दत्ता : अनिल परांजपे

                                                              अनुभव ऑगस्ट २०२१

एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीच्या आत दडलेलामाणूसकधी कधी वेगळा असतो. कसा, हे उलगडून दाखवणारा अनुभव.

सकाळीच बंगलोरहून मुंबईला पोचलो होतो. बीकेसीमधलं काम आटोपून बाहेर पडलो तेव्हा तीन-साडेतीन झाले होते. जेवणखाण सोडून बराच वेळ मीटिंगझगडा चालला होता. शेवटी परत भेटायचं असं ठरवून विमनस्कपणे तिथून निघालो होतो. फोनमधे पुण्याला नेणार्या भाड्याच्या गाडीची माहिती येऊन स्थिरावली होती. ड्रायव्हरचं नाव होतं दत्ता. तो दहा मिनिटांत गाडी घेऊन हजर झाला. एरवी मी ड्रायव्हरांना हाय, हॅलो वगैरे करतो, हसून बोलतो, ते दार उघडून द्यायला लागले तर नको नको वगैरे म्हणतो. त्या दिवशी हे सगळं केलं की नाही माझं मलाच आठवत नाही, इतका मी विचारात होतो. मी यंत्रवत गाडीत बसलो. पुण्याला जायचंय हे माहीत असल्यामुळे दत्ताने काही न विचारता गाडी सुरू केली असावी बहुतेक. किंवा विचारलंही असेल. मी मीटिंगचेच विचार करत शांतपणे सीटवर मान टाकून पडून राहिलो.

‘‘एऽऽऽ भें---, आंधळा झाला का रे?’’ पुढून एकदम आवाज आला. मी चमकून अर्धवट तंद्रीतून जागा झालो.  ड्रायव्हर कुणाकडे तरी रोखून बघत शिव्या घालत होता. काय बरं नाव याचं?... हं, दत्ता. तो कोणाला शिव्या घालत होता ते काही कळलं नाही, पण त्याने मला माझ्या विचारांतून मात्र बाहेर काढलं होतं. थोड्याच वेळात लक्षात आलं, दत्ता अतिशय आक्रमकपणे गाडी चालवत होता. तसे नियमबियम पाळत होता, पण ते चालवणं जरा डेंजरसच होतं.

‘‘दत्ता... दत्ताच ना?’’

‘‘हो सर.’’ जराशा घोगर्या आवाजात दत्ता बोलला.

‘‘दत्ता, आपल्याला घाई नाहीये कुठलीही. जास्त जोरात जायची गरज नाहीये. स्पीड लिमिटमधे राहू दे. एक्स्प्रेस वेवर तर शंभरच्या पुढे स्पीड गेलाच नाही पाहिजे.’’ मी समजुतदार शांतपणे पण ठासून म्हणालो. तो काहीच बोलला नाही. आम्ही चेंबूरच्या आसपास पोचलो होतो. ट्रॅफिक वाढत चाललं होतं. दत्ताची आक्रमकता अजून गेलेली नव्हती, पण आता तो शिव्या देत नव्हता. दरवेळी मध्ये कोणी तरी तडमडलं की काही तरी पुटपुटत होता हे मात्र कळत होतं.

पहिल्यांदाच मी त्याच्याकडे नीट पाहिलं. आरशात त्याचा चेहरा अधूनमधून दिसत होता. होता तसा खप्पडच, पण चेहर्यावरच एक आक्रमकता पसरली होती. डोळे तांबारलेले आणि खुनशी, रोखून बघणारे, रस्त्यालाही थोडेसे बोचतील असे. मागून त्याची शरीरयष्टी दिसत नव्हती, पण खांद्यांच्या रुंदीतून गडी फार काही आडवा नाहीये हे कळत होतं. उंचीही बेतास बात वाटत होती. अंगात मळक्या तपकिरी उभ्या पट्ट्यांचा पिवळट शर्ट होता. मागून झालेलं हे त्याचं दर्शन अगदीच सामान्य होतं.

मी दत्ताचं निरीक्षण करत असतानाच त्याचा कुणाच्या तरी पुढे जायचा निकराचा प्रयत्न चाललाय हे मला जाणवलं. अटीतटीच्या जागेतून ओव्हरटेक करायला जाताना त्या पुढच्या टेंपोने आम्हाला दाबलं आणि आम्हा दोघांनाही कळायच्या आत दत्ताच्या तोंडातून एक शिवराळ लाखोली सुटली. आता मी त्याच्यावर उखडून त्याला परत शांतपणे टॅक्सी चालवायचा दम दिला. त्याचे डोळे आणखीनच तांबरले. आता आमच्यात एक अबोल ताण निर्माण झाला होता. मी लॅपटॉप काढून कामाला सुरुवात केली; पण अर्धं लक्ष गाडी कशी चालतीये याकडे होतंच.

‘‘थांबायचं का?’’ अचानक समोरून प्रश्न आला. मी पुढ्यातल्या प्रेझेंटेशनमधून डोकं बाहेर काढलं.

‘‘अं... कुठं आलो आहोत आपण?’’

‘‘हेऽऽऽ पयला टोल आलाय. नंतर लगीच फुड मॉल. थितं थांबायचं का तुमाला?’’ दत्ताने गाठ उकलली.

‘‘थांबू या. भूक लागलीये.’’

काही न बोलता दत्ताने फुड मॉलमधे गाडी घातली. फारसं मनात नसताना मी त्यालाही शिरस्त्याप्रमाणे माझ्याबरोबर चहा आणि खाण्याचं आमंत्रण दिलं. 

‘‘नगं.’’ दत्ता तुटकपणे बोलला.

मी एकटाच रेस्तराँमधे गेलो. मुंबईला जाताना पोहे आणि येताना वडापाव हे काही तरी रिच्युअलच बनलंय आता माझं. मी एरवी वडापाव कधी खात नाही, पण त्या प्रवासात मात्र हटकून खातो. पोटपूजा करून बाहेर गाडीपाशी आलो. समोर बघतो तर गाडीच्या डिकीवर एक स्वच्छ टॉवेल, त्यावर उघडलेला प्लॅस्टिकचा टिफिन, त्यातून बाहेर आलेले चकाकते स्टीलचे कडीचे डबे, स्टीलच्या छोट्याशा ताटलीत भाकरी, जवळच पाण्याची स्टीलची बाटली आणि एक बंद थर्मास ठेवून दत्ता उभ्यानेच जेवत होता. मी गेल्यावर त्याने मानेनेचथोडं थांबाअशी खूण केली. मी आधीच दत्ताला जळजळीत वडापाव खाऊन, चहा मारून, सिगरेट किंवा तंबाखूचा बार लावणार्या व्यक्तींमधे टाकून दिलं होतं. दत्ता त्या डोहाच्या कित्येक योजनं बाहेर होता. मी स्वस्थ उभा राहिलो. चहुबाजूला गाड्या, इतर ड्रायव्हर्स, खाण्यासाठी जगणार्यांसारखी दिसणारी अनेक तोंडं, त्यांची वचावचा बडबड या सगळ्यांमधे दत्ता स्थितप्रज्ञ शांततेने मन लावून जेवत होता. जेवण झाल्यावर त्याने सगळं शिस्तीत आवरलं, डबेडुबे धुऊन आणले, थर्मास उघडून चहा ओतला आणि पिशवीतून आणखी एक कप काढून मला खुणेनेचचहा घेणार काअसं विचारलं.  मी नाही म्हटल्यावर त्याने न बोलता शांतपणे आपला चहा संपवला. आम्ही निघालो.

पुणे-मुंबई प्रवासात टॅक्सीवाल्यांशी भरपूर गप्पा मारणारा मी दत्ताशी मात्र अजिबात बोललो नव्हतो. त्याच्या वागण्यावरून बोलावंसंच वाटलं नव्हतं. त्याचं हे शिस्तीतलं जेवण मात्र माझं कुतूहल चाळवून गेलं. लगेचच घाट सुरू झाला. दत्ताने गाडी वळवळत्या चाबकासारखी रहदारीतून वाट्टेल तशी पुढे काढायला सुरुवात केली. घाटात हळूहळू जाणार्या ट्रक्समधून अशी वाट काढत जाणं हे मीही केलं होतं; पण दत्ताची आक्रमकता जरा जास्तच अतिरेकी होती. माझा संयम सुटून मी त्यालाआत्ताच्या आत्ता गाडी थांबव, मी उतरतोय,’ असा दम दिला. त्याने आपल्या तांबारलेल्या जळजळीत नजरेने आरशातून माझ्याकडे पाहिलं आणि न बोलता वेग कमी केला.

लवकरच घाट संपला. एकही शब्द न बोलता द्रुतगती मार्ग आणि बायपासही सुटला. गाडी औंधच्या रस्त्याला लागली. पहिल्याच लाल सिग्नलपाशी दत्ता थांबला. एक भिकार्याचं पोर काचेपाशी येऊन दीनवाणे हावभाव करायला लागलं. मी दुर्लक्ष करतोय हे पाहून ते पुढे जाणार तेवढ्यात दत्ताने त्याला स्वतःच्या काचेपाशी बोलावून त्याच्या हातात काही तरी ठेवलं. मग आणखी एक पोरगं आलं. दत्ताने शेजारच्या पॅसेंजर सीटवरच्या मला न दिसणार्या पिशवीतून तीन-चार पोरांना काही तरी दिलं. असे भिकारी आले की काचा बंद करणं, गाडी जरा काही फूट पुढे नेणं या सगळ्याच ड्रायव्हरांच्या क्लृप्त्या असतात. त्या पार्श्वभूमीवर दत्ताचं वागणं अगदी वेगळं वाटलं. पुढच्या सिग्नलला परत तेच. दोन-तीन वेळा असं झाल्यावर माझी मलाच काहीशी लाज वाटायला लागली. ‘भिकार्यांना पैसे दिले तर हे असंच बळावत जातंया माझ्या ठाम विचाराचं मी कितीही निर्धाराने पालन करत असलो तरी कित्येक पोरांकडे बघून आतडं पिळवटण्याचा अनुभव मीही घेतला होता. दत्ताने मात्र हा प्रश्न त्याच्यापुरता सोडवलेला दिसला. न राहवून मी त्याला म्हटलं, ‘‘या पोरांना असले चार पैसे कशाला देतोस तू? जन्मभर भीकच मागत राहतील ते मग. दुसरंच कोणी तरी पैसे घेऊन जात असेल. यांना त्यातलं काय मिळत असेल शंकाच आहे मला.’’

‘‘मी त्यान्ला पैसे देत नाय्ये, बदाम देतोय.’’ दत्ता शांतपणे म्हणाला.

मला आधी कळलंच नाही. ‘‘काय देतोएस? बदाम?’’ मी विश्वास न बसून म्हणालो.

‘‘हो.’’ फार बोलायला दत्ता अजूनही तयार नव्हता. पुराव्यासाठी त्याने शेजारच्या सीटवरची पिशवी उचलून मला दाखवली. आत साधारण अर्धा किलो तरी बदाम असावेत. माझी जीभच खिळल्यासारखी झाली. मला कारण कळत होतंही आणि नव्हतंही.

मी बोलत नाही म्हटल्यावर जणू उमजून दत्ताच बोलायला लागला- ‘‘तुमी बोलला तसं त्यान्ला खायला काय मिळत न्हाय नीट. मंग काय तरी शेव फरसाण-पाव खात बस्त्यात. त्यान्ला भीक घालू ने ह्ये मलाबी पटतंय, पन बगवत न्हाय त्यान्ला आसलं काय तरी खाताना. म्हनून मग त्यान्ला सुकाम्येवा देतो. काय तरी तरी चांगलं पोटात जाईल.’’ त्याने खुलासा केला, काहीच विशेष न झाल्यासारखा.

