चौकशी : जयंत पवार
अनुभव जानेवारी २०१७च्या अंकातून
पारीचं पंधरा दिवसांचं मूल भटक्या कुत्र्यांच्या टोळीने फाडून खाल्लं.त्या दिवशी शहरात हीच वार्ता चर्चेत होती. टीव्हीवरच्या सगळ्या चॅनेल्सवर ती दाखवली जात होती. दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर ठळक टाइपात ती झळकणार होती.
शहराच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. काय झालं होतं, की हॉस्पिटलमधले सगळे वॉर्ड तुडुंब भरले होते. रुग्णांना झोपायला खाटा अपुर्या पडत होत्या. बाळंतिणीच्या वॉर्डात तर कहर झाला होता. मग खाटांच्या मध्ये दोन बिस्तरे टाकून बाळंत बायकांना त्यावर त्यांच्या तान्ह्या पोरांसकट झोपवलं गेलं होतं; पण ही व्यवस्थादेखील अपुरी पडू लागली. सगळ्याच लोकांनी शहराची आबादी वाढवण्याचा निर्णय घेतला असावा असं वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली होती. मग हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने काही बाळंतिणींची सोय बाहेर व्हरांड्यात केली. व्हरांड्यातल्याही बिछान्यांच्या रांगा एवढ्या वाढत गेल्या, की त्याचं एक टोक जवळजवळ हॉस्पिटलच्या बाहेरच्या दिशेला असलेल्या उघड्या भागात जाऊन पोचलं. त्या टोकावर पारीचा बिस्तरा होता. तिच्या अंगावर पुरेसं पांघरूण नव्हतं, कारण हॉस्पिटलच्या वॉर्डरोबमध्येच चादरी उरल्या नव्हत्या. पारीने आपल्या तान्हुलीला पदराखाली घेतलं होतं, पण तो पदरही पहाटेच्या वार्यात दूर उडून पोर उघडी पडली होती. थंडीने काकडून रडतही असेल, पण गाढ निद्रेने झडपलेल्या पारीला ते काही ऐकू गेलं नाही. कुठूनसं भटक्या कुत्र्यांचं टोळकं वस् वस् करत आलं आणि हलके गुरगुरत त्यांनी पारीच्या पोरीचे लचके तोडायला सुरुवात केली; पण तेवढ्यात गाढ झोपेतल्या पारीला काही क्षणांतच कसल्याशा भयानक स्वप्नाने जाग आली होती- अज्ञाताची सूचना झाल्याप्रमाणे. समोरचं दृश्य बघून ती जिवाच्या आकांताने हंबरली. तिच्या हंबरण्याने सगळ्या वॉर्डांचे उंबरे हादरले. सगळे आवाजाच्या दिशेने धावले. पण पारी पार थिजली होती, थरथरत होती आणि फक्त भेसूर हंबरत होती. जमलेल्या आयाबायांनी, परिचारिकांनी कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला; पण तोंडाला रक्त लागलेली कुत्री एकमेकांशी झोंबत बारक्याशा मांसाच्या गोळ्याचे लचके तोडण्यात दंग झाली होती.
त्यानंतर पारी तिथेच मूर्च्छित झाली.
या घटनेने एकच गहजब झाला. लोक भयभीत, अचंबित, क्रोधित झाले. जथ्थ्याने हॉस्पिटलकडे धाव घेऊ लागले. शहरातले सुजाण नागरिकही हडबडले होते. सरकारी हॉस्पिटल्सच्या अनागोंदीचा इतका भयंकर प्रत्यय यापूर्वी आला नव्हता. सगळ्यांची एकमुखी मागणी होती, या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि हॉस्पिटल प्रशासनाला याची जबर शिक्षा झाली पाहिजे.
या क्रूर घटनेला आणखी एक व्यवस्था जबाबदार होती. या शहराची महानगरपालिका. गेले अनेक दिवस ‘शहरातल्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा’ अशी मागणी नागरिक पालिकेकडे करत होते; पण पालिका प्रशासन ढिम्म होतं. आणि मागील महिन्यापासून तर भटक्या कुत्र्यांना पकडणार्या आणि त्यांचं निर्बीजीकरण करणार्या विभागातले कर्मचारीच संपावर गेले होते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या तीव्र झाली आणि नागरिकांच्या मागणीलाही धार आली तरी एकटे पालिका आयुक्त काय करू शकणार होते?
पण आता मात्र सरकारी हॉस्पिटल व्यवस्थापन आणि पालिका प्रशासन या दोन्ही व्यवस्थांना कठोर चौकशीला सामोरं जावं लागणार होतं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच तशी घोषणा केली होती.
पारीच्या बिस्तर्याभोवती जमावाचा वेढा पडला होता. तिला हॉस्पिटलच्या अधिकार्यांनी आपल्या कक्षात बोलावून असंख्य प्रश्न विचारले होते; पण पारी कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नव्हती. आत्तादेखील टीव्ही चॅनेल्सचे, वृत्तपत्रांचे वार्ताहर तिच्यावर प्रश्नांचा भडिमार करत होते; पण शुद्धीवर येऊन बराच वेळ झाल्यानंतरही पारी कुठल्याही चौकशीला उत्तर देण्याइतपत शुद्धीवर आली नव्हती.
पारीच्या भोवतीचा गराडा वाढतच होता, पण तिच्या घरचा एकही माणूस तिच्यासोबत नव्हता. गेले पंधरा दिवस तिची विचारपूस करायला तिचा एकही सगेवाला तिथे फिरकला नव्हता. तिला मुलगी झालीय, हे कळल्यावर लेबररूमच्या बाहेर तिष्ठत बसलेला तिचा नवरा तिथून जो निघून गेला तो पुन्हा न परतण्याच्या प्रतिज्ञेनेच. तिच्या सासूने तर परत मुलगी काढलीस तर घरी येऊ नकोस, असं बजावूनच हॉस्पिटलात पाठवलं होतं. लगातार तीन मुलींनंतर तरी मुलगा होईल, या चिवट आशेने तिने आपल्या लेकाला पारीवर चढवलं होतं. एरवी पार चिपाड झालेल्या पारीच्या हाडबंडल देहाचं तिच्या नवर्याला आता काहीच आकर्षणच उरलं नव्हतं. त्यामुळे सासूसासरेनवरादीरनणंदा अशा ऐसपैस कौटुंबिक पसार्यातला एकही सदस्य तिच्या नव्या लेकीच्या स्वागतासाठी फिरकला नाही. तिचं माहेर तर शहरापासून कोसो मैल दूर आणि आपल्याच विवंचनेत गढलं होतं. अशी घरच्यांसाठी दुर्लक्षणीय ठरलेली बाई हॉस्पिटलच्या कर्मचार्यांच्या पराकोटीच्या अनास्थेचा विषय ठरल्यास नवल ते काय! तिचा बिस्तरा व्हरांड्याच्या पार कोपर्यात ढकलून दिला तरी तक्रार करायला कोण येणार होतं? पण एरवी कुणी नाही तरी भटके कुत्रे आले आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाला चौकशीच्या फेर्यात अडकवून गेले.
चौकशी हा एकच शब्द पारीच्या कानावर आदळत होता. तिच्या भोवती जमलेला, तिच्याकडे एकटक बघणारा समूह तो शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत होता- पारीच्या पोरीच्या भयाण मृत्यूने दचकत, हबकत, हळहळत होता, पण पारीसाठी मात्र कळवळत नव्हता. सर्वांच्या द़ृष्टीने पारी ही आई नव्हेच. शेजारी आपल्या पोरीचे लचके तोडले जात असताना प्रगाढ निद्रेत बुडून गेलेल्या बाईच्या ठायी आईचं हृदय आहे असं म्हणावं तरी कसं? ही कोण बाई? कुठल्या भागातून, कुठल्या समाजातून, कुठल्या जातीतून, कुठल्या घरातून, कुठल्या थरातून आली? सगळे चौकसपणे कुजबुजत होते, पण पारीची मान गुडघ्यांत होती. कुठलेच प्रश्न तिच्या आत पोचत नव्हते. तिला कशाचीच उत्तरं द्यायची नव्हती. तिला प्रश्नच कळत नव्हते, त्यामुळे उत्तरंही माहीत नव्हती.
पण लोक चौकशी करतच असतात. समाज चौकस असतो. म्हणून तर एकमेकांवर दाब राहतो. कोणी चुकतोय, चुकीचं वागतोय असं लक्षात आल्यावर प्रश्न विचारायला नकोत का?
या चौकस प्रश्नांची, नाना चौकश्यांची पारीला सवय होती. त्यामुळे ती गांगरून गेली नाही. निमूट मात्र राहिली. कारण कुठल्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नाहीत आणि कुठलीच उत्तरं समाधानकारक नसतात हे तिला एव्हाना नीट कळलं होतं. आठवतं तेव्हापासून तिला आठवते ती चौकशीच. तिला कळू लागलं त्या काळातली पहिली घटना आठवते ती चौकशीचीच. शेजारच्या नेहाच्या घरात ती खेळायला जायची आणि तिच्या खेळण्यांमध्ये रमून जायची. नेहाच्या बाबांनी लेकीसाठी आणलेलं एक भारीचं खेळणं हरवलं तेव्हा ते पारीनेच लंपास केल्याचा आळ तिच्यावर येऊन तिची आधी नेहाच्या बाबांकडून आणि नंतर तिच्या बाबांकडून हडसून खडसून चौकशी झाली होती. ते खेळणं पारीला चोरावंसं वाटत होतं पण तिने ते चोरलं नव्हतं. न चोरता चोर ठरण्याचा अनुभव तिने घेतला. चौकशी आणि मार हातात हात घालून आले होते. या दुहेरी तडाख्याने अप्राप्य गोष्टींची वासना धरू नये हे तिला शिकवलं.
पुढे एके रात्री चौकशी, मार आणि उपासमार अशा तिहेरी कारवाईच्या सापळ्यात ती अडकली. वर्गातल्या मैत्रिणीसोबत ती मास्तरांच्या क्लासला जायची. मास्तरांचा मैत्रिणीवर लोभ फार. मैत्रिणीची मास्तरांवर भक्ती फार. या अव्याख्येय स्नेहाचा पारी शालेय पाठ्यपुस्तकापेक्षा अधिक अभ्यास करू लागली आणि हा स्नेह वाढवण्यात दोघांना मदत करू लागली. त्या बदल्यात मास्तर मैत्रिणीसोबत तिलाही अधनंमधनं सिनेमाला नेत. अशाच एका सिनेमावारीत त्याच थिएटरात आलेल्या धाकट्या चुलत्याने तिला पाहिलं आणि घरी येऊन गहजब केला. त्या यातनामय रात्री चौकशीच्या तीक्ष्ण बाणांनी तिला घायाळ केलं. बापाने मारलं आणि आईने उपाशी ठेवलं. या प्रकाराला तिच्या चारही बहिणींना साक्षी ठेवलं गेलं. सगळा प्रकार एका विचित्र शांततेत पार पडला. त्यानंतर सिनेमा पारीच्या आयुष्यातून निघून गेला. सिनेमातल्या हीरोला पाहणं हा तिच्यासाठी दुर्मिळ एकान्तातला सावध खेळ ठरला.
एकदा बहिणींबरोबर उघड्या जागेवर तिला मोठमोठ्याने हसताना बघून समोरून येणार्या मामाने खाडकन तिच्या मुस्कटात मारली होती आणि तेव्हा तिच्या अकारण हसण्याची घरात आटोपशीर चौकशी झाली होती, हेही तिच्या चांगलंच स्मरणात आहे.
मोठ्या बहिणीच्या लग्नात कर्हा धरून मागे मागे फिरणार्या पारीकडे बघत काही मंडळी बोट दाखवून हलक्या आवाजात चौकशी करत होती. थोड्याच दिवसांत तिला लग्नाची मागणी आली. शाळा बंद करायला ते एक निमित्तच ठरलं.
तिला पाहायला आलेल्या मंडळींच्या कोंडाळ्यात पारी उभी राहिली. तिला आपादमस्तक नीट न्याहाळत चाललेली प्रश्नोत्तरं म्हणजे एक छोटा कौटुंबिक चौकशी आयोगच होता. अशा वेळी मनमोकळी उत्तरं देणं हे आत्मघातकी ठरतं आणि खरी उत्तरं देणं हा गुन्हा, हे थोरल्या बहिणीने शिकवल्यामुळे पारी यातून शिताफीने बाहेर पडली नि थेट बोहल्यावर चढली.
पहिल्या रात्री नवर्याच्या हिंस्र लिंगाच्या मुखाला रक्त न लागल्याने तो संशयाकुल होऊन परत परत चादर तपासत होता. पहाटे त्याने चौकशी आरंभली. त्याचा पहिला प्रश्न होता : तुझी थानं एवढी मोठी कशी? नवर्याचा पारीवर विश्वास नाही हे हळूहळू घरात पसरल्यावर सगळ्यांनाच पारीच्या चौकशीचे अधिकार मिळाले.
घरातल्याच एका पोरसवदा नोकराशी गुजगोष्टी करताना सासूने तिला पकडलं आणि तिच्या चारित्र्याचा मुद्दा चौकशीच्या केंद्रस्थानी आणला. शिक्षा म्हणून नवर्याने तेव्हापासून रोज मारपिटीला प्रारंभ केला, तर सासूने तिचं दूधदुभतं बंद करून थाळीत कदान्न पडेल असं पाहत तिचे स्तन, मांड्या आक्रसून जातील अशी व्यवस्था केली.
तसं पाहिलं तर तिला लागोपाठ तीन मुली होणं हा मोठाच अपराध होता. त्याला क्षमा नव्हती. सासू-सासर्याने पंचायत बोलावून पारीचा सोक्षमोक्ष लावायचा बेत आखला. त्या पंचायतीच्या आखाड्यात पारीच्याच नव्हे तर तिच्या माहेरच्या माणसांचीही कसून चौकशी झाली. पारीच्या आईनेही मुलींचीच पैदास केल्यामुळे मुद्दलात वाणच कमअस्सल आहे व ज्याचा त्याने परत न्यावा, असा निवाडा करून पंचायतीने पारीला बापाच्या घरी परत पाठवण्याचा मार्ग सुचवला. पारीचा बाप त्या पंचायतीला उपस्थित राहून हातापाया पडत, गडबडा लोळत गयावया करत होता. त्याने भक्कम धनराशी, काही तोळे सोनं आणि पंचायतीला सामिष भोजन देण्याची तयारी दाखवत मामला तात्पुरता मिटवला.
दरम्यान, पारीच्या तिन्ही मुली तिच्याशी बोलेनाशा, तिच्याशी संपर्क ठेवेनाशा झाल्या. अस्तित्वाच्या अकाली संघर्षात कोणाच्या बाजूने उभं राहण्यात शहाणपण आहे याचं अचूक भान त्यांना आलं होतं.
खरं तर तान्ह्या पोरीला कुत्र्यांनी खाल्ल्यामुळे पारीला आता मोकळं वाटत होतं. पोरीने उद्याचं मरण आजच भोगलं होतं, हे एक बरंच झालं. एक भला मोठा प्रश्नच संपल्यासारखं पारीचं मन रितं झालं होतं; पण आता पुढे काय, या प्रश्नाने ते पुन्हा भरत चाललं होतं. माहेरचं दार मागच्या खेपेलाच बंद झालं होतं आणि सासूने तर ‘परत तोंड दाखवू नकोस’ असं बजावूनच हॉस्पिटलात पाठवलं होतं. पण हाही प्रश्न परिस्थितीनेच सोडवला अखेर. या भयंकर घटनेची बातमीच इतकी मोठी झाली, की हॉस्पिटल व्यवस्थापनाने पारीच्या सासरच्या सर्व माणसांना प्रकरणात खेचलं. त्यामुळे पुढील कारवाईला घाबरून नवर्याने पारीला घरी नेलं. घरी तिचं निमूट स्वागत झालं. तिला एक अंधारी खोली दिली गेली. पारीला तसाही उजेड नकोच होता. पोटाला दोन घास आणि तहानेला पेलाभर पाणी, इथवर तिची गरज आता सीमित झाली होती.
पण चारच दिवस. चार दिवसांत घटना जुनी झाली. पत्रकार दुसर्या बातम्यांमागे धावू लागले. टीव्ही चॅनेल्सनी विषय बदलले. पोलिसांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला थोडा दम देऊन, थोडा दाम घेऊन फाइल बंद करून टाकली. पालिकेत वेगळी प्रकरणं गाजू लागली. खूप लोक मेल्याच्या घटना समोर येऊ लागल्या तसे लोकही तान्ह्या मुलाचा मृत्यू विसरून गेले. त्याच वेळी पारीच्या घरात पुन्हा पंचायत बसली. सासू-सासरे म्हणाले, “हिचा निवाडा झाला पाहिजे.” पारीला कोपर्यात उभं करून चौकशीला प्रारंभ झाला. अखेर निवाडा झाला तो असा, की ही हडळ आहे. हिने पोटच्या पोराला मारून खाल्लं. हिने यमदूतांना बोलावलं. ते कुत्र्यांच्या रूपाने आले. या अवदसेला घरात ठेवाल तर ती एकेकाला खाईल. हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा आणि जागेची शांती करा.
पारीला नवर्याने ‘बाहेर हो’, सांगितलं. सासर्याने फर्मान सोडलं. दिराने दरवाजा सताड उघडा करून दिला. पारीचे पाय हलेनात, तेव्हा सासूने तिच्या हाताला धरून तिला फरफटत बाहेर काढलं. पारी पूर्णपणे बधिर झाली होती. बाहेर ऊन चमकत होतं. रस्ते वाहत होते. आता पाय हेच पारीचे प्राण झाले होते. ती निघाली. सारे बघत राहिले. पारी रस्त्यावर आली आणि पुढे जात जात दिसेनाशी झाली. साचलेली वाहतूक, माणसांचे जथ्थे, कचर्याचे ढीग- सारं ओलांडत ती दिशाहीन निघाली. पुढे पुढे ओढल्यागत जात राहिली. खूप पुढे चालून आली ती. शहराच्या सीमेवरच समोर एक भला मोठा उखडलेला रस्ता आडवा पडलेला होता. नव्याने बांधला जाण्याकरताच तो उखडून ठेवलेला असणार हे नक्की. कारण बरेच मजूर त्यावर लगबगीने काम करताना दिसत होते. खड्ड्यात रेती-खडी दाबून बसवली जात होती. त्यावर डांबर पसरून रोलर फिरवण्याची घाई उडाली होती. माणसं बेभान होऊन राबत होती. पारी त्या रस्त्यापाशी आली तेव्हा ऊन अधिकच चमकत होतं. पारीच्या डोळ्यांपुढे अंधार झाला आणि ती त्या प्रशस्त रस्त्याच्या मधोमध कोसळली. तिच्या देहाएवढ्या आकाराच्या खड्ड्यात ती पार आडवी झाली. त्याच वेळी एक अजस्र पोकलेन तिच्यावर खडी टाकत गडगडत निघून गेला. पुढच्या काही क्षणांत त्यावर डांबर टाकून रस्ता दाबून टाकणारा रोलरही फिरवला गेला. भल्या थोरल्या वाहतुकीसाठी एक अद्ययावत चकाकता रस्ता सज्ज होण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता.
पण या प्रक्रियेत रस्ता ओलांडणारी बाई ज्यांनी पाहिली त्यांना ती पलीकडे पोचलेली काही दिसली नाही. इकडून निघालेली व्यक्ती पलीकडे कशी पोचली नाही याची चौकशी कुणीच केली नाही.
हा तोच रस्ता होता जो अकाली खचल्यामुळे पालिका अधिकारी आणि कंत्राटदाराच्या भ्रष्ट कारभाराची कठोर न्यायालयीन चौकशी झाली होती. पण या रस्त्याच्या उदरात जिवंत गडप झालेल्या एका बाईच्या अदृश्य होण्याची चौकशी मात्र कधीच झाली नाही.
जयंत पवार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा