स्व त: प ली क डे : वृषाली जोगळेकर

अनुभव ऑक्टोबर २०२१च्या अंकातून,

 मी-माझं कुटुंब-माझे नातेवाईक या मर्यादित परिघाचं वर्तुळ ओलांडून दुसर्यांसाठी धडपडण्यात आनंद मानणार्या सामान्यांमधल्या कर्तबगारांची ओळख

डॉप्रदीप आगाशे


कर्णवर्गाची दुप्पट किंवा बाजूवर्गे मिळतो चौरस..

त्रिज्जावर्ग गुणिले पाय वर्तुळक्षेत्र मिळूनी जाय..

पाय गुणिले त्रिज्जा दुप्पट

परीघ मिळतो अगदी झटपट..

गणित-भूमितीतली सूत्रं असोत, रसायनशास्त्रातल्या संज्ञा असोत किंवा नागरिकशास्त्रातली राज्यपालांची कर्तव्यं असोत.. शाळेतला किचकट वाटणारा हा अभ्यास सहजसोप्या चाली असलेल्या गाण्यांमधून शिकता आला तर मुलांचा शिक्षणातला रस नक्कीच वाढेल. डॉ. प्रदीप आगाशे या हाडाच्या शिक्षकांनी शाळेतल्या अभ्यासावर आधारित ही आणि अशी अनेक गाणी लिहिली आहेत. मुलांना अभ्यासात गोडी वाटावी यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये जाऊन आगाशे सर विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना मार्गदर्शन करतात.

भोर तालुक्यातील चिखलगाव या छोट्याशा गावात देवळात भरणार्या शाळेत सरांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. नंतर भोरला माध्यमिक शिक्षण आणि पुढे पुण्यात विज्ञान शाखेतली पदवी आणि बी.एड. पूर्ण केलं. भोरमधल्या शाळेत ते शिक्षक म्हणून काम करायला लागले. त्याच दरम्यान राज्याचे तत्कालीन शिक्षण संचालक वि.वि. चिपळूणकर यांच्याशी त्यांचा संपर्क आला. त्यांची मुलांना शिकवण्याची तळमळ बघूनएकाच शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये अडकून पडू नका, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुमच्या प्रयत्नातून शिक्षणाची गोडी लागेल असं बघाअसा सल्ला चिपळूणकरांनी दिला. आगाशे सरांनी त्याचा आदर राखत शाळेच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांची भ्रमंती सुरू झाली.

शैक्षणिक अभ्यासावर आधारित गाणी, कीर्तनं, भारूडं, पोवाडे, सवाल-जवाब, कथाकथन, नाटकं, खेळ, कोडी अशा अनेक रचना सरांनी तयार केल्या. अभ्यास सोपा करणारी काही पुस्तकंही लिहिली. अभ्यासावर रचलेली गाणी मुलांना चालीत म्हणायला शिकवणं, मुलांच्या सहभागातून गणित-विज्ञान या विषयांवर छोटी नाटकं सादर करणं, कागदाच्या घड्यांमधून भूमिती शिकवणं, नाणी आणि नोटांच्या मदतीने हिशोब शिकवणं, गणिती आणि वैज्ञानिक तत्त्वावर आधारित चमत्कार अशांसारख्या प्रयोगांमधून शिक्षण सोपं करण्यासाठी सरांची सतत धडपड सुरू असते. शिक्षकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यातून विषयाचं आकलन व्हावं हा त्यामागचा हेतू.

पुण्याच्या आपटे प्रशालेचे त्यावेळचे मुख्याध्यापक पु. . वैद्य यांनी आगाशे सरांच्या प्रत्येक नवीन उपक्रमाला प्रोत्साहन दिलं. त्यांचा कोणताही नवीन कार्यक्रम आधी आपल्या शाळेत सादर करण्याची परवानगी दिली. त्यांच्या कौतुकाची थाप सरांच्या कामासाठी प्रेरक ठरली. महाराष्ट्रभर झालेल्या सहा हजारांहून अधिक व्याख्यानांमुळे, कार्यक्रमांमुळे किमान ५००० मुख्याध्यापक आणि १०,००० हून अधिक शिक्षक त्यांना व्यक्तिशः ओळखतात.  

सरांनी या कामाला सुरुवात केली, त्याच दरम्यान म्हणजे १९७७-७८ साली शिक्षकांचा राज्यव्यापी संप सुरू झाला. तो साधारण दीड महिना चालला. या काळात सरांनी आपल्या शैक्षणिक किर्तनाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि पुढे अनेक शाळांकडून सरांना बोलावणी यायला सुरुवात झाली. शाळांमध्ये हे उपक्रम मोफत होतात. सुरुवातीच्या वर्षांत यातले बहुतांशी उपक्रम सरांनी वैयक्तिक पातळीवर अमलात आणले. त्यांच्या कामाबद्दल माहिती झाल्यावर मग अनेक स्वयंसेवी संस्थांनी आपल्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये सरांचे प्रशिक्षणवर्ग आयोजित करायला सुरुवात केली.

पुण्यातीलस्वच्छया संस्थेशी जोडलेल्या सफाई कर्मचार्यांना व्यावहारिक हिशोब सोप्या पद्धतीने शिकवण्याचं कामही आगाशे सरांनी केलेलं आहे. आज वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही यूट्यूबच्या माध्यमातून सरांचे शैक्षणिक उपक्रम सुरूच आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलनक्षमता कमीअधिक असते, ती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिकवा, त्यांना नाउमेद करू नका, असं ते शिक्षकांना आणि पालकांना आवर्जून सांगतात.

विद्यार्थ्यांना समूहगीतं शिकवणं, देशभक्तीपर गीतं शिकवणं आगाशे सरांना मनापासून आवडतं. त्यांनी स्वत: अनेक गीतं आणि कविता रचलेल्या आहेत. गीतेतील प्रत्येक अध्यायावर त्यांनी गीत रचलेलं आहे. ‘गीतगीताया नावाने त्याचे कार्यक्रमदेखील ते करत असतात. बालचित्रवाणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रमांचं लेखन केलेलं आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांचे कार्यक्रम सादर झालेले आहेत.

इन्व्हेस्ट इन मॅनया सामाजिक संस्थेच्या फुलगावमधील एका आश्रमात अनाथ मुलींना आश्रय दिला जातो. आगाशे सर आणि त्यांच्या पत्नींनी दहा वर्षं आश्रमात राहून मुलींच्या पालकांची भूमिका अतिशय जबाबदारीने निभावली आहे. आईवडील आता जगात नाहीत म्हणून अनाथ झालेल्या मुली या आश्रमात आहेतच. शिवाय मुलींच्या पाठीवर मुलगा झाल्यानंतर आईवडिलांनी आधी झालेल्या आणि सोडून दिलेल्या मुलीही तिथे आहेत. तर काही अगदी गरीबाघरच्या, घरी खायची भ्रांत असल्याने सोडून दिलेल्या, अशाही आहेत. अशा मुली हिरमुसलेल्या, आत्मविश्वास हरवलेल्या असतात. आगाशे दांपत्याने त्यांना मायेची ऊब दिली. स्वच्छतेचे, शिक्षणाचे संस्कार दिले. त्यांच्या चेहर्यावर हसू फुलवण्याचे प्रयत्न केले. 

याशिवाय आगाशे सर मसाज उपचारही करतात. गुडघेदुखी, कंबरदुखी, सांध्यांचे विकार, अर्धांगवात अशा व्याधींसाठी त्यांनी अनेकांवर उपचार केलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना मसाज कसा करावा, याचं प्रशिक्षण ते मोफत देतात. वेगवेगळ्या कामांमध्ये सर स्वत:ला सतत व्यग्र ठेवत असतात. पण त्यांची खरी तळमळ विद्यार्थ्यांचं हसतखेळत शिक्षण हीच आहे. प्रत्येक मूल शिकलं पाहिजे, ती काळाची गरज आहे, हे आपण जाणतोच. पण प्रत्येक मुलाला शिकण्याची गोडी लागावी यासाठी अशा तर्हेने झटणार्या आगाशे सरांसारखी व्यक्ती विरळाच!

संपर्क : ८९९९९२०१११

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

 

                             राजाराम जोशी 



आयुष्यात परीक्षा बघणारे प्रसंग अनेकांच्या वाट्याला येतात. काहीजण कठीण प्रसंगात हिंमत दाखवून परिस्थितीशी सामना करतात. पण काहीजण मात्र हताश होऊन आयुष्य संपवण्याचाच विचार करतात. समोर उभ्या ठाकलेल्या प्रश्नावर आत्महत्या हेच त्यांना उत्तर वाटतं. असे आत्महत्येचा विचार करणारे ठाणे आणि मुंबईच्या आसपासचे लोक बरेचदा वाशीचा खाडी पूल गाठतात. हा पूल बर्यापैकी उंच आहे आणि पुलाच्या दोन्ही बाजूला समुद्राचं अथांग पाणी आहे. या पुलावरून उडी टाकणं म्हणजे हमखास जीव जाण्याचा मार्ग. पण मृत्यूला जवळ करण्याच्या प्रयत्नांत असणार्या अशा कित्येकांना नव्याने जीवनदान देतात वाशी गावात राहणारे राजाराम जोशी.

राजाराम पेशाने कोळी आहेत. लहानपणापासूनच मासे पकडण्यासाठी ते समुद्रावर जात आहेत. समुद्राची भरती-ओहोटीची वेळ, पाण्याची खोली, लहानमोठ्या लाटा यांचा अचूक अंदाज त्यांना अनुभवाने आलेला आहे. ते बारा वर्षांचे असताना एकदा त्यांनी समुद्रात उडी मारलेल्या एका महिलेला बाहेर काढण्यात यश मिळवलं. तेव्हापासून ते गेली तीस वर्षं आत्महत्या करणार्या लोकांच्या मदतीला धावून जात आलेले आहेत. काही वेळेला त्या व्यक्तीने प्राण गमावलेला असतो. अशा वेळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचं काम राजाराम करतात. आतापर्यंत त्यांनी असे ५५ मृतदेह बाहेर काढलेले आहेत. तर त्यांच्या प्रयत्नांमुळे ४९ व्यक्तींचे जीवही वाचलेले आहेत. त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून अथवा पोलीसांकडूनही या कामासाठी ते एकही पैसा घेत नाहीत.

वाशी गावात आणि परिसरात सगळ्यांनाच राजाराम यांच्या या कामाबद्दल आता माहिती झाली आहे. पुलावरून उडी मारताना एखाद्या व्यक्तीला कोणी बघितलं तर राजाराम यांना लगेच बोलावलं जातं. त्यांच्या घरापासून पुलापर्यंत पोचायला फक्त पाच मिनिटं लागतात. त्यामुळे उडी मारलेल्या व्यक्तीला लवकर मदत मिळते आणि त्याचे प्राण वाचण्याची शक्यता वाढते. मात्र काही वेळेला अशी त्वरित माहिती मिळत नाही. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी ती व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीसांकडे केलेली असते; पोलीस तपासात त्या व्यक्तीने पुलावरून उडी मारल्याचं लक्षात येतं; आणि पोलीस राजाराम यांच्याकडे मदतीसाठी येतात. अशा प्रसंगी ती व्यक्ती जिवंत असण्याची शक्यता खूप कमी असते. पण राजाराम यांच्या खटपटीमुळे किमान नातेवाईकांना त्या व्यक्तीचा मृतदेह तरी बघायला मिळतो.

राजाराम यांनी पाण्यातून बाहेर काढलेली व्यक्ती जिवंत असो वा मृत, पुढील सोपस्कारांसाठी त्याला पोलीसांच्या हवाली केलं जातं. नातेवाईकांना संपर्क करणं, जिवंत व्यक्तीला दवाखान्यात नेऊन आवश्यक ते उपचार करणं, यासाठीही राजाराम पोलीसांना आवश्यक ती मदत करतात. तसंच ते जिवंत व्यक्तीला आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात.

या कामामुळे राजाराम यांनी अनेक माणसं जोडली आहेत. पोलीसही त्यांना हक्काने मदतीसाठी बोलावतात. पण अशा कामाची, अशा मदतीची वेळ येऊ नये असं त्यांना वाटतं. आयुष्य सुंदर आहे. ते जगताना कधीतरी समस्या, प्रश्न सगळ्यांनाच येणार. ते सोडवण्यासाठी मदत घ्यावी पण आयुष्य संपवणं हा उपाय असू शकत नाही असं ते आवर्जून सांगतात.

संपर्क: ९२२४२९२७८९

---------------------------------------------------------------------------------------------------------------

           विलास पंदारे, वैशाली पंदारे 

विलास पंदारे जुन्नरजवळच्या आणे या गावातल्या एका शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून काम करत होते. तिथे जवळच अपंगांसाठी काम करणारी एक संस्था होती. त्या संस्थेशीही ते जोडलेले होते. याच दरम्यान एकदा त्यांना समजलं, की मंचरजवळच्या पळसठीका या छोट्याशा गावातलाबालगृह अनाथ परिवारहा अनाथाश्रम बंद पडण्याच्या मार्गावर आहे. विलास यांनी त्या अनाथाश्रमाची जबाबदारी घ्यावी, असं गावातल्या लोकांनी सुचवलं. त्याच सुमारास, काही कारणाने विलास यांची शाळेची नोकरीही सुटलेली होती. त्यांनी पत्नी वैशाली यांच्याशी अनाथाश्रमाबाबत चर्चा केली. हा आश्रम आपण चालवायचा, असं दोघांनीही नक्की केलं. वैशाली जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. या दांपत्याला मूलबाळ नाही. अनाथाश्रमाचं काम बघितलं तर लहान मुलांचा सहवास मिळेल आणि त्या मुलांना पालकांचं प्रेम मिळेल, असा विचार त्यांनी केला.

