एक दुःख तुझे पोरी मला त्याची व्यथा : अनिल साबळे

अनुभव दिवाळी २०१९च्या अंकातून

जुन्नर-ओतूर परिसरातला पेटलेला उन्हाळा. 

‘मध घ्या, मध’ असा एका लहान मुलीचा आवाज कानावर आला. मी बाहेर येऊन बघितलं, तर हातात परात घेतलेली अंदाजे दहा वर्षांची मुलगी आणि दारू पिऊन झिंगलेली तिची आई नुकत्याच काढलेल्या मोहळांचा मध विकत होत्या. दोघी कातकरी समाजाच्या दिसत होत्या. 

ओतूर गावालगत अगदी नदीच्या काठावर एक गरीब कातकरी वस्ती आहे. माझ्या मित्रांमार्फत पुण्यातून गोळा झालेले कपडे, चपला इत्यादी वस्तू देण्यासाठी मी नेहमी त्या वस्तीवर जात असतो. ही माणसं तिथे साधी कुडाची घरं बांधून राहतात. चिंचेच्या मोसमात कातकरी नवरा-बायको जोडीला दिवसभर चिंचा झोडण्याचं काम मिळतं. नवर्‍याने झाडावर चढून चिंचा झोडायच्या आणि बायकोने त्या चिंचा पोत्यात भरून ठेवायच्या. उन्हाळयात हातात झेलं घेऊन रानातले आंबे उतरुन काढण्याचं काम असतं. चिंचा आणि आंब्यांची ही दोन जोखमीची कामं सोडली तर या माणसांना कायमस्वरुपी रोजगार नसतो. त्यामुळे घरांमध्ये दोन वेळच्या जेवणाचीही मारामार. नदीच्या पाण्यात मिळतील ते मासे-खेकडे पकडून भाजून नाहीतर कालवण करून खायचे, याचाच त्यांना आधार.  


त्या मायलेकींनी घाणेरीच्या झुडपात घुसून मोहळं काढली असावीत असं मला वाटलं. कारण, मुलीच्या हातपायांवर घाणेरीच्या झुडपांचे अनेक ओरखडे दिसत होते. मध विकून मुलीच्या आईला तिच्या संध्याकाळच्या खाण्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं. आणि काही पैसे उरले तर आपल्या नवर्‍यासाठी दारू विकत घ्यायची होती. ती काळीसावळी लहानगी मुलगी फारच अशक्त दिसत होती. सपाटून तापलेल्या उन्हामुळे तिचा चेहरा भाजल्यासारखा वाटत होता.

मी त्या दोघींना थांबवलं. दारूच्या नशेतल्या तिच्या आईला धडपणे उभंही राहता येत नव्हतं; त्यामुळे ती तोल सावरत कशीबशी खाली बसली. त्यांच्याकडच्या मोहळांवर काही मधमाशा घोंगावत होत्या. उन्हाळ्यामुळे मोहळांत मध सुद्धा कमीच दिसत होता. तीन-चार मोहळांच्या कांद्यांचे त्यांनी दोनशे रुपये सांगितले. मला ती किंमत खूप वाटली. तरीही मी घासघीस न करता ते सगळे कांदे विकत घेतले. पैसे देताना मी सहज त्या मुलीला विचारलं, “शाळेत जातेस का? कितवीला आहेस?” 

“शाळेत जात होते; आता मेंढ्या वळायला जाते.” तिने उत्तर दिलं. 

एवढीशी लहान मुलगी मेंढ्या वळायला कशी आणि कुठे जात असेल... माझ्या मनात एका क्षणात अनेक प्रश्न उभे राहिले. सालगडी म्हणून मेंढ्या वळणार्‍या भिल्ल मुलांबद्दल मला माहीत होतं. त्यांची माहिती मी अनेक वर्षांपासून गोळा करत होतो. दिवाळी झाल्यावर जुन्नर-ओतूर भागात अनेक मेंढपाळ मेंढ्या घेऊन फिरायचे. हजार-दोन हजार रुपयांसाठी मेंढपाळांच्या घरी मेंढ्या वळायला जाणारी अनेक लहान मुलं मी पाहिली होती. फार कष्टाचं काम होतं ते. त्या मुलांकडे पाहून जीव तुटायचा. पण ओतूर गावातली एक मुलगी हे काम करते आहे, हे मी पहिल्यांदाच ऐकत होतो. तिची सगळी माहिती गोळा करावी म्हणून मी दोघींना घरात बोलावलं. त्या मुलीला खाऊ दिल्यावर ती बोलायला लागली.

तिचं नाव होतं, कोमल. दोन महिन्यांपूर्वी तिची आई वारली होती. आज तिच्यासोबत होती ती तिची सावत्र आई.  मला आठवलं- दोन महिन्यांपूर्वी एक दिवस सकाळी सरकारी दवाखान्याजवळ एका बेवारस कातकरी बाईला आणून टाकलं गेलं होतं; अति दारू प्यायल्यामुळे तिचं लिव्हर फुटलं आणि ती मेली, अशी चर्चाही कानावर आली होती. ती बाई या कोमलची आई होती, हे आता माझ्या लक्षात आलं. कोमलच्या वडिलांनी पैशांसाठी कोमलला एका मेंढपाळाकडे सालाने मेंढ्या वळण्यासाठी पाठवून दिलं होतं. त्या उन्हाळयात तो मेंढपाळ मेंढ्या चरायला ओतूरजवळ आला होता, म्हणून कोमल काही दिवस घरी आली होती. नाहीतर वर्षभर कामातून तिची सुटका नसायचीच. चारा खात रानभर पळणार्‍या मेंढ्या हाकून आणणं म्हणजे फारच कष्टाची गोष्ट असते. तो मेंढपाळ तिला शिळ्या भाकरी खायला द्यायचा; त्या देखील तिला अनेकदा उभ्याउभ्याच खाव्या लागायच्या. तिला मालकाकडून मिळालेले कपडेही फाटकेच होते. तिचं शोषण होत होतं, हे धडधडीत वास्तव होतं. फक्त तीन हजार रुपयांसाठी ती मुलगी मेंढपाळाकडे वर्षभर राबत होती. ज्याने बाप्या माणसाचाही पिट्ट्या पडेल, असं काम ही अंगात जीव नसलेली पोरगी करत होती. वेठबिगारीच होती ही. किंवा खरंतर गुलामगिरीच. विचारानेही माझा जीव कासावीस झाला. 

तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल, याचा मी विचार करू लागलो. मी कोमलच्या सावत्र आईला सुचवलं, “मी मेंढपाळाला तीन हजार रुपये देऊन टाकतो. इथे जवळच अनेक शासकीय आश्रमशाळा आहेत. त्यातल्याच एखाद्या शाळेत कोमलचं नाव घाला.” पण त्याला त्या बाईंची तयारी दिसली नाही. त्याला कारण होतं. कोमल आधी कोकणातल्या आश्रमशाळेत शिकत होती; मात्र तिच्या बापानेच तिला तिथून काढली होती. कोमलच्या बापाला दारूचं अतोनात व्यसन होतं. दारूसाठी त्या मेंढपाळाकडून तो वरचेवर उसने पैसे घेत असे. त्यामुळे कोमलच्या सालाच्या तीन हजारांतून दारूचे पैसे कापून घेतले जात. कधी कधी गावचे पोलीस बापाला दारू पाजून त्याच्याकडून सडलेली प्रेतं काढून घेण्याचं काम करून घेत. कोमलच्या घरापुढेच देशी दारूचं दुकान होतं. तिथे कुणी दारूडा झिंगून पडलेला दिसला, की कोमलचा बाप त्याच्या खिश्यातलीही दारूची बाटली काढून घेई. माझ्या लक्षात आलं, की कोमलच्या सुटकेसाठी दारूच्या आहारी गेलेल्या तिच्या आई-बापांकडून कोणतंही सहकार्य मिळण्याची शक्यता नाही. तरीही, काही ना काही प्रयत्न तर करायलाच हवे होते.  

मी कोमलला व तिच्या आईला काही जुने कपडे दिले आणि त्यांच्यासोबत कोमलच्या बापाला भेटायला त्यांच्या घरी गेलो. घर म्हणजे एक झोपडीच होती. कातकरी वस्तीवरची झोपडी. कोमलचा बाप दारूच्या नशेत तर्र होऊन पडला होता. झोपडीत सामानसुमान फारसं काही नव्हतंच. झोपडीत गेल्या गेल्या कोमल आपल्या वडिलांना बिलगून बसली. बापाने आपल्याला दारूपायी कामाला जुंपल्याचा राग, खंत तिच्या चेहर्‍यावर दिसत नव्हती. मला आश्चर्य वाटलं. मला पाहिल्यावर बाप उठून बाहेर आला. मी त्याच्याशी बोलू लागलो. कोमलला मेंढ्या वळायला कशासाठी पाठवता? किती लहान आहे ती पोर. तिला आश्रमशाळेत टाका. शिकेल. चांगली नोकरी करेल वगैरे वगैरे. 

मला वाटत होतं, तो माझ्यावर वैतागेल. तुमचा काय संबंध म्हणत मला हुसकावून लावेल. पण तसं काही झालं नाही. तो माझ्या बोलण्यावर होकारार्थी मान हलवत राहिला. करतो करतो म्हणू लागला. तो नशेत असल्यामुळे मी जास्त काही न बोलता परत आलो. वाटलं, चला फार काही त्रास न होता काम झालं. आता ही पोरगी काम सोडून शिकायला लागेल. 

पुढे काही दिवस त्यांच्या वस्तीवरून जाताना मी डोकावून बघायचो. मला कोमल त्यांच्या झोपडीच्या आसपास दिसायची. तो मेंढपाळ आता खाली कोकणात मेंढ्या चारायला गेला असणार, असा मी अंदाज बांधला. हुश्श झालं. 

सुट्टीत गावी गेल्यावर काही दिवस मला कोमलचा विसर पडला. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर एकदम आठवलं की कोमल यावर्षीपासून शाळेत जाणार आहे. म्हणून तिची चौकशी करायला परत तिच्या घरी गेलो. तेव्हाही तिचा बाप तर्र अवस्थेतच होता. कोमल कुठे दिसत नव्हती. बापाला विचारल्यावर तो म्हणाला, “ती तिच्या मावशीला भेटण्यासाठी दूरच्या गावी गेली आहे. आठ दिवसांत आली, की आपण तिला आश्रमशाळेत टाकू.” मी तिच्या सावत्र आईकडे पाहिलं. पण त्या बाई काहीच बोलल्या नाहीत. मी तिथून बाहेर पडलो. 

त्या कातकरी वस्तीतच माझा एक मित्र राहत होता. मी त्याला भेटलो तेव्हा सगळा उलगडा झाला. कोमलच्या बापाने मला खोटंच सांगितलं होतं. त्याने कोमलला पुन्हा मेंढपाळाकडे मेंढ्या वळण्यासाठी पाठवलं होतं. मेंढपाळाने तिला अक्षरशः ओढत ओढत नेलेलं मित्राने पाहिलं होतं. ते ऐकून मी सुन्न झालो. आता तातडीने काहीतरी हालचाल करणं गरजेचं होतं. कोमलच्या घरच्यांना विनंती-विनवण्या करण्याची वेळ निघून गेली होती. मी ठरवलं, सर्वात आधी त्या मेंढपाळाला गाठायचं; पण कसं? 

सुदैवाने मित्राच्या वाडीवरच्या एका माणसाकडे त्या मेंढपाळाचा मोबाइल नंबर होता. मी लगेच त्या नंबरवर फोन लावला आणि मेंढपाळाला खरीखोटी सुनावली. त्याला म्हटलं, ‘तुझे तीन हजार रुपये मी देतो; पण आधी कोमलला परत आणून सोड.’ 

तो मेंढपाळ आधी उडवाउडवीची उत्तरं देत होता. मात्र पोलीस केसची धमकी दिल्यावर तो सरळ झाला. तरी त्याने एक कारण पुढे केलंच... “माझ्या मंडळीला फटफटीनं उडावलं हाय. दहा दिवस थांबा, मी पोर आणून घालतो.” एवढं बोलून त्याने फोन कट करून टाकला. मला तरी ती थापच वाटली. दहा दिवस थांबून काहीही होणार नाही, हे माझ्या लक्षात आलं. 

मित्राला घेऊन मी पुन्हा कोमलच्या बापाकडे आलो. मित्राने कातकरी भाषेतूनच कोमलच्या बापाला खूप फटकारलं. त्यानंतर बाप पुरता वरमला. किमान आम्हाला तसं वाटलं. मेंढपाळाने दिलेले सर्व पैसे त्याने दारूत उडवले होते. त्यामुळे ‘आता तुम्हीच पैसे देऊन कोमलला सोडवून आणा’ अशी विनवणी तो करू लागला. मी त्याला आमच्यासोबत ताबडतोब मेंढपाळाकडे चलण्याची अट घातली. त्यावर त्याने त्या दिवसाचा त्याचा तीनशे रुपये रोज बुडण्याचं कारण पुढे केलं. मी तिथल्या तिथे त्याला माझ्या खिशातले तीनशे रुपये दिले आणि दोन मोटारसायकली घेऊन आम्ही तिघं निघालो. तरी निघण्यापूर्वी त्याने घरातली अर्धी बाटली दारू रिचवलीच. 

मेंढपाळाला शोधायचं कसं हा प्रश्न होता. माझ्या मित्राने पुन्हा त्या मेंढपाळाला फोन केला आणि त्याचा ठावठिकाणा विचारला. खोटं सांगितलंस तर पोलीसांना घेऊन येऊ, अशी धमकी दिल्यावर तो सरळ आला. आपण आणे गावाजवळ असल्याचं त्याने सांगून टाकलं. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर हे गाव आहे. आम्ही लगेच आमच्या मोटारसायकली नगरला जाणार्‍या महामार्गाकडे वळवल्या. 

आणखी दोन तासांत आम्ही नगर-कल्याण महामार्गावरच्या आणे गावात येऊन थांबलो. आता पुन्हा एकदा मेंढपाळाला फोन करावा का, या विचारात आम्ही काही वेळ तिथे थांबून राहिलो. तेवढ्यात लांबून एका मोटारसायकलवरून दोन माणसं येताना दिसली. त्या दोघांच्या मध्ये बसलेली कोमल आम्हाला दिसली. पुढच्या माणसाने अंगात मळका सदरा घातला होता. दोन्ही कान टोपी-उपरण्याने झाकलेले होते. तोच आम्हाला हवा असलेला मेंढपाळ होता. 

आमच्यापासून थोडी लांब त्याने मोटारसायकल थांबवली. कोमलला खाली उतरवून तो तिच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलू लागला. त्याच्या हावभावावरून तो तिला दम देत असावा. कोमल बिचारी घाबरली होती; मान हलवत नुसती ‘हो, हो’ म्हणत होती. मग तो मेंढपाळ आमच्याजवळ आला. मला नमस्कार करत गरीब आवाजात म्हणाला, “सर, अजून दोन तीन दिवस थांबला असता, तर मीच मुलीला आणून घातलं असतं. मंडळी आजारी असल्यामुळे आमची आबाळ झालीय.” 

नंतर आम्ही सगळे एका हॉटेलात चहा प्यायला गेलो. चहाचा ग्लास हातात धरलेली कोमल थरथर कापत होती. चहा पिता पिता मी खिशात हात घालून तीन हजार रुपये काढले आणि त्या मेंढपाळाला दिले. त्याने त्यातले अडीच हजार रुपयेच ठेवून घेतले आणि अगदी उदारपणा दाखवत तो म्हणाला, “कोमलनं दोन महिने माझ्या मेंढ्या वळल्या हायीत. त्यामुळं पाचशे रुपये मला कमी द्या. ते माझ्या नातवावरून आवळणी टाकून मी ह्या पोरीला देतो.” निघताना तो म्हणाला, त्याने आमच्याशी वाद घातलाच- हिचा बेवडा बाप हिला शिकू देणार नाही. हिला दुसर्‍या मेंढक्याला विकून टाकील. तशीही कातकर्‍याच्या पोरी कुठे शाळा शिकतात का, वगैरे बोलत राहिला.

त्याच्या फार नादी न लागता आम्ही कोमलला घेऊन तिथून निघालो. एका हॉटेलवर मिसळपाव खायला थांबलो. तेव्हा कोमलला आम्ही बोलतं केलं.  मेंढपाळाकडच्या तिच्या जगण्याची दशा ऐकून आमच्या जीवाचं पाणी पाणी झालं. मेंढपाळ तिला पहाटे पाच वाजताच उठवायचा. सगळ्या मेंढ्या वाघरीच्या बाहेर काढून तिला खराटा मारायला लावायचा. मेंढ्या पिळून काढलेलं दूध तो विकायला घेऊन जायचा. कोमलला रात्रीच्या उरलेल्या भाकरीच वाढायचा. मेंढ्या चुकून नको त्या कुंपणात शिरल्या किंवा आणखी काही चूक झाली, तर तो कोमलला पायातल्या चपलेने मारायचा. अशा कितीतरी हकीकती. कोमल एका निर्विकार चेहर्‍याने हे सगळं सांगत होती. आणि तिचा बापही ते तेवढ्याच निर्विकार चेहेर्‍याने ऐकत होता. त्याची दारू अजून उतरलेली नसावी. कोमल म्हणाली, मेंढपाळाच्या बायकोचा अपघात वगैरे काहीही झालेला नव्हता; ती आपल्या लेकीला भेटायला गावाला गेली होती. 

आम्ही कोमल आणि तिच्या बापाला वस्तीवर आणून सोडलं. पोरीला आणखी कुणा मेंढपाळाच्या हवाली करू नको, असा दम तिच्या बापाला पुन्हा एकदा भरला. थोड्या दिवसांनी कोमलला घेऊन मी ओतूरच्या एका शाळेत गेलो. कोमलच्या घरापासून ती सगळ्यात जवळची शाळा होती. पण तिथल्या मुख्याध्यापकांनी तिला तिथे प्रवेश द्यायला थेट नकार दिला. त्यांचं म्हणणं, चौथीत शाळा सोडून या मुलीला दोन वर्षं झाली आहेत. आता हिला शाळेत घालून काय उपयोग? उलट तिच्या कामाचे बापाला तीन हजार रुपये तरी मिळत होते. 



त्यांचं बोलणं ऐकून मला प्रचंड संताप आला. मग मी कोमलला घेऊन गाडगेमहाराज आश्रमशाळेत गेलो. तिथले मुख्याध्यापक राजू ठोळक यांनी कोमलला त्यांच्या शाळेत प्रवेश देण्याचं आश्वासन दिलं. त्यांनी तिच्या जुन्या शाळेशी पत्रव्यवहार करून तिचा दाखलाही मागवून घेतला. अखेर मेंढ्या वळण्याचं काम सोडून कोमल शाळेत दाखल झाली. माझा जीव भांड्यात पडला. 

फेसबुकवर मी कोमलची ही गोष्ट लिहिली. ती वाचून अनेकांनी तिच्यासाठी आर्थिक मदत देऊ केली. त्यातून मी लगेच कोमलसाठी शाळेचा गणवेश, वह्या-पुस्तकं घेतली. दोन वर्षांपूर्वी सुटलेली शाळा कोमलला परत मिळाली; तिच्या आयुष्यातलं वेठबिगारीचं नष्टचर्य संपलं.  

मेंढपाळाच्या तावडीतून कोमलची सुटका झाल्याची बातमी ‘सकाळ’ वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. ती पाहून माझ्या चुलत भावाचा तिंगाववरून फोन आला. आमच्या तिंगावजवळच्या धनगरवाड्यावरची एक भिल्ल मुलगी देखील सालाने मेंढ्या वळतेय, असं भावाला समजलं होतं. नंदा तिचं नाव. कोमलची बातमी वाचल्यावर नंदाचीही अशीच सुटका करता येईल, असं माझ्या भावाच्या मनात आलं. मी तर काय तयारच होतो.  

लगेच तिंगावला जायला निघालो. आमचं गाव संगमनेर तालुक्यातलं. हा सगळा दुष्काळी भाग. इथल्या रानात दिवाळीपर्यंत मेंढ्यांना खायला चारा असतो. शेतांच्या बांधावरच्या लिंबा-बाभळीचे झाडे डहाळून मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना पाला आणि बाभळीच्या शेंगा खाऊ घालतात. दिवाळीनंतर हे मेंढपाळ दूरच्या गावाला निघतात. रानात पाल टाकून राहण्यासाठी लागणारं सामान ते त्यांच्या घोडीच्या पाठीवर लादून नेतात. मेंढपाळांना भाकरी करून घालण्यासाठी एखादं बाईमाणूस सोबत असतं. जिथे अंधार पडेल तिथेच सर्वांचा मुक्काम होतो. पावसाळा सुरू झाल्यावर मेंढपाळ मेंढ्या घेऊन पुन्हा आपल्या गावी येतात. अनेक वर्षांपासून मेंढपाळ हेच करत आले आहेत.  

संगमनेर तालुक्यातल्या तिंगाव, कौठे, धनगरवाडा, मेंढवण, तळेगाव अशा अनेक गावांमध्ये मेंढ्या वळणारे अनेक लहान लहान सालगडी मी पाहिले होते. पण सालाने मेंढ्या वळणारी कोमलनंतर हीच मुलगी पाहत होतो. आणि तीही आमच्या तिंगावजवळच्या धनगरवाड्यावर. चुलत भावाने त्या मुलीचे काही फोटो मला पाठवले होते. ते पाहून ती वयाने कोमलपेक्षाही लहान असणार, असं वाटलं. मी तिंगावला पोचल्यावर जरा चौकशी केली, तेव्हा समजलं की नंदा गेल्या तीन वर्षांपासून सालाने मेंढ्या वळायला जात होती. पिण्याचं पाणी आणण्यासाठी ती भर उन्हाळ्यात चार किलोमीटर अनवाणी पायपीट करायची. त्या मेंढपाळाला चारणीला जाता जाता कधीतरी नंदाचा बाप भेटला होता. त्याने तिच्या बापाला दारूचं अमिष दाखवून नंदाला सालाने आणलं होतं. 

भल्या सकाळी आम्ही धनगरवाड्यावर गेलो. पावसाळा सुरू झाल्यामुळे चारणीसाठी बाहेरगावी गेलेल्या सगळ्या मेंढ्या गावी आल्या होत्या. धनगरवाड्यावर मेंढ्यांची एकच ‘बेबे’ सुरू होती. जुनी कौलारू घरं चुलीच्या धुराने काळवंडलेली होती. प्रत्येक घरापुढे वाघूर ठोकलेलं होतं; त्यात मेंढ्या रवंथ करत बसलेल्या होत्या. काही मेंढ्या तर लेंड्यांमध्येच फतकल मारून बसल्या होत्या. गळ्यात लोखंडी पट्टा असलेली राखणी कुत्री वाघरीजवळ आपलं तोंड शेपटीजवळ घेऊन निजलेली होती. काही ठिकाणी आदल्या दिवशी व्यायलेल्या मेंढीच्या मायांगातून बाहेर लोंबणार्‍या जाराच्या फुग्यावर चोच मारण्यासाठी डोमकावळा धडपडत होता. एक मेंढका मेंढीच्या खुरातला काटा लाचकडाने उपटण्याचा प्रयत्न करत बसला होता. रानातला कोवळा चारा खाऊन फुगलेल्या मेंढीला एखादा मेंढका बेलं कुटून पाजत होता. बर्‍याच मेंढक्यांनी लिंबाच्या हिरव्या पाल्याच्या जुड्या बांधून लहान कोकरांना खाण्यासाठी ठेवल्या होत्या. लहान काळी कोकरं तंगड्या वर करून तो पाला खात होती. डोक्याला लाल पागोटा, पायात कातडी आणि अंगावर काळी घोगडी पांघरलेले एक म्हातारे सगळ्या धगनरवाडयातून फिरताना दिसत होते.    

आम्ही नंदाला शोधत शोधत गेलो. एके ठिकाणी ती रात्रभर मेंढ्या बसलेला दगडी वाडा झाडताना आम्हाला सापडली. मेंढ्यांच्या मुताच्या थारोळ्यातून झाडू फिरवताना तिच्या अंगावर सगळी घाण उडत होती. तिच्याकडे बघूनच कळत होतं की गेले अनेक दिवस तिने अंघोळ केलेली नव्हती. तेलपाणी न लागलेले तिचे केस जळून गेलेल्या रोपट्यासारखे वाटत होते. ती फारच अशक्त दिसत होती. आम्हाला पाहून त्या मेंढपाळाच्या बायकोने तिला लगेच घरात पाठवलं. ती आत गेली आणि खराटा हातात धरून खिडकीतून आम्हाला न्याहाळत राहिली. कुणाशी बोलायचं नाही आणि सालाने मेंढ्या वळतेय असं सांगायचं नाही. कुणी विचारलंच तर या घरात पाहुणी आलीय, असं सांगायचं हे मंदालाही पढवून ठेवलं असावं. मेंढपाळ घरात नव्हता. त्याची बायको आमच्याकडे संशयाने पाहत होती. आम्ही मेंढपाळाबद्दल चौकशी केल्यावर तो कोकरं विकायला बाजारात गेल्याचं कळलं. मग जास्त वेळ तिथे थांबणं आम्हाला बरोबर वाटलं नाही. मी एकटी बाईमाणूस घरात असताना ही माणसं इकडे कशाला आली, असं सुद्धा ती बाई म्हणाली असती. 

आम्ही तिथून बाजारापाशी आलो. तो मेंढपाळ आपली कोकरं घेऊन जवळच्या फाट्यावर उभा असलेला दिसला. फाट्यावर उभं राहिलं म्हणजे वाटेने येणारे जाणारे खाटीक भाव करून कोकरं विकत घेतात. जागेवर गिर्‍हाईक मिळत असल्यामुळे लांबच्या लोणीच्या बुधवार बाजाराला कुणीच जात नाही. एवढ्या लांब पायी कोकरं हुसकत नेणं सोपं नसतं. वाटेतल्या वाडीवस्तीवरचे कुत्रे कोकरांच्या कळपावर हल्ला करतात. अचानक हल्ला झाल्यावर रस्ता सोडून इकडंतिकडं पळालेली कोकरं पुन्हा जुळवणं म्हणजे ताप होतो. त्यापेक्षा असं घराजवळ आलेलं गिर्‍हाईक नेहमी चांगलं असतं. 

आम्ही फाट्यावर आलो, तेव्हा तो मेंढपाळ आपल्या आठ-दहा कोकरांच्या कळपासोबत तिथे उभा होता. हाही चांगला नंदाच्या आज्जाच्या वयाचा दिसत होता. माझ्या भावाने आपल्या खिशातला पेपर काढून कोमलच्या सुटकेची बातमी त्या मेंढपाळापुढे धरली. त्याने ती बातमी वाचली आणि तो कोकरांच्या कळपात घुसलेल्या लांडग्याकडे पाहावं तसं आम्हाला निरखू लागला. मी समजुतीच्या शब्दात त्याला सांगितलं, ‘लहान मुलीला असं सालगडी म्हणून ठेवणं बरोबर नाही; तुमच्या नाती जशा शाळेत जातात, तसं तिलाही शाळेत जाण्याचा हक्क आहे.’ त्यावर तो एकदम गुश्शात म्हणाला, “ती लहान पोर आमच्या मागं लागून इथं आलीय. मी तिला नातीपेक्षा जास्त जीव लावतोय. तुम्हाला कोण म्हणालं ती सालगडी आहे म्हणून. उद्या तिच्या बापाला फोन लावतो आणि तिला तिच्या गावाला पाठवून देतो. तुम्ही पंचायती करीत माझ्याकडे परत यायचं नाही.” 

आम्ही त्याला तिथल्या तिथेच नंदाच्या बापाला फोन लावायला लावला. नंदा पुन्हा त्याच्या मेंढ्या वळताना दिसली, तर पोलीस केस करण्याचा इशारा दिला. त्यादिवशी दिवसभर ती मुलगी मेंढ्या वळण्यासाठी रानात आली नाही. धनगरवाड्यावर काम करणारे एक शिक्षक त्या मेंढपाळाच्या घराकडे लक्ष ठेवून होते. त्या मुलीचा बाप मेंढपाळाच्या घराजवळ दिसल्या दिसल्या त्या शिक्षकांनी आम्हाला फोन केला. आम्ही लगेच तिथे गेलो. माझ्या भावाने त्याला जाब विचारल्यावर त्याने हात जोडून आमची माफी मागितली. आम्ही नंदाच्या शिक्षणाचा सगळा खर्च करण्याची तयारी दर्शवली. आम्ही बोलत असताना बाप खाली मान घालून ‘हो, हो’ म्हणत होता. पण ही मुलगी पुन्हा शाळेत जाईल याची मला खात्री वाटेना. तिचा बाप तिला आता लांबच्या मेंढपाळाकडे पाठवेल की काय, अशी शंकाही वाटून गेली. मग मी बापाला निर्वाणीचा इशारा दिला- आम्ही आठ-दहा दिवसांतून एकदा तुमच्या गावाला चक्कर मारणार. आम्हाला नंदा तुमच्या घरी दिसली नाही तर आम्ही थेट पोलीस स्टेशन गाठणार, मुलीला बालमजुरी करायला लावली म्हणून तुम्हाला सुद्धा शिक्षा होऊ शकते. या धमकीचा उपयोग झाला असावा. नंदाचा बाप तिला घेऊन एसटीने आपल्या गावी निघून गेला. 

कोमलनंतर आणखी एका मुलीची वेठबिगारीतून सुटका करण्यात आम्हाला यश आलं होतं. कोमल आता पाठीवर दप्तर अडकवून आश्रमशाळेत जातेय. रोज ताजं जेवण जेवतेय. उघड्या आभाळाखाली झोपण्यापेक्षा आश्रमशाळेच्या सुरक्षित वातावरणात निर्धोक झोपतेय. मेंढ्या वळताना होणारे अमानुष कष्ट आता तिच्या वाट्याला पुन्हा येणार नाहीत, अशी आशा आहे. नंदा शाळेत जाऊ लागली की नाही हे अजून कळलेलं नाही. तिच्या गावी चक्कर मारली की कळेलच. पण ती आमच्या गावाजवळच्या मेंढपाळांकडे मेंढ्या वळताना दिसलेली नाही, ही गोष्टही मला फार समाधानाची वाटतेय. मी आणि माझे मित्र सालाने काम करणार्‍या अशा आणखी मुला-मुलींचा माग काढतो आहोतच. पण आता कुठेही डोंगरावर मेंढ्या चरताना दिसल्या की माझी नजर आपसूक त्यांना चारणार्‍यांना शोधत राहते.. न जाणो त्यात कुणी कोमल-नंदा निर्विकार चेहरा घेऊन गपगुमान आयुष्याचं ओझं वहात असेल..

- अनिल साबळे

(लेखाचं शीर्षक कवी ग्रेस यांच्या ‘काही धारा 

माझ्या पोरी’ या कवितेतील ओळीवर आधारित)

------------------------------------------------------------------------

आपल्या आसपास घडणाऱ्या पण आपल्या विचारविश्वाचा भाग नसणाऱ्या घडामोडी समजून घ्याव्यात, त्या घडामोडींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा, आपल्या म्हणण्यापल्याडचे काही दृष्टिकोन समजून घ्यावेत, आपल्याला न दिसणारं जग जाणून घ्यावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच 'अनुभव' मासिकाचा दर महिन्याचा अंक म्हणजे आपला भवताल, आपला समाज समजून घेण्यासाठीची धडपड असते. अनुभव'च्या परिवाराचा एक भाग बनून तुम्हीही या प्रवासात सामील होऊ शकता.'अनुभव'चे वर्गणीदार बना

• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://imojo.in/anubhav

• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://www.instamojo.com/anubhavmasik/pdf-3a78e/

PDF अंक वार्षिक - ₹ ४००
अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :
वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० ।

• वर्गणी भरण्यासाठी संपर्क - 9922433614


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८