कोरोना कल्लोळाचे १७० दिवस : मुकुंद कुलकर्णी

अनुभव दिवाळी २०२१च्या अंकातून 

‘एमआरआय’च्या गारेगार पेटीत पडलो होतो. विभिन्न लयीचं, भन्नाट बाजाचं संगीत थिरकत कानात रिचवलं जात होतं. तलवारबाज घालतात तशा घट्ट शिरेटोपात डोकं बंदिस्त होतं. अंगावर हॉस्पिटलचे कपडे लटकत होते. चटका देणार्‍या गारठ्यात अंगावर डबल लेअरचं, उबदार ब्लँकेट होतं. त्रास नव्हता, अवघडलेपण होतं. संगीताच्या प्रत्येक चढत्या-उतरत्या लाटांमध्ये अनेक आठवणी, घटना आपल्या चेहर्‍यांची उघडझाप करत गडप होत होत्या. मध्येच हाताच्या नसेत कुठलासा द्राव घुसवण्यात आला. एका सुईच्या अग्रावर किती स्मरणं असू शकतात याची तेव्हा जाणीव झाली. सुमारे तासभर हा संगीत भांगडा सुरू होता. अनुभवांच्या जात्यावर मी असा दळला जाईन, अशी आधी कधी कल्पनाही केली नव्हती. आणि अजूनही ‘सुपात’ बरंच काही शिल्लक आहे, असे संकेत डॉक्टरांच्या बोलण्यातून मिळत होते..

..या गारेगार ‘एमआरआय’ अनुभवाच्या शंभर दिवस आधी म्हणजे १७ एप्रिल २०२१ रोजी ही गोष्ट सुरू झाली.

शेजार-पाजार अन् भवताल धुंडाळत जिथे तिथे स्थिरावणारा कोरोना माझ्या कुशीत घुसला होता. किंबहुना मी त्याच्या कुशीत होतो. त्याआधी तीन आठवड्यांपूर्वी लशीचा पहिला डोस टोचून झाला होता. पण तरीही अंगात कचकच सुरू झाली होती. ‘वेदर चेंज’, ‘तापमानाची भरती’, ‘पुण्याचं पोल्युशन’ वगैरे असावं असं मानून सिनॅरेस्टच्या गोळीपासून सुरुवात झाली. तात्पुरतं बरं वाटायचंही. पण मग ताप चढला. भूक मेली, पण चव आणि वास शाबूत होते. याच गुगलीला फसलो! 

चार दिवसांनी पूनमला (बायको, ती स्वत: डॉक्टर आहे) आणि अभयालाही (मुलगी) लक्षणं दिसू लागली. मग आरटीपीसीआर! त्यासाठी गर्दी होती. रिपोर्ट मिळायला एक-दोन दिवस लागायचे. ‘सह्याद्री लॅबच्या बाणेर सेंटरला जा, संध्याकाळपर्यंत रिपोर्ट्स मिळतील,’ असं सह्याद्री हॉस्पिटलमध्येच वरिष्ठ फिजिशियन असलेल्या, वयाने आणि ज्ञानानेही मोठ्या असलेल्या पुतण्याने -डॉ. अविनाश कुलकर्णी याने फर्मावलं. अभयाने त्या सेंटरला ऑनलाइन नोंदणी केली आणि २३ एप्रिल रोजी तापलेल्या शरीरात बाकबुक करणार्‍या मनाने सेंटरवर पोहोचलो. रांग होती, पण आगाऊ नोंदणी असल्याने लगेच नंबर लागला. टिव्हीवाल्यांनी तपासणीची दहशत घातली होती. पण नाक-घश्यात काड्या घालण्याची ही टेस्ट जेवढी त्रासदायक वाटली होती, तेवढी पार करताना जाणवली नाही. 

संध्याकाळी ‘इडा-पिडा’ घेऊन ‘रिपोर्ट्स’ मोबाइलवर धडकले. पुढे या धडका ‘आतंकवादी’ होणार होत्या याची म्या पामराला त्यावेळी अजिबात जाणीव नव्हती. कशी असणार? गेल्या साठ वर्षांत सहावेळा देखील रिपोर्ट्सशी पाला पडला नव्हता. पण ‘भूतकाळ छोडो!’.. वर्तमानात तिघांचे रिपोर्ट्स ‘पॉझिटिव्ह’ होते. मग लगेच पुढची रक्त तपासणी झाली आणि पोळा फुटला! बायको-मुलगी ‘माइल्ड’ होत्या; पण आमची केस (रिपोर्टमध्ये) हाताबाहेर धावत होती. 

२४ एप्रिल, रविवार. सकाळ भपक्कन आदळली ती डॉक्टर पुतण्याचा फोन घेऊनच. ‘हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागेल, ते पण लगेच! तयारी कर.’ त्याने आदेश सोडला. पण बाहेरची स्थिती एकदम खतरनाक होती. हॉस्पिटल, बेड्स, ऑक्सिजन पुरवठा, औषधांची उपलब्धता वगैरे सर्व आरोग्ययंत्रणा पार धराशाई होत्या. ‘बेड देता का कुणी... ऑक्सिजनचा बेड!’ असा आकांत उसळला होता. मला त्रास काही नव्हता. गोळ्यांच्या मार्‍यात ताप दडून बसला होता. प्राणवायू ताळ्यावर होता. घरच्यांची अन् मित्रांची बेडसाठी धावपळ सुरू होती. मी निवांत होतो. खरंच अज्ञानात किती मूर्ख सुख असतं, नाही! 

अखेर डॉक्टर पुतण्याने जिकिरीने बेड मिळवला आणि बॅगेसह आमची वरात निघाली. पूनम (रिपोर्ट्स कळत असल्याने) आणि अभया हल्लक झाल्या होत्या. पण अभया हिमतीने गाडी चालवत होती. मी काही जिवलगांना फोन करत होतो. ‘खुदा ने चाहा तो फिर मिलेंगे,’ वगैरे डायलॉग मारत निरोप घेत होतो. मनात विश्वास होता : बस, ‘हा गेलो आणि हा परतलो’. आजारपण, दवाखाना याचा कधीच अनुभव नव्हता. तब्येत मजबूत होती. डोकं दुखणं कसं असतं, हेही ठाऊक नव्हतं. हजार किलोमीटर ड्रायव्हिंग केल्यावरही थकवा जाणवायचा नाही. या सगळ्याची नाही म्हटलं तरी एक अकड होती. 

या पुढचा प्रवास सोपा नाही, हे तेव्हा जाणवलं नाही. मात्र तो जेव्हा सुरू झाला तेव्हा वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला. एका न थांबणार्‍या चक्राची ती सुरुवात होती. या चक्रात काय-काय गमवावं लागणार होतं, याबाबत अनिश्चितता होती. निश्चित होती ती वेदना. या चक्राची दोन आवर्तनं पार केल्यावर पुढच्या वळणाच्या प्रतीक्षेत असलेल्या मला एका जाणीवेची झुंजमुंज स्पर्शून गेली. ती म्हणजे, वेदना विव्हल तर करतेच; पण समजही देते. ‘वेद’ला गर्भात धारण करून प्रचारात उतरलेली ‘वेदना’ शाब्दिक ज्ञानाच्या पार ज्ञात जाणिवांचा पैस रुंदावते. व्यक्त करतो म्हटलं तर उलगडत नाही. लिहितो म्हटलं, तर शब्द लंगडे पडतात. फक्त अनुभव घेऊ शकतो. 

घटना आणि भवताल यांमधून डोकावणार्‍या अनुभवांचा हा सारीपाट...

अ‍ॅडमिट झाल्यानंतर कधीतरी नंतरची वेळ. .....सायरनच्या आवाजाने दचकून जाग आली. डोळे उघडताक्षणीच पुन्हा गच्च मिटले. जाणवलं बाहेर चिरणारा प्रकाश खिदळत होता. पाठीवर पडलो होतो. कुशीवर वळता येत नव्हतं. मान हलवली तर नळ्या अडवत होत्या. काही कळत नव्हतं. जाग होती; पण सुध नव्हती. पुन्हा पुन्हा सायरन किंचाळत होता. परत सावकाश मान हलवली, तर नजरेला सगळीकडेच नळ्या अन् स्टँडवर लटकलेल्या सलाईन बाटल्या दिसत होत्या. काहीच ‘रजिस्टर’ होत नव्हतं. घशाला कोरड जाणवत होती. हात हलवला तर सुई आपलं अस्तित्व टोकदारपणे सांगत होती. ठाण्णकन् काहीतरी आपटलं, आणि एकदम आवाजांचा लोळ अंगावर आदळला. ‘नीट धरा, डोकं उचला. सिलेंडर काढा आता...’ अशा परस्परांवर धडका देणार्‍या सूचना कानावर आल्या आणि आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, हे ध्यानी आलं. डोळे किलकिले करत बघितलं तर आसपासचे बेड्स, त्यापलीकडची काच लावलेली भिंत आणि त्या काचेपल्याड उभा असणारा अंधार दिसला. म्हणजे रात्र होती तर. 

काहीच संगत लागत नव्हती. बराच काळ आपण इथे आहोत, असं जडावलेलं शरीर सांगत होतं. कसा आणि केव्हा आलो मी इथे, या प्रश्नावर दचकलो. समोर बरीच हालचाल जाणवली. मी आवाज दिला, पण कुणी आलं नाही. वाटलं आपणच आपला आवाज ऐकतो आहोत. काय होतंय हे कळत नव्हतं. काही टोकदार दु:ख नव्हतं; बस धूसर धुक्यात गटांगळ्या घेत होतो. वाटलं, ‘आदमी नशे में है क्या?’ ओळखीचा फील वाटला. हसू आलं. 

एकदम आठवलं की, अभयाने मला ‘कॅज्युल्टी’मध्ये सोडलं आणि ती कागदी सोपस्कार करायला ‘अकाऊंटस्’च्या केबिनमध्ये गेली. इकडे ‘कॅज्युल्टी’मध्ये डॉक्टरने माझं बी.पी. तपासलं. ताप मोजला, प्राणवायू पडताळला अन् ‘ओके’ची खूण केली. म्हटलं, ‘अबे (हे मनात!) ओके आहे, तर मी इथे का?’ यावर ‘ब्लड रिपोर्टस् बघू’ अशी विचारणा झाली. लगेच मोबाइलवरचे लॅब रिपोर्ट्स दाखवले. ते पाहिले आणि डॉक्टरचा चेहरा बदलला. “तुम्ही इथे कसे आलात?” म्हटलं, “मुलीने सोडलं, ती फॉर्म वगैरे भरते आहे.” “नाही, म्हटलं इथवर कसे आलात?” म्हटलं, “बॅग घेऊन पायी चालत आलो.” त्याच्या चेहर्‍यावर अविश्वास दिसत होता. तेवढ्यात अभया आली. भरतीची प्रक्रिया आटोपली होती. आता पुढचा आदेश निघाला. “मावशी स्ट्रेचर आणा, पेशंटला वॉर्डमध्ये शिफ्ट करायचं आहे.” स्ट्रेचर म्हणजे धडधाकट माणसाला अर्धं आऊट करणारी चिताच. मी म्हटलं, “मी जातो ना! स्टे्रचर कशाला, बरा आहे मी.” यावर डॉक्टरने माझ्याकडे अजब नजरेने बघितलं. शेजारची नर्स हुशार असावी, तिने मावशीला खूण केली. अन् एक चिमण्या चणीची पोरगी व्हीलचेेअर घेऊन आली. 

पहिल्यांदाच व्हीलचेअरमध्ये बसलो. मजा वाटली. लिफ्टने सहाव्या मजल्यावरची चढण सुरू झाली. अभया सुन्नपणे सोबत होती. लिफ्ट थांबली अन् कोविड वॉर्डाच्या दिशेने आमचं गाडं निघालं. अपारदर्शक आणि भक्कम असा बंद दरवाजा समोर दिसत होता. बाहेर एक सिक्युरिटी मावशी उभी होती. लिफ्टच्या बाहेरच अभयाला थांबवण्यात आलं. तिने मला मागून हाक दिली. मी वळून बघितलं, पावणेसहा फूट उंचीची, मजबूत बांध्याची माझी देखणी लेक विव्हल होत हात हलवत गेली. मन गलबललं. मी पण हात हलवला आणि दाराआडच्या अपरिचित जगात दाखल झालो.

आत नुसता दंगा उसळला होता. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण ‘किट’ घातलेल्या पांढर्‍या-निळ्या आकृत्या फक्त डोळे दाखवत सर्वत्र फिरत होत्या. दारापासून निघणारा पॅसेज सरळ एका वॉर्डात जात होता. या मार्गाच्या दोन्ही बाजूला आणि तिरपीकडे वॉर्ड नामक हॉल होते. तिथे खाटाच खाटा अन् रुग्णच रुग्ण. नर्सिंग स्टेशन, सामानाची कपाटं, कपड्यांचे शेल्फ सारं अस्ताव्यस्त ओसंडून वाहत होतं. त्या पसार्‍यातून आपल्या कामाचं नेमकं असं काहीतरी उचलून नर्सेस खाटांकडे धावत होत्या. मावशी-मामा येणार्‍या ‘बुलाव्यां’ना ‘येते’, ‘आलोच’ असं उत्तर देत सामानात काहीतरी शोधण्यात गर्क होते. सर्वत्र औषधांचा वास होता; पण पॅसेज, त्याला मध्येच जुळणारा टॉयलेट ब्लॉक, जंगी वॉश बेसिन आणि या सर्वांखाली पसरलेली फरशी अगदी स्वच्छ. टॉयलेटच्या बाजूला बेड-पॅनची चळत होती. पण कुठेही वास नव्हता. दवाखाने, सरकारी कार्यालयं, वसतिगृह अशा तद्दन ठिकाणी घुमणारा आपला ‘राष्ट्रीय मुतारी वास’ इथे अजिबात नव्हता. 

डावीकडल्या हॉलमधील पॅसेजलगतचा बेड मला देण्यात आला. तो नुकताच रिकामा झाला होता. आधीच्या रुग्णाचे अवशेष तिथे विखुरलेले होते! बेडखाली एका भक्कम अशा नव्या चपलेचा जोडही डोकावत होता. गाडी थांबली. नर्स, मावशी धरायला पुढे सरसावले. मी हसत हसत खुर्चीवरून उठून बेडवर जाऊन बसलो. ती मंडळीपण हसली असावीत. मला फक्त तोंडावरचं ‘किट’ हलल्याचं दिसलं. 

दुसरा धक्का! बेडवरची चादर स्वच्छ धुतलेली. बिनवासाची, कडक इस्त्रीची. पूर्ण शाबूत, न विरलेली. बिनडागाची खोळ असलेली जाड उशी जागेवर होती. लगेच एका मावशीने हॉस्पिटलचे कपडे आणून ‘हे घाला’ म्हणून सांगितलं. ते चढवले. योग्य त्या ‘नाड्या जोडा’ असं कोडं घालणारी ‘पैजामा-बंडी’ ही जोडी पुढच्या मुक्कामात माझं डोकं भिन करणार होती. 

कपडे चढवून बेडवर बसलो. सभोवार बघत असतानाच मोबाईल वाजला. डॉक्टर पुतण्याचा होता. वास्तपुस्त केल्यावर तो म्हणाला, ‘रिपोर्ट्स वाईट आहेत. काही सांगता येत नाही. बट वुई आर अराऊंड, लेट्स सी.’ म्हटलं, ‘ठीक आहे.’ दुसरं काय उत्तर देणार? 

इतक्या दिवसांत पहिल्यांदाच गंभीर झालो. वाटलं होतं तेवढा साधा मामला दिसत नाही. झर्रकन मनात अनेक विचार फिरून गेले; आणि हसू आलं. माझं आयुष्य सगळं छान होतं. कोई गिला-शिकवा नहीं था! मस्तीत मनासारखा जगलो होतो. कायम अनिश्चिततेची बोच जवळच्यांना असेलही; पण त्यांना त्याचा त्रास होऊ दिला नव्हता. पंधरा रुपये रोजीने सुरू झालेल्या प्रवासात पुढे व्यावहारिक यश आणि प्रतिष्ठेच्या सर्वमान्य व्याख्येत असणार्‍या सर्व घटकांची पूर्तता झाली होती. म्हटलं, राइट टाइम टू क्विट!

मनाची निरवानिरव सुरू असतानाच सभोवार नजर टाकली. जनरल वॉर्ड होता. एकूण सात बेड्स होते. स्त्री-पुरुष हा भेद कोरोनाने नष्ट केला होता. सगळेच श्वासांवर लटकलेले. सगळ्यांच्या नाकात नळ्या होत्या. काहींच्या नळ्यांबरोबर फुगेही होते. माझा बेड पॅसेजजवळ होता. उजव्या हाताला मध्ये पार्टीशन होतं. त्यापलीकडे उजवीकडे काही खोल्या, अन् त्याच्या पुढे-मागे तिरपीकडे रुग्णांनी भरलेले असेच हॉल. पॅसेजला लागून असल्यामुळे सगळ्यांच्या सगळ्या हालचाली आवाजासह कळत होत्या. माझ्या हॉलमध्ये डावीकडे दोन बेड होते आणि समोर चार खाटा रुग्णांसह पसरल्या होत्या. प्रत्येक बेडजवळ बाजूला सलाईनचा स्टँड. फायली, औषधं, पाण्याच्या बाटल्या असं ठेवता येण्यासारखं जे काही असेल, ते ठेवण्यासाठी चाकं असणारं अरुंद पण बेडवर खाली-वर सरकू शकेल असं फिरतं टेबल. ते खरं तर रुग्णांच्या जेवणासाठी होतं हे नंतर कळलं. प्रत्येक बेडच्या मागे त्या रुग्णाचं सामान अन् त्याची औषधं ठेवण्यासाठी लहान ड्रॉवर आणि त्यापेक्षा थोडंच मोठं कपाट होतं. ते पण गच्च भरलेलं होतं. सगळीकडच्या सर्व जागा गच्च भरलेल्या होत्या. 

डावीकडच्या भिंतीवर पारदर्शी काचा असलेली मोठी खिडकी होती. पहिली नजर तिकडेच जात असे. बाहेरचं छान, भुरकं पण निळं आकाश दिसत होतं. आणि त्या आकाशात पंख न हलवता निवांत तरंगणारी घार. वॉर्डात छतावर रिमोटनेच चालणारे पंखे आणि एसी लागलेले होते. ‘हवामान’ थंड होतं. 

वॉर्ड-दर्शन सुरू असताना मध्येच सिस्टर ‘तबक’ घेऊन आल्या. ‘तपासण्या करायच्या आहेत, ब्लड घेते,’ असं म्हणत तिने हातावर ‘इंट्रा कॅथ’ घुसवला. रक्त काढलं आणि ‘सी.टी.’ करायला मला घेऊन जाण्यासाठी मावशीला फर्मावलं. पुन्हा माझी व्हीलचेअर सवारी बेसमेंटमध्ये सीटी स्कॅनसाठी रवाना झाली.

अंगात ताप होताच, पण गोळ्यांनी दबला होता. भूक मेली होती. अन्न जात नव्हतं. त्यामुळे थोडं गळल्यासारखं वाटत होतं. बाकी ठीक होतो. संध्याकाळी शेजार-पाजार्‍यांशी ओळख करून घेतली. त्यातल्या त्यात फिरता मीच होतो. त्यामुळे सगळ्यांशी गप्पा झाल्या. अर्थातच, विषय फक्त कोरोना! 

भरती होऊन आठ तास झाले होते. काहीच डोक्यात शिरत नव्हतं. चौफेर दंगा सुरू होता, सगळा श्वासांचा चढ-उतार! उतारावर घसरलेल्या रुग्णांना उचलून आयसीयूमध्ये नेलं जात होतं. बेड रिकामा झाला नाही, तोच दुसरा रोगी दाखल होत होता. त्यांची धावपळ. जे बेडवर होते, त्यांचा बेडपॅनसाठी कल्ला असायचा. बारक्या सिस्टर आणि कावलेले मावशी-मामा अक्षरश: मुंडी कापलेल्या मुरारबाजीसारखे झुंजत असत. बॅकग्राऊंडला सहाव्या मजल्यापर्यंत येऊन पोहोचणारा अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन. सतत. अटर केऑस! कधी डोळे मिटून निपचीत पडून, तर कधी मुकाट बसून आपल्या वाट्याला काय येणार याची वाट बघत होतो.

आसपास जे दिसत होतं त्यातल्या अनेक गोष्टी अस्वस्थ करणार्‍या होत्या. ऑक्सिजनवर असलेल्या पेशंटस्ना बेडपॅन लागत असे. बेडपॅन ‘देणं’ आणि ‘काढणं’ ही एक मोठीच अकटोविकट प्रक्रिया होती. एकतर बेडपॅन लवकर मिळत नसे. कारण बेडपॅनच्या हाकार्‍यांना मावशी किंवा मामा कुठून तरी ‘देते’, ‘आलोच’ अशी उत्तरं देत. बरं, त्यांनी येऊन बेडपॅन खाली सरकवला तरी तो बाहेर कधी निघेल, याची ‘विचित्रासनात’ पडून वाट बघावी लागे. मग आरडाओरडा, पांडुरंगा, गजानना, विठ्ठला इत्यादी देवतांच्या नावाने हाका! यात काही रुग्णांना दम निघायचा नाही. त्यांचे कपडे आणि बेड खराब व्हायचे. त्यावर पुन्हा वेगळाच त्रागा. सुदैवाने मला या बेडपॅन चक्रात अडकण्याची वेळ आली नाही. वॉर्ड फुल्ल होते; पण टॉयलेट ब्लॉक मोकळे असत. त्यामुळे मी जेवढा काळ भानावर होतो, तेवढ्या काळात माझी कधी अडचण झाली नाही. 

रात्रीच्या जेवणाची वेगळीच तर्‍हा बघितली. झाकण असलेली प्लॅस्टिकची ताटं यायची. ताटं आली की ‘वर करा’चा गजर व्हायचा. त्याचं असं व्हायचं की ऑक्सिजनच्या नळ्या लागलेल्या रुग्णांना वदनी कवळ घेण्यासाठी उठून बसावं लागे. तसं ते स्वत:हून करू शकत नसत. बेडचा उर्ध्वभाग पायापाशी असलेल्या कळीत हँडल फिरवून वर करावा लागे. मग चाकं असणार्‍या टेबलवर थाळी ठेवून ती रुग्णांच्या तोंडाजवळ आणावी लागे, मग कुठे त्याला ब्रह्मार्पणम् करता येई. यासाठी ‘वर करा’चा घोष असे. नेहमीप्रमाणे ‘मा-मा’ (म्हणजे मावशी-मामा) कुठेतरी हरवलेले असत. बरं, नाकात नळ्या किंवा फुगा असल्यामुळे अजब आवाज येत. त्याचा गजब असा एकत्रित गदारोळ चाले. अखेर एखाद्या सिस्टरने ‘हँडल आणा’ असा किंचाळून आदेश दिल्यानंतर शोधाशोध करून, तोंडाने वैताग-कॉमेंट्री करत कुणीतरी, कुठूनतरी हँडल घेऊन अवतीर्ण होई. मग सगळ्यांना ‘वर’ केलं जात असे. मग जेवण. ते संपूर्ण सपाट चवीचं. (रुग्णांनी असंच खावं म्हणे!) घास खाली उतरत नसे. पण उदर भरणाचा भाग म्हणून जेवणाची ढकला-ढकली करावी लागे. ती झाली की लगेच ‘खाली करा’चा बाजा वाजू लागे. दरम्यान, हँडल अचानक दिसेनासं झालेलं असे. मग पुन्हा तीच सर्कस. मी तिथे होतो त्या दहा दिवसांत या बेडपॅन आणि ‘वर करा’, ‘खाली करा’च्या व्रतात कधी खंड पडला नाही. नंतर कधीतरी “काय सर, बरे आहात ना! काही अडचण?” असं विचारणार्‍या फ्लोअर इनचार्जला मी म्हटलं, “सिस्टर, इतक्या बेडस्साठी एकच हँडल आहे का? नसतील तर मागवा, माझ्या बिलात अ‍ॅड करा, पण रोजची ही कासावीस थांबवा.” यावर “हो सर बघते मी” असं उत्तर मिळालं, पण ‘हँडल’चं रुसून गायब होणं मात्र तसंच राहिलं. 

रात्र चढत होती. काचेबाहेर अंधार दिसत होता. आत मात्र डोळे चिरणारा प्रकाश. खायची इच्छाच मेली होती. म्हटलं झोपावं, पण आता शरीर आतून हलायला लागलं होतं. अस्वस्थता होती. वॉर्डात घोरणं अन् कण्हणं याचं भेसूर मिश्रण घुमत होतं. समोरच्या खाटेवरील रुग्ण ‘आयो....आयो’ करत ओरडत होता. सिस्टरला विचारलं तर म्हणाली, “ते असेच ओरडतात, तुम्ही झोपा.”

दहाच्या सुमारास एक डॉक्टर आले. माझे रिपोर्ट्स आले होते. फुप्फुस ६५ टक्के इन्फेक्ट झालं होतं. कुठलातरी आकडा १०० की १५०च्या आत हवा असतो, तो माझा ११०० ते १२००च्या आसपास भरकटला होता. ताप चढला होता. थकव्याने शरीराचा ताबा घेतला होता. ‘काका ऑक्सिजन लावावा लागणार, सकाळी स्टिरॉइड सुरू करू’, असं म्हणत त्या डॉक्टरने नाकात नळ्या घातल्या आणि मी वॉर्डाच्या यात्रेत दाखल झालो. ग्लानी आणि झोप यांच्या सरमिसळीत रात्र गेली. 

सकाळी जाग आली ती कुणाच्यातरी घसा खरवडण्याच्या आवाजानेच. त्याही स्थितीत हसू आलं.  घसा साफ करणारा आयटम बघावाच म्हणून उठलो. ऑक्सिजनची नळी अलगद काढून स्टँडवर ठेवली आणि हलकेच उठून टॉयलेटकडे गेलो. बेडपॅन नकोच होता आणि स्थिती अजूनही ‘मॅनेजेबल’ होती.

पॅसेजच्या डाव्या बाजूला दोन वॉर्डांच्यामध्ये पाच टॉयलेट असलेला ब्लॉक होता. आणि त्या ब्लॉकच्या सुरुवातीला एक जंगी वॉशबेसिन होतं. दोन हात खोल अन् चार हात रुंद. पाण्याचे तुषार प्रयत्न करूनही बाहेर उडू नयेत म्हणून ही सोय विचार करून केलेली होती. बेसिनवर एक आजी नाली समजून स्वत:चा घसा घासत होती आणि संपूर्ण बेसिन भीषण आवाजाने हादरत होतं. या आजीने कृष्णजन्मापासून संचित केलेला सगळा काळा रंग ल्यायला होता आणि त्यावर पिवळ्याधम्म सोन्याची महिरप लावली होती. दागिन्यांमुळे कानाची पाळी दिसत नव्हती. हातातही बांगड्यांची चळत. जगण्या-मरण्याची लढाई चालू असतानाही सोन्याची हौस फिटत नव्हती. अंगावर जांभळ्या-लाल फुलांचा गाऊन असा थाट. (पुढे आजीशी दोस्ती झाली; अन् कानावरचा सोनेरी पत्रा आणि बांगड्या आपलं लेणं आहे, ते कधीच काढत नाही, असं तिने सांगितलं. अन् ‘घसा-घासणं?’ यावर ‘सवयच पडली’ हे उत्तर.) ही ‘खाकरा’ आजी! अजून दोन आज्या होत्या. एक ‘स्पष्ट’ आजी व दुसरी ‘काडेल’ आजी. त्यांच्या कथा पुढे येतीलच. 

विधी आटोपून बाहेर पडलो तर ‘खाकरा’आजी मख्ख चेहर्‍याने परत जात होत्या. ब्रश करण्यासाठी पेस्ट काढतच होतो, तोच बेसिनचा ताबा गेला. साधारण पाच-सव्वापाच फूट उंची, चमकणारं टक्कल, त्याभोवती काळ्याभोर केसांची फ्रिल, गरगरीत शरीरावर बसकी भरलेली मान, त्यात चार-दोन गंडे दोरे, आखूड हात, मनगटावर आठ-दहा रंगीत दोरे, गोबर्‍या गालावर दाढीचे पांढरे खुंट अशा रूपाचं चाळीसेक वर्षांचं एक गुटगुटीत बाळ हातात एक लिटर पाण्याची बाटली घेऊन, डोकं वाकडं करून चेहर्‍यावर पाणी ओतत होतं. एक, दोन, तीन, चार बाटल्या झाल्या; पण गडी थांबेना. माझी चुळबुळ वाढली. ‘दादा’ अशी पुसटशी हाक मारली, तर डोकं वाकडंच ठेवून, हातात बाटली तशीच धरून, ‘काका....तोंअंऽऽड धुतो’ असं हसत घोगर्‍या आवाजात उत्तर आलं. आणखी चार-सहा बाटल्यांचा अभिषेक झाल्यावर एकदाचं ते ‘तोंअंऽऽड’ धुणं थांबलं. हात जोडत म्हणाला, ‘आपल्याला ही आदतच आहे, दिवसातून चार वेळा धुतो.” त्याच्या पाठीवर थाप मारत म्हटलं, “म्हणूनच चेहरा असा चमकतोय.” यावर ते ‘तोंअंऽऽड’ चक्क लाजलं!

दिवस चढायला लागला आणि माझी हालत उतरायला लागली. अन्न जात नव्हतं, थकवा वाढत होता. दुपारचं जेवण आलं, तसंच पडून राहिलं. नाश्त्याचा डबाही तसाच होता. डॉक्टर आले, तपासलं, फाइलवर काहीतरी लिहिलं. नर्स आली. हाताला लागलेल्या ‘इंट्रा-कॅथ’मध्ये इंजेक्शन घुसवलं. सलाईनचा स्टँड वाजला. नाकात नळी, हाताला सलाईन असा मेकअप पूर्ण झाला आणि माझं गाडं पुरतंच घरंगळलं. सगळं धूसर व्हायला लागलं. हालचाल, आवाज, माणसं जाणवायची, पण खूप दूर आहेत असं वाटायचं. मध्येच हुशारी यायची आणि परत धुकं उठायचं. 

सोमवार उलटला. मंगळवार सुरू होऊन सरत आला तरी माझं तळ्यात-मळ्यात सुरूच होतं. काही-काही दिसायचं. समुद्रावरून मी गाडी चालवत जायचो. मध्येच माझा मित्र सुहास (कुलकर्णी) आणि मी लाटेवर तरंगताना दिसायचो. लगेच पार टोकावरची सिरोंच्यापल्याडची गोदावरी आणि तिच्या तीरावरचं कालकालेश्वराचं काळ्या पथ्थराचं भव्य मंदिर दिसायचं. मध्येच धुळे-नंदुरबारमधील भिल्ल वस्ती झळकायची. अशी अनेक ठिकाणं तरंगून जायची. दोन दिवस हेच चालू होतं. त्यातलं काही आठवतं; बरंचसं मेंदूत रेकॉर्डच झालेलं नाही.

मंगळवारी संध्याकाळी थोडी हुशारी आली आणि मोबाईल वाजला. कॅनडाहून मोठ्या मुलीचा, जयमतीचा कॉल होता. तिने ‘बाबा’ म्हणत पॉज घेतला. पोरगी रडत असावी. ‘मी ठीक आहे. काळजी करू नको,’ असं सांगत तिच्या बाळाची चौकशी केली. नातीचा जन्म होऊन महिनाही झाला नव्हता. पोरगी म्हणाली, ‘व्हिडिओ कॉल करते.’ म्हटलं, ‘बेटा, इथे सारं कनेक्शनच ढेपाळलेलं आहे. नंतर बोलू.’ फोन ठेवून दिला. संसार...हवासाही वाटतो; पण जिव्हारी झोंबतोही!

मधले दोन दिवस जाणिवेतून सुटले होते; पण आता संगत लागू लागली. वायरिंग ताळ्यावर आलं. बुधवारची पहाट; झुंजूमुंजू झालं, तशी बाहेर आकाशात तरंगणारी घार दिसली. निळाईत फिरणारी ती घार नवा विशुद्ध श्वास देऊन गेली. अच्छा लगा! “बाबा कसं वाटतं? जेवत का नाही? आता नाश्ता आला की मी चारून देईन,” असं म्हणत एक चिमणी सिस्टर जवळ येऊन कपाळावर थोपटत होती. रात्रभर धावपळ करूनही रेखीव भिवयांमध्ये रुतलेले तिचे टपोरे डोळे नितळ प्रेमाने माझ्याकडे बघत होते. और भी अच्छा लगा!

गेल्या दीड दिवसात बरीच टोचाटोची झाली होती. ‘स्टिरॉइड्स’ सुरू होते. मध्येच रेमडेसिव्हिरचा धिंगाणा झाला. ‘मिळत आहे’, ‘नाही मिळत’ या दंगलीत अखेर एक ‘स्टॅट’ डोस अंगात गेला. नाश्त्याच्यावेळी पोटात दोन घासही जाऊ शकले. दरम्यानच्या दोन-तीन दिवसांत घरच्यांची स्थितीही सुधारली होती. मग अभयाने सूत्रं हाती घेतली आणि सूप्स, ज्युस, इतर चवदार जिन्नसांचा रतीब सुरू केला. हॉस्पिटलमध्ये कुणाला येऊ देत नव्हते. मात्र तिने वस्तू ने-आण करणारी ‘डन्झो’ नावाची सर्व्हिस शोधून काढली आणि माझ्या पोटात चवदार अन्न पडायला लागलं. 

“वाटलं नव्हतं, पण तू ‘पॉझिटिव्ह टर्न’ घेतलास. नाऊ यू आर आऊट ऑफ डेंजर,” असं डॉक्टर पुतण्याने बुधवारी हसत जाहीर केलं. काय समजायचं? या ‘धनात्मक’ व ‘ऋणात्मक’ वळणांचा स्वभाव मला नंतरदेखील कायम रहस्यमयच वाटत राहिला. थोडक्यात सध्या तरी ‘एक्झिट’ टळली होती. ताप हटला होता. भूक ताळ्यावर आली होती. ऑक्सिजनचा डोसदेखील कमी झाला होता. सकाळ-संध्याकाळ सलाईनमधून जाणारं स्टिरॉइड काम करत होतं. 

वॉर्डाच्या अंतहीन धबडग्यात असे पाच दिवस गेले. रात्र आणि दिवसात काहीच फरक नाही. फक्त काचेच्या खिडकीतून येणार्‍या प्रकाशावरून सकाळ, संध्याकाळ अन् रात्र कळायची, बास! अशातच एका रात्री कोलाहलाने झोप तुटली आणि बघतो तर माझ्या लगतच्या बेडवरचा विश्वेश्वर धापा टाकत होता. सिस्टर आणि डॉक्टर धावपळीत मावशीला बोलवत होत्या. म्हटलं ‘काय झालं?’ उत्तर आलं, ‘आयसीयूत शिफ्ट करतो आहे.’ 

घट्ट, काळा अन् लठ्ठ सदरात मोडणारा पन्नाशीही न गाठलेला विश्वेश्वर तीन दिवसांपूर्वी भरती झाला होता. तीव्र मधुमेह असणारा दोन मुलांचा हा बाप स्वभावाने अतिशय मऊ आणि मोकळा होता. आल्यापासून ‘काका-काका’ म्हणत सतत प्राणवायूच्या फुग्याआडून बोलायचा. अर्धंअधिक कळायचंही नाही; पण त्याचा जिव्हाळा पोहोचायचा. एकदा त्याच्या घरच्यांशी व्हिडिओ कॉलवर बोललो. ‘काका, लक्ष असू द्या’, असं त्याची बायको अन् मुलगी म्हणाली. हसून मान डोलावली आणखी काय करणार? 

मी उठून बसलो. विश्वेश्वर घामाघूम होऊन कष्टाने श्वास उपसत होता. त्यात त्याने घरी फोन लावला आणि माझ्या हातात दिला. त्याची बायको-मुलगी तर रडतच होत्या. कुटुंब कर्नाटक सीमेवरचं होतं. बायको रडत कानडीत मला विचारत होती. काय बोलणार मी तरी! ‘घाबरू नका, आयसीयूत नेल्याने अधिक लक्ष ठेवलं जाईल’, वगैरे काहीतरी बोललो अन् फोन बंद केला. अर्धवट झोप, वॉर्डातील निर्मम रात्र आणि स्ट्रेचरवरून जाणारा विश्वेश्वर. सुन्न झालो. स्ट्रेचरवरून हात जोडत मला म्हणाला, “बाबा, कच्चा संसार आहे, उघडा पडेल.” म्हटलं, “काही होत नाही, हिम्मत ठेव.”

विश्वेश्वरचा बेड रिकामा झाला. मावशी लगबगीने चादर, उशीचा खोळ बदलत होती. नव्या पेशंटची तयारी. झोप पळाली होती. मी सुन्नपणे बसलो होतो. रात्रीचे दहा वाजले होते. डोळे चिरणारा प्रकाश निपचित होता. पॅसेजच्या दिव्यांच्या अर्धवट प्रकाशात विव्हळणारा वॉर्ड विस्कटून पडला होता आणि मी चोळामोळा होऊन बसलो होतो. पॅसेजच्या पलीकडच्या खोलीतून मावशांचं करवादणं सुरू होतं. नर्सिंग स्टेशनवर हाडांच्या मोळ्या पसराव्यात तशा दोन सिस्टर्स झोपल्या होत्या. सारंच थकलं होतं. आजारी झोपेत माणसं कशी विकल होतात, याची सुदृढ असताना कधी कल्पनाच नसते. खूप गृहीत धरून जगतो आपण. विचारसुद्धा आयसीयूत गेले असावेत, असा रिता होऊन बसलो होतो. 

अख्खी रात्र अशीच गेली. हळूहळू काचेबाहेर फटफटायला लागलं. सकाळ अलगद पसरायला लागली.. तीच अजब उदासी घेऊन. त्या उदासीमुळे वॉर्डदेखील दंगा थांबवून चिडीचूप होऊन कोपर्‍यात उभा होता. सारे रुग्ण, स्टाफ मूक चित्रपटासारखे नि:शब्द हलत होते. काचेपल्याड धूसर निळाईत माझी घार निवांत फेर्‍या मारत होती. ते तिचं निवांत तरंगणं, वॉर्डातील निश्चलता.. एकदम आठवलं, भगवंताने (म्हणजे आपला श्रीकृष्ण) गीतेत कशाला तरी स्थिर ज्योतीची उपमा दिलेली आहे. कधी कधी भवताल आणि स्मरण समाधीसंगम घडवून आणतो. नकळत डोळ्यात पाणी आलं अन् शरीर विरल्यागत मी निवांत झालो. काही क्षण काहीच जाणवलं नाही. तोच “काय काका, बरे आहात ना?” ‘तोंअंऽऽड’ धुणारा बटुकेश्वर डोकावून विचारत होता. मनात म्हटलं, ‘अरे सोंड्या, थोड्या वेळानं टपकला असता तर काय प्रलय झाला असता?’ बाटली दाखवत खूण करत होता. समजलो. बरोबरच आहे त्याचं, तो आपला ‘निज’ 

तोअंऽऽड धुण्याचं कर्म करत होता. गीतेतच म्हटलं आहे ना, आपापल्या धर्मात मरा म्हणून! हा भिडू तोंड धूतच मरणार! धुवो बापडा!

एकवेळ स्वभावाला औषध गावेल, पण सवयींना उतारा मिळणं अशक्य. वॉर्ड म्हणजे नमुनेदार सवयींची थोरली कढईच होती. शेजारची ‘काडेल’ आजी म्हणजे सतत तोंडाला फोन. गोळ्या-गोळ्यांच्या गाऊनमधली ही ठेंगणी-ठुसकी आजी. तरुणवयात सुबक असावी. बोलणं म्हणजे दुधारी सुरी. ‘ती नाही का असं बोलली’, ‘मला अमकीनं सांगितलं, विश्वासच बसला नाही’, ‘मी तमकीला विचारलं, तर तिनं अजून भलतंच सांगितलं’, ‘काय म्हणावं बाई... तुला म्हणून सांगितलं, कुणाला सांगू नको बरं’ असाच सगळा संवाद. दोन मुलं, एक मुलगी, दोन सुना आणि एक जावई या सगळ्यांत ही म्हातारी अशा काही कलागती लावायची, की मी थक्कच व्हायचो. निव्वळ रिअ‍ॅलिटी शो!

‘काडेल’ आजीच्या शेजारी ‘स्पष्ट’ आजी होत्या. ‘पलंग’ हा शब्द इतका स्पष्ट- काटेकोरपणे उच्चारला जाऊ शकतो, याची मला तोवर समजच नव्हती. त्यांचे शुद्ध उच्चार ऐकून आपण आता मूकच व्हावं, असा माझा निश्चय व्हायला लागला होता. एक सकाळ त्यांच्या स्पष्ट उच्चाराने दचकूनच उजाडली. “आपल्या बेडरूममध्ये, पलंगावर मी ज्या बाजूला झोपते, त्याच्या पायथ्याला असलेल्या अलमारीत, माझ्या खणात निळी-पिवळी आणि लाल रंगाच्या चेन असलेल्या बॅग्ज आहेत. त्याखाली ग्रे रंगाची एक चौकोनी पिशवी आहे. त्यात डायपर आहेत. नीट, सावकाश बघा म्हणजे सापडतील...” इति ‘स्पष्ट’ आजी. बिच्चारे आजोबा तिकडे सूचना घेत होते. आजींना जोराचा मधुमेह. ‘कंट्रोल’ राहायचा नाही. आणि मावशी, बेडपॅन आणि नेमकी वेळ याचा योगायोग दुर्मिळ. त्यामुळे डायपरची मागणी चालली होती. पण पुढचे चार दिवस तरी आजोबांना ‘ग्रे’ पिशवीने थांग लागू दिला नाही.

बेडस्च्या पुढच्या ओळीत ‘बेरियाट्रिक ताई’ होती. वय जेमतेम तीस पार. घरी तीन वर्षांचा मुलगा अन् नवरा. वजन खूप, त्यामुळे ऑपरेशन करून पोट लहान केळ्याएवढं केलेलं. ऑपरेशन करून महिना उलटत नाही तोवर कोरोना झाला. भूक लागायची पण अन्न खाता यायचं नाही. फक्त लिक्विड डाएट. घरी करायला कुणी नाही. मुलगा फोनवर सारखा ‘आई-आई’ करायचा. रोज त्या माऊलीचे डोळे वहायचे. 

एरवी दिसणारी, जाणवणारी माणसं जनरल वॉर्डात वेगळीच होतात. समोरच्या बेडवर एक ‘कावरा’ दादा होता. सतत फोनवर चिडचिड. अर्थात बायकोवर! महिना-दीड महिन्यापूर्वी पहिल्या मुलीनंतर आठ वर्षांनी मुलगा झाला होता. नशीब बघा... डिलिव्हरीनंतर ‘कावरा’ दादाच्या बायकोला कोरोना झाला. नंतर ‘कावरा’ दादाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हा दादा डायबेटिक. कोरोना फार नव्हता; पण भरती व्हावं लागलं. बेचव जेवणाने वैतागला होता. अखेर एक दिवस जवळचं लोणचं दिलं. त्या बदल्यात त्याने त्याची कर्मकथा ऐकवली. जमेल तसं त्याला समजावलं. म्हटलं, ‘तणतण करू नको. बायकोशी नीट वाग.’ पांढरी दाढी अशावेळी फार कामी येते. त्याने ऐकलं अन् फोन प्रेमाचा झाला. सगळे एकजात कोरोनापाई हल्लक झालेले. त्यात मधुमेह, बेचव अन्न आणि घरच्यांची भेट फक्त मोबाइलवर. त्यामुळे सगळी ‘भडास’ कुणाकुणावर निघायची. 

‘भडास’वरून मला वॉर्डाच्या टोकावरील बेडवरचे बनेबाबा आठवले. आयुष्य ऊन-वार्‍यात कष्टाने राबत, शेतीत काढलं. बारदाना मोठा होता. जमीनजुमला भरपूर. इथे मनाविरुद्ध भरती करण्यात आलं होतं. त्यामुळे थोडं काही बिनसलं की, बाबांची ‘भ’ची बाराखडी सुरू व्हायची. त्यातून कुणीच सुटायचं नाही. सारखं झोपून असायचे अन् झोपेत मोठमोठ्याने कुणाकुणाची नावं घेऊन त्यांचा उद्धार चालायचा. बने बाबांना हॉस्पिटलचे कपडे कधीच जमले नाहीत. त्यामुळे बाबांची लहानशी मूर्ती शर्ट काढून, नाडी गळ्यात लटकावून, हाताच्या बोटांनी घसरणारा पैजामा सावरत टॉयलेटला जात असे. बरं, त्यांना कुणी काही म्हणायची सोय नव्हती. लगेच ‘भ’चा भक्कार सुरू व्हायचा. जेवणावर तर भारी राग होता बाबांचा. ‘हे कुटार नाही चघळत. बोट्या अन् भाकरी द्या’ म्हणायचे. एक दिवस सकाळी बाबांची शुगर घसरली. काही तरी गोड हवं होतं. सिस्टर गडबडली. मला विचारलं, तर मी माझ्याजवळची द्राक्षं दिली. म्हातारा एकदम खुष झाला. बनेबाबा डिस्चार्जच्या दिवशी सकाळपासूनच पैजामा-शर्ट आणि पांढरी टोपी घालून तयार बसले होते. मिशीला पिळ देत मला मुला-सुनांच्या गोष्टी सांगत होते. एकूण मामला भारी होता. तापट; पण प्रेमळ अन् दिलदार. ‘घरी या’ असं भरगच्च आमंत्रण देऊन, बरोबर फोटो काढून, बाबा डोळे पुसत गेले.

किती प्रकारचे लोक त्या दहा दिवसांत स्पर्शून गेले? कुणीच कुणाचे नातलग नव्हते. आधी कधी भेटले नव्हते. पुढे कधी भेटणारही नव्हते. कोरोना हाच समान धागा होता. 

जनरल वॉर्डमधल्या या अस्थायी कुटुंबातील महत्त्वाचा घटक होते- तिथले डॉक्टर, नर्सेस, मावशी आणि मामा. चेहर्‍यांची ओळख नव्हती; कारण ते कायम मास्कआड असायचे. डोळ्यांचीच नाळ होती. स्टाफ सहृदय होता. कामाने कावला होता; पण चुकार नव्हता. कामात थोडी शिस्त आणली तर सगळ्यांचंच भलं होईल, असं त्यांच्याकडे बघून पदोपदी जाणवायचं. बेडस्चे हँडल, पंखा, एसीचा रिमोट, ऑक्सिमीटर असे एक- दोन नव्हे; तर एकूणच व्यवस्थेत गलथान वैताग. एक वस्तू वेळेवर अन् जागेवर सापडेल तर शपथ! 

अगदी औषधांबाबतसुद्धा असाच गडबडगुंडा. प्रत्येक रुग्णाची औषधं त्याचं नाव, बेड क्रमांक टाकून पिशवीत येत असत. ती त्या-त्या रुग्णाच्या डोक्याशी असलेल्या ड्रॉवरमध्ये ठेवण्याची सोय होती. मग सकाळ-दुपार-संध्याकाळ सिस्टरने येऊन ड्रॉवरमधली ठराविक औषधं रुग्णाला देणं इतकी साधी-सरळ बाब! पण नाही. त्यातही बाजार-गोंधळ. एकतर ड्रॉवर रिकामे नसत. आधीच्या रुग्णांची औषधं, रिकाम्या स्ट्रिप्स, बाटल्या, चमचे, डब्या अशा असंख्य गोष्टींनी ड्रॉवर गच्च भरलेलं असे. माझ्या ड्रॉवर आणि कपबोर्डमध्ये तर कुठल्याशा सुवर्णकाराच्या नावाचा ठप्पा असलेल्या दोन पिशव्या गच्च सामानासह पसरल्या होत्या. हे कोण? अन् कुणाचं? ठाऊक नाही. मग औषधं कपबोर्डवर किंवा जेवण्यासाठी असलेल्या रांगत्या टेबलवर ‘पळापळी’ करत असत. नेमक्यावेळी काही गोळ्या लपून बसत अन् सिस्टर्सच्या हाती लागत नसत. मग “काका, तुमची ‘डोलो’ सध्या द्या. मग आणते,” अशी विनंती. मग पुढच्या वेळी अजून कुणाची ‘डोलो’ आणून काकाचं तोंड गप्प करण्यात येत असे. ‘कोरोना की जान’ ऑक्सिमीटर तर स्वत: प्राणवायू प्यायला कुठल्या बगीच्यात गेला असावा, असंच वाटायचं. वेळेवर कधीच सापडायचा नाही. ड्युट्यांच्या अदलाबदलीत कायम तो गायब व्हायचा. बरं, त्या उपकरणाची वॉर्डातल्या चोपडीत नोंद असायची. पण तपासणीच्या वेळी तो बोटांना गुंगारा द्यायचा. 

तीच कहाणी ‘इंजेक्शन’च्या तबकाची! खरं तर रोज सकाळी त्या ‘ट्रे’चा यथासांग मेकअप व्हायला हवा हा कायदा. स्पिरिट-स्वॉबस्, कापसाचे बोळे, टर्निकेट, बॅण्डेड पट्ट्या, कात्री वगैरे वस्तू आपापल्या जागी हव्यात. पण रोजच्या दंगल-दंग्यात सगळं भसकलेलं असायचं. त्यामुळे स्पिरिटच्या स्वॉबशिवाय करकरीत सुई कातडीत घुसायची. हल्लक शरीराच्या संवेदनेने आधी मान टाकलेली असायची. सुयांचं खुपसणं आणखी वेदना द्यायचं. फक्त ते व्यक्त करण्याची शक्ती क्षीण झालेली असायची. नऊ दिवस रोज रात्री मला ‘अँटी कोअ‍ॅग्युलंट’चं इंजेक्शन पोटात दिलं जात असे. मार्दवता नसलेल्या अशाच सुयांनी माझ्या बेंबीभोवती नऊ उग्र-लाल ठिपक्यांची माळ बनवली होती. ‘बाबा दुखतं ना? पण काय करू, स्वॉबच नाहीत’ ती सिस्टर रोज हळहळायची. अखेर मी वेट टिश्यूचे तुकडे करून थोडा थंडावा मिळवला. 

पुन्हा सांगतो... स्टाफ चांगला होता. पण आपल्या शिक्षणात, प्रशिक्षणात अन् जीवनातही जो एक धसमुसळा अजागळपणा आहे, त्याचे हे दृश्य परिणाम. वस्तू जागच्याजागी न ठेवणं याने काय आकांत होऊ शकतो, हे कोरोनाने आपल्या व्यवस्थेच्या कंबरेत लाथ घालून दाखवलेलं आहे. पण तरीही आपण असेच!

त्या नऊ-दहा दिवसांत पेशंट लोकांचं येणंजाणं सुरूच होतं. कुणाला डिस्चार्ज मिळाला की, सगळ्यांचा ‘कॉमन’ प्रश्न. ‘बिल किती झालं?’ आपल्या रोजच्या जगण्यात अन् महिन्याच्या बजेटमध्ये औषधं-आजारपण याला जुजबी स्थान असतं. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती आणि आठ ते दहा दिवस उपचार याच्या खर्चाची तोंडमिळवणी कठीण जाते. अर्थात औषधोपचार आणि बिलाचा अंदाज ‘फोन’द्वारे जवळच्या नातेवाईकांना दिला जातो. तशी व्यवस्थाच आहे म्हणे. पण ‘व्यवस्था’ म्हटलं की त्याची ऐशीतैशी होेणं आलंच! रुग्णाचे हालहवाल कळवायला घरी रोज एक मख्ख फोन जायचा. ‘फोनवाला’ किंवा ‘फोनवाली’ अर्थातच थकलेले. कारण प्रेशरच तसं! बरं, रुग्णाची माहिती घेऊन फोन करावा, तर त्याबाबतही आनंदच. मग कुठल्याही प्रश्नाला संबंधित डॉक्टरांशी बोलून कळवतो/कळवते, असं उत्तर दिलं जायचं. हा मेळ अशक्य असायचा. ‘प्रेशर’ हा परवलीचा शब्द... सुगीच्या दिवसांत तर कुणीही सुग्रास संवाद साधेल, पण खरी गरज अशा वैशाखात असते. रुग्णाला आयसीयूत शिफ्ट करताना घरच्यांना थोडी आधी कल्पना देणं, गरजेचं नाही का? पण तसं होत नाही. कारण ‘प्रेशर’! मग रुग्ण थोडा शुद्धीवर असेल, तर तो घरी वेळी-अवेळी फोन करून सांगणार. रात्री दीड वाजता आयसीयूत जाताना माझ्या शेजारच्या विश्वेश्वरची आणि त्याच्या घरच्यांची प्राणांतिक फडफड मी कधीच विसरू शकत नाही. 

रुग्णाच्या विचारणेला धुडकावून लावण्याची सवयही मला फार खटकायची. कितीही आवाज देत राहा, कुणी लक्ष द्यायलाच तयार नसायचं. तीन वेळा औषधं देणारी ‘ताई’सुद्धा गोळ्या तोंडात टाकून पाणी ओतून त्या गिळायच्या आत निसटून जात असे. मावशी-मामांचा तर प्रश्नच नाही. ही मंडळी काम करत असत पण कायम ‘लाल बावटा’ हातात असल्याच्या आवेशात. रात्रपाळीचे डॉक्टर कायम अधांतरी अन् गोंधळलेले. खरं तर वॉर्डातील बहुतेक रात्री म्हणजे ‘कत्तल की रात!’ औषधं कोणती? ती कशासाठी? याबाबत हे ‘नाईट-किंग’ चूपच असायचे. दिवस-रात्र काम करणारी ही भिन्न ‘पॅथीय’ मंडळी रुग्णाईत होऊनच रात्र ढकलायची.

मात्र ‘उत्तर का देत नाहीत’ ही माझी खाज एका मामाने अशा उत्तराने जिरवली की, मी सुन्नच झालो. मी भरती झालो त्या दुपारपासून माझ्या बेडखाली एक मजबूत असा नवाकोरा चपलांचा जोड पडला होता. मी बरीच विचारणा केली की, “अरे हा कुणाचा? येऊन घेऊन जा. नवा आहे.” पण कुणी दादच देत नव्हतं. एका संध्याकाळी नेहमीचा एक मामा निवांत वावरताना दिसला. त्याला आवाज दिला आणि चपलांकडे खूण करून, कुणाच्या? असं हातानेच विचारलं. मामा सवयीप्रमाणे तसाच सटकला. मात्र थोड्या वेळात माझ्या बेडपाशी येऊन म्हणाला, “काय बाबा, काय हवं?” मी चपलांकडे बोट दाखवलं. म्हटलं, “अरे, घेऊन जा या चपला. कुणाच्या आहेत त्यांना दे.” मामाने कमरेवर हात ठेवले आणि माझ्याकडे थेट बघत म्हणाला, “बाबा, या चपलांचा मालक गेला. त्याला कधीच चपला लागणार नाहीत. याच बेडवर होता. तुम्ही यायच्या दोन तास आधीच आटोपला. तो आटोपला म्हणून तुम्हाला बेड मिळाला.” असं म्हणून मामा चालू लागला. जाणवलं, मंडळी चूप राहतात तेच बरं. त्याच्या या मख्खपणाआड किती चपला दडल्या आहेत कोण जाणे. 

आठवड्याभराच्या वास्तव्यानंतर मला डिस्चार्जचे वेध लागले. ऑक्सिजनची नळी सुटली. भूक ताळ्यावर आली. ‘दोन दिवस ऑब्झर्व्ह करू आणि सुटी देऊ,’ असं राऊंडवर आलेल्या डॉक्टरांनी हसून सांगितलं. म्हटलं ‘बच गये!’

अखेर सुटीचा दिवस उजाडला. दरम्यान सगळ्यांशी चांगलीच ओळख झाली होती. ‘तोंअंऽऽड धुवायचं’ चा आधीच डिस्चार्ज झाला होता. तो आता घरी जाऊन आपल्या व्रताचं पालन करत असावा. जाताना निरोप घेऊन, पाया पडून गेला होता. ‘खाकरा’आजी एका संध्याकाळी आपली साफसफाई उरकून भेटून गेली. “च्यांगला वाटला दादा आपल्याशी बोलून” असं म्हणाली. मी चान्स न सोडता, “ताई, घश्याशी नीट वाग. त्याला रोज असा हासडू नको. घशाला सांभाळ, नाहीतर मग सुनांवर कोण डाफरंल?” यावर “काय दादा...” असं म्हणत चक्क ‘बाय’करून गेली. ‘बेरियाट्रिक’ ताई, ‘कावरा’ दादा माझ्याप्रमाणेच सुटीच्या प्रतीक्षेत होते. ‘स्पष्ट’ आजींची शुगर नॉर्मल झाली होती. ‘काडेल’ आजी चिमली होती. पण ‘काड्या’ कमी झाल्या नव्हत्या.

डिस्चार्ज हे एक भारीच प्रकरण असतं. म्हटलं तर सरळ मामला. औषधोपचारांसह सर्व तपासण्यांची बिलं, डॉक्टर, बेडचा चार्ज असं सर्व हॉस्पिटलवाले श्वास मोजावा तसं मोजून-मापून तयार ठेवतात. ‘मनी-मॅटर’ना! पण इन्शुरन्सवाले सालटं काढतात. त्यामुळे डिस्चार्ज मिळता मिळत नाही. 

सकाळचा नास्ता झाला. सिस्टर म्हणाली, “बाबा आता जेवण घरीच.” मी फक्त हसलो अन् दुपारचं जेवण सांगितलं. अनुभवाने शहाणा झालो होतो. पाच-सात तास लागणार बिल सेटल व्हायला हे कळलं होतं. घरून पूनम सर्व बाबींवर ऑनलाईन नजर ठेवून होती. इन्शुरन्सवाले वेगवेगळ्या गुगली टाकत होते. मात्र पूनम खमकी; म्हणून बधली नाही. 

अखेर १० ते ५ असा वेळ घेऊन सर्व मामला सकळसंपन्न झाला. मात्र नेमकी त्याचवेळी वॉर्डात धामधूम उठली. बाजूच्या हॉलमधल्या एका रुग्णाच्या प्राणवायूने मान टाकली. अन् आयसीयूत धावपळ सुरू झाली. सर्व स्टाफ तिकडेच. त्यामुळे माझ्या सुटीच्या कागदावरची नर्सची सही रखडली. मी कपडे बदलून घरच्या कपड्यात बेडवर बसलो होतो. वॉर्डातील संध्याकाळ पानगळ झालेल्या निष्पर्ण झाडासारखी निश्चेष्ट पडली होती. खरंतर वॉर्डातील रोजची सकाळ आणि संध्याकाळ या हुरहुरीच्या हेलकाव्यांच्या भरती-ओहोटीचाच अनुभव होता. त्या संध्याकाळी सगळे जागे होते, पण तरंगहीन होते. मन विषण्ण होतं. अचानक नजर बेडखालच्या चपलांवर गेली. क्षणभर रेंगाळलो आणि उठून मागच्या कपबोर्डमधून ‘सुवर्णकार’ ठप्प्याची पिशवी काढली. ती तिथेच रिकामी केली आणि खाली वाकून त्या चपला पिशवीत टाकल्या. पिशवी माझ्या बॅगच्या बाजूला ठेवली. शेवटी नर्सताई आली. माझ्या मनगटावरचा वॉर्डाचा बिल्ला काढला. कमरेत हात घालत तिने ‘सेल्फी’ काढला. अन् ‘बाबा काळजी घे, परत भेटू!’ असं म्हणून व्हीलचेअरवर माझी सवारी सामानासह लादण्यात आली. मनात म्हटलं, ‘परत भेटू’ का म्हणते माझी माय? झालं ते लई झालं. आता नको!

पण तसं होणार नव्हतं. अजून ‘लय’ बाकी होतं! 

हॉस्पिटलच्या दाराजवळ अभया गाडी घेऊन वाट बघत होती. मी व्हीलचेअरवरून उठलो. मावशीने बॅग गाडीत ठेवली. मी चपलांची पिशवी गार्डला दिली. म्हटलं, “चांगल्या चपला आहेत, कुणाला दे. कामी येतील.” उत्सुकतेने त्याने पिशवी घेतली व आत डोकावत म्हणाला, “चांगल्या आहेत, कुणाच्या आहेत?” मी गाडीचं दार उघडून क्षणभर थांबून पिशवीकडे बघत म्हटलं, ‘मित्राच्या!’ 

अभयाने गाडी सुरू केली आणि मी घराकडे निघालो. 

आत-बाहेर होणार्‍या श्वासांच्या चक्कीत नऊ दिवस आणि नऊ रात्री फिरून अखेर मी घरी आलो. व्हॉट अ रिलीफ! छान गरम पाण्याचा मनसोक्त शॉवर घेतला. एरवी नऊ दिवस अंग विसळणंच सुरू होतं. कुर्ता घातला अन् तो एकदम ढगळ वाटला. आरशात स्वत:ला बघितलं अन् वजन घटल्याचं जाणवलं. लगेच वजन करून बघितलं तर नऊ किलो कमी झालं होतं. नऊ दिवसांत नऊ किलो. हिसाब बराबर था! छान जेवलो. चव होती. भूकही होती. थकवा सोडता बाकी काही त्रास नव्हता. फक्त उजव्या डोळ्याच्या भिवयीपासून वर थोडं सुजल्यासारखं वाटत होतं. दुखत नव्हतं; फक्त हात लागला की हुळहुळायचं. हॉस्पिटलमध्ये सुटीच्या आदल्या दिवशी, डॉक्टरला दाखवलं होतं. म्हणाले, “मला तसं काही वाटत नाही. काही लागलं असावं.” म्हटलं छोडो! 

इथून पुढे चौदा दिवस घरात राहायचं होतं. रात्री जेवलो अन् झोपणार...तर झोप गायब. अख्खी रात्र डोळ्यात काढली. बघत-बघतच सकाळ उजाडली. थकवा नव्हता. दुसरी, तिसरी रात्र अशीच जागत गेली. मग बायकोने डॉक्टर पुतण्याशी बोलून झोप येईल अशी गोळी दिली. काही उपयोग नाही. बरं, उजव्या कुशीवर झोपलं तर उजवा डोळा आणि त्यावरील भाग अवघडल्यासारखा व्हायचा. मग आरामखुर्चीवर आसन जमवलं. श्वास बघत, भवतालातले आवाज टिपत रात्र काढली. डॉक्टरांना विचारलं, तर त्यांचं म्हणणं, ‘कोरोना इन्फेक्शन इतकं जोराचं होतं, की शरीरात उठलेल्या वादळाने (त्याला सायटोकाइन स्टॉर्म असं म्हणतात) केलेल्या पडझडीचे परिणाम काही महिने झेलावेच लागतील.’

ठीक. पण डोळ्यावरच्या फडफडीचं काय? यावर डॉक्टरांचं उत्तर तेच : हॉस्पिटलमध्ये बेडचा माथा किंवा असंच काहीतरी लागलं असेल. तुम्हाला कळलं नसेल. वाटलं, असेल तसंच काहीतरी. हॉस्पिटलमधला बेड मला कसाबसा पुरायचा. उशी घेतली तर पावलं बाहेर लटकायची. दोन-तीन दिवस मी ग्लानीत होतो, तेव्हा लागला असेल मार. डॉक्टर विचारायचे, डोकं दुखतं का? यावर माझा प्रतिप्रश्न असायचा, म्हणजे काय असतं नेमकं? कारण आयुष्यात डोकं दुखण्याचा मला अनुभवच नव्हता. असो. एकुणात बरं सुरू होतं. रात्रीचे चढ-उतार, मी आरामखुर्चीवर पडून बघत अंगावर खेळवत होतो. समोरचा पिंपळ, त्यालगतचा बदाम, शेवगा, मधला करंज अन् फुललेली तगर, पिंपळावर रात्री कचकच करत त्याची पानं-फळं खाणारी लुसलुशीत वटवाघळं, भल्या पहाटे बदामावर कुठल्याच बाजात न बसणारा आवाज करत तिरपे-तारपे सूर मारत झेपावणारे पोपट, सकाळपासूनच प्रेमगीत सुरू करणारा कोकीळ आणि तुरतुर लुडबुड करणारे फूलचूसे बॅबलर हे सगळं मी निवांत अनुभवत राहिलो. आकाश तर वेड्यागत आलटून-पालटून रंग उधळायचं. मला माझी घार आठवायची.

झोपेचं खोबरं आणि डोळ्यांवरचं दुखणं सतावत होतं. मार्ग सापडत नव्हता. अखेर सुहासच्या सांगण्यावरून त्याचे होमिओपॅथ डॉक्टरमित्र योगेश खरेंकडे गेलो. त्यांना कोविड ट्रीटमेंटचे रिपोर्ट दाखवले. म्हणाले, ‘बरं झालं भरती झाला ते. कठीण होतं!’ मग डोळ्यांची कथा सांगितली. हा माणूस फार बोलत नाही. पण टोकदार न्याहाळतो. ‘दुखणं सायनससंबंधी असावं, औषध देतो’, असं म्हणून एकात लिक्विड अन् दुसर्‍या बारीक बाटलीतून बारीक पांढर्‍या गोळ्या दिल्या. 

दरम्यान, थोड्या दिवसांनी उजव्या डोळ्यावर सूज चढून डोळा बारीक झाला. दिवसातून दोन-तीन तास कचकचही जाणवायची. ताप नसायचा. जेवण-खाणं व्यवस्थित होतं. डॉक्टरांचं म्हणणं, ‘होतं असं कोरोनानंतर. ताप नाही ना? मग फिकीर नॉट! वाटलं तर एखादी कॉम्बिफ्लॅम घ्या.’ पण अभयाचं समाधान होईना. कोरोना आणि म्युकरच्या बातम्यांनी पेपर वेढलेले होते. ती म्हणाली, “बाबा ऑप्थल्मॉलॉजिस्टला दाखवू, म्युकर डोळ्यांवरच चढाई करतो म्हणे पहिले.” 

अभयाने औंधमधल्या एका डोळे तज्ज्ञ डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. आम्ही तिघं गाडी घेऊन औंधला. डॉक्टरबाईंनी डोळा व्यवस्थित तपासला. बोर्डावरची बाराखडी म्हणायला सांगितली. मग डोळ्यात ड्रॉप टाकून बसायला सांगितलं. मग तपासणी. ‘व्हिजन’, ‘पॉवर’ आणि एकूणच डोळ्यांची तब्येत उत्तम होती. 

पुन्हा येरे माझ्या मागल्या! भूक, झोप ताळ्यावर होती. ‘फील गुड’चा भाव होता. तरीपण दिवसभरात दोन-तीन तास कचकच राहायचीच. डोळेवाल्या डॉक्टरांनी सूजेवर ‘इमॅनझेड’ नावाची गोळी दिली होती, ती घ्यायचो. त्यामुळे थोडं बरं वाटायचं. डॉक्टर पुतण्याने एक गोळी दिली होती, तीही घ्यायचो. शिवाय होमिओपॅथीच्या गोळ्या होत्याच. या सर्व गोळ्यांच्या मार्‍यात ‘कचकच’ कमी झाली.

पण सूज कमी होईना. त्यामुळे डोळ्यांनंतर कान-तज्ज्ञांकडे गेलो. त्यांनी नळ्या टाकून कानाचा भूगोल तपासला. ‘नो प्रॉब्लेम’ म्हणाले. नाक, कान, घसा आणि डोळे... म्युकरच्या ओळखीच्या ठिकाणांचा तपास झाला होता. कुठे काही ‘संशयास्पद’ हालचाली आढळल्या नव्हत्या. तपास जारी रहेगा। कारण उजव्या डोळ्यावर सूज कायम होती. डोळा बारीक झाला होता. मग पुन्हा डॉ. श्रीकांत जोशी या अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांना डोळे दाखवले. त्यांनी ग्वाही दिली की, ‘डोळे बेकसूर’ आहेत. बरं इकडे जेवण सुधारलं. बायको-मुलीने पौष्टिक पदार्थांचा रतीब सुरू केल्याने एक-दीड किलो वजनही वाढलं. सकाळी फिरायला जायचो चांगला तीनेक किलोमीटर. गाडी चालवायचो. सगळं नॉर्मल. पण डोळा आणि त्यावरची सूज काही दाद देत नव्हती. कोरोनाचा ‘उत्तर पक्ष’ म्हणावं तर आता पन्नास दिवस उलटले होते. अखेर डॉक्टर पुतण्या म्हणाला, ‘बस झाली तुझी भनभन. आपण एमआरआय करू.’ 

२४ जूनचा मुहूर्त ठरला आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी एमआरआयच्या थंड पेटीत विसावलो.. एमआरआयची पेटी म्हणजे ‘इग्लू’च होतं. फक्त संगीतमय. संगीताच्या कंपनलहरी कानाद्वारे डोक्यात सोडून आतला भावताव तपासण्याचं ते तंत्रज्ञान अद्भुत म्हणावं लागेल. त्या एका तासात मी आधीच्या शंभर दिवसांच्या स्मरण यात्रेवर जाऊन आलो.

‘एमआरआय’साठी तयारी झाल्यावर नर्सबाईने हाताच्या पालथ्या पंजावर पाइपवाली सुई खुपसली. वरून चिकटपट्टी डकवली. यावेळी रीतसर स्पिरीट स्वॉब वगैरे लावून. बरं वाटलं! मग ‘एमआरआय’ रूममध्ये तिथल्या दादाने पेटीत कसं झोपायचं, फार अस्वस्थ वाटलं तर उपाय म्हणून हातात दिलेली बटन-डबी कशी वाजवायची वगैरे सूचना दिल्या. पण त्या गारेगार थंडीचं काय? दिलेल्या कपड्यांच्या सगळ्या फटीतून थंडीचे लोळ उघड्या अंगाला झोंबत होते. पण तशाच अवस्थेत मला मशीनमध्ये जाणार्‍या पट्टीवर झोपवण्यात आलं आणि बटन दाबताच ती पट्टी सरकत मशीनच्या आत गेली. सगळी ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ योग्य असल्याची खात्री झाल्यावर कानावर घट्ट बसतील अशा झडपा आणि वरून शिरस्त्राण चढवण्यात आलं. दरम्यान ‘अरे या थंडीचं काय?’ असं मी थरथरत विचारलं. तशी ‘थांबा’ची खूण करून त्या भल्या माणसाने माझ्या धडावर डबल लेअरचं ब्लँकेट टाकलं. देव भलं करो त्याचं!  

डोकं हलू नये म्हणून ते एका साच्यात फिट्ट केलं होतं. ‘सांगेन तेव्हा दीर्घ श्वास घ्या’ असं सांगून तो बाबा अदृश्य झाला. ती मोठी, सतत थंडी प्रसवणारी खोली. त्यात गोठलेला अंधार, डोकं मोठं अन् पाय बारीक असणारं ते जंगी मशिन... अन् कानावर लाटेगत आदळणारं संगीत. डोळे मिटून मी सारं बघत होतो. वाटलं हे कधीच संपणार नाही. मध्यंतरात तो अदृश्य होणारा बाबा अवतरला, त्याने ब्लँकेट बाजूला करून पंजावरच्या पाइपवाल्या सुईमधून नवा द्रवपदार्थ सोडला. परत संगीत संमेलन सुरू झालं. आधी आणि नंतर यातील बदल टिपण्यासाठी ते इंजेक्शन होतं म्हणे.

‘एमआरआय’ आटोपला, आता रिपोर्टस्ची अस्वस्थ वाट! ‘अरे तू इतका फिट आहेस की, सगळं नॉर्मलच येणार.’ घरच्यासकट सर्वांची, अगदी ‘एमआरआय’ घेणार्‍या बाबाची अन् सुई डकवणार्‍या ताईची देखील अशीच जबानी होती. दुसर्‍या दिवशी रिपोर्टस् आले. ते अक्षरश: मुंडी उडवणारे होते. अर्थात हे नंतर कळलं. अगम्य भाषेतील या रिपोर्ट नामक दस्तावेजांची फोड करण्यास जाणकारच लागतात. ‘एमआरआय’ची लेखी अन फिल्म स्वरूपातील निरीक्षणं डॉक्टर पुतण्यानं न्यूरोसर्जनकडे पाठवली.

रविवार, २७ जून उजाडला आणि पुतण्याचा फोन आला. ‘स्पीकरवर टाक’ म्हणाला. बायको, मुलगी आणि मी ऐकत होतो. तो जे काही सांगत होता, ते भयंकर होतं. भिवयीच्यावर कवटीमध्ये म्युकर मायकोसिसची जोरदार लागण होती. त्यामुळे कवटीचा तो भाग काढावा लागणार होता. हे का आणि कसं हे तो सांगत होता. बायकोला समजत असावं. मी तर सुन्नच झालो होतो. म्हणाला, “उद्या न्यूरोसर्जनची वेळ घेतो. ते सविस्तर सांगतील.”

घरावर सावट दाटलं. असं काही होईल अशी कुणीच कल्पना केली नव्हती. धक्का तर जबरदस्त होता. पण मला माझ्या मनाचं नेहमीच कुतूहल वाटत आलं आहे. आघात झाला की ते बधीर होतं. पण लगेच उसळी मारून त्या आघाताकडे लांबून अन् थेट बघायला लागतं. आजवर अनेक वेळा आलेला हा अनुभव यावेळी पुन्हा आला. अर्थात यावेळेचा आघात भीषण होता. आजवर बाकीचे आघात सहन करायला शरीराची तटबंदी भक्कम असायची. त्यामुळे मातीतून उठून दोन हात करायची हिंमत होती. पण यावेळी माझ्या भरवशाच्या तटबंदीलाच खिंडार पडलेलं होतं. 

जेवणात कुणाचंच लक्ष नव्हतं. फिरून-फिरून चर्चा, हे का आणि कसं झालं, यावर येत होती. दुपार झाली, अन् म्हटलं, ‘बास झालं. उद्या तो न्युरोबाबा काय म्हणतो ते बघू. अभी घूम के आयेंगे.’ गाडी काढली अन् नांदे-चांदे गावांच्या पार दुथडी भरून वाहणार्‍या नदीकिनारी फिरून आलो. नदीची वाहती धार अन् समुद्राच्या उसळणार्‍या लाटा यामध्ये संजीवनी असावी. म्हणून खचलेल्या शरीरातल्या दमलेल्या मनात त्या शक्ती प्रस्फुटित करतात. त्या वाहत्या पाण्याकडे बघून अच्छा लगा!

सोमवार उजाडला आणि आमची वरात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. पूनम, अभया, अभयाचा होणारा नवरा आणि मी. रिपोर्टस्, भल्या थोरल्या पिशवीत एमआरआयच्या फिल्मस आणि खायचं-प्यायचं असा जामानिमा घेऊन त्या जत्रेत बसलो. हो, जत्रेसारखी गर्दी. कुणी व्हीलचेअरवर, कुणी ‘कॅथेटर’ची लटकणारी पिशवी घेऊन, कुणी प्लॅस्टरमध्ये हात किंवा पाय लपेटून अशी थकलेली, भयग्र्रस्त चेहर्‍यांची माणसं. सोबतीला हबकलेले नातेवाईक. माहोल एकदम डरावना था! हॉस्पिटलच्या आकर्षक गणवेषात फिरणारी चटपटीत स्मार्ट अन् देखणी मुली-मुलं या जत्रेला शांतपणे, कधी आर्जवाने; तर कधी हलकेच दटावून नियमित करत होती. मृत्यूची सावली माणसाला कसं हतबल करते, मृत्यूची अटळता हाडीमाशी  असली तरी माणसं तिच्याशी कशी झुंजत राहतात, असं काय काय मनात येत होतं. या संसारात उदराच्या भिंतीतसुद्धा मृत्यू गर्भाला आलिंगून बसला आहे, असं ज्ञानेश्वरांनी कुठेतरी म्हटल्याचं लखकन् आठवून गेलं. स्मरण कसं मजेदार असतं बघा! एरवी तत्त्वज्ञान तिडीक उठवतं; पण काही क्षणी समजेचं सखोल अंजन लेवून जातं. 

जत्रा न्याहाळत वाट बघणं सुरू होतं. दिलेल्या वेळेनंतर दोन तासांनी डॉक्टर आले. मध्यम उंचीची, सडपातळ, व्यवस्थित भांग पाडलेली, तशी किरकोळ सदरात मोडणारी; पण आश्वासक अन् बुद्धिमान चेहर्‍याची व्यक्ती आत आली. बघताक्षणीच ओळखलं, हेच न्युरोसर्जन असणार. केबिनमध्ये जाताच त्यांनी बुलावा धाडला आणि डॉ. रणजितसिंग देशमुख अशी भारदस्त नावाची पाटी असलेल्या खोलीत आम्ही चौघं दाखल झालो. सगळे रिपोर्टस् फिल्मसह त्यांच्या स्क्रिनवर होते. अविश्वासाने माझ्याकडे बघत ते हसले आणि म्हणाले. “तुम्ही अविनाश कुलकर्णी सरांचे (डॉक्टर पुतण्या) काका?”  मी ‘हो’ म्हटलं. “एकदम फिट दिसता!” 

रिपोर्ट्सचं सादरीकरण सुरू झालं. टेक्नॉलॉजी ही खरंच काय अफलातून चीज आहे! पूर्ण डोक्याचं, कवटीचं हलतं-डुलतं चित्र समोर फिरत होतं. डॉक्टर शांत, समजुतीच्या स्वरात हळूहळू ‘भयपट’ उलगडत होते. डोळ्याच्या वरती थेट डोक्याच्या मध्यापर्यंत इन्फेक्शनचं दाट जाळं पसरलं होतं. भिवयीचं हाड त्याने कुरतडलं होतं. सांगता सांगता मध्येच त्यांनी कुणाला तरी फोन लावून विचारलं, ‘आहेस का ओपीडीत? जरा येतो का?’ थोड्या वेळात इन्फेक्शीयस डिसिज एक्स्पर्ट डॉ. रमण गायकवाड दाखल झाले. गंभीर चेहर्‍याच्या या तज्ज्ञाने रिपोर्ट्सकडे बघत उदास स्वरात सांगितलं, ‘म्युकर आहे.’ माझ्याकडे पुन्हा त्याच परिचित झालेल्या अविश्वासाने बघितलं. या माणसाला म्युकर आहे हे कुणालाच खरं वाटत नव्हतं. 

माझ्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले. एक, ऑपरेशन करून डोळ्यावरची कवटी काढून टाकायची. त्याला क्रेमेटॉमी म्हणतात. अर्थात हे मेजर ऑपरेशन असणार होतं. दुसरा पर्याय, भिवयीच्यावर बारीक प्रोसिजर करून आतली लागण इंजेक्शनने काढून त्याची बायप्सी करायची. त्याचा रिझल्ट आला की मग पुढचं ठरवायचं. काय करावं? संभ्रम होता. आम्हालाच नव्हे, डॉक्टरांनाही. कारण चांगला धडधाकट पेशंट बघून डॉक्टर मंडळी बुचकळ्यात पडत होती. ‘म्युकर’ आहे पण डोळा पूर्ण शाबूत आहे... आपली दृष्टी आणि स्थान भक्कम राखून. नाक, कान आणि घसा सर्व दोषरहित. डोकेदुखी तर नाहीच. हे होतं माझं बाह्य दिसणं. दुसरीकडे रिपोर्ट्समध्ये उसळ्या मारणारी लागण अन् कुरतडलेली हाडं दिसत होती. तो नक्की ‘म्युकर’ आहे की कुठल्या बॅक्टेरियाचा उपद्व्याप आहे, हे कन्फर्म माहीत नव्हतं! ‘दोन्ही पर्यायांचा विचार करा; दोन दिवसांनी ठरवू’ दोन तासांच्या सादरीकरण-चर्चेनंतर हा निर्णय झाला अन् आम्ही बाहेर पडलो.

आमच्या बृहद कुटुंबातले अर्धे कुलकर्णी डॉक्टर! त्यामुळे सर्वत्र फोनाफोनी सुरू झाली. मोठी बहीण डॉक्टर. ती नागपूरला होती. तिला रिपोर्ट्स पाठवले. ते तिने तिच्या परिचित तज्ज्ञांमध्ये फिरवले. त्या क्षेत्रांतील अनेक तज्ज्ञ पूनमचे वर्गमित्र होते. त्यांच्याकडेही रिपोर्ट्स धाडले गेले. पण लोक काहीही म्हणाले तरी शेवटी निर्णय आम्हा तिघांना घ्यायचा होता. डॉक्टर पुतण्या पहिल्या पर्यायाच्या, म्हणजे मेजर ऑपरेशनच्या बाजूने ठाम होता. लागण बघता अन् तेथील हाडांची स्थिती बघता ऑपरेशन ‘मस्ट’ आहे. मग बायप्सीचा एकपात्री प्रयोग कशाला, असा त्याचा रास्त मुद्दा होता. 

अखेर लागण निपटून काढायची अशा निर्णयावर पोहोचलो. आता ऑपरेशन कसं आणि केव्हा, पुढील लाईन ऑफ ट्रिटमेंट कशी राहणार, ऑपरेशनमध्ये काय पडझड होऊ शकते, किती काळ औषधं घ्यावी लागणार हे सगळं सविस्तर सांगण्यासाठी डॉक्टरांनी एक मिनी शिखर परिषद बोलावली! एक जुलैला आम्ही सगळे परत हॉस्पिटलमध्ये. डॉ. देशमुखांनी सर्व सविस्तर समजावून सांगितलं. हा माणूस शांतपणे, धिम्या आवाजात, मध्येच मिश्कील पेरणी करत भीतीदायक प्रक्रिया सहज समजावत होता.

तारखा ठरल्या. दोन जुलैला भरती व्हायचं, तीन तारखेला ऑपरेशन करायचं अन् पुढचं बघायचं! ऑपरेशन मेजर होतं. चार-पाच तास चालणारं. डिफॉर्मिटी येऊ शकणार होती. थोडक्यात डोळा विद्रूप होण्याची शक्यता होती. कपाळ अन् वरती खड्डा पडणार होता. अर्थात म्युकरचा पूर्ण निपटारा झाल्यावर पाच-सहा महिन्यांनी कृत्रिम कवटी बसवून तो पूर्ववत करण्यासारखा होता. म्यूकरची औषधं किमान तीन महिने घ्यावी लागणार होती. म्यूकरचा कणदेखील कुठे शिल्लक राहणार नाही याची पक्की खातरजमा करून घेतल्यानंतरच तो उपक्रम राबवला जाणार.... असं बरंच काही.. दरम्यान, या सर्व चर्चेत म्युकर डोळा चुकवून कपाळात कसा चढला, ब्रेनच्या वाट्याला का गेला नाही, हे सगळे प्रश्न वारंवार यायचे अन् ‘काही कळत नाही’, इथे येऊन थांबायचे. खरंच कुणाला काही कळत नव्हतं. सगळे ठोकताळे! म्युकर आपल्या नेहमीच्या स्वभावाविपरीत वागत होता, ही मात्र वस्तुस्थिती होती. 

मी फक्त बघत होतो. सारंच ऐरणीवर आलं होतं. पल्याड काय याची कल्पनाच खुंटली होती. 

दरम्यान, ‘कवटी-तोड’ की ‘बायप्सी’ या हिंदोळ्यावर फिरणार्‍या मित्रमंडळींना पहिली कारवाई होणार असल्याचं सांगितलं. सारेच अस्वस्थ झाले. फोनचे ओघ सुरू झाले. कोरोनापासूनच्या सर्व घडामोडींत सामील असलेल्या अनेकांनी भेटीला येतो म्हणून हट्ट धरला. पण यातील बरीचशी बाहेरगावी होती, त्यामुळे त्यांना ‘नको’ म्हटलं. रोज ‘अपडेट’ मिळतील अशी ग्वाही दिली, तेव्हा सुटलो. गौरी, सुहास आणि आनंद मात्र घरी आले. सगळे हलले होते. पण हिंमत देत होते. वातावरण नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत होते.  मात्र निघताना सुहासने जवळ घेतलं अन् त्याचे डोळे वाहू लागले. एरवी कठोर वाटणारा हा माझा जीवलग आतून फार हळवा आहे, हे ठाऊक होतं. म्हणूनच ‘तू हॉस्पिटलमध्ये मला भेटायला येऊ नको’, असं त्याला निक्षून सांगितलं. उपयोग होणार नाही हे पक्कं माहीत असतानादेखील! सारेच गलबलले. आमच्यात गौरी सगळ्यात लहान अन् हिंमतीची. ‘मी येईन भेटायला,’ या तिच्या ठाम घोषणेवर मी फक्त तिच्या खांद्यावर थोपटलं. आनंद हबकूनच होता. गाडीत बसता बसता उठून जवळ आला. न बोलता आम्ही एकमेकांचे हात हातात घेतले. मी पण हेलावलो. हे माझं खरं धन आहे, हे आत कुठेतरी जाणवत होतं. बरेच जण भेटू नाही शकले; पण फोनवरून व्यक्त झाले. लक्षात आलं, दशकांच्या पायर्‍या ओलांडूनही हे निरपेक्ष प्रेम तसंच ताजं-टवटवीत आहे. एकदम सम्राट-श्रीमंत वाटलं. कवटीची फिकीर उडून गेली!

दोन जुलै रोजी पुन्हा तीच बॅग भरून निघालो. यावेळी पूनम आणि अभया सोबत होत्या. दरम्यानच्या दिवसात ‘कोरोना-कल्लोळ’ शमल्याने हॉस्पिटल तुलनेनं मोकळं होतं. स्पेशल रूम मिळाली. नवव्या मजल्यावरची ही खोली एकदम पंचतारांकित होती. छान, स्वच्छ. कळीने वरखाली होणारा बेड, अ‍ॅटॅच्ड टॉयलेट-बाथरूम, शांत-सुखद हवामान, आणि एक ‘हसीन’ मोठी खिडकी. मधल्या काही आगाऊ इमारती वगळता दूरवरच्या डोंगरांना कवेत घेत क्षितिजावर टेकणारं आकाश दिसत होतं. मी बघत होतो, तोच त्या निळाईत घार झेपावली. अरे माझी घार! ही कदाचित वेगळी असेल... पण आधीच्या हॉस्पिटल मुक्कामात मनाला दिलासा देणारी ती हीच, असं मानायला काय हरकत होती?

सोपस्कार सुरू झाले. हॉस्पिटलचे कपडे अंगावर चढले. यावेळी कुर्त्याला नीट बटणं आणि पैजाम्याला व्यवस्थित नाडा होता. ‘पाईप-सुई’ बसवायला सिस्टर आली. तिला म्हटलं, सुई व्हेनमध्ये शिरताना जेवढा त्रास होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त नंतर सुईला काढताना होतो. हातावरचे केस स्टिकिंग टेपमुळे कचाकचा उपटले जातात. यावर त्या सिस्टरने काही न बोलता छोट्या रेजरने हातावरचे केस सफाचट केले. रक्त काढलं, तपासायला नेलं, व्हीलचेअरवर बसून इको करून आणलं. ऑल वेल! दुपारी एकजण आला... ‘जंगल’ वाढलं होतं, डोकं दाढी, पोट अन् गुडघ्यापर्यंतचं शरीर भादरून गेला. मिशी तेवढी सोडली. 

दोन-तीन वेळा बी.पी. तपासून झालं. ‘शुगर’ची हिस्ट्री आहे का विचारणं झालं. गुंगीतज्ज्ञ येऊन ‘ऑपरेटिंग’ इतिहास विचारते झाले. कुठला हलणारा दात आहे का, असं काय काय विचारून झालं. उद्या सकाळीच ऑपरेशन होणार असल्यामुळे रात्री नऊनंतर काही खाऊ नका, असं चार-चार जणांनी गिरवून घेतलं. सारखा वेगवेगळ्या डॉक्टरांचा राऊंड सुरू होता. प्रत्येकजण ओळख करून देत होता : मी अमका, मी तमका विशेषज्ञ. दोन तरुण डॉक्टर आले, “मी उद्या तुमच्या ऑपरेशनमध्ये डॉ. देशमुखांना ‘असिस्ट’ करणार आहे.” मी प्रत्येकाला हसून मान डोलावत होतो. एकुणात ‘कल की दावत भारी होगी’ असं दिसत होतं. यात डॉक्टर पुतण्याची कमेंट छान होती. इको करताना मला म्हणाला, “कवटी शेवटची पाहून घे, कल नहीं रहेगी!”

ऑपरेशनपूर्वीची रात्र कुणालाच ‘हॉस्पिटलमध्ये सोबत राहू नका’ म्हणून सांगितलं. नंतर त्या सगळ्यांना दगदग अन् चकरा व्हायच्याच होत्या. बरं, मी एकदम ठीक होतो. टकलावरून हात फिरवत बसलो होतो. शिवाय हाताशी बेड वर-खाली करण्याची आणि कॉलिंग बेलचीही कळ होती. सर्व्हिस एकदम झकास होती. माझं जेवण झालं, सगळे घरी गेले. मी दिवे मालवून, काचेतून येणार्‍या प्रकाशाच्या तिरपीत खिडकीतून आकाश न्याहाळत होतो. उद्यापासून मोठा बदल होणार होता. म्हटलं तर मोठा, म्हटलं तर काही नाही. ‘कवटी उतरवणं हे आमच्यासाठी सर्वांत सोपं काम’, असं डॉक्टर म्हणाले होते. पण माझ्या द़ृष्टीने फक्त कवटी उतरणार नव्हती. त्यामागचा लोचट म्युकर नंतर पुरणार होता, त्याचं काय?

एकीकडे मनात सर्ववेळ खर्चाचाही विचार चालला होता. इन्शुरन्स होता, तरी खिशाला झळ बसणार होतीच. वाटलं खरंच या सगळ्याची गरज आहे का? गेल्या वेळी कोरोनात तिसर्‍या दिवशीच मी आटोपणार होतो. पण चमत्कारी वळण आलं अन् निसटलो. एकदम विश्वेश्वर आठवला. त्याचं राहणं गरजेचं होतं. तो तरुण होता, त्याची मुलगी-बायको त्याच्यावर अवलंबून होती. माझ्याबाबत ‘बोनस’ सुरू होता. सगळं स्थिरस्थावर, छान होतं. आणि तसंही लोक ‘थांब’ म्हणत असताना जाणं, इस में मजा है! 

रात्र चढत गेली आणि तलावातील तरंग हळूहळू काठापर्यंत विस्तारत शमून जावेत, तसं मन निमावत गेलं. आकाश स्वच्छ होतं. तारे लुकलुकत होते. त्याखाली शहराची आपाधाबी सुरू होती. पण मला आवाज येत नव्हते. किती शांत आणि सुखद आहे ही खोली! नाही तर जनरल वॉर्ड? क्षणात तिथले सारे कॅरेक्टर आठवले, अन् हसू आलं. इथे ज्या सोयी आहेत, त्यातील काही थोड्या प्रमाणात का होईना, तिथे झिरपल्या तर अनेकांचा विव्हळ थांबेल. पण तसं होणार नव्हतं. जे आहे, तेच पुढे सरकणार आहे... मध्येच कुणीतरी येऊन बी. पी. तपासून गेलं अन् मी झोपी गेलो.

सकाळी कळलं ऑॅपरेशन आठऐवजी दुपारी एक वाजता होणार! बसलो वाट पाहत. खायचं नव्हतंच, घोट-दीड घोट पाण्यावर निभावलं. भूक फारशी जाणवली नाही. बाराच्या सुमारास सिस्टर आली अन् मला हिरवा गाऊन घालायला देऊन गेली. नंगू शरीरावर हिरवा झगा चढवला आणि व्हीलचेअरने ऑपरेशन थिएटरकडे निघालो. आदल्या रात्री सगळे फॉर्म भरले होते. सह्या झाल्या अन् मी थेटरमध्ये दाखल झालो. पुन्हा सारं गारेगार. बरेच डॉक्टर होते. वर मोठा दिवा, खाली अवजारं मांडलेली टेबलं, सगळी जय्यत तयारी होती ‘कवटी की बारात’ काढण्याची. एक डॉक्टर मला सारखे प्रश्न विचारत होते, मी ‘हुं..हां’ करत होतो. “काय झालं?” त्यांनी विचारलं. म्हटलं, “केवढा हा गारठा. अंगावर नुसता गाऊन. कवटीचं पुढचं पुढे. त्याआधीच कुल्फी व्हायची माझी.” ते हसले अन् माझ्या अंगावर, मंद उबदार फीलिंग देणारं ब्लँकेट ओढलं. अच्छा लगा!

डॉ. देशमुख आले. सगळे डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या गणवेशात वेगळेच भासत होते. गुंगी देणार्‍या डॉक्टरांनी मला पुन्हा आदल्या दिवशीचेच प्रश्न विचारले. तेवढ्यात डॉक्टर देशमुख म्हणाले, “अशा ऑपरेशनच्यावेळी आम्ही जवळच्या नातलगाला आत बोलावतो. तुमच्या मिसेसना बोलावू का?” मी काहीच बोललो नाही. क्षणभर थांबून तेच म्हणाले, “पण नको. मला त्या थोड्या अँक्शस वाटल्या.” मी हसून म्हणालो, “डॉक्टर इथे तुम्हीच माझे जवळचे नातलग!” डॉक्टर डोळ्यांनी हसले अन् जवळ येत खांद्यावर थोपटत म्हणाले, “आता निवांत झोपा. काळजी करू नका.” दरम्यान गुंगीचा मास्क नाकावर चढला अन् काही कळायच्या आत मी बुडालो. 

हलकी जाग आली, कुणीतरी मला थापडा मारत होतं. डोळे उघडले तर समोर डॉक्टर होते. “कसं वाटतंय?” एकच प्रश्न. काय वाटणार? गुदगुल्या होत आहेत म्हणून सांगू? हसू आलं. “बरं आहे ना? काही त्रास?” ‘नाही’ म्हटलं. त्रास काहीच नव्हता. गुंगी होती. मग स्ट्रेचरवरून आयसीयूमध्ये हलवलं गेलं. बेडवर ठेवलं. डॉक्टर, नर्स सलाइन वगैरे अ‍ॅडजस्ट करत होते. तोच पूनम आणि अभया समोर आल्या. भास नव्हता, खरंच आल्या होत्या. त्यांनी बघितलं, मी पण बघितलं. रात्रीचे नऊ वाजले होते. पाच-साडेपाच तास ऑपरेशन चाललं होतं. नियमानुसार तिथे कुणी थांबू शकत नसल्याने घरचे पांगले. मी झपाट्याने शुद्धीवर आलो. 

आयसीयू निवांत होता. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त गर्दीचा होता. अर्थात सगळे पेशंट बेडवर विभिन्न नळ्यांच्या गुंतावळ्यात होते. प्रत्येकाच्या डोक्याशी लाल-पिवळ्या नागमोडी वळणाच्या रेषा दाखवणारी अन् बिप.. पिप..आवाज करणारी यंत्रं. मी बरा होतो; पण विचित्र अवघडलेपण होतं. चाचपडल्यावर जाणवलंं डोक्याला जंगी शिवण आहे आणि त्याच्या मध्यावर शेंडीसारखी ट्यूब लावलीय. तिचं कनेक्शन माझ्या बाजूला असलेल्या एका भांड्याशी जोडलं आहे. याला ‘ड्रेन’ म्हणतात. खाली ‘कॅथेटर’ लावून पिशवी बेडला बांधली होती. या दोन शेंड्यांमुळे अस्वस्थता होती. सलाइन सुरू होतं. ग्लानी होती. फार ताणलं नाही आणि झोपी गेलो. 

सकाळी जाग आली. रविवार होता. नर्स आली ‘ड्रेन’ची डबी आणि कॅथेटरची पिशवी तपासली. ऑल वेल! मग डॉक्टर आले आणि कॅथेटर निघालं, हुश्श झालं. वरची शेंडी मात्र राहणार होती. कपाळावरून बोटं फिरवली. लिबलिबीत लागत होतं. अरे, कवटी गेली! फक्त कातडी शिल्लक राहिली होती. लिक्विड डायट सांगितलं होतं. पूनमने आणलेलं खाल्लं-प्यायलो. तुरळक कण्हण्याचे आवाज वगळता आयसीयू शांत होतं. ‘खोली मिळाली की हलवू’ असं सांगितलं गेलं. शक्यता कमी होती. पण दुपारी खोली मिळाल्याचं कळलं. दुपारी उशिरा शिफ्ट झालो. 

शरीर आणि मनाची जोडगोळी असते. एक बिचकला की दुसरा कलंडतो. सकाळी उठून ‘ड्रेन’ची ‘शेंडी’ आणि ‘गडवा’ सांभाळत टॉयलेटला गेलो. वॉश-बेसिनवर मोठा आरसा होता. आत गेलो तेव्हा लक्षच नव्हतं. अचानक आरशातील प्रतिबिंब पाहिलं अन् पार कोसळलो. भयाण गलीत होती ती प्रतिमा! एका कानापासून दुसर्‍या कानापर्यंत डोक्याच्या मध्यभागी भलीमोठी शिवण होती. त्यावर भेसूर अशा चिकटपट्ट्या लागल्या होत्या. त्यातच गेल्या तीन महिन्यांच्या होरपळीत शरीर विसविशीत झालं होतं. सुजेच्या चढ-उतारात चेहरा पार नासला होता. उतरलेले खांदे, अर्धवट केस काढलेले निर्जीव हात बघून तर हतबलतेने डोळ्यांत पाणीच आलं. माझे भरलेले खांदे अन् कसलेले हात कुठे गेले? बेसिनचा आधार घेत उभा होतो. क्षणात विश्वासाच्या ठिकर्‍या उडाल्या. पार अस्ताव्यस्त झालो. थरथरत, आधार घेत कसाबसा बेडवर येऊन लवंडलो. ‘कसं होईल’ची अंधार पोकळी समोर दिसत होती. कूस पालटली, तर समोर अंथरलेलं निळं आकाश पसरलं होतं. घार निवांत घिरट्या घालत होती अन् तिला न्याहाळत मी मूकपणे समज सावरत राहिलो.

डॉ. देशमुख आले. म्हणाले, “कपाळाचा बोन काढताच आतील लागण फसफसून बाहेर आली होती. ती ब्रेनमध्ये कशी गेली नाही याची निव्वळ कमाल आहे. ती जर पसरली असती, तर सगळंच हाताबाहेरचं होतं.” त्यांनी जखम बघितली अन् ड्रेन काढण्याच्या, ड्रेसिंग बदलण्याच्या सूचना दिल्या. नंतर साथरोगतज्ज्ञ डॉ. गायकवाड आले. ‘म्युकर’वर शिक्कामोर्तब झालं होतं. आता औषधोपचार, इंजेक्शन की गोळ्या यावर थोडी भवतीन्भवती झाली. मेडीसिनवाले म्हणत होते की, ‘पुट हिम ऑन ओरल मेडिकेशन’. डॉ. गायकवाड दोन्ही सुरू करू म्हणत होते. बुरशीचं पूर्ण निखंदनच करू. तीन ते सहा महिने भक्कम डोसचा औषधोपचार होता. पोसाकोनॅझोलच्या १०० एम.जी.च्या एकाच वेळी तीन गोळ्या सुरू झाल्या. पुढे किमान तीन महिने तरी हा खुराक घ्यावा लागणार होता. सोबत १० दिवस रोज ‘अ‍ॅम्फोटेरिसिन’ नावाचं इंजेक्शनदेखील देण्याचं ठरलं. त्यासाठी हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार होतं. 

बाकी काही त्रास नसताना केवळ एका सुईसाठी हॉस्पिटलमध्ये राहण्याची कल्पना अंगावर येणारी होती. इंजेक्शन सलाईनद्वारे देण्यात येणार होतं. अन् त्याला शरीरात सरकायला चार ते पाच तास लागणार होते. शिवाय, यासाठी नेहमीची डकवलेली ‘पाइप-सुई’ चालणार नव्हती, तर सेंट्रल-पी लाइन टाकावी लागणार होती. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. 

लगेचच पुढची कार्यवाही सुरू झाली. हिमॅटोलॉजी विभागाची टीम अवजारांनी भरलेला ‘ट्रे’ घेऊन हाजीर झाली. डॉक्टर मॅडमनी स्वत:ची ओळख सांगितली आणि म्हणाल्या, “तुमच्या उजव्या हाताच्या नसेतून एक पाइपवजा ट्यूब घालण्यात येईल. यामधून दुसरी त्यापेक्षा लहान अशी दोरीसारखी दुसरी ट्यूब ‘इंजेक्ट’ केली जाईल. ती थेट खांद्याकडून डावीकडे हृदयापर्यंत जाईल. त्यातून रोजचं इंजेक्शन सलाइनद्वारे सरळ आतपर्यंत पोहोचेल.”

‘पी लाइन’ चढवण्यात आली. अन् त्या पाठोपाठ ‘अ‍ॅम्फोटेरिसिन’ शरीरात दाखल झालं. चांगले पाच तास लागले. पार वैतागलो. पोटात मळमळ आणि भकभक जाणवत होती. त्यावर पुन्हा गोळ्या. अस्वस्थतेने घेरलो गेलो. या औषधापेक्षा उरलेली कवटी काढली असती तर बरं झालं असतं, असं वाटून गेलं!

चौथा दिवस उजाडला तो वेगळाच विषय घेऊन. म्युकरवरच्या अ‍ॅम्फोटेरिसिन इंजेक्शनचा तेव्हा प्रचंड काळाबाजार सुरू होता. हा काळाबाजार रोखण्यासाठी इंजेक्शनच्या कुप्या महापालिका आयुक्तांमार्फत दवाखान्यांना पुरवण्यात येत. त्यासाठी हॉस्पिटलला रोज निविदा द्यावी लागे. मग उपलब्धतेनुसार पुरवठा केला जात असे. माझ्यासाठी चौथ्या दिवसाची कुपी आली ती वेगळ्याच नावाची अन् भलत्याच कंपनीची. डॉक्टर गडबडले. म्हणाले, “मी आजवर हा ब्रँड बघितलेलाच नाही. कसा विश्वास ठेवावा?” मागे ‘रेमडेसिव्हर’बाबत असाच गडबडगुंडा झाला होता. 

डॉक्टर त्या कुपीकडे बघत म्हणाले, “आपण गोळ्यांवरच शिफ्ट होऊ. सिस्टर इंजेक्शन नका देऊ. पी लाईनही काढायला सांगा.” अचानक सुटकेचा शिडकावा आला! मला हवं असलेलं फर्मान काढून डॉक्टर निघाले. “उद्या तुमची सुट्टी करू,” अशी खूशखबरही त्यांनी जाता-जाता दिली. ‘येस बात जम गई!’ मी खूष झालो! सरकारी यंत्रणा अशीही कामाला येऊ शकते, हे मला प्रथमच कळलं. 

पाचवा दिवस उजाडला. पंधरा दिवसांचा मुक्काम पाच दिवसांत आटोपला, या खुशीत अखेर घरी आलो.

आता खाणं-पिणं आणि झोप एवढाच कार्यक्रम होता. रोज जेवणानंतर तीन गोळ्या गिळायच्या होत्या. बस! मात्र हे बरंच महागडं प्रकरण होतं. रिटेल भावात एक गोळी ८०० रुपयांना पडायची. दवाखान्यातून दहा दिवसांचा खुराक मिळाला होता. मग पोसाकोनॉझोल नामक गोळ्यांच्या किंमती अन् कंपन्या याचा शोध सुरू झाला. बरीच ‘कोटेशन’ आली. अखेर पूनमच्या परिचितांपैकी एका डॉक्टरच्या ओळखीतून फॅक्टरी रेटने ३८० रुपयाला एक गोळीप्रमाणे ग्लेनमार्क कंपनीच्या गोळ्या मिळाल्या आणि ११४० रुपयांचा रोजचा रतीब सुरू झाला. हा किमान तीन महिने चालणार होता. ‘म्युकर’ची बुरशी अतिशय लोचट अन् बेशरम मानली जाते. त्यामुळे असा दीर्घकालीन औषधोपचार आवश्यक होता.

ऑपरेशननंतर १० दिवसांनी म्हणजे १७ जुलैला टाके काढण्यात आले. आता यानंतर किमान सहा महिने अर्धी डावी आणि पूर्ण उजवी भिवयी ते थेट डोक्याच्या मध्यापर्यंतची कवटी गायब झालेल्या अवस्थेत काढायचे होते. कवटी काढून टाकलेल्या जागी आता फक्त कातडी होती. सकाळी ही कातडी आपल्या पूर्वपदी म्हणजे कवटी असतानाच्या अवस्थेत जायची. दिवस चढायला लागला की तिला जणू कवटीचा विरह जाणवायचा अन् ती खाली दबायला लागायची. रात्री कपाळावर छान हातभराच्या वाडग्याएवढा खड्डा असायचा. या चढ-उतारात डोळा सामील व्हायचा अन् सूजेचा लपंडाव सुरू व्हायचा. याचा काही त्रास नव्हता, पण या ‘विरहग्रस्त’ कातडीला जपावं लागणार होतं. कारण मेंदूचं कवटीरूपी कवचच निघालं होतं. कातडीच्या आत ‘डायरेक्ट’ ब्रेनदादा होते. त्यांना जपणंही गरजेचं होतं. ‘नॉर्मल जगा, फक्त कुठे घसरू नका.’ असं डॉ. देशमुख मिश्किलपणे म्हणाले होते. ‘आता या वयात कुठे घसरणार डॉक्टर?’ म्हणून मी हसत उत्तरही दिलं होतं. 

दोन महिने म्युकर कवटीत कसा अडकून बसला, त्याचा इतर कुठेही प्रवास कसा झाला नाही ही बाब सगळ्यांसाठीच रहस्याची राहिली. घरी आल्यावर डॉ. योगेश खरेंकडे गेलो. ते म्हणाले, “मोठ्या दुखण्यातून उठलात. अवघड होतं सगळं. दोनच महिने होते तुमच्याकडे... पण निघालात बाहेर. आता काळजी नाही.” यावर मी त्यांना ‘म्युकर-रहस्य’ विचारलं. म्युकर डोळ्यांत किंवा मेंदूपर्यंत का पोहोचला नाही, हे कळणं आवश्यक होतंच. म्हटलं, “हा तुमच्या औषधांचा परिणाम असावा का? कारण गेल्या दोन महिन्यांत मी तुमचं सोडता इतर कुणाचंच, कुठलंच औषध घेतलेलं नाही. मला वाटतं तुमच्या औषधानेच ‘म्युकर’ला कवटीत रोखून धरलं असावं.” डॉ. खरे फक्त हसले. म्हणाले, “आपण क्रेडीट घेऊ नये, झाला तो चमत्कार मानावा आणि आता तब्येत चांगली करण्याकडे लक्ष द्यावं.” यशस्वी होऊनही काही माणसं किती सहज, नम्र राहतात.

याच दरम्यान अभयाचं लग्न ठरलं. चार महिन्यांचं उदास सावट दूर झालं. घरातलं वातावरण बदललं. मला मात्र अध्येमध्ये अंधारात चाचपडल्यासारखं व्हायचं. हा लेख लिहीत होतो, तेव्हा जाणवलं की, ‘डी’, ‘बी’, ‘यू’ , ‘व्ही’, ‘इ’, ‘सी’ ही इंग्रजी मुळाक्षरं अन् बरीचशी मराठी जोडाक्षरं यात गफलत होतेय. ‘अस्थी’ हा शब्द मला दिसायचा, पण लिहिता यायचा नाही. दुसरं म्हणजे, डोक्यात विचार फॉर्म झालेले असायचे, पण लिहायला लागलो की मध्येच ब्लँक व्हायचो. काहीच आठवायचं नाही. अशावेळी सुरुवातीला विलक्षण अस्वस्थता यायची. मग जिथे आठवण सांडली तिथून ... अशी टिंब-टिंब द्यायला लागलो. आठवेपर्यंत टिंब देत राहायची. एकदा टिंबाचं दीड पान हा उच्चांक झाला. मी हादरलो. डॉक्टरांशी बोललो तर कुणी ‘ब्रेन फॉगिंग’ म्हणाले, कुणी म्हणाले, ‘सराव करत राहा, येईल गाडी रूळावर’. शरीर इतक्या धक्क्यातून गेलंय, काहीतरी ‘साइड इफेक्ट’ होणारच. ‘सहा महिने लक्ष ठेवून राहा’, असा सल्लाही मिळाला. 

दुसरीकडे या पोसाकोनॉझोल गोळ्या आपला प्रभाव दाखवण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत असं कळलं. मळमळ, जळजळ, डोकेदुखी वगैरे वरवरचा त्रास होतो, आणि आत किडनी, लिव्हरवरही त्या परिणाम करतात, असं कळलं होतं. डिस्चार्जच्या वेळी हॉस्पिटलमधल्या खत्रूड चेहर्‍याच्या अन् पालीच्या पोटासारखा रंग असलेल्या एका डॉक्टरने मला तसं कुचक्या हसर्‍या चेहर्‍याने सांगितलं होतं. तो दोन हात दूर होता, शिवाय माझ्या भोवती लोक होते म्हणून... अन्यथा तिथेच त्याला त्याच्या या बोलण्याचा ‘साइड इफेक्ट’दाखवला असता! 

सुदैवाने मला गोळ्यांचा अजिबात त्रास झाला नाही. दर पंधरा दिवसांनी पोसाकोनॉझोलची रक्तातील पातळी तपासण्याचा डॉक्टरी सल्ला होता. तसंच महिन्यातून एकदा किडनी आणि लिव्हरची टेस्ट करायची होती. सर्व मर्यादेत होतं. रक्तातील पातळी कमी-अधिक व्हायची. डॉ. गायकवाडांना रिपोर्टस जायचे. मीही भेटायला जायचो. ते ‘ऑल वेल’ म्हणायचे. ‘तीन महिन्यांनी औषधं बंद करू’ असा त्यांनी निर्णय घेतला. त्या दिवसाची वाट बघू लागलो. दिवस मोजू लागलो. तर लक्षात आलं, मोजणंही गंडलं आहे. २२ नंतर २३चा आकडा यायच्या ऐवजी एकदम ३२च यायचं. काय होतंय कळायचं नाही. शेवटी ॥॥ अशा रेषा काढायचो आणि नवव्या रेषेनंतर १०ची आडवी रेषा ताणायचो. अशा कित्येक मजा मजा. 

आता तीन महिने झालेत. औषधं बंद झाली आहेत. आता पुढचे दोन महिने ‘बघण्याचे’ आहेत. ‘म्युकर’मामा कुठे लपून तर बसले नाहीत ना, याची तपासणी करत रहायची आहे. त्यासाठी पुन्हा एमआरआय. सारं ठीकठाक असेल तर मग ‘ऑपरेशन कवटी-जोड’साठी पुन्हा हॉस्पिटल! ‘तमाम उम्र का हिसाब मांगती है जिंदगी’ असं कुठल्याशा कवीने म्हटलं आहे, तेच हिशोब तर चुकते करतो आहे. 

तरीही निळं आकाश, सळसळणारा पिंपळ, खिडकीतून झेपावणारा गच्च लाल फुलांचा ट्युलिप आणि ‘हसीन’ नजाकतीत जुनी पानं झटकणारा बदाम, त्यावर फुदकणारे पक्षी आणि माझी घार रोज बघतो आणि वाटतं, ‘जिंदगी कितनी खुबसूरत है, आईये आप की जरूरत हैं।’

---------------------------------------------------------------------------------------------

अंक सर्वत्र उपलब्ध आहे.

अनुभव दिवाळी अंक खरेदीसाठी लिंक : https://www.bookganga.com/R/8FG5W
अनुभव दिवाळी अंकाची पीडीएफ खरेदी करण्यासाठी लिंक : https://anubhavmasik.myinstamojo.com/.../anubhav-diwali-2021

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८