कापूस : जयंत पवार

नाटककार, लेखक जयंत पवार यांचं नुकतंच निधन झालं. जयंत पवार यांनी 'अनुभव' मासिकासाठी वेळोवेळी भरपूर लिखाण केलं. मार्च २०१७च्या अंकातील कथा वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

त्या ऐसपैस घरातल्या सगळ्या खोल्यांत भर दुपारी नीरव शांतता पसरलेली असायची, पण एका खोलीत मात्र तेव्हाच जीवनकलह निकरावर आलेला असायचा. जीवन-मरणाचे प्रश्न टोकदार होऊन जायचे. हे समरप्रसंग तसे अलीकडेच घडायला लागले होते. त्याआधी टीव्हीवरच्या धारावाहिक मालिकांतल्याप्रमाणे लुटुपुटीच्या गोष्टी घडायच्या. सासू-सुनांच्या शाब्दिक लढाया, नणंदांची छुपी कारस्थानं, नवर्‍याचं घराबाहेरचं लफडं, असा मामला याही खोलीत एखाद्या एपिसोडप्रमाणेच सादर व्हायचा. यात कॉलेजात जाणार्‍या मुलामुलींची प्रेमप्रकरणंही सुरू झाली. लग्नाची बोलणी, हळदीचे प्रसंग, मंडपातली धामधूम, मानधन आणि बिदाईपर्यंत प्रकरणं जाऊन थांबली. मग पुन्हा सासवा-सुना. हे तेच तेच व्हायला लागलं तेव्हा पोरं कंटाळली. पुन्हा या सार्‍या पोरींच्या आणि बायांच्या भानगडी, त्यांच्या कागाळ्या, त्यांचं करवाचौथ आणि त्यांचीच डोहाळजेवणं. यात पुरुषांना स्कोप कुठून असायला? म्हणून मुलग्यांनी डान्स इंडिया डान्स आणि सारेगामा स्टाइल नाचाचे आणि गाण्याचे शो सुरू केले. मग मुलींचेही आयटम डान्स होऊ लागले. मुलगे पीचवर बॅटिंग करत तेव्हा मुली पलंगावर चिअर गर्ल बनून नाचत. असा सगळा आतल्या खोलीत धुडगूस चाललेला असे, पण बाहेर निजलेल्या करुणाताईंना त्याची जराही खबर नसे. 



खरं तर मुलांचे हे असे आत खेळ चालले आहेत हे करुणाताईंना कळतं तर कोणाचीच धडगत नव्हती. त्यांचा धाकच असा होता, की त्यांनी डोळे वटारले तरी मुलांना धार लागायची. करुणाताईंच्या पाळणाघराचा लौकिकच तसा होता सोसायटीत. शिस्त म्हणजे शिस्त! त्यामुळे सोसायटीतले पालक आपल्या किडला करुणा मॅडमच्या बेबी सिटिंगमध्ये अ‍ॅडमिशन मिळावं म्हणून धडपडत. पण करुणाताई आठच मुलं घेत. नववं मूल त्यांना चालत नसे. कारण आपल्या कॅपॅसिटीची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्या मुलांचं संगोपन उत्तम करत. सगळं काही वेळच्या वेळी. मुलांना शी-शू आणि भुकेची कळही विशिष्ट वेळीच येई. त्यांच्या घरात शिरल्यानंतर मुलं नेमस्त बागडत आणि माफक खेळत; पण एकदा का दुपारी त्यांच्या करुणा आंटी झोपल्या की मात्र त्यांना उधाण येई. 

घरात करुणा आंटी आणि त्यांच्या एज ओल्ड अम्मा सोडून दुसरं कोणीही नाही. अम्मा मात्र झोपत नाहीत. त्यांना झोपच येत नाही. पण त्यांचा मुलांना काही त्रास नाही. त्या डायनिंगला लागून असलेल्या छोट्या बेडरूममध्ये पडलेल्या असतात किंवा खुर्चीवर बसून पोथी, स्त्रोत्रं असलं काही वाचत असतात. दुपारच्या हॉलमध्ये येऊन वाती वळत टीव्हीवर पौराणिक सीरियल अथवा सत्संगाचे धार्मिक कार्यक्रम बघत असतात. ईश्वरचिंतन हीच त्यांची शांती, पूजा हीच प्रेरणा. म्हणून करुणाताईंनी त्यांच्या बेडशेजारीच त्यांना छोटं देवघर थाटून दिलं आहे. करुणाताईंचा मात्र घरात सर्वत्र वावर आहे. एक डोळा पाळणाघरातल्या मुलांवर ठेवून त्या आपली कामं करत घरभर संचार करत असतात. दुपारी मात्र त्यांना नेमाने एक फोन येतो. तेव्हा त्या एकाच जागी घुटमळत बराच वेळ बोलत राहतात. बोलताना त्यांचा आवाज चढतो. त्या ओरडतातही. कधी कधी किंचाळतात. त्यांनी रिसीव्हर ठेवून फोन बंद केल्याचा आवाज अम्मा आणि मुलांना ऐकू येतो. मग त्यांना एक गोळी घ्यावी लागते. त्यानंतर त्या झोपतात. झोपण्यापूर्वी मुलांच्या खोलीचं दार त्या घट्ट बंद करून घेतात. तत्पूर्वी, आता सगळ्यांनी डोळे बंद करून निजायचंय एका मिनिटात, अशी ताकीद देऊन जातात. मुलंसुद्धा आपापल्या जागेवर पहुडून डोळे घट्ट बंद करून घेतात. पण त्यानंतर पाचच मिनिटांत ती उठून ताजीतवानी होतात. करुणा आंटी आता एक तास उठणार नाहीत याची त्यांना पूर्ण कल्पना असते. अलीकडे आंटीनी गोळीचा डोस वाढवला असावा. कारण आताशा त्या दीड तासाने, कधी कधी तर दोन तासांनी उठतात. पण करुणाताईंच्या निद्रेची हीच वेळ मुलांसाठी सामोरं जाण्याची वेळ असते. अशा वेळी त्यांच्या कल्पकतेला धुमारे फुटतात, सर्जकतेला बहर येतो. 

परवाच त्यांनी रेपचा खेळ मांडला. धारावाहिक मालिकांच्या नकला छापत बसण्याचा कंटाळा आल्यानंतरचा कल्पकतेने नवं जीवनाभिमुख वळण घेण्याचा काळ. मुलांची क्रीडालालसा तीव्र आणि थरारक झाली होती. त्याच्या आदल्याच दिवशी किडनॅपिंगचा गेम झाला होता. मानवच्या डोक्यातून या गेमची कल्पना निघाली. त्याच्या क्लासमधली मुलं हा खेळ रिसेस टाइममध्ये खेळतात. मानव म्हणाला, “आम्ही त्रिष्णाला किडनॅप करणार.” त्रिष्णाचं खरं नाव तृष्णा आहे, पण इंग्लिश स्पेलिंगप्रमाणे ते त्रिष्णाच होतं. आणि आपलं खरं नाव तृष्णालाही माहीत नाही. मानव ‘आम्ही’ म्हणाला, म्हणजे तो आणि धुल्लू अर्थात धवल. रोशन हा त्रिष्णाचा डॅड बनला होता. त्रिष्णाच्या खर्‍या डॅडकडे फॉर्च्युनर आणि मम्मीची होंडा सिटी होती. त्यामुळे तीच किडनॅप करण्यायोग्य होती. ती क्यूट होती आणि डान्स करताना सेक्सी दिसते, असं मानवला वाटायचं. त्यामुळे त्याला किडनॅप गर्ल त्रिष्णाच हवी होती. महिका त्रिष्णाची ममा झाली होती. रेहाना पोलिस इन्स्पेक्टर आणि साक्षी हवालदार. अंजोर त्रिष्णाची बेस्ट फ्रेंड बनली. किडनॅप करतेवेळी मन्नूने दांडगाई केली हे त्रिष्णाला मुळीच आवडलं नाही. तिने मन्नूला वॉर्न केलं; पण तेव्हा तो धुल्लूला कोपर्‍यात घेऊन त्याच्या कानाला लागत हसला. तेही त्रिष्णाला आवडलं नाही. तिचं तोंड रुमालाने गच्च आवळून बांधल्यामुळे ती प्रचंड संतापली होती; पण करुणा आंटी उठायच्या थोडं आधी त्रिष्णाच्या डॅडकडून पैसे घ्यायला आलेल्या धुल्लूला पोलिसांनी शिताफीने पकडून मन्नूलाही अटक केल्यामुळे प्रकरण तिथेच मिटलं. 

दुसरा दिवस गेम ऑफ रेपचा होता. साक्षी सोडून सगळ्या मुली रिसॉर्टवर पिकनिकला गेल्या. तिथे त्यांनी अंताक्षरीचा खेळ केला, रेनडान्स केला, स्विमिंग केलं आणि त्या परतल्या. परतताना संध्याकाळ झाली. त्रिष्णाच्या फॉर्च्युनरमधूनच त्या गेल्या होत्या आणि त्याच गाडीतून परतत होत्या. वाटेत रोशनने लिफ्ट मागितली : “बहेनजी, आखरी बस निकल गयी है...” मुलींनी त्याला गाडीत घेतलं. चारही मुली शॉर्ट्समध्ये. हसतात, खिदळतात. रोशन म्हणतो, “मी तुम्हाला शॉर्टकट दाखवतो. गाडी वेगळा टर्न घेते. तिथे मन्नू आणि धुल्लू उभे असतात. अंधार पडतच असतो. दोघं रस्त्याच्या मधोमध उभे. गाडी ब्रेक दाबत थांबते आणि त्यानंतर गँगरेपला सुरुवात होते. तीन तरुण चार तरुणींवर बलात्कार करतात. साक्षीला या प्रकरणात व्हिक्टिम व्हायचं नव्हतं. अशा गोष्टींना ती घाबरतेच. त्यामुळे ती रिसॉर्टवर जाणार्‍या मुलींमध्ये नव्हती, इन्स्पेक्टर होऊन शांतपणे पोलिस स्टेशनमध्ये बसली होती. रेपचा अ‍ॅक्ट भलताच रंगला. पोरी किंचाळल्या, “बचाओ... मुझे छोड़ दो... मैं तुम्हारे पैर पडती हूँ... कमीने, खाली नाटकं करू नकोस! तुला दाखवतो”.... संवादाच्या फैरी, आक्रोश. ओरडताना, किंचाळतानाही पोरं खिदळत होती. पण हे कुठलेच आवाज बाहेर करुणा आंटीच्या कानांपर्यंत पोचले नाहीत. रेप झालेल्या मुलींपैकी अंजोर अणि रेहाना बेशुद्ध पडतात. त्रिष्णा तिथून पळते, धावत थेट पोलिस ठाण्यात पोचते. ती असतेच हिंमतवान. कप्लेंट देते. महिका लगेच टीव्ही अँकर बनून न्यूज फ्लॅश करणार असते... असं सगळं ठरलं होतं. तसंच घडणार होतं. पण बाहेर बराच वेळ फोनची रिंग वाजत होती, ते साक्षीने ऐकलं. करुणा आंटी उठल्याचाही आवाज झाला. मुलांना खेळ थांबवावा लागला. त्यामुळे आजही त्रिष्णा चिडली. मन्नूने तिला खूप वेळ अंगाखाली दाबून ठेवलं होतं. ती जोर लावून उठली तेव्हा तिने मन्नूला एक सणसणीत ठेवून दिली. तेवढ्यात साक्षी म्हणाली, “आंटी उठलीय.” पुढे टीव्हीवरची न्यूज, कँडल मार्च, पोलिस अरेस्ट, सगळंच थांबलं. करुणा आंटीने दरवाजा उघडला तेव्हा प्रत्येकाच्या पुढ्यात पुस्तक होतं. 

दुसर्‍या दिवशी हाच गेम पुढे चालू ठेवायचा होता त्रिष्णाला. पण मन्नू म्हणायला लागला, “मला पोलिस पकडूच शकत नाहीत. माझे वडील मिनिस्टर आहेत.” तसेही त्याचे खरे वडील बिझनेसमन होते. ते कोणालाही कितीही रिश्वत देऊ शकत होते. धुल्लू आणि रोशनचे बापही काही कमी नव्हते. पण त्रिष्णा म्हणाली, “माझे डॅड बिग शॉट आहेत. ते तुमच्या सगळ्या डॅडींना गार करून टाकतील.” आता प्रत्येकाच्या बापाच्या औकातीवरून भांडण पेटलं. मुन्ना हटायलाच तयार नव्हता. वेळ जात होता. मग महिका, अंजोर आणि रोशनने त्रिष्णाची समजूत काढली, “छोड़ ना यार! वो बेवकूफ है।” मग सगळ्यांनीच ‘रेप पार्ट टू’ थांबवून दुसरा खेळ खेळायची आयडिया मान्य केली. 

हा गेम होता फॅमिली पार्टीचा. चार कपल्स होती; पण तीन मुलगे आणि पाच मुली अशी विषय विभागणी झाल्यामुळे अंजोरने साक्षीचा नवरा बनावं असं सर्वानुमते ठरलं. साक्षी आणि अंजोरच्या मॅरेज अ‍ॅनिव्हर्सरीची पार्टी त्यांनी एका पबमध्ये ठेवली होती. महिका म्हणाली, “धुल्लू मला हजबंड म्हणून पायजे.” त्रिष्णाला रोशन हवा होता. पण रोशन त्रिष्णाचा कझिन असल्यामुळे ते राँग होईल, असं महिकाचं म्हणणं पडलं. रोशनला स्वत:लाही ते पटलं. त्यामुळे तो रेहानाच्या वाट्याला आला. तसाही रेहानाला काही से नव्हता. ती अ‍ॅग्री झाली. त्यामुळे मुन्ना परत त्रिष्णाच्या नशिबी आला. तरी बरं, पार्टीत डान्स करताना आपापल्या पार्टनरबरोबर नाचायचं नव्हतंच, अदलबदली करायची होती. नाही तर मुन्नासोबत डान्स करणं त्रिष्णाला बोअरच झालं असतं. पार्टीत ड्रिंक होतं. तकिला शॉट्स, रेड अ‍ॅण्ड व्हाइट वाइन विथ चीज, हार्ड अ‍ॅण्ड सॉफ्ट लिकर- सबकुछ. वेगवेगळ्या जोड्या जुळल्या. सर्वांनी एन्जॉय केलं. धुल्लूने हेवी ड्रिंक घेतलं, त्यामुळे तो ओकला. महिकाने त्याला सांभाळून घरी नेलं. पार्टी लेट नाइट संपली. सगळे आपापल्या घरी डुलत आले. चार बेड होते. चार कपल चार बेडवर झोपली. मुली म्हणाल्या, “ए, टच नहीं करने का हाँ। फालतूगिरी नै मंगता!” तरी त्यांना गुदगुल्या होत होत्याच. अंजोर साक्षीला बिनधास्त मिठी मारून झोपली. एवढी इंटीमसी बाकीच्यांनी दाखवली नाही, पण ‘टच’ झालाच. मुन्ना त्रिष्णावर पाय टाकायचा. त्रिष्णाने त्याला ढकललं. पण तो परत परत तसंच करायचा. त्रिष्णाने मग त्याला चिमटे काढायला सुरुवात केली, तर तो खिदळायलाच लागला. अचानक एकदम सगळे बेडवरून उठले आणि म्हणाले, “अब बस हो गया।” 

त्रिष्णाने तेव्हाच ठरवलं होतं, इस बास्टर्ड का कुछ तो करना चाहिए। हा साला परत परत पार्टनर म्हणून नकोच. नाय तर गेम चेंज करू. पण इतर सगळ्यांना हाच गेम पुढे कंटिन्यू करावा असं वाटत होतं. त्यामुळे कालच निघताना ठरलं की प्रत्येक कपलची एकेक वेगळी स्टोरी करायची. 

आज आल्या आल्याच त्रिष्णाने डिक्लेअर केलं की पहिली स्टोरी माझी होणार. मुन्ना तयार होताच. त्रिष्णा मनात म्हणत होती, या ढोल्याला चांगला सबक शिकवते! तिने अशी आयडिया काढली, की तिची केस डिव्होर्सपर्यंत गेली आहे. कोर्टात फाइट सुरू आहे. मुन्ना म्हणाला, “असं कसं? पैले आपण घरात राहू, भांडू, मग डिव्होर्स!” पण त्रिष्णा ठाम होती. ‘वो सब हो चुका है ऐसा समझने का। तू अ‍ॅग्री है तो बोल, नै तो जा फुट! मेरा हजबंड कार एक्सिडेंट में मर गया ऐसा समझेगी मैं।’ मुन्नाचं काही चालेना. पण डिव्होर्सचा गेम म्हटल्यावर साक्षी रडायला लागली. काही सांगेचना कारण रडण्याचं. त्रिष्णा वैतागून म्हणाली, “साक्षी, तुझे पसंद नै ना ये गेम, तू मत खेल।” त्यावर साक्षीने जोरातच भोकाड पसरलं. करुणा आंटी आत आल्या. त्यांना वाटलं, साक्षीची आई आज रात्री लेट घरी येणार आहे, तोवर साक्षीला इथेच राहू दे, असं ती सांगून गेल्यामुळे साक्षी रडतेय. गव्हर्नमेंट सर्व्हंट असलेल्या साक्षीच्या आईला अलीकडे अधूनमधून ऑफिस वर्कसाठी उशिरापर्यंत थांबावं लागतं. आंटी साक्षीची समजून काढून गेल्या. त्यांनी तिला एक चॉकलेट दिलं. होमवर्क झाल्यावर सगळ्यांना एकेक चॉकलेट मिळणार आहे, असं सांगून त्या गेल्या. आंटी मुलांचे लाडही करतात अधनंमधनं. आज त्यांचा मूड बरा होता. त्यामुळे मुलं आत-बाहेर करून आली. शी-शूसाठी वॉशरूमला जाऊन आली. धुल्लूने बाहेर ठेवलेली सायकल फिरवली. महिका, अंजोर, साक्षी, रोशन कॅरम बोर्ड मांडून बसले. त्रिष्णा डायनिंगमध्ये जाऊन थोडा वेळ टीव्ही पण बघून आली. दुपारी फोन आला. करुणा आंटीचा चेहरा त्रासिक झाला. पण आज त्या हळू बोलत होत्या. आवाज कडकच होता पण चढत नव्हता. त्रिष्णा आपल्याकडे बघतेय हे लक्षात आल्यावर त्यांनी डोळे वटारले. त्रिष्णा चुपचाप उठून आपल्या खोलीत गेली. दरवाजा बंद झाला. अगदी घट्ट. 

त्रिष्णाच्या डोक्यात आता वेगळीच आयडिया होती. तिने डिव्होर्सचा प्लॅन कॅन्सल केला होता. तिची स्टोरी असल्यामुळे ती तिलाच ठरवायची होती. मुन्नूसुद्धा ठरवू शकत होता. पण तो आज काही बोलला नाही. सारखा त्रिष्णाचा अंदाज घेत होता. त्रिष्णा एकदम म्हणाली, “मेरा हजबंड फॉरिन में है। जॉब करता है उधर। इधर कभीच आता नहीं।” मुन्नू म्हणाला, “मग आपण भेटणार कसं? लोकांना कसं कळणार आपण नवरा-बायको आहोत ते?” त्रिष्णा म्हणाली, “फोन पर बातें करेंगे। सबको समझेगा।” अंजोर किंचाळून म्हणाली, “करुणा आंटी जैसा?” त्रिष्णाने तोंडावर बोट ठेवून तिला तिथल्या तिथे दटावलं आणि खेळ सुरू केला. बाकीची मुलं त्रिष्णाची रिलेटिव्ह, मुलं नाही तर नौकरानी झाली. 

फोनवर संभाषण झालं. त्रिष्णाने प्रॉब्लेम्स सांगितले. पैसे जास्त पाठव, बेटी बीमार आहे, कामवाली पैसे वाढवून मागते, सास माँ को तीरथ यात्रा जाना है, असा पाढा वाचला. मुन्ना हूं हूं करत होता. “तू कैसी है डिअर?” असंही त्याने विचारलं. त्रिष्णाने फोन ठेवून दिला. दुसर्‍या दिवशी तोच डायलॉग. थोडा उन्नीस-बीस. सगळा एपिसोड त्रिष्णाच्या घरातच घडत होता. मुन्ना तिकडे परदेशात- कॉम्प्युटर समोर ठेवून बसलेला. तिसर्‍या फोन कॉलच्या वेळी मुन्ना अचानक म्हणाला, “डिअर, मैं इंडिया आ रहा हूँ। मुझे छुट्टी मिल गयी है। तुम सबको देखना चाहता हूँ।” त्रिष्णा म्हणाली, “असं एकदम नाही.” मुन्ना म्हणाला, “का नाही? मला तुझी, बंटीची आठवण येते. मी नाही आलो तर बंटी मोठा झाल्यावर मला ओळखणार पण नाही. ते काही नाही, मी येणार म्हणजे येणार! फ्लाइटचं तिकीट बुक केलंय.” तेवढ्यात काही ठरलं नसताना बंटी झालेला रोशन गुडघ्यांवर उभा राहून टाळ्या पिटायला लागला, “पप्पा आएंगे... सबको गिफ्ट लाएंगे।” त्रिष्णाने बंटीला एक फटकाही मारला. पण आता पुढचं होणारं ती टाळू शकत नव्हती. 

डिंगडाँग! बेल वाजली. मुन्ना फॉरिनहून आला होता. ढेर सारा लगेज था उसके पास। चार मोठ्या सुटकेस. सगळ्यांसाठी काय काय आणलं होतं! बंटीसाठी टॉइज, त्रिष्णाला भारीचे परफ्युम्स, मम्मीजी को गरम कपडे... लॉट ऑफ मनी. आता सगळे सुखात राहणार होते. भरपूर शॉपिंग करणार होते. टूर करणार होते. लगेच सुटीचं प्लॅनिंग करायला सुरुवात झाली. मग रात्र झाली. बंटी झोपला. मम्मी औषधं घेऊन झोपली. त्रिष्णा बेडवर पहुडली. थोड्या वेळाने मुन्ना आला, तिच्या शेजारी झोपला. त्रिष्णा म्हणाली, “तू दुसर्‍या बेडवर झोप.” मुन्ना धिटाईने म्हणाला, “नाही, इथेच झोपणार! फॉरिनला तुझी आठवण येते. मुझे प्यार करने का है।” इतर मुलं श्वास रोखून बघत होती. मुन्नाने पायावर पाय टाकायच्या आधीच त्रिष्णाने त्याला दूर लोटलं. म्हणाली, “आज नहीं होगा।” मुन्नाने विचारलं, “क्यूँ नहीं होगा?” त्रिष्णा म्हणाली, “पीरियड चालू है।” महिका, अंजोर, साक्षी, रोशन एकमेकांकडे टकामका बघू लागले. हे काय नवीन? मुन्ना म्हणाला, “तू झूठ बोलती है।” त्रिष्णाने फ्रॉक वर करून चड्डीत हात घातला आणि कापूस बाहेर काढला. “ये देख।” मुन्ना चडफडत उठला. दुसरा दिवस सुरू झाला. टूरला निघाली मंडळी. पुन्हा रात्र झाली. हिल स्टेशनवरचं हॉटेल. मुन्ना जवळ आला. त्रिष्णा म्हणाली, “चल हट! कहा ना, पीरियड है।” तिने चड्डीतून पुन्हा कापूस काढला. मुन्ना म्हणाला, “ये नाटक मत कर। मेरी छुट्टी खतम हो जायेगी।” त्यावर त्रिष्णा म्हणाली, “मैंने थोडीच तुमको बुलाया था? छुटी खतम होने तक मेरा पीरियड चालू है।” तिने पुन्हा कापूस काढून दाखवला. आता मुन्ना खवळला. आरोप करू लागला, “यू ब्लडी फूल! झूठी... नाटक करती है! हजबंड को फसाती है!” त्याने तिचे केस खसाखस ओढले तशी त्रिष्णा चवताळली, “यू रास्कल, सन ऑफ बीच। हरामजादे! साले, खून पी जाऊंगी तेरा!” मुन्नाने तिला एक जोरदार फाइट ठेवून दिली. त्रिष्णा किंचाळली. तिने मुन्नाला बोचकारायला सुरुवात केली. तिची नखं त्याच्या गालावर रुतली. मुन्नाचं रक्त खवळलं. तो त्रिष्णावर तुटून पडला. त्रिष्णा ऐकणार थोडीच होती? तिने त्याला चावे घेतले. आता मुन्नाही गुरासारखा ओरडू लागला. बाकी मुलांना काय करावं कळेना. ती रडू लागली. छोड़ो छोड़ो म्हणू लागली. त्रिष्णा रडत नव्हती, भिडत होती. मुन्नाने तिची चड्डी जोर देऊन खसकन खेचली, तर आतून कापसाची गुंडाळी सापासारखी बाहेर पडली. त्याने सैराट होऊन कापसाचे तुकडे पिंजारून सगळीकडे उडवायला सुरुवात केली. खोलीभर कापूस पसरला. तोच धाडकन दरवाजा उघडला गेला. दारात उभं राहून करुणाताई डोळे विस्फारून मुलांची अनावर झोंबी बघत होत्या. त्याच वेळी पलीकडे डायनिंग हॉलमध्ये अम्माजी वाती वळायचा कापूस कुठे गेला म्हणून सगळीकडे शोधत होत्या.

जयंत पवार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी