आकार घेतोय पत्रकारितेतला अभिनव प्रयोग : गौरी कानेटकर

सलाम पुणे...

कष्टकऱ्यांचं हक्काचं व्यासपीठ

आकार घेतोय पत्रकारितेतला अभिनव प्रयोग

- गौरी कानेटकर

                                                                 अनुभव फेब्रुवारी २०२२



आज सगळीकडे माध्यमांचा सुळसुळाट आहे, माहितीचा स्फोट झाला आहे. पण कष्टकऱ्याशी संवाद साधणारी-त्यांच्या गरजांचा विचार करणारी माध्यमं आज जवळपास नाहीतच. उदाहरणार्थ, पुण्यातली अर्धी लोकसंख्या वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहते. या माणसांनाही सन्मानाने जगावंसं वाटतं. आपल्या पुढच्या पिढ्यांना चांगलं आयुष्य मिळावं यासाठी ही माणसं धडपडत असतात. पण त्याचं प्रतिबिंब कुठल्या माध्यमांत पडतं? त्याचं उत्तर जवळपास कुठल्याही माध्यमात नाही असंच आहे.

कष्टकऱ्यांच्या हक्काचं एक व्यासपीठ असावं, त्यांच्या धडपडीला मदत करणारं माध्यम असावं, असं आम्हाला गेली काही वर्षं प्रकर्षाने वाटत होतं. म्हणूनच युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाची भगिनीसंस्था असलेल्या मितानिन फाउंडेशनमार्फत आम्ही या कष्टकरी वर्गासाठी एक नियतकालिक काढण्याचं ठरवलं. असं नियतकालिक जे फक्त कष्टकरी वर्गासाठीच असेल. आरोग्य, आहार, करिअर, व्यवसाय, कायदा अशा अनेक बाबतीतली उपयुक्त माहिती त्यात असेल. परिस्थितीवर मात करणाऱ्यांच्या कहाण्या, त्यांना मदत करणाऱ्या संस्था, मंडळं, कार्यकर्ते यांच्याबद्दलही वाचकांना त्यात वाचायला मिळेल. त्यांचे प्रश्न पुढे आणण्याचं, ते सोडवण्यासाठी त्यांना मदत करण्याचं कामही हे माध्यम करेल. या नियतकालिकाचं नाव ठरलं 'सलाम पुणे' !

ठरवणं सोपं होतं; पण ही कल्पना प्रत्यक्षात आणण तीन आघाड्यांवर अवघड होतं. पहिली गोष्ट म्हणजे कष्टकऱ्यांना हे नियतकालिक विकत घेणं परवडेलच अस नाही. त्यामुळे सुरुवातीला तरी ते पूर्ण मोफत देणं गरजेचं होतं.. म्हणजे त्यासाठीची आर्थिक तरतूद करणं हे मोठंच आव्हान होतं. पण म्हटलं, सुरू तर करूया, हळूहळू पैसे उभे. दूसर आव्हान होतं कष्टकऱ्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना जवळचा वाटेल, वाचायला आवडेल असा मजकूर तयार करण्याचं. त्यासाठी आमच्या टीममधले तरुण पत्रकार (युनिक स्कूल ऑफ जर्नालिझमच्या मुशीत तयार होत असलेले- योगेश जगताप, तुषार कलबुर्गी, सतीश उगले, नितीन गांगर्डे आणि अप्सरा आगा) निवडक वस्त्यांमध्ये उतरले. लोक सध्या काय वाचतात, कुठल्या घरी रोजचं वर्तमानपत्र येतं, त्यातलं त्यांना काय आवडतं, काय उपयोगी पडतं, बायका काय वाचतात, तरुण पोरं पोरी किती वाचतात असे नाना प्रश्न घेऊन त्यांनी वस्त्या पालथ्या घातल्या. त्यांचे प्रश्न समजून घेतले, धडपड्या लोकांच्या कहाण्या मिळवल्या आणि मगच आम्ही मजकुराच्या तयारीला लागलो. एकीकडे अंकाच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच वेळी गेल्या २६ जानेवारीला पहिला प्रायोगिक अंक काढायचं ठरवलं. नाना माहिती मिळवून, भरपूर खपून, उलट सुलट गोष्टींचा विचार करून ३२ पानी अंक तयार केला.

तिसरं आव्हान होतं या अंकाचं वितरण करण्याचं. वाचकांची नाडी समजून घेण्यासाठी वस्त्यावस्त्यांमध्ये फिरून आलेली आमची पत्रकार पोरं म्हणाली, “पत्रकारांनी अंक स्वतः नेऊन द्यायचा नाही, असा काही नियम आहे की काय? वस्त्यांमध्ये जाऊन आम्हीच अंकाचं वितरण करतो." झालं, उतरले पुन्हा मावळे वस्त्यांमध्ये. जनता वसाहत, आंबिल ओढा, पानमळा, केळेवाडी, लोहियानगर, वैदूवाडी, वडारवाडी, जनवाडी या वस्त्यांमध्ये तब्बल १५ हजार घरांमध्ये या मुलांनी प्रत्यक्ष जाऊन अंक वाटला. त्यासाठी अंगणवाडी तायांची मदत घेतली, कुठल्या कुठल्या गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांना हाताशी घेतलं. वस्तीतल्या विविध घटकांशी ओळख झाली. प्रश्नांचे त्यातून अंक तर घरोघरी पोहोचलाच, पण वस्तीतल्या विविध घटकांशी ओळख झाली. प्रश्नांचे वेगवेगळे कंगोरे कळू लागले. काम करणारी माणसं दिसू लागली. अंक पोहोचल्यानंतर मुलांनी पुन्हा एकदा वस्त्यांमध्ये चक्कर मारली. अंक कसा वाटतोय, वाचला जातोय का हे समजून घ्यायला. आश्चर्य म्हणजे खूप घरांमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तेव्हापासून ‘सलाम पुणे’चे चार अंक आम्ही काढले आहेत आणि याच निवडक वस्त्यांमध्ये, त्याच घरांमध्ये, त्याच वाचकांपर्यंत पोहोचवले आहेत. या प्रवासात जशी अनेक धडपडी माणसं भेटत गेली, तशाच वस्तीपातळीवर काम करणाऱ्या अनेक संस्थांचीही साथ मिळत गेली. कुणी त्यांच्या लाभार्थीपर्यंत अंक पोहोचवण्याची जबाबदारी उचलली, कुणी कार्यकर्ते जोडून दिले, कुणी गरजूंना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी पुढे आले, तर कुणी प्रश्न-समस्या समजून देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. मशाल, यार्दी फाऊंडेशन, दे आसरा फाउंडेशन, स्वच्छ, अन्नपूर्णा, डोअरस्टेप स्कूल, शेल्टर या त्यातल्या काही महत्त्वाच्या संस्था. आमचे कष्टकरी बंधूभगिनी, वस्त्यांमधलेच कार्यकर्ते आणि अशा संस्था यांच्या मदतीने 'सलाम पुणे'चं काम सध्या व्यवस्थित सुरू आहे.

पण 'सलाम पुणे' म्हणजे केवळ अंक नव्हे. या प्रकल्पाचं उद्दिष्ट तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. कष्टकऱ्यांचं जगणं सुकर व्हावं, त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती मदत त्यांना मिळावी, त्यांचे प्रश्न समाज, माध्यमं, शासन यंत्रणा यांच्यासमोर यावेत यासाठी प्रयत्न करणं हीदेखील माध्यम म्हणून आम्ही आमची जबाबदारी मानतो. त्यासाठी सध्याच्या नव्या आणि प्रभावी सोशल मीडियाचाही आधार आम्ही घेतोय. 'सलाम पुणे'चं यूट्यूब चॅनल कष्टकऱ्यांना उपयुक्त माहिती देतं. त्यांना प्रेरणादायी ठरतील अशा वस्तीतल्या यशकथा त्यांच्यापर्यंत पोहोचवतं. विशेषतः वाचता न येणाऱ्यांसाठी, वाचनाची फारशी सवय नसलेल्यांसाठी आणि तेवढा वेळ काढणं शक्य नसलेल्यांसाठी हे व्हिडिओ मोलाचं काम करतात. हातात सतत स्मार्ट फोन बाळगणाऱ्या तरुण पिढीसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही हे व्हिडिओ किंवा अन्य माहिती पाठवली जाते.

हा छोटा लेख संपवण्याआधी आणखीही एका उपक्रमाबद्दल सांगायला हवं. आपल्याकडे स्थानीय पातळीवरच्या डॉक्युमेंटेशनला फारसं महत्त्व दिलं जात नाही. इतिहास हा फक्त स्थूल, म्हणजे मॅक्रो स्वरूपातच पाहिला जातो. पण शहरांचं आणि त्यातही एकेका वस्तीचं, तिच्या इतिहासाचं, तिथली माणसं, त्यांच्या भाषा, त्यांचे सण-उत्सव-देव-मंदिरं-मशिदी-बौद्धविहार या साऱ्याचं डॉक्युमेंटेशन होणं खरंतर गरजेचं आहे. स्थानीय आणि ज्याला सबअल्टर्न म्हणतात अशा इतिहासाच्या नोंदींसाठी ते महत्त्वाचं आहे. ते कामही आम्ही 'सलाम पुणे'च्या माध्यमातून आस्ते आस्ते हाती घेतो आहोत. आज हे काम छोट्या स्वरूपात असलं तरी उद्या पुण्याच्या स्थानीय इतिहासात ते महत्त्वाचं योगदान ठरेल, अशी आशा आम्ही बाळगून आहोत.

'सलाम पुणे'चं हे काम सामाजिक कामांच्या सेवा किंवा संघर्ष अशा नेहमीच्या साच्यात बसणारं नाही. त्यामुळे त्याचं महत्त्व लोकांना पटवणं आणि अत्यंत गरजेची असलेली आर्थिक मदत उभी करणं हे आमच्यापुढचं आव्हान आहे. म्हणूनच 'अनुभव'च्या सजग आणि जाणकार वाचकांनी या कामाचं मोल जाणून आमच्या पाठीशी उभं राहावं, ही विनंती.

अधिक माहितीसाठी संपर्क - आनंद अवधानी : ९८२३०१७८१२

________________

आर्थिक मदतीसाठी बँक तपशील :-

MITANIN FOUNDATION 

JANATA SAHAKARI BANK LTD. PUNE 

ACCOUNT NO.- 007230100003294 

IFSC – JSBP0000007

(देणगीची रक्कम बँकेत जमा केल्यावर ९९२२४३३६०७ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपलं नाव, पत्ता आणि पाठवलेली रक्कम असे तपशील पाठवावेत, ही विनंती. त्यायोगे देणगी जमा झाल्यावर पावती पाठवणं सोयीचं होईल.)




• अनुभव फेब्रुवारी २०२२च्या अंकाची पीडीएफ खरेदी करण्यासाठी लिंक : https://bit.ly/3IUAkP8 

• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक -  https://bit.ly/3okRz4g

• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक : https://bit.ly/3GipL6Z

• अनुभव मासिकातील इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगला भेट द्या- https://bit.ly/3olaNqJ

• PDF अंक वार्षिक - ₹ ४००

• अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :

वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० ।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८