कोरोना विषाणू कोडं उगमाचं! - आरती हळबे
सार्स-कोव्ह २, म्हणजेच कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला, तो नैसर्गिकरीत्या तयार झाला, प्रयोगशाळेतून त्याची गळती झाली की तो मुद्दाम बनवला गेला यावर जगात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही बाजूंच्या सिद्धांतांचे आधार काय आहेत आणि ही चर्चा सध्या कुठवर येऊन ठेपली आहे याचा वेध.
सूक्ष्मदर्शका शिवाय न दिसणारा एक सूक्ष्म जीव आता वर्षभरापेक्षा अधिक काळ संपूर्ण जगात उलथापालथ घडवून आणतोय. सार्स-कोव्ह २ (SARS-CoV2) या नावाने ओळखला जाणारा हा विषाणू सर्वप्रथम चीन येथील वुहान या शहरात आढळला. माणसाच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करणारा हा विषाणू जग हादरवून टाकणार्या कोविड-१९ पॅनडेमिकला कारणीभूत आहे. प्राण्यांना संसर्ग करणार्या विषाणूंमध्ये नैसर्गिक म्युटेशन होऊन मनुष्याला संसर्गित करणारा सार्स-कोव्ह-२ हा विषाणू तयार झाला असावा असा जगभरातील शास्त्रज्ञांचा प्राथमिक अंदाज होता. वुहान येथील मार्केटमध्ये मांसासाठी जिवंत वन्य प्राण्यांची खरेदी-विक्री होते त्यात वटवाघळंही असतात. तिथेच या विषाणूने वटवाघळांच्या पेशींवरून मनुष्याच्या पेशींवर उडी मारली असावी असं मानलं जातं.
सार्स-कोव्ह
२ नैसर्गिकपणे तयार झालेला विषाणू असल्याचं मानलं गेलं असलं, तरी कोणताही चांगला शास्त्रज्ञ केवळ पुराव्यांच्या
व निरीक्षणांच्या आधारे सिद्ध होऊ शकणार्या गोष्टींचाच सत्य म्हणून स्वीकार करतो.
कुठलाही सिद्धांत जोवर सिद्ध होत नाही तोवर ती केवळ एक शक्यता असते. सार्स-कोव्ह-२
नैसर्गिकपणे निर्माण झाला असल्याचे भक्कम पुरावे अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या
बोलायचं तर सार्स-कोव्ह-२ नैसर्गिकरीत्या तयार झाला असेल हीदेखील एक शक्यताच आहे.
दुसरीकडे
या विषाणूच्या उगमाची आणखी एक शक्यता संशोधकांनी २०२० च्या सुरुवातीला वर्तवली होती.
सार्स-कोव्ह २ एखाद्या प्रयोगशाळेत निर्माण केला गेलेला असू शकतो का, अपघाताने त्याची गळती झाली असू शकते का
किंवा असा भयंकर प्राणघातक विषाणू मुद्दाम मानवी शरीरात सोडला गेला असू शकतो का? काही संशोधक या शक्यतांचाही विचार करत आहेत.
सार्स-कोव्ह २ विषाणू प्रयोगशाळेत निर्माण झाला की नैसर्गिकपणे याची तपासणी पारदर्शकपणे, वस्तुनिष्ठपणे आणि माहिती व पुराव्यांचा
काळजीपूर्वक अभ्यास करून केली जावी अशी काही संशोधकांची मागणी आहे.
कुठलेही
ठोस पुरावे नसतानाही सार्स-कोव्ह २ चा उगम नैसर्गिकच आहे ही शक्यता वर्ष-सव्वा वर्ष
रेटली गेली. यात प्रामुख्याने अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा पुढाकार होता. फेब्रुवारी
२०२० मध्ये लॅन्सेट जर्नलमध्ये काही शास्त्रज्ञांनी ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’ना प्रोत्साहन
देऊ नये असं पत्रही प्रकाशित केलं होतं. त्याचे एक लेखक होते ब्रिटनचे पीटर डॅशॅक.
डॅशॅक हे अमेरिकेतल्या ‘इकोहेल्थ अलायन्स’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. नंतर मार्च २०२०
मध्ये अमेरिकेतील ख्रिश्चियन अँडरसन आणि त्यांच्या गटाने ‘नेचर मेडिसिन’मध्ये प्रकाशित
झालेल्या संशोधनात हा विषाणू प्रयोगशाळेत तयार झाल्याची शक्यता पूर्ण नाकारली आणि त्याची
नैसर्गिक उत्पत्ती कशी झाली असेल याबद्दलच्या तीन शक्यता मांडल्या; पण त्याच वेळी हा विषाणू प्रयोगशाळेत तयार
झाल्याची शक्यता नाकारणं हे अपुर्या माहितीवर आधारित असल्याचं मत निकोलस वेड या ज्येष्ठ
ब्रिटिश विज्ञान पत्रकाराने आपल्या ५ मे २०२१च्या ‘द बुलेटिन ऑफ अॅटॉमिक सायंटिस्ट्स’मधील
लेखात व्यक्त केलं होतं.
त्यानंतर
वेळोवेळी अनेक शास्त्रज्ञांनी सार्स-कोव्ह-२ प्रयोगशाळेत निर्माण झाला असल्याच्या शक्यतेचा
पाठपुरावा केला,
त्याच्याशी
संबंधित संशोधन करून त्याबद्दल लेखही प्रसिद्ध केले. ड्रास्टिक रिसर्च या नावाने ओळखला
जाणारा शास्त्रज्ञांचा एक गट सार्स-कोव्ह-२ च्या उत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न सातत्याने
करतो आहे. यात पुण्याचे संशोधक डॉ. मोनाली रहाळकर व डॉ. राहुल बहुलीकर यांचंही योगदान
आहे. मे २०२० मध्ये प्री-प्रिंट आणि ऑक्टोबर २०२० मध्ये ‘फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ’मध्ये
प्रकाशित झालेल्या अभ्यासात त्यांनी २०१२ मध्ये काही खाणकामगारांना झालेल्या सार्ससदृश
रोगाचा अभ्यास केला. या खाणीच्या जवळील गुहांमधून वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमधील
संशोधकांनी वटवाघळांना संसर्ग करणार्या विषाणूंचे नमुने गोळा केले होते. ते जेनेटिकली
सार्स कोव्ह-२ च्या सर्वांत जवळचे विषाणू आहेत. त्यामुळे त्यातून हा विषाणू तयार झाला
असू शकतो का याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी या अभ्यासात केली होती. असं असलं, तरीही बहुतांश शास्त्रज्ञ समुदाय या विषाणूची
उत्पत्ती नैसर्गिकपणे झाली असावी याच मताचा पुरस्कार करत होता.
सार्स-कोव्ह-२
प्रयोगशाळेत तयार झाला असल्याची शक्यता जवळजवळ वर्षभर का डावलली गेली? त्याबद्दल शास्त्रज्ञांच्या मताकडे का दुर्लक्ष
केलं गेलं? लोकप्रिय मताच्या विरोधात मत प्रकट करणं
सध्याच्या परिस्थितीत शास्त्रज्ञांना महागात पडू शकतं, हे त्यामागचं एक कारण असावं. संशोधनासाठी
मिळणार्या रिसर्च ग्रँटचं नियंत्रण ज्यांच्या हातात असतं त्यांच्याविरुद्ध जाणं शास्त्रज्ञांना
परवडत नाही. त्यामुळे त्यांची संशोधनं ठप्प होऊ शकतात. त्यामुळे अनेकदा शास्त्रज्ञ
वादग्रस्त गोष्टींबद्दल मौन बाळगतात. एक्सपर्ट म्हणून शास्त्रज्ञांच्या वक्तव्यावर
अवलंबून असलेल्या विज्ञान पत्रकारांना पर्यायी मताबद्दलच्या बातम्या देणं अवघड होऊन
बसतं. त्यामुळे माध्यमंदेखील सार्स-कोव्ह-२ हा विषाणू नैसर्गिकपणे उद्भवला असल्याच्या
राजकर्त्यांनी ठामपणे मांडलेल्या मताला दुजोरा देण्याव्यतिरिक्त फार काही करू शकली
नाहीत. या वरवर दिसणार्या कारणांच्या मागे अजूनही कारणं होती. काही राज्यकर्त्यांचे
हितसंबंध जपण्यासाठी सार्स-कोव्ह-२ हा नैसर्गिकरीत्या तयार झाल्याचं पद्धतशीरपणे पुढे
रेटण्यात आलं.
मग आता
नेमकं काय घडलं ज्यामुळे प्रयोगशाळा सिद्धांताची तपासणी व्हावी असं मत पुढे येऊ लागलं? फेब्रुवारी २०२१ च्या सुमारास जागतिक आरोग्य
संघटनेचं एक पथक चीनच्या दौर्यावर गेलं. तेव्हा चीनमधील संशोधकांना सार्स-कोव्ह-२
हा विषाणू नैसर्गिकपणे उद्भवला आहे, हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे देता आले नाहीत. या पथकात पीटर डॅशॅकसुद्धा
सामील होते. ते ज्या ‘इकोहेल्थ अलायन्स’ संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्या संस्थेमार्फत ‘वुहान इन्स्टिट्यूट
ऑफ व्हायरॉलॉजी’ला विषाणूंवरील विशिष्ट संशोधनासाठी अर्थसाहाय्य दिलं जातं. हे अर्थ
सहाय्य अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’च्या कक्षेत येणार्या संस्थेकडून
देण्यात येतं. ज्ञात असलेल्या विषाणूंमध्ये जेनेटिक इंजिनियरिंग करून निरनिराळे विषाणू
बनवणं आणि मानवी पेशींवर त्यांचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणं असं या संशोधनाचं
स्वरूप आहे. अशा रीतीने मिळवलेल्या माहितीचा उपयोग भविष्यात अधिक परिणामकारक लशी तयार
करण्यासाठी करता येईल, असं
या संशोधनाचं समर्थन करणारे सांगतात. ‘गेन ऑफ फंक्शन’ संशोधन पद्धतीत विषाणूत कोणते
बदल केले तर त्याचा संसर्ग वेगाने होईल, त्यातले कुठले जीन बदलले तर तो मनुष्यासाठी जीवघेणा ठरेल, अशा प्रश्नांची उत्तरं प्रयोगांमधून शोधली
जातात. असं संशोधन अत्यंत धोकादायक आहे आणि अनेकांनी वेळोवेळी अशा प्रकारच्या संशोधनाला
बंदी घालावी अशी मागणी केली आहे; मात्र तरीही ते संशोधन सुरू राहिलं आहे.
विषाणूंवर
‘गेन ऑफ फंक्शन’ संशोधन करणार्या वुहानमधील प्रयोगशाळेतून सार्स-कोव्ह २ विषाणूची
गळती झाली अशी शंका घेणं हे अमेरिका आणि चीनच्या सरकारांना, तसंच ‘इकोहेल्थ अलायन्स’ या संस्थेलाही
महागात पडणारं होतं. त्यामुळे या सर्वांनी पहिल्यापासून सार्स-कोव्ह २ विषाणूची गळती
प्रयोगशाळेतून झाली असू शकते याचं खंडन केलं होतं.
अमेरिकेचे
तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्स कोव्ह-२ चीनमधील प्रयोगशाळेतील
गळतीमुळे पसरल्याचा आरोप एप्रिल २०२० मध्येच केला होता; मात्र, अमेरिकेच्या डयरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सने लगेचच त्यांच्या या विधानाचं
खंडन केलं. शिवाय,
कोरोनाला
संपवण्यासाठी ब्लीच प्यायचा सल्ला देणार्या ट्रम्प यांचं विधान शास्त्रज्ञ समुदाय
गंभीरपणे घेणं शक्य नव्हतं.
पण आता
अमेरिकी इंटेलिजन्सला मागील महिन्यात प्राप्त झालेल्या अहवालात अशी माहिती मिळाली, की नोव्हेंबर २०१९ मध्ये कोव्हिड-१९ चा
पहिला रुग्ण सापडला हे अधिकृतपणे जाहीर होण्याच्या आधी वुहान येथील इन्स्टिट्यूट ऑफ
व्हायरॉलॉजीचे काही शास्त्रज्ञ श्वसनसंस्थेशी संबंधित रोगाने आजारी पडले होते. या रोगाची
लक्षणं कोव्हिड-१९ च्या लक्षणांशी मिळतीजुळती होती.
सार्स-कोव्ह
२ विषाणू प्रयोगशाळेत निर्माण झाल्याचीही शक्यता आहे असं शास्त्रज्ञांना का वाटू लागलं? त्यामागे काय तर्क आहेत हे समजून घेण्यासाठी
मॉलिक्युलर बायॉलॉजी (रेण्वीय व पेशीजीवशास्त्र)मधील काही संकल्पना समजून घ्याव्या
लागतील.
सार्स-कोव्ह
२ हा कोरोना व्हायरस गटातील विषाणू आहे. वटवाघळांमध्ये आढळणार्या विषाणूंपासून हा
तयार झाला आहे. याच गटातील विषाणूंमुळे २००२ साली सार्स व २०१२ साली मर्स हे साथीचे
रोग उद्भवले होते. कोरोना व्हायरस गोलाकार असतो आणि त्याचा पृष्ठभाग स्पाइक प्रोटिन
(आरी किंवा गुच्छाच्या आकारातील प्रथिनं) आच्छादित असतो. त्याचा पृष्ठभाग मुकुटासारखा
(इंग्रजीमध्ये कोरोना) दिसतो म्हणून त्याचं नाव कोरोना व्हायरस आहे. मानवी पेशींशी
जोडले जाऊन त्यांना संसर्गित करण्यात हे स्पाइक प्रोटिन महत्त्वाची भूमिका बजावतात.
सार्स-कोव्ह २ मधील स्पाइक प्रोटिन मानवी पेशीच्या (ऍंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम)
एसीई२ रिसेप्टरशी जोडला जातो. पण पेशीत प्रवेश करण्यासाठी आणखी एक गोष्ट घडावी लागते.
स्पाइक प्रोटिनचे साधारण मध्यभागी दोन तुकडे व्हावे लागतात. ते घडल्यावरच अनेक जैवरासायनिक
अभिक्रियांच्या मदतीने विषाणू यजमान पेशीत प्रवेश करू शकतो. स्पाइक प्रोटिनमध्ये १२००हून
जास्त अॅमिनो अॅसिड्सची साखळी असते. फ्युरिन नावाचे यजमान पेशीतील विकर (एन्झाइम)
ही साखळी तोडण्यास मदत करतात. ही साखळी तुटणं जितकं कार्यक्षम तितका संसर्गाचा वेग
जास्त.
जेव्हा
एखादा विषाणू वन्य प्राण्यांकडून मनुष्याकडे येतो तेव्हा अनेकदा आणखी एखाद्या प्रजातीमार्फत
हा प्रवास होतो. उदाहरणार्थ, सार्सचा विषाणू वटवाघळांकडून पाम सिवेटमध्ये आला आणि त्यानंतरच्या म्युटेशनमुळे
मनुष्यात संसर्ग निर्माण करणारा विषाणू तयार झाला. मर्ससाठी हा मध्यस्त प्राणी उंट
होता. नैसर्गिकपणे मनुष्यापर्यंत विषाणू पोचण्याची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने होत
असते. अनेक म्युटेशन्स घडून त्यातून मनुष्याला संसर्ग करणारा विषाणू तयार होतो. याच्या
खाणाखुणा त्या विषाणूच्या जीनोमची आणि त्यासदृश इतर विषाणूंच्या जीनोमशी तुलना केल्यास
दिसून येतात. जीनोममध्ये जशा विषाणू नैसर्गिकपणे निर्माण झाल्याच्या खुणा दिसतात तशाच
मानवनिर्मित विषाणूच्या जीनोममध्येही या खुणा दिसतात. परंतु जसजसं जेनेटिक इंजिनियरिंगचं
तंत्र प्रगत होत चाललं आहे तसतशा या खुणा पुसट होत चालल्या आहेत.
सार्स-कोव्ह-२
मध्ये ही साखळी तुटण्याचं ठिकाण नेमकं सर्वाधिक कार्यक्षमपणे साखळी तुटेल अशा ठिकाणी
आहे. सार्स-कोव्ह-१ च्या विषाणूमध्ये ते दिसत नाही. ही बाब फारच आश्चर्य वाटण्यासारखी
आहे. कारण नैसर्गिक उत्क्रांतीमधून असं होणं अशक्य नसलं तरी तशा शक्यता खूप कमी आहेत.
एवढ्या माहितीवरून नक्की कुठलाच निष्कर्ष काढता येणार नाही हे खरं, पण हा विषाणू प्रयोगशाळेत बनलेला नाही, ही शक्यताही त्यामुळे सहजी खोडून काढता
येणार नाही.
हा विषाणू
नैसर्गिकपणे निर्माण झाला नाही
याकडे
बोट दाखवणारी काही निरीक्षणं
सार्स, मर्स व सार्स-कोव्ह-२ हे सर्व बीटा-कोरोना व्हायरस कुळातील आहेत. सार्स
व मर्स विषाणू ज्या मध्यस्थ यजमान प्राण्याकडून (अनुक्रमे पाम सिवेट आणि उंट) आले त्यांचा
शोध अनुक्रमे चार व नऊ महिन्यांत लागला. आज अनेक शास्त्रज्ञ प्रामुख्याने सार्स-कोव्ह
२ संबंधी संशोधन करत असूनसुद्धा दीड वर्षाहून अधिक काळ लोटला तरी सार्स-कोव्ह-२ साठीचा
मध्यस्थ यजमान सापडलेला नाही.
जर या विषाणूने वटवाघळांवरून थेट मनुष्यावर
उडी घेतली असं मानलं, तरी
डिसेंबरच्या २०१९ च्या आधी सार्स-कोव्ह-२ सदृश विषाणूमुळे मनुष्यात न्यूमोनियासारखे
आजार झाल्याच्या नोंदी मिळायला हव्यात. नैसर्गिक उत्क्रांती सावकाश होते, त्यामुळे अचानक सार्स-कोव्ह-२ ला त्याचं
सध्याचं रूप मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. परंतु अशा नोंदी चीनमध्ये मिळालेल्या नाहीत.
तसे कुणी रुग्ण आढळलेच नसतील, किंवा चीनने ही माहिती नोंदवली नसेल, किंवा नोंद केली असल्यास उपलब्ध करून दिली नसेल, अशाही शक्यता आहेतच.
मार्च २०२० मध्ये अँडरसन आणि त्यांच्या
सहकार्यांनी ‘नेचर मेडिसिन’मध्ये लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे, की सार्स-कोव्ह २ च्या जीनोममध्ये तो मानवनिर्मित
असल्याच्या कुठल्याही खुणा आढळल्या नाहीत. शास्त्रज्ञांच्या या विधानाला असलेला वैज्ञानिक
आधार अपूर्ण आहे. जीन कापून जोडायच्या पूर्वीच्या पद्धती प्रगत नव्हत्या. त्याच्या
खूप सहज ओळखता येतील अशा खुणा दिसत असत. मात्र, जीन संपादनाचं तंत्र प्रगत झाल्यामुळे सहज ओळखता येण्यासारख्या खुणा आढळत
नाहीत. संशोधकांनी केलेला अभ्यास या सहज न दिसणार्या खुणा शोधण्यासाठी पुरेसा नाही.
अँडरसन आणि सहकारी त्यांच्या संशोधनात असंही म्हणतात, की स्पाइक प्रोटिन एसीई २ रिसेप्टरला जोडले
जाण्यासाठी सर्वोत्तम नाही. कुणी प्रयोगशाळेत विषाणू तयार केला असता तर त्यांनी स्पाइक
प्रोटिन एसीई २ रिसेप्टरला जोडले जाण्यासाठी जी सर्वोत्तम संरचना असू शकते तिची रचना
केली असती. पण निकोलस वेड यांचं म्हणणं असं आहे, की मुळात शास्त्रज्ञ कॅल्क्युलेशन करून स्पाइक प्रोटिनची रचना करतात हे
गृहीतकच चुकीचं आहे. विषाणूने ज्या पेशींना संसर्गित करणं अपेक्षित आहे त्यांना लक्ष्य
पेशी म्हणतात. विषाणू लक्ष्य पेशींना कसे कसे जोडले जात आहेत याचं निरीक्षण करून विषाणूंच्या
पुढच्या पिढीतील सर्वाधिक कार्यक्षमपणे लक्ष्य पेशींशी जोडले जाणारे व्हेरियंट निवडून
ते लक्ष्य पेशींच्या पुढच्या नमुन्याला संसर्गित करण्यासाठी वापरले जातात. ही क्रिया
अनेक वेळा करून शेवटी सर्वाधिक संसर्ग करणारा व्हेरियंट निवडला जातो. या व्हेरियंटच्या
स्पाइक प्रोटिनची संरचना कॅल्क्युलेशन केलेल्या सर्वाधिक इष्टतम संरचनेपेक्षा कमी कार्यक्षम
असू शकते. त्यामुळे अँडरसन आणि सहकार्यांचा हा तर्क अपुरा आहे असं म्हटलं जात आहे.
आणखी एका निरीक्षणातून महत्त्वाचा संकेत मिळतो. स्पाइक प्रोटिनची साखळी ज्या ठिकाणी फ्युरिन विकराच्या मदतीने तुटते, ते ठिकाण मनुष्याच्या पेशीला संसर्गित करण्यास सर्वोत्तम आहे. वटवाघळांना संसर्गित करणार्या सार्स-कोव्ह २ ला सर्वांत जवळच्या असणार्या विषाणूमध्ये ही संरचना आढळत नाही, पण स्पाइक प्रोटिनच्या संरचेनेतील केवळ एवढाच भाग मनुष्याला संसर्गित करणार्या इतर कोरोना व्हयरससदृश आहे. म्हणजे जणू काही वटवाघळात दिसणार्या विषाणूच्या स्पाइक प्रोटिनमध्ये केवळ मनुष्याला संसर्गित करण्यासाठी तेवढाच बदल केल्यासारखा. असा बदल नैसर्गिकपणे होण्याची शक्यता खूप कमी असल्याचं मानलं जातं. निकोलस वेड यांच्या लेखात त्यांनी नोबेल पुरस्कारप्राप्त विषाणुतज्ज्ञ डेव्हिड बाल्टिमोर यांचं मत नमूद केलं आहे. बाल्टिमोर म्हणतात, ‘फ्युरिनमुळे स्पाइक प्रोटिन ज्या ठिकाणी तुटतं, ते पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की या संरचनेतच सार्स-कोव्ह-२ च्या उगमाचा निश्चितपुरावा मिळू शकेल.’ एका नोबेल पुरस्कारप्राप्त विषाणुतज्ज्ञाकडून आलेलं हे विधान फार महत्त्वाचं आहे.
करंट सायन्स या मासिकात भारतीय विज्ञान
संस्थेचे पूर्वीचे संचालक आणि जैवरसायनशास्त्रज्ञ पद्मभूषण पी. बलराम यांनी सार्स-कोव्ह-२
च्या उगमाविषयी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे, ‘विषाणू लक्ष्य पेशीशी जोडला जाणं (स्पाइक प्रोटिन एसीई २ रिसेप्टरशी जोडलं
जाणं) भौतिकशास्त्रीय घडामोडींवर अवलंबून असतं, पण विषाणूचा पेशीत प्रवेश रासायनिक प्रक्रियांवर (फ्युरिनमुळे स्पाइक
प्रोटिनची साखळी तुटणं) अवलंबून असतो. ढोबळपणे सांगायचं, तर या संदर्भात भौतिकशास्त्रीय घडामोडी
रासायनिक अभिक्रियांपेक्षा जलद असतात. विषाणूचा पेशीत प्रवेश जलद करण्यासाठी या दोन्हींतली
मंद प्रक्रिया जलद करण्याचा विचार कुणी नक्कीच करू शकतो.
हे व
असे अनेक तर्क पुढे आल्याने आता सार्स-कोव्ह-२ च्या उगमाच्या सर्व शक्यता लक्षात घेणं
आवश्यक बनलं आहे. भविष्यात कुठल्या रोगाचा उद्रेक होऊ नये आणि झाल्यास त्याच्याशी सामना
करण्यास आपण सक्षम असायला हवं यासाठी हा शोध घेणं अत्यावश्यक आहे. मे २०२१ मध्ये काही
शास्त्रज्ञांचं ‘सायन्स’ या नियतकालिकात एक पत्र प्रकाशित झालं. त्याचा आशय असा होता, की सार्स-कोव्ह-२ विषाणू प्रयोगशाळेत निर्माण
झाला की नैसर्गिकपणे निर्माण झाला या दोन्ही शक्यता ध्यानात ठेवून आपण माहिती व पुराव्यांचा
काळजीपूर्वक अभ्यास करायला हवा. याबाबतची तपासणी पारदर्शक, वस्तुनिष्ठ व माहितीच्या आधारे करावी.
थोडक्यात, गेलं वर्षभर हा विषाणू प्रयोगशाळेत तयार
झाला असणं शक्य नाही असं जगाला छातीठोकपणे वाटत होतं, ती खात्री आता डळमळीत झाली आहे. कुठल्याही
बाजूचे ठोस पुरावे मिळाल्याशिवाय कोणताही दावा करता येणार नाही हे स्पष्ट आहे. शिवाय
हा विषाणू प्रयोगशाळेत तयार झाला असेल असं सिद्ध झालं तर पुढे काय, हा वेगळाच मुद्दा.
- आरती हळबे
( आरती हळबे इंजिनियर असून गेली पाच वर्षं सायन्स कम्युनिकेटर म्हणून कार्यरत आहेत.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा