली. रीतसर सरकार स्थापन केलं. अमेरिका, युरोपीय देश, ब्रिटन, जपान या देशांनी अफगाण सरकारला पैसे आणि लष्करी मदत देऊ केली. १९७९ ते २००१ या काळात अफगाणिस्तान उद्ध्वस्थ झालं होतं, ते पुन्हा उभं करण्याच्या योजना दात्या देशांच्या मदतीनं करझाई यांनी जाहीर केल्या. तालिबानच्या त्रासाला तोंड देण्यासाठी अमेरिका इत्यादी देशांचं सैन्य करझाई यांनी ठेवून घेतलं.

या गोष्टीला चार वर्षं होऊन गेली होती. पेपरात, बीबीसी-सीएनएनवर उलट-सुलट बातम्या येत होत्या. परिस्थिती सुधारते आहे असं कोणी सांगे, तर परिस्थिती आणखीनच बिघडली आहे असं कोणी म्हणे. 

चला, आपण प्रत्यक्षच पाहून यावं असं ठरवलं. अफगाणिस्तानात उभारणीच्या कामात लागलेल्या संस्थांनी दिलेलं आमंत्रण ही संधी होती. 

निघण्यापूर्वी अफगाणिस्तान या विषयावर छापून आलेला मजकूर वाचून ठेवला होता. महिनाभर आधी बीबीसी, सीएनएनवरच्या अफगाण बातम्या व फीचर्स पाहिली होती. नुकतंच तालिबाननं २३ कोरियन नागरिकांचं अपहरण केलं होतं. (तालिब म्हणजे एक माणूस, इस्लामचा अभ्यासक. तालिबान म्हणजे अनेक तालिब, तालिबांचा समूह. हा समूह म्हणजे त्यांची संघटना, म्हणजे तालिबान.) तुरुंगातल्या तालिबांना सोडवलं तर कोरियनांना सोडू, नाही तर मारून टाकू, अशी धमकी तालिबाननं दिली होती. अफगाण सरकार तालिबांना सोडायला तयार नव्हतं, तालिबाननं एका कोरियन स्त्रीला मारून टाकलं होतं. 

विमान बरंच उशिरा सुटलं. महत्वाच्या ठिकाणी, जिथं पर्यटक जातात, जिथं पैशाची खूप उलाढाल होते तिथं जाणारी विमानं वेळेवर सुटतात. काबूलला कोण महत्त्वाचं माणूस मरायला जातंय? खोळंबलेले प्रवासी निमूट बसून होते. ना तक्रार, ना आवाज चढवून जाब विचारणं. नंतर विमानातलं एअर-कंडिशनिंग बंद करून ते धावपट्टीवर उभं करून आणखी उशीर केला. उकडून उकडून जीव गेला. 

एकदाचं विमान सुटलं. 

बसल्या बसल्या वाचलेला मजकूर आठवत होतो. काही मजकूर सांगत होता की, अफगाणिस्तानची परिस्थिती खराब आहे, तालिबांचा कब्जा वाढला आहे. काही मजकूर सांगत होता की, सावकाशीनं का होईना पण परिस्थिती सुधारत आहे, अफगाणिस्तानात पैसे गुंतवले जात आहेत.

 अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी या देशांनी आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानात जाऊ नये असा कडक सल्ला दिला होता. 

काबूल दिसू लागलं. चौकोनी कंपाऊंड. त्यात घर. कंपाऊंडमधे एखादं झाड. एकुणात करडा, ग्रे रंग पसरलेला.  वैराण.

विमानतळ. परिघावर काळी लष्करी विमानं उभी. हेलिकॉप्टर्स, बख्तरबंद गाड्या, जिपा, रणगाडे. कावळ्यांच्या थव्यात एखादा बगळा असावा तसं युनायटेड नेशन्सचं पांढरं विमान. प्रवाशांची ने-आण करणारं एकही विमान नव्हतं. 

विमानाच्या बाहेर पडल्यावर न्यायला जपान सरकारनं भेट म्हणून दिलेल्या बसेस.

तळावर गर्दी नव्हती. गेल्या वेळी प्रवाशांना मदत करणारे, टॅक्सीवाले, हॉटेलवाले नुसता गराडा करून होते. या वेळी मामला थंड दिसत होता.

राहत्या ठिकाणाकडं निघालो. विमानतळाच्या जवळ मोठे रस्ते, नंतर गल्ल्या. रस्त्यांत खड्डे फार. रस्त्यांच्या कडेला मातीचे ढिगारे. गल्ल्यांच्या तोंडाशी कचर्‍याचे ढीग. 

दुपारचे दोन-अडीच वाजले होते. वर्दळ नव्हती. गेल्या वेळी रस्त्याच्या कडेला बाँबफेकीनं आणि रॉकेट्सनी फाटलेल्या इमारती दिसल्या होत्या. या वेळी तशा इमारती तुरळक दिसल्या, त्यांच्या जागी नव्या इमारती. मधे मधे छान इमारती उभ्या राहिलेल्या होत्या.

मनात आलं - सुधारणा होतेयसं दिसतंय. पण माणसं रस्त्यावर का दिसत नाहीत? आज सुटीचा दिवस नाही की जुम्मा नाही. संचारबंदी लागल्यागत का वाटतंय?

मुंबईचे पावसाळ्यातले रस्ते बरे म्हणायची पाळी. फूट-फूट खोल खड्डे. डांबर नाही की काँक्रीट नाही. प्लास्टिक उकिरडे. उकिरड्याला वळसा घालून गेस्ट हाऊसच्या बाहेर गाडी उभी राहिली.

 लोखंडी दरवाजा, गॅरेजला असतो तसा, मजबूत. दरवाज्यावर खटखट केली. आतून काही आवाज नाही, आलो आलो अशी आरोळी नाही. 

मी चहूकडं पाहिलं. समोर रस्त्याच्या पल्याड एक घर होतं. त्यालाही मोठा लोखंडी दरवाजा.शेजारचं घर. तसाच दरवाजा. त्यापलीकडचं घर. तसाच लोखंडी दरवाजा. हिरवे, निळे दरवाजे. प्रत्येक दरवाज्याबाहेर मशीनगन घेऊन पहारेकरी उभा.

आतून एक पठाण आला. त्यानं दरवाजा उघडला. गाडी घराच्या कंपाऊंडमधे गेली. दरवाजा बंद झाला.

किल्ला.

संध्याकाळी जेवायला काय मिळेल याचा शोध घेत खाऊ गल्लीत हिंडत होतो. दुकानांच्या बाहेर शेगड्यांवर कबाब आणि कोंबड्या भाजल्या जात होत्या. हिरव्या पिवळ्या प्रकाशातल्या धुरानं भरलेल्या खाणावळीत हिंदी सिनेमांतली गाणी लागली होती. टीव्हीवर शाहरुख खानचा कुठलासा हिंदी सिनेमा चालला होता. गजबजाट होता. बोलता बोलता मी म्हणालो, “विमान इस्लामी पाकिस्तानावरून जात असताना माझ्या हातात पहिला बियरचा कॅन आला आणि विमान कट्टर इस्लामी अफगाणिस्तानावरून उडत असताना मी बियरचा दुसरा कॅन उघडत होतो. काय मजा आहे नाही?”

माझ्या सोबत होता रहमान. तो हसला आणि म्हणाला, “यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तुम्हाला काय वाटतं की, पाकिस्तानात दारू पीत नाहीत, अफगाणिस्तानात दारू पीत नाहीत? मुळीच नाही. ज्यांना प्यायची असते ते पीत असतात. इस्लाम त्यांच्या आड येत नाही. तुम्हाला प्यायची सणक आलीय का? चला, मी घेऊन जातो.”

रहमान मला एका दुकानात घेऊन गेला. किराणा व इतर माल विकणारं दुकान होतं. काउंटरवर असलेल्या माणसाशी तो त्याच्या भाषेत बोलला. नंतर मला विचारलं, “तुम्हाला कुठली व्हिस्की किंवा वोडका हवी ते सांगा. तो आणून देतोय.”  

त्याच्याकडं कोणकोणते ब्रँड आहेत त्याची चौकशी केली, किमती काय आहेत ते पाहिलं. उद्या घेऊन जातो, असं सांगून मी दुकानाबाहेर पडलो. खरं म्हणजे मला पिण्यात रस नव्हता, माहिती हवी होती.

तिथून फिरत फिरत आम्ही एका ‘दिल्ली दरबार’ नावाच्या खाणापिणावळीत गेलो. उघड्या कोर्ट यार्डात खुर्च्या-टेबलं टाकलेली होती आणि पलीकडं एका मोठ्या हॉलमधेही बसायची सोय केलेली होती. करझाई, महात्मा गांधी यांचे फोटो भिंतीवर टांगलेले होते. एक फोटो ऐश्वर्या रायचा होता. 

वेटरनं मेनू टेबलावर ठेवला. 

मेनूमधे नाना प्रकारच्या दारु होत्या, वाइन्स होत्या. रशियानं या देशावर एके काळी राज्य केलेलं असल्यानं वोडकाचे नाना प्रकार होते. भारतात जी नावं कानावर आलेली नव्हती अशा अनेक ब्रँडच्या वोडका होत्या. त्यातली एक मागवली. आम्ही तिघं होतो. वेटरनं आमच्याकडं पाहिलं. बरोबरचे दोघं अफगाण असल्यानं त्यांना दारू देता येणार नाही, फक्त भारतीय असल्याकारणानं मलाच दारू देता येईल, असं म्हणाला.

रहमान त्याला म्हणाला, “कमाल करतोस! गेल्या आठवड्यात तर आम्ही आलो होतो, तेव्हा आम्हाला दारू दिली होती.”

वेटर म्हणाला, “सर, आता सरकारनं नवं फर्मान काढलं आहे. माझा इलाज नाही.”

“ठीक आहे. मी पाकिस्तानी आहे आणि माझ्याबरोबरचा माझा मित्र इराणी आहे. दामले हिंदुस्तानी आहेत. तेव्हा आम्हाला दारू देऊ शकतोस.” रहमाननं तोडगा काढला.

अफगाणिस्तानात एक मजा आहे. अफगाण नागरिक देशांच्या सीमा मानत नाही. त्यांच्या मते ब्रिटिशांनी कृत्रिमरीत्या देशांची तोडमोड करून अफगाणिस्तान घडवला आहे. पाकिस्तान, इराण, ताजिकिस्तान इत्यादी देश वेगळे नाहीत असंच त्यांना वाटतं. त्यामुळं परवानग्या, व्हिजा वगैरे न मानता अफगाण माणसं सहज इराणात, पाकिस्तानात ये-जा करत असतात, तिथं राहतात, कामं करतात.

वेटर नकारावर ठाम होता. 

बाहेर पडलो.

दुकानं पाहत फिरलो. परदेशी पर्यटक जिथं हमखास जातात त्या रस्त्यावर, दुकानात गेलो. दुकानदार, दुकानात काम करणारे सहायक यांचा घोळका आमच्या मागं लागला. प्रत्येकजण आम्हाला त्यांच्या दुकानात चलण्याचा आग्रह करत होता. दुकानं ओस पडली होती. एकही गिर्‍हाईक नव्हतं. रस्ताच ओस होता. भीती वाटावी इतकं ओसाडपण. काय काय वस्तू मिळतात, भाव काय असतात ते चाचपून पाहण्यासाठी काही दुकानात गेलो. दुकानदार सांगत होता, “आता पर्यटक येत नाहीत. त्यांना भीती वाटते. पाहण्यासारखंही काही राहिलेलं नाही. युनायटेड नेशन्सचे किंवा एनजीओचे लोक शहरात आहेत, पण ते दुकानात यायला घाबरतात.”

काळोख जसजसा वाढू लागला तसतशी जी काही तुरळक वर्दळ होती तीही कमी कमी होत गेली. आता वसतीला  परतलं तर बरं, असं ठरलं. 

हॉटेल पार्क रेसिडेन्सी हे मध्यवस्तीतलं हॉटेल. दिवसाचे पंचावन्न डॉलर्स. पंचावन्न डॉलरमधे जेवणखाणासह दिवसभराचं वास्तव्य म्हणजे वाईट नाही. अडीच हजार रुपये. पुण्यात बर्‍या हॉटेलात राहायचं तर अडीच हजार रुपये होतात. सांगली, कोल्हापुरातही तेवढेच पैसे लागतात. अफगाणिस्तानाचं चलन आहे अफगाणी. शंभर भारतीय रुपये दिले तर एकशे दहा अफगाणी मिळतात. काबूलमधे लोक डॉलरच्याच भाषेत बोलतात. दुकानदार भारतीय रुपये घेत नाही. दुकानाच्या बाहेर चलनाची चवड हातात घेऊन माणसं उभी असतात. त्यांना रुपये द्यायचे, ते अफगाणी देतात. ते अफगाणी दुकानदाराला द्यायचे. दुकानदार डॉलर मात्र घेतात. 

पार्क रेसिडेन्सीच्या तीन बाजूंनी वीस फूट उंच भिंती. एका बाजूला पाच मजली इमारत. इमारतीचे तीन मजले मॉल आणि वरचे दोन मजले हॉटेल. 

सर्वांत वरच्या मजल्यावर भारतीय दूतावासातल्या अधिकार्‍याची राहण्याची जागा. तीनेक हजार चौरस फुटांची. चौकशी केल्यावर कळलं की महिन्याला दहा लाख रुपये भारत सरकार या फ्लॅटवर भाड्यापोटी खर्च करतं. हा दूतावासातला अधिकारी काय बरं करत असेल? फिरत-बिरत तर नाहीच. काबूल सोडून कुठंही जात नसेल. शक्यच नाही. भारत सरकारनं असे कितीसे पैसे अफगाणिस्तानात गुंतवले आहेत? अफगाणिस्तानात मुळातच आर्थिक उलाढाल फारशी होत नसताना दूतावास, युनायटेड नेशन्स, जागतिक बँक वगैरेमधली मंडळी इथं करतात तरी काय? लट्ठ पगार घेण्यापलीकडं या माणसांचं अफगाणिस्तानाला योगदान काय? 

चारही बाजूंनी वेढलेल्या पार्क रेसिडेन्सीच्या हिरवळीवर गप्पांचा अड्डा जमवला. त्यात हेरट, काबूल, गझनी, झाबुल इत्यादी ठिकाणी कामं करणारी माणसं होती. त्यात एक होता मुनीर मशाल. 

“तुम्हाला आमची प्रगती कशी होतेय ते सांगतो. प्रत्येक मंत्र्याला सहा- सात सल्लागार आहेत. परदेशी. पगारी. प्रत्येकी दरमहा दहा-पंधरा हजार डॉलरचा पगार. मंत्र्यांची संख्या गुणिले साताठ गुणिले दहा हजार. म्हणजे किती डॉलर खर्च होतात पहा. हे डॉलर येतात अमेरिका, जर्मनी, ब्रिटनमधून. तिथंच ते परत जातात. ते सल्ला काय देतात, त्या सल्ल्याचं काय होतं कुणास ठाऊक! प्रगती दिसत नाही. रस्त्याची कामं अडलेली आहेत. यंत्रं, कामगार ठप्प असतात कारण, तालिब केव्हा अपहरण करतील, बाँब उडवतील ते सांगता येत नाही.” मुनीर.

झाबुल प्रांतातल्या गोष्टी मुनीरनं सांगितल्या. तिथंच तो काम करत होता.

डॉ. इसा खान नावाचा डॉक्टर होता. चांगली प्रॅक्टिस होती. लोकांमधे चांगलं वजन होतं. चांगला माणूस होता. अफगाणिस्तानचा आर्थिक विकास झाला पाहिजे असं त्याला कळकळीनं वाटत होतं. सरकारनं स्कीम काढली की ती अमलात आणण्यासाठी तो मदत करायचा. 

इसा खानला फोन आला ः ‘सरकारला मदत करायची नाही. हे सरकार नापाक- इस्लामविरोधी अमेरिकन लोकांचं आहे.’ 

“अमेरिकन लोक काय आहेत, काय नाहीत, ते इस्लामविरोधी आहेत किंवा नाहीत यात मला पडायचं नाही. आपल्या देशाचं, माझ्या अफगाण बांधवांचं कल्याण केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यांची सेवा म्हणजेच देवाची सेवा, इस्लामची सेवा, असं मला वाटतं. मी चुकीचं वागतोय असं मला वाटत नाही. मला माझं काम करू द्या.” इसा खानचं उत्तर.

धमकी देणारे तालिब होते. गावातलेच होते. इसा खान त्यांना ओळखत होते.

धमक्या येत होत्या. इसा खान धमक्यांकडं दुर्लक्ष करत होते.

एके दिवशी संध्याकाळी ते दवाखान्यातून घराकडं परतत होते. वाटेत एका ठिकाणी तालिबानी जीप मधे घालून त्यांची गाडी अडवली. जीपमधून चारजण उतरले. त्यांच्या हातांत मशीनगन्स होत्या. 

“शेवटला इशारा देतोय. आमचं ऐकणार की नाही बोला!” एक तालिब दरडावत म्हणाला.

“माझं उत्तर पूर्वीसारखंच आहे. मी काही वाईट काम करतोय असं मला वाटत नाही. कृपा करून मी काय म्हणतोय ते ऐका, तुमचा हा मार्ग सोडून द्या.” इसा खान म्हणाले.

म्होरक्यानं इसा खानना गाडीबाहेर खेचलं. त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. धाड धाड पंचवीस-तीस गोळ्या घातल्या. शरीराची चाळण केली. चेहरा विस्कटून गेला. रक्ताशिवाय काहीच दिसत नव्हतं. 

मुनीर सांगत होता की, हे तालिब लोक तालिब वखवखलेले आहेत, विकृत आहेत. छोटी छोटी मुलं पळवून नेतात, त्यांच्यावर बलात्कार करतात. गावातल्या लोकांना हे कसं सहन होणार? पण ते तरी काय करणार? सरकार, पोलिस, काही करू शकत नाहीत. गावात पोलिस नसतातच. तालिबांचाच शब्द चालतो. कोणी ब्र जरी काढला तरी मारून टाकतात. असे किती लोक मेले, किती नाहीसे झाले याची मोजदाद नाही. बातम्या येत नाहीत. येणार कशा? जागोजागी वार्ताहर कुठं आहेत? स्थानिक वार्ताहराची बातमी द्यायची हिंमत नसते. गावातला एखादा माणूस कुठं बाहेर गेला, कोणाजवळ तरी बोलला तर बातमी फुटते.

“तालिबानवर पाकिस्तानचं नियंत्रण आहे. तिथून त्यांना शस्त्रं मिळतात, प्रशिक्षण मिळतं, हुकूम येतात. आता तुम्ही इथं आलात. समजा, इथल्या  हस्तकानं पाकिस्तानातल्या पुढार्‍याला सांगितलं की, दामले नावाचा एक हिंदुस्थानी आलाय आणि तो माहिती गोळा करतोय. पाकिस्तानातून फोन येईल की, दामले यांना मारून टाका, नाही तर त्याचं अपहरण करा. बस. झाली तुमची रवानगी.” मुनीर म्हणाला.

“माझ्या नादी पाकिस्तानी कशाला लागतील? मी एक क्षुल्लक माणूस आहे. मी  मराठी भाषेत एखादं पुस्तक लिहिणार. ते पुस्तक मराठी माणसंही वाचणार नाहीत, तर तालिबांची गोष्टच सोडा. कशाला ते माझ्या भानगडीत पडतील?”  मी म्हणालो.

“तसं नाही हो. मी आपलं एक उदाहरण दिलं. तुम्ही घाबरू नका हो. विषय निघाला म्हणून एका भारतीय इंजिनियरचीच गोष्ट सांगतो. त्याला तालिबांनी पकडलं. सोडण्यासाठी पाच लाख अफगाणीची मागणी सरकारकडं केली. अफगाण सरकार पैसे द्यायला तयार नव्हतं. वाटाघाटी सुरू झाल्या. तिकडं पाकिस्तानातल्या पुढार्‍याला ही बातमी कळली. त्यानं निरोप पाठवला, तुम्हाला पैसेच हवेत ना? आम्ही देतो. पाचऐवजी दहा लाख देतो. त्याला सोडू नका. मारून टाका.” मुनीर.

“तू पाकिस्तानात जातोस? किती वेळा? तुला तिथली माणसं कशी दिसतात? त्यांचा तालिबानला पाठिंबा आहे का?” मी मुनीरला विचारलं.

“पाकिस्तानात बर्‍याच वेळा ये-जा करतो. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही विभागणीच आम्हाला मान्य नाही. आम्ही एकच आहोत. ब्रिटिशांनी एके दिवशी उठून जमिनीवर एक रेघ ओढली आणि म्हणाले की हा पाकिस्तान आणि हे अफगाणिस्तान. आम्हाला ते मंजूर नाही. साधारण पाकिस्तानी तालिबानला पाठिंबा देत नाही. सामान्य पाकिस्तानी सॉफ्ट आहे. सगळी गडबड आहे ती मुशर्रफमुळं. पाकिस्तानचं सरकार वाईट आहे.” मुनीर.

“मुशर्रफनी लाल मशिदीवर हल्ला केला, तिथल्या मुल्लांना व विद्यार्थ्यांना मारलं. अजूनही लाल मशीद धुमसते आहे. तुला त्याबद्दल काय वाटतं? तिथंही मुशर्रफचं चुकलं असं वाटतं?” मी विचारलं.

मुनीरनं भुवया वाकड्या केल्या. टेबलावर हात आपटत म्हणाला, “बिलकुल चुकलं. मुशर्रफनं मशिदीवर हल्ला केला हे अगदीच वाईट केलं. तो हल्ला इस्लामवर आहे.” 

“असं कसं? मुशर्ऱफही इस्लामवादी आहेच की!” मी म्हणालो.

मुनीर गप्प झाला.

“मला हे कोडंच उलगडत नाही. सामान्य पाकिस्तानी सॉफ्ट असेल तर आयएसआय आणि सरकार तालिबान्यांना मदत कसं करू शकतं? बहुसंख्य जनतेला जर तालिबान पसंत नसतील तर तालिबान अफगाणिस्तानात कसं दादागिरी करू शकतं? सध्याचं अफगाण सरकार जर बहुसंख्य जनतेनं निवडून दिलेलं आहे, तर ते सरकार तालिबानचा बंदोबस्त का करू शकत नाही?” मी विचारलं.

मुनीर म्हणाला, त्याच्याकडं उत्तर नाही.

सर्व जगभरच असं का होतंय? माणसं म्हणतात की, त्यांना सरकारचं वागणं मंजूर नाही. मग ती सरकारं टिकू कशी शकतात? ती सरकारं लोकेच्छेच्या विरोधात कसं वागू शकतात?


पार्क रेसिडेन्सीची हिरवळ. सकाळची वेळ. न्याहारी. हॉटेलचे मालक जातीनं गिर्‍हाइकांची चौकशी करत होते. मी पत्रकार आहे म्हटल्यावर आनंदले आणि म्हणाले, “आमच्या हॉटेलात खास खास माणसं येतात. तुमची ओळख जरूर करून देईन.”

तिथं एका डॉक्टरची भेट झाली. डॉक्टर नझीर. हेरटचा. हा खरोखरचा डॉक्टर होता. खाजगी प्रॅक्टिस होती आणि सेवाभावी संस्थेसाठीही काम करत होता.

कोहसान जिल्ह्यातल्या ८ गावांची हकीकत त्यानं सांगितली. डॉक्टर असल्यानं त्या गावातल्या प्रत्येक घरात त्याला प्रवेश होता. त्यांनी महिलांना भेटण्यात तालिबांची हरकत नव्हती. 

“गावं इराणच्या हद्दीला लागून आहेत. गावांतली परिस्थिती अगदीच वाईट. एकाही गावात शाळा चालत नाही. शाळेसाठी एखादी खोली द्यायला गावातले लोक तयार आहेत, पण शिक्षक मिळत नाही. गावात शिकलेला एकही तरुण किवा प्रौढ नाही. कारण गेल्या पंचवीस वर्षांत इथं शाळाच नाही. गावातला एखादा माणूस काबूल, हेरटमधे जाऊन शिकतो.  शिकला की गावात परत येत नाही. अशिक्षितांचा उपयोग नाही आणि सुशिक्षित यायला तयार नाहीत. तालिबांचा त्रास तर आहेच. बाहेरच्या माणसाला गावात फिरणंही कठीण आहे. शेती नाही. इथं झाली तर अफूचीच शेती होते. सरकारनं बंदी घातल्यानं आता अफूही पिकत नाही. इतर ठिकाणी चोरून अफू पिकवली जाते, पण या गावातल्या लोकांना ते जमलेलं नाही.  उत्पन्नाचं एकही साधन नाही. माणसं गाव सोडून जात आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर गाव ओस पडेल. काय गंमत होईल पहा. परदेशातलं कोणी तरी येऊन या गावात शाळा सुरू करेल, पण त्या वेळी शाळेत जाण्यासाठी या गावात एकही माणूस शिल्लक नसेल. केस आहेत तर कंगवा नाही. कंगवा येईल तोवर केस नाहीसे झालेले असतील.” डॉक्टर.

माझ्या जगभरच्या भटकंतीतल्या गोष्टी, किस्से मी त्याला सांगितले.  साधारणपणे कुठल्याही देशातली खेड्यातली मंडळी जगापासून दूर असतात. प्रवासी माणसानं गोष्टी सांगितल्या की ती खूष होतात.  

“दोन दिवसांनी मी हेरटला परतणार आहे. येता माझ्याबरोबर? त्या गावात तुम्हाला घेऊन जाईन. माझ्याच घरी रहा. मोठ्ठंच्या मोठ्ठं घर आहे. बगीचा आहे. जंगलासारखी मोठमोठी झाडं बगीच्यात आहेत. तुम्ही आलात तर संध्याकाळी शेकोटीच्या भोवती बसून छान दारू पिऊ.” गडी चांगलाच रंगात आला होता.



“कुठली दारू मिळते?” मी विचारलं.

“मागाल ती. सर्व प्रकारची स्कॉच, वाइन्स. आम्हाला इराण जवळ आहे. तिथून मुबलक दारू येते.” डॉक्टर.

“इराणवर मुल्लांचं राज्य चालतं. तिथं कडक इस्लामी कायदे आहेत असं आम्ही पेपरात वाचतो. तिथं दारू?” मी विचारलं.

डॉक्टर हसला.

“मुल्लाबिल्लांचं जाऊद्या हो. इराणात लोक दाबून दारू पितात. चोरून,  तरीही राजरोस. इस्लाम आणि खोमेनी हे आता आता इराणात आले. त्याआधी पर्शियन संस्कृती होती. समृद्ध. नाचगाणी, मद्य या गोष्टी  पर्शियन संस्कृतीत आहेतच.” डॉक्टर.

हेरटमधे जायची कल्पना काही वाईट नव्हती. गेल्या वेळी मी हेरटला जाण्याच्या खटपटीत होतो. रस्ता धड नव्हता. विमानानं.   विमानतळावर जाऊन बसायचं. वाट पाहायची. विमान सुटेल याची आणि वेळेची खात्री नव्हती. हेरटचा विमानतळ अगदीच कामचलाऊ होता. झंझावात सुरू झाला की विमानं उडू शकत नाहीत. हेरटला झंझावात केव्हाही होऊ शकतो. झंझावात आला की आसमंत वाळूनं भरतो. संध्याकाळ झाल्यासारखं वाटावं इतका काळोख भर दुपारी बारा वाजताही होतो. 

आताच्या परिस्थितीत शक्य नव्हतं. 

म्हटलं, पुन्हा कधी तरी.


हॉटेलच्या काउंटरशी बसून मॅनेजरशी गप्पा करत होतो. समोरच्या टेबलावर दोन दिवसांचे काबूल टाइम्सचे अंक पडले होते. सरकार ज्या काही बातम्या सोडेल तेवढ्याच या पेपरात छापून येतात.  

बातमी ः

अपहरण. बावीस कोरियन अटकेत आहेत. सरकारच्या वतीनं वोलेसी जिरगा म्हणजे संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सदस्य मुल्ला अब्दुल सलाम रॉकेटी तालिबानशी वाटाघाटी करत आहेत. काल एका कोरियन माणसाला मारलं आहे. तुरुंगातले तालिब सोडले तरच कोरियन लोकांना सोडू, ही अट तालिबान शिथिल करायला तयार नाही. सरकार तालिबांना सोडायला तयार नाही. त्यामुळं मामला जैसे थे. तालिब  प्रत्यक्ष भेटत नाहीत, टेलिफोनवर बोलतात. करझाई म्हणतात की, इस्लाममधे अपहरण, विशेषतः स्त्रियांचं अपहरण मान्य नाही. अपहरण झालेले कोरियन ‘ख्रिश्चन एड’ या एनजीओचे कार्यकर्ते आहेत. ते धर्मांतर करण्यासाठी अफगाणिस्तानात आले आहेत, असा आरोप तालिबाननं केला आहे. 

माझ्या हातात इकॉनॉमिस्ट या आंतरराष्ट्रीय साप्ताहिकाचा अंक आहे. त्यात द. कोरियावर टिपण आहे. द. कोरियामधे एके काळी बुद्ध धर्माचा प्रभाव होता. त्यानंतर शिंटो उपासनापद्धती लोकप्रिय झाली. परवापरवापर्यंत एक नंबरवर बुद्ध, दोन नंबरवर शिंटो आणि तीन नंबरवर ख्रिस्ती होते. आता ख्रिस्तींची संख्या वाढली असून ते एक नंबरवर आहेत. अमेरिकेतून आलेल्या पैशावर नाना पंथांचे ख्रिस्ती कोरियात वाढले आहेत. हे ख्रिस्ती अमेरिकन पैशाच्या पाठबळावर आता इस्लामी देशांत फिरून तिथं धर्मांतर करण्याच्या खटपटीत आहेत. 

बातमी ः

कामदेश विभागात नाटो सैन्यानं तालिबान-अल कायदाच्या लोकांवर कारवाई केली. त्यात २५ अतिरेकी ठार झाल्याचं नाटो अधिकार्‍यानं कळवलं आहे.

चौकट : अफगाण पोलिस अधिकार्‍यांनी नाटो फौजांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांचं म्हणणं असं की, तालिबानवर कारवाई करताना परदेशी फौजा पोलिसांना पुढं करतात.  पोलिस जखमी झाले तर त्यांना तातडीनं जवळात जवळच्या इस्पितळात हलवत नाहीत, औषधोपचार करण्याबाबत हयगय करतात. परदेशी सैनिकांना मात्र हेलिकॉप्टरनं त्यांच्या सैनिकी तळावरच्या अद्ययावत इस्पितळात दाखल करतात.

बातमी ः एक लाख असहाय गरीब अफगाण लोकांना युनोतर्फे केला जाणारा अन्नधान्यपुरवठा जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून थांबला होता. कारण कंदाहारवरून हेरटला जाणार्‍या धान्याच्या ट्रकवर वाटेत तालिबान हल्ला करत असे. दररोज १५०० ते २००० टन धान्य पाठवले जात असे. आता युनोच्या सैन्यानं कुमक वाढवली असून तालिबानचा यशस्वी मुकाबला केला आहे. नुकताच तालिबानचा एक हल्ला सैन्यानं परतवून लावला असून आता अन्नपुरवठा  सुरू झाला आहे.

बातमी ः जीवनावश्यक वस्तूंच्या किमती फार वाढल्यानं नागरिक त्रासले आहेत. तांदुळाचा भाव सात किलोला ३२० अफगाणींवरून ३६० अफगाणींवर गेला आहे. ( तांदूळ  किलोला ४६ रुपये.) एक किलो खाद्यतेलाची किंमत ४० रुपयांवरून ६० रुपयांवर गेली आहे. जीवनावश्यक वस्तू पाकिस्तान, इराण या देशांतून आयात होतात. या वस्तू येताना वाटेत टोळीवाले त्यांच्याकडून जकात वसूल करतात. त्यामुळंच किंमत वाढली आहे. सरकार टोळीवाल्यांवर कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहे.

बातमी ः पेट्रोलची टंचाई वाढली आहे. अनेक पंपांवर पेट्रोल नाही. देशाला दर वर्षी दीड कोटी टन पेट्रोल लागतं. अनेक देशांमधून ते आयात करावं लागतं. इराणनं पुरवठा थांबवला आहे. ती तूट रशिया, तुर्कमेनिस्तानातून आयात वाढवून भरून काढावी लागणार आहे. अर्धंअधिक पेट्रोल सरकारी यंत्रणाच वापरते.

बातमी ः पक्तिका विभागात तालिबाननं पोलिसांच्या तीन ट्रकवर हल्ला करून जाळून टाकले. हेलमंडमधेही अशीच घटना घडली. त्यात दोन पोलिस ठार झाले.

बातमी ः बदाखशानमधे जमीन खणल्यावर सामूहिकरीत्या पुरली गेलेली ५०० प्रेतं सापडली. काबूलच्या उत्तरेला एका गावात झालेल्या खणणीत ८० प्रेतं सापडली. कुनार प्रांतात १२०० प्रेतं सापडली. घाऊक खून करून ही माणसं पुरण्यात आली होती. ती केव्हा पुरली, ती माणसं कोण होती याची माहिती मिळवण्यासाठी विशिष्ट वैज्ञानिक प्रक्रिया, वस्तू, रसायनं वापरावी लागतात. त्या गोष्टी अफगाणिस्तानात मिळत नसल्यानं फ्रान्स, जर्मनी इत्यादी ठिकाणहून माणसं, यंत्रं, रसायनं आयात करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळं ही माणसं नेमकी केव्हा व कोणी मारली याचाही पत्ता लागेल.

बातमी ः काबूलमधे पत्रकार संघटनेतर्फे दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्षमरीत्या बातम्या गोळा करणं, या विषयावर जाणकारांनी प्रकाश टाकला. बातम्या गोळा करण्यासाठी पोषक वातावरण देशात नाही, पत्रकारांना फिरता येत नाही, त्यांना मारहाण होते, धमक्या दिल्या जातात, ठारही मारलं जातं, असं पत्रकारांनी सांगितलं. सरकारनं सुरक्षा व्यवस्था सुधारली नाही तर बातम्या गोळा करणं अशक्य आहे, असं पत्रकार म्हणाले. छळण्याच्या ३० घटना गेल्या वर्षभरात घडल्याची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.

बाबराची मजार पाहायचं ठरलं. बाबर बाग आहे आणि तिच्यात बाबराची कबर आहे, काबूलच्या उत्तरेला . टेकडीवर.

बाबरानं म्हटलं होतं की, त्याला त्याच्या गावात, काबूलमधे दफन केलं जावं. 

वाटेत उद्ध्वस्त झालेल्या इमारती.

वाटेत पोलिसांची नाकेबंदी. वाहनं तपासत होते. आत्मघातकी अल कायदाचा धोका आहे.

मजार वाईट परिस्थितीत होती. मुजाहिद आपसात मारामार्‍या करत होते. त्यांनी काबूलवर चहू बाजूंनी तोफगोळे आणि रॉकेट्सचा मारा केला. अनेक रॉकेट्स बाबर बागेवर कोसळली. बाग उद्ध्वस्त झाली. आता सरकारनं ही बाग नव्यानं उभारायचं ठरवलं आहे. काम चालू आहे.



ही बाग आता सहलीची जागा झाली आहे. डबे घेऊन कुटुंबं सहलीसाठी येतात. बागेत कारंजी आहेत, वाहतं पाणी आहे. मुलं त्यात डुंबतात. एक बाबर रेस्तराँ उभारलं जातंय. भव्य. चकाचक. तिथं बसलं की सारं काबूल दिसतं. पर्यटकांना तिथं मजा येईल. 

बर्‍याच पायर्‍या चढून कबरीकडं गेलो तर कबर बंद केलेली.  दुपारनंतर तिथं शाळकरी मुलं येतात, गोंधळ घालतात म्हणून.

आमच्याबरोबर महंमद दाऊद होता.  

खुरटलेली दाढी. पन्नाशीचा असावा. चॉकलेटी रंगाचा पठाणी ड्रेस आणि गडद चॉकलेटी रंगाचं जाकिट. एकूण वेशावरून तो पाकिस्तानी किंवा अफगाणी असावा याची खात्री पटते.

दाऊदचं घर वाटेवर होतं - टेकडीवर. घरी चला म्हणाला. गाडीच्या बाहेर येऊन त्याच्या घराकडं पाहिलं. टेकडीवर बरंच वर होतं. तिरक्या तिरक्या अगदी उभ्या पायर्‍या. दहा पायर्‍या चढल्या तरी मेलो असतो इतकी तीव्र चढण. दाऊदनं हातानं त्याचं घर दाखवलं. अगदी लहान दिसलं इतक्या उंचीवर. 

पाण्याची सोय नाही. वीज नाही. ड्रेनेजची सोय नाही. दुकानं वगैरे तळाशी. कठीण आहे. पाणी, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू टेकडी उतरून घ्यायच्या, पुन्हा वर जायचं. आजारी, म्हातारे, प्रसूतीच्या कळा आलेल्या महिला... कसं निभावत असतील?

“छे ! त्यात काहीच कठीण नाही. आम्ही सहजपणे वावरतो. आम्हाला सवय झालीय. ” दाऊद मजेत होता.

दाऊद स्वतःबद्दल बोलला.  तो मूळचा गझनीचा. पठाण. घरची गरिबी. कामाच्या शोधात शाळकरी वयातच काबूलमधे आला. रशियनांचा कबजा होता त्या काळात तो सैन्यात दाखल झाला. सैन्यात नोकरी म्हणजे केवढी मोठी गोष्ट. आनंदानं एका माणसानं त्याला मुलगी दिली. लग्न झालं. एके दिवशी नजीबला फाशी झाली. आरियाना चौकात त्याला लटकवलेलं पाहायला दाऊद गेला होता. तोंडात सिगरेट कोंबलेली, खिशात खच्चून भरलेल्या नोटा बाहेर डोकावत आहेत, अशा स्थितीत  खांबावर लटकवण्यात आलं होतं. नजीबला फाशी झाली आणि गोंधळ, अराजक माजलं. काही काळ मुजाहिदांचं राज्य होतं. नंतर तालिबान. तालिबाननं दाऊदला सैन्यातून काढून टाकलं, कारण तो नजीबच्या सैन्यात होता. नजीब देशद्रोही होता असं तालिबानचं मत होतं. बर्‍याच काळानंतर दाऊदला नजीबच्या काळात त्यानं सैन्यात काम केलं होतं याचं प्रमाणपत्र मिळालं. 

अफगाण सैन्यात होता याचा अर्थ त्याला गणवेष मिळाला होता आणि बंदूक चालवता येत होती येवढंच. बाकीचं शिक्षण नव्हतं. सैन्यातून हकालपट्टी झाल्यावर दाऊद काय करणार? हातगाडीवरून सामानाची ने आण करणं, हमाली करणं, येवढंच करता येत होतं. तालिबानच्या काळात तीही कामं मिळत नव्हती. 

तालिबानचा पाडाव झाल्यानंतर दाऊदला एका संस्थेमधे नोकरी मिळाली. हमाली. चपराशी. पडेल ते काम करावं लागे. गेली तीन-चार वर्षं दाऊद ख्रिश्चन एड या संस्थेमधे काम करतो. सायकलवरून ऑफिसात जातो. तासभर लागतो. बारा तासांची ड्यूटी असते. 

“मला विचाराल, तर परिस्थिती बरी आहे. माझी तर नक्की. बाकीच्यांबद्दल मी बोलू शकत नाही. पत्नी सरकारी नोकरीत आहे. महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो. चांगल्या खुर्च्या घेतल्यात. चांगलं कार्पेट घेतलंय. टीव्ही घेतलाय. नुकतीच सहा स्पीकरची साऊंड सिस्टीमही घेतलीय.” दाऊद.

“पत्नीचं नाव काय?” मी विचारलं.

गडी  लाजला. मी पुन्हा पुन्हा विचारलं.

बरोबरचे लोकही हसू लागले.

“आमच्यात पत्नीचं नाव घेण्याची  पद्धत नाही. पत्नीचा उल्लेख मुन्नेकी मां असा करतात,” दाऊद म्हणाला.

“मुलं किती?” मी.

“तीन. मोठा सात वर्षांचा, त्याहून धाकटा पाच वर्षांचा आणि शेंडेफळ ३ वर्षांचं. मोठा शाळेत जातो.” दाऊद.

“बस? तीनच?” मी विचारलं.

दाऊद हसला.

“कोंडोम वापरतोस? की पत्नीचं ऑपरेशन केलंस?” मी.

दाऊद हसला.

“काळजी घेतो.” दाऊद.

“तालिबानचा काळ कसा होता? आता काही फरक पडलाय?” मी विचारलं.

“तालिबानच्या काळात बर्‍याच वेळा मार खाल्ला. विनाकारणच. उदा. एकदा रस्त्यावरून चाललो असताना एका तालिबनं थांबवलं. नमाज झाला का, असं विचारलं. मी ‘झाला’ असं म्हणालो. तर म्हणाला, खोटं बोलतोयस. तू नमाज केलेला नाहीस. चाबकाचे फटके मारले. रस्त्यात नमाज करायला लावला. अलीकडल्या काळातली गोष्ट सांगतो. म्हणजे गेल्याच वर्षीची. रात्रपाळीसाठी घरून निघालो होतो. वाटेत एका कारनं मला उडवलं. जखमी, बेशुद्ध झालो. काही वेळानं शुद्ध आली. काही अंतरावर पोलिस स्टेशन होतं. धडपडत, खुरडत स्टेशनपर्यंत पोचलो. माझं काही ऐकून घ्यायच्या आत पोलिसांनी बंदुका उगारल्या व मला मारायला सुरवात केली. त्यांना मी आत्मघातकी माणूस वाटलो. मी ओरडून सांगितलं की, मला अपघात झालाय, मदतीसाठी आलोय. माझं म्हणणं कळेपर्यंत बराच मार खाऊन झाला होता.”

रशियनांची कारकीर्द, मुजाहिदांचं अराजक, तालिबानचे अत्याचार. दाऊद काबूल सोडून पळाला नाही. सोबतचे लोक पाकिस्तानात गेले, दाऊद गेला नाही.

“काय गंमत आहे पहा. माझ्या मुलाला शाळेत प्रवेश घ्यायला गेलो. तर कारकुनानं पैसे मागितले. लाच. ” दाऊद म्हणाला.

इतकी संकटं सोसतही हा माणूस शांत आहे, देश सोडून जात नाही. तो असं का करतो, असं मी त्याला खोदून खोदून विचारलं. नाना प्रकारे. ‘देशप्रेम’ असं काही तरी उत्तर त्यानं दिलं असतं तर ते समजण्यासारखं होतं; पण जाम तो तसं बोलला नाही.

अजमल.

टॅक्सी चालवतो. 

आता परिस्थिती बरी आहे. नवं कार्पेट घेतलं आहे. एक जुनी मोटार घेतली आहे. भाऊ वापरतो, कधी सामानाची ने-आण करण्यासाठी, कधी टॅक्सी म्हणून.

घरची परिस्थिती साधारण. वडील खासगी नोकरीत. १४ माणसांचं कुटुंब.

“तालिबानचं राज्य सुरू झाल्यावर वडिलांची नोकरी गेली. बेकारी. अर्धपोटी राहावं लागलं. एके दिवशी वडिलांना रडू कोसळलं. घर कसं चालवायचं ते त्यांना कळेना. मलाही काय करावं ते कळेना. माझ्याजवळ एक हजार अफगाणी शिल्लक होते. त्या वेळी अफगाणी अगदीच फालतू होता, आजच्यासारखा किमती नव्हता. तेवढ्या पैशावर कुठं जाणार? मी इराणची वाट धरली. इसफहानला गेलो. मिळेल ती कामं केली. वीटकाम. हमाली. २००१ साली तालिबानचा पाडाव झाल्यावर परत आलो. खासगी कंपनीत काम मिळालं. आता घर सावरतंय. लग्न झालंय. तीन मुलं आहेत. तिसरी मुलगी चार महिन्यांची आहे. कुटुंब नियोजन सुरू केलं आहे.”  अजमल.

“मी पेपरात वाचतो की, अफगाणिस्तानात आता बाहेरून मदत येत आहे, पैसे येत आहेत, गुंतवणूक होत आहे. परिस्थिती सुधारते आहे, असं कधी कधी छापून येतं. एक साधारण माणूस म्हणून तुला काय वाटतंय?” मी.

“माझं बरं चाललंय. चार पैसे मिळताहेत; पण सारं काही ठीक आहे असं मला वाटत नाही. मला आलेले अनुभव सांगतो. माझ्या मुलाला बालवाडीत प्रवेश घ्यायचा होता. १०० अफगाणी मागितले. मी दिले नाहीत. प्रवेश रेंगाळला. मग मांडवळ केली. २५ अफगाणींवर भागवलं. ओळखपत्रावर नाव टाकताना चूक झाली होती. कचेरीत गेलो, दुरुस्त करायला सांगितलं. ५०० अफगाणी मागितले. मी हुज्जत घातली. कमी पैसे घे, अशी विनंती केली. तो माणूस तयार झाला नाही. पैसे दिले नाहीत तर ओळखपत्र फाडून टाकेन, अशी धमकी दिली. ओळखपत्र गेलं की नोकरी गेली. नवं करायला गेलो तर आणखी जास्त पैसे. झक मारत पैसे दिले, दुरुस्ती करून घेतली. आमच्या कारची नंबर प्लेट टेंपररी होती. ती कायमी करून घ्यायची होती. पैसे द्यावे लागले. माझ्या ऑफिसतर्फेच सामान दिल्लीला पाठवायचं होतं. सामान जड होतं. टॅक्सीतून विमानतळापर्यंत नेलं. तिथला पोलिस सांगू लागला की गाडी आत न्यायची नाही. मी म्हणालो की सामान हातानं न नेता येण्याइतपत जड आहे. तो म्हणाला, टॅक्सी आत न्यायची असेल तर १०० अफगाणी द्यावे लागतील. दिले. आत गेल्यावर पहिली तपासणी.  त्यानं १०० मागितले. सामान पुढं सरकलं. कागद होते. त्यावर अधिकार्‍याची सही हवी होती. त्यानं १०० मागितले. नंतर कस्टम्स. सामानात कपडे होते. ते पाठवायचे तर २००० अफगाणी द्या, असं म्हणू लागला. पाच-सातशे अफगाणींचे कपडे आणि हा २००० मागत होता. मी म्हणालो त्यापेक्षा परत घेऊन जातो, तेव्हा ४०० अफगाणींवर भागवलं. सामानात होमियोपथीची औषधं होती. ती मादक द्रव्यं आहेत, असं म्हणून अधिकारी परवानगी नाकारू लागला. समजून सांगितलं. ऐकलं नाही. शेवटी ती औषधं मी परत आणली.”


रहीम.

वय तीस-बत्तीस वर्षांचं. बुटका. चार-पाच दिवसांची दाढी. हसला की वरचे पुढले चार चांदीचे दात दिसतात. काळोखात ते दात चमकतात, भीती वाटावी असे. त्याच्या पायांतले बूट विचित्र, सापाच्या कातडीसारखे.  टोकाला निमुळते, चिचुंद्रीच्या तोंडासारखे. माणूस प्रेमळ. आपणहून मदत करत होता. वापरण्यासाठी मोबाइल मिळवून दिला. गावात कुठं जावं, कुठं नाही याची माहिती पुरवली. अनेक वेळा त्यानं दुभाष्याचं काम केलं. ख्रिश्चन एड या एनजीओत काम करतो. 

लग्न झालंय. तीन मुलं आहेत. तीन मुलांवरच थांबला आहे.  

“आम्ही काबूलमधे होतो. वडील आयात-निर्यातीच्या व्यवहारात होते. एक दुकान होतं. नजीबचा खून झाला त्या वेळची गोष्ट. म्हणजे १९८० वगैरेचा काळ. रशियन गेले. त्यांची जागा घेणारं नवं सरकार काही स्थापन होईना. मुजाहिद गट एकमेकांशी भांडू लागले, अफगाणिस्तानावर सत्ता मिळवण्यासाठी. अराजक माजलं. मी, मोठा भाऊ,  आई यांना घेऊन वडील पेशावरला गेले. बहीण काबूलमधेच थांबली, दुकान सांभाळायला.आमच्यासोबत होते कपडे, गालिचा, काही भांडी आणि १००० अफगाणी. अफगाणवस्तीत गेलो. ना ओळख ना पाळख. रात्र झाली होती. उघड्यावरच आमच्या सामानाच्या भोवती कोंडाळं करून बसलो होतो. एक माणूस आमच्याकडं पाहत होता. तो होता त्या जागेचा मालक. पाकिस्तानी होता. त्याला आमची दया आली. वडील आणि आम्ही दोघं भाऊ यांना त्यानं स्वतःच्या घरात नेलं. आई आणि बरोबरच्या आणखी एका महिलेला मात्र तो घरात घेऊन जाऊ शकत नव्हता. कारण त्या परकी स्त्रिया. त्यांच्यासाठी त्यानं एक तंबू तयार करून दिला. वडिलांकडं भारताचा व्हिजा होता. पाकिस्तानी माणसानं सांगितलं की भारतात गेलात तर पुन्हा परत येणं कठीण होईल. दोन दिवस त्या माणसाच्या घरी काढले. सोबतचे पैसे संपले होते. पैसे कुठून आणायचे? विकण्यासाठी होता फक्त गालिचा. तो विकला. 

