अवलिये आप्त : सुहास कुलकर्णी

जगाच्या गदारोळात राहूनही आपल्या कामात गढून गेलेल्या काही धुनी आणि अवलिया माणसांबद्दल सुहास कुलकर्णी यांनी लिहिलेलंअवलिये आप्तहे पुस्तक लवकरच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित होतंय. ही आहेत महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी, अव्वल आणि अस्सल माणसंया पुस्तकाचं हे मनोगत.


आपल्याला माणसं काय आयुष्यभर भेटतच असतात. त्यातल्या काहीच माणसांकडे आपण ओढले जातो.त्यातल्या काहींशी आपल्या गाठीभेटी होतात. काहींशी नात्यांचे धागे विणले जातात. काहींशी दोस्तीही होते. ही माणसं आपली असतात.

अर्थातच, सगळी माणसं सारखी नसतात. कुणी विद्वान असतात, कुणी प्रतिभावान असतात. कुणी लोकसेवक असतात, कुणी जागले असतात. कुणी बोलके असतात, कुणी अबोल. कुणी लोकांमध्ये वावरत असतात, कुणी गुहेत आपल्या कामात गर्क. माणसं कशीही असोत, पण त्यांच्यात एक अवलियापण असतं. त्यांच्यात एक प्रकारची धुंदी असते. त्यांच्यातील हे धुनीपण त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवत असतं. तेच त्यांना कार्यप्रवृत्त करत असतं. आयुष्यात काही प्रश्न निर्माण झाले किंवा वयोमानाने अगदी शरीरही थकलं, तरी त्यांच्या कामात खंड पडत नाही. त्यांची जीवनेच्छा तसूभरही कमी होत नाही. या माणसांमधलं हे अवलियापणच आपल्याला त्यांच्याकडे खेचून नेत असतं.

हे ओढलं जाणं प्रत्येकाचं, ज्याच्या त्याच्या पिंडाप्रमाणे आणि आसपासच्या परिस्थितीप्रमाणे आकारत असणार. शिवाय वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ते बदलतही असणार. उदाहरणार्थ, मी मूळचा वर्ध्याचा असल्यामुळे आणि कुटुंब व शाळा गांधीविचारांची असल्याने त्या गोतावळ्यातली माणसं आसपास होती. आचार्य विनोबा हे त्यातले प्रमुख. त्यांचा आश्रम म्हणजे आम्हा पोरांचं खेळण्याचं अंगणच जणू. कधीही जा आणि विनोबांना भेटा, असं आमचं चाले. ते एवढे मोठे विद्वान, तत्वज्ञ, पण आमच्याशी ते छान गप्पा मारत, प्रसंगी बसल्या बसल्या खेळत. वर्ध्यापासून दोन-तीन तासांच्या अंतरावर होते बाबा आमटे. कौटुंबिक संबंधांमुळे त्यांच्याकडेही जाणं येणं असे. देशाला भूषण अशी ही दोन माणसं मला बालपणीच बघायला मिळाली.

पुढे कॉलेजवयात पुण्यात आलो. आणि एका संपूर्ण नव्या जगाला सामोरा गेलो. समाजवादी, हिंदुत्ववादी, मार्क्सवादी, मध्यममार्गी, तटस्थ असे नाना प्रकारचे लोक दिसू लागले. धर्म, इतिहास, संस्कृती, विज्ञान, कायदा, समाज बदल, पत्रकारी, साहित्य, कला अशा क्षेत्रातल्या लोकांची ओळख होऊ लागली.

१९८० च्या दशकातला काळ आठवला तर त्याकाळी पुण्याच्या सार्वजनिक जीवनात विविध क्षेत्रांतील किती थोरांचा सहज वावर होता, हे कळू शकतं. गं. बा. सरदार, मे. पु. रेगे, राम बापट, गो. पु. देशपांडे, रा. . नेने, सुलभा ब्रह्मे अशी विचारवंत मंडळी सहज भेटू शकत. त्यांना प्रसंगी घरी जाऊनही गाठता येत असे. शरद पाटील, . दि. फडके, वसंत पळशीकर यांच्यासारखी बाहेरची मंडळी पुण्यात आल्यावर भेटायला सहज तयार असत. त्यांची अभ्यास शिबिरं, व्याख्यानमाला होत, तिथे गाठीभेटी करता येत.

याच काळात राजेंद्र व्होरा-सुहास पळशीकर-गोपाळ गुरू-यशवंत सुमंत-सदानंद मोरे यांच्यासारखे सुप्रतिष्ठित अभ्यासक-प्राध्यापक विद्यापीठात एकगठ्ठा भेटले. नागपूरचे भास्कर लक्ष्मण भोळे आणि कोल्हापूरचे अशोक चौसाळकरही इकडे येऊन जाऊन असत. त्यांच्याकडून अनेक विषय समजून घेता आले. खूप काही शिकायला मिळालं. त्यांच्यासोबत बरीच वर्षं वावरताही आलं. प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं इतकं अकृत्रिम आणि मित्रत्वाचं असू शकतं, हे त्यांच्यासोबत वावरताना कळलं.

पुढे पत्रकारितेत हातपाय मारण्याच्या वयात पुण्या-मुंबईतल्या सामाजिक क्षेत्रांतल्या मान्यवरांच्या गाठीभेटी झाल्या. एसएम जोशी, नानासाहेब गोरे, मधु दंडवते, गोदुताई परुळेकर, शरद जोशी, मृणाल गोरे, नागनाथअण्णा नायकवडी, मेधा पाटकर असे थोरमोठे अनेक. पण बाबा आढाव, गोविंद पानसरे, . प्र. प्रधान, भाई वैद्य, मोहन धारिया, सय्यदभाई, संपतराव पवार, न्या. नरेंद्र चपळगावकर, नरेंद्र दाभोलकर या मंडळींसोबत छान ओळख झाली. त्यांचा कमी-अधिक सहवासही लाभला.

आपापल्या क्षेत्रात दमदार काम केलेली ही माणसं; त्यामुळेच मी त्यांच्याकडे ओढलो गेलो असणार. ‘वैष्णव जन तो तेणे कहिये, पीड पराई जाणे रेही भावना जवळची असल्यानेही समाजाला समर्पित माणसं आपली वाटणं स्वाभाविकच होतं..

तशीच ओढ लेखकांबाबतही. आसपासचं जग बघून, स्वत:चे आणि इतरांचे अनुभव साठवून, समाजाचा भूतकाळ पचवून नव्या साहित्य कृती घडवण्याची किमया करणारे लेखक-कवी-नाटककार ही जमातच अजब. त्यातले विजय तेंडुलकर खूपच आधी भेटले आणि रत्नाकर मतकरी तुलनेने बर्याच नंतर. पण दोघांशीही खास नाती तयार झाली. नारायण सुर्वे, दया पवार, ग्रेस, मधु मंगेश कर्णिक, . मो. मराठे, गंगाधर महांबरे, श्याम मनोहर, दिनानाथ मनोहर, सतीश काळसेकर या लेखक मंडळींशी गाठीभेटी कमी, पण बंध छान. कामामुळे माधव गडकरी, कुमार केतकर, जगन फडणीस, मुकुंदराव किर्लोस्कर, श्री. भा. महाबळ, दत्ता सराफ, एकनाथ बागुल, वा. दा. रानडे, विजय कुवळेकर, अशोक जैन, निखिल वागळे, प्रकाश बाळ, अशोक याळगी अशा अनेक पत्रकार-संपादकांशी संबंध आले. यदुनाथ थत्ते, डॉ. अभय-राणी बंग, अशोक बंग, डॉ. विकास-भारती आमटे, डॉ. प्रकाश-मंदा आमटे, डॉ. सतीश गोगुलवार- शुभदा देशमुख ही तर विस्तारित कुटुंबातलीच माणसं. सुभाष अवचट, अनिल उपळेकर, चंद्रमोहन कुलकर्णी, . मा. परसवाळे, दिलिप भंडारे, दीपक संकपाळ ही चित्रकार मंडळी मित्रमंडळीही. असं किती तरी माणसांबद्दल सांगता येऊ शकतं.

पण सांगण्याचा मुद्दा हा, की अशा अनेक धुनी माणसांबद्दल मला ओढ वाटत आली आणि त्यांच्यासोबत वावरता आलं, अनेकांसोबत कामही करता आलं. काहींकडून मित्राचं प्रेम मिळालं, तर कधी कुणाकडून वडिलधारी आपुलकी. काही गुरुजी झाले, तर काही द्रोणाचार्यांसारखे (पण अंगठा कापून न घेणारे) दूरस्थ मार्गदर्शक. काही माणसं दीपस्तभांसारखी सोबत राहिली. त्यांच्या सोबतच्या अशा विविध नात्यांमुळे त्यांच्याबद्दल लिहावं, असं माझ्याकडे खूप काही आहे. पुढे लिहीनही. खरंतर अनेक वर्षं प्रामुख्याने राजकीय-सामाजिक विषयांवर लिहीत असल्याने व्यक्तिचित्रणात्मक लिहिणं, ही गोष्ट कधी प्राधान्यावर नव्हतीच. असं काही आपण लिहावं किंवा लिहू शकतो, हेही गावी नव्हतं. पणयुनिक फीचर्सच्या पंचवीस वर्षांच्या पत्रकारी प्रवासाचा धांडोळा घेणारंआमचा पत्रकारी खटाटोपहे पुस्तक मी पाच-सहा वर्षांपूर्वी लिहिलं. त्यात ओघाने अनेक माणसांबद्दल लिहित गेलो आणि आपण आपल्याला भावलेल्या अस्सल आणि अव्वल आप्तांबद्दल लिहिलं पाहिजे, असं जाणवू लागलं.

त्याची सुरुवात झाली तीलोकसत्ताचे संपादक अरुण टिकेकर यांच्यापासून. त्यांच्यासोबत मला १०-१५ वर्षं काम करायला मिळालं असल्याने त्यांच्याशी छान नातं तयार झालं होतं. त्यांच्यावर लिहिण्यासारखं माझ्याकडे बरंच होतं. म्हणून त्यांच्यावर एक मोठा लेख लिहिला. तो छापून आल्यावर टिकेकरांनी वाचला. ते मनापासून खुष झाले होते. ‘बेटर लेट दॅन नेव्हर... जस्टिस इज डनअसं खास त्यांच्या शैलीतलं सर्टिफिकेट त्यांनी मला दिलं होतं. आपण व्यक्तिपर लिहू शकतो, हे मला त्यावेळी पहिल्यांदा कळलं. या साक्षात्कारामुळे ज्यांच्याशी स्नेहाचे, दोस्तीचे धागे विणले गेले अशांबद्दल आपण लिहावं, असं तीव्रतेने वाटू लागलं. या माणसांसोबतचा प्रवास, त्या काळात दिसलेली त्याच्यातली स्वभाववैशिष्ट्यं, वयातलं अंतर कापून दोस्ती करण्याचं त्यांचं कसब अशा अंगाने आपल्या आप्तांबद्दल लिहावं, असं वाटू लागलं. .. मग मी वर्षभर आमच्याअनुभवमासिकात लिहीत गेलो.

मी ज्या माणसांबद्दल इथे लिहिलं आहे, ती सगळी अवलिया आणि आयुष्यभर झपाटून काम केलेली धुनी माणसं आहेत. मराठीतले पहिले लोकप्रिय विज्ञान लेखक निरंजन घाटे यांनी पोटापाण्यासाठी काहीकाळ नोकर्या वगैरे केल्या, पण आयुष्यभर व्रतस्थपणे प्रचंड लिखाण केलं. हजारो लेख लिहिले. दोनेकशे पुस्तकं लिहिली. त्यांच्या वाचनाचा झपाटा तर काहीच्या काही. आयुष्यभर ते पुस्तकांचा फडशा पाडत आले आणि मिळालेलं ज्ञान वाटत आले. इतकं प्रचंड वाचणारा मराठी लेखक विरळा. तीस-बत्तीस वर्षं मी हा झपाटलेला माणूस बघत आलेलो आहे. निळू दामलेंचंही तसंच. गेली पन्नास वर्षं हा माणूस फिरतो आहे आणि लिहितो आहे. आयुष्यातला बहुतेक काळ त्यांनी मराठी पत्रकारितेची चाकोरी मोडून स्वतंत्र पत्रकारिता केली. स्वत:ला महत्त्वाच्या वाटणार्या विषयांचा माग घेत ते जसे गावाखेड्यांत नि शहरांत फिरले, तसेच जगभर फिरले. त्यांनी ज्या रेंजमध्ये फिरस्ती पत्रकारी केली, तसा माणूस देशात क्वचितच सापडेल. अनिल अवचट यांनी तर मराठी पत्रकारी आणि साहित्यात स्वत:ची वेगळी वाटच तयार केली. कष्टकर्यांचं नि वंचिंतांचं जग मराठी वाचकांसमोर मांडून त्यांनी सामाजिक पत्रकारीचं एक स्वतंत्र दालन निर्माण केलं. त्यांचं लेखन आणि सामाजिक काम एकमेकांपासून अलग करता येणार नाही, इतकं मिसळून गेलेलं आहे. आयुष्यातला बराच काळ संपादक म्हणून काम केलेल्या सदा डुम्बरेंनी स्वत:चं फारसं लेखन केलं नाही, (तरी पाच-सहा पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत) पण वेगाने उलगडणार्या जगाकडे सजगपणे कसं पहायचं आणि त्यावर वाचकांना विचारप्रवृत्त कसं करायचं, याचा एक नमुना त्यांनी दाखवून दिला. तरुण पिढीतील लिहित्या लेखकांना लिहिण्यासाठी संधी दिली, प्रोत्साहित केलं. अरुण टिकेकर तर वाचन, संशोधन, लेखन, संपादन यातील त्यांच्या कर्तृत्वामुळे सगळ्यांचेसाहेबहोते. एकदम शिस्तशीर काम. पण तरुण सहकार्यांवर पूर्ण विश्वास टाकून त्यांना परफॉर्म करण्याची संधी देण्याची त्यांची रीत काहीच्या काही.

ही सारी मंडळी पत्रकारितेशी संबंधित. त्यापलीकडील ना. धों. महानोर हे आपल्या प्रतिभेने अखिल महाराष्ट्राला अचंबित करून टाकणारे कवी म्हणून तर थोरच, पण त्यांनी साहित्य-संस्कृतीबाबतचे प्रश्न सरकारसमोर मांडण्याचं कामही केलं. ते हाडाचे शेतकरी, त्यामुळे शेतीपाण्याच्या प्रश्नावरही त्यांनी आवाज उठवला. महानोर जसे एका छोट्याशा दुर्लक्षित खेड्यात जन्मलेले-वाढलेले, तसे एकनाथ आवाड निर्धन कुटुंबातून पुढे आलेले कार्यकर्ते. अस्पृश्यता, जातिव्यवस्था आणि त्यातून आलेली विषमता यांच्याविरोधात लढाई पुकारलेला ढाण्या वाघच. स्वतःतल्या धडाडीने त्यांनी स्वतःसोबतच आपल्या भोवतीच्या वंचितांचं आयुष्य बदलून टाकलं. त्यांना अन्यायाचा प्रतिकार करण्याची हिंमत आणि साधनं दिली. हे सारं मी जवळून पाहिलं, त्यांच्याकडून समजून घेतलं. आणि सरतेशेवटी.. सामाजिक क्षेत्रातील महाराष्ट्रातलीफर्स्ट फॅमिलीअशी ओळख घट्ट झालेले आमटे कुटुंबीय! त्यांच्याबद्दल वेगळं काय बोलणार? महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं हे नाव. समाजाने नाकारलेल्या घटकांना आसरा देणारं, त्यांना आत्मसन्मान देणारं, त्यांना पुन्हा समाजात आणून सोडणारं त्यांचं काम मोठंच नावाजलेलं. मला या मंडळींच्या विस्तारित कुटुंबाचा भाग बनता आलं. एरवी ज्या संवेदना तुमच्यात निर्माण होत नाहीत, त्या तिथे माझ्यात भिनल्या.

या सगळ्यांवरचे लेख मी झपाटल्यासारखे लिहून काढले. यातील एखादा अपवाद वगळला तर बहुतेकांसोबत भरपूर सहवास लाभलेला. दहा-वीस-तीस वर्षांचा. यातील टिकेकरांसोबचा प्रवास जसा त्यांच्या अकस्मात निधनाने थांबला, तसाच डुम्बरेंच्याही अकाली जाण्याने. पण माणूस जाण्याने प्रवास भलेही थांबत असतील; नातं संपत नाही. विशेषत: ज्या माणसांचं बोट पकडून तुम्ही चार पावलं चाललेले असता तेव्हा.

या सार्यांकडून मला आजवर भरभरून मिळालं. ‘देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावेया न्यायाने मी त्यांच्याकडून घेत राहिलो. ही व्यक्तिचित्रं लिहून मी त्यातून थोडा उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे. हे लेख म्हणजे म्हटली तर व्यक्तिचित्रं आहेत, म्हटली तर नाहीत. पण हे लेख म्हणजे त्यांची कार्यचरित्रं नव्हेत, एवढं नक्की. ही माणसं माझ्या वाट्याला जेवढी आली, आणि त्यामुळे जेवढी दिसली, त्यांचं चित्रण मी केलेलं आहे. यात स्वाभाविकपणे त्यांचं-माझं नातं आणि या नात्याने बांधले गेलेले स्नेहाचे धागे महत्त्वाचे बनतात. यात मी एक पात्र असलो, तरी महत्त्वाचा नाही. या प्रकारचं लेखन मला आनंद तर देऊन गेलंच, पण ज्यांच्यावर मी लिहिलं, त्यांच्या मित्रांना आणि चाहत्यांनाही ते आवडून गेले. त्यातून माझा आनंद द्विगुणित झाला.

पण माझ्यासाठी खरी आनंदाची गोष्ट म्हणजे मी ज्यांच्यावर लिहिलं, त्यांनाही हे लेख म्हणजे सुखद धक्का होता. मी त्यांच्यावर लिहीन असं कुणालाही वाटलं नव्हतं आणि त्यांना माहीतही नव्हतं. ही सगळी मोठी मंडळी असली, तरी बहुतेकांवर असे लेख कुणी लिहिलेले नव्हते. त्यामुळेही ते सुखावलेले दिसत होते. त्यामुळे आपण आपल्या या ज्येष्ठ आप्तांना हा आनंद देऊ शकलो, याबद्दल माझ्या मनात निव्वळ समाधानाची भावना भरून आहे. या भावनेची ताकद मला अजूनही जाणवते आहे. या अनुषंगाने महानोरांची-ज्यांच्यावर वर्षानुवर्षं लिखाणाचा आणि कौतुकाचा वर्षाव झालेला आहे- त्यांची प्रतिक्रिया सांगण्यासारखी आहे. लेख वाचून झाल्यावर महानोर म्हणाले, ‘स्वतःवर छापून येण्याचं अप्रुप आता उरलेलं नाही. लोकांनी माझ्यावर खूप लिहिलं. कवितेवर लिहिलं, कामावर लिहिलं. पुस्तकं लिहिली, प्रस्तावना लिहिल्या. पण आपलं माणूस कसं लिहितो याची उत्सुकता मला लागून होतीच...’

एरवी आपण मराठी लोक कुणालाथँक्सम्हणण्याबाबत फारच कद्रू आहोत. चांगल्याला चांगलं म्हणणं, गुणांचं वर्णन करणं, आयुष्यभराच्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानणं याबाबत आपल्याकडे कंजुषपणाच फार. ही अपरीत बाजूला ठेवून मी मोकळेपणाने माझ्या या ज्येष्ठ आप्तांबद्दल लिहिलं आहे. यातील सदा डुम्बरे यांच्यावरील लेख ते हयात असताना लिहिला होता. मात्र दरम्यानच्या काळात त्यांचं निधन झाल्याने त्या लेखावर आवश्यक ते संपादकीय संस्कार करून इथे प्रकाशित केला आहे.

ज्या लेखनाचा मी, या ज्येष्ठांनी, त्यांच्या चाहत्यांनी आणि वाचकांनी भरघोस आनंंद मिळवला, ते लेख आता पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहेत. त्यामुळे उर्वरित वाचकही हा आनंद मिळवू शकतील.

सुहास कुलकर्णी

suhas.kulkarni@uniquefeatures.in

सुहास कुलकर्णी हेयुनिक फीचर्सचे संस्थापक संपादक असून सामाजिक शास्त्राची शिस्त आणि पत्रकारी कौशल्य यांचा मेळ घालून लिखाण करण्याकडे त्यांचा कल आहे.

अवलिये आप्त

सुहास कुलकर्णी

समकालीन प्रकाशन

मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी

पानं : १८०

किंमत : २००

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८