परवडत नाहीम्हणून स्वतःच्या पोरांनाही रेशनसारखे बदाम देणारे काही मध्यमवर्गीय लोक माझ्या डोळ्यांसमोरून थयथयाट करून गेले. ‘‘हे कधीपासून करतोयस तू?’’ मी काय बोलायचं हे न कळून काही तरी बोललो.

‘‘हितं पुन्याला यून गाडीवं लागल्यापासून... तीन वर्सं झाली.’’

‘‘कुठला तू?’’

दत्ताने सातारच्या जवळच्या कुठल्या तरी गावाचं नाव सांगितलं. मी पुढचं काही न विचारता मग तो स्वतःच भरभरून बोलायला लागला. गावातली छोटी शेती. तिच्यातकायबी व्हीना’. मग दहावी झाल्यावर पुणं, एक-दोन फुटकळ नोकर्या, बापाकडून पैसा घेऊन ड्रायव्हिंगचं शिक्षण आणि आता टूरिस्ट टॅक्सी, अशी त्याची चढती भाजणी त्याने सांगितली. ‘‘आईनी यकच सांगितलं, भाईर जेवू नगंस, घरचंच खा. स्वता कर आन् जे खाशील त्यातलं चार घास गरिबाला दे. म्हनून मंग मी आदी चार भाकर्या जास्त करायचो आन् रस्त्यात पोरान्ला द्यायचो. पन् मंग ल्हान पोरांना काय मिळत न्हाय. भाकरी पटाक्किनी खाता येत न्हाय.  मंग मारामार्या व्हत्यात. आन् भाकरीत त्यान्ला काय इशेष वाटतबी न्हाय. मंग ग्लुकोज बिस्किटं द्यायला लागलो. मंग मदी पेपरात न्हवतं का आलं, की झेडपीच्या शाळांमदी पोरांना बिस्किटं देत व्हते, त्यावर बोंबाबोंब झाली की बिस्किटांत कायबी नसतंय म्हनून. मंग फळं दिली. तीबी पटाक्कन खाता येत न्हाईत. मंग सुकामेवा द्यायाला सुरवात केली. बदाम, काजू, अक्रोड आसं काय तरी देतो. पोरान्ला त्ये पटाक्कन तोंडात टाकता येतं. मंग मारामार्या व्हत न्हाईत. पोरान्लाबी येगळं वाटतंय. हातात पल्डं की पोरं खिडकीशीच लगीच तोंडात टाकत्यात. कुनी तसाच जायला लागला तर त्याला आदी तोंडात घाल म्हनून सांगतो.  आगदी ल्हान पोरं आसली तर मीच त्यांना तोंड उघडायला सांगून त्यांच्या तोंडात बदाम टाकतो.’’

दत्ता अगदी सहजपणे मला घायाळ करत होता हे त्याच्या गावीही नव्हतं. ‘‘किती पैसे लागतात याला?’’ मी विचारू का नको असा विचार करत शेवटी जराशा डिप्लोमॅटिकली विचारलंच.

‘‘आसं काय नाय, पोरं भ्येटली की तस्तसं देत जातो. कदी कदी दिवसाला शे-दोनशेचे पन बदाम व्हत्यात. कदी कदी कमी लागत्यात. म्हयन्याला यक-दोन हजार लागत असतीन.’’ दत्ताच्या आवाजात कसलीही फुशारकी नव्हती. 


गावातल्या ट्रॅफिकमुळे किंवा या भरभरून बोलण्यामुळे असेल, पण दत्ता अगदी व्यवस्थित गाडी चालवत होता. मीही निःशब्द झालो होतो. तोही कसल्या विचारात पडला होता कुणाला माहीत! सेनापती बापट रोडवर गाडी वळली. मॅरिएटपाशी यू टर्न घेताना घर जवळ आल्याची जाणीव झाली. आज मला घराची ओढ जाणवत नव्हती. दत्ताच्या गाडीत अजून बराच वेळ बसून राहावंसं वाटत होतं. घरापाशी उतरलो. पैसे ऑफिसकडून परस्पर दिले जाणार होते. शिरस्त्याप्रमाणेटिपदेण्यासाठी मी पाकीट काढायला हात खिशात हात घातला.

‘‘नगं सर... टिपबिप नगं... आपन भीक घेत न्हाय, द्येतो. आन् तीबी भीक नसती. ल्हान पोरांना दिली तर ती भीक नसती.’’ पंचविशीचा दत्ता अजूनही त्याच्या आई-वडलांनी केलेल्या संस्कारांवर अढळ श्रद्धा ठेवून होता. मी तरी पण पाकीट काढलं. नेहमीच्या शंभर-दोनशेच्या नोटेऐवजी सरळ दोन हजाराची नोट काढून त्याच्यापुढे धरली.

‘‘पुढच्या महिन्याचा खाऊ पोरांना माझ्यातर्फे घे.’’ दत्ता बधेना. ‘‘हे बघ दत्ता, तू जे काही करतोयस ते मला आवडलं. मी आत्तापर्यंत कधीच हा विचार केला नव्हता, आता करेन; पण माझ्याकडून होईलच असं नाही. तू मात्र निश्चित करतोयस. तेव्हा प्लीज नाही म्हणू नकोस. तू तो खर्च करणारच आहेस. तुला तुझ्याच पैशांनी खाऊ द्यायचा असेल तर तो देच. माझ्या पैशांनी जास्त पोरांना दे. किंवा याच पोरांना अजून थोडा जास्त दे. नाही म्हणू नकोस.’’ पैसे घेणार्याऐवजी देणाराच काकुळतीला आल्याचा हा माझ्या आयुष्यातला पहिलाच अनुभव!

दत्ताला काय वाटलं काय माहिती, त्याने माझ्या डोळ्यांत रोखून बघत माझ्याकडून ती नोट घेतली. तेच तांबारलेले डोळे, माझी कणव किती खरी आहे याचा जणू एक्सरे काढणारे! मग त्याने गाडीतली बदामांची पिशवी उचलली. त्यातून दोन-चार बदाम काढून माझ्या हातात ठेवत तो म्हणाला, ‘‘घ्या. आई म्हन्ती, कदी कुनाचं फुकट घेऊ ने.’’

अख्ख्या प्रवासानंतर दत्ता पहिल्यांदाच हसला. अगदी निर्मळ हसला. आता त्याची आज्ञा पाळण्याची पाळी माझी होती!

अनिल परांजपे

amparanjape@gmail.com

 अनिल परांजपे उद्योजक, इंजिनीअर, पर्यावरणवादी आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत. सध्या ते अमेरिकेत असतात.


 **********************************************

आपल्या आसपास घडणाऱ्या पण आपल्या विचारविश्वाचा भाग नसणाऱ्या घडामोडी समजून घ्याव्यात, त्या घडामोडींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा, आपल्या म्हणण्यापल्याडचे काही दृष्टिकोन समजून घ्यावेत, आपल्याला न दिसणारं जग जाणून घ्यावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच 'अनुभव' मासिकाचा दर महिन्याचा अंक म्हणजे आपला भवताल, आपला समाज समजून घेण्यासाठीची धडपड असते. अनुभव'च्या परिवाराचा एक भाग बनून तुम्हीही या प्रवासात सामील होऊ शकता.'अनुभव'चे वर्गणीदार बना

• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://imojo.in/anubhav

• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://www.instamojo.com/anubhavmasik/pdf-3a78e/

PDF अंक वार्षिक - ₹ ४००
अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :
वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० ।

• वर्गणी भरण्यासाठी संपर्क - 9922433614

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी