निर्वासितांचे सहोदर : प्रीति छत्रे
युरोपासमोर निर्वासितांच्या लोंढ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. जनमत निर्वासितांविरोधात तयार होत असताना या समस्येचा मानवी चेहरा समोर आणण्याचं काम काही पत्रकार, आणि वृत्त छायाचित्रकार चिकाटीने करत आले आहेत. निर्वासितांच्या या सहोदरांबद्दल..
“माय मिशन इज टू मेक शुअर दॅट नोबडी कॅन से: ‘आय डिडन्ट नो’, माय मिशन इज टू टेल यू द स्टोरी अँड देन यू डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू डू.”
-यान्निस बेहराकिस, वृत्त छायाचित्रकार
अरब
स्प्रिंगनंतर सिरिया, ट्युनिशिया
इत्यादी देशांमध्ये काय घडलं, निर्वासितांचे लोंढे युरोपकडे कसे निघाले, हे अनेक धाडसी आणि संवेदनशील पत्रकारांमुळे
जगाला समजलं. तुर्कस्तानातून ग्रीसमध्ये आलेले निर्वासित पुढे नॉर्थ मॅसेडोनिया, सर्बिया, हंगेरीमार्गे ऑस्ट्रिया किंवा जर्मनी गाठण्याच्या प्रयत्नांत होते. मानवी
तस्करांनी अल्बेनिया, क्रोएशिया
या समुद्रकिनार्यालगतच्या देशांतून जाणारा आणखी एक मार्ग प्रस्थापित केला होता. ‘वेस्ट
बाल्कन रूट फॉर मायग्रन्ट्स’ म्हणून ओळखल्या जाणार्या या मार्गांवरचे काही देश युरोपियन
युनियनचे सदस्य नसल्यामुळे त्या-त्या ठिकाणच्या सीमारेषांवर कडक बंदोबस्त असतो. अशा
प्रत्येक ठिकाणी निर्वासितांची अडवणूक होत होती. मानवी तस्कर त्यांचा गैरफायदा घेत
होते. त्यांच्याकडून पैसा उकळत होते. उपासमार, हिंसा याला धरबंध राहिला नव्हता.
नॉर्थ मॅसेडोनिया-ग्रीस सीमेवरचं जेव्जेलिया रेल्वे स्टेशन म्हणजे निर्वासितांच्या या मार्गातला कळीचा टप्पा होता. जेव्जेलिया हे गाव नॉर्थ मॅसेडोनियातलं मानलं जातं, मात्र ग्रीसची सीमा या गावातूनच जाते. जेव्जेलियाच्या अलिकडचं ग्रीसच्या हद्दीतलं इडोमेनी गाव म्हणजे असाच आणखी एक कळीचा टप्पा होता. लेस्बोस (ग्रीस) आणि लॅम्पेदूसा (इटली) या बेटांप्रमाणेच इडोमेनी, जेव्जेलिया भागात २०१५-१६ दरम्यान अक्षरश: अराजक माजलं होतं. लेस्बोस, लॅम्पेदूसा बेटं इतरवेळी पर्यटनस्थळं म्हणून तरी ओळखीची होती. जेव्जेलिया, इडोमेनी गावांची अशी काही ओळखही नव्हती. मात्र तिथली भयानक परिस्थिती इतर देशांना कळावी यासाठी जगभरातले अनेक पत्रकार जीव धोक्यात घालून या भागांमध्ये फिरले. त्यांतले काही मुक्त पत्रकार होते, तर काही मोठ्या वृत्तसंस्थांशी निगडित होते.
यान्निस
बेहराकिस हे त्यांतलं एक प्रमुख नाव. मध्यपूर्व आशियाचा गेल्या एक-दीड दशकातला सामाजिक
इतिहास छायाचित्रबद्ध करणार्या पत्रकारांमध्ये बेहराकिसचं नाव महत्वाचं मानलं जातं.
२०१५-१६ साली बेहराकिस आणि त्याच्या सहकार्यांनी सिरियातल्या युद्धाचा फोटोंमार्फत
माग घेतला. सिरियन निर्वासितांची वणवण, आपल्या मुलाबाळांना जिवंत ठेवण्यासाठीचा आटापिटा त्यांनी फोटोंमधून टिपला.
त्यासाठी त्यांना पुलित्झर पुरस्कार मिळाला.
अशा
प्रकारच्या वृत्तांकनाला ‘न्यूज फोटोग्राफी’ म्हटलं जातं. बेहराकिस म्हणतो- ‘न्यूज
फोटोग्राफी करताना अनेक उद्दीष्टं समोर असतात. तो एकमेवाद्वितीय, जादुई क्षण कॅमेरात पकडायचा असतो. असा क्षण
जो पुन्हा येणार नसतो. पाहणार्याला त्याची ताकद जाणवायला हवी. तो क्षण माणसांना हसवणार
किंवा रडवणार असतो. चांगल्या कामाला आर्थिक मदत करण्यासाठी प्रवृत्त करू शकणारा असतो.
किंवा बंदुकीचा ट्रिगर ओढण्यापूर्वी नीट विचार करायला भाग पाडू शकणारा असतो... मला
युद्धं, हिंसा आवडत नाही. पण मानवी आयुष्यातले सर्वोत्तम
आणि सर्वात वाईट क्षण मला तिथेच सापडतात. जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठीचं माझं
योगदान कोणतं? तर असे क्षण टिपणं.’
युद्धाचे
फोटो काढणं याला बेहराकिस ‘न्यूज फोटोग्राफी’चा कळस मानतो. २००० साली सिएरा लिऑनमधल्या
यादवी युद्धाचं चित्रांकन करत असताना तिथल्या सैन्याने दबा धरून केलेल्या हल्ल्यात
बेहराकिसचे दोन सहकारी मारले गेले. बेहराकिस आणि त्याचा अन्य एक सहकारी बालंबाल बचावले.
त्या मृत सहकार्यांच्या आठवणीच बेहराकिसला पुन्हा पुन्हा ‘वॉर फोटोग्राफी’कडे वळवत
राहिल्या.
तुर्कस्तानातून
ग्रीसमध्ये जाण्याची धडपड करणार्या निर्वासितांना पाहून बेहराकिस समूळ हादरून गेला.
त्यांच्या कथा फोटोंमधून जगाला सांगणं हे त्याने आपलं कर्तव्य मानलं. तेव्हाचे त्याचे
काही फोटो इतके जवळून काढलेले आहेत, की पाहणार्याला वाटतं आपणही त्या निर्वासितांसोबत बोटीत बसलो आहोत; ते त्यांच्या लहान मुलांना आपल्याकडेच सोपवत
आहेत. निर्वासितांच्या मदतीला भर समुद्रात जाणार्या बोटींबरोबरही बेहराकिस जायचा.
निर्वासितांनी किती पराकोटीचा धोका पत्करला आहे, जगाने त्यांच्याकडे पाठ फिरवणं कसं चुकीचं आहे, हे त्याला फोटोंमधून दाखवून द्यायचं होतं.
तेव्हाच्या
त्याच्या अनुभवाबद्दल त्याने एका ठिकाणी लिहिलंय- कधी कधी कळायचं नाही, की त्या लोकांचे फोटो काढावेत, की कॅमेरा बाजूला ठेवून देऊन त्यांना खायला
द्यावं, कपडे द्यावेत, मदतकेंद्रात नेऊन सोडावं. मग मी स्वतःला
समजवायचो, की फोटोंमधून त्यांची परिस्थिती जगाला सांगणं
हेच आपलं मुख्य काम आहे.
दोन वर्षांपूर्वी वयाच्या ५८ व्या वर्षी कॅन्सरच्या आजाराने बेहराकिसचा मृत्यू झाला.
ग्रीक
मुक्त पत्रकार आणि व्हिडिओग्राफर विल वॅसिलोपुलोस यानेही गेली ५-७ वर्षं लेस्बोस बेटावरच्या
निर्वासितांच्या परिस्थितीचा सातत्याने माग घेतला आहे. २०१५-१६ साली प्रचंड संख्येने
तिथे आलेले निर्वासित, बेटावर
त्यांनी पाय ठेवतानाची परिस्थिती, एकेकाच्या चेहर्यावर लिहिलेल्या कथा, बेटावर उद्भवलेली अनागोंदीची परिस्थिती हे सारं त्याच्या व्हिडिओ कॅमेराने
टिपलं. त्यासाठी अनेकदा तो त्या बेटावर गेला. अशा इतरही अनेक ठिकाणांचं चित्रिकरण, वार्तांकन त्याने केलं. पण लेस्बोस बेटावरचं
चित्र पाहून पूर्णपणे हबकून गेल्याचं त्यानेही नोंदवलं आहे.
पत्रकार
म्हणून तोलूनमापून वार्तांकन करणं त्याला तिथे अतिशय कठीण झालं होतं. बोटी भरभरून तिथे
येऊन ओतणार्या निर्वासितांची अवस्था कुणालाही आतून मोडून पाडणारी होती. कधीकधी तो
समुद्रकिनार्यावर एकटाच असायचा. लांब क्षितिजावर अचानक ४-५ ठिपके दिसायला लागायचे.
बघताबघता ते मोठे व्हायचे, त्या बोटी असायच्या आणि आत कोंबून बसलेली अगतिक माणसं, भीतीने आणि थंडीने काकडणारी. कधी तो एकटाच
किनार्यावर जायचा, आणि
त्याला अचानक एखाद्या लहान मुलाचं शव दिसायचं. आदल्या रात्री आलेल्या बोटीतलं ते मूल
असणार याचा त्याला अंदाज यायचा.
२०१६
मध्ये तुर्की सरकारने निर्वासितांसाठी ग्रीसच्या दिशेच्या सीमा बंद केल्या आणि लेस्बोस
बेटावरचा त्यांचा ओघ आटला. २०१७ साली वॅसिलोपुलोस पुन्हा एकदा लेस्बोसला एका वेगळ्या
कामासाठी गेलेला असताना त्याला त्या समुद्रकिनार्यावर आता कशी परिस्थिती आहे हे पाहावंसं
वाटलं. आधी ज्या ज्या जागी त्याने मन विदीर्ण करणारी दृश्यं पाहिली होती, त्यांचं चित्रिकरण केलं होतं, त्या त्या जागी तो पुन्हा गेला. त्याच्यातला
व्हिडिओग्राफर त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याने आधीचीच ठिकाणं, कॅमेराचे आधीचेच कोन वापरून तेव्हा-आणि-आता
अशा प्रकारच्या छोट्या छोट्या व्हिडिओ-क्लिप्स केल्या. नेटवर काही ठिकाणी त्या पाहायला
मिळतात. लेस्बोसच्या किनार्यांवर आता शांतता असली तरी आधीची दृश्यं कधीच आपली पाठ
सोडणार नाहीत, हे तेव्हाच्या एका लेखात त्याने प्रांजळपणे
कबूल केलं आहे. तुर्की सरकारची धोरणं बदलली, की पुन्हा हा ओघ सुरू होऊ शकतो, अशी चिंता आणि भीतीही तेव्हा त्याने व्यक्त केली होती. (गेल्या एक-दीड
वर्षांत या मुद्द्यावरून तुर्कस्तान आणि युरोपियन युनियनमध्ये रस्सीखेच सुरू झालेलीच
आहे.)
लेस्बोस
बेटावरच्या वार्तांकनासाठी वॅसिलोपुलोसला २०१६ सालचा ‘रॉरी पेक पुरस्कार’ मिळाला. रॉरी
पेक हा एक आयरिश मुक्त पत्रकार आणि युद्ध छायाचित्रकार होता. १९९३ साली मॉस्कोतल्या
‘ब्लॅक ऑक्टोबर’ घटनांचं चित्रिकरण करत असताना तिथल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर १९९५ साली त्याच्या पत्नीने ‘रॉरी पेक ट्रस्ट’ची स्थापना केली. जीव धोक्यात
घालून महत्वाच्या बातम्या जगापुढे आणणार्या मुक्त पत्रकारांसाठी ट्रस्टतर्फे दरवर्षी
पुरस्कार दिले जाऊ लागले. त्यासुमारास मुक्त पत्रकारांची संख्या हळूहळू वाढत होती.
मात्र असे पत्रकार कोणत्याही एका वृत्तसंस्थेशी कायमस्वरूपी जोडलेले नसल्यामुळे बातमीदारी
विश्वातला त्यांच्या कामाचा वाटा तसा दुर्लक्षितच होता. त्याकडे लक्ष वेधणं हे या ट्रस्टचं
आणि पुरस्कारांचं उद्दीष्ट होतं. जागतिक मुक्त पत्रकारिता विश्वात आता हे पुरस्कार
प्रतिष्ठेचे मानले जातात.
रॉरी पेक पुरस्कारांच्या (किंवा अशा इतर कोणत्याही आघाडीच्या जागतिक पुरस्कारांच्या) गेल्या दहा-एक वर्षांतल्या अंतिम फेरीच्या यादीवर एक नजर टाकली, पुरस्कारप्राप्त पत्रकारांनी हाताळलेले विषय पाहिले, तर सिरियातली यादवी, त्याचे परिणाम, तिथल्या सर्वसामान्यांची परवड याच गोष्टी प्रामुख्याने दिसतात.
फोटो, व्हिडिओंमधून घटना बघणार्यापर्यंत थेट
पोहोचते, हे खरंच. तरीही जगाला वेढणार्या अशा समस्येकडे
लिखित पत्रकारितेच्या माध्यमातून बघण्याचं प्रमाण आजही सर्वाधिक असेल. एखादी मोठी घटना
घडते तेव्हाचं वार्तांकन आणि त्या घटनेचे पडसाद, परिणाम, जनमानसातल्या
प्रतिक्रिया यांचा वेध घेत पुढे वेळोवेळी केलेलं वार्तांकन, या दोन स्वतंत्र गोष्टी असतात. डॅनियल ट्रिलिंग
हा ब्रिटिश पत्रकार या दुसर्या प्रकारातल्या पत्रकारांमध्ये मोडतो. गेली ५-७ वर्षं
त्याने युरोपातल्या निर्वासितांच्या समस्येचा सातत्याने वेध घेत विश्लेषणात्मक लेखन, वार्तांकन केलेलं आहे.
ट्रिलिंगने
अनेक निर्वासितांशी, निर्वासितांसाठी
काम करणार्या कार्यकर्त्यांशी, सरकारी अधिकार्यांशी बोलून ‘लाइट्स इन द डिस्टन्स: एक्झाइल अँड रेफ्युज
अॅट द बॉर्डर्स ऑफ युरोप’ हे पुस्तक लिहिलं आहे. जवळपास दोन वर्षं तो या पुस्तकावर
काम करत होता. त्यातून त्याच्याकडे माहिती, तथ्यं, अनुभव
यांचा मोठा साठा तयार झाला. त्यामार्फत तो या विषयावरचं स्वतःचं असं एक भाष्य करत आलेला
आहे.
ट्रिलिंग
आपल्या आजीचे अनुभव ऐकत लहानाचा मोठा झाला. त्याच्या आजीने दोनवेळा निर्वासितपण भोगलं
होतं. एकदा ती रशिया सोडून जर्मनीत आली तेव्हा, आणि दुसर्यांदा नाझी जर्मनीतून कशीबशी सुटका करून ती ब्रिटनमध्ये आली
तेव्हा. ट्रिलिंगच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आजीला ब्रिटनमध्ये स्थैर्य मिळालं ते सरकारमुळे नव्हे, तर सरकारवर आलेल्या दबावामुळे.
२०१८
मध्ये ट्रिलिंगने एक लेख लिहिला- ‘फाइव्ह मिथ्स अबाऊट द रेफ्युजी क्रायसिस’. २०१७-१८
च्या सुमाराला युरोपातला निर्वासितांचा ओघ कमी झाला. युरोपीय देशांच्या सरकारांनी नोंदणी
न झालेल्या निर्वासितांसाठी कायदे, नियम आणखी कडक केले. याचा अर्थ २०१५ साली उद्भवलेली समस्या आता संपली, असं कुणी समजू नये, असं ट्रिलिंग ठासून सांगतो. आपल्या म्हणण्याच्या
पुष्ट्यर्थ त्याने युरोपियन युनियनमधल्या देशांच्या दृष्टीकोनातल्या विसंगती दाखवल्या
आहेत. युरोपातली निर्वासितांची म्हटली जाणारी समस्या वास्तविक निर्वासितांची नाही, तर युरोपीय देशांच्या सीमाविषयक फसलेल्या
धोरणांची आहे, असं तो नोंदवतो.
ट्रिलिंग
लिहितो, निर्वासितांवर गुदरलेल्या प्रसंगांच्या
दर्दभर्या कहाण्या जगाला आकर्षित करतात. मात्र या समस्येवर योग्य उत्तर शोधायचं असेल
तर केवळ त्या कहाण्यांनी इतरांचा दृष्टीकोन बदलेल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. कारण
अनुकंपा तत्वावर केल्या जाणार्या मदतीला, सहानुभूतीला मर्यादा असतात.
निर्वासितांच्या
समस्येमुळे युरोपीय मूल्यं संकटात सापडली आहेत, असा एक सूर तिथे आळवला जातो. त्यालाही ट्रिलिंगचा आक्षेप आहे. निर्वासितांच्या
बाजूने बोलणारे आणि विरोधात बोलणारेही ‘युरोपीय मूल्यं’ या संज्ञेला हवं तसं फिरवून
वापरतात, याबद्दल तो नाराजी व्यक्त करतो. युरोपातल्या
निर्वासितांच्या समस्येची तुलना ज्यू होलोकास्टशी करणंही त्याला चुकीचं वाटतं.
२०१९ साली लिहिलेल्या ‘हाऊ द मिडिया कंट्रिब्यूटेड टू द मायग्रन्ट क्रायसिस’ या आणखी एका विस्तृत लेखात त्याने निर्वासितांच्या समस्येचा प्रसारमाध्यमांच्या अंगाने वेध घेतला आहे. जगभरातल्या निर्वासितांच्या संख्येच्या तुलनेत युरोपातल्या निर्वासितांची संख्या तशी कमीच भरते. मात्र ज्या प्रकारे ते युरोपात आले ते हादरवून सोडणारं होतं. अरब निर्वासित युरोपच्या दरवाज्यांवर धडका द्यायला लागले तेव्हा कुठे युरोपला ‘त्या तिकडच्या लोकांची’ दखल घ्यावीशी वाटली. प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट वृत्तं यायला लागली. कधी निर्वासितांकडे दयेच्या दृष्टीने पाहिलं जायचं, तर कधी ते आपल्या जमिनी, नोकर्या हडपू शकतात, असा सूर आळवला जायचा. ट्रिलिंगने या विरोधाभासांचं बारकाईने विश्लेषण केलं आहे. बाहेरच्या जगातून आपल्यावर हे मोठं संकट कोसळलं आहे, असं युरोपीय देशांनी त्याकडे बघू नये; स्थलांतर, संस्कृतींमधली देवाणघेवाण, परंपरांचं मोडत आणि घडत जाणं, हे सतत होतच असतं, असं तो म्हणतो.
अरब
स्प्रिंगनंतर युरोपात आलेल्या निर्वासितांमध्येही अनेक कुशल पत्रकार होते. सुरुवातीला
त्यांनी मिळतील ती छोटीमोठी कामं केली. कारण तगून राहण्याच्या धडपडीसाठी ते आवश्यक
होतं. मात्र जराशी संधी मिळताच त्यांनी परत एकदा पत्रकारितेचा हात धरला. स्थानिक पत्रकारांबरोबर
जमेल तसं काम सुरू केलं. अशा निर्वासित पत्रकारांमुळे अनेक अशा बातम्या, कथा समोर येऊ शकल्या, ज्याकडे स्थानिक पत्रकारांचं पूर्ण दुर्लक्षच
झालं असतं.
खास
पत्रकारांसाठी म्हणून काम करणार्या काही संस्थांचाही त्याला हातभार लागला. उदाहरणार्थ, फ्रान्सची ‘मेजों दे जर्नालीस (एम.डी.जे.)’
ही संस्था निर्वासित पत्रकारांना मदत करण्याचं काम करते. संस्थेमार्फत आजवर जवळपास
७० देशांमधल्या ४०० निर्वासित पत्रकारांना घरं, भाषाशिक्षण, इंटर्नशिप्स इत्यादी मदत मिळाली आहे. त्या सर्वांनाच पुढे पत्रकारितेतलं
काम मिळालं असं नाही. पण आवडत्या क्षेत्रात काम करण्याची त्यांची आशा टिकून राहण्यासाठी
त्याची नक्की मदत झाली.
अशाच
प्रकारे लंडनमध्ये २०१६ साली ‘लंडन कॉलेज ऑफ कम्युनिकेशन’तर्फे ‘रेफ्युजी जर्नलिझम
प्रोजेक्ट’ची सुरुवात झाली. या प्रोजेक्टच्या संचालक व्हिव्हिएन फ्रान्सिस म्हणतात, की मोठाल्या वृत्तसंस्था निर्वासित पत्रकारांना
कामं देऊ शकतील का, यापेक्षा
हे निर्वासित पत्रकार त्या संस्थांना काय देऊ शकतात, हे जास्त महत्वाचं आहे.
फ्रेंच पत्रकार निना
घेदारच्या मते
‘पाश्चात्य प्रसारमाध्यमं निर्वासितांकडे निव्वळ अनोळखी माणसांचा समूह
म्हणून बघतात. त्यांना नाव-गाव आहे,
त्यांच्याकडेही काही कौशल्यं आहेत, हे लक्षातच
घेतलं जात नाही; हे भयंकर आहे.’ फ्रान्सच्या
प्रसारमाध्यमांमध्ये निर्वासितांबद्दलचं वरवरचं वार्तांकन केलं जातं, ही गोष्ट तिला खूप टोचत होती. त्यातून तिने २०१८ साली
स्वतःची स्वतंत्र वृत्तसंस्था सुरू केली. सारा फरिद ही पाकिस्तानी
पत्रकार तिथे काम करते. सारा आणि तिच्या पत्रकार नवर्याला २०१८ मध्येच पाकिस्तानातून पळ काढावा लागला. सारा
पाकिस्तानातही निर्वासितांच्या प्रश्नांचाच माग घ्यायची. आपण
स्वतःही एक दिवस निर्वासित म्हणवले जाऊ, असं कधीच वाटलं नव्हतं,
असं ती सांगते. फ्रान्समध्ये आल्यावरही तिला स्वतःला
निर्वासित म्हणवून घ्यायला खूप दिवस जावे लागले. निना घेदारच्या
संस्थेमुळे त्या गोष्टीचा स्वीकार करणं तिला शक्य झालं.
मात्र
निर्वासित पत्रकारांना त्यांच्या निर्वासितपणाचं लेबल कायमस्वरूपी चिकटवलं जाऊ नये, त्यांना पाय रोवण्याची मदत केल्यानंतर त्यांच्याकडे
फक्त ‘पत्रकार’ म्हणून बघावं, असंही या क्षेत्रातले जाणकार बोलून दाखवतात. दुसरीकडे, २०१९ साली ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने केलेल्या
एका अभ्यासात असंही दिसून आलं, की यूके, जर्मनी, स्वीडनमधल्या वृत्तसंस्था स्थलांतरित आणि
निर्वासित पार्श्वभूमीच्या पत्रकारांना कामं देऊ इच्छितात, पण त्यांच्याकडे असे खूप कमी अर्ज येतात.
बदलत्या समाजव्यवस्थेच्या सर्व बाजूंवर प्रकाश टाकायचा असेल तर त्याकडे वेगवेगळ्या
दृष्टीकोनांमधून बघायला हवं. पत्रकारांमधलं वैविध्य यासाठी आवश्यक आहे. मात्र ते करताना
आपण कोणीतरी वेगळे आहोत, आपल्याला
पुरेशी संधी मिळत नाही, असं
निर्वासित पत्रकारांना वाटता कामा नये, असं हे अभ्यासकर्ते नोंदवतात.
ओमिद
रेझाइ हा इराणी पत्रकार. २०१४ मध्ये त्याला आपला देश सोडून जर्मनीत यावं लागलं. तिथे
भाषेचा अडसर असल्याने स्थानिक बातम्या त्याला कळायच्या नाहीत. त्याने तो खूप अस्वस्थ
व्हायचा. पुढे हॅम्बुर्ग मिडिया स्कूलमार्फत विस्थापित पत्रकारांसाठी चालवल्या जाणार्या
प्रशिक्षण आणि उमेदवारी कार्यक्रमात तो सहभागी झाला. २०१७ मध्ये त्याने इराण, अफगाणिस्तान, सिरियातून आलेल्या त्याच्यासारख्या आणखी
पत्रकारांसोबत मिळून ‘अमाल, बर्लिन!’ नावाची न्यूज-साइट सुरू केली. तिथे अरबी आणि फारसी भाषेत बर्लिन
शहरातल्या बातम्या दिल्या जातात. पाठोपाठ त्या मंडळींनी हॅम्बुर्ग शहरासाठी तशीच ‘अमाल, हॅम्बुर्ग!’ ही साइट सुरू केली. हळूहळू
त्यांना दिसलं, की त्यांच्या जर्मन मित्रांनाही साइटवरच्या
वृत्तांमध्ये रस होता. मग त्यांनी साइटवर जर्मन भाषेत बातम्यांचा सारांश द्यायला सुरुवात
केली. जर्मन वृत्तसंस्थांना न्यूज-लेटर्स पाठवायला सुरुवात केली. सध्या त्यांची चार
जणांची टीम हॅम्बुर्गच्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या ऑफिसमधूनच काम करते. त्या वृत्तपत्राच्या
यंत्रणेमुळे यांना बातम्या, फोटो मिळवणं सोपं जातं. आणि यांच्यामुळे त्या वृत्तपत्राला निर्वासितांच्या
अनोळखी जगताची माहिती मिळते.
निर्वासित पत्रकारांना साहाय्य करणार्या जर्मनी, फ्रान्स, यूके इथल्या स्वयंसेवी संस्थांच्या म्हणण्यानुसार, अशी देवाणघेवाण येत्या काळात अत्यावश्यक ठरणार आहे. युरोपातल्या निर्वासितांच्या समस्येने ही एक बाब प्रकर्षाने समोर आणली आहे.
**********************************************
आपल्या आसपास घडणाऱ्या पण आपल्या विचारविश्वाचा भाग नसणाऱ्या घडामोडी समजून घ्याव्यात, त्या घडामोडींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा, आपल्या म्हणण्यापल्याडचे काही दृष्टिकोन समजून घ्यावेत, आपल्याला न दिसणारं जग जाणून घ्यावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच 'अनुभव' मासिकाचा दर महिन्याचा अंक म्हणजे आपला भवताल, आपला समाज समजून घेण्यासाठीची धडपड असते. अनुभव'च्या परिवाराचा एक भाग बनून तुम्हीही या प्रवासात सामील होऊ शकता.'अनुभव'चे वर्गणीदार बना
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा