भ्रष्टाचार म्हणजे एन्जॉय ! : सुहास कुलकर्णी

 भ्रष्टाचार म्हणजे एन्जॉय ! : सुहास कुलकर्णी


अनुभव मे २००१




भारतातल्या लोकांना कोणत्या विषयावर गप्पा मारायला आवडतात या विषयावर एखादं सर्वेक्षण केलं तर 'सिनेमा', 'क्रिकेट' आणि 'राजकारण' ही तीन उत्तरं अग्रक्रमाने मिळतील. पूर्वी लोक अमिताभ-रेखा बद्दल, गावस्कर कपिलबद्दल किंवा नेहरू-इंदिराजीबद्दल बोलत असतील. आताही हृतिक काजोलबद्दल, सचिन- सौरवबद्दल आणि बंगारू सोनियांबद्दल बोलत असतील पण सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या तीनही क्षेत्रांना व्यापून टाकणारा आणखी एक विषय भारतीय बोलत असतात भ्रष्टचार! भ्रष्टाचार हा विषय पूर्वी नसे असे नाही, पण लोक एकतर मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे किंवा रोजची कामं घडवून आणण्यासाठी चाराव्या लागणा-या पैशाबद्दल कटकटायचे. आता तेवढंच राहिलेलं नाही. त्यांची आवडती तीनही क्षेत्र भ्रष्टाचाराच्या आरोपांनी संपूर्णत: डागाळली आहेत. कुठल्या सिनेमाला कुठून बेहिशेबी पैसा आला नि कोणता खेळाडू मॅच फिक्स करण्यात माहिर होता किंवा आहे, अशी या विषयावर गप्पा मारायची लाईन बदलली आहे.

त्यामुळे भ्रष्टाचार हा आजच्या घडीला भारतीयांसाठी एकदम हॉट विषय आहे. माणसांना इतरांच्या प्रेमप्रकरणांबद्दल किंवा कुणीतरी केलेल्या खुनाबद्दल जसं वाचायला बोलायला आवडतं तसं भ्रष्टाचाराबाबतही आवडत. या विषयांमध्ये सेन्सेशन आहे. तेवढ्या एकाच गोष्टीमुळे लोक या विषयांकडे आकर्षित होतात असं त्यामुळेच म्हणावंसं वाटतं. लोकांना भ्रष्टाचार सहन होत नाही, भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात, कुणी एक निष्कलंक नेता उभा राहिला तर भ्रष्टाचार विरोधात देशात क्रांती घडेल वगैरे कुणीकुणी जे म्हणत असतं ते खरंतर फिजूल आहे. भ्रष्टाचार हा व्यवहार कितीही तापदायक, अन्यायी, शोषण करणारा आणि व्यवस्था सडवणारा असला आणि लोक चिडूनचिडून, बोटं मोडून काहीही बोलत असले तरी हा विषय बोलण्यापुरताच ताणण्याचा आहे याचं गंमतीशीर भान भारतीयांनी बाळगलेलं आहे.

तसं नसतं तर भारतीयांनी भ्रष्टाचार एकदाच नव्हे तर परशुरामाप्रमाणे एकवीस वेळा हटवला असता. जगातल्या अव्वल भ्रष्टाचारी देशांमध्ये आपलं स्थान अव्वल आहे जगण्याच्या सर्व क्षेत्रांत वर्षानुवर्षे भ्रष्टाचाराचे विविध नमुने भारतीय लोक अनुभवत आहेत. जगात भ्रष्टाचार करण्याच्या ज्या ज्या आयडिया मानवजातीने हुडकून काढल्या असतील त्या सर्व कल्पनांचे प्रात्यक्षिक भारतीयांनी पाहिले आहे. नेहरूंच्या मंत्रीमंडळात जीप खरेदीत भ्रष्टाचार झाला तिथपासून ते बंगारू लक्ष्मणांनी कॅमे-यासमोर लाखभर रुपये घेतले इथपर्यंत सर्व नजारे भारतीयांनी पाहिले आहेत. तरीही प्रत्येकवेळीस भलतीच आगळीक घडली अशा चेहऱ्यांनी लोक फिरत असतात नि नव्या जोमाने भ्रष्टाचाराबद्दल बोलत असतात. ज्यांना समाजातून भ्रष्टाचारी लोक आणि भ्रष्ट व्यवस्था घालवून द्यावीशी वाटते अशी भाबडी मंडळी लोकांच्या तोंडून ज्या ध्वनिलहरी निघतात त्यामुळे मोहरून जातात. त्यांना असं वाटतं की आला, समय निकट आला आता लोक उठणार, पेटणार, भ्रष्टाचाराविरूद्ध लढा उभा राहणार! पण भावड्यांनी हे वाक्य मनात घोळवेपर्यंत लोक निघून गेलेले असतात. कधी जयप्रकाश नारायण, कधी व्ही. पी. सिंह, कधी अटलबिहारी , तर कधी अण्णा हजारे यांच्या सभांना हजर राहून टाळ्या पिटल्या की भारतीयांची जबाबदारी संपलेली असते. उत्साह खलास झालेला असतो मुळात आपल्या आयुष्यातील गांजलेपण विसरण्यासाठी लोक बोलत असतात, सभांना जात असतात ही बाब आता स्वीकारायला हवी. तसं नसतं तर जयप्रकाशानंतर आणखी कुणाला भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करावं लागलं नसतं. १९७७ सालीच लोकांच्या सहभागाने भ्रष्टाचार गाडला गेला असता.

आपल्याकडे भ्रष्टाचार हा लोकाश्रय लाभलेला विषय असल्यामुळे लोकप्रियता मिळवण्यासाठी त्याचा वेळोवेळी उपयोग होतांना दिसतो. कुणाबद्दल काही बोलण्यासारखं नसलं तर भ्रष्टाचाराचे दोन सनसनाटी आरोप केले की आरोप करणाऱ्याकडे लोक बघू लागतात. त्याच्याबद्दल बोलू लागतात. भाजप-सेना युतीच सरकार होतं तेव्हा काँग्रेसवाले भ्रष्टाचाराचे आरोप करत होते, आता काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचे सरकार आहे त्यामुळे भाजप-सेनावाले भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. या दोन्ही पक्ष-आघाड्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असताना, ते दोघेही एकमेकांच्या चारित्र्याबद्दल बोलतात ही त्यातली खरी गंमत आहे मागे युतीचे सरकार असतांना काँग्रेसचे एक नेते म्हणत होते की 'आम्ही भ्रष्टाचाराबद्दल बोलणं खरंतर बरोबर नाही. पण बोलावं लागत. आमचे नेते बोलतात आणि लोक टाळ्या वाजवतात' भाजप-सेनेतही कुणी सज्जन असतील तर कदाचित तेही हेच म्हणतील थोडक्यात, लोकप्रियता मिळवण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप करणं आवश्यक बनून गेलं आहे, अशी परिस्थिती आहे. आरोप करणारा कोण आहे, त्याच्यावर आरोप आहेत का वगैरेंची तमा बाळगण्याचं कारण भारतीयांना वाटत नाही. आपल्या देशात आजवर फक महात्मा गांधीच असे नशीबवान आहेत की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत, बाकी सारी नावं भ्रष्टाचाराच्या डांबराच्या टाकीत घालून बाहेर काढली गेली आहेत. कुणी, कुणावर, किती आरोप करावेत याला आपल्याकडे काही बंधन नाही. एखाद्या गुंडाने निवडून आल्यास 'लॉ अॅड ऑर्डर' नीट ठेवू असं आश्वासन द्यावं,त्याप्रमाणे भ्रष्टाचाराबाबत परिस्थिती आहे. एखाद्या पक्षाने अथवा नेत्याने 'आपण चारित्र्यसंपन्न आहोत आणि आमच्यावर कुणी शिंतोडा उडवू शकत नाही, असा दावा केला रे केला, की त्यावरची प्रतिक्रिया मोठी गंमतीशीर असते. एकतर, हा नेता किंवा त्याचा पक्ष राजकारण करण्याच्या लाचकीचा नाही असं शिक्कामोर्तब होत किंवा या लोकांना साधा पैसाही खाता येत नाही अशी अनपेक्षित प्रतिक्रिया येते तेव्हा जो पक्ष अथवा नेता (स्वतः भ्रष्ट असो अथवा नसो) इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करू शकतो, तोच खरा 'माईकालाल' असतो अशी एक प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळेच विरोधी पक्षातले नेते मधूनमधून उचल खाऊन भ्रष्टाचाराचे आरोप करताना दिसतात. सत्ताधाऱ्यांनाही आपण किती चिखलात उभे आहोत हे माहित असतं त्यामुळे नवा विषय काढून गुंगारा देण्याकडेच त्यांचा कल असतो.

तहलकाच्या टेप्स टीव्हीवर दिसल्यानंतर काँग्रेसवाल्यांनी आपण किती सोज्वळ आहोत असे चेहरे केले आणि भाजपवाल्यांनी नापास विद्यार्थ्याला दोष देऊन हात झटकले. बिचारे बंगारू लक्ष्मण पक्षासाठी निधी घेत असतांना रंगेहाथ पकडले गेले अंगावर वर्दी नसताना पोलिसाशी बोलून पहा, तो म्हणतो, 'मी दहावीस रूपये घेतले तर डोळ्यावर येतं, पण बडेबड़े सौदे होतात त्याबद्दल कुणी बोलत नाही' बंगारूच तसंच झालं. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला निवडणुका लढवायच्या तर पाच-सातशे कोटी सहज लागतात. ते पैसे बिनबोभाट जमा होतात त्याबद्दल कुणी काही बोलत नाही, पण बंगारूचे एक लाख रूपये मात्र खटकतात. बंगारूंचं काहीही असलं तरी त्यांनी एक गोष्ट बरोबर नोंदवली आहे. ते म्हणतात, सर्वच पक्षांना पैसे लागत असतात आणि त्यांना ते गोळा करावे लागतात. पण ही पध्दत जणू अस्तित्वातच नाही अशा रितीने लोक बोलत आहेत. पक्षासाठी पैसे घेणारा मी काही एकमेव माणूस नाही' बंगारू बोलत आहेत ते खोट आहे का ? प्रत्येक सभासदाकडून एक रूपया घेऊन वर्षाला तीस कोटी रूपये गोळा करण्याचा एक मार्ग काँग्रेसने काल परवा शोधून काढला आहे. पण गेली पन्नास वर्ष काँग्रेस काय करत आहे ? आणि तीस कोटीच्या निधीत निवडणुकीच्या बाजारात काय कात मिळतो? पण या प्रश्नांकडे कुणी पहायला तयार नाही. सर्वांना तहलका प्रकरण 'एन्जॉय' करायचं आहे एम टीव्हीची स्लोगन ज्याप्रमाणे 'एन्जॉय' अशी आहे, त्याप्रमाणे भ्रष्टाचाराबाबतचीही आहे. भ्रष्टाचाराचा विषय म्हणजे लोकांची करमणूक

'आऊटलूक' या इंग्रजी साप्ताहिकाने नुकतच एक सर्वेक्षण प्रसिध्द केलं आहे. त्यात ४८ टक्के लोकांनी कामं होण्यासाठी आपण लाच देतो असं मान्य केलं आहे. ४० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांनी देवाणघेवाण होते असं म्हटलं आहे, तर सरकारी कर्मचाऱ्यांना लाच द्यावी लागल्याबद्दल ८१ टके लोक तक्रार करत बसत नाही. माझं काम लवकर व्हावं यासाठी मी पैसे सरकवतो. परंतु मी लाच देणं आणि नोकरशहांनी किंवा मंत्र्यांनी सौद्यांमध्ये पैसे काढणं यात फरक आहे असे सर्वेक्षणात भेटलेल्या लोकांनी सांगितलं आहे. भ्रष्टाचार म्हणजे काय याच्या प्रत्येकाच्या व्याख्याही वेगवेगळ्या आहेत. आपण करतो तो भ्रष्टाचार नाही, मात्र इतर करतात तो भ्रष्टाचार असा सर्वसाधारण कल दिसतो. परंतु या सर्वेक्षणात लाच देऊनही ती घटनाव घडली नाही अस मानणारे जे ८१ टक्के लोक आहेत ते खरे भारतीयांचे प्रतिनिधी आहेत असं म्हणता येईल. पैसे देऊनही आपण त्या गावचेच नाही असं जे स्वतःला मानतात, परंतु संधी मिळताच भ्रष्टाचाराबद्दल चिडूनचिडून बोलतात ते भारतीय' अशी नवी व्याख्या आता करायला हवी

अगदी अलिकडे युती सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल अण्णा हजारेनी गावोगाव जाहीर सभा घेतल्या, तेव्हा अशा 'भारतीय' लोकांनी तिथे जोरदार गर्दी केली होती अण्णांनीही भ्रष्टाचारविरोधी समित्या स्थापन करण्याच्या घोषणा केल्या होत्या. पुढे या समित्यांच्याच विश्वासार्हतेचे प्रश्न निर्माण झाले आणि त्या समित्या बरखास्त कराव्यात अशा मागण्या होऊ लागल्या 'माणसं स्वच्छ आणि निष्कलंक असतील तरच त्यांना समित्यांवर घेतलं जाईल' अशी अण्णांची भूमिका होती. ही भूमिका कितीही नैतिक असली तरी वास्तवाकडे डोळेझाक करणारी होती. एकतर कोणती माणस निष्कलंक हे मोजण्याचं माप आपल्याकडे नाही आणि कुणाकडे असेल तर व्यक्तिपरत्वे ते बदलत जाणार आहे. शिवाय माणूस ही चीज निष्कलंक असू शकते का हा मिलियन डॉलर प्रश्न उरतोच! निष्कलंक आणि स्वच्छ लोकांनी एकत्र येऊन काय करायचं हाही एक प्रश्नच आहे. संपूर्ण व्यवस्थाच जर 'दिल मांगे मोअर' या तत्वावर चालत असेल आणि लाईफ मीन्स मोअर' हे नीतिवचन रोजच्या रोज पोराबाळांमध्ये मिनत असेल तर अधिक मिळवण्यासाठी काहीतरी करणं आलंच यातली आणखी एक गोष्ट अशी की जोपर्यंत लोक स्वतः भ्रष्टाचारात सामील आहेत तोपर्यंत भ्रष्टाचाराला विरोध ही खोटी गोष्ट असते, ही बाब समजून घ्यायला पाहिजे. म्हणूनच जोपर्यंत या व्यवस्थेची गुंतागुंत कुणी समजावून घेत नाही, तोवर भ्रष्टाचाराच्या प्रत्येक आरोपाला टाळ्या पडतील, आश्चर्ययुक्त कटाक्ष मिळतील, आणि काही उसासेही ऐकू येतील. पुन्हा येरे माझ्या मागल्या!

जोवर अर्थव्यवस्थांमध्ये भ्रष्टाचार अपरिहार्य का ठरतो याचं नीटसं विश्लेषण होत नाही, तोपर्यंत भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणावर लोक बोलत राहतील. घराघरात चित्रं असं असेल लोक एम टीव्ही पाहत, हातात कोका कोलाची बाटली घेऊन भ्रष्टाचाराबद्दल बोलत राहतील आणि म्हणतील एन्जॉय !


- सुहास कुलकर्णी

suhas.kulkarni@uniquefeatures in





• अनुभव जानेवारी २०२२च्या अंकाची पीडीएफ खरेदी करण्यासाठी लिंक : http://surl.li/bdnvz

• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक - http://surl.li/bdnxj

• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक :  http://surl.li/bdnwf

• अनुभव मासिकातील इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगला भेट द्या- http://surl.li/bdnwo

• PDF अंक वार्षिक - ₹ ४००

• अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :

वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० ।


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८