निर्णय पक्का झाल्यावर विलास यांनी चॅरिटी ऑफिसमध्ये कागदपत्रांची रीतसर पूर्तता केली आणि आश्रमाचा ताबा घेतला. या गोष्टीला आता सात वर्षं झाली. काही वर्षं तो आश्रम दुर्लक्षित राहिल्यामुळे त्याची अवस्था वाईट झाली होती. विलास यांनी आश्रमाची डागडुजी करून घेतली. खोल्यांची, बाथरूमची दारं, लाईट्स दुरूस्त करून घेतले. रंगरंगोटी केली. पाण्याची व्यवस्था केली.

त्यावेळी आश्रमात सात मुलं राहात होती. विलास यांनी त्यांना गावातल्या शाळेत घातलं. हळूहळू मुलांची संख्या तीसवर गेली. अनाथाश्रमातल्या प्रत्येक मुलाने शिकलं पाहिजे यासाठी त्यांची धडपड असते. मुलांना शाळेत सोडण्यासाठी त्यांनी एक व्हॅन घेतलेली आहे. ते स्वत: मुलांना शाळेत सोडायला आणि आणायला जातात. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत या आश्रमातल्या दोन मुलांनी उत्तम गुण मिळवलेले आहेत. पंदारे दांपत्य मुलांसाठी लागणारा बराचसा खर्च स्वत:च्या उत्पन्नातून करतात. दोघांचा कामातला प्रामाणिकपणा बघून आता ग्रामस्थही त्यांना शक्य ती मदत करायला लागले आहेत. काही ग्रामस्थ शिधा देतात; तर कोणी कपडे देतात. काहीजण स्वैपाक करणं, मुलांना जेवायला वाढणं, अशा कामांत प्रत्यक्ष मदत करतात. 

आश्रमात सहा ते सोळा वर्षं वयाची मुलं राहतात. मुलांची दुखणीखुपणी काढण्यासाठी, अभ्यासातल्या अडचणी सोडवण्यासाठी विलास आणि वैशाली तत्पर असतात. शाळेतली नोकरी सांभाळून वैशाली सगळ्या कामांमध्ये विलास यांना मदत करत असतात. वेळ पडली तर सगळ्या मुलांसाठी स्वैपाक करण्याचीदेखील त्यांची तयारी असते. 

विलास पंदारे यांचं बालपण खूपच खडतर गेलं होतं. शाळा शिकत असतानाच त्यांनी आईवडिलांना मदत होईल या हेतूने छोटीमोठी कामं करायला सुरुवात केली होती. हलाखीच्या परिस्थितीची जाणीव त्यांना तेव्हापासूनच होती. पुढे नोकरी लागली, आयुष्यात जरा स्थैर्य आलं तरीही लहानपणी कोणाच्या वाट्याला खडतर आयुष्य येऊ नये, असं त्यांना तळमळीने वाटत असे. अनाथाश्रमाच्या कामात स्वत:ला झोकून दिल्यामुळे त्यांची इच्छा काही प्रमाणात का होईना पूर्ण झाली आहे.  

 संपर्क : ९७६७५५४७४६

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

वृषाली जोगळेकर युनिक फीचर्समध्ये कार्यरत असून समाजाच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान आणि धडपड्या व्यक्तींबद्दल लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे.

आपल्या आसपास घडणाऱ्या पण आपल्या विचारविश्वाचा भाग नसणाऱ्या घडामोडी समजून घ्याव्यात, त्या घडामोडींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा, आपल्या म्हणण्यापल्याडचे काही दृष्टिकोन समजून घ्यावेत, आपल्याला न दिसणारं जग जाणून घ्यावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच 'अनुभव' मासिकाचा दर महिन्याचा अंक म्हणजे आपला भवताल, आपला समाज समजून घेण्यासाठीची धडपड असते. अनुभव'च्या परिवाराचा एक भाग बनून तुम्हीही या प्रवासात सामील होऊ शकता.'अनुभव'चे वर्गणीदार बना

• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://imojo.in/anubhav

• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://www.instamojo.com/anubhavmasik/pdf-3a78e/

PDF अंक वार्षिक - ₹ ४००
अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :
वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० ।

• वर्गणी भरण्यासाठी संपर्क - 9922433614

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी