दानिश सिद्दिकी : देशधर्मापल्याडचा माणूस - इंद्रजित खांबे
एखाद्या व्यक्तीचा ‘मित्र’ म्हणून उल्लेख करण्यासाठी नेमके कोणते मापदंड लागतात? तुमची व त्या व्यक्तीची कित्येक वर्षांची ओळख हा मापदंड मैत्री सिद्ध करण्यासाठी उपयोगी पडेलच असं नाही. कित्येक वर्षं एकमेकांना ओळखत असूनही दोन व्यक्ती कधी मित्र होऊ शकत नाहीत. तर काही वेळा एखाद्या व्यक्तीशी घट्ट मैत्री होण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो. दानिश सिद्दिकीचा माझा अनुभव असाच म्हणता येईल. त्या एका अनुभवामुळे दानिशला मी माझा जवळचा मित्र म्हणू शकतो. त्यामुळे हा लेख मी दानिश सिद्दिकी नावाचा एक महान मित्र गमावल्याच्या दुःखातून लिहीत आहे.
दानिशचं काम मी गेली कित्येक वर्षांपासून पाहत आलोय. त्याच्या कामापासून
प्रेरणा घेत आलोय. परंतु त्याला मित्र का म्हणतोय हे कळण्यासाठी
एक प्रसंग मला लिहिला पाहिजे. मे महिन्याच्या अखेरीस एक दिवस
मला दानिशचा मेसेज आला. तो वाचून मी आनंद आणि कृतज्ञतेच्या भावनेने
शहारून गेलो होतो. तो संदेश असा होता -
प्रिय इंद्रजित,
तू आणि तुझं कुटुंब सुखरूप असाल अशी आशा आहे. अपघाताने का
होईना मी तुझं काम पाहिलं. ते पाहणं माझ्यासाठी ब्लेसिंग होतं.
कितीतरी वेळ मी ते पाहत होतो. तू तुझ्या परिसराचं
केलेलं डॉक्युमेंटेशन पाहणं फारच सुखदायक आहे. तुझी मुलं निसर्गाच्या
सान्निध्यात उत्तमोत्तम गोष्टी शिकत मोठी होत आहेत. हे सारं काम
पाहणं हा माझ्यासाठी थेरपीसारखा अनुभव होता. विशेषतः दुःखद घटनांचं
छायाचित्रण करून आल्यावर तुझं काम मला मानसिक शांतता देऊन गेलं. काळजी घे. तुला मनःपूर्वक शुभेच्छा!
-
दानिश.
दानिश हा पुलित्झर मिळालेला पहिला भारतीय फोटोग्राफर होता. गेल्या शंभरहून
अधिक वर्षांमध्ये हा मान कोणत्याही भारतीय फोटोग्राफरला मिळालेला नाही. तो करत होता ते काम अतिशय आव्हानात्मक होतं. त्याची इतर
कोणत्याही फोटोग्राफी जॉनरशी तुलना करता येणार नाही. जे काम करताना
जीव जाऊ शकतो, त्यापेक्षा आव्हानात्मक काम कोणतं असू शकतं!
परंतु हे करत असतानाही दानिशसारखा माणूस माझ्यासारख्या आडगावात राहून,
सुखवस्तू आयुष्य जगत काम करणार्या फोटोग्राफरचं
कौतुक करायला जराही कचरला नाही.
स्वतःचं मोठेपण बाजूला ठेवून माझ्यासारख्या फोटोग्राफरला असा मेसेज
पाठवताना त्याच्यात कोणताही अहंभाव नव्हता. त्यातूनच दानिश किती साधा आणि संवेदनशील
माणूस होता याची कल्पना येऊ शकते.
दानिश अर्थशास्त्र शिकला होता. सोबत मास कम्युनिकेशची पदवी घेऊन तो फोटोजर्नलिझममध्ये
आला. रॉयटर्ससारख्या नामांकित एजन्सीमध्ये तो मुख्य फोटोग्राफर
होता. रोहिंज्या निर्वासितांचे त्याचे फोटो प्रचंड गाजले.
त्यासाठी त्याच्या टीमला पुलित्झरही मिळालं. देशातल्या
कोव्हिड महासाथीची अत्यंत प्रभावी छायाचित्रं त्याने काढली. सरकार
जेव्हा मृत्यूचे आकडे लपवत होतं तेव्हा वस्तुस्थिती काय आहे हे दानिशच्या छायाचित्रांमुळे
जगाला कळलं.
पण हे सर्व करत असताना त्याने प्रभावित लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर
कधीही गदा येऊ दिली नाही.
त्याचा कॅमेरा या प्रभावित लोकांपासून कायम एक अंतर राखत आला.
एका मुलाखतीत त्याने त्याच्या कामावर सुंदर भाष्य केलं होतं.
तो म्हणाला होता, ‘ज्याला आपण हे फोटो का काढतोय
हे माहीत असतं, तोच चांगला फोटोजर्नलिस्ट. सामान्य माणसाला न्याय देण्याचं व
वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याचं काम माझ्या फोटोंनी करायला हवं असं मला वाटतं.’
हे फोटो काढणं वरकरणी वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी
प्रचंड मानसिक किंमत मोजावी लागते. रोहिंज्या निर्वासितांचे फोटो
काढताना दानिशला त्या माणसांमध्ये स्वतःची बायका मुलं दिसायची. एकीकडे छायाचित्रण करतानाची आव्हानं आणि दुसरीकडे मानसिक संतुलन बिघडू न देण्याचं
आव्हान. अशा घटनांची प्रभावी छायाचित्रं घेण्यासाठी नेमकी कोणत्या
गोष्टींची गरज आहे, असं त्याला एका मुलाखतीत विचारलं गेलं,
तेव्हा तो अगदी सहजपणे म्हणाला होता, की पहिली
गरज असते ती तिथे हजर असण्याची. मला नेहमी प्रश्न पडतो,
की अशी कोणती ऊर्जा आणि प्रेरणा दानिशकडे होती ज्यामुळे तो प्रत्येक
वेळी अशा संकटठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून उपस्थित होता? हे काम करण्यासाठी प्रसंगी त्याला आपल्या कुटुंब व मित्रमंडळींच्या सहवासाचा
बळी द्यावा लागला. प्रत्येक वेळी घरातून बाहेर पडताना तो त्याच्या
कुटुंबाला ‘योग्य ती काळजी घेईन’ हे आश्वासन
देऊन बाहेर पडत होता. पण ते तितकं सोपं नव्हतं. काळजी घेणं त्याच्या हातातही नव्हतं. कोणत्याही क्षणी
आपल्याला जीव गमवावा लागू शकतो, हे माहीत असतानाही बाहेर पडणं
सोपं कसं असेल?
हे काम करत असताना त्याने सामान्य माणसाशी असलेली त्याची नाळ कधीही
तुटू दिली नाही.
काही अतिशय वेगळी कामंही त्याने केली. मुंबईतल्या
काही थिएटर्समध्ये काही गाजलेले हिंदी सिनेमे सतत दाखवले जातात. विशेषतः प्रेमकथा असलेले सिनेमे. हे सिनेमे पहायला येणार्या प्रेक्षकांचेही त्याने फोटो काढले. या तरुण प्रेक्षकांचा
भाबडा रोमँटिसिझम त्याने छायाचित्रांमध्ये पकडायचा प्रयत्न केला. हिंसा, दुःख यांचं छायाचित्रण करत असताना त्याने त्याच्या
मनातला हा प्रेमळ कोपराही जिवंत ठेवला होता.
दानिशच्या मृत्यूनंतर समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याच्या इंस्टाग्राम
प्रोफाईलवर जाऊन काही लोकांनी अत्यंत वाईट प्रतिक्रिया दिल्या. विशेषतः कोव्हिड महामारीत शेकडो चिता जळताना दाखवणार्या छायाचित्रांमुळे काहींच्या भावना दुखावल्या. परंतु
अशा टिप्पणी करत असलेल्या लोकांना फोटोजर्नालिस्ट आणि त्यांच्या जबाबदार्यांबद्दल काहीही देणंघेणं नसतं. पुलित्झर मिळाल्यावर
एका मुलाखतीत दानिश म्हणाला होता, ‘‘ मी ज्या संघर्षग्रस्त घटनांचे
फोटो काढतो, त्या दुर्देवी असतात. परंतु
फोटोग्राफरपेक्षाही मी एक हिस्टॉरियन आहे. या घटना चांगल्या की
वाईट हे शोधण्यापेक्षा जे समोर दिसतंय ते इतिहासाचा भाग म्हणून संवेदनशीलपणे डॉक्युमेंट
करणं ही माझी जबाबदारी आहे. व ती मी नेहमी पार पाडेन.’’
युद्धभूमी आणि तशाच विविध दुर्दैवी घटनांचं छायाचित्रण करणार्या फोटोग्राफर्सना
कालांतराने मानसिक आव्हानांचा सामना करावा लागतो. कित्येक छायाचित्रकारांना
नैराश्य येतं. केविन कार्टरसारख्या छायाचित्रकाराने आत्महत्या
केली. कित्येकांना तरुण वयात आपला जीव गमवावा लागतो. रॉबर्ट कापासारखा महान फोटोग्राफर वयाच्या चाळिशीत भूसुरूंगावर पाय पडल्यामुळे
मृत्युमुखी पडला. दानिशसारखे फोटोग्राफर त्यांच्या जीवाला धोका
आहे हे माहीत असूनही हे क्षेत्र निवडतात. हे काम करण्यामागील
त्यांच्या प्रेरणा समजून घेणं आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी अशक्य आहे,
असं मला वाटतं. दानिशच्या रूपाने आपण एक महान फोटोग्राफर
गमावला. दानिश हा देश, धर्म यांच्या पल्याडचा
माणूस होता. इतिहास त्याला नेहमी लक्षात ठेवेल.
इंद्रजित खांबे
https://www.indrajitkhambe.com
(ऐसी अक्षरे या वेबपोर्टलवरून साभार.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा