हॅरीचे हसू : जयंत पवार
नाटककार, लेखक जयंत पवार यांचं नुकतंच निधन झालं. जयंत पवार यांनी 'अनुभव' मासिकासाठी वेळोवेळी भरपूर लिखाण केलं. एप्रिल २०१७च्या अंकातील कथा वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातला हरी अखेर हसला. खदा खदा हसला. मध्यरात्रीच्या काळोखात कसल्या तरी गडगडाटी आवाजाने क्युरेटर खडबडून जागा झाला नि हरीच्या पिंजर्याकडे धावत सुटला. पिंजरा कसला तो, एक छोटं ऐसपैस मैदानच! चहुकडे पाऊलभर हिरवळ आणि मधोमध तुडुंब भरलेला तलाव- हरीला डुंबण्यासाठी. त्या तलावाच्या काठावर उभा राहून हरी खदखदा हसत होता. आपला विशाल जबडा त्याने इतका मोठा पसरला होता की त्यात अख्खी पृथ्वी सामावली असती. त्या जबड्यातून त्याचे तीक्ष्ण शुभ्र दात चमकत होते. यशोदेने माखनचोर बाळकृष्णाला तोंड उघडायला लावल्यावर त्याच्या मुखात विश्व सामावलेलं पाहून यशोदेला जसा आधी धक्का बसून मग पृथ्वीमोलाचा आनंद झाला होता अगदी तसाच धक्कानंद क्युरेटरला झाला होता. तो उलट्या पावली धावत जाऊन प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापकाला फोन करता झाला. मध्यरात्री खणखणणार्या फोनने वैतागून जाग्या झालेल्या व्यवस्थापकाला हरी हसतोय ही बातमी कळताच तोही हर्ष पोटात मावेनासा होऊन खोलीतल्या काळोखात गदगदून हसू लागला. त्याने ही वार्ता शिताफीने अशी काही पसरवली की ती पुढील काही मिनिटांतच गृह राज्यमंत्र्यांच्या कानी पडली. तेव्हा ते देशाचा विकासदर वाढवण्यासंबंधी चाललेल्या एका गहन चर्चासंपन्न बैठकीत काही महत्त्वाची आकडेवारी सादर करत होते. त्यांच्या भ्रमणध्वनीच्या छोट्या पडद्यावर त्यांनी ‘हरी खदखदा हसतो आहे’, अशी अक्षरं वाचली तेव्हा त्यांनी सर्व चर्चा थांबवून तो भ्रमणसंदेश सर्वांना दाखवला. त्यासरशी बैठकीचं गंभीर वातावरण अचानक हास्यलकेरीत बदलून गेलं. आता सगळा नूरच बदलणार होता. सरकारवरची प्रच्छन्न टीका थांबणार होती. टीकाकारांचे दात घशात जाणार होते. गृहराज्यमंत्र्यांची थट्टा करणार्यांचंच हसं होणार होतं. त्यांची मंत्रिमंडळातली पत वाढून आता कदाचित जास्तीचं दान त्यांच्या पदरात पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापकाची शान वाढणार होती. नव्या खर्चिक योजना मंजूर होऊन त्यांचा लाभ खालपर्यंत झिरपणार होता. क्युरेटरची नोकरी सहीसलामत तर राहिलीच होती, पण आता तो पदोन्नतीस पात्र ठरणार होता. मुख्य म्हणजे देश आनंदून जाणार होता. हास्याची एक देशव्यापी लहर उठणार होती. कारण हरी हसत होता. जबडा आ वासून खदखदा हसत होता.
आता हे सांगायलाच हवं, की हरी हा सत्तावीस वर्षांचा पाणघोडा होता. तुकतुकीत जांभळ्या कांतीचा, आखूड बलदंड पायांचा आणि तपकिरी डोळ्यांत आश्चर्यकारक नम्र भाव असलेला हरी हा वर्षभरापूर्वी कांगोच्या जंगलातून राष्ट्रीय प्राणिसंग्रहात आणला गेलेला, संपूर्ण राष्ट्राचं लक्ष वेधून घेणारा हॅरिसन नावाचा आकर्षक पाणघोडा होता. हॅरिसनचं हॅरी आणि हॅरीचं हरी असं देशी नामकरण होऊन तो इथे आल्यापासून कुतूहलाचा विषय बनलेला होता. त्याच्याविषयी कुतूहल निर्माण होण्याचं आणि त्याचं आकर्षण वाटण्याचं एकमेव कारण म्हणजे तो हसर्या पाणघोड्यांच्या जातीतला पाणघोडा होता.
लाफिंग हिप्पोपोटेमस ही मध्य आफ्रिकेतली एक अतिशय दुर्मिळ जात आहे, हे फारच थोड्यांना माहीत असेल. खरं तर पाणघोडा हा अत्यंत हिंसक प्राणी मानला जातो. ओठांवरच्या टोकदार केसांनी गवताचे भारे अलगद उचलून कुरूकुरू फस्त करणारा हा पशू जबडा वासून गरजला की भले भले प्राणी थरथरू लागतात. समोर आलेल्या सिंहालाही भारी पडणारा हा प्राणी. तुम्ही-आम्ही त्याला दुरून पाहिलेलं आहे. बहुतेक वेळा प्राणिसंग्रहालयात किंवा सर्कशीत किंवा अॅनिमल प्लॅनेट-डिस्कव्हरीसारख्या टीव्ही चॅनेल्सवर. अनेकदा तो पाण्यात शांतपणे डुंबतानाच दिसतो किंवा गवतात पुतळ्यासारखा उभा असलेला. त्याच्या बटाट्यासारख्या उघड-मीट होणार्या डोळ्यांतून त्याच्या हिंस्रतेचा अंदाज येत नाही; पण कांगोच्या खोर्यातल्या लोकांना विचाराल तर त्याच्यासारखा धोकादायक प्राणी दुसरा नाही. डिस्कव्हरी चॅनेलवरची ती सतरा सिंहांच्या बछड्यांच्या तावडीत सापडलेल्या एका पाणघोड्याची चित्रफीत तुम्ही पाहिली असेल तर त्याच्या दगडी शांतपणाच्या आड दडलेल्या क्रूरतेचा अंदाज तुम्हाला येईल. झुडुपाआड स्वतःत मग्न होऊन तो बसला असता पाठीवर उड्या घेत त्याला चावत, ओरबाडत सुटलेल्या चेकाळलेल्या छाव्यांपासून तो पळू लागला आणि पळता पळता गर्रकन वळला. त्याने एकदम जबडा वासला आणि एक अख्खा बछडा कचकन दाढेखाली घातला होता. ते दृश्य पाहणार्यांच्या काळजाचा ठोका एक क्षण चुकलाच असणार. कांगोच्या विरंगा पार्कच्या जंगलात अशा कराल जबड्यांच्या पाणघोड्यांच्या झुंडीच्या झुंडी वावरत असतात. त्यांत लाफिंग हिप्पो मात्र वेगळे ठरतात. तेही भला थोरला जबडा वासतात पण इतर हिप्पोंप्रमाणे त्यांच्या डोळ्यांत त्या वेळी खुनशी भाव दिसत नाहीत, उलट त्यांचे डोळे बारीक पसरट होत मिश्कील दिसतात. त्यामुळे ते तोंड उघडून हसताहेत असंच वाटतं. आणि खरंच ते हसत असावेत. निदान कांगोच्या जंगलातल्या हुतू आणि माई माई जमातीच्या लोकांची तशी ठाम समजूत आहे. शिवाय हे पाणघोडे कमी हिंसक असल्याचं विरंगा पार्कच्या जंगल अधिकार्यानेही आपल्या गृह राज्यमंत्र्यांना ठामपणे सांगितलं होतं. या लाफिंग हिप्पोजमधलाच एक होता हॅरिसन, जो गृह राज्यमंत्र्यांच्या पत्नीच्या मनात भरला होता.
झालं होतं असं, की युगांडात झालेल्या तिसर्या जगातल्या शांततेविषयीच्या एका परिषदेला आपले गृह राज्यमंत्री सपत्नीक गेले होते. परिषद आटोपल्यावर आफ्रिकन सफारीचा आनंद लुटावा म्हणून ते कांगो प्रजातंत्रातल्या अंगोला, नामीबिया वगैरे देशांत फिरले आणि तिथली प्राणिसंपदा पाहून थक्क झाले. ते विरंगा पार्कच्या जंगलात सैर करत असताना हा हॅरिसन अचानक त्यांच्या गाडीच्या समोर आला. त्याने डोळे किलकिले करत आ वासला मात्र, गृह राज्यमंत्र्यांच्या पत्नीच्या अंगावर गोड रोमांच उठले आणि त्या बसल्या जागी चीत्कारल्या. हॅरीची चकाकणारी तुपाळ गुळगुळीत कांती; फुगीर, गोल, लयबद्ध वळलेलं अजस्र पोट; जमिनीत रुतून बसलेले खाबांसारखे जाडजूड पाय आणि त्याचं अणकुचीदार दातांना मिरवणारं हसू. गृह राज्यमंत्री भार्या उद्गारल्या, “हाच तो! हाच तो!” त्यांना आठवलं, की आपल्या लाडक्या लेकीबरोबर (जी आता ओहयो विद्यापीठात क्रॅश कोर्स करतेय.) एकदा बघितलेल्या ग्रेट रशियन सर्कसमध्ये असाच हसणारा हिप्पोपोटेमस होता. तो त्या सर्कशीचा सर्वांत मोठा आकर्षणबिंदू होता. त्याच्या दर्शनाने गृह राज्यमंत्री कन्या आणि भार्या एकाच वेळी थरारून गेल्या होत्या. ग्रेट रशियन सर्कसने जाहिरातच केली होती : या आणि हसणारा पाणघोडा पाहा! लहान मुलं तर अक्षरशः किंचाळत होती त्याला पाहून. अनेकांना त्याच्या जबड्यात हात फिरवून बघण्याचा अनिवार मोह होत होता. मंत्रिपत्नी पतिदेवांना म्हणाल्या, “आपण या हिप्पोला घेऊन जाऊ या.” मोठ्या लोकांचे हट्टही मोठे असतात. ते पुरवलेही जातात. कारण त्यामुळे हट्ट पुरवणार्याचं मोठेपण सिद्ध होत असतं. रामायणात नव्हता का सीतेने कांचनमृगाचा हट्ट धरला? पण मंत्रिपत्नीचा हट्ट त्याहून मोठा ठरला. कारण सीतेला स्वतःच्या सोन्याच्या काचोळीसाठी मृग हवा होता, तर मंत्रिपत्नीला देशासाठी पाणघोडा हवा होता. गृह राज्यमंत्र्यांनी कौतुकभरल्या नेत्रांनी पत्नीकडे कटाक्ष टाकला आणि ते म्हणाले, “दिला!”
मंत्री शब्दाचे पक्के! निश्चयाचे महामेरू! कोसो योजने दूर असलेल्या आपल्या देशात आफ्रिकन हिप्पोपोटेमस नेऊन त्याला आपली राष्ट्रीय संपत्ती बनवायचा निश्चय त्यांनी केला. देशाच्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात पाणघोडे नव्हते असं नाही; पण हा हसरा पाणघोडा होता. त्याच्या या गुणामुळे तो एकमेवाद्वितीय होता. एका उभरत्या राष्ट्राची तो शान ठरू शकला असता. विरंगा पार्क जंगल अधिकारी म्हणाला, “साहेब, ही जमात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगभरच्या सर्कसवाल्यांनी मोठ्या किमती मोजून हसणारे पाणघोडे नेले आहेत. ही तशी तुलनेने शांत जमात. रवांडातून आलेले हुतू याचा फायदा घेतात आणि त्यांना ठार करतात. यांचं मांसही भयंकर रुचकर असतं. त्याला कायद्याने बंदी असल्यामुळे पुर्या आफ्रिका खंडात त्याचं जोरदार ब्लॅक मार्केटिंग चालतं. ह्या हसर्या पाणघोड्यांचे दात तर हत्तींनाही आपले दात घशात घालायला लावतील अशा किमतींना विकले जातात.” त्यावर गृह राज्यमंत्री म्हणाले, “तुम्ही किमतीची चिंता करू नका. आम्ही हा पाणघोडा नेणार म्हणजे नेणार!” “पण एकटा नर पाणघोडा कसा नेणार? त्याच्या जोडीला मादी नको? ती नसेल तर हा पिसाळेल आणि हसणं विसरून दंगा करेल.” जंगल अधिकार्याचा प्रश्नही बरोबर होता. मग त्यानेच एक पाणघोडी दाखवली. मेसी! दोघांचा सौदा काही हजार कोटींना झाला म्हणतात. एका महाकाय बोटीवर हॅरी आणि मेसीला चढवण्यात आलं. दोन महिने पुरेल इतकं गवत बोटीवर भरण्यात आलं. त्यांच्यासाठी बोटीवर लावण्यात आलेला पिंजरादेखील अजस्र होता. केप ऑफ गुड होपला वळसा घालत दोन हिप्पो दूरदेशी निघाले.
