मुक्काम वाराणसी : योगेश जगताप | स्नेहल मुथा

मुक्काम वाराणसी : योगेश जगताप | स्नेहल मुथा


अनुभव मार्च २०२२

काशी विश्‍वेश्‍वराच्या मंदिर परिसराचा कायापालट करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे वाराणसी चर्चेत आहे. शिवाय सध्या तिथे निवडणुकांची रणधुमाळीही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘युनिक स्कूल ऑफ जर्नालिझम’च्या विद्यार्थ्यांनी या शहराला भेट दिली. त्या मुक्कामात त्यांनी अनुभवलेल्या वाराणसीची ही झलक.



दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी याच्या वीस वर्षांपूर्वी आलेल्या ‘इंद्रा द टायगर’ या सुपरहिट सिनेमाने मी झपाटून गेलो होतो. एवढा की दिवसातून तीनतीनदा तो सिनेमा बघायचो. सिनेमा दाक्षिणात्य असला तरी त्याला कशी कोण जाणे, वाराणसी शहराची पार्श्वभूमी होती. त्या सिनेमामुळे पहिल्यांदा वाराणसीशी नातं जुळलं. या शहरात जायला हवं, अशी ठिणगी मनात पडली ती तेव्हाच. पुढे आणखी एका दाक्षिणात्य नटाच्या सिनेमामुळे, धनुषच्या ‘रांझणा’मुळे मी वाराणसीकडे ओढला गेलो. या सिनेमातून पाहिलेला वाराणसीचा परिसर, तिथल्या गल्ल्यागल्ल्यांमधली मंदिरं, गंगेवरचे घाट यांनी कायमचं मनात घर केलं. पण तरीही वाराणसीला येण्याचं निमित्त मिळत नव्हतं. ती संधी मिळाली उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमुळे. या निवडणुका वादळी होणार, हे तारखा जाहीर होण्याआधीपासून सुरू झालेल्या रणधुमाळीवरून कळू लागलं होतं. उत्तर प्रदेश नावाचं प्रकरण थोडंफार तरी समजून घ्यायचं असेल तर निवडणुका अनुभवायला हव्यात, असं वाटत होतं. दुसरीकडे वाराणसीची ओढ होतीच.. त्यामुळे दौरा ठरवला तेव्हा त्यात सगळ्यात आधी वाराणसीसाठी दोन दिवस पक्के केले..

27 जानेवारीला रात्री भदोहीहून रेल्वेने वाराणसी स्टेशनला उतरलो. वाराणसी, जसं मनात चित्र होतं तसंच निघालं. स्टेशनवरच्या भिंतीवर चितारलेल्या मंदिरांच्या आणि साधूंच्या चित्रांनी आमचं स्वागत केलं. धड मोठं शहर नाही, धड गाव नाही अशा स्टेशनवर जसं वातावरण असतं तसंच इथेही होतं. आम्ही उतरल्या उतरल्या रिक्षावाल्यांनी आमच्याभोवती गराडा घातला. त्यातल्याच एकाशी दोस्ती जमवून आम्ही आमचं सामान त्याच्या रिक्षात टाकलं आणि निघालो. आमचा मुक्काम सारनाथला होता. हे अंतर दहा-बारा किलोमीटर असल्यामुळे उतरल्या उतरल्याच वाराणसी दर्शन होणार होतं. रिक्षावाल्याशी गप्पा मारत, त्याला ‘रांझणा’च्या गाण्याची फर्माइश करत सारनाथला पोहोचलो, तेव्हा अखेर वाराणसीत आलोच, असं झक्कास फीलिंग सोबत होतं.  

दुसर्‍या दिवशी सकाळी उठून गावात आलो. काशीविश्वेश्वराचा बदललेला परिसर बघायचा, जमेल त्या लोकांशी गप्पा मारायच्या, या बदलांबद्दलचं त्यांचं म्हणणं जाणून घ्यायचं एवढंच ठरवलेलं होतं. मंदिराकडे जाणार्‍या सर्वच रस्त्यांवर माणसांची गर्दी होती. या रस्त्यांच्या बाजूला कपड्यांची, खाद्यपदार्थांची, मिठाईची, देवा-धर्माच्या वस्तूंची दुकानं नजरेस पडली.  मंदिराच्या अलीकडे एखाद किलोमीटरवर एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो. तिथे आधीपासूनच राजकारणावरच्या गप्पा रंगलेल्या होत्या. आम्ही महाराष्ट्रातून निवडणुकांसाठी आलोय असं सांगत ‘काय म्हणतंय बनारस’, असा प्रश्न विचारला. त्यातला एक जण क्षणाची उसंत न घेता म्हणाला, ‘‘बनारस में आके पूछ रहे हो, क्या हाल हैं? अरे यहाँ खुद भगवान विराजमान है। इधर मोदी जी के सिवा कोई भी नही है।’’ त्याचं बोलणं संपायच्या आत दुसर्‍या माणसाने त्याची री ओढली. ‘‘मोदी-जोगी की जोडी सुपरहिट है। यहाँ पे इन के जैसा काम ना किसी ने किया है, ना कोई कर पायेगा।’’ सलामीलाच आमची मोदीभक्तांशी भेट झाली होती. या दोघांनी व्यक्त केलेलं मत हेच वाराणसीचं मत आहे की त्यात काही वेगळे अंतर्प्रवाहही आहेत, हे समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी बोलणं गरजेचं होतं.



त्याच टपरीवर दोन कामगार शांतपणे चहा पित थांबले होते. या निवडणुकीत कुणाची हवा आहे, असा प्रश्न त्यांनाही विचारला. ‘‘देखो भाई, हमे पॉलिटिक्स से कुछ भी लेना देना नही है। रोजीरोटी कमाने के लिए हमको ही काम करना पडता है। ना योगी, ना मोदी, ना अखिलेश किसी के आने से हमे कुछ फरक नही पडता।’’ अशी दोन-तीन सणसणीत वाक्यं आमच्या अंगावर फेकून ते दोघं तिथून चालते झाले.

मंदिराच्या वाटेवर दुकानांची मोठीच्या मोठी रांग दिसत होती. एक-दोन दुकानात डोकावलो. ‘‘अरे इतना विकास किया है। जोगी-मोदी को कोई चॅलेंज हो सकता हैं क्या?’’ अशा सुरातील उत्तरं त्यांच्याकडून मिळाली. पुढच्या दुकानात म्हटलं, ‘‘इकडे सगळे मोदी-जोगींचं कौतुक करतायत. इथल्या लोकांसमोर कुठलेच प्रश्न-चिंता नसाव्यात.’’ एवढं म्हणायचा अवकाश दुकानदारासोबत तिथल्या गिर्‍हाइकांनीही प्रश्नांची यादी वाचायला सुरुवात केली. ‘‘भाईसाब, महंगाई तो इतनी बढ गयी है की पूछो मत। गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, सब्जी के भाव कितने बढे हैं।’’ पण लगेचच त्यापुढे शेपूट जोडलं जायचं, ‘‘पर अकेले मोदी क्या क्या देखेंगे?’’ त्यांच्या या अजब तर्कावर विचार करत आम्ही मंदिराकडे निघालो.

तसं बघायला गेलं तर काशीविश्वेश्वर मंदिराचं महाराष्ट्राशीही नातं आहे. आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी 1783 साली हे शिवलिंग स्थापन केलं. आयुष्यात एकदा तरी काशीविश्वेश्वराचं दर्शन घ्यायला हवं असं मानणारे करोडो भाविक दरवर्षी इथे येतात. साहजिकच त्या लोकांच्या गरजा भागवणारी यंत्रणा इथे तयार झाली आहे. हे जसं भाविकांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे, तसंच गरिबांना छोटेमोठे रोजगार पुरवणारंही. गेल्या तीन-चार वर्षांपासून वाराणसी चर्चेत आहे, ते काशीविश्वेश्वर मंदिर परिसराचा कायपालट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे. काशी कॉरिडॉर नावाने गेल्या तीन वर्षांपासून हे काम सुरू आहे. त्यामुळे साहजिकच नेमकं काय काम केलं जातंय हे पाहण्याची आम्हालाही उत्सुकता होतीच. मंदिराची वाट गोदोलिया बाजारपेठेतून जाते. बहुतेक दुकानं बनारसी साड्यांची. सगळ्या दुकानांत चहलपहल दिसत होती. अयोध्येसारखी इथे हिंदू-मुस्लिम वादाची पार्श्वभूमी नसल्यामुळे वातावरणात ताण नव्हता.  

कॉरिडॉरमध्ये प्रवेश करताना कडेकोट बंदोबस्तातून पुढे जावं लागतं. सामान लॉकरमध्ये ठेवून आम्ही आत प्रवेश केला. मोबाईल आधीच जमा करून घेतलेले असल्यामुळे फोटो काढायची सोय नव्हती. 

अहिल्याबाई होळकर यांनी शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर 1839 साली महाराजा रणजितसिंग यांनी काशी विश्वेश्वर मंदिराचं शिखर सोन्याने मढवून घेतलं. हे मुख्य मंदिर आजही जुन्याच ढाच्यात आहे. शेवटच्या टप्प्यात या मुख्य मंदिराची डागडुजी केली जाणार आहे, असं कळलं. पाच-सहा एकर परिसरात मुख्य मंदिराच्या बाजूने फिकट गुलाबी रंगांच्या दगडांत नवी मंदिरं बांधण्यात आली आहेत. या मंदिरांची रचना लक्ष वेधून घेत होती. त्यावर पडलेला दिव्यांचा पांढरा प्रकाश आणि मंदिराच्या मध्यातूनच दिसणारं तांबूस आकाश. पाहत राहावं असं दृश्य होतं खरं, पण इथल्या जुन्या गल्ल्यांमधल्या घरोघरी मंदिरं असतील, तिथला शंखनाद या परिसरात घुमत असेल तेव्हाचं वाराणसी कसं असेल हे मनात आल्यावाचून राहत नव्हतं. आदल्या दिवशीच वाराणसीतले ज्येष्ठ पत्रकार हिसाम सिद्दिकी यांच्याशी या बदलांबद्दल गप्पा मारत होतो. ते म्हणत होते, ‘‘सध्या शहरात सुरू असलेल्या विकासामुळे वाराणसीची जुनी ओळखच बदलते आहे. हजारो मंदिरं आणि शेकडो मशिदी असलेलं वाराणसी आता एकाच भव्यदिव्य मंदिरासाठी ओळखलं जाईल. जुन्या काळातील शेकडो मंदिरं पाडल्यामुळे तिथल्या गल्ली-बोळांत आधी असणारा लोकांचा गजबजाट, मंदिरांतून घुमणारा डमरू आणि शंखांचा नाद आता कधीच अनुभवायला मिळणार नाही.’’ त्यांचं बोलणं आठवून आपण जुनं वाराणसी पाहायला मुकलो असल्याची जाणीव होत होती. 

काशी कॉरिडॉरच्या बांधकामासाठी 150 हून अधिक कुटुंबं, शेकडो मंदिरं आणि हजारो दुकानं विस्थापित करण्यात आली आहेत. इथल्या मूळ जागा मालकांना चार पट मोबदला देण्यात आला असला तरी भाड्याने दुकान चालवणार्‍यांना कुठलीही मदत किंवा पर्यायी जागा मिळालेली नाही, असं बोललं जातं. काशी कॉरिडॉरसंदर्भातल्या या घडामोडींचा आणि सरकारी दडपशाहीचा वृत्तांत स्थानिक पत्रकार सुरेश प्रताप सिंह यांनी त्यांच्या ‘उडता बनारस’ या पुस्तकात दिला असल्याचं कुणी कुणी सांगत होते. हे पुस्तक वाचल्याशिवाय वाराणसी दौरा पूर्ण होणार नाही, अशी खूणगाठ मनात बांधली आणि तिथून बाहेर पडलो. 



फिरत फिरत घाटाच्या बाजूने असणार्‍या प्रवेशद्वाराजवळ गेलो. तिथे अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या परिसरात सर्वांत लक्ष वेधून घेत होती ती तिथली स्वच्छता. सगळा परिसर लख्ख होता. कर्मचारी सतत साफसफाई करताना दिसत होते. इथे स्वच्छतेसाठी 60 कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करतात. या कर्मचार्‍यांच्या पायात लाकडी सपाता दिसत होत्या. उत्सुकतेने विचारलं, तर कळलं की मंदिराच्या गाभार्‍यात चपला घातल्या जात नाहीत. पण हिवाळ्यात तिथल्या फरशा अतिशय थंड पडतात. कर्मचार्‍यांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना लाकडी चपला पुरवण्यात आल्या आहेत. 

काशी विश्वनाथ मंदिराला लागूनच ज्ञानवापी मशीद आहे. काशी कॉरिडॉर प्रत्यक्षात येण्याआधी मंदिर आणि मशीद जवळपास एकाच आवारात होते. (पण आता नव्या आराखड्यातून मात्र ही मशीद वगळण्यात आली आहे, असं कळलं.) काशी विश्वनाथ मंदिरावरील आक्रमणानंतर औरंगजेबाने 1669 साली ही मशीद बांधल्याची माहिती एका स्थानिक पंडितांकडून मिळाली. मशीद आणि मंदिराच्या मध्ये ज्ञानवापी विहीरही आहे. याच विहिरीतून शिवलिंग बाहेर काढून अहिल्याबाईंनी त्याची स्थापना केल्याची इतिहासात नोंद आहे. शिवलