एकनाथ आवाड एक वाघ माणूस : सुहास कुलकर्णी

एकनाथ आवाड एक वाघ माणूस :   सुहास कुलकर्णी


अनुभव मासिकातील एकनाथ आवाड यांच्यावरील लेख... 




अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेच्या विरोधात उभा ठाकलेला एक दणदणीत कार्यकर्ता म्हणजे एकनाथ आवाड. पोतराजाच्या भणंग मुलापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास जातिभेद आणि विषमतेशी अनेक अंगांनी लढत विस्तारत गेला. व्यक्तिगत उत्कर्षापलीकडे जाऊन त्यांनी हजारो कुटुंबांना त्यांच्या आयुष्यात स्थिरस्थावर केलं. २५ मे २०१५ रोजी त्यांचा हा प्रवास अकाली संपला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडून दाखवणारा लेख.

एकनाथ आवाड हा एक वाघ माणूस होता. या माणसाने त्याच्या वाट्याला आलेल्या जातिव्यवस्थेला नाकारलं, धुडकावलं, तिच्यावर हल्ला केला आणि तिला फाडून फेकून दिलं. या संघर्षातून त्याने स्वत:चं आणि स्वत:च्या कुटुंबाचं भविष्य तर बदलून टाकलंच, पण त्याला साथ देणार्‍या हजारो लोकांना एक नवं आयुष्य दिलं. जातिव्यवस्थेच्या चरकात चिडीचूप जुलूम सहन करत असलेल्या माणसांना तो नाकारण्याची हिंमत दिली, मार्ग दाखवला आणि त्यांचा लढा प्रस्थापितांचे हल्ले सहन करत यशस्वीही केला. २०१५ साली आटोपलेल्या साठ-पासष्ठ वर्षांच्या आयुष्यात एकनाथ आवाड यांनी ही किमया करून दाखवली. एका आयुष्यात एवढा मोठा पल्ला गाठलेली माणसं विरळाच.

१९९० च्या दशकात एकनाथ आवाड यांचं नाव कुठे कुठे ऐकू येऊ लागलं होतं. विशेषत: दलित चळवळीतल्या मित्रांकडून. ‘तिकडे बीडकडे एक तगडा कार्यकर्ता बेडरपणे काम करतोय. त्याला भेटा, त्याच्यावर लिहा,’ असं आम्हाला सांगितलं जात होतं. आमच्यापैकी एक-दोघं त्यांचा माग काढत मराठवाड्यात भेटायला गेले. त्यांच्याशी बोलले. त्यांचं म्हणणं समजून घेतलं. त्यांच्या कामाची पद्धत बघितली. आणि लक्षात आलं, हा एक ढाण्या वाघ आहे. याला महाराष्ट्रासमोर आणायला पाहिजे. मग आम्ही एक विस्तृत लेख लिहिला. निखिल वागळे यांनी तो ‘अक्षर’च्या दिवाळी अंकात छापला. ही गोष्ट १९९५ ची.

त्या लेखाचा तेव्हा बराच गाजावाजा झाला. अस्पृश्यता आणि जातिभेदाच्या भिंतींना जोरकस धडका मारणारा माणूस या लेखामुळे महाराष्ट्राला कळला. मराठवाड्यात तेव्हा जातिव्यवस्थेचा वेढा अगदी भक्कम होता. गावकीची कामं मान्य असोत अथवा नसोत, दलितांनी करायचीच, असा अलिखित कायदाच होता जणू. जातीला धरूनच व्यवसाय करणं, मेलेली ढोरं ओढणं, जत्रेत रेडा कापणं, गावातल्या जमीनदारांचा वेठबिगार बनून पिढ्यान्पिढ्या मजुरी करणं, मंदिरात-पाणवठ्यात प्रवेश नसणं, पिढ्यामागून पिढ्या पोतराजकी करणं, आणि दलितांना नाना प्रकारची अस्पृश्यतेची वागणूक देणं असं सर्रास चाललेलं होतं. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्नही भिजत पडलेला होता. शिवाय हे सगळं मान्य नसलेली अगदी साधी साधी बंडखोर माणसं निर्घृणपणे मारली जात होती. अशा सार्‍या विपरीत परिस्थितीत एकनाथभाऊ आणि त्यांचे कार्यकर्ते लढत होते. त्यांची लढाई स्वत:च्या अस्तित्वाची होती; स्वाभिमानाचीही होती. ती लढण्यासाठी त्यांनी जी साधनं विकसित केली होती, त्यात नावीन्य होतं. भारताची राज्यघटना आणि कायद्यातली कलमं वापरून अन्यायाला आळा घालण्याची आक्रमक पद्धत त्यांनी शोधून काढली होती.

त्यांच्या कामाला पुढे धुमारे फुटत गेले. ‘मानवी हक्क अभियान’ ही त्यांनी सुरू केलेली संघटना मराठवाडाभर गावाखेड्यात पोहचली. अस्पृश्यतेच्या प्रश्नावर गावोगावी संघर्ष झाले. गावातल्या सर्वसत्ताधीशांविरुद्ध बंडं झाली. त्यांना कायद्याचा इंगा दाखवला गेला. कायदे मोडले, कायदे हातात घेतले म्हणून त्यांच्यावर खटले भरले, शिक्षा झाल्या. ज्यांच्या हाती गावातील सत्तेची आणि त्यामुळे अन्यायाची सूत्रं होती, त्यांची नांगी मोडली. त्याद्वारे त्यांचा ताठा, तोरा नेस्तनाबूत केला गेला. गावोगावच्या अशा संघर्षाचे नायक अर्थातच एकनाथभाऊ आणि त्यांचे कार्यकर्ते होते.

पुढे एकनाथभाऊंनी वेठबिगार मुक्तीची चळवळ केली. ऊसतोड कामगारांच्या पाठीशी उभे राहिले. गायरान चळवळ सुरू केली. सरकारी पडीक जमिनीवर दावे दाखवायला सुरुवात केली. या चळवळीतून त्यांनी हजारो भूमिहीनांना कसण्यासाठी जमिनी मिळवून दिल्या. त्यांना जगण्याचा आधार मिळवून दिला. हाती आलेलं उत्पन्न सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कर्ज घेऊन छोटे छोटे उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी नॉनबँकिंग फायनान्स कंपनी काढली. पूर्वी अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातीतील लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याच धर्तीवर मातंग व भटक्या-विमुक्त समाजाला सोबत घेऊन बौद्धधर्म स्वीकारण्याची एक चळवळ उभी करण्याच्या कामात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं आणि आपल्या समर्थकांसह सामूहिक धर्मांतर केलं. असं बरंच काही.

त्यांचा हा प्रवास अचंबित करणारा होता. २००५-०६ साली आम्ही पुन्हा त्यांच्यावर लेख लिहिला. ‘खरेखुरे आयडॉल्स’ पुस्तकात त्याचा समावेश केला. त्यांच्या कामाचा आवाका आणि महत्त्व ओळखून त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित करायचं ठरवलं. या पुस्तकाच्या प्रक्रियेत एकनाथभाऊ आणखी जवळून बघायला आणि अनुभवायला मिळाले.

एकनाथभाऊंना सगळेजण ‘जिजा’ म्हणायचे. जिजा म्हणजे थोरला भाऊ. त्यांचे सगळे सोबती, कार्यकर्ते, गावोगावची माणसं-बाया त्यांना ‘जिजा’च म्हणायचे. त्यांचं ना आवाड साहेबांमध्ये रूपांतर झालं, ना एकनाथरावांमध्ये. ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत ‘जिजा’ राहिले. पण का माहीत नाही, मी त्यांना कधी ‘जिजा’ संबोधलं नाही. मी त्यांना ‘भाऊ’ म्हणत असे, आणि तेही मला ‘भाऊ’च म्हणत असत. बोलताना मात्र उच्चार ‘भाऽऽव’ असा करत. भाऊ म्हणण्याच्या त्यांच्या या लकबीची मोठी गंमत वाटे.

एकनाथभाऊ खरं तर एकदम रांगडा माणूस. कुठेही घुसणारा आणि दणकेबाज बोलणारा. पण पुस्तकाच्या चर्चेवेळी बर्‍याच वर्षांनंतर पहिल्यांदा भेटले, तेव्हा म्हणाले, ‘खरं सांगतो भाऽऽव, इतक्यांदा पुन्याला आलो, या तुमच्या ऑफिसच्या भोवती कित्तींदा चकरा मारल्या. पन ऑफिसात येऊन तुम्माला भेटण्याची हिम्मतच झाली नाही बघा!’ त्यांचं हे बोलणं ऐकून मी चकित झालो. गावोगावच्या जमीनदार, मालदार नि सावकारांना वठणीवर आणणारा आणि ‘अरे’ला ‘कारे’ करण्याची रग अंगी असलेला हा माणूस... असा कसा वागू शकतो! पोलिस चौकीत फोन करून त्यांचा मोठा साहेब असल्यासारखा आवाज लावणारा हा माणूस... इकडे असा मऊ कसा पडू शकतो! नंतर कधी त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारलं तर म्हणाले, ‘भाऊ, तुम्ही तेलगावला या. तिकडे तुम्हाला खरा जिजा भेटेल. तुमच्याकडे आले की जिजाचा आवाज बदलतो, भाषा बदलते, सगळंच बदलतं. हा खरा जिजा नव्हे.’

एकनाथभाऊंचं आयुष्य खरं तर एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षाही वरताण होतं. या माणसाला स्वत:ची जन्मतारीखच काय जन्मसालही माहीत नव्हतं. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या दुकडेगाव या बारक्याशा गावात एका पोतराजाच्या पोटी त्यांचा जन्म झाला. मरीआईची गाणी गात आणि लोकांचं शुभ चिंतत भीक मागणारी ही माणसं. तीही वंशपरंपरागत. त्यांनी दुसरा व्यवसाय करायचा नाही. पोतराजकी हीच त्यांची सुरक्षितता आणि तेच त्यांचं नशीब. लोकांनी दिलेल्या शिळ्या भाकरीवर कसंबसं जगायचं, हे त्यांचं जगणं. ‘अठरा विश्व दारिद्य्र’ हा घासून गुळगुळीत झालेला शब्दही शरमेने मान खाली घालेल, अशा अवस्थेत ही माणसं जगतात. जन्म मातंग समाजातला. एकनाथभाऊंच्या बालपणी सर्रास अस्पृश्यता पाळली जायची. जातिवाचक शिव्या सहजपणे दिल्या जायच्या. अगदी दलित जातींमध्येही आपापसांत श्रेष्ठ-कनिष्ठपणाची भावना होती. या सगळ्या काळाबद्दल भाऊ कमी बोलायचे. पण बोलले की त्यातली धग जाणवायची. अस्पृश्यता पाळणार्‍यांबद्दल तर ते तिडीकीने बोलायचेच, पण आपल्या माणसांबद्दल बोलतानाही त्यांचे शब्द कठोर होत. पण लगेच म्हणत, ‘पण भाऽऽव, आमची मान्सं वर्षानुवर्षांची गुलाम. ती तरी एका रातीत कशी उठून त्यांच्यासमोर उबी र्‍हानार!’

एकनाथभाऊ त्याच्या कुटुंबातला थोरला मुलगा. त्यामुळे परंपरेमुळे वडील यांनाच पोतराज बनवणार होते. पण आई-बहिणीने हट्ट धरला म्हणून तसं घडलं नाही. मुलाला शिकवायचं असं त्यांच्या आईच्या मनाने घेतलं होतं. त्यामुळे ते आधी जवळच्या कुप्पा नावाच्या गावातल्या शाळेत शिकले. पुढे मॅट्रिकपर्यंत जवळच्या लवूळ गावात. तिकडून कॉलेजात माजलगावला. वडिलांच्या पोतराजकीत मुलाचं शिक्षण कसं होणार! त्यामुळे पाय फुटल्यापासून काम करत चार पैसे मिळवतच ते शिकले. कधी शेळ्या पाळल्या, तर कधी लाकडं फोडली. कधी खड्डे खणले, तर कधी दोरखंड वळून बाजारात विकले. कधी ओझी उचलली, तर कधी मजुरी केली. मिळेल ते काम करत त्यांनी दिवस काढले. स्कॉलरशिपच्या पैशाने आई-वडिलांच्या संसाराला आधार दिला. कित्येक पिढ्यांमध्ये शिक्षणाचा गंध नसला तरी शिकत राहिले. ‘आईमुळे शिकू शकलो’ हे पालुपद त्यामुळेच त्यांच्या तोंडी असायचं. ‘तेव्हा कळत नव्हतं, पण नंतर अक्कल आल्यावर आईच्या मनात माझ्याविषयी काय स्वप्न होतं, ते कळलं’, असं भाऊ म्हणत. बोलता बोलता आई गात असे ती जात्यावरची ओवी म्हणून दाखवत.

भाऊंचा आवाज विनामाईकची भाषणं करून चांगलाच तगडा बनलेला होता. पण तो भरड झालेला नव्हता. दोस्तीत बोलत तेव्हा तर तो चक्क मंजूळ बने. किमान तसा वाटे तरी! आईची ओवी गाताना तर त्यांच्या लकबी देखील बदलत.

लिंब लोनी करीते, तुझ्या शाळंत येऊन

बाळ माझ्या एकनाथा, दाव अक्षरं लिहून

लिंब लोनी करीते, तुझ्या शाळंच्या वाटंला

बाळ माझा एकनाथा, वाघ जनू जाळीतून सुटला

ही ओवी म्हणताना भाऊंचा आवाज भरून यायचा. म्हणायचे, ‘भाऽऽव, आपलं पोरगं जाळीतून सुटलेला वाघ आहे, हे तिला तेव्हाच कळलं होतं पहा.’

आईची आठवणारी दुसरी ओळी म्हणताना तर भाऊंचा चेहरा बदलून जाई.

दहाची पंचाईत माझ्या ऐकल्यानं केली

बाळ माझ्या एकनाथानं सभा सावलीला न्हेली

भाऊ या ओवीचा संदर्भ सांगत. दहाची पंचाईत ऐकल्याने केली, म्हणजे जिथे दहा पंच बसून न्याय करतात, तिथे एकट्या लेकानेच न्यायाचा झेंडा हाती घेतला. सभा सावलीला नेली म्हणजे सगळ्यांना सावली मिळवून दिली, सगळ्यांना न्याय मिळवून दिला.

पहिली ओवी भाऊ शाळेत शिकत असतानाची आणि दुसरी ओवी भाऊ तरुणपणी गावोगावी न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत होते तेव्हाची.

भाऊंचा आईवर विशेष जीव. तिच्यामुळे आपलं आयुष्य बदललं याची जाणीव त्यामागे असणार. तुलनेने त्यांचे वडील प्रवाहपतित. आपल्या मुलाने पोतराज व्हावं आणि संसाराला आधार द्यावा, एवढीच त्यांची मुलाकडून अपेक्षा. वडील पोतराज बनून रस्तोरस्ती फिरायचे तेव्हा ते जे म्हणत, त्याचीही भाऊ नक्कल करून दाखवत. ‘जय लकापती लक्ष्मी, एकाचे एक व्हव दे. पाचाचे पन्नास व्हव दे. वेल मांडवाला जाव दे. गायी-गोधनानी वाडे भरू दे...’ एवढा सगळा आशीर्वाद चांगल्या उंच आवाजात एका दमात म्हणून दाखवत.

एकदा भाऊ वडिलांना म्हणाले, ‘बाबा, तू एवढे आशीर्वाद मागतोस मरीआई कडे... पण तुझं आयुष्य असं का?’ हा विचार भाऊंना तरुण असताना सुचला आणि त्यांना अस्वस्थ करून टाकू लागला. जातीची गुलामी त्यांना अगदी नको वाटू लागली. वडिलांच्या डोक्यावरचा तो हळदीकुंकवाने माखलेला बुचडा, त्यांचं अंगात येणं, घुमता घुमता दाताने लिंब फोडणं, कोंबडीच्या जिवंत पिलाची मान दातात धरून हिसक्याने धडावेगळी करणं... आणि तेही सगळं जातीच्या नावावर... हे सगळं भाऊंना नको झालं होतं. एक दिवस त्यांनी वडिलांना पटवून त्यांचा बुचडा कापून टाकला आणि वडिलांसह येणार्‍या पिढ्यांना पोतराजकीतून मुक्त करून टाकलं.

घरचाच पोतराज कातरल्यामुळे नंतर एकनाथभाऊंनी गावातल्या सगळ्याच पोतराजांना केस काढायला लावले. पुढे त्यातून पोतराजमुक्तीची चळवळच उभारली आणि गावोगावचे पोतराज माणसांत आणले. भाऊंनी ऐन तरुणपणी जे अनेक उद्योग चालवले होते, ते सांगायचे तर खूप लिहावं लागेल. त्याऐवजी वाचकांनी भाऊंचं ‘जग बदल घालुनि घाव’ हे आत्मचरित्र वाचावं. भाऊंमधील वाघाचं संपूर्ण दर्शन त्या पुस्तकातून होईल.

या पुस्तकाची रूपरेषा ठरवताना आणि ते रचताना त्यांच्या आयुष्याची एक झलक आम्हाला माहीत असण्याची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांना किल्ली मारावी लागे. सुरुवातीला ते थोडे अडखळत, पण नंतर एकेक प्रसंग रंगवून रंगवून सांगत. चळवळीतले सोबती मिळण्याच्या आधीच्या काळात भाऊंचा एकट्यानेच संघर्ष चालला होता. ते प्रसंग स्वत:च्या आठवणीच्या भरवश्यावर सांगत. पण नंतरचे प्रसंग सोबतच्या कार्यकर्त्याची साक्ष काढत सांगत. त्यांचे हे किस्से ऐकले की सर्वस्वी परावलंबी जीवन जगणार्‍या पोतराजाच्या घरात इतक्या स्वतंत्र विचारांचा माणूस कसा जन्मला आणि असा अजब कसा घडला, असं वाटून जाई.

ज्या प्रथा शेकडो वर्षं चालत आलेल्या आहेत, त्या मोडण्याचा विचार आणि धाडस भाऊंमध्ये शाळकरी वयातच कसं आलं असेल, हा प्रश्न मला कित्येक वर्षं पडत आलेला आहे. गावात मेलेलं जनावर विशिष्ट जातीच्या माणसांनी ओढत न्यायचं आणि त्याची विल्हेवाट लावायची, असं जातिप्रथेच्या आधारे रुढ झालेलं असताना भाऊंनी त्याला त्या वयात नकार का दिला असावा? गावात मरून पडलेल्या ढोराला शिजवून खाण्याची वेळ गरीबीपायी आणि भुकेपायी काही लोकांवर येई. पण असं वंगाळ खाऊ नये असं भाऊंना त्या वयात कसं सुचलं असावं? तसं खाणार्‍या मित्रांना त्यापासून परावृत्त करण्याचा विचार भाऊंमध्ये कसा आला असावा? अशीच एक प्रथा चालू होती ‘कारन’ करण्याची. म्हणजे गावच्या जत्रेत रेडा कापून देण्याची. हे कामही विशिष्ट जातींनी करणं बंधनकारक असे. पण जातिव्यवस्थेने बंधनकारक केलेलं प्रत्येक अपमानकारक काम भिरकावून देण्याचा निखारा भाऊंमध्ये सुरुवातीपासून होता. हा कुठून आला असेल? गावात जातीच्या आणि विशेषत: अस्पृश्यतेच्या अंगाने कुणावरही अन्याय होत असेल, तर भाऊ सगळं भान विसरून त्यात उतरत आणि येनकेन प्रकारे न्याय मिळवून देत. ही शक्ती त्यांच्यामध्ये कुठून आली असेल?

जातिआधारित अन्यायाला रोखायचं तर गावातलं राजकारण बदलावं लागेल, असं सुचणं हेही अचंबित करणारंच. पण वर्षानुवर्षं घडी बसलेलं राजकारण असं सहजी बदलू शकत नसतं. अनेकांचे हितसंबंध आणि नेतृत्व स्वीकारायची सक्ती यातून ही घडी तयार झालेली असते. ही घडी विस्कटण्याची शक्कल शाळावयातच भाऊंनी लढवली होती. गावच्या जुलमी पाटलाची सत्ता संपवायची तर ते एखाद्याच्या बळावर शक्य नसतं. म्हणून भाऊंनी गावातल्या दुसर्‍या एका जातीच्या माणसाला उभं केलं नि त्याच्या पाठीशी मुस्लिम, मातंग आणि इतर गरीब जातींची जूट केली. अशी समीकरणं गेल्या पंचवीस-तीस वर्षांत जुळवली जाताना आपण बघतो आहोत. पण प्रस्थापित सत्तेला आव्हान द्यायचं तर अशी काहीतरी जुळणी करावी लागेल, ही गोष्ट भाऊंना त्याच्या बरीच आधी कळली होती.

राजकारणाप्रमाणेच कायद्याचा वापर आपल्या हक्कांसाठी करण्याची जाणीवही भाऊंमध्ये फार सुरुवातीपासून होती. दोन-तीन उदाहरणं बघण्यासारखी आहेत. भाऊ तेव्हा जेमतेम मॅट्रिक झाले होते. गावचा पाटील त्यांना सतत त्यांच्या जातीची आणि अस्पृश्यतेची जाणीव करून देत होता. त्यावरून दोघांची जुंपली, हमरीतुमरी झाली. पाटलाने हात उगारला, शिव्या दिल्या. एवढं सारं झाल्यावर भाऊ पोलिसात गेले, त्याच्याविरुद्ध तक्रार केली आणि खटला चालवला.

याच्या वरताण आणखी एक घटना आहे. जवळच्या एका गावात दलित आणि सवर्णांचे स्वतंत्र पाणवठे होते. ही व्यवस्था अर्थातच बेकायदेशीर होती. सवर्णांच्या पाणवठ्यावरून दलितांनी पाणी नेण्याचा प्रयत्न केला म्हणून दोन गटांत हाणामारी झाली. दलित वस्तीवर बहिष्कार टाकला गेला. हा सगळा अस्पृश्यता पाळण्याचाच प्रकार होता. भाऊ या प्रकरणात उतरले. त्यांनी गावातल्या सगळ्या दलितांची मोट बांधली आणि संबंधितांवर केस केली. या प्रकरणात गावच्या पाटलाला सात वर्षांची शिक्षा झाली.

गोरगरिबांसाठीचं रेशनवर येणारं धान्य बाजारात विकून टाकलं जातं आणि त्यामुळे लोक गावात हक्काच्या अन्नापासून वंचित राहतात, म्हणून भाऊंनी सरळ तहसीलदाराकडे तक्रार केली होती. तहसीलदाराला गावात यावं लागलं, चौकशी करावी लागली आणि दुकानदारावर कारवाई करावी लागली. हा दुकानदारही गावातल्या राजकारणातला गड्डा होता. इथे भाऊंचा हल्ला दुहेरी होता.

ही सगळी समज, हक्कांची जाणीव, शासकीय यंत्रणेची माहिती, कायद्याचं ज्ञान हे सगळं भाऊंना त्या बीड जिल्ह्यातल्या दुर्लक्षित गावातल्या दुर्लक्षित घरात कसं काय होतं, याचं खरोखर आश्चर्य वाटतं. त्यामुळे भाऊंची जेव्हा जेव्हा भेट होई, तेव्हा हटकून हा विषय निघे आणि मी याचं खोदकाम सुरू करे. अन्यायाविरुद्धची चीड ही भाऊंमध्ये उपजत होती. पण पुढे जसं ते वाचू लागले, तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पूर्वीच्या काळी कम्युनिस्टांविषयी जसा ओढा असे, तसा तो त्यांनाही वाटला होता. त्यांच्या कार्यपद्धतीत आक्रमकता होती. व्यवस्थेने उभं रहायलाही जागा ठेवलेली नाही, या चिडीतून ती आली असावी. शिवाय व्यवस्थेतली माणसं जेव्हा स्वत:च कायदा पाळत नाहीत, तिथे दणके देण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत. आणि कायद्याचा उपयोग करून ते दणके देतही. पण त्यांनी स्वत:ला कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊ दिलं नाही हेही खरं. त्यांचा एकूण प्रवास बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रकाशात झाल्याने त्यांच्यात हा बदल झाला असावा. पण त्याचवेळीस हेही खरं की एरवी आंबेडकरवादी कार्यकर्ते जसे गांधीविरोधी असतात, तसे भाऊ नव्हते. गांधीजींची ‘पुणे करारा’वेळची भूमिका भाऊंना अजिबातच मान्य नव्हती. पण म्हणून गांधीजी हे त्यांना कधी शत्रू वगैरे वाटले नाहीत. माझं त्यांच्याशी याबद्दल बोलणं होई. ते एकदा म्हणाले, ‘गांधींचं उपोषण वगैरे त्यांच्यासाठी ठीक होतं हो! पण आम्ही आयुष्यभर उपाशी मरतो. आम्ही आंदोलन म्हणूनही उपाशीच रहायचं, हे कसं शक्य आहे! आम्ही खाऊन पिऊनच आंदोलन करणार!’ भाऊंचा गांधींवरील आक्षेप हा असा व्यावहारिक असावा.

सगळं बालपण भुकेने खाऊन टाकलेलं असलं, तरी भुकेच्या आगीत भाऊंमधली जिद्द जळून गेली नाही. उलट ती आणखी बळकट बनली. मांजराला चहूबाजूंनी कोंडलं की शेवटी ते जसं चवताळून हल्ला करतं, तसं भाऊंचं झालं. भाऊ तर साक्षात वाघ. त्यांना त्या दिवसांमध्ये साथ मिळाली ती दलित पँथरच्या वाघांची. या वाघांनी त्या काळी गावागावात आंदोलनं केली, पाणवठे खुले केले, मंदिरं खुली केली, गावोगावच्या दलितांना एकवटत सार्वजनिकरीत्या आंबेडकर जयंती साजरी केली, दलित अत्याचारांविरुद्ध खटले चालवले, नामांतर चळवळीत भाग घेतला. जातिव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी जे जे करायचं, ते सारं केलं. ‘भाऽऽव, तुम्हाला सांगतो, माझी एक थिअरी आहे...’ असं म्हणत भाऊ एकदम संशोधकाच्या भूमिकेत जात. म्हणत, ‘जिथल्या लोकांनी आमच्यासोबत गावाशी झगडा केला, त्या गावांमधली अस्पृश्यता संपली. तिथे आता कुणी कुणाशी जातीवरून वेगळं वागू शकत नाही. पण जी गावं तेव्हा डरली आणि संघर्षात उतरली नाहीत, ती अजूनही जातीय द्वेषाला बळी पडत आहेत. या गावातून जोवर तरुण पोरं उभी राहून गावची सत्ता धुडकावत नाहीत, तोवर इथे बदल होणार नाही.’

भाऊंचं बोलणं कधीच हवेतलं नसे. १९९० मध्ये ‘मानवी हक्क अभियान’ नावाची संघटना स्थापन केल्यानंतर त्यांनी तेलगाव या छोट्याशा गावाजवळ एक कॅम्पस उभं केलं. तिथे या सर्व लढ्यांचे दस्तावेज गोळा केले. पुढे अनेक अभ्यासकांनी या लढ्यांचा अभ्यास केला. भाऊ छाती फुगवून अभिमानाने म्हणत, ‘आमच्या कामावर चार-पाच पुस्तकं लिहिली गेलीत आणि पंधरा-वीस डॉक्टरेट झाल्यात.’

भाऊंचं आयुष्य सिनेमासारखंच होतं असं म्हटलं ते म्हणूनच. ज्या माणसाला खायला दोन घास मिळत नव्हते आणि जो मजुरी करून शिकला, पुढे एमए झाला, एमएसडब्ल्यू झाला, एलएलबी करून वकील झाला. त्याने पुढे ठाणे जिल्ह्यात जाऊन विवेक आणि विद्युल्लता पंडित यांच्यासोबत आदिवासी वेठबिगारी मोडून काढण्याचं काम केलं. नंतर मराठवाड्यात परतल्यावर ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी वस्ती शाळा चालवल्या, मजुरांच्या युनियन्स बांधल्या, भूमिहीनांना गायरान जमिनी मिळवून देण्याचं अभियान छेडलं. काही संघटनांच्या समन्वयातून सुमारे ७० हजार हेक्टर जमिनीसाठी लढा उभारला. अडीच लाख दलित कुटुंबांपैकी पन्नासेक हजार कुटुंबांना जमिनीवर ताबा मिळवून दिला आणि कायदेशीर प्रक्रिया चालू केली. एवढंच काय परदेशात जाऊन युनो आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर जाऊन भारतातील दलितांच्या वतीने जोरकसपणे भूमिका वगैरेही मांडली. एका माणसाच्या आयुष्यात एवढं सारं घडलेला माणूस खरोखरच विरळा. त्यामुळे भाऊ माझ्यासमोर असले की मला गहिवरून जायला होत असे आणि त्यांना ‘प्यार की एक झप्पी’ दिल्याशिवाय आमची भेट संपत नसे.

प्रस्थापित व्यवस्थेला एखादा माणूस आपल्या फौजफाट्यासह धक्के देतो, तेव्हा त्याच्या जिवावर माणसं उठतातच. असे छोटे-मोठे प्रसंग भाऊंच्या आयुष्यात अनेक आले. ज्या लोकांच्या भल्यासाठी ते काम करत होते, त्यातल्याच लोकांना फितवून त्यांच्यावर हल्ले केले गेले. हे हल्ले अर्थातच जीवघेणे होते. भाऊंच्या अफाट कामामुळे आणि त्यातून त्यांना मिळणार्‍या समर्थनामुळे प्रस्थापित राजकारणीही त्यांच्यावर दात खाऊन असत. एका निवडणुकीत भाऊंच्या प्रभावामुळे एक मंत्री पराभूत झाला, म्हणून त्याने भाऊंवर हल्ला घडवून आणला म्हणे. या हल्ल्यात भाऊंवर एका गुंड टोळक्याने तलवारीने वार केले. प्रसंगावधान राखून कितीही बचाव केला, तरी त्यांचा कान, नाक, छाती आणि पाठीवर तलवारी सपासप चालल्या. या प्राणघातक हल्ल्यातून भाऊ बचावले खरे, पण तेव्हापासून त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचं संरक्षक कडं वावरू लागलं. ते ऑफिसमध्ये भेटायला येत, तेव्हाही त्यांच्या खिशात किंवा पिशवीत परवानाधारक पिस्तुल सोबत असे. ‘पिस्तुल दाखवा’, असं गंमतीने म्हटलं तरी कधी दाखवत नसत. ‘ते पिस्तुल तुमच्यासाठी नाही भाऽऽव! ज्याच्यासाठी आहे त्याला मात्र नक्की दाखवेन’ असं गोड हसून म्हणत.

भाऊंचं दिसणं तसं राकट. चांगला धिप्पाड देह. रंग पक्का काळा. चेहर्‍याभोवती पांढर्‍या फेक केसांचं जंगलं आणि एकमेकांत मिसळून गेलेल्या मोठ्याच्या मोठ्या दाढी नि मिशा. पांढरा लांब झब्बा आणि निमुळता होत जाणारा पायजमा. हिवाळ्यात अंगावर बटणबंद जाकीट. खांद्यावर टिपिकल मल्टिपर्पज मराठवाडी उपरणं. कार्यक्रम वगैरे असेल तर उपरण्याची जागा लाल-निळी रंगीत शाल घेत असे. याहून वेगळ्या पेहरावात भाऊंना मी पाहिलं नाही. त्यांचं बोलणं दणदणीत. आवाज खणखणीत. पण एखाद्या सभेत बोलणारे किंवा पोलिसांना कायद्याचे धडे देणारे भाऊ वेगळे, नि खासगीत दोस्तांच्या मैफिलितले भाऊ वेगळे. गप्पांमध्ये भाऊ गोड हसत, गोड बोलत. त्यांचा आवाज अगदी मऊ झालेला असे. पुढचा माणूस बोल लागला, की अगदी मन लावून ऐकत. पटलं तर पूरक बोलत. हे अगदी सहज सहज. मान तिरकी करून बोलण्याची त्यांची शैली. आणि बोलताना ‘बरं का भाऊ...’, ‘भाऊला सगळं माहीत आहे...’, ‘भाऊ होते ना तेव्हा...’, असं जवळीक साधणं. अगदी मन:पूर्वक. ‘भाऽऽव, कुठल्याही कारणानं तुम्हाला कुणी हात लावला, तर अर्ध्या रातीत हा जिजा तुमच्यासाठी धावून येईल...” अशी मनमोकळी दिलदार वाणी.

भाऊंसोबतच्या गप्पांच्या फडात आठवणी, किस्से, गंमतीजमती वगैरे तर असतच, पण महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एरवी बाहेर न कळणार्‍या बातम्याही असत. कोण कुणाला भेटलं, कुणी कुणाला काय सांगितलं, त्यातून कशी चक्र फिरली वगैरे त्यांना बरंच माहीत असायचं. विशेषत: मराठवाड्यातल्या मंत्र्या-संत्र्यांबद्दल नि आमदार वगैरे जमातीबद्दल ते मौलिक माहिती बाळगून असायचे. ‘भाऊ, तुम्हाला सांगतो... वरून दिसतं तसं नसतं या लोकांचं...’ असा कानमंत्र देत विरोधी आणि सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांची आपापसात कशी देवाणघेवाण चालते वगैरे उदाहरणांनिशी सांगायचे. विश्वास बसणार नाही अशी माहिती त्यात असे.

मी अनेक वर्षं देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर लिहीत आलोय. त्यामुळे त्या अनुषंगाने वाचत राहणं आणि समजून घेत राहणं, हे ओघानेच आलं. पण माझं प्रशिक्षण राज्याची राजकीय प्रक्रिया समजून घेण्याचं झालं होतं. राजकीय पक्ष, त्यांची विचारसरणी, त्यांची निवडणुकांतील कामगिरी, त्यांचं राज्यपातळीवरील आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व, त्या नेत्यांनी बांधलेले मतदारसंघ, त्यासाठी केली जाणारी विकासकामं अशा रीतीने अभ्यास केला जाई. पक्षांमधल्या गटबाज्या आणि एकमेकांवरच्या कुरघोडी वगैरे माहीत होत्या. पण भाऊंचं बोलणं ऐकून स्थानिक पातळीवर त्या किती प्रभावी ठरतात, हे कळू लागलं. आपल्या प्रभाव क्षेत्रातील (किंवा जातीची) मतं दुसर्‍या मतदारसंघातील विरोधी पक्षाच्या उमेदवाराला देऊन त्याच्या बदल्यात त्याच्या प्रभावक्षेत्रातील मतं आपल्याला मिळवण्याचे जुगाड कसे जुळवले जातात, हे त्यांच्याकडून मला लख्खं कळलं. एरवी ज्या दोन जातींचे हितसंबंध एकमेकांविरोधात मानले जातात, त्या जाती आपापल्या नेत्यांच्या आदेशावरून कशा मतदान करतात, हे त्यांच्यामुळे समजलं. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख या दोन परस्परविरोधी पक्षांतील प्रतिस्पर्धी नेत्यांचं स्थानिक पातळीवरील राजकारण कसं घडतं नि उलगडतं, हे कळलं तेव्हा तर मला दिव्यदृष्टी प्राप्त झाल्यासारखं वाटलं होतं.

भाऊ हे मूळचे दलित पँथर या जहाल राजकीय, सामाजिक चळवळीचे महत्त्वाचे पाईक. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील ही निसरडी अवस्था बरोबर हेरली. शरद पवारांच्या राजकारणाचा चेहरा पुरोगामी होता. त्यांची नामांतर चळवळ आणि एकूणच दलित चळवळीला सहानुभूती होती. त्यामुळे भाऊ त्यांना धरून होते. त्यांनी पवारांना कार्यक्रमाला, सभेला वगैरे बोलावलं होतं. पुढे राष्ट्रीय राजकारणात आणि राज्याच्या राजकारणातही निसरडी परिस्थिती पाहून त्यांनी १९९६ साली थेट लोकसभेची निवडणूक लढवली. भाऊंचा कांशीराम या उत्तरेतील बड्या बहुजन नेत्यांशी संपर्क होता. त्यांच्या सांगण्यावरून ते निवडणुकीला उभे राहिले. निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे; प्रस्थापितांना सत्तेवरून खेचण्यासाठी लढ, असं कांशीराम यांनी भाऊंना सांगितलं होतं. भाऊ लढले आणि त्यांना मिळालेली मतं निर्णायक ठरली. पुढे हेच सूत्र धरून भाऊंनी बीडसह मराठवाड्यातील आसपासच्या जिल्ह्यात स्वत:ची ताकद उभी केली. ही ताकद निवडून येण्याएवढी नव्हती, पण उमेदवार पाडण्याएवढी नक्कीच होती. त्यातून भाऊंनी स्वत:चा राजकीय वचक तयार केला. दलित, वंचित, गरीब घटकांना राजकारणात जी स्पेसच शिल्लक नव्हती, ती कशी मिळवायची याची एक पद्धतच भाऊंनी शोधून काढली. त्याच्या बळावरच त्यांनी आपली पत्नी गयाबाई यांना जिल्हा परिषदेत निवडून आणलं, सभापती बनवलं, गरिबांच्या विकासाची कामं करण्याची वाट

खुली करून दिली. भाऊंचा हा राजकीय प्रवास माझं नव्याने राजकीय प्रशिक्षण करणारा होता.

भाऊंच्या पुस्तकाचं काम चालू असताना तर त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी कळत गेल्या. सुमारे एक वर्षभर पुस्तकाच्या लिखाणाचं काम चाललं होतं. माझा सहकारी प्रशांत खुंटे शब्दांकन करत होता. तो चार-सहा महिने त्यांच्याकडेच जाऊन राहिला. त्यांच्याशी बोलला, सगळी माहिती मिळवली. भाऊंना सोबत घेऊन त्या संपूर्ण परिसरात गावोगावी फिरला. भाऊंचं आयुष्य ज्यांच्यासोबत गेलं होतं, त्यांना भेटला. त्यांच्याकडून आठवणी मिळवल्या. लोक ज्या भाषेत त्यांच्या ‘जिजा’बद्दल बोलत, ते ऐकून हरखला. ‘जिजा, तुझ्यामुळं आमचं संसार उभं रायलं बग. वावर पिकवायला मिळालं, पोराला साळंत धाडायला आलं. साजर्‍या घरात राहायला मिळालं... दगडाच्या देवानी आमच्यासाठी काय केलंय जिजा? आम्हास्नी माय बापाच्या वरचा सहारा तू आहेस बाबा...’ असं बोलणारे लोक त्याने बघितले. ‘जिजा होता म्हणून आमचं जगणं बदललं’ असं लोक सहजपणे म्हणत, तेव्हा जिजांचाही ऊर भरून येत असे. आपल्या कामामुळे हजारो माणसांचं जगणं बदललं याचा त्यांना अभिमान होता आणि तीच त्यांच्या जगण्याची उर्जा होती.

लोकांच्या मनात अशी जागा पटकावलेला जिजा... पण मी त्यांचे फोटो वगैरे काढू लागलो, की अवघडून जात असे. त्यांचे लुकलुकणारे डोळे आणि चेहर्‍यावरचं राकट सौंदर्य गोठून जात असे. त्यांना बोलताही येत नसे. ‘भाऊ, तुम्ही बोला निवांत. त्याशिवाय फोटो चांगले येणार नाहीत’ असं म्हटलं, की रेटून बोलण्याचा प्रयत्न करत. तेव्हा त्यांचं बोलणं-वागणं-हातवारे सगळं औपचारिक होऊन जाई. एकदा निखिल वागळेंनी टीव्हीसाठी त्यांची मोठी दोन तासांची मुलाखत घेतली होती. तेव्हाही ते असेच अवघडून गेले होते. त्यांना म्हटलं, ‘का गडबड करत होतात कॅमेर्‍यासमोर?’ तर म्हणाले, ‘भाऊ, मी रस्त्यावरचा माणूस. लोकांमध्ये राहणारा. हे टीव्ही, मुलाखत वगैरे आपल्याला जमत नाय बगा.’

पुस्तक लिहून तयार झाल्यावर पुस्तकाला प्रस्तावना असावी, अशी चर्चा सुरू झाली. आम्ही मिळून साताठ नावं काढली. मागच्या पिढीतले दलित लेखक, अभ्यासक, विचारवंत, संपादक अशी. पण भाऊंना कुणी पटेना. ‘याचं माझ्याशी जुळत नाही’, ‘याला मी एकदा चांगलं खडसावलं होतं’, ‘याला आपल्या कामाचं मोल नाही’, ‘हा आपल्याजागी थोर आहे, पण जमिनीवरचं वास्तव कळत नाही...’ अशी एक ना अनेक कारणं देऊन त्यांनी सगळी नावं नाकारली. मग मला म्हणाले, ‘भाऊ, एक रिक्विस्ट करतो तुम्हाला..’ मी म्हटलं, ‘रिक्वेस्ट कसली... आणखी कुणाचं नाव असेल तर सांगा. आपण तुमच्या पुस्तकासाठी नक्की मिळवू प्रस्तावना.’ भाऊ ट्रेडमार्क हसले. म्हणाले, ‘भाऽऽव, तुम्हीच लिहा प्रस्तावना.’ मी उडालोच. त्यांना म्हटलं, ‘तुमच्या कामाचं मोल मला पक्कं माहीत आहे. पण

तुमच्यासारख्या झुंजार आयुष्य जगलेल्या निडर माणसाबद्दल लिहायला कुणी तेवढ्याच ताकदीचा माणूस पाहिजे. माझ्यासारख्याचं काम नव्हे हे.’

माझं बोलणं ऐकून भाऊ खणखणीत हसले. मी काय म्हणतोय ते त्यांना नीट कळलं होतं. म्हणाले, ‘आता जास्त बोलायला लावू नका. मी आपल्याच धुंदीत काम करत होतो, तेव्हा मला धुंडत तुम्ही माझ्याकडे आलात. माझ्यावर लिहिलंत. माझी ओळख महाराष्ट्राला करून दिली. आताही तुम्ही पुन्हा माझ्याकडे आलात. माझं पुस्तक लिहिलंत. नाहीतर मी आपला माझं काम करत राहिलो असतो. लोकांपर्यंत काही गेलंच नसतं. प्रस्तावना लिहिण्याचा हक्क तुमचाच. लिहाच तुम्ही!’

आमच्या दोघांत वयाचं अंतर पंधरा-सतरा वर्षांचं त्यांचं सगळं आयुष्य संघर्षशील. सर्वस्वी असुरक्षित. मी त्यांच्यापुढे कुणी म्हणजे कुणीच नाही. पण भाऊंचं नि माझं प्रेमप्रकरण असं, की त्या प्रेमाचा भाग म्हणून मी प्रस्तावना लिहिली. त्यात वर ‘आणखी कुणापेक्षा तुमची प्रस्तावनाच चांगली झाली भाऊ!’ असं प्रत्येक भेटीत म्हणत म्हणजे म्हणतच. हे पुस्तक दलित आत्मचरित्रांची झालेली कोंडी फोडणारं, नवी दिशा देणारं आहे, हे माझं म्हणणं त्यांना विशेष आवडलं होतं.

आपलं पुस्तक पुण्याच्या प्रकाशकाने छापलं, याचंही त्यांना मोठं कौतुक होतं. पुण्या-मुंबईत त्या पुस्तकाचं स्वागत झाल्याने ते हरखलेही. एकदा त्यांचा फोन आला. तेव्हा ते अकोला जिल्ह्यातल्या कुठल्याश्या दूरच्या खेड्यात दलित चळवळीतील एका तळमळीच्या शिक्षकाला स्वत:चं पुस्तक भेट द्यायला गेले होते. तिथून त्यांचा फोन. एकदम एक्साईट होऊन. म्हणाले, ‘भाऽऽव, मी पार एका खबदाड्यातल्या गावात आलोय. ज्यांच्याकडे आलोय, त्यांना पुस्तक दिलं, तर त्यांनी हे पुस्तक आधीच घेतलंय. शिवाय भाऽऽव, आतल्या खोलीत एका कपाटात ‘समकालीन’ची सगळी पुस्तकं रांगेने ठेवलीत.’

आपलं पुस्तक दूरदूरच्या गावांमध्ये पोचलंय आणि लोक वाचताहेत याने ते आनंदून जात. त्यांच्या पुस्तकाचं रीतीप्रमाणे एकच एक प्रकाशन झालं नाही. गावोगावी प्रकाशनं झाली. पाठोपाठ पुरस्कार मिळू लागले. ‘भाऽऽव, आपल्याला आणखी एक पुरस्कार मिळाला’ असं ते खुशीने कळवत. (ही खुशी आपलं काम, आपली चळवळ लोकांपर्यंत पोहचतीए, तिला समाज मान्यता मिळतीय, याचीही होती.) एका वर्षात पुस्तकाच्या तीन आवृत्त्या निघाल्या आणि पुढेही निघत राहिल्या. त्यामुळे पुस्तकामुळे मिळायचा तो सर्व आनंद त्यांना मिळाला, याचं माझ्या मनातलं सुख वेगळंच आहे.

पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरही त्यांचं येणं-जाणं चालू राहिलं. कुठल्यातरी पुरस्काराची नाहीतर कशाची बातमी ते घेऊन आलेले असत. ‘भाऽऽव, आज शेलेब्रेट करायचं. चांगलं हाटेल शोधा. पार्टी करायची आज’ असं म्हणत रात्रीच्या जेवणाचं बुकींग करत. आम्हाला आग्रहाने जेवायला लावत, स्वत: अगदी मोजकं खात. पण गप्पांचा मात्र दणकट फड लावत. हा सगळा उपक्रम भाऊ पुण्यात आले की होणार म्हणजे होणारच. असेच एकदा ते आले, म्हणाले, ‘रातच्याला जेवायला जायचं.’ पुस्तक आल्यामुळे काय करू न काय नको, असं त्यांना झालं होतं. जेवताना म्हणाले, ‘भाऊ, तुम्ही इतकी वर्षं चांगलं काम करताय. तुमच्यासाठी मला काही तरी मोठं करायचंय.’ मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही लोकांसाठी खूप काम केलंय. त्यात आमचं ओझं घेऊ नका.’ मग म्हणाले, ‘तुम्ही वेळ काढून चार दिवस तेलगावला या. तुम्माला मस्त मटण-भाकरी चारतो. तिथे ठरवू तुमच्यासाठी काय करायचं ते!’

पुस्तक आलं २०११ मध्ये. दोन-तीन वर्षांमध्येच त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. मधुमेह बळावला. फ्रोजन शोल्डर त्रास देऊ लागला. पोटाचं दुखणं आधीपासूनच होतं बहुतेक. ते डोकं वर काढू लागलं. पुण्यात डॉक्टर शोधून उपचारासाठी येत. कधी पत्नी गयाबाईंसोबत भेटायला येत. त्यांच्यासमोर तब्येतीबद्दल बोलत नसत, पण एकटे असले की ‘जरा असं होतंय, जरा तसं होतंय’ म्हणत. हे बोलताना त्यांचा चेहरा अगदी कसनुसा झालेला असे. अनलाइक भाऊ! ‘हे आजार फिजार आपल्याला माइतच नाय ना भाऽऽव... आयुष्यभर असाच उंडारलो पण कधी कशाचा त्रासच नाही. पण आत्ताच हे खेंगटं मागं लागलं ना... ’ असं उदासपणे म्हणत. काहीतरी करून तब्येतीला आराम पडायला हवा, या इच्छेपायी हा हाडाचा आंबेडकरी माणूस गांधीवादी आश्रमात अंगाला ओली माती लावून निसर्गोपचारही करून घ्यायलाही गेला.

म्हणायचे, ‘भाऊ, आपल्याला मृत्यू हॉस्पिटलच्या बेडवर नको आहे. गोळ्या-औषधांच्या जिवावर आपल्याला जगायला नको आहे. रस्त्यावरची लढाई मी लढत आलो. लढतानाच मरण पायजे आहे.’ पण तसं झालं नाही. घरी असताना त्यांची तब्येत बिघडली. धावपळ करत त्यांना हैदराबादला एका मोठ्या

हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं गेलं. पण भाऊ बरे होऊ शकले नाहीत. पोटाच्या अल्सरने त्यांचं निधन झालं. तारीख २५ मे २०१५.

हे सगळं इतकं अचानक आणि तडकाफडकी झालं, की मला याची कल्पनाच नव्हती. थेट भाऊ गेल्याची बातमी पेपरमध्ये आल्यावरच सगळं कळलं. भाऊंचा मुलगा-मिलिंदही दरम्यानच्या काळात माझा मित्र झालेला. तो दिल्लीतल्या प्रतिष्ठित जेएनयूमध्ये शिकला व तिथेच प्राध्यापक झाला. त्याच्याशी थोडक्यात बोलणं झालं. काय झालं, कसं झालं, आम्हाला कळलं कसं नाही, असं मी त्याला म्हणू लागलो. म्हणाला, ‘मी येतो पुण्यात भेटायला.’ थोडे दिवसांनी मिलिंद आला. तो बोलू लागल्यावर डोळे वाहू लागले. भाऊ आपल्या जिवात किती आहेत, हे तेव्हा कळत होतं.

त्यानंतर एक काम काढून मुद्दाम तेलगावला गेलो. मिलिंदही दिल्लीहून आला होता. त्याने सेंटरला कळवून ठेवलं होतं. मी आणि माझा सहकारी मुकुंद कुलकर्णी तिथे पोहोचलो, तेव्हा स्वागताला जिजाचे पंचवीस-तीस कार्यकर्ते आसपासच्या गावांवरून आले होते. त्यांची-माझी पहिली भेट असली, तरी ‘जिजाचा पुन्याचा मित्र’ अशा नजरेने ते माझ्याकडे पाहत होते, माझ्याशी बोलत होते. एक दिवस, एक रात्र त्यांच्यासोबत राहिलो, जेवलो, झोपलो, सेंटर बघितलं. तिथे इमारती उभ्या होत्या, माणसं होती, सगळं होतं.. फक्त जिजा नव्हते. भाऊ ज्या पडवीत रोज बसत आणि आलेल्यांच्या तक्रारी ऐकून फोनाफोनी करून जागच्या जागी सोडवून देत, ती जागा; ती टेबल-खुर्ची जशीच्या तशी तिथे होती. फक्त जिजा तिथे नव्हते. ‘भाऽऽव, तुम्ही एकदा तेलगावला या...’ हा आवाज तेवढा कानात घुमत होता. डोळे पाणावत होते. भाऊंमुळे भेटलेली माणसं-मिलिंद, अशोक तांगडे, वाल्मिक निकाळजे हीच माणसं आता उरली, असं मन सांगत होतं.

तिकडून निघालो तेव्हा रस्त्यावरचे मैलाचे दगड आणि गावांच्या पाट्या दिसत राहिल्या. दुकडेगाव, कुप्पा, लवूळ, चिंचाळा, परळी, लिमगाव, माजलगाव, वडवणी अशी गावं डोळ्यासमोर येत राहिली. ही गावं, इथले प्रसंग आणि इथल्या आठवणी ज्या माणसामुळे आपल्यात आल्या, तो माणूस आता आपल्यात नाही हे स्वत:ला सतत सांगावं लागलं. तरीही एकनाथभाऊंची आठवण आली, की त्यांचं आत्मचरित्र उघडतो आणि त्यांचे हावभाव नि माझ्यासाठीचा खास प्रेमळ आवाज आठवून ते वाचत राहतो... दलित चळवळीने दिलेल्या एका वाघाच्या आठवणीतून ऊर्जा मिळवत राहतो.

- सुहास कुलकर्णी

suhas.kulkarni@uniquefeatures in





• अनुभव जानेवारी २०२२च्या अंकाची पीडीएफ खरेदी करण्यासाठी लिंक : http://surl.li/bdnvz

• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक - http://surl.li/bdnxj

• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक :  http://surl.li/bdnwf

• अनुभव मासिकातील इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगला भेट द्या- http://surl.li/bdnwo

• PDF अंक वार्षिक - ₹ ४००

• अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :

वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० ।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८