आपल्याकडे ते येण्यापूर्वीच त्यांच्या आगमनाची द्वाही माध्यमांनी देशभर फिरवली होती. वर्तमानपत्रांमध्ये बातम्यांचा पाऊस पडत होता. टीव्हीवर मंत्रिमहोदयांच्या मुलाखती, पाणघोड्याच्या जमातींची माहिती, इतिहास आणि सरकारी प्रसिद्धी माध्यमांद्वारे हॅरीच्या छायाचित्रांचा सुकाळ, असा सगळा माहोल बनला होता. प्राणिसंग्रहालयात नव्या पाणघोड्यांसाठी प्रशस्त जागा निर्माण केली गेली. त्यात मोठा तलाव बांधण्यात आला. चहुबाजूंनी चर खणून आतली जागा मोकळी ठेवण्यात आली होती. पिंजर्याची रचना टाळण्यात आली होती. कुणालाही हसर्या पाणघोड्यांना थेट निरखता येणार होतं, त्यांचे फोटो काढता येणार होते. अर्थात विरोधकांनी पाणघोड्यांवर चाललेल्या उधळपट्टीचा मुद्दा करून चार दिवस संसदेचं काम रोखून धरलंच. पण त्यामुळेच सरकारसाठीही हा प्रतिष्ठेचा प्रश्न झाला. हसरा पाणघोडा देशाच्या प्राणिसंग्रहालयात येणं यासाठी महत्त्वाचं झालं होतं, की तो आता देशातल्या सुखी होत चाललेल्या जनतेचं प्रतीक बनून जाणार होता. देश प्रगतीचा अविश्वसनीय आलेख गाठत असताना सुखाचा निर्देशांकही वाढणं क्रमप्राप्त होतं. सुखी जनता रडत नाही, ढेपाळत नाही. ती हसत असते, आक्रमकपणे पुढे जात असते आणि आपल्याबरोबर देशालाही पुढे नेत असते. हसणारा पाणघोडा नेमका हाच संदेश जगभर घेऊन जाणार होता. गृह राज्यमंत्र्यांच्या कल्पकतेचं कौतुक होऊ लागलं.
हॅरी आणि मेसी आले. त्यांचं जंगी स्वागत झालं. पाणघोड्यांच्या राष्ट्रार्पण सोहळ्यासाठी प्राणिसंग्रहालयात झुंबड उडाली. अनेकांना तिकिटाअभावी त्या दिवशी संग्रहालयात प्रवेश मिळू शकला नाही. लोक म्हणत होते, दिसतोय खरा वेगळा पाणघोडा! त्याची मादीही कशी धिप्पाड आहे बघा! जोडा शोभतोय बाकी छान! सगळे त्यांच्याकडे टक लावून बघत राहिले. पण काय आश्चर्य! त्या दिवशी हॅरी हसला नाही. मेसीही हसली नाही. त्यांनी जबडा उघडलाच नाही. लोक हरीऽ हरीऽ असा पुकारा करत ओरडले, चिअरअप करून दमले. क्युरेटरने त्यांच्या पुढ्यात गवताचे भारे टाकले; पण दोघांनीही तोंड उघडलं नाही. हॅरी अचानक गंभीर झाला होता. रोखून सार्यांकडे पाहत होता. त्या दिवशी लोक निराश होऊन गेले. दुसर्या दिवशी दुसरे लोक आले, पण त्यांच्याही पदरी निराशाच पडली. दुसर्या दिवशीही हॅरी हसला नाही. पुढचे काही दिवस गर्दी होती, पण हॅरी हसला नाही. मेसीदेखील हसली नाही. हळूहळू प्राणिसंग्रहालयातली गर्दी ओसरू लागली, पण सरकारवरच्या टीकेला मात्र पूर आला. हसणारा पाणघोडा ही शुद्ध थाप आहे, जनतेची दिशाभूल आहे, हा मोठ्ठा भ्रष्टाचार आहे आणि यात बडे बडे लोक गुंतलेले आहेत, अशी चर्चा सुरू झाली. आफ्रिकेतल्या ज्या कंपनीच्या मार्फत हा व्यवहार झाला होता ती कंपनीच बोगस आहे, असा शोध माध्यमांनी लावला. या टीकेने गृह राज्यमंत्री हवालदिल झाले. काहीही करा पण हॅरी हसलाच पाहिजे, असं फर्मान त्यांनी हाताखालच्या अधिकार्यांना सोडलं. सगळे कामाला लागले.
खरं तर मोठी फौजच कामाला लागली होती. देशातले प्राणितज्ज्ञ हॅरी का हसत नाही यावर विचार करू लागले होते. तो गांगरला आहे का, खचला आहे का, नर्व्हस झाला आहे का, यावर मानसोपचारतज्ज्ञांचे सल्ले मागवले गेले. त्याच्या खाण्यात बदल केले गेले. त्याला प्रसन्न वाटण्यासाठी आफ्रिकन संगीत वाजवलं गेलं. त्याच्या दोन इंच जाड त्वचेवर बर्फगार हुळहुळणार्या पाण्याचा मारा करण्यात आला. मात्र, हरी शांत होता. मेसीही शांतच असायची. काहीही करून ते आक्रमक होत नाहीत हे लक्षात आल्यावर त्याच प्राणिसंग्रहालयातली अस्वलं त्यांच्या अंगावर गुदगुल्या करण्यासाठी सोडण्यात आली. अस्वलं आधी बिथरली होती; पण त्यांची भीड चेपल्यावर त्यांनी गुदगुल्या केल्याच. पण हरी आणि मेसी (जिचा देशी उच्चार मौसी असा झाला होता.) ढिम्म! माकडं आणून हरीसमोर नाचवली. हरी शांतपणे त्यांच्याकडे बघत राहिला. कोणी म्हणालं, “सर्कसवाल्यांना ह्यांची नस बरोबर कळते. सर्कशीतल्या विदूषकांना बोलवा.” लाल नाकाचे चेहरे रंगवलेले विदूषक आले. त्यांनी खूप चाळे केले, कोलांटउड्या मारल्या, विजारी सोडल्या, पडले, धडपडले. ते पाहून आजूबाजूला जमलेले लोक लोटपोट होऊन हसले, पण हरी आणि मौसीच्या चेहर्यावरची रेष हलली नाही. मग काही महाभाग म्हणाले, “त्यांचे जबडे उघडण्यासाठी प्रयत्न करा. हवं तर रेकॉर्डेड लाफ्टर्सचा प्लेबॅक देऊ.” पण हरीने गवत खाण्यापुरतं तोंड उघडलं तेवढंच. त्याचा विशाल वासलेला जबडा कोणी पाहिलाच नाही. हरी गुमसूम असायचा.
स्वतःतच गढून गेल्यासारखा विचारी मुद्रा करून बसायचा. तो मेसीबरोबर पाण्यात डुंबायचा, पण ती क्रीडा नव्हती. तो शांतपणे तिच्या पाठीवर मान टाकून पाण्यात पडून राहायचा. गृह राज्यमंत्र्यांनाही आता वाटू लागलं, आपली फसवणूक तर नाही झाली? त्यांनी कांगोच्या जंगल अधिकार्यांना फोन लावला. ते म्हणाले, “तुम्ही पाहिला तोच हा पाणघोडा. आम्ही आफ्रिकन लोक एकवेळ ठार मारू, पण फसवणार नाही कुणाला.” मग त्यांनी आणखी एक माहिती सांगितली ती अशी, की लाफिंग हिप्पोजमधले काही हिप्पोज गंभीर असतात. ते खूप विचार करतात. क्वचितच हसतात. पण ते हसले की भूमंडळ थरारून जातं. हे दुर्मिळातले दुर्मिळ पाणघोडे. त्यांच्या पूर्वजांच्या कवट्या झांबियाच्या अरण्यात सापडल्या आहेत. त्यांच्यावर अभ्यास चालू आहे.पण आपल्याला विचारी पाणघोड्यांची गरज नव्हती. ते सुखी जनतेचे प्रतीक कसे बनू शकले असते? आणि विचारी जनता काही देशाला समृद्धीच्या वाटेवर नेत नाही.
मग प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापकांनी सगळी सूत्रं आपल्या हातात घेतली. क्युरेटरला त्यांनी विश्वासात घेतलं. हत्तीच्या माहुताला बोलावलं. एका रात्री सगळ्यांनी नीट विचार केला आणि त्याच रात्री हरी आणि मेसीला दिल्या जाणार्या वागणुकीत आमूलाग्र बदल केला गेला. हरीच्या जाड त्वचेवर अणुकुचीदार लोखंडी गोळ्यांचा मारा करण्यात येऊ लागला. धातूच्या जाड बांबूंनी त्याच्या शरीरावर प्रहार करण्यात आले. तरीही तो प्रतिकार करत नाही असं पाहून त्याच्या जबड्यातले दात खेचून काढण्याचे नाना प्रयत्न सुरू झाले. त्याच्या गुह्यांगात सळ्या घुसवण्यात आल्या. हेच सगळे प्रयोग मेसीवर केले गेले. माणसं भोवती जमा झालेली पाहताच ती सैरावैरा पळू लागायची. पाण्यात घुसायची. हरीच्या मागे लपायची. हरी गरीबपणे सभोवती बघत राहायचा. एके रात्री पाण्यात घुसलेल्या मेसीला बाहेर काढण्यासाठी पाण्यात प्रखर विजेचा प्रवाह सोडण्यात आला. दुसर्या दिवशी सकाळी तिचा देह पाण्याच्या तळाशी पडलेला आढळला. हरी दूर हिरवळीवर जमिनीत तोंड खुपसून बसला होता. प्राणिसंग्रहालयातली पाणघोडी मेली, हीदेखील राष्ट्रीय बातमी झाली. त्यानंतर हरी आणखीनच शांत झाला. विझलेल्या डोळ्यांनी आकाशात बघत विचार करत तासन्तास दगडी पुतळ्याप्रमाणे उभा असलेला दिसू लागला. त्याच दिवसांत गृह राज्यमंत्री मनःशांती ढळू न देता पाणघोडा हसण्यासाठी महाचंडी यज्ञ करत होते. एकवीस आफ्रिकन मगरींचा हविर्भाग त्यांनी यज्ञात दिला होता.
आणि त्यानंतर...
त्यानंतर कधी तरी एके रात्री प्राणिसंग्रहालयात प्रचंड मोठा गडगडाट झाला. कडाडणार्या विजेसारखा. गाढ झोपेतला क्युरेटर खडबडून जागा झाला आणि आवाजाच्या दिशेने धूम पळत सुटला. पाहतो तो समोर हरी हसत होता. जबडा अख्खाच्या अख्खा आकाशधरतीला स्पर्शून जाईल असा वासून खदाखदा हसत होता. हर्षवायू झाल्याप्रमाणे हसत होता. न थांबता हसत होता
एकदाचा हरी हसला...
हरी हसला आणि देशातली जनता हसू लागली. हसर्या हरीला पाहायला गर्दी करू लागली. प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापकांनी एक नामी योजना जाहीर केली : हसणार्या जनतेला हसणार्या हरीबरोबर सेल्फी काढता येईल! लोक अक्षरशः धावत सुटले. लांबच लांब रांग लागली प्राणिसंग्रहालयाच्या दारात. उन्हातान्हात, बोचर्या वार्यात आणि पावसाच्या धारांतही लोक रांगेत उत्साहाने उभे होते. न भिता हरीपाशी येऊन त्याच्या जांभळ्या जखमी मस्तकावर अलगद हात टाकून हसत हसत सेल्फी काढत होते. हरीही हसत होता. मात्र, दोघांच्या हसण्यात फरक आहे हे कुणालाच कळलं नाही.
जयंत पवार
************************************************************************
आपल्या आसपास घडणाऱ्या पण आपल्या विचारविश्वाचा भाग नसणाऱ्या घडामोडी समजून घ्याव्यात, त्या घडामोडींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा, आपल्या म्हणण्यापल्याडचे काही दृष्टिकोन समजून घ्यावेत, आपल्याला न दिसणारं जग जाणून घ्यावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच 'अनुभव' मासिकाचा दर महिन्याचा अंक म्हणजे आपला भवताल, आपला समाज समजून घेण्यासाठीची धडपड असते. अनुभव'च्या परिवाराचा एक भाग बनून तुम्हीही या प्रवासात सामील होऊ शकता.'अनुभव'चे वर्गणीदार बना
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा