एलियट हिगिन्स: नव्या काळाचा, नव्या माध्यमाचा पत्रकार - निळू दामले
अनुभव सप्टेंबर २०२१
पत्रकारितेची ठरीव चाकोरी मोडून जगाच्या पत्रकारी नकाशावर स्वतःच्या स्वतंत्र शैलीचा ठसा उमटवणार्या काही अवलिया पत्रकारांची ओळख करून देणारं सदर. फावल्या वेळात कुतुहलापोटी सुरू केलेल्या उद्योगातून इंटरनेटी जगतातले प्रसिद्ध पत्रकार बनलेल्या एलियट हिगिन्स यांच्याबद्दलचा हा लेख
एलियट हिगिन्स हे ब्लॉगर आहेत. त्यांचे ब्लॉग जगातले लाखो लोक वाचतात.
ब्लॉगिंगला पत्रकारी म्हणायचं की नाही? पत्रकारी म्हणजे
माहिती गोळा करणं, तपासून घेणं, संपादित
करणं आणि प्रसिद्ध करणं. सुरुवातीला माहिती कागदावर छापली गेली.
नंतर ती ऐकवली, दाखवली गेली. इंटरनेट आल्यावर आता माहिती कंप्यूटरच्या पडद्यावर दाखवली जातेय. एलियट हिगिन्स माहिती गोळा करतात- लोकांना भेटून,
हिंडून, पुस्तकं वाचून वगैरे. नंतर ती माहिती नेटचा वापर करून तपासून घेतात. मग ती
कंप्यूटरवर टाईप करून तो मजकूर कंप्यूटरवर ब्लॉगच्या रूपात प्रसिद्ध करतात.
म्हणजे कंप्यूटरमधली पत्रकारीच की.
एलियट हिगिन्स ब्रिटीश आहेत. श्रूजबरी हे त्यांचं जन्मगाव.
गावातच त्यांचं ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण झालं. बालवयातच कंप्यूटरचा नाद लागला. हिगिन्स दिवसभर कंप्यूटरवर
खेळ खेळत असे. आईवडील म्हणत, की मुलगा फुकट
गेलाय.
शिक्षण झाल्यावर काही काळ हिगिन्सनी एका फायनान्स कंपनीत प्रशासकीय
नोकरी केली. नोकरीही सर्वसाधारणच होती. तेवढ्यात त्यांचं लग्नही झालं.
त्याची तुर्की पत्नी नुरी नोकरी करत असे. बेकारी
ओढवल्यावर हिगिन्स घरातच असत. छोट्या मुलीचं संगोपन करणं आणि
वेळ मिळाली की लॅपटॉप उघडून गेम खेळणं, यु ट्यूबवर कार्यक्रम
करणं यात त्यांचा वेळ जात असे. मुलीचं संगोपन करतोय म्हटल्यावर
त्यांच्या पत्नीने त्यांचं सतत कंप्यूटरवर असणं सहन केलं असावं.
जगभरचं काय काय पाहणं आणि त्यावर मत व्यक्त करणं या नादात हिगिन्सनी ‘ब्राऊन मोझेस’
नावाचा स्वतःचा ब्लॉग सुरू केला. ते पर्यावरणवादी
होते. त्यांना राजकारण आवडत नसे. यू ट्यूब
पिढीतल्या हिगिन्सचं यू ट्यूबमुळेच पसरलेल्या अरब स्प्रिंगवर, तिथल्या तरुणांच्या आंदोलनावर लक्ष होतं. पण तरीही हिगिन्स
पोलिटिकल माणूस नव्हता.
२१ ऑगस्ट २०१३.
श्रूजबरीत सकाळ उलटली होती. हिगिन्स अजून अंथरूणातच होते आणि स्मार्टफोनवर
ट्वीटरवरच्या पोस्ट्स पाहत होते. ट्वीटरवर एकामागे एक पोस्टी
सांगत होत्या, की दमास्कसच्या उपनगरात रासायनिक हल्ला झालाय.
खूप माणसं मेलीयत. मेलेल्यांची बेरीज केली तर आकडा
हजारांत जात होता.
हिगिन्सनी यू ट्यूब उघडलं. रात्री अनेक व्हिडिओ येऊन पडले होते.
व्हिडिओ पाठवणारे हिगिन्सच्या परिचयाचे होते. व्हिडिओत
माणसं तडफडताना दिसत होती. त्यात प्रौढ होते, छोटी मुलं होती, कुत्रे होते, मांजरं
होती. एका व्हिडिओत एक वृद्ध माणूस श्वास घेण्याचा प्रयत्न करत
होता, त्याच्या तोंडातून फेस येत होता. एकामध्ये एका कुत्र्याचे पाठचे दोन पाय थरथरत होते आणि त्याच्या तोंडातून फेस
येत होता. एका व्हिडिओत एक छोटं तडफडणारं मूल मांडीवर घेऊन एक
माणूस मदतीसाठी आकांत करत होता.
असे दोनेकशे व्हिडिओ होते.
या व्हिडिओ क्लिप्स पहाणं हा हिगिन्सचा दैनंदिन उद्योग बनला. ट्विटरवर बातम्या
येत. फेसबुक, इन्स्टाग्रॅम आणि यु ट्यूबवर
आंदोलक फोटो आणि व्हिडिओ क्लिप टाकत. आंदोलनाच्या बाजूचे,
सरकारी अशा दोन्ही बाजूच्या हजारो पोस्टी येत असत. कोण कोण कसकशा पोस्टी टाकतं, त्यातली किती माहिती खरी
असते आणि कोणती प्रचारक खोटी असते याचा अभ्यास हिगिन्स करत असत. एखाद्या माहितीबद्दल शंका असेल, उगम माहीत नसेल किंवा
एखादी माहिती अपुरी असेल तर हिगिन्स तसं ब्लॉगवर लिहून संबंधितांना आवाहन करत असत,
की योग्य ती माहिती त्यांनी पाठवावी. त्यांच्याकडून
माहिती बरोबर असल्याचं पक्कं झालं की ते ती माहिती आपल्या ब्राऊन मोझेस या ब्लॉगवर
टाकत असत.
ट्वीटर सांगत होतं की हजारो माणसं मेलीयत. हिगिन्स चक्रावले.
व्हिडिओ क्लिप्समध्ये फार माणसं मेल्याचं दिसत नव्हतं. रासायनिक शस्त्रं आलं कुठून? कोणी टाकलं? रासायनिक शस्त्रं असतील तर ती कुठायत? ती कशी असतात?
या प्रश्नांनी हिगिन्सचं डोकं भणभणलं.
दमास्कसच्या झमालका या उपनगरात २१ ऑगस्टच्या पहाटे दोन वाजता रॉकेटं
कोसळली होती. आसपासची शेकडो माणसं घुसमटून मेली होती. महंमद अल जझारी
हा २७ वर्षांचा इंजिनियर तरुण सकाळी उठून बाहेर पडला तेव्हा त्याच्याच जवळच्या इमारतीच्या
एका भिंतीत एक रॉकेट रुतलं होतं, त्याचा स्फोट झाला नव्हता.
ते फुटलं का नाही आणि फुटल्यास त्याचा काय परिणाम होईल हे अल जझारीला
कळलं नाही. इतर कुठे अशी रॉकेटं आहेत काय ते पहायला तो बाहेर
पडला.
अल जझारी मशीदीजवळ पोचला. मशीदीच्या मागे कचर्याच्या ढिगात एक रॉकेट पडलेलं दिसलं. तेही फुटलं नव्हतं.
अल जझारीने हँडीकॅमने त्या रॉकेटची क्लिप केली आणि यू ट्यूबवर टाकली.
तिकडे हिगिन्सच्या लॅपटॉवर ती उघडली.
त्याच्याच काही तास इकडेतिकडे घुटा या गावातून व्हिडिओ क्लिप्स आल्या. दराया,
आद्रा, होम्समधून ट्वीट्स आले, चित्रं आली. हा दृश्य मजकूर पाठवणारी मंडळी आंदोलनातली
होती, कार्यकर्ते होते. गावात बाँब पडला,
रॉकेट कोसळलं, शेलिंग झालं की कार्यकर्ते जखमींना
मदत करण्यासाठी, मृतांची व्यवस्था लावण्यासाठी धावाधाव करत.
पण हे करत असताना पडलेला बाँब आणि रॉकेट, बाँब
पडल्यानंतर पडलेला खड्डा, शेलिंग झाल्यानंतर शेलचे तुकडे,
गोळ्यांच्या केसेस यांचे फोटो यू ट्यूबवर टाकत. ते तसेच फोटो आणि क्लिप्स होत्या.
त्यानंतर आठवडाभर हिगिन्स रात्रीची जेमतेम झोप घेत इंटरनेटवरून आलेल्या
क्लिप्स संकलित करून त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते. अल जझीराने पाठवलेलं
रॉकेटचं चित्र घुटामधून आलेल्या रॉकेटच्या चित्राशी जुळणारं होतं. म्हणजे एकाच प्रकारची रॉकेटं कोणी तरी सोडली होती. पण
ही हातभर लांबीची रॉकेटं कोणत्या प्रकारची आहेत ते हिगिन्सना कळत नव्हतं. त्यांनी रॉकेटची ही चित्रं अमेरिका, इस्रायल,
युके इत्यादी ठिकाणच्या जाणकार लष्करी अधिकार्यांना पाठवली आणि त्यांचा प्रकार काय, ती कुठे निर्माण
केली असतील, असा प्रश्न विचारला. हिगिन्सचा
हा उद्योग एवढा प्रसिद्ध झाला होता की त्यांचं म्हणणं सरकारांतले जनरल लोकं गंभीरपणाने
घेत. हिगिन्सनी स्वतंत्रपणे शस्त्रनिर्मितीची मॅन्युअल्स मिळवली;
दहशतवादी शस्त्रं कशी तयार करतात आणि वापरतात याचीही मॅन्युअल्स त्यांच्या
वेबसाईटवरून हस्तगत केली.
अलीकडे जगात शस्त्रं, रॉकेटं, विमानं,
बाँब इत्यादी गोष्टी मुळीच गुप्त नसतात. कार्यकर्ते,
उत्सुकता असणारी मंडळी सरकारांची गुप्तता फोडून ती सर्व माहिती गोळा
करतात आणि थेट इंटरनेटवर टाकतात. हिगिन्सनी या माहितीचं विश्लेषण
करण्याचं कसब मिळवलं होतं. त्यामुळे अमेरिका, सीरिया, इस्रायल, रशिया,
चीन, आयसिस, सौदी,
क्रोएशिया इत्यादी ठिकाणी शस्त्रं कशी तयार होतात, ती कशी चोरून किंवा अधिकृतपणे विकली जातात, इत्यादी गोष्टींची
माहिती हिगिन्सकडे गोळा झाली होती. हिगिन्सचा उत्साह,
हेतू आणि कष्टाची तयारी एवढी दांडगी की त्यांच्याजवळची माहिती सरकारांकडेही
नसे. सरकारं हिगिन्स काय म्हणताहेत ते पाहत.
दमास्कसमधे पडलेली रॉकेटं काय आहेत हे कोणालाच समजलेलं नव्हतं, हिगिन्सनाही.
त्यांनी ट्विटर, फोन, इन्स्टाग्रॅमचा
वापर करून त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला. घुटातल्या कार्यकर्त्याने जमिनीत रुतलेलं रॉकेट दाखवलं. हिगिन्सनी त्याला सांगितलं, की विविध कोनांतून त्याचे
फोटो काढ. सूर्याच्या किरणांमुळे रॉकेटची सावली जमिनीवर पडली
होती. त्यावरून हिगिन्सना वेळ कळत होती. त्यांनी गुगल मॅप्सचा वापर करून, सॅटेलाईट चित्रांचा
वापर करून त्या त्या रॉकेटची जागा निश्चित केली. जागा,
रॉकेटचा कोन यावरून ती रॉकेटं कुठल्या दिशेने आणि कुठून आली याचा अंदाज
त्यांनी लावला. रॉकेटं दमास्कसच्या उत्तरेला असलेल्या टेकड्यांवरून
येत होती. तिथे सीरियन लष्कराचा तळ आहे.
जमिनीत रुतलेलं एक रॉकेट बाहेर काढून दूर नेण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी
केला. स्काईपवर बोलताना हिगिन्सनी त्यांना सांगितलं की तसा उद्योग करू नका,
जमिनीच्या बाहेर काढलं तर स्फोट होईल. हिगिन्सना
रॉकेटं आणि भूसुरुंग कसे काम करतात ते माहीत होतं.
सर्व क्लिप्समधे वायू बाहेर पडल्याचं लोकं सांगत होती. संदर्भ गोळा
केल्यावर हिगिन्सना कळलं, की सारीन हा वायू वापरण्यात आला होता.
सारीनची बाधा झाल्यावर माणसांची तडफड कशी होते, ती कशी मरतात याचे तपशील त्यांनी अभ्यासले. हिटलरने दुसर्या महायुद्धात हा वायू वापरला आणि अमेरिकेने हाच वायू व्हिएतनाममध्ये वापरला
होता.
हिगिन्सनी त्या रॉकेटचं नाव ‘यू.एम.एल.ए.सी.ए.’
(अन-आयडेन्टिफाइड म्युनिशन लिन्क्ड् टू अलेज्ड्
केमिकल अटॅक्स) असं ठेवलं आणि अभ्यास सुरू केला. जगभरचे तज्ज्ञही याच नावाने त्या रॉकेटचा अभ्यास करू लागले. हे रॉकेट रशियन बनावटीच्या रॉकेटसारखं दिसत होतं, पण
तंतोतंत तसं नव्हतं. याचा अर्थ जगाला माहीत असलेल्या कारखान्यात
ते तयार झालं नव्हतं. इकडले तिकडले सुटे भाग एकत्र करूनही ते
तयार झालेल नव्हतं. कारण त्यांच्यावर तसं दर्शवणारी कोणतीही मार्किंग्ज
दिसत नव्हती. याचा अर्थ हे रॉकेट सीरियानेच स्वतःच्या कारखान्यात
तयार केलं होतं. सारीन वायू सीरियात इतरत्र तयार करण्यात आला
होता आणि या रॉकेटमधे त्याची कुपी बसवण्यात आली होती.
सीरियाने जागतिक युद्ध कायद्याचा भंग करून सारीन वायू सोडून निष्पाप
माणसांना मारलं होतं,
असं सिद्ध झालं. दमास्कसमध्ये झालेल्या हल्ल्याची
चित्रं एकत्र करून हिगिन्सनी आपल्या ब्लॉगवर टाकली. अमेरिकेच्या
नॅशनल सेक्युरिटी सल्लागार सुझन राईस यांनी ती चित्रं पाहिली आणि त्या हादरल्या.
पण अधिकृतरीत्या रासायनिक हल्ला झाला हे मानायला अमेरिका तयार नव्हती,
कारण अमेरिकेच्या लष्कराकडे त्याबद्दल माहिती, पुरावे नव्हते. हिगिन्स हिगिन्ससारख्या एका व्यक्तीने
दिलेल्या पुराव्यांना मान्यता देणं सरकारच्या प्रतिष्ठेत बसणारं नव्हतं. अमेरिकेला स्वतःचे निरीक्षक पाठवणं भाग पडलं. ‘युनो’नेही आपले निरीक्षक पाठवले. दोघांनीही प्रत्यक्ष निरीक्षणानंतर
काढलेले निष्कर्ष हिगिन्सच्या निष्कर्षांशी जुळणारे होते.
हिगिन्सचा ब्लॉग वाचणार्यांची संख्या काही हजारांत होती,
ती दमास्कस रासायनिक हल्ल्यानंतर काही लाखांवर गेली. अरब स्प्रिंग आंदोलनातले कार्यकर्ते, जागरूक नागरी संघटना,
सरकारांतले अधिकारी, पत्रकार इत्यादी मंडळी हिगिन्सचा
ब्लॉग बायबल असल्यासारखा वाचू लागले. न्यू यॉर्क टाईम्स,
लंडन टाईम्स, गार्डियन ही वृत्तपत्रं हिगिन्सच्या
ब्लॉगवरचा मजकूर वापरू लागली, त्यांना स्वतंत्रपणे लेख लिहायला
सांगू लागली.
सीरियन सरकारने बॅरल बाँब टाकायला सुरुवात केली होती. सीरियन कार्यकर्त्यांनी
त्याची चित्रं हिगिन्सना पाठवली. हिगिन्सचं संशोधन सुरू झालं.
बॅरल बाँब म्हणजे एक पिंप असतं. त्या पिंपात स्फोटकं
आणि खिळे-धातूचे तुकडे-विषारी रसायनं असतात.
साध्या विमानातून, हेलेकॉप्टरमधून ही पिंपं खाली
टाकली जातात. अगदी स्वस्तात म्हणजे दोन-तीनशे डॉलरमध्ये हा बाँब तयार करता येतो. याचं वजन ४५
किलोपासून ४५० किलोपर्यंत असू शकतं. इस्रायलने प्रथम १९४८ च्या
सुमाराला पॅलेस्टिनी लोकांवर हे बाँब टाकले. नंतर अमेरिकेने व्हिएतनाममध्ये
हे बाँब वापरले. लंकेच्या सरकारने ते एलटीटीईच्या लोकांना मारण्यासाठी
वापरले. या बाँबला कायद्याने बंदी आहे. पण ते करायला सोपे असल्याने सरकारं ते वापरत असतात.
आसादनी ते सीरियात तयार करायला सुरुवात केली. सुरुवातीला या
बाँबच्या पिंपाला वरून एक वात लावलेली असे. ती वात पेटवून पिंप
खाली भिरकावलं जात असे. नंतर वात जाऊन तिथे स्प्रिंगचे डिटोनेटर
लावण्यात आले. पिंप जमिनीवर आदळलं की बाँब डिटोनेट होत असे.
परंतु या बाँबला दिशा नसे. ज्यांना मारायचं ती
माणसं दूर राहत, बाँब भलत्याच ठिकाणी जाऊन फुटत असे. स्फोटानंतर तुकडे तुकडे होत, आग लागे, त्यामुळे हे शस्त्रं काय आहे ते लोकांना कळत नसे. हिगिन्सनी
आपल्या संशोधन पद्धतीने हा बँरल बाँब आहे हे सिद्ध केलं. आसाद
आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करत आहेत हे सिद्ध करण्यासाठी हिगिन्सनी तयार केलेला पुरावा
वापरण्यात आला.
पाठोपाठ सीरियन सरकारने क्लस्टर बाँब टाकले. बाँबचा पाऊस
पडावा असं दृश्य दिसत असे. गोंधळलेल्या कार्यकर्त्यांनी बाँब
पडण्याची, फुटण्याची दृश्य चित्रित करून हिगिन्सकडे पाठवली.
त्यांनी अभ्यास करून जाहीर केलं, की ते क्लस्टर
बाँब होते. क्लस्टर बाँब म्हणजे असंख्य छोट्या बाँबचा मोठा बाँब.
एका मोठ्या रॉकेट किंवा कवचात असंख्य छोटे छोटे बाँब ठेवलेले असतात.
प्रत्येक छोट्या बाँबमध्ये स्फोटकं, विषारी रसायनं,
खिळे, धातूचे तुकडे इत्यादी भरलेलं असतं.
हा बाँब विमानातून खाली टाकला जातो किवा लाँचरमधून रॉकेटसारखा दूरवर
फेकता येतो. बाँब फुटला की त्यातून शेकडो उपबाँब फुटतात आणि विस्तृत
प्रदेशात विध्वंस माजवतात. दुसर्या महायुद्धानंतर
प्रत्येक युद्धात जगातल्या बहुतेक देशांनी हे बाँब वापरले आहेत. या बाँबचा वापर करण्याला आंतरराष्ट्रीय कायद्याने मनाई आहे.
तीसेक देश हे बाँब तयार करतात, त्यात रशिया आघाडीवर आहे. हिगिन्सनी चित्रं पाहून, अभ्यास करून शोधलं, की सीरियात वापरले गेलेले क्लस्टर बाँब रशियातून आलेले होते. त्यांचा ब्लॉगचे वाचक आणखी वाढले. सरकारंही तो ब्लॉग
पाहू लागली. अमेरिकेसारखा बलाढ्य देश, तंत्रज्ञान
आणि लष्कर दोन्हीबाबत कोणी त्याची बरोबरी करू शकत नाही, पण त्यांच्याकडेही
नसलेली माहिती हिगिन्सकडे मिळत असे.
अमेरिकन एस्टाब्लिशमेंटमधल्या लोकांमध्ये हिगिन्सबद्दल असूया आणि द्वेष
निर्माण झाला. काही माणसांनी हिगिन्सबद्दल तो दहशतवाद्यांना मदत करतो, असा प्रचार सुरू केला. हिगिन्सना राजकारणात ओढण्याचा
प्रयत्न झाला.
हिगिन्सवर आरोप होत असे, की तो सीआयए, मोसाद,
एमआय-फाइव्ह, एमआय-सिक्स या इंटेलिजन्स एजन्सींचा हस्तक आहे. हिगिन्सचं
म्हणणं असं, की त्यांचा कोणत्याही एजन्सीशी संबंध नव्हता किंवा
संपर्क नव्हता. एक गोष्ट मात्र ते ठासून सांगत असत, ती म्हणजे, ते युद्धविरोधी होते, जगात कुठेही युद्ध होता कामा नये असं त्याचं मत होतं.
हिगिन्सचे हे उद्योग स्वांत सुखाय चालले होते. एक कंप्यूटर,
घरात मिळणारी वीज आणि इंटरनेट एवढ्यावरच त्यांचं ब्लॉगिंग चालत होतं,
खर्च नव्हता. त्यामुळे त्याच्या पत्नीनेही आक्षेप
घेतला नाही.
बीबीसीने हिगिन्सना बोलावलं. या प्रकारच्या पत्रकारीची कार्यशाळा घेतली,
आपल्या पत्रकारांना त्या कार्यशाळेत भाग घ्यायला लावला. अमेरिकेत टीईडीने त्यांची व्याख्यानं ठेवली. मग काही
कंपन्या पुढे आल्या आणि त्यांनी हिगिन्सना ही पत्रकारी अधिक चांगली करण्यासाठी पैसे
देऊ केले. हिगिन्सचं म्हणणं होतं, की कंपन्यांची
खात्री नसते, शेवटी त्यांना नफा महत्वाचा असतो, त्यामुळे त्याच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.
काही उत्साही कार्यकर्ते आणि धनिक पुढे आले. त्यांनी हे एक
सत्कार्य आहे असं म्हणून हिगिन्सना देणगी म्हणून काही पैसे देऊ केले. तेही त्यांनी नाकारले. एकदा बीबीसीने त्यांच्या एका प्रोजेक्टला
मदत म्हणून काही निश्चित रकमेसाठी जनतेला आव्हान केलं. काही तासांतच
ती रक्कम गोळा झाल्यानंतर बीबीसीने ती मोहीम थांबवली.
२०१४ साली हिगिन्सनी ‘बेलिंग कॅट’ नावाची
एक वेबसाईट तयार केली. जगातून कुठूनही मोकळेपणाने माहिती मिळवून
तिचा उघड वापर करून सत्य शोधण्यासाठी नागरिकांनी केलेला एक प्रयत्न, असं या वेबसाईटचं स्वरूप होतं. इतर आठ स्वयंसेवक त्यांच्या
मदतीला आले. आता टीम मोठी झाली होती. त्यांनी
तंत्रज्ञानाचं जाळं व्यापक केलं. सॅटेलाईटवर गोळा होणारी माहिती
गुगलवर मोफत उपलब्ध असते. पृथ्वीवरच्या इंचन इंचाचा नकाशा गुगलवर
मिळतो. आकाशातल्या वस्तूंची म्हणजे विमानं, रॉकेटं इत्यादींची हालचालही थोडे कष्ट घेतले तर गुगलवर कोणालाही मिळते.
वरील माहिती मिळवणं, ती वाचणं, नकाशे समजून घेणं, एवढीच गोष्ट करावी लागते.
जेम्स फोली या अमेरिकन पत्रकाराचं अपहरण करून आयसिसच्या लोकांनी त्याला
सीरियात ठार मारलं.
या घटनेची क्लिप आयसिसच्या लोकांनी सोशल मिडियावर टाकली, दहशत पसरवण्यासाठी. पण हे मारणारे लोक कोण होते आणि फोलीला
नेमकं कुठे मारलं, याची माहिती कोणाकडेही नव्हती, अमेरिकन लष्कराकडेही. हिगिन्सनी सॅटेलाईटवरच्या चित्रांचा
अभ्यास करून, खुणा ताडून पाहून हा खून राक्कामधे केला गेला हे
सिद्ध केलं.
मलेशियाचं विमान युक्रेनमधे पाडण्यात आलं होतं. ‘बेलिंग कॅट’ने विमान पडण्याची जागा, त्या वेळी आसपास हवेत इतर कोणती
विमानं किंवा रॉकेटं होती याचा शोध घेतला. विमान पाडणार्या रॉकेटची दिशा आणि प्रवासपरीघ गुगलवरच्या माहितीवरून शोधला. असं करत करत कोणत्या रशियन विमानाने हा उद्योग केला आणि कुठला पायलट होता हेही
‘बेलिंग कॅट’ने शोधलं. या
अपघाताची चौकशी करण्यासाठी डच पोलिसांनी एक स्वतंत्र टीम नेमली होती. या टीमने ती माहिती तपासली आणि ती खरी आहे असं जाहीर केलं. रशियाने मलेशियाचं विमान पाडलं होतं.
रशियन एजंटांनी एका रशियन गुप्तहेराचा इंग्लंडमध्ये खून केला होता. ‘बेलिंग कॅट’ने ब्रिटीश पोलिसांकडे असलेल्या कणभर माहितीचा वापर करून मणभर माहिती गोळा
केली. रशियाने लष्करातले काही लोक बाजूला काढले होते.
डुप्लीकेट पासपोर्टद्वारे त्यांना नव्या ओळखी दिल्या होत्या.
या माणसांना विषाच्या कुप्या देऊन जगभर पाठवून रशिया आपल्याला नकोशा
असलेल्या लोकांना ठार करण्याचा उद्योग करत होतं. हे सारं प्रकरण
‘बेलिंग कॅट’ने शोधून काढलं.
त्यासाठी
‘बेलिंग कॅट’ची माणसं कुठेही गेली नाहीत.
ना त्यांच्याकडे छुपी पिस्तुलं होती, ना जेम्स
बाँडसारखी विमानं आणि गाड्या. पासपोर्टच्या विविध विमानतळांवर
झालेल्या नोंदी, ते एजंट ज्या गावात जात तिथले पोलिस आणि हॉटेलं
यांच्यातल्या नोंदी, अशी माहिती हाती घेऊन ‘बेलिंग कॅट’ पुढे पुढे सरकलं. अर्थात
या कामी जगभरच्या हौशी नागरिकांनी त्यांना मदत केली. रशियन सरकारचे
उद्योग पसंत नसलेले रशियन नागरिक त्यांच्या देशातल्या कागदपत्रांची माहिती
‘बेलिंग कॅट’ला पाठवत होते.
थोडक्यात म्हणजे हिगिन्सनी बातमीदारांची एक मोठी अनौपचारीक संघटना
तयार केली. हे बातमीदार म्हणजे प्रशिक्षित पत्रकार वगैरे नाहीत. त्यांना कोणी पगारही देत नाही. आपल्या गावातल्या पालिकेच्या
कार्यालयातल्या रजिस्टरमधून अमुक माणसाची जन्मतारीख शोधणं, अमुक
एका नावाचं खातं बँकेत आहे का ते शोधणं, अमुक नावाचा एक सैनिक
अमुक साली अमुक ठिकाणी सैन्यात होता की नाही ते शोधणं, इत्यादी
अगदी साध्या गोष्टी ही माणसं करतात. माहितीचा एक अगदी छोटा कण;
असे कण गोळा करून त्यातून हिगिन्स व्यापक चित्र उभ करतात. जगभर पसरलेले हे बातमीदार माहिती पाठवतात, त्यावर हिगिन्स
नावाचा संपादक संस्कार करतो आणि कुठेही छापल्या न जाणार्या पेपरचा
अंक तयार करतो.
हिगिन्स २०१६ ते २०१९ या काळात ‘डिजिटल फॉरेन्सिक रिसर्च लॅब फ्युचर
युरोप इनिशिएटिव’ या अॅटलांटिक कौन्सिल
नावाच्या थिंक टँकचे फेलो होते. हिगिन्सची गणना आता जागतिक विचारवंतांत
केली जाते. गार्डियन, इंडिपेंडंट,
न्यू यॉर्कर, हफिंग्टन पोस्ट या पेपरांनी हिगिन्सचं
सविस्तर प्रोफाईल प्रसिद्ध केलंय. चॅनल फोर आणि सीएनएन या वाहिन्यांनी
त्यांच्यावर कार्यक्रम केलेत.
हिगिन्सच्या या पत्रकारीच्या आधी एडवर्ड स्नोडेन आणि ज्युलियन असांज
यांनी जगभर खळबळ उडवून दिली होती. स्नोडेनने अमेरिकन सरकारच्या फायलीतली माहिती उघड
केली. असांजने जगभरातल्या दूतावासांतून होणार्या संदेशांची देवाणघेवाण उघड केली. असांज आणि स्नोडेन
यांनी केलेले उद्योग ही शोध पत्रकारीच होती. ते बातमीदार होते.
कुठलाही पत्रकार जशी माहिती शोधून काढतो तशीच माहिती या दोघांनी शोधून
काढली होती. फरक एवढाच, की ते कोण्या पेपरांचे
किवा वाहिनीचे बातमीदार नव्हते. खाज म्हणून, एक ध्येय म्हणून त्यांनी माहिती खणून काढली आणि पेपरांना दिली. असांजने दिलेली माहिती गार्डियनसारख्या पेपराने रीतसर वापरली, खात्री करून घेऊन जबाबदारीने छापली. गार्डियनचे शेकडो
बातमीदार जगभर पसरलेले होते, त्यांत आणखी एका बातमीदाराची भर
पडली एवढंच.
पत्रकारी या व्यवसायाचं रूप किती बदललंय हे स्नोडेन, असांज आणि हिगिन्स
यांनी केलेल्या पत्रकारीवरून लक्षात येतं. गरजा बदलल्या,
तंत्रज्ञान बदललं, माहिती गोळा करण्याचं तंत्र
बदललं. गोळा करण्याबरोबरच संपादन आणि प्रकटनाचं तंत्रही बदललं.
संपादक महोदय त्यांच्या केबीनमध्ये बसलेत; त्यांचे
मुख्य बातमीदार, मुख्य वृत्त संपादक इत्यादी लोक त्यांच्या समोर
बसलेत; मग ही मंडळी बातमी आणि अग्रलेख वगैरेंची चर्चा करत आहेत;
असं हे काल परवापर्यंतच्या जर्नालिझमचं चित्र. आता हिगिन्स घरातच आपल्या कंप्यूटवर बसून माहिती मिळवतात, संपादित करतात. सीरियातले कार्यकर्ते त्यांच्या सेलफोनवरून
माहिती गोळा करून दृश्य स्वरूपात हिगिन्सकडे पाठवतात.
सीरियातल्या कार्यकर्त्यांना काही अमेरिकन संस्थांनी स्वतंत्रपणे माहितीची
शहानिशा कशी करावी व ती कशी जपावी याचं रीतसर प्रशिक्षणही दिल्याच्या नोंदी आहेत. गाव उध्वस्थ
झाल्यावर तुम्ही पळून जायला निघाल तेव्हा पालिका, पोलिस कार्यालय
इथल्या फायलीतलं काय काय पळवा आणि बाहेर पडा, हे सीरियन तरुणांना
सांगितलं गेलंय. म्हणजे हीही पत्रकारीची शाळा म्हणायची.
हिगिन्स हे एकविसाव्या शतकातल्या पत्रकारीचे जनक म्हणायला हरकत नाही.
निळू दामले - damlenilkanth@gmail.com
************************************************************************
आपल्या आसपास घडणाऱ्या पण आपल्या विचारविश्वाचा भाग नसणाऱ्या घडामोडी समजून घ्याव्यात, त्या घडामोडींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा, आपल्या म्हणण्यापल्याडचे काही दृष्टिकोन समजून घ्यावेत, आपल्याला न दिसणारं जग जाणून घ्यावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच 'अनुभव' मासिकाचा दर महिन्याचा अंक म्हणजे आपला भवताल, आपला समाज समजून घेण्यासाठीची धडपड असते. अनुभव'च्या परिवाराचा एक भाग बनून तुम्हीही या प्रवासात सामील होऊ शकता.'अनुभव'चे वर्गणीदार बना
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा