लेखकाचा मृत्यु : जयंत पवार
१. आरसे
कधी तरी हे होणारच होतं. लोकांनी ठरवून देशातले सगळे आरसे फोडले. लक्षात घ्या, हा छोट्या गोष्टींकडून मोठ्या गोष्टींकडे सरकणारा काळ आहे. लेखकांनी लघुकथेकडून दीर्घकथेकडे सरकायला हवं. कवींनी चतकोर काव्याचे तुकडे जुळवत बसण्यापेक्षा खंडकाव्य लिहायला घ्यावं. पण आरसेच फोडले गेल्याने त्यांची पंचाईत झालीय.
पण हे होणारच होतं. आरशांची निर्मितीच इतकी बेसुमार झाली होती की त्यांच्या विरोधात कधी तरी अशी प्रतिक्रिया उमटणारच होती. आरशांच्या निर्मितीचा कालखंड हा देशाच्या इतिहासातला छोट्या गोष्टींचा कालखंड आहे. नितांत रमणीय किंवा रोमँटिक पीरियड नावाने साहित्यात त्याची दखल घेतली गेली आहे. पण आरसेच इतके निर्माण झाले की लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ लागली. आपण आरशासमोर तल्लीन होऊन उभं राहावं, पण त्याच वेळी आपल्या मागे कोणी तरी त्याच्या समोरच्या आरशात बघत उभं राहिलेलं असावं आणि त्याची प्रतिमा मागूनपुढू न आपल्या आरशात घुसावी, असं वारंवार होऊ लागलं. आणि केवळ मागेच नव्हे, तर डाव्या उजव्या बाजूला असलेली आरशात बघणारी माणसंही तल्लीनतेचा भंग करू लागली. पुढे पुढे तर शेजारीच नव्हे, तर सरळ-आडव्या- तिरक्या- वक्राकार अशा सर्व अंगांनी माणसं आरशात बघताना दिसू लागली. आरशाच्या कारखानदारांनी आरशांच्या लाद्या आणि आरशांचं छतदेखील बनवलं.
शेवटी हे प्रकरण अशा थराला गेलं, की आरशात बघण्याची अर्थपूर्ण क्रिया लोकांना निरर्थक वाटायला लागली आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे आरसे फोडले. लोकांना कुठेच बघायचं नव्हतं इतके ते उद्विग्न झाले होते, संतापले होते. त्यांनी सर्वप्रथम लेखकांची दुकानं बंद केली. अनेकांनी स्वत:हूनच दुकानाच्या फळ्या बंद केल्या. काही नावाजलेल्या लेखकांचे मॉल होते. तिथे शिरल्यावर वाटायचं, जणू आरसेमहालातच आलोय. अनेक शोभिवंत दिवे, झुंबरं आली. अनंत प्रतिमा परावर्तित करणार्या कलात्मक वस्तू यांची एक लकाकती दुनिया तिथे साकार झाली होती. लोकांनी त्या मॉलना आगी लावल्या. सगळ्यांना पिटाळून लावलं.
एक लेखक एकटा होता. त्याचं ना दुकान होतं ना मॉलमध्ये गाळा. तो दिवसभर फिरून आल्यावर आपल्याच घरात बसून लिहायचा. त्याच्या पेनाच्या शाईत पारा मिसळलेला होता असं म्हणतात. त्याने या आरसेफोड आंदोलनाला जिवाच्या आकांताने विरोध केला. रस्त्याच्या मधे उभा राहून तो मोठमोठ्याने बोलायला लागला. हा एक त्याचा वेडेपणाच झाला. त्याचं फळ त्याला लागलीच मिळालं. लोकांनी त्याची खांडोळी करून त्याला भर चौकात फेकून दिलं.
असे सर्व आरसे फोडून झाल्यावर लोक शांत झाले. आता त्यांना एकमेकांची तोंडंही बघायची नव्हती.
पण शांत होत गेलेल्या लोकांना कालांतराने स्वत:चे चेहरे बघायची मात्र इच्छा होऊ लागली; पण ते बघायचे आता दोनच पर्याय शिल्लक होते. एक तर दुसर्याच्या डोळ्यात किंवा पाण्यात. पण अनेकांचे डोळे लाल तांबूस किंवा पांढरे झालेले होते. अनेकांच्या डोळ्यांच्या बाहुल्या स्थिर राहत नव्हत्या. डोळ्यांवर झापड येत होती अनेकांच्या. अनेकांच्या पापण्यांचे केस झडून डोळ्यांत पडून खाज सुटत होती.
मग सगळ्यांनी पाणथळ जागांचा, नद्या-विहिरी- नाल्यांचा आणि तलावांचा शोध घेतला. अलीकडे अनेक जथ्थे ओणवून पाण्यात बघताना जागोजाग दिसतात. ज्याला त्याला स्वत:ला पाहायचं आहे; पण आपली प्रतिमा सापडण्यात अडचण येते आहे.
शिवाय विहिरी-तळी-नद्या कोरड्याठाक पडलेल्या दुष्काळी प्रदेशातल्या लोकांनी काय करायचं, उद्योगधंद्यांनी सोडलेल्या सांडपाण्याने गढूळ झालेल्या नाल्यांच्या शहरातल्या लोकांनी काय करायचं, पर्जन्यछायेतल्या पूरग्रस्त भागातल्या लोकांनी काय करायचं, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्यांची उत्तरं अजून सापडलेली नाहीत.
२. उपकथानक
उपरोक्त कथेला एक उपकथानक आहे. खरं म्हणजे अशी असंख्य उपकथानकं आहेत, जी एकमेकांना जोडून बृहद्कथा रचायला हवी; परंतु सगळे लेखक पळाल्यामुळे ती रचायची कोणी, हा मुदलातला प्रश्न आहे. आणि मी एक छोटा लेखक आहे व ढुंगणाला पाय लावून पळायची पाळी माझ्यावर केव्हाही येऊ शकते. म्हणून जाता जाता त्रोटक ओळींमध्ये मी ही गोष्ट नोंदवतो आहे.
गोष्ट अशी, की ज्या लेखकाची खांडोळी करून त्याला भर चौकात फेकून दिलं त्याचे प्राण बराच काळ फडफडत होते. जमाव निघून गेल्यावर काही चिडलेले लेखक तिथे जमा झाले आणि म्हणू लागले, तो मरणार नाही. तो पुन्हा जिवंत होईल आणि लिहील. लेखक कधी मरत नसतो.
आणि काय आश्चर्य! लेखकाचे सात तुकडे केले होते, त्या प्रत्येक तुकड्याने जिवंत होऊन जीव धारण केला. आजच्या युगातला हा महान चमत्कारच म्हटला पाहिजे. तो पाहून धन्य झालेले लेखक माना डोलवून आपापल्या वाटेने निघून गेले. आता एका लेखकापासून पुनर्जीवित झालेले सात लेखक उठून उभे राहिले; पण त्यांना फार काळ उभं राहता येईना. कारण त्यांची हाडं मऊ-मुलायम-लवचिक होती. शिवाय त्यांना बोलता येत नव्हतं. एकमेकांना ते ओळखू शकत नव्हते. त्यामुळे थोड्या वेळाने ते सरपटत सात वाटांनी निघून गेले.
याची व्हिडिओ क्लिप माझ्याजवळ आहे. ती व्हायरल केली तर हाहाःकार माजेल; पण त्याने नक्की कुणाचा फायदा होईल हे मला कळत नाही.
३. जळीत
परवा एका लेखकाने आत्महत्या केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. तो माझा मित्र होता. तो जळून मेला. म्हणजे त्याने जाळून घेतलं. स्वत:हून प्राचीन काळात लोक अग्निदिव्य वगैरे करायचे हे तुम्हाला ठाऊक असेल; पण ते त्यातून बाहेर पडण्यासाठी. माझ्या लेखक मित्राला त्या अग्नीतून बाहेर पडायचं नव्हतं. त्याने मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्यात आपण स्वेच्छेने मरत आहोत, आपल्या मृत्यूसाठी कुणासही कारणीभूत धरू नये, असं स्पष्ट लिहिलं होतं. शिवाय आपल्या अंत्यसंस्कारांसाठी लागणारे पैसे त्याने एका पाकिटात घालून ते बिछान्यावर उशीखाली व्यवस्थित ठेवून दिले होते. तसं त्याने त्या चिठ्ठीतही नमूद केलं होतं.
लेखक फार आनंदी नव्हता, तरी दु:खीही नव्हता. तो आमच्यात असायचा. हसायचा, बोलायचा आणि अनेकदा नसायचाही. किती तरी वेळा तो एकट्याने मस्त तंद्रित फिरताना दिसायचा. त्याने कुणाला लळा लावला नसला किंवा कुणाचा लळा लावून घेतलेला नसला, तरी तो जेव्हा फिरताना दिसायचा तेव्हा त्याचा आगे-मागे चार-पाच भटकी कुत्री फिरताना दिसायची. या कुलंगी कुत्र्यांना तो नेमाने बिस्किटं खाऊ घालत असे. बदल्यात ती त्यालाचाटत असत, तेव्हा हा आपणहून आपला तळवा, मनगट त्यांच्यापुढे धरत असे.
लेखक मेला त्याच्या आदल्या रात्री आमच्या मैफलीत बसून, गप्पा मारून पिऊन वगैरे गेला होता. त्यामुळे दुसर्या दिवशी पहाटे त्याने जाळून घेतलं, हे आम्हाला भयंकर धक्कादायक वाटलं.
नेहमीप्रमाणे झोप पूर्ण झाल्यावर तो उठून शांतपणे बाथरूममध्ये गेला. त्या दिवशी त्याने रॉकेलने अंघोळ केली आणि शांतपणे काडी पेटवून सर्वांगावर फिरवली. कातडीने भुरूभुरू पेट घेतला, पण याचं हूं नाही की चूं. तो जळत होता. धूर जमा होत खिडक्यांच्या फटींतून बाहेर पसरू लागला तशी बाहेर इमारतीलगत झोपलेली कुत्री जागी झाली. त्यांना लेखकाच्या कातडीचा वास आला की काय कोण जाणे, पण त्यांनी भुंकून भुंकून इतका उच्छाद मांडला की अख्खी इमारत जागी झाली. आगीचा संशय येऊन सगळे धावले. त्यांनी लेखकाचं दार तोडलं. आत घुसून बाथरूमचा दरवाजा उखडला. अर्धा जळलेला लेखक त्यांनी बाहेर काढला. त्याच्यावर बदाबदा पाण्याच्या बादल्या ओतल्या. त्याचा देह जाड चादरीमध्ये गुंडाळला. अॅम्ब्युलन्स बोलावली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेला. तिथे लेखकाचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; पण तो इतका भाजला होता की शेवटी दुपारी तो मेलाच.
त्या संध्याकाळी आमची मैफल बसली होती. मी माझ्या डॉक्टर मित्राला विचारत होतो, “जळल्यावर किती यातना होतात?”
तो म्हणाला, “त्वचा जळून आग हाडांमध्ये शिरेपर्यंत दाह होतो, पण त्यानंतर काहीच जाणवत नाही. अर्धवट जळलेल्याची मात्र असह्य तडफड होते.”
म्हणजे लेखकाला वाचवणार्यांनी त्याची तडफड वाढवली की काय? शांतपणे धीराने, मरणाला सामोरा जाणार्याला वाचवायची मूर्ख खटपट करून त्याच्या वेदना या लोकांनी वाढवल्या आणि आपल्या खटपटीच्या कथा तिखट मीठ लावून सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. ज्यांनी आयुष्यभर लेखकाची बिस्किटं खाल्ली ती कुत्रीदेखील अखेरच्या क्षणी बेइमान झाली. आपण सगळेच साले बेअक्कल आहोत. मी हे म्हणालो तेव्हा डॉक्टर माझ्या ग्लासात पेग ओतत म्हणाला, “यू आर राइट!”
या गोष्टीचादेखील कसा अर्थ लावायचा हे मला नक्की कळलेलं नाही; पण लेखक असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्याचा किडा माझ्यात आहेच ना! त्याचं काय करायचं?
४. गंमतच !
लेखक मेला आहे, हे त्याने लिहिल्यावरच शेवटी लोकांना कळलं.
५. प्रकाश
तो पावसाळी रात्री वीज गेलेल्या रस्त्यावरून घनघोर अंधारात एकटाच चालत होता. आडव्या-तिडव्या वाहणार्या सोसाट्याच्या वार्याबरोबर धुवांधार पावसाचे बाण सपासप चेहर्यावर, अंगावर बसत असल्याने तो बधिर झाला होता. एका महामार्गावरून आपण चालत असल्याचं भान त्याला नव्हतं. अधनंमधनं सूंऽऽ सूंऽऽ करत प्रकाशाचे झोत टाकत जाणार्या गाड्यांचंही अस्तित्व त्याला जाणवत नव्हतं. मनाच्या तळघरात असंख्य कल्पना वळवळत पडल्या होत्या. त्यांना वर येण्यासाठी उजेड सापडत नव्हता. अखंड तगमगीत तो न संपणार्या अंधारात आत आत शिरत पुढे चालला होता, तोच दिव्यांचा एक प्रखर झोत त्याच्यावर येऊन आदळला. दिव्य तेजाचा तो झोत त्याच्या डोळ्यांत इतका आरपार शिरला की त्याचं अंतरंग आरपार उजळून निघालं. असा तेजोमय क्षण त्याने कधी अनुभवला नव्हता. ज्या साक्षात्कारी क्षणाची तो वाट पाहत होता तो क्षण अकस्मात येऊन त्याच्यावर आदळला; पण त्यानंतर तो उरला नव्हता.एक अजस्र ट्रक त्याला ओलांडून धडधडत पुढे निघून गेला.
६. लेखक बचाओ!
लेखक जगायला हवे आहेत, त्यांनी मरता कामा नये; ही प्रजाती मेली तर संस्कृतीच्या विकासक्रमात बाधा येईल, हे शेवटी सरकारला उमगलं आणि यावर उपाय शोधण्यासाठी व्यापक स्तरावर एक बैठक बोलावण्यात आली, ज्यात मंत्रिगण, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, पोलिस, विशेष सुरक्षा बले, आपत्ती निवारण तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, वकील, न्यायमूर्ती, अभियंते, तंत्रज्ज्ञ, साधू महंत, ज्योतिषी, व्यापारी, उद्योजक, उद्योगपती अशा मान्यवरांचा समावेश होता. बैठकीत असंख्य सूचना- उपसूचना, प्रस्ताव, योजना यांचा पाऊस पडला. त्यांची इथे नोंद घेणे शक्य नाही. मात्र, जो अंतिम मसुदा तयार झाला त्यातल्या ठळक बाबी मांडणं क्रमप्राप्त आहे.
उदाहरणार्थ, लेखकांनी धीर सोडू नये याकरिता त्यांना प्रोत्साहन देणारे, उत्तेजित करणारे फलक जागोजागी लावावेत. हे प्रोत्साहन देणारी माणसं कोण आहेत, किती उच्च पदावरची आहेत व त्यांच्या मनात लेखकांविषयी किती आस्था आहे हे ठळकपणे त्यांच्या लक्षात यावं, अशी फलकांची मांडणी असावी. आपल्या लेखनाने वाद वा गैरसमज निर्माण होणार आहेत असं वाटल्यास त्याची लेखकांनी पोलिसांना आगाऊ कल्पना द्यावी, जेणेकरून त्यांच्या संरक्षणाची त्वरित व्यवस्था करण्यात येईल. पोलिस यंत्रणेत यासाठी वेगळा सेल निर्माण करण्यात येऊन लेखकांच्या सुरक्षेसाठी शिपाई नेमण्यात येतील, जे तक्रार नोंदवल्यापासून अर्ध्या तासाच्या आत लेखकाच्या दारात हजर होतील. लेखकासोबत शस्त्रधारी शिपाई सावलीसारखे असतील आणि लेखकाच्या प्रत्येक गोष्टी जातीने तपासून घेतील, कृती निरखतील, प्रसंगी हस्तक्षेप करतील, उदा. लेखकाला येणारी पत्रं वाचून त्यात लेखकास धमकी वगैरे नाही ना, याची खात्री करूनच त्यास सुपूर्द केली जातील. लेखक जिथे जाईल त्याच्या आधी त्या स्थळी शिपाई पोचून तिथली झडती घेतील. सर्व लेखकांच्या घराच्या दरवाज्यांना आणि खिडक्यांच्या चौकटींना जाळ्या बसवण्यात येतील.
लेखकांनी त्यांच्या रक्षणार्थ चालवण्यात येणार्या महाअभियानास स्वत:च्या वर्तनाने सहकार्य करावे, उदा. त्यांनी सदैव प्रसन्न राहावे. स्वच्छ व सौम्य रंगाचे कपडे परिधान करावे. नखे कापावीत, केस कापावेत. चेहर्यावर नेहमी स्मायली ठेवावी. विनाकारण उत्तेजित करणारे तामसी पदार्थ भक्षण करू नयेत. त्यांच्यासाठी तयार केलेल्या सात्त्विक आहाराच्या यादीतील व्यंजनं आहारात ठेवावीत. सात्त्विक खाण्याने विचारांतही सात्विकता येते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे अभिव्यक्तीत नेमस्तपणा येतो. लेखक हे सांस्कृतिक सभ्यतेचे वाहक आहेत. ही सभ्यता समाजात झिरपण्यासाठी त्याची सुरुवात आपल्यापासूनच झाली पाहिजे, याचे भान लेखकांनी बाळगावे. कारण तेच खरे समाजाचे आदर्श आहेत. समाज लेखकास प्रेमादर देत असतो, त्यामुळे लेखकाने समाजाची भीड बाळगावी. भिडस्तपणा हा सभ्यतेचा भाग आहे. भय हा मानवी उत्क्रांतीला सर्वांत उपयुक्त गुणधर्म आहे. कारण भीतीपोटीच मानवसमाज वाढत गेला आहे व त्याने आपल्या संरक्षणाच्या नवनव्या व्यवस्था तयार केल्या आहेत. साहजिकच लेखकांच्या अस्तिवाचे प्रश्न उग्र होत असताना ही भीती नष्ट होण्यापासून त्यांना तारू शकते. शरीरातील रसायनांमध्ये भीतीची मात्रा वाढवण्यासाठी विशिष्ट संप्रेरकं तयार केली गेली आहेत, त्यांची लस लेखकांनी नियमित टोचून घ्यावी. लेखकांनी त्यांना दिली जाणारी सरकारी ओळखपत्रं प्राणपणाने जपून ठेवावी व अशी ओळखपत्रं असणार्यांसाठी आखण्यात आलेल्या सवलत योजना, पुरस्कार योजनांचा लाभ घ्यावा. लेखकांनी उदात्त विचार करावेत. भव्य स्वप्नं पाहावीत. थोर विभूती आपल्या समाजात असतातच, त्यांचा शोध घेऊन त्यांची चरित्रं लिहावीत. ज्या विभूती लेखकांचा शोध घेत स्वत:हून त्यांच्यापाशी येतील त्यांचा आदर राखावा. ‘प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे. प्रेमलाभे प्रेमळाला’, हे ध्यानी ठेवून तशीच वृत्ती राखावी. तरीही समाजातील काही गोष्टींनी चित्त विचलित होत असेल तर ध्यानधारणा करावी. अमंगल विचार मनी आले तर उपोषण करावे. भांडू नये, तंटू नये. समाधानी असावे. लेखक स्वप्नाळू असतात. त्यांना कल्पकतेचं वरदान असते. त्याचा लाभ घेत भिकार वास्तवाकडे न पाहता त्यांनी अंत:चक्षू आत वळवावेत व कल्पनेचे मनोराज्य उभं करावं जे सर्वांप्रति आदर्श असेल. आपल्या परंपरेत लेखकांनी एका जन्मात अनेक जन्म घेतल्याची थोर उदाहरणं आहेत. ती पाहता लेखक स्वर्गमृत्युलोकपाताळ असे त्रिस्थळी भ्रमण करू शकतात. त्यांनी तसे करावे. राजेराण्यापर्याअप्सरांच्या दिव्य कथा, शृंगारिक कहाण्या आणि भव्योदात्त त्यागाचे सर्ग रचावेत. (शृंगारिक कहाण्यांच्या प्रदेशात लेखिकांना प्रवेश वर्ज्य आहे हे ध्यानी ठेवावे.) यासाठी वारंवार निद्रादेवीच्या कुशीत शिरून आपले कल्पनेचे साम्राज्य चेतवावे. लेखकांनी कलियुगाचा मोह टाळून द्वापारत्रेतासत्ययुगात जावे. आनंदाचे गाणे गावे. सुखाने नाचावे. प्रभूचे गुणगान गावे... याच्या पुढची ओळ लिहून खोडली होती. ती महत्त्वाची असावी आणि त्यावर विवाद झडले असावेत असे वाटून आम्ही ती महत्प्रयासाने आधुनिक तंत्राने वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा दृश्यमान झाली. तिथे लिहिले होते - लेखकाने भोसड्यात जावे.
-जयंत पवार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा