अस्वस्थ वर्तमान ! - जयंत पवार

 नाटककार, लेखक जयंत पवार यांचं नुकतंच निधन झालं. जयंत पवार यांनी 'अनुभव' मासिकासाठी वेळोवेळी भरपूर लिखाण केलं.

देशाने स्वातंत्र्यकाळात केलेल्या प्रगतीकडे लेखक कसं पाहतात, हे समजून घेण्यासाठी 'अनुभव'ने २०१३ साली अनेक लेखक-कवींना या विषयावर लिहिण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्या लेखमालिकेसाठी जयंत पवार यांनी लिहिलेला 'अस्वस्थ वर्तमान' हा लेख वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.


फ्रान्झ काफ्काच्या ग्रेगर साम्साला झोपेतून जागं झाल्यावर आपलं एका मोठ्या कीटकात रूपांतर झालंय हे कळलं, त्याला जवळपास शंभर वर्षं होतील.

मी काल-परवा एका दशकाच्या प्रदीर्घ निद्रेतून जागा झालो आणि माझ्या लक्षात आलं, आपलं असंख्य छोट्या कीटकांत रूपांतर झालंय. जाग येता येताच मला जाणवलं होतं की आपलं शरीर एका लगद्यासारखं झालं आहे. ते हलत नाहीये पण आतून प्रचंड वळवळ जाणवते आहे. मग हळूहळू त्या लगद्याचं विघटन झालं आणि त्यातून लहान लहान तुकडे बाहेर पडले, ज्यांना अनेक पाय, इवलंसं डोकं आणि पातळ पापुद्य्रासारखं शरीर होतं. ते अनेक दिशांनी सरकण्याचा प्रयत्न करत होते. प्रयत्नांती ते त्यांना जमत होतं; पण त्याच वेळी त्यातलेच काही कीटक पुढे जाणार्‍यांना आडवं येत मागे ओढत होते. असंख्य डोक्यांमध्ये विभागल्या गेलेल्या माझ्यातल्या पुढे जाण्याच्या प्रेरणा आणि मागे येण्याची इच्छाशक्ती यांच्यात झगडा सुरू होता आणि त्यातून येणारी प्रचंड थकव्याची जाणीव सर्व तुकड्यांत वाटली जात होती.

मला एवढं आठवतंय, की झोपायला जाण्यापूर्वीची स्थितीही फारशी बरी नव्हती, पण संघर्षाचं टॉनिक घेऊन मी जागा राहायला सिद्ध झालो. कारण रात्र वैर्‍याची आहे, असं माझे मित्र म्हणत होते. नव्या जादुभर्‍या शस्त्रांनिशी नवे आक्रमक हल्ला करायला येत आहेत आणि त्यात निर्बल नामशेष होणार आहेत, असं ते सांगत होते. मी योद्धा नव्हतो, लेखक होतो. लेखणीने योद्ध्यांना बळ देऊ शकत होतो. त्यासाठी मी लेखणी परजली. तेवढ्यात मोठे दंगे झाले, शंखभेरी निनादून रथांवरून लोक धावले. राष्ट्रांवर हल्ले झाले, नगरांत घातपात झाले. नव्या वसाहतवाद्यांशी मित्रांनी सीमेवर लढाई केली, त्यात ते पराभूत झाले. मग नव्या आक्रमकांनी मायावी जाळी फेकून नगरवासीयांना संमोहित केलं. सुखाचा धूर निर्माण केला. त्या धुराचे पडदे भेदत जे लोक गाणी म्हणत, गोष्टी सांगत, नाटकांचे खेळ करत धुंदीतल्यांना जागं करत फिरत होते त्यात मी होतो. खोटी आशा आणि पक्की निराशा यांच्यामध्ये आंदोलणारा लंबक ज्या काळावरून फिरत होता तो काळ नव्वदचं दशक म्हणून पुकारला जात होता. त्या संघर्षमय काळातला थरार अनुभवताना मला आठवतं, मी अनेकदा गोंधळलो होतो, तरी पुढे जाण्याची दिशा ठामपणे ठरवत होतो. मी मला सापडत होतो. तीच माझी आत्मप्रेरणा होती.

आता हळूहळू माझ्या लक्षात येतंय, की जो काळ मी जागा राहून घालवला ते एक स्वप्न होतं आणि जागा राहण्यासाठी मी जे टॉनिक घेतलं त्यानेच मला निद्रेत ढकललं.

ग्रेगर साम्साला आपण कीटक झाल्यावर भीती वाटली ती आपलं अस्तित्व नष्ट होण्याची, इतर माणसांकडून आपण चिरडले जाण्याची.मला काही तशी भीती वाटली नाही. कारण मी सभोवती पाहिलं तेव्हा माझ्या आजूबाजूला माणसंच नव्हती. भोवतालच्या प्रत्येक माणसाचं असंख्य छोट्या कीटकांमध्ये रूपांतर झालं होतं. फरक इतकाच होता, की प्रत्येकाच्या असंख्य तुकड्यांमधूनही वेगाचं एक सूत्र वाहत होतं आणि जो तो निश्चित दिशेने आपल्याच मस्तीत एखाद्या स्वयंचलित यंत्रासारखा पुढे पुढे चालला होता. सगळ्यांमध्ये एक अनाम उत्साह संचारला होता आणि त्यांच्या गुणगुणीतून एक उत्सवी धून लहरत होती. 

या उत्सवी उत्साहाचं उधाण बघून माझ्यातल्या असंख्य कीटकांमध्ये मात्र निरुत्साह शिरत होता. माझ्यासारखे आणखी काही नक्कीच असतील, पण ते कुठे असतील याची मला कल्पना येत नव्हती. माझा आवाज गुरगुरल्यासारखा येत होता, पण तो कुठेच पोचत नव्हता. मी एकटा पडत चाललो होतो.

या जाणिवेने मात्र मी घाबरलो. हे एकविसाव्या शतकाचं दुसरं दशक आहे. नव्या सहस्रकाला आता आता कुठे सुरुवात झाली आहे, तोच जगण्याने भयंकर वेग पकडला आहे. एका महाकाय रोलरकोस्टरमध्ये बसवलं जावं तशी अवस्था. नव्वदोत्तरी पिढीचा लेखक या अवस्थेतून सभोवताली कसा बघतोय? वास्तविक नव्वदोत्तरी पिढीची एका बदलाची साक्षीदार म्हणून गणना केली गेली होती; पण माझ्यासारख्या या काळातल्या माणसालाही आता समोर बघताना भोवळ येते आहे. जिथे मी उभा आहे तिथून बाहेर बघताना स्थिर काहीच दिसत नाही. क्षणात उंच उसळी घ्यावी आणि क्षणात दरीत कोसळावं, अशा टोकाच्या जाणिवांसह पुढे जाताना आपला हात समोरच्या दांडीवर घट्ट पकडून ठेवण्याचीच कसरत करावी लागते आहे. काहींना हे दुःस्वप्न वाटतं आहे तर अनेकजण आनंदाने चीत्कारताहेत.

ह्या उन्मादाला उत्तर आधुनिक काळातली जागतिकीकरणोत्तर अवस्था असं नाव आहे. ज्याअर्थी उन्माद आहे, आनंदाचे चीत्कार आहेत त्याअर्थी काही बरं, चांगलं घडत असणारच. महानगरात वावरणार्‍या माणसांचे चेहरे बघितले तरी याची जाणीव होते. लोकल ट्रेनच्या फुटबोर्डवर उभं राहून तरुण कानाला हेडफोन लावून डुलत असतात. बरिश्ता आणि सीसीडीमध्ये एका हाताने कापुचिनो कॉफीचे मग सांभाळत दुसर्‍या हाताची बोटं आयफोन, ब्लॅकबेरीवरून सराईतपणे फिरवत नादिष्ट घोळके बेफिकीर होत असतात. प्रेमी जिवांचे ब्रेकअप होतात तेव्हा ते एकमेकांना फुलं पाठवतात आणि आपल्या मित्रांना पार्टी देतात. 

जोडीदाराचं गैर वाटणारं वर्तन सहन करत लग्न टिकवण्याची सक्ती आताची पिढी स्वतःवर लादून घ्यायला तयार नाही. वडीलधार्‍यांचं ऐकून घेतलं पाहिजे, यातला भंपकपणा त्यांच्या लक्षात आलाय. आता शाळकरी परकरी पोरगीही लिपस्टिक लावून ठुमकते तेव्हा तिच्या आई-बापांच्या डोळ्यांत कौतुकाची कारंजी नाचू लागतात. कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसांनाही नवं जगणं खुणावू लागलंय. चाळीतून उत्तुंग इमारतीत, सेपरेट संडास-बाथरूमच्या व्यवस्थेत बरेचसे गेलेत, आणि उरलेल्यांनाही तिथेच आपलं आनंदनिधान असल्याचे साक्षात्कार झालेत. घरोघरी असलेलं टीव्ही नामक खोकं रंगीत स्वप्नं पेरत सुख-दुःखाची, कपट-कारस्थानाची, त्याग आणि जिव्हाळ्याची मॉडेल्स समोर ठेवून सुखी संसाराचं सूत्र प्रत्येकाच्या हाती ठेवतायत. एके काळी नाटकाची तिकिटं वाढली म्हणून थिएटरकडे पाठ फिरवणारा मध्यमवर्ग आता ३०० आणि ५०० रुपयांची तिकिटं काढून नाट्यगृहात गर्दी करू लागला आहे. इंटरनेटच्या मायाजालातून हवी ती माहिती एका क्लिकसरशी मिळू लागल्यामुळे अज्ञानाचा गंड निघून गेलाय. सानथोर फेसबुक, ऑर्कुट आणि ट्विटरवर चॅटिंग करण्यात, स्टेटस अपडेट करण्यात गढून गेले आहेत. वयात न आलेली पोरंही पोर्नो साइट्स सहजपणे बघतायत आणि आपल्या अनुभवाचा परीघ विस्तारतायत. कधी सायकलही न फिरवणारे आता स्वतःच्या आलिशान मोटारींतून फिरताहेत. जीवनमान उंच झालंय, रंगीन झालंय, सुगंधी झालंय, झुळझुळीत झालंय. आता प्रत्येकाला स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय. कारण जो तो एक-दुसर्‍याची स्पेस मान्य करू लागला आहे आणि स्वतःची स्पेस प्राणपणाने जपू लागला आहे.अनेकदा माझ्या मनात छद्मी विचार येतो, खरंच हे मुक्तपणाचं स्वातंत्र्य आहे की एकटेपणाचं पारतंत्र्य? 

‘स्वातंत्र्य हे कुठच्या गाढवीचं नाव आहे?’ असा प्रश्न नामदेव ढसाळांनी कवितेतून विचारला होता; त्याला खोल अर्थ आहे. भारत १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला म्हणून काही या देशातला प्रत्येक माणूस स्वतंत्र झाला नाही. सांस्कृतिक गुलामगिरीच्या शृृंखला तशाच राहिल्या. त्यातल्या थोड्याबहुत नंतरच्या काळात तुटताहेतसं वाटलं तरी माणसांनी नव्या बेड्या स्वतःसाठी करून घेतल्या. माणसाने स्वातंत्र्य नावाची मिथ तयार केली आणि तिचा अर्थ केवळ देशांच्या भौगोलिक सीमांशी निगडित ठेवला. त्यामुळे खर्‍या अर्थाने तो स्वतंत्र झालाच नाही. उलट, दुसर्‍याच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करणं हा आपला हक्क मानत राहिला. अन्यथा, आज आपण जागतिकीकरण झालंय असं मानत असताना देशादेशांतले सीमारेषांचे वाद का उफाळून यावेत? ग्लोबल व्हिलेजची संकल्पना मांडत असताना जगभर अस्मितेचे प्रश्न टोकदार होऊन भेदाच्या भिंती अधिक भक्कम का व्हाव्यात?

जागतिकीकरणाचं समर्थन करणार्‍यांनाही एव्हाना कळून चुकलंय, की ही संकल्पना आपण मानली तशी काही आदर्श निघाली नाही. याचं कारण तिच्या पार्श्वभागाखाली दडलेला स्वार्थ. स्वार्थ ही कल्पना त्याज्य ठरवायचं कारण नाही, कारण ती माणसाची मूलभूत जीवनप्रेरणा आहे. उलट, आपला ‘स्व’ मोठा केला की स्वार्थालाही व्यापक परिमाण मिळू शकतं. पण नव्या जगण्यात ‘स्व’चा परीघ अधिकाधिक आक्रसत गेला. त्यामुळे जागतिकीकरण माणूसकेंद्री न होता अर्थकेंद्री झालं. मूठभरांना नवभांडवली व्यवस्थेत जगावर राज्य करण्यासाठी जागतिकीकरण हा व्यूह हवा होता. मात्र, त्यातला प्रमुख अडथळा होता मध्यमवर्ग. त्यामुळे नवभांडवलदारांनी मध्यमवर्गालाच आपल्या कटात सहभागी करून लाभार्थी बनवलं आणि त्याची नखं काढून घेतली. फ्रेंच राज्यक्रांतीत जसं अमीर-उमरावांनी मध्यमवर्गाला सत्तेत वाटा देऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता या संकल्पना खालपर्यंत झिरपूच दिल्या नाहीत, तसं जागतिकीकरण वरच्यावर राहिलं. मूठभरांत मध्यमवर्ग मिसळून झालेले पसाभर लोक जवळ आले आणि अख्ख्या जगण्याचे आयाम बदलल्याच्या घोषणा करू लागले. आज मध्यमवर्गाच्या दृष्टीने खरंच सुबत्ता आली आहे. त्यामुळे त्यालाही विकासाची आणि प्रगतीची स्वप्नं पडू लागली आहेत.

लिओ टॉलस्टॉय आपल्या ‘कन्फेशन’ या महत्त्वाच्या पुस्तकात अत्यंत कळीचं विधान करतात. ते म्हणतात, ‘समाजाचा प्रगतीवर आंधळा विश्वास आहे. लोक जीवनाचं आकलन करून घेत नाहीत आणि हा अभाव ते प्रगतीच्या मागे लागून स्वतःपासून लपवतात.’

‘इंडिया शायनिंग’, ‘भारत महासत्ता होणार’ अशा बुलंद घोषणा, चकचकीत महामार्ग, उंच झेपावणारे उड्डाणपूल, बुलंद-प्रासादतुल्य इमारती, झगमगीत मॉल्स, प्रशस्त मल्टिप्लेक्सेस, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, हायपर सिटी, तंत्राचे नित्यनवे चमत्कार आणि त्यातून साकारणारं व्हर्च्युअल जग हे सारं आणि अशा असंख्य गोष्टी म्हणजे प्रगती असं आज आपण समजतो आहोत. 

जगण्याच्या लढाईत टिकून राहण्यासाठी माणसाने निसर्गाशी झुंजत, त्याला वाकवत आपल्या ऐहिक सुखासाठी जे जे केलं त्याला प्रगती म्हटलं. त्याची ही झेप चित्तथरारक असली तरी तो जे शोधत होता ते त्याला सापडलं का, हा प्रश्न शिल्लक आहे. त्याला हवी होती शांती, निर्घोर निद्रा, निर्धोक जगण्याचं आश्वासन, समाधानाची तृप्ती आणि जगण्याचं प्रयोजन. तिथवर पोचलेले अनेक मानव आहेतही; पण ते काही सगळ्या मानवजातीचं श्रेयस झालं नाही. उलट, माणसाच्याच मेंदूच्या तळघरातल्या त्याच्या हिंसा, वासनादी आदिम प्रेरणा आणि दुसर्‍यावर अधिकार गाजवण्याची दुर्दम्य कांक्षा यांनी त्याला सतत अतृप्त ठेवलं, अस्थिर आणि भयभीत ठेवलं. या भयातूनच आक्रमणं झाली. जेत्यांनी जितांवर आपली संस्कृती लादली. नगरं उभी केली, साम्राज्यं स्थापन केली. हीदेखील प्रगतीच. भांडवलशाही हा साम्राज्यशाहीचाच आधुनिक आविष्कार. तिची लढण्याची हत्यारं वेगळी आणि राज्य करण्याची पद्धत वेगळी. जागतिकीकरणासोबत आलेल्या तंत्रयुगाने तर नवे चमत्कार घडवत मानवी प्रगतीची अकल्पित शिखरं गाठली. इंटरनेट, मोबाइल माणसांच्या हातात सोपवून प्रत्येकाला जगाशी कनेक्ट करून टाकलं. ज्ञानाचे आणि माहितीचे मार्ग सर्वांना खुले केले, ऐहिक सुखाच्या प्राप्तीची संधी व्यापक केली आणि सुखासीन जगण्याची लालूच दाखवली. प्रश्न इतकाच आहे, की प्रगतीचे लाभार्थी कोण ठरले आणि या प्रगतीची माणसाने काय किंमत चुकवली?

शेती उद्ध्वस्त झाली आणि शहरांकडे लोंढे वाढू लागले. कारखाने, उद्योग बंद पडून कामगारांच्या संघटना खच्ची झाल्या. स्वतःला विकायला शहराच्या नाक्यानाक्यांवर उभ्या राहणार्‍या असंघटित मजुरांचे बाजार वाढू लागले. अर्धवट शिकलेल्या पोरांच्या इच्छा-आकांक्षा-वासनांच्या शेपट्या वळवळत राहिल्या. वंचितांची बायका-मुलं सर्वाधिक असुरक्षित झाली. हे सगळं एलिमेंट ज्यांच्या हाती सत्ता-साधन-संपत्ती आहे त्यांनी रॉ मटेरियलसारखं वापरलं आहे. यांच्याच कवडीमोल श्रमांतून, शरीराच्या निर्दय वापरातून, अतृप्त इच्छांतून वरच्यांचे समृद्धीचे मळे पिकतात. खालच्या वर्गातल्या प्रबळांना हाताशी धरून खालच्याच वर्गातल्या दुर्बळांना संपवण्याची उपजत हातोटी वरच्या वर्गापाशी उपजत आहे. गिरणी संपात बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागा कामगारांचा विरोध मोडून सहीसलामत आपल्या ताब्यात येण्यासाठी गिरणीमालकांनी कामगारांच्या मुलांचाच माफिया म्हणून वापर केला, हे याचं ठळक उदाहरण आहे.

 अंडरवर्ल्डमधला गुंड हा कामगाराचाच मुलगा होता आणि बापाने आपल्या रास्त हक्कासाठी पुकारलेला संप मोडून काढत होता. आता कामगार मुंबईतून संपलाच आहे; पण जो थोडाफार आपल्या जमिनीवर अजून टिकला आहे त्यालाही शहराबाहेर हद्दपार करून त्याच्या जमिनी गिळंकृत करण्यासाठी, अब्जावधींची माया उभारण्यासाठी याच अंडरवर्ल्डचा वापर होतो आहे. मध्य मुंबईत उभ्या असलेल्या गिरणगावाची स्कायलाइन गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदलली. कनिष्ठ मध्यमवर्गीय कामगारांच्या वस्त्यांचा बघता बघता कायापालट होऊन टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. या जागांनी एके काळी समूहजीवनाचा आदर्श ठरावा अशा कामगारजीवनात संशयाची आणि द्वेषाची बीजं पेरली. लाखो आणि कोटींच्या भावात आपल्या जागांना भाव येतो आहे हे लक्षात येताच घरोघरी सख्ख्या नात्यांत संपत्तीच्या हिश्शासाठी भाऊबंदकी उभी राहिली. रियल इस्टेट ही संपन्नतेची नवी खूण ठरली, जिने मानवी नात्यांचे आयाम बदलून टाकले. 

हा स्वार्थ पूर्वी नव्हता का? नक्कीच होता. जातिपातींची बजबज हजारो वर्षांची आहे. भ्रष्टाचार भारतीय मातीत तिचं लक्षण मानावं अशा रीतीने मुरलेला आहे. ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रवेश मिळवताना भ्रष्टाचाराचाच वापर करून सरदार मीर जाफरला अंकित करावं लागलं, ज्याने ऐन युद्धात नबाब सिराजुद्दौलाला दगा दिला. हा इतिहास आहे. अनेक सुभे आणि प्रांत यांमध्ये विभागल्या गेलेल्या या देशातील राजे-महाराजांच्या लढाया त्यांच्या सत्ताकांक्षेची साक्ष देतात. आणि दहशत तर माणसाच्या जन्माबरोबरच अस्तित्वात आलेली सर्वांत प्राचीन गोष्ट. पण भ्रष्टाचार, सत्ताकांक्षा, दहशत (टेररिझम) यांचं या काळात सार्वत्रिकीकरण होऊन त्यांना जशी प्रतिष्ठा प्राप्त झालीय तशी यापूर्वी कधीही नव्हती. आज नवे आदर्श या त्रयोगुणांतूनच निर्माण होताहेत. राजकारणात गेलेल्या माणसाला सगळ्याच गोष्टींपासून अभय असतं हे आता मिसरूड न फुटलेल्या मुलालाही ठाऊक झालंय. राजकारणी, दहशतवादी, माफिया आणि उद्योगपती हे आजचे श्रेष्ठ कोटीतले लोक आहेत. अंडरवर्ल्डमधला माणूस केवळ पोलिस (खाकी वर्दीतले माफिया) खोट्या चकमकीतून मारू शकतात किंवा दुसर्‍या टोळीच्या माणसांना त्याला संपवायचा अधिकार आहे. सामान्य माणसाने त्याला घाबरून राहावं, हा नियम आहे. राजकारण्यांसाठी भ्रष्टाचाराचे आरोप, चारित्र्यहनन, खंडणी-बलात्कारादी गुन्हे हे क्वालिफिकेशन ठरतं. लेखक, कलावंत, शिक्षक, पत्रकार, नोकरदार हे या लोकांप्रति आदर बाळगून, किंबहुना त्यांना घाबरून असतात. म्हणूनच ते कधीच स्पष्ट बोलू शकत नाहीत किंवा सत्याचा उच्चार करू शकत नाहीत. याला अपवाद आहेतच, परंतु ते इतके कमी आहेत की त्यामुळे नियमच सिद्ध होईल. त्यामुळे परिस्थितीचं नित्यनूतन आकलन मांडणारे विचारवंत या काळात सत्य अशी काही गोष्टच उरलेली नाही असं मानू लागले आहेत. असं मानणं सर्वांनाच सोयीचं आहे. परिस्थितीचे लाभार्थी ठरणार्‍या गुंडपुंड-दंडधार्‍यांना आणि पाठीवर अन्यायाचे वळ वागवणार्‍या सामान्यांनाही.

सर्वसामान्यांना प्रगतीचा लाभ घेता आला नाही तरी प्रगतीचं चित्र तर पाहता येतं! हे चित्र पाहण्यासाठीच तर खेड्यापाड्यांतून देशोधडीला लागून नाही तर नव्या रोजगाराच्या स्वप्नात लोक महानगराच्या दिशेने येत नसतील ना, अशी सतत मला शंका येते.

सुपरस्टार राजेश खन्ना वारला त्या दिवसाची ही गोष्ट उदाहरणादाखल. मी काही कामानिमित्ताने विलेपार्ल्याला उतरून नानावटी हॉस्पिटलच्या दिशेने निघालो होता. मुख्य रस्त्यावर येण्याच्या आधी तुडुंबलेली गर्दी दिसत होती. पोलिसांच्या शिट्ट्या कानावर पडत होत्या. स्कायवॉकच्या ब्रिजवर प्रचंड रेटारेटी. लोक मागे-पुढे होत होते तसा ब्रिज हलत होता. रस्त्याचे दोन्ही फुटपाथ जाम झाले होते. राजेश खन्नाच्या ‘आशीर्वाद’ बंगल्याकडे जाणारा तो रस्ता होता. ट्रॅफिक अडकलं होतं. लोक अक्षरशः आनंदाने चीत्कारत होते. विनोद खन्ना, हेमा मालिनी, शाहरुख खान, शाहिद कपूर, प्रियांका चोप्रा अशा कुणाकुणाची डोळ्यांत प्राण आणून वाट बघत होते. एखादी आलिशान गाडी गेली की डोळे ताणत होते. तहान-भूक विसरून आशा-निराशेच्या झुल्यावर तासन् तास झुलत उभ्या असणार्‍या त्या गर्दीतून अचानक चीत्कार उमटले. रस्त्यावरची एक कळकलेली बाई कोणाला तरी तारस्वरात ओरडून सांगत होती, “अरे वो देक्ख, साजिद खान आया!” तिच्या आवाजासरशी एक मोठा घोळका त्या दिशेने धावत सुटला. साजिद खान हा बोलून-चालून एक दु्य्यम नट आणि दिग्दर्शक. आपल्या संरक्षक कवचातून तो झपझप पावलं टाकत रस्त्यावरून आशीर्वाद बंगल्याच्या दिशेने चालला होता; पण त्यालाही पाहण्यासाठी, गाठण्यासाठी गर्दीतून आरोळ्या उठत होत्या, “साजिद! साजिद!”

त्या गर्दीतल्या घामट, चिकट, उग्र चेहर्‍याच्या, मळक्या-कळक्या कपड्यांतल्या, फाटक्या चपलांतल्या वा अनवाणी, रापलेल्या असुंदर चेहर्‍यांकडे बघताना ते कुठून आले असतील, कुठल्या विवंचना मनात वागवत असतील, कुठल्या यातनामय प्रसंगांतून रोज जात असतील याचा अंदाज सहज आला असता. पण आत्ता तर त्यांचे चेहरे अतोनात फुललेले, उत्कंठेने ताणलेले, हसणारे, ओरडणारे...आणि प्रसंग एका लोकप्रिय कलाकाराच्या मृत्यूचा!

त्या क्षणी मला त्यांचं तिथे असं हातातले कामधंदे टाकून लोंबकळत राहण्याचं प्रयोजन कळलं. कुणाचं तरी मरण हे त्यांच्यासाठी सेलिब्रेशन ठरलं होतं. कारण त्याच निमित्ताने तर त्यांच्या समोरून समृद्धीची बेटं जाणार होती... स्वप्नवत वाटाव्या अशा हाकेच्या अंतरावरून त्यांना ती न्याहाळता येणार होती... त्यांच्यातून वाहणारा संपन्नतेचा सुगंध नाकपुड्यांतून भरून घेता येणार होता. सुखाचा हा वारा अंगावरून जावा म्हणून सारी माणसं तडफडत होती. पराकाष्ठेने धावत, उधळत होती. 

सुख शेजारी आहे, या कल्पनेनेही सुखावणारे अगणित लोक या शहरात आहेत. इथल्या प्रदूषित हवेतही दुरून जाणार्‍या सुखाच्या झुळुकीसाठी तिष्ठत उभे आहेत. आपल्या जगण्यातला अभाव ते अशा अनुभवातून भरून काढतात. 

अभाव सर्वांच्याच जीवनात आहे. खालच्यांच्या तर आहेच, पण मधल्यांच्या आणि वरच्यांच्याही जगण्यात आहे. तो नेमका कसला आहे हे कुणाच्याही लक्षात आलेलं नसलं तरी तो आहे याचा सल मात्र प्रत्येकाच्या मनात आहे. आणि ही पोकळी भरून काढायचा तो अव्याहत प्रयत्न करतो आहे. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचे नवे नवे आविष्कार मांडणारी गॅझेट्स, बुवा-बापू-अम्मांचे आध्यात्मिक पंथ, धर्मांधतेचा कैफ वाढवणार्‍या संघटना असे अनेक मार्ग आहेत पोकळी भरून काढण्याचे; पण प्रत्येक मार्ग म्हणजे धुक्यात हरवलेली वाट आहे. अशा वेळी टॉलस्टॉयचं म्हणणं खरं ठरू लागतं. 

प्रगती आणि विकासाच्या या भीषण लाटेत सर्वांत क्लेशदायक गोष्ट ही आहे, की माणसं एकमेकांपासून दूर चालली आहेत. आम्हाला जगाच्या घडामोडी कळतात पण प्रश्न कळत नाहीत. शोषितांची दुखं, वंचितांच्या पीडा मीडिया आमच्यासमोर आणतो, पण त्यातली वेदना पोचत नाही. व्याकुळता स्रवणारी माणसातली ग्रंथी विकासक्रमात नष्ट होत चालली आहे, ही आपण प्रगतीची मोजलेली किंमत आहे. ‘थिंक बिग’ म्हणत इच्छांचं अ‍ॅम्बिशन्समध्ये, ध्यासाचं करियरमध्ये आणि आनंदाचं इव्हेण्टमध्ये रूपांतर करण्याचा ट्रेण्ड वाढतो आहे. यात साध्या साध्या गोष्टींना, छोट्या आनंदांना, हर्षविमर्षाच्या तरल क्षणांना, लहानशा गोष्टीसाठी हळवं होण्याला स्थान नाही. महत्त्वाकांक्षी नसणं हा गुन्हा ठरतो आणि अपयशी ठरणार्‍याला तर हद्दपारीचीच शिक्षा असते. म्हणूनच कधी कधी (खरं तर आता नेहमीच) या काळाची मला भीती वाटते. त्याचं भव्यपण दडपून टाकतं. उपद्रवमूल्य नसणार्‍यांना आपल्या अजस्र पावलांखाली चिरडून टाकण्याची त्याची क्षमता मला दचकवते. या संक्रमणाच्या काळात आपले एकमेकांच्या हातात असलेले हात सुटले आहेत. मधल्यांनी खालच्या माणसांना कधीच वार्‍यावर सोडून दिलं आहे. ते गटांगळ्या खातील, हवं तर स्वतःच्या बळावर तरतील नाही तर नष्ट होतील, आम्हाला काय त्याचं? आम्ही आमच्या प्रगतीचं बघू आणि पुढे पुढे जात राहू.

अशा एकट्या एकट्या होत चाललेल्या, सहानुकंपेची वीण उसवलेल्या आणि आत्मकेंद्रिततेच्या कड्यावर उभ्या राहिलेल्या माणसांचं जग टिकून आहे ते जगण्याशी प्रामाणिक असलेल्या, मेहनती आणि सच्छील अशा सामान्य लोकांवर. दिवसेंदिवस असे लोक संख्येने कमी होत चालले असले, तरी जोवर त्यांचं अस्तित्व आहे तोवर जगाचा आस ढळणार नाही. मोठ्या उत्पातांतून आणि संहारांतूनही ते वाचेल. हारुकी मुराकामीची ‘सुपर फ्रॉग सेव्ह्ज टोकियो’ नावाची अफलातून गोष्ट हे विलक्षणरीत्या सांगते.

एक महाकाय बेडूक कातागिरी नावाच्या टोकियोतल्या एका सामान्य नोकरदार इसमाच्या घरात अवतरतो आणि त्याची मदत मागतो. टोकियोत मोठा भूकंप होणार आहे. त्याचं केंद्र कातागिरी जिथे काम करतात त्या सिक्युरिटी ट्रस्ट बँकेच्या तळघरात आहे. तिथे उतरून तिथल्या एका अजस्र कृमीशी लढून तिला हरवलं की हे संकट टळेल, तेव्हा या लढाईत कातागिरींनी आपल्याला मदत करावी अशी बेडकाची इच्छा आहे. कातागिरी काही मोठे ताकदवान नाहीत. त्यांचं चारित्र्य आणि आपल्या कामात सर्वस्व झोकून देण्याची वृत्ती हेच बेडकाला मोठं भांडवल वाटतं. या लढाईत आपण जिंकलो तरी कोणी याचं श्रेय देणार नाही आणि हरलो तरी कोणी अश्रू ढाळणार नाही, कारण कुणालाच याची कल्पना नाही, हे बेडूक आधीच स्पष्ट करतो. कातागिरी तयार होतात; परंतु प्रत्यक्ष कामगिरीवर जाण्यापूर्वीच एका हल्ल्यात जायबंदी होऊन ते तिथे पोचू शकत नाहीत. पण ठरल्या दिवशी भूकंप होत नाही. सुपर फ्रॉग त्याला हॉस्पिटलमध्ये येऊन भेटतो आणि म्हणतो, “अभिनंदन! तुझ्या मदतीमुळेच त्या प्राण्याला संपवणं मला शक्य झालं.” कातागिरी गोंधळतात. आपण इथे जायबंदी होऊन पडल्याचं सांगतात. पण फ्रॉग म्हणतो, “त्याने फरक पडत नाही. आपली लढाई कल्पनेच्या प्रदेशातच पार पडली. आपली तीच युद्धभूमी होती.”

मला इथवरच्या गोष्टीने मोठी उमेद दिली. पण यानंतरच्या भागात आणखी एक विलक्षण कलाटणी घेऊन मुराकामीने मला जमिनीवर आणलं. गोष्टीचा इथवरचा भाग जितका रोमहर्षक आणि अद्भुत होता तितकाच पुढचा भाग गोंधळात टाकणारा, निराश करणारा; पण खरा होता.

सुपर फ्रॉगने त्या भूमिगत प्राण्याशी झुंज घेतली तरी त्याला तो निर्णायकपणे पराभूत करू शकला नाही. उलट, स्वतःच अधिक घायाळ झाला. कोमात जाण्यापूर्वी तो म्हणाला, “इतरांप्रमाणे मी स्वतःदेखील माझा शत्रू आहे.” तो बेशुद्ध झाला आणि त्याचे तुकडे होत गेले. त्याचं शरीर फाटलं. आतून दुर्गंधी येणारा द्रव बाहेर येऊ लागला आणि पाठोपाठ अळ्यांसारखे असंख्य किडे वळवळत बाहेर आले. त्या किड्यांनी सार्‍या परिसरावर आक्रमण केलं. ते कातागिरींच्या अंथरुणात घुसले, त्यांच्या अंगावर चढले, मांड्यांवर पसरले, त्यांच्या नाका-कानातून, गुदद्वारातून आत शिरले. एका गिळगिळीत असह्य जाणिवेने कातागिरी किंचाळले.

आदर्शांनाही वेढून राहिलेलं किंवा त्यांनी थोपवून धरलेलं त्यांच्या आतलं हीण हेच शेवटी माणसांवर चाल करून येईल आणि त्यांची लढाई हा एक भ्रम ठरेल का?

मुराकामींची गोष्ट मला किंचित पुढे न्यावीशी वाटते...

मिस्टर कातागिरींच्या शरीरात सर्व अळ्या घुसल्या आणि त्यांनी कातागिरींच्या शरीरातल्या पेशींशी युद्ध केलं. खूप काळ चाललेल्या लढाईनंतर कातागिरींचं शरीर चोळामोळा झालं. हळूहळू त्याचं विघटन होऊन लहान लहान तुकडे झाले. त्यांना अनेक पाय, एक बारीकसं डोकं आणि पापुद्र्यासारखं शरीर फुटून त्यांचं असंख्य कीटकांत रूपांतर झालं.

निद्रेतून जागं होत मिस्टर कातागिरी जोराने किंचाळले तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये नव्हते. दिवा लावत त्यांना सावरण्यासाठी एकही नर्स आजूबाजूला नव्हती. असंख्य स्वरांत चिरफाळलेली एक वेदना तेवढी गुरगुरल्यासारखी उमटली.

-जयंत पवार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८