एक खोली घेतली. वडील काम शोधायला बाहेर पडले. एका ठिकाणी घराचं बांधकाम चाललं होतं. तिथं सुतारांची गरज होती.  वडिलांनी सुतारकाम कधीच केलं नव्हतं. तरीही आपण सुतार आहोत, असं म्हणाले. जे पैसे होते ते खर्च करून हत्यारं घेतली आणि कामावर हजर झाले. त्यांना सुतारकाम लवकरच जमलं. बरे पैसे मिळू लागले. मीही त्यांना मदत करता करता सुतार झालो. एक खोली घेतली. ७०० कलदार भाडं. कलदार म्हणजे पाकिस्तानी रुपये. कसंबसं पोट भरत होतो. २००१ पर्यंत तग धरला. तालिबानचा पराभव झाल्यावर आम्ही काबूलला परत आलो.” रहीम.

“अफगाणिस्तानात परिस्थिती सुधारते आहे की नाही?” मी.

“खरं सांगू का? काही खास खास लोकांचीच परिस्थिती सुधारली आहे, सामान्य माणसाची नाही. विशेषतः आम्हा एनजीओंचं बरं चाललं आहे. परदेशी पैशावर या संस्था चालतात. जवळजवळ १७०० संस्था आहेत. प्रत्येक संस्थेचं एकेक ऑफिस असतं. साधारणपणे एक लाख रुपये ऑफिसच्या भाड्यापोटी खर्च करतात. घरवाल्यांना पैसे मिळाले. काम करणार्‍याना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पगार दिला जातो. एक साधा दुभाष्याही महिन्याला साठ-सत्तर हजार रुपये पगार मिळवतो. शहरात मोलमजुरीतून महिन्याला हजारभर रुपये मिळतात. खेड्यात तेही नाही. माणसं अर्धपोटी जगतात.” रहीम.

रहीम मला एका मॉलमधे घेऊन गेला. तीन मजली मॉल होता. बाहेरून इमारत सामान्य वाटत होती. आत गेल्यावर मात्र झगमगाट. सिंगापूर, बँकॉक, लंडन अशा कुठं तरी आहोत असं वाटावं. दुकानं मालानं खचाखच भरलेली होती. थायी-सिंगापुरी कपडे. स्विस घड्याळं, जपानी कॅमेरे, टीव्ही, दागिने. चक्क पेंटिंग विकणारं एक दुकान होतं. आत जाऊन मी चौकशी केली की, उद्ध्वस्त अफगाणिस्तानमधे पेंटिंग कोण घेतं. अपेक्षेनुसार उत्तर आलं. परदेशी लोक. नाटो, युनो, विश्व बँक, देशांच्या दूतावासांतले अधिकारी इ. 

एका मजल्यावर फूड कोर्ट होतं. त्यात मॅकडोनाल्डचे पदार्थ, स्टार बकची कॉफी, केंटकी चिकन इत्यादी गोष्टी होत्या. 

दुकानात आणि फूड कोर्टमधे एकही परदेशी माणूस नव्हता. अफगाण आणि बहुधा पाकिस्तानी लोक असावेत. छान कपड्यांतले, खानदानी दिसत होते. फिरणार्‍या बायका बुरखा गुंडाळून उघडपणे फिरत होत्या. 

रहीम म्हणाला की, ही श्रीमंत माणसं म्हणजे मंत्र्याचे नातेवाईक, कंत्राटदार, टोळीवाल्यांचे नातेवाईक, अफूचं स्मगलिंग करणारे वगैरे लोक आहेत. जरा बाहेर जाऊन पाहा म्हणजे खरं अफगाणिस्तान दिसेल.

बाहेर.

भीक मागणारी मुलं, बायका, म्हातार्‍या, म्हातारे. 

टॅक्सीच्या दरवाज्यावर टकटक. कित्येक दिवस न धुतलेले काळेकुट्ट कपडे. पुढं केलेला हात.

नाक्यावर फुटपाथच्या कडेला बसून जाणार्‍या-येणार्‍याकडं भिकेसाठी पाहणारी, जागेवरून हलता न येणारी माणसं.

पाय नाही. पायाच्या जागी कृत्रिम लाकडी पाय किंवा लोखंडी सळया. 

मॉलच्या बाहेर पाऊल ठेवलं रे ठेवलं की भिकार्‍यांची गर्दी. 

गळ्यात मोबाइल फोन रिचार्जची कार्डं आणि हातात नोटांची चळत घेऊन धावत येणारी मुलं. रुपये द्या, डॉलर द्या, पाकिस्तानी कलदार द्या, पाऊंड द्या, अफगाणी घ्या. एका हातात छोटा कॅलक्युलेटर. रुपये पुढं केले की कॅलक्युलेटरवर गणित करून पटकन अफगाणी देतात - चालती बोलती बँक. 

ही अफगाण माणसं वरून फार गंभीर, क्रूर, भावनाहीन अशी काही तरी वाटतात. धिप्पाड असतात. बोलायला लागली की वेगळीच दिसतात. बोलतं करणं हीच अडचण. भाषेची. बर्‍याच लोकांना उर्दू, हिंदी समजतं. कारण पेशावर, क्वेट्टा इथं यांचं जाणं-येणं. शिवाय हिंदी सिनेमे आणि मालिका पाहत असतात. भारतातून आलोय म्हटलं की आपलेपणानं बोलतात.

महंमद शफी. 

तरुण आहे. २००१ साली तो पेशावरहून काबूलमधे आला. आता आई, वडील, दोन बहिणी, दोन भाऊ यांच्यासोबत राहतो. सध्या १०वीमधे आहे. रात्रपाळी करतो.  दिवसा शाळेत जातो. सायकलवरून. जाण्या-येण्यात एक तास जातो. अजून लग्न झालेलं नाही. देखणा आहे. घारे डोळे. मुलगी तर सहजच मिळेल. कदाचित मुली पाठी लागल्याही असतील. शिक्षण पूर्ण करून चांगली पक्की नोकरी मिळाल्याशिवाय लग्न करायचं नाही, असं त्यानं ठरवलं आहे.

“तालिबानचा काळ फारच वाईट होता. त्यामानानं आता बरी परिस्थिती आहे. एक किस्सा सांगतो. 

पेशावरला चाललो होतो - बसमधून. बस नाक्यावर पोचली. काळ्या पगड्या घातलेल्या तालिबांनी अडवली. खाली उतरायला लावलं. सर्वांना. विचारलं, “नमाज झाला का?” 

मी म्हणालो, “माझा नमाज झाला आहे.” 

विनाकारणच तालिब भडकला. मला म्हणाला, “खोटं बोलतोस. जा रस्त्याच्या कडेला आणि नमाज पढ.”

मी काय करणार? गोळी घातली असती. नमाज केला. बरोबर करतोय की नाही ते पाहत होता. इतरांचीही तीच हालत. नमाज संपल्यावर आम्ही गाडीत परत. यात अर्धा तास गेला. 

पंधरा-वीस मिनिटांनी एका नाक्यावर पुन्हा गाडी अडवली. पुन्हा मागल्यासारखंच. नमाज पढलात की नाही? खोटं बोलताय. नमाज पढा. पुन्हा नमाज.

तिसर्‍या वेळीही तेच. मी तालिबाला म्हणालो, “अरे बाबा, सकाळपासून चार वेळा नमाज झालाय. पुरे की! असं करत राहिलं तर आम्ही पेशावरला कधी पोचणार?”

भडकला. बंदूक उगारली. तिसरा नमाज. अर्धा तास.

सुदैवानं नंतर नमाजाची वेळ आली नाही.”

सोहेलनं भेटायचं कबूल केलं होतं. पार्क रेसिडेन्सीमधेच. अब्दुल हलीम त्याची गाडी घेऊन मला न्यायला आला. 

आम्ही निघालो. 

गाडीत बसल्या बसल्या अब्दुल म्हणाला, “सकाळीच एक स्फोट झालाय. तुला त्या जागी जायचंय? चल जाऊया.”

गाडी जलालाबादच्या दिशेनं निघाली. वाटेत एका ठिकाणी चौकात वाहतूक तुंबलेली होती.

“पाहा, आता किती वेळ अडकायला होतंय कुणास ठाऊक ! कोणी तरी मंत्री जात असणार. अर्धा-अर्धा तास गाड्या अडवून ठेवतात.” अब्दुल.

मी हसलो. 

“म्हणजे तुमचा देश आता वळणावर आला म्हणायचं! गेल्या मुक्कामात मी तुमच्या पुनर्वसन मंत्र्यांना भेटलो होतो. मला वाटतं, फरहांग का काही तरी नाव होतं. इमारतीबाहेर एकच पहारेकरी होता.  फाटका आणि केविलवाणा.  मला त्यानं अडवलंही नाही. त्या वेळी वीज गेली होती. चार मजले चढून गेलो. जाताना वरून खाली जाणारे लोक दिसले. वर गेलो तर मंत्र्यांचा सेक्रेटरी म्हणाला, “अरेच्या. एक पाच मिनिटं आधी आला असतात तर मंत्री भेटले असते. आता ते खाली गेले. कदाचित जिन्यातून जाताना तुम्हाला ते क्रॉसही झाले असतील.” नंतर मंत्री भेटले. सहज. पायी चालणारे, सुरक्षा गार्डशिवायचे मंत्री. आणि आता?” मी.

आमची गाडी आरियाना चौकात पोचली. अहमदशहा मसूदच्या नावाचा एक स्तंभ या चौकात आहे. मसूद आता राष्ट्रीय हीरो झालेला आहे. जागोजाग त्याचे फोटो लावलेले दिसतात. चौकात एक खांब आणि त्याच्यावर एक केबिन. याच केबिनच्या बाहेर नजीबला फाशी देऊन लटकवलेलं होतं. गेल्या वेळी मला अमेरिकन पोलिसांनी तिथं जाऊ दिलं नव्हतं.

पुढं गेल्यावर मक्रो रयान वस्ती लागली. पाच मजली इमारतींची वसाहत. रशियन लोकांनी बांधलेल्या खोका टाइप बेरूप इमारती. यातल्याच एका इमारतीत मी एका तालिबाला भेटलो होतो.

गाडी पुढं सरकत असताना अब्दुलला मी माझ्या काबूलच्या आठवणी सांगत होतो.

डावीकडं पुल चरखी तुरुंग लागला.

जलालाबादच्या दिशेनं आम्ही सरकत होतो. रुंद, उत्तम रस्ता.

“तुम्हाला हा रस्ता पाहून बरं वाटलं ना? काबूलच काय, अख्ख्या अफगाणिस्तानातला हा एकच चांगला रस्ता. तो चांगला आहे, कारण तो अमेरिकन-जपानी लोकांनी केलाय. इथून पुढं गेल्यावर नाटोचा लष्करी तळ आहे. हजारो सैनिक, अधिकारी, दूतावासाचे लोक त्या तळावर चकडबंद सुरक्षिततेत राहतात. त्यांना कामासाठी शहरात, शहराच्या केंद्रात यावं लागतं. प्रेसिडेंट, मंत्री, राजदूत, युनोचे अधिकारी इत्यादी सर्व तिथं असतात. हे जाणं-येणं सुखाचं व्हावं म्हणून त्यांनीच हा रस्ता केला आहे.”

रस्त्याच्या दोन्ही कडेला बांधकामासाठी वापरली जाणारी अवाढव्य यंत्रं, ट्रक्स, यार्‍या रांगेनं लावून ठेवलेल्या. 

एका ठिकाणी पोलिसांनी गाडी थांबवली. चौकशी केली. अब्दुल दरी भाषेमधे त्यांच्याशी बोलला. पोलिस अब्दुलच्या ओळखीचा निघाला. त्यानं छातीला हात लावून सलाम केला, अब्दुलची चौकशी केली व गाडी सोडली. 

पुढं काही पावलांवरच बाँबस्फोटाची घटना घडली होती.

गाडी बाजूला उभी करून मी खाली उतरलो. रस्त्याच्या कडेला नान, कोल्ड ड्रिंक्स विकणारी दुकानं होती. गाडी थांबल्यावर दुकानदाराला गिर्‍हाईक आलंय असं वाटलं. त्यानं पोरं आमच्याकडं पिटाळली. त्या पोरांना दूर सारत मी दुकानापर्यंत पोचलो.  

दुकानदारानं आम्हाला आत बोलावलं. दुकानाच्या एका कोपर्‍यात प्रायमससारख्या स्टोवर एक किटली होती, काजळीनं काळवंडलेली. तिच्यात पाणी उकळत होतं. एका छोट्या मुलानं आमच्यासमोर ग्लास ठेवले. त्या किटलीतलं फिकट रंगीत पाणी कपात ओतलं. तो चहा होता.

दुकानदारानं घटनेचं वर्णन केलं ः

आम्ही बसलो होतो त्याच्या समोरच्या बाजूनं एक माणूस बाहेर आला. रस्त्यावरून जाणार्‍या एका लष्करी गाडीच्या दिशेनं त्यानं हातबाँब भिरकावला. बाँब तसा किरकोळच होता. त्या भल्या मोठ्या लष्करी गाडीपुढं तो बाँब म्हणजे हत्तीच्या अंगावर एखादी लिमलेटची गोळी फेकावी असाच होता. स्फोट झाला. त्या गाडीवर काहीही परिणाम झाला नाही.  गाडीच्या पलीकडून जाणारी एक खासगी मोटार मात्र उलटली आणि रस्ता विभाजकावर आदळली. 

जणू काहीच झालेलं नाही अशा थाटात लष्करी गाडी निघून गेली. कदाचित त्या गाडीला स्फोटाचा आवाजही ऐकू गेला नसेल.  त्या गाड्या बुलेटप्रूफ असतात. आतून एअर-कंडिशंड असतात.

मागून येणार्‍या गाड्या थांबल्या. त्यातून गोरे सैनिक धाडधाड उतरले, बंदुका परजत. लढाईत पोझिशन घेतात तसे ते रस्त्याच्या दोन्ही कडांना पसरले.  हँडग्रेनेड टाकणारा जिथून आला होता त्या दिशेला  सैनिकांनी गोळ्या झाडल्या.

त्या बाजूनं प्रतिगोळीबार झाला. आरडाओरड झाली. वाहतूक थांबली.

काय झालंय ते कळेपर्यंत सैनिक आपापल्या गाड्यांत बसले आणि निघून गेले. सैनिक गेल्यावर दिसलं ते उलटलेली गाडी, तिच्यातली जखमी माणसं, गोळीबारात जखमी झालेले काही लोक. त्यातले दोघेजण हिरव्या वेषातले अफगाणी पोलिसच होते. ते खरे पोलिस होते की पोलिसाच्या वेशातले अल कायदावाले होते ते कळायला मार्ग नाही. लष्कराच्या गाड्या गेल्या आणि काही वेळातच पोलिसांच्या गाड्या आल्या. त्यांनी जखमींना उचलून नेलं.

“काय घडलं ते आम्हाला माहीत नाही. पेपरात बातमी येतेच असं नाही. पोलिस आणि गोरे सैनिक यांच्यात गोळीबाराच्या घटना नेहमी घडतात. गोरे पोलिस मनोरोगी झाले आहेत. जरा खुट्ट झालं की ते गोळीबार सुरू करतात. जराही दम धरत नाहीत. समोरचा माणूस अफगाणी वेषातला असेल, त्याच्या डोक्यावर अफगाणी टोपी असेल तर तो माणूस अल कायदाचाच आहे असं त्यांना वाटतं. समोरच्या माणसाकडं ओळखपत्र मागणं वगैरे काळजी ते घेत नाहीत. अल कायदाचे लोक पोलिसी गणवेषात असतात. त्यामुळं समोर खराखुरा पोलिस असला तरीही सैनिक त्याच्यावर गोळ्या झाडतात.” अब्दुल हलीम म्हणाला.

दुकानदाराशी गप्पा करत असताना लष्करी गाड्यांची ये-जा दिसत होती. वेगात.  टपावरचे अँटेना उसाच्या शेतात तुरे डोलावेत तसे हेलकावे खात होते. खासगी गाड्यांमधेही लष्करी माणसं दिसत होती. डोक्यावर हेल्मेट. शर्टावर आणि पँटवर किती तरी वस्तू टांगलेल्या. पिस्तूल. फोन्स, पाण्याची बाटली. आणखी काही तरी. सैनिकाचा चेहरा जवळजवळ दिसतच नव्हता. 

अब्दुलनं गाडी वळवली आणि आम्ही शहराकडं परतू लागलो. वाटेत दोन वेळा तरी लष्करी जिपा आमच्या गाडीला चाटून गेल्या. वेगात - उर्मटपणे.

सोहेल. ही दुसरी भेट.

गेल्या वेळी पत्रकारिता आणि सोहेलचं दैनिक हा विषय होता. या वेळी मला अफगाणिस्तानली परिस्थिती सोहेलला कशी दिसते ते पाहायचं होतं. शिवाय इस्लामबद्दलही बोलायचं होतं. अफगाणिस्तान समजून घ्यायचा असेल तर इस्लाम आणि अफगाणी लोकांची वर्तणूक-व्यवहार या गोष्टी समजणं आवश्यक.

सुरुवात आर्थिक परिस्थितीपासून केली.

“मला वाटतं की आर्थिक सुधारणा झालेल्या नाहीत. तुम्हाला काबूलमधे चांगल्या इमारती उभ्या राहिलेल्या दिसतील. उद्ध्वस्त इमारतींपैकी काही इमारतींच्या जागी नव्या इमारती आलेल्या दिसतील. ती विकासाची लक्षणं नाहीत. एकूण काबूलची लोकसंख्या पाहिली तर या वरवरच्या गोष्टीही दोन टक्के लोकांपुरत्याच आहेत. बाकीची जनता अजूनही वाईट परिस्थितीत आहे. खेड्यात तर विचारायलाच नको. तिथली परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट आहे. शेती नाही, उद्योग  नाही. रोजगार कुठून येणार? अफूचं उत्पादन हे एकच साधन. अफू, स्मगलिंग हे पैसे मिळवण्याचे दोन मुख्य उद्योग आहेत. त्यातून चार लोकांचं पोट जरूर भरत असेल, पण त्यातून देशाची अर्थव्यवस्था उभी राहत नाही.” सोहेल.

अफगाणिस्तानात बहुतेक भाग शेती करण्यास लायक नाही. अफगाणिस्तानात नैसर्गिक वायू आणि तेल आहे, खनिजं आहेत. तेल, वायू, खनिजं नीट विकसित केली तरच अफगाणिस्तानचा आर्थिक विकास शक्य आहे. त्यासाठी तंत्रज्ञान आणि पैसे हवेत. ते अफगाणिस्तानात नाही. एकूणच अर्थव्यवस्था जेमतेम ८ अब्ज डॉलरची आहे. तेवढ्या पैशावर प्राथमिक गरजाही भागवता येत नाहीत. अमेरिका, युरोपमधले देश, जपान इत्यादी देश कित्येक वर्षं तेल व खनिज उद्योगात पैसे गुंतवू इच्छितात.  त्यासाठी आवश्यक  पायाभूत आर्थिक व्यवस्था  अफगाणिस्तानात नाही.  स्थैर्य नाही. सतत हिंसा, मारामार्‍या असतील तर कोण पैसे गुंतवणार? रशियाच्या प्रभावाखालच्या पंचवीस वर्षांच्या काळात पश्चिमी लोकांनी पैसे गुंतवले नाहीत. रशिया गेला. आता तालिबानला घालवण्याच्या नादात पश्चिमी देश आहेत. तालिबानचा पुरता बंदोबस्त झाला, वातावरण गुंतवणुकीसाठी सुरक्षित झालं, तर भविष्यात युरोपीय देश, अमेरिका पैसे गुंतवतील. ८ ते ९ अब्ज डॉलर्सचं नियोजन आहे. त्यातला फार कमी पैसा विकासासाठी खर्च होतोय. लष्करी सामग्री, लष्कराचा खर्च, पश्चिमी संस्था व माणसांची सल्लामसलत फी इत्यादीमधेच फार पैसा खर्च होतोय.

विकासाची एकच वाट पश्चिमी जगाला माहीत आहे - खासगीकरणाची. अफगाणिस्तानातले सर्व मुख्य उद्योग सरकारी आहेत. रशियनांच्या काळात सरकारीकरण सुरू झालं. सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सरकारी मालकीच्या  असाव्यात, हे तत्त्व एके काळी जगभर मान्य होतं. खाणी, वाहतूक, वीज व पाणी, रस्ते इत्यादी व्यवहार सरकारी मालकीचे आहेत. पश्चिमी देशांच्या सांगण्यावरून ते खासगी करण्याची खटपट चालली आहे. त्यातून काय साध्य होईल त्याबद्दल शंका आहे.

“आणखी एक गंमत. परदेशात स्थायिक झालेला एक अफगाण दोन वर्षांपूर्वी देशात परतला - देशप्रेमापोटी. त्यानं भांडवल गुंतवून एक खाजगी उद्योग सुरू केला आहे - कोकाकोलाचा. आता याला काय म्हणायचं? कोकाकोलामधे  शरीराला उपयोगी काहीच नाही. तरीही एखाद्याला तो प्यायचा असेल तर हरकत नाही. युरोपात आणि अमेरिकेत कोकाकोला असणं वेगळं आणि अफगाणिस्तानात, जिथं माणसाला दोन वेळा जेवायला मिळत नाही तिथं, कोकाकोलाचा कारखाना घालणं वेगळं. आज परदेशातून आलेले परदेशी आणि देशातच परदेशी पैशावर जगणारे लोक कोकाकोला पितात. सामान्य माणसाला पिण्याचं पाणी नाही. हे पैसे धरण बांधण्यात खर्च झाले असते तर किती बरं झालं असतं! त्या अफगाण उद्योगपतीला, परदेशातून पैसे पाठवणार्‍या संस्थांना अफगाणिस्तानात तातडीनं काय हवं आहे हे माहीत नाही काय?”  सोहेल.

आम्ही बोलत होतो. सोहेल न्याहारीबरोबर कोकाकोला पीत होता.

खासगीकरणावर सोहेलचा राग होता याचं एक कारण खासगीकरणामधे जे उद्योग उभारले जाणार आहेत त्यातून अफगाणिस्तानचा बेकारीचा बिकट प्रश्न सुटण्याची शक्यता कमी आहे. अफगाणिस्तानात साक्षरता वीस टक्क्यांपेक्षाही कमी आहे. जे साक्षर आहेत तेही जेमतेम दरी, पश्तू भाषा जाणतात - इंग्रजी नाही. एखाद्या कचेरीत अगदी कमी दर्जाची कारकुनी, एखाद्या संस्थेमधे जेमतेम कारभार करण्याजोगं ज्ञान त्या साक्षरांजवळ नाही. आधुनिक तंत्रं आणि कसब त्यांच्याजवळ नाही. आज कुठंही काम करायचं तर कॉम्प्युटर, इंटरनेट, टेलिफोन, कारभार इत्यादी गोष्टी याव्या लागतात. हे सर्व व्यवहार साधारणपणे इंग्रजीत, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन भाषेत होतात. त्या भाषा अवगत असतील तरच व्यवस्थापन, कारभार, ऑफिस चालवणं इत्यादी गोष्टी माणूस करू शकणार. साताठ सेलफोन बनवणार्‍या कंपन्या आल्या आहेत. तीन विमान कंपन्या सुरू झाल्या आहेत. तिथं अशिक्षित अफगाणांना काम मिळणार नाही. अडचणीत भर पडतेय ती देशात परतणार्‍या अफगाणांची. अफगाणिस्तानावर राग असलेले इराण, पाकिस्तान हे देश आता म्हणतायत की, परदेशी मदत आलीय ना, मग जा आपल्या देशात परत. काही लाख अफगाण परतलेत. त्यांना काम नाही. आता अफगाणिस्तानात दोनच वर्ग उरलेत - श्रीमंत आणि गरीब. दोन टोकं. मधला मध्यमवर्ग नाहीसा झालाय.

“तुमचं म्हणणं की विकास होत नाहीये. जे करायला पाहिजे ते करत नाहीयेत, जे करायची आज आवश्यकता नाही ते करत आहेत. म्हणजेच नियोजनातच घोटाळा आहे?” मी विचारलं.

आमच्या टेबलावर इतर तिघं बसलेले होते.  मधे मधे सोहेल त्यांना आमचं काय बोलणं चाललं होतं ते दरीमधे सांगत होता. ती माणसं माना हलवून सोहेलचं म्हणणं खरं आहे असं म्हणत होती. 

एकजण प्लेट घेऊन उठला, काही तरी आणायला म्हणून. परतला नाही.

“नियोजन चुकतंय, कारण सरकारमधले मंत्री हितसंबंधी, अडाणी आहेत. त्यांना अग्रक्रम कळत नाही. त्यांना स्वतःचे खिसे भरायचे आहेत. परदेशी लोकांचा सल्ला ते आंधळेपणानं मानतात. त्यात आपल्या देशाचं नुकसान होतंय ते त्यांना कळत नाही. दोन उदाहरणं देतो.”

“इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं. वीज महत्त्वाची. वीज तयार करण्याचा एक शक्य मार्ग म्हणजे धरणं बांधणं. हिंदुकुश पर्वतात, उत्तरेला  धरणांच्या जागा आहेत. ताबडतोबीनं त्या धरणांवर गुंतवणूक व्हायला हवी होती, हवी आहे. पण या सरकारनं जनरेटर्स आणून वीज तयार करण्यावर भर दिला. जनरेटर चालतात डिझेलवर. डिझेल परदेशातून येतं. जनरेटर परदेशातून येतात. पैसा परदेशातून येतो, परदेशात जातो.  देश परावलंबी राहतो.”

“दुसरं उदाहरण मोबाइल फोनचं. मोबाइल ही चांगली गोष्ट आहे हे खरं आहे; परंतु मोबाइलचा वापर सर्रास होण्यासाठी देशाची एक विशिष्ट आर्थिक स्थिती यावी लागते. आर्थिक व्यवहार वाढल्यावर ते कार्यक्षम होण्यासाठी मोबाइल आवश्यक असतो. अफगाणिस्तानात ना शेती, ना उद्योग, ना खाणी, ना तेल. अफू, थोडीशी शेती, थोडंसं पशुपालन व बरीचशी गुंडगिरी यावर देश चालतो. तिथं मोबाइलची जरुरी नाही. ते आणले. ते चालवण्यासाठी डिझेल जाळत आहेत. लक्षावधी लिटर डिझेल मोबाइल कंपन्या जाळत आहेत. आपण इथं बसलो आहोत. जरा कान देऊन ऐका. एक घरघर ऐकायला येईल. ती जनरेटरची आहे.” 

“साठ टक्के नियोजन चूक आहे. पण यांना सांगणार कोण? करझाई स्वतः बरा माणूस आहे. त्याला कळकळ आहे. पण त्याला स्वतःचा पक्ष नाही. देशात त्याला पाठिंबा नाही. टोळी, जमात, धर्म यांच्या आधारावर चालणार्‍या पक्षांचं कडबोळं त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. एके काळी म्हणजे १९९० ते १९९५ पर्यंत जे लोक सत्ता मिळवण्यासाठी आपसात भांडले, ज्यांनी देशाची वाट लावली त्या मुजाहिदांचा भरणा सरकारात आहे. त्यांना आर्थिक प्रश्न कळत नाहीत. बंदूक, हिंसा, खिसे भरणं, येवढंच त्यांना समजतं. ते करझाईंना कारभार करू देत नाहीत. एक विदेश मंत्री होता. हुशार होता. भ्रष्ट नव्हता. त्याला या लोकांनी काम करणं मुश्कील करून टाकलं. राजीनामा देऊन तो परदेशात निघून गेला.”

गाण्यात जसं ध्रुवपद ठराविक अंतरानं येत असतं तसा तालिबानचा विषय येत होता. देशभर तालिबानचा प्रभाव वाढत चालला आहे, देशात माणसाचं जगणं सुरक्षित नाही, ही सर्वांत मोठी अडचण आहे असं सोहेल म्हणत होता. तालिबान म्हटलं की इस्लाम हे प्रकरण आलंच. 

“तालिबानची जी काही दादागिरी आहे ती इस्लामच्याच आधारे, हे खरं आहे ना? तालिबानचा इस्लाम, जगभरच्या इतर देशांतला इस्लाम, ओसामाचा इस्लाम, असे वेगवेगळे इस्लाम आहेत काय? तुमचा इस्लाम कोणता?” मी विचारलं.

टेबलावर उरलेल्या इतर दोघांपैकी एकजण उठण्याच्या बेतात होता. तो खाली बसला. सोहेलचं इस्लामबद्दलचं मत त्याला ऐकायचं होतं. सोहेलनं त्याला दरी भाषेत काही तरी सांगितलं आणि नंतर तो माझ्याशी बोलू लागला.

“माझे अनुभव सांगतो.

मी मलेशियात गेलो होतो.  रमझानचा काळ होता. मुसलमानांचा मोठा सण. उपास ठेवले जातात. मी मुसलमान आहे, पण उपास करतोच अशातला भाग नाही. माझ्या मित्राबरोबर बाहेर फिरत होतो. दुपारची वेळ झाली. मित्रानं विचारलं की, जेवण करायचं का? रमझानचा उपास करतोस का? मी म्हणालो की मी उपास करत नाही. तो म्हणाला की तोही उपास करत नाही. मग आम्ही एका रेस्तराँमधे गेलो. तिथं जेवलो. लक्षात घ्या, मलेशिया हा मुस्लिम देश आहे. पण तिथं रेस्तराँ उघडी होती. लोकांची भरपूर गर्दी होती. रात्री क्लबात गेलो. तिथं नाच-गाणं चाललं होतं. लोक ड्रिंकही घेत होते. रमझानच्या दिवसांत. हा मलेशियातला इस्लाम. अफगाणिस्तानात हे शक्य आहे?

नंतर तुमच्या हैदराबादेत गेलो होतो. आठ दिवस राहिलो. तिथं आमच्यासारखंच... कर्मठ माणसं.

इथं कर्मठ लोकांचा प्रभाव आहे. त्यांना कुराण, हदीस, शरियत यांचं शब्दशः पालन करायचं आहे. बदलत्या काळानुसार कुराणाचे नवे अर्थ लावायला हे लोक तयार नाहीत. ठराविक वेळा ठराविक नमाज पढा, हे का सांगितलं गेलं ते हे लोक विसरतात. नुसता नमाज पढण्यावर भर, त्यामागच्या उद्देशांचा विचार करत नाहीत. मी स्वतः नमाज पढत नाही. कधी कधी पढतो. आमच्या घरात माझे वडील कधी कधी नमाज पढतात. भर राहिला बिनचूक नमाजावर, विकासावर नाही.

फंडामेंटलिझम जगभर वाढतोय. अफगाणिस्तानात तर कळस आहे.

कोणत्या कारणासाठी फंडामेंटलिझम वाढतोय ते लक्षात घ्यायला हवं. अफगाणिस्तानातलं सरकार नीट वागलं, सुबत्ता आली, समाजाच्या सर्व स्तरांमधे सुबत्ता आणि शिक्षण आलं, जगणं सुरक्षित झालं तर तालिबान्यांना कोणी विचारणार नाही. आज तालिबानचा प्रभाव वाढतोय, कारण सरकार, आधुनिकता यांचा प्रभाव शिल्लक नाही. गावातला तालिबान दादागिरी करू शकतो, कारण लोकांना दुसरा पर्याय नाही.

सौदी अरेबिया हा देश श्रीमंत आहे असं तुम्ही लोक म्हणता. त्या देशात पैसा आहे, इमारती आहेत, पूल आहेत, मॉल्स आहेत, चैनीच्या वस्तू आहेत; परंतु तो देश श्रीमंत नाही. आतून ती माणसं मागासच आहेत. ठराविक कुटुंबं आणि धार्मिक गट यांची दादागिरी तिथं चालते. तिथं माणसं सुखाचा श्वास घेत नाहीत. तिथं लोकशाही नाही. अफगाणिस्तान हे इस्लामिक रिपब्लिक आहे. ते इस्लामिक आहे पण रिपब्लिक नाही. इथं लोकांना स्वातंत्र्य नाही. सौदीतही नाही.”

तर्जुमा. इतर दोघांचं माना डोलावणं.

“तुमच्या विचारांची माणसं किती? तुमच्या पेपरमधे तुम्ही हे सगळं लिहिता?” मी विचारलं.

“नाही रे बाबा! असं लिहिलं तर मला जिवंत ठेवणार नाहीत. आमच्या विचारांची माणसं कमी आहेत. आम्ही शिकलो-सवरतो, जगात फिरतो, इंग्रजी वाचतो म्हणून आम्ही हा विचार करू शकतो. अशी माणसं थोडीशीच. त्यातही आणखी एक भानगड अशी की, समजा कोणी इंग्रजी वाचून शहाणा झाला, तरी इतर माणसं त्याच्यावर दडपण आणणार, त्याचे विचार पसरू देणार नाहीत. आमचा समाज शतकानुशतकं दडपणाखाली, कर्मठपणात वाढला आहे. त्याला अनेक ऐतिहासिक कारणंही आहेत. अशा समाजात एकाएकी बदल होणं कठीण आहे. बदल सावकाशच होतील. भारतातली परिस्थिती खूपच वेगळी आहे. तुमच्या देशात वैविध्य आहे. नाना परस्पर विरोधी विचार आणि आचारांची माणसं तिथं हजारो वर्षं एकत्र राहत आहेत. मोकळेपणा, शिक्षण या गोष्टी तुमच्या रक्तात मुरल्या आहेत. आमची वाट कठीण आहे. मी जे बोललो तसं मला लिहिता येणार नाही. आम्ही भारतातलं राजकारण, पाकिस्तानातल्या घटना  पेपरात देतो. त्यातून अप्रत्यक्षपणे अनेक गोष्टी लोकांना समजत असाव्यात. प्रतिभा पाटील यांच्या निवडणुकीवर आम्ही खूप बातम्या दिल्या, लिहिलं. एक हिंदू बाई एका मुसलमान माणसाला दूर सारून निवडून आलेली नाही, हे आम्ही आडून आडून लोकांना सांगितलं. अगदी शांततेनं, निवडणुकीनं त्या निवडून आलेल्या आहेत, हे आम्ही दाखवलं. याउलट, पाकिस्तानात मुशर्ऱफ निवडणुका न घेता, धर्माच्या नावावर बखेडे करून सत्ता हस्तगत करण्याच्या नादात आहे, हेही आम्ही दाखवलं.”


गेल्या वेळी मला कंदाहारमधली मंडळी भेटली होती. या वेळी कंदाहारला जाता आलं नाही. गेल्या वेळी मी धाडस केलं. या वेळी धाडस करणं शक्य नव्हतं इतकी वाईट परिस्थिती होती. काबूल, गझनी, कंदाहार हा रस्ता सर्वांत जास्त धोक्याचा होता. गेल्या वेळी जाता-येता मी गझनीत थोडा थांबलो होतो, तिथं गप्पा केल्या होत्या, भांडलोही होतो. हिंदुस्थान लुटून नेलात, त्या पैशाचं काय केलंत असा प्रश्न मी विचारला होता. ज्या पठाणाला हा प्रश्न विचारला तो चमकला जरूर होता, पण त्याला माझ्या बोलण्याचा अर्थ समजला होता. येवढा पैसा गोळा करूनही त्याचा योग्य उपयोग देशाच्या विकासासाठी करता आला नाही, हा माझा मुद्दा त्याच्या लक्षात आला होता. ब्रिटिशांनी भारताला लुटलं पण विद्यापीठं, पार्लमेंट इत्यादी संस्था उभ्या केल्या. अफगाणांनी काय केलं, असं मी विचारल्यावर तो गप्प झाला होता.

असे प्रश्न विचारण्यासाठी जिवंत तर राहायला हवं?

 गझनीमधे शाळा जाळण्यात आल्या. गझनीमधे रस्ते बांधणार्‍या कंत्राटदारांचं अपहरण करण्यात आलं, त्यांना मारण्यात आलं. सुरुंगांवरून गेल्यामुळं वाहनं उद्ध्वस्त झाली.  

चार वर्षं मधे गेली, म्हणजे माझं वयही चार वर्षांनी वाढलं होतंच.

या वेळी हेरटमधली माणसं काबूलमधेच भेटली. 

या वेळच्या मुक्कामात डॉ. नझीर आणि इंजिनियर शफीक भेटले. पैकी नझीर हा रंगेल माणूस, शायर. त्यामानानं इंजिनियर शफीक हा सुरुवातीला सनातनी आणि जुनाट वाटला. शफीक मरणाच्या उन्हाळ्यातही कोट घालून फिरत होता. दाढी. चेहर्‍यावर फारसे भाव दिसत नसत. कोरडा, रागावलेला आहे असंच वाटत होतं. बियर घ्यायची ठरवली तेव्हा नझीर म्हणाला की, शफीकसमोर मी बियर घेणार नाही, त्याला आवडत नाही. तेव्हा शफीक इंजिनियरबद्दल  माझ्या मनात एक अढी निर्माण झाली.  

त्यांची गावाला, हेरटला परत जायची वेळ आली, तेव्हा शफीक माझ्या खोलीवर आला आणि म्हणाला की, आज रात्री पुन्हा एकदा शेरोशायरीची रात्र जमवूया. शबेशेर. मिठी घालून त्यानं मला आमंत्रण दिलं.

मी थोडा हळवा झालो. 

रात्री मैफिल झाली. अब्दुल्लानं रूमीच्या कविता म्हटल्या. डॉ.नझीरनं त्याचे शेर ऐकवले. 

शबेशेर ऐन रंगात असतानाच मी इस्लामचा विषय काढला. सोहेलशी काय बोलणं झालं ते सांगितलं. विचारलं, “अफगाणिस्तानचा विकास होणं न होणं याचा तालिबानशी, अल कायदाशी, ओसामा बिन लादेनशी, इस्लामशी किती संबंध आहे?”

इथून पुढं तुटक तुटक संवाद सुरू झाला. नझीरला इंग्रजी समजतं पण बोलता येत नाही. शफीकला थोडं थोडं समजतं, बोलता तर अजिबात येत नाही. अब्दुलला इंग्रजी, उर्दू, हिंदी भाषा चांगल्या अवगत. त्याच्या मध्यस्थीनं संवाद झाला.

“मी नमाज पढत नाही. विसरतोच. कधी कधी कित्येक दिवस नमाज करत नाही. माझा मुलगाही तसाच आहे. त्याचं नमाज आणि कुराणात विशेष लक्ष नाही. तो इंजिनियर झालाय. त्याला पुढं शिकायचंय. भारतात बंगलोर आणि दिल्लीला इंजिनियरिंगचं चांगलं शिक्षण मिळतं, असं आम्ही ऐकलंय. त्याची इच्छा बंगलोरला जायची आहे.” शफीक म्हणाला. 

शफीकच्या दाढीजंजाळातून आज मला पहिल्यांदा थोडं हसू दिसलं. 

मला वाटलं तसा हा शफीक कर्मठ वगैरे दिसत नव्हता. 

एखादा माणूस मुसलमान आहे हे अगदी मोजक्या गोष्टींतून सिद्ध होतं. रमझानचे उपास आणि नमाज या त्यातल्या मुख्य गोष्टी. तेवढं सांभाळून दिवसभर तो माणूस कसाही वागला तरी इस्लामी असू शकतो. 

हिंदूंमधे अनेक कर्मकांडं आहेत. दिवसभराच्या नाना प्रार्थना आहेत. नाना सण आहेत. धार्मिक व्रतंवैकल्यं किती तरी आहेत. देव-देवताही पुष्कळ. संत, महात्मे, महाराजही पुष्कळ. हिंदू माणसं कर्मकांडं करूनही धर्माच्या खर्‍या आशयाला टांग मारू शकतात. कर्मकांडं करणाराही नास्तिक असू शकतो आणि कर्मकांडं न करणाराही आस्तिक असू शकतो. मजा मजा आहे!

इस्लाममधेही तशीच गंमत. पाच वेळा नियमित व करेक्ट नमाज पढणारा, हाज यात्रा करणारा, रमझानचे उपास सांभाळणारा, कुराण पाठ असणारा माणूसही दुनियेतल्या अनेक अनैतिक गोष्टी करू शकतो. बलात्कार करणारे, लहान मुलांचा लैंगिक वापर करणारे, दारूडे, अत्याचारी असे किती तरी तालिब आणि मुल्ला असतात. गेल्याच आठवड्यात काबूलमधे एका मुल्लाला लोकांनी पकडलं, कारण त्यानं एका लहान मुलीवर बलात्कार केला होता. लोकांनी बदड बदड बदडलं. त्यात तो मेला.

नमाजाची चालढकल करणारे, रमझानचा उपास न करणारे, कुराण पाठ नसलेले, हाजला न गेलेले किती तरी मुसलमान उत्तम नैतिक जीवन जगताना दिसतात, उत्तम नागरिक असतात, उमदे आणि छान असतात.

“ओसामा, मुल्ला उमर या लोकांनी इस्लामचा जो काही अर्थ लावला आहे तो चुकीचा आहे. इस्लाम वाईट नाही.” शफीक म्हणाला.

इतरांनीही माना हलवून, छातीवर हात ठेवून, अल्लाची आठवण करून शफीकच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

“ओसामा, मुल्ला उमर, मौदुदी, सय्यद कुतुब, वहाबी, सलाफी त्यांना हवा तो अर्थ लावू शकतात.  म्हणजे कुराण, इस्लामचा अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य माणसाला आहे. काळानुसार तुम्हीही स्वतंत्र अर्थ काढू शकता, हे खरं की नाही? विज्ञान, लोकशाही, अर्थव्यवस्था, इतर धर्मांचंही चांगुलपण स्वीकारा, असा नवा अर्थ तुम्ही का स्वीकारत नाही?” मी विचारलं.

माझा प्रश्न अब्दुलनं भाषांतर करून सांगितला. माझ्या प्रश्नाचा अर्थ काय आहे, मला काय विचारायचं आहे यावर तिघांमधे चर्चा झाली. चर्चा करत असताना ते माझ्याकडं पाहत, माझ्याकडं बोट दाखवत, पुन्हा चर्चा करत. 

काही वर्षांपूर्वी देवबंदच्या शाळेतून फतवा निघाला होता की, नमाज पढताना चष्मा आणि मनगटी घड्याळ वापरू नये... कुराणात चष्मा आणि घड्याळाचा उल्लेख नाही म्हणून. लोकांमधे खळबळ माजली.  चष्मा आणि घड़्याळाशिवा़य जगणंच शक्य नाही हे लोकांना कळत होतं. घड्याळामुळं नमाजाची वेळ पक्की कळत होती. चष्म्यामुळं कुराण वाचणं सोपं होत होतं. चर्चा झाली.  देवबंदनं फतवा मागं घेतला. चष्मा आणि घड्याळ हराम नसून हलाल आहे, असा निर्णय दिला.

तिघांमधे बरीच चर्चा झाली. शेरोशायरीनं निर्माण केलेला रोमान्स आता कुठच्या कुठं नाहीसा झाला होता. वातावरण गंभीर झालं होतं.

टेबलावर कागद पडलेले होते. त्यातला एक घेतला.  त्यावर एक टिंब काढून त्याच्या भोवती वर्तुळ आखलं. म्हणालो, तो आहे अफगाणिस्तान.

जवळ एक दुसरा बिंदू आणि त्याभोवती वर्तुळ - ते सौदी. 

तिसरं वर्तुळ - इस्लाम. 

चौथं वर्तुळ - कुराण. 

पाचवं वर्तुळ - हदीस. 

ही वर्तुळं कागदावर डाव्या बाजूला खालच्या कोपर्‍यात होती.

उजव्या बाजूच्या कोपर्‍यात, अंतरावर एक वर्तुळ काढलं - ते अमेरिका. 

एक वर्तुळ - तो भारत.

आणखी एक वर्तुळ - युरोप.

विज्ञान, तंत्रज्ञान, हिंदू, विद्यापीठ, अर्थशास्त्रं अशी अनेक वर्तुळं काढली.

शफीकला म्हणालो, “तुमचा संबंध अफगाणिस्तान, सौदी, इराण, कुराण वगैरे वर्तुळांशी येतो. त्या पलीकडं जगात किती वर्तुळं आहेत पहा. त्यांचं अस्तित्व तुम्ही मान्य करत नाही, तरीही ती अस्तित्वात आहेत. ती नाकारू नका. ती विचारात घेऊन त्यांच्या सोबत जगायला शिका. असं नाही तुम्हाला वाटत?”

अब्दुलनं माझा प्रश्न, माझं म्हणणं त्यांना सांगितलं. त्यांची आपसात चर्चा. हातवारे. माझ्याकडं पाहणं. माझ्याकडं बोट दाखवणं.

शफीकनं तो कागद त्याच्याकडं घेतला.  माझ्या हातातून पेन घेतलं. सगळ्या वर्तुळांना सामावून घेणारं असं एक कागदभर वर्तुळ त्यानं आखलं. म्हणाला, “हे मोठं वर्तुळ म्हणजेच इस्लाम. इस्लाम आणि कुराणात तू सांगतोस त्या सार्‍या गोष्टी आहेत. महंमदानं त्या सार्‍या गोष्टी खुबीनं कुराणात सांगितल्या आहेत. इस्लाम म्हणजेच राजकारण, इस्लाम म्हणजेच अर्थकारण, इस्लाम म्हणजेच विज्ञान, इस्लाम म्हणजेच तंत्रज्ञान, इस्लाम म्हणजेच समाजवाद. इस्लाममधे सर्व काही आहे. इतर काहीही शिकण्याची आवश्यकताच इस्लामला नाही.”

मी चाटच पडलो. 

काबूलमधे येण्याच्या आधी काही दिवस लातूरला असताना एका  माणसाशी, तो हिंदू होता, गाठ पडली होती. बोलण्याच्या ओघात मी त्याला सांगत होतो की, भारतानं प्रगत जगाकडून काही गोष्टी शिकायला हव्यात. उदाहरणार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञान. त्यावर तो मला म्हणाला, “काय राव आम्हाला या गोष्टी सांगताय! रॉकेट, विमानं, अणुबाँब, मोबाइल फोन या सगळ्या गोष्टी हिंदुस्थानात किती तरी हजार वर्षांपूर्वी होत्या. वेद, रामायण, महाभारत वाचा म्हणजे तु्म्हाला कळेल की त्या काळात आजच्या सगळ्या गोष्टी होत्या.  अमेरिका आणि युरोप जन्मालाही आलं नव्हतं तेव्हा भारतात अणूचा शोध लागला होता. ज्ञानेश्वरांनी अणूचा उल्लेख ज्ञानेश्वरीत केला आहे यावरून, राव, लक्षात घ्या की ज्ञानेश्वरांना पार्टिकल फिजिक्स माहीत होतं.”

रात्र बरीच झाल्यानं चर्चा आवरती घेतली.

मला मुंबईचं विमान धरायचं होतं. सामानाची बांधाबांध करत होतो, हॉटेल सोडायचं होतं. शफीक, नझीर वगैरे मंडळी आणखी एक दिवस काबूलमधे राहणार होती.

शफीक माझ्या खोलीवर आला. मला मिठी मारून म्हणाला, “तुम्हाला मी हेरटला बोलवेन. तुमची चांगली व्यवस्था करेन. नक्की या. ज्या अर्थी दोन वेळा अफगाणिस्तानात आलात त्या अर्थी तिसर्‍या वेळीही नक्कीच याल. इन्शाल्ला!”

पाठोपाठ डॉ. नझीर आला. डोळे मिचकावत, हसत, माझ्या कानात म्हणाला, “लक्षात ठेवां हं. बाग. रात्र. शेकोटी. व्हिस्की.”

एकानं माझी बॅग घेतली. दुसर्‍यानं माझी लॅपटॉपची पिशवी घेतली. मी नको नको म्हणत असताना. टॅक्सीत मला व माझं सामान कोंबलं. दरवाजा लोटला.

माझ्या मनात आलं, हे म्हणत असावेत, जा रे बाबा आता, पुरे झालं. पुन्हा बोअर करायला येऊ नकोस!

-

निळू दामले

४१/४२, गुडविल, वनमाला टँक रोड, 

माहीम, मुंबई ४११०१६.


************************************************************************

आपल्या आसपास घडणाऱ्या पण आपल्या विचारविश्वाचा भाग नसणाऱ्या घडामोडी समजून घ्याव्यात, त्या घडामोडींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा, आपल्या म्हणण्यापल्याडचे काही दृष्टिकोन समजून घ्यावेत, आपल्याला न दिसणारं जग जाणून घ्यावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच 'अनुभव' मासिकाचा दर महिन्याचा अंक म्हणजे आपला भवताल, आपला समाज समजून घेण्यासाठीची धडपड असते. अनुभव'च्या परिवाराचा एक भाग बनून तुम्हीही या प्रवासात सामील होऊ शकता.'अनुभव'चे वर्गणीदार बना

• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://imojo.in/anubhav

• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://www.instamojo.com/anubhavmasik/pdf-3a78e/

PDF अंक वार्षिक - ₹ ४००
अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :
वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० ।

• वर्गणी भरण्यासाठी संपर्क - 9922433614

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८