माकडं : जयंत पवार

नाटककार, लेखक जयंत पवार यांचं नुकतंच निधन झालं. जयंत पवार यांनी 'अनुभव' मासिकासाठी वेळोवेळी भरपूर लिखाण केलं. फेब्रुवारी २०१७च्या अंकातील कथा वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

मातीच्या उंच ढिगार्‍यांवरून पोरं फिरत होती. काही नुसतीच उभी होती. नीरव दुपार भगभगीतपणे सर्वत्र पसरलेली होती. 

काही दिवसांपूर्वी इथे दगड, माती, विटा, सिमेंट, पत्र्यांचा भला मोठा खच पडला होता. बुलडोझरने सर्व भुईसपाट केलं होतं. बॉम्ब पडून सर्व नेस्तनाबूत व्हावं, किंवा लढाईत सारं तहसनहस व्हावं किंवा पेंढार्‍यांनी गाव लुटून न्यावं तसं. तेव्हाही पोरं येऊन बघत उभी राहायची. धास्तावलेली असायची. कारण इथेच त्यांची घरं होती. इथेच त्यांच्या घरातून बाहेर जाण्याच्या आणि बाहेरून घराकडे परतण्याच्या पायवाटा होत्या, ज्या आता दिसत नव्हत्या. 

पण लवकरच सारं डेब्रिज उचललं गेलं. पत्रे, तुटक्या फरशा, विटा आणि सिमेंटच्या भुश्शाने तट्ट फुगलेले ट्रक निघून गेले. मैदान साफ झाल्यावर तिथे मोठे खड्डे केले गेले. त्या खड्ड्यांतून उकरलेल्या मातीचे बाजूला ढिगारे तयार झाले. 

त्या ढिगार्‍यांना डोंगर आणि खड्ड्यांना दर्‍या समजून पोरं फिरत होती. दर्‍यांमध्ये वाकून बघत होती. 

खूप बैठी घरं आणि बैठ्या चाळी या जमिनीवर काही महिन्यांपूर्वीपर्यंत आडव्यातिडव्या पसरलेल्या होत्या. या बेशिस्त वस्तीत चिक्कार चपट्या गल्ल्या होत्या, अचानक पुढे आलेले कोनाडे आणि गुप्त हालचालींचे आडोसे होते; समोरासमोर येणार्‍या दारांच्यामधे शहाबादी फरशा आणि त्यावरून येणारी जाणारी माणसं, धावणारी पोरं, थबकलेल्या बायका, हाळी देत फिरणारे फेरीवाले होते. या सर्वांचे रेकण्याचे, खाकरण्याचे, खोकल्याचे, रडण्याचे, चिडण्याचे, डिवचण्याचे, उल्हासण्याचे, निराशण्याचे आवाज होते. रेडिओचे, लग्ना-बारशाला कर्ण्यांतून वाजणार्‍या गाण्यांचे, भजनांचे, आराध्यांचे सकाळ-संध्याकाळ-मध्यान्ह-रात्रीपर्यंत वाहणारे सूर होते. हे सगळे आवाज, ध्वनी आणि संगीत गायब होऊन एक चरचरीत नीरवता सगळीकडे पसरल्याने पोरं हरवल्यासारखी आसमंताच्या पोकळीत ढिगार्‍यांवरून फिरत होती. 


या जागेवर काही दिवसांनी किंवा महिन्यांनी किंवा वर्षांनी उंच इमारती उभ्या राहतील आणि पोरं त्यात रहायला येतील. 

काही तरी संपून गेल्यानंतर काही तरी उगवण्याच्या दरम्यानचा करडेपणा पोरांच्या मनात पसरला होता. 

पोरांच्या लक्षात आलं, की झाडं दूर गेलीयत. चाळींच्या अधेमधे येणारी काही खुरटी, काही बुटकी, काही उंच आणि भरघोस झाडं तोडली आहेत. आता दूरदूरची झाडंच तेवढी सुरक्षित अंतर राखून तटस्थपणे उभी आहेत. या मधल्या झाडांवर चढता येत असे. उंच झाडांवर कायम पाखरं लटकलेली असत. दूर दूर गेलेले थवे सांजच्याला विमानासारखे झेपावत. नेमके आपल्या झाडांकडे परतत. सगळ्या कावळ्यांचं एक झाड होतं आणि सगळ्या बगळ्यांचं एक झाड. एका झाडाच्या पोपटी पानांआड सगळे पोपट संध्याकाळी गुडूप होत. प्रत्येकाची ठरलेली फांदी. एक झाड म्हणजे एक वस्तीच. 

या वसलेल्या झाडांकडे बघताना पोरांना जोरदार याद आली ती लालतोंड्या, लालबोच्या माकडांची. 

कुठूनशी ही माकडांची टोळी भर दुपारी अवतरायची. फांद्यांवरून सरसर लटकन माकडं धडाधड घरांवर उड्या टाकायची. चाळींच्या छपरांवर टाकलेल्या पत्र्यांवरून दणादण धावत सुटायची. पत्र्यांवर बायकांनी पापड-सांडगे वाळत टाकलेले असत, ते पळवायची. वाळत घातलेले कपडे लंपास करायची. एखाद्या उघड्या दारातून पटकन घरात शिरून खाण्याचे जिन्नस घेऊन छू व्हायची. त्यांच्या पत्र्यावरच्या दडदड आवाजानेच घरातली माणसं सावध व्हायची. बायकांची शिवीगाळी सुरू व्हायची. पोरं हातात काठी, फळकूट, दगड घेऊन धावत सुटायची- सरसर पत्र्यावर चढायची. माकडांच्या मागे जीव तोडून पळायची. माकडं धूम ठोकायची. पोरं हाताला मिळेल ते माकडांवर फेकायची. त्यांचा नेम चुकवत माकडं झाडांवर लटकन गायब व्हायची. हा एक खेळच झाला होता पोरं आणि माकडांच्यात. पोरं दातओठ खाऊन मागे लागायची आणि माकडं वळून बघत टुकटुक खिजवायची. 

पण एकदा एक माकड तडाख्यात गावलं. पोरांनी त्याचं पार पेकाट मोडलं. इथून दुरुस्ती सुरू झाली. मग एक दिवस एका लहानग्या पोराला एक माकड चांगलंच बोचकारून गेलं. पोरांना वाटलं, माकडांनी बदला घेतला. हे वैर वाढत गेलं. माकडं पत्र्यावर आली म्हटल्यावर पोरं युद्धाला निघाल्यासारखी त्वेषाने धावून जाऊ लागली. माकडांनी आणखीनच नासधूस सुरू केली. त्यांच्याही डोळ्यांत खुन्नस आली. 

ही दुश्मनी आता आतापर्यंत शाबूत होती. 

आता मात्र उच्छाद संपला होता. 

नसलेल्या चाळींवरच्या, नसलेल्या पत्र्यांवर, नसलेल्या झाडांवरून उड्या मारून, नसलेले पापड पळवण्याच्या बेतात असलेल्या अदृश्य माकडांकडे बघताना पोरं गुमसूम होती. आपल्याला हायसं वाटतंय की रिकामं वाटतंय हे त्यांना ठरवता येत नव्हतं. 

अचानक रिकाम्या आसमंतात काही तरी हालचाल झाली. समोरच्या मातीच्या ढिगार्‍यावर अकस्मात उगवल्याप्रमाणे आधी डोकी आणि मग इवलीशी शरीरं दिसू लागली.

ती लोलतोंड्या, लालबोच्या माकडांची टोळी होती. पलीकडच्या मातीच्या टेकडीवर ती वर-खाली बसून पोरांकडे एकटक बघत होती. 

पोरांचंही लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्यांच्या चेहर्‍यांवरचे भाव बदलले. काही हसली, काही चकित झाली. काही घाबरली, काही ओरडली, काही चिडली. माकडांच्याही डोळ्यांत तसेच भाव. प्रत्येकाची भावना वेगळी. 

एकमेकांचे शत्रू आमोरासमोरच्या डोंगरांवर ठाकलेले आणि मध्ये खोल दरी. दोघांच्याही नजरा एकमेकांवर जखडलेल्या. 

हळूहळू त्या डोळ्यांतले भाव बदलत गेले. माकडं गरीबपणे पोरांकडे बघू लागली. पोरांनाही राग येईना. एक तह होत होता, ज्यात युद्धविरामाची अनुच्चारित घोषणा होती. 

दोन्ही बाजूंनी शरणागती पत्करली होती. 

दुपारच्या नीरव शांततेत डोळाभेटीच्या सलग धाग्यात एक निरामय कातरता ओवली जात होती. 

- जयंत पवार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी