लॉकडाऊनमधले शिक्षणप्रयोग ; तुषार कलबुर्गी
अनुभव सप्टेंबर २०२१च्या अंकातून
कोव्हिडकाळात शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला; पण तो सगळ्यांनाच परवडणारा नाही. कोणाकडे स्मार्टफोन नाही, तर कोणाकडे स्मार्टफोन रिचार्ज करायला पैसे नाहीत. या दोन्ही गोष्टी असल्या तर घरी फोन एक आणि मुलं त्याहून जास्त. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या खिशाला कात्री लागलेली असताना ऑनलाइन शिक्षणासाठी पैसा खर्च करणं कसं परवडणार? मुलं शाळेत येऊ शकत नसतील तर शिक्षकांनी मुलांपर्यंत जायला हवं असा विचार करून पुण्यातील शिक्षक अमर पोळ यांनी नवा प्रयोग सुरू केला. शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या प्रयत्नांवर टाकलेला प्रकाश.
आकाश यादव हा पुण्याच्या गुलटेकडीमधील मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये
राहणारा आठवीतला मुलगा.
सातवीपर्यंत जवळच्या महानगर पालिकेच्या शाळेत शिकला. आई-वडील दोघंही भाजी विक्री करतात. त्यातून त्यांचं घर चालतं. आकाशकडे त्याच्या ऑनलाईन शिक्षणासाठी
स्मार्टफोन नाही. मुलाच्या शिक्षणासाठी मोबाईल घेऊ शकतील आणि
दर महिन्याला दोनशे रुपयांचं रिचार्ज करू शकतील, अशी त्याच्या
घरची परिस्थिती नाही.
रोशनी,
खुशी आणि मोहित हे तिघं भाऊ-बहीणही मीनाताई ठाकरे
वसाहतीमध्ये राहतात. खुशी नववीला आणि मोहित सातवीला आहे,
तर रोशनी त्याच महापालिकेच्या शाळेतून नुकतीच दहावी पास झाली आहे.
त्यांची आई धुणीभांड्याची कामं करते. वडील असून
नसल्यासारखे. महिन्याला जेमतेम दहा हजारांची कमाई. तिघांच्या शिक्षणासाठी घरात एकच स्मार्टफोन आहे. तोही
हप्त्यावर घेतलेला. अशा परिस्थितीत शिक्षण कसं होणार?
ही दोन प्रातिनिधिक उदाहरणं. पण कमीअधिक फरकाने सगळ्याच कष्टकरी
घरांमध्ये मुलांच्या शिक्षणाची हीच दैना आहे. स्मार्ट फोन,
रिचार्ज आणि इंटरनेट रेंज असल्याशिवाय शिक्षण मिळणं अवघड. त्यात ऑनलाइन शिक्षणातून विषय कळणं आणखी अवघड. ही परिस्थिती
पुण्यात एका खाजगी शाळेत शिक्षक असणार्या अमर पोळ यांना दिसत
होती. मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी काहीतरी करायला
हवं, असं त्यांच्या मनाने घेतलं. त्यातूनच
अमर सर आणि त्यांचे स्वयंसेवक मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये गेल्या वर्षभरापासून पहिली
ते दहावीच्या मुलांना मोफत शिकवत आहेत. या शिकवणीमुळे अनेक मुलं
शिक्षणाच्या धारेत टिकून आहेत.
अमर पोळ स्वतः अतिशय कष्टातून शिक्षण घेऊन वर आले. घरची गरिबी.
शिक्षणासाठीही घरी पैसा नसल्यामुळे जे मिळेल ते काम करून पैसे कमवत ते
शिकले. पण त्यांना शाळेत कायमच चांगले शिक्षक मिळत गेल्यामुळे
त्यांनीही शिक्षक होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्यांनी बी.ए. आणि एम. एस. डब्ल्यूचंही शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यावेळी ‘थरमॅक्स सोशल इनिशिएटिव्ह फाउंडेशन’
आणि ‘आकांक्षा’ संस्थेच्या
साह्याने पुणे महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर एक प्रकल्प सुरू झाला होता. त्यात त्यांना सोशल वर्कर आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून काम मिळालं.
तिथे दोन वर्षांचा अनुभव घेतल्यावर शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची
संधीही त्यांच्यासमोर चालून आली. पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या
शाळेत ते या प्रकल्पाअंतर्गतच शिक्षक म्हणून रुजू झाले. आता काबाडकष्ट
करण्याचे दिवस संपले, आता सुखात राहू, असं
त्यांनी म्हटलं असतं तर चुकीचं ठरलं नसतं. पण आपल्याला शिकताना
ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, त्या इतर मुलांना लागू
नयेत, त्यांना चांगलं सकस शिक्षण मिळावं यासाठी धडपडत राहण्याचा
मार्ग अमर सरांनी स्वीकारला.
पालिकेची ही शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरी त्यात बहुसंख्य विद्यार्थी
गरीब वस्त्यांमधील आणि अल्पशिक्षित घरांमधील असत. त्यांच्या आई-वडिलांनी मुलांच्या भविष्यासाठी पोटाला चिमटा काढून त्यांना या शाळेत टाकलेलं
असे. पण घरी अभ्यास करून घेणारं कुणी नसल्यामुळे त्यांना शिक्षण
जड जाई. हे ओळखून अमर सरांनी मुलांसाठी अनेक उपक्रम सुरू केले.
शाळेतल्या पुस्तकी शिक्षणाला अनुभवांची जोड दिली, तर मुलांना विषय अधिक चांगले समजतील असा विचार करून त्यांनी मुलांना शाळेबाहेरचं
जग दाखवायला सुरुवात केली. चांगल्या लेखकांच्या भेटी घडवून आणणं,
चांगले सिनेमे-नाटकं दाखवणं, चांगली पुस्तकं वाचण्याची सवय लावणं, विविध विषय समजून
घेऊन त्यावर लिहिण्यासाठी-आपली मतं मांडण्यासाठी मुलांना उद्युक्त
करणं अशा अनेक उपक्रमांमुळे अमर सरांच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुलभ झालं आणि त्यांच्या
व्यक्तिमत्त्व विकासाची वाटही मोकळी झाली. यातूनच मुलांना अभ्यासक्रमाबाहेरचं
समाजशिक्षण मिळावं यासाठी त्यांनी बालशिक्षण मंचही सुरू केला.
हे काम वैयक्तिक पातळीवर करत असतानाच या शिक्षणप्रयोगाचा वसा इतर
शिक्षकांपर्यंत घेऊन जाण्याची संधीही अमर सरांना मिळाली. पुण्यातल्या
काही कंपन्यांच्या सीएसआर प्रयत्नांमुळे अध्यापन-अध्ययन प्रक्रियेची
गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे चालून
आली.
गेल्या वर्षी कोव्हिडच्या महासाथीमुळे लॉकडाऊन लागला आणि शाळा ठप्प झाल्या तोपर्यंत अमर पोळ यांचं हे काम जोरात सुरू होतं. पण लॉकडाऊनच्या नियमांमुळे मुलांना एकत्र येणं अशक्य झालं. त्यामुळे अभ्यासिका आणि व्यक्तिमत्व विकासाचा वर्ग नाईलाजाने थांबवावा लागला. पण तरीही सर स्वस्थ बसले नाहीत. त्यांच्या वर्गात येणार्या जवळपास सगळ्याच मुलांच्या पालकांचं पोट हातावर असल्याने लॉकडाऊनमुळे त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली होती. सरांनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी मिळून सर्व गरजू पालकांना मोफत किराणा वाटण्याचा कार्यक्रम सुरू केला. पण अमर सरांचा मूळ पिंड शिक्षकाचा. आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान कसं थांबवायचं हा विचार रोज त्यांच्या मनाला स्पर्श करत होता.
कोव्हिडची परिस्थिती पूर्ववत होण्याची चिन्हं दिसत नसल्यामुळे शासनाने
शाळा वर्गाविनाच सुरू करण्याचा निर्णय घेतला. ऑनलाइन शिक्षणाचा अध्याय सुरू झाला.
ऑनलाइन माध्यम कसं क्रांतिकारी आहे, याची चर्चाही
लगेचच सुरू झाली. पण प्रत्यक्षात समाजाचा मोठा भाग ऑनलाइनपासून
वंचित आहे हे अमर सरांनी ठाकरे वसाहतीमध्ये प्रत्यक्षात पाहिलं होतं. विशेष म्हणजे अमर सर मुलींच्या ज्या खाजगी शाळेत शिक्षक आहेत, त्या शाळेने प्रत्येक मुलीला ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब दिले. शाळा त्यामध्ये दर महिन्याला नेटचं रिचार्ज करते. एकीकडे
काही मुलं ऑनलाइन शिक्षणाकडे सहजपणे वळू शकली, तर दुसरीकडेे काही
मुलं त्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली जाण्याची भीती निर्माण झाली.
ही विषमता सरांची अस्वस्थता वाढवत होती.
आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल यावर अमर सर आणि स्वयंसेवक
रोज चर्चा करायचे.
त्यातून एकदा विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शिकवण्याचा मार्ग समोर आला.
पूर्वी अमर सरांकडे अभ्यासिकेमध्ये महानगर पालिकेच्या शाळेतील जवळपास
७० विद्यार्थी यायचे. त्याच मुलांचे वर्ग घ्यायचं त्यांनी ठरवलं.
त्यांच्यासोबत होते त्यांनीच याआधी तयार केलेले विद्यार्थी. या विद्यार्थ्यांनी आनंदाने स्वयंसेवक म्हणून काम करायचं ठरवलं.
महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या वेगळ्या अडचणी असतात. दुसरीतल्या
विद्यार्थ्याला मुळाक्षरांची ओळख नसते, चौथीच्या विद्यार्थ्यांना
दुसरीचा अभ्यास जमत नाही. आठवीतल्या मुलांना एकअंकी गुणाकार येत
नसतो. कोणी गणितामध्ये कच्चा, तर कोणी भाषेमध्ये.
अशा मुलांना इयत्तेनुसार शिकवणं म्हणजे खरंतर त्यांच्यावर अन्यायच.
म्हणून अमर सरांनी या मुलांचे त्यांच्या क्षमतांनुसार गट पाडले.
मुळाक्षरं न येणारे, मुळाक्षरांची ओळख असूनही वाक्य
वाचता न येणारे, लिहिता न येणारे, इंग्रजीमध्ये
कच्चे, गणितामध्ये कच्चे इ. प्रत्येक विद्यार्थ्याकडे
वैयक्तिक लक्ष देता यावं यासाठी एका गटामध्ये सात-आठ विद्यार्थी
असतील असा त्यांचा कटाक्ष होता.
या विद्यार्थ्यांना शिकवायचं कुठे हाही प्रश्न होता. सुरुवातीला
एका स्वयंसेवकाच्या घराच्या गच्चीवर हे तास सुरू झाले. रोज संध्याकाळी
मुलं तिथे जमायची. रोज वेगवेगळ्या गटांना शिकवलं जायचं.
महिनाभर तिथे गटांनुसार वर्ग चालले, पण लवकरच जागा
अपुरी पडू लागली. असे वर्ग चालू आहेत, हे
कळल्यावर अनेक मुलं तिथे येण्यासाठी उत्सुक होती. मग ज्या विद्यार्थ्यांच्या
घरी सात-आठ जणांचे वर्ग घेता येतील, अशांच्या
घरी किंवा त्यांच्या घरांच्या गच्चीवर वर्ग सुरू झाले. आपल्या
मुलाला शिकवायला शिक्षक घरी येणार म्हटल्यावर सगळ्या पालकांनी त्यांचं स्वागतच केलं.
२०२०च्या ऑगस्टपासून आजतागायत हे वर्ग सुरू आहेत.
जुलैमध्ये त्यात एक बदल झाला. यावर्षी तरी शाळा सुरू होतील, असं वाटत होतं. पण एप्रिल-मेमध्ये आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला. त्यामुळे हे वर्ग यापुढेही सुरू ठेवायचे असतील तर लोकांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना शिकवणं हे काही शाश्वत मॉडेल नाही, असं अमर सरांना वाटतं होतं. उद्या शाळा सुरू झाली तरीही ही मुलं पूरक अभ्यासासाठी-शंका निरसनासाठी आपल्याकडे येत राहिली पाहिजेत, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे सरांनी ठाकरे वसाहतीतलं आपलं दहा बाय दहाचं जुनं घर बांधायला काढलं. त्या बांधकामासाठी लोकांकडून मदत गोळा केली. घराची डागडुजी करत आणखी एक मजला चढवला. तिथे आता जवळपास साठ विद्यार्थी दररोज येतात. संध्याकाळी पाच ते रात्री दहा या वेळात गटांनुसार एकेक तास इथे वर्ग चालतात, तेही विद्यार्थ्यांकडून कसलंही शुल्क न घेता. काही वर्ग स्वतः सर घेतात, तर काही वर्गाची जबाबदारी स्वयंसेवकांकडे सोपवली जाते.
इतर वस्त्यांमधील मुलांच्या ऑनलाइन शिक्षणाची परिस्थिती फारशी वेगळी नाही. त्यातही ऑनलाइन शिक्षणामध्ये मागे असलेले विद्यार्थी सरकारी शाळेतले असतात ही गोष्ट सूचक आहे. पण हा प्रयोग प्रत्येक वस्तीत राबवणं अमर सरांना शक्य नाही. ही परिस्थिती बदलण्याची तीव्र इच्छा आणि तळमळ असली तरी आमची शक्ती मर्यादित आहे. त्यामुळे आमचा फोकस सध्या फक्त मीनाताई ठाकरे वसाहतीमधील पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांवरच आहे. आम्ही सध्या मोठा घास घेऊ इच्छित नाही. मुलांच्या शिक्षणाबद्दल तळमळ असलेल्यांनी आमचं मॉडेल आपापल्या भागामध्ये अमलात आणावं, असं अमर सर म्हणतात. त्यासाठी या शिक्षकांना लागेल ती मदत करण्याचीही त्यांची तयारी आहे.
- तुषार कलबुर्गी ( ७४४८१४९०३६ )
--------------------------------------------------------------------------------------
आपल्या आसपास घडणाऱ्या पण आपल्या विचारविश्वाचा भाग नसणाऱ्या घडामोडी समजून घ्याव्यात, त्या घडामोडींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा, आपल्या म्हणण्यापल्याडचे काही दृष्टिकोन समजून घ्यावेत, आपल्याला न दिसणारं जग जाणून घ्यावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच 'अनुभव' मासिकाचा दर महिन्याचा अंक म्हणजे आपला भवताल, आपला समाज समजून घेण्यासाठीची धडपड असते. अनुभव'च्या परिवाराचा एक भाग बनून तुम्हीही या प्रवासात सामील होऊ शकता. 'अनुभव'चे वर्गणीदार बना.
• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://imojo.in/anubhav
• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://www.instamojo.com/anubhavmasik/pdf-3a78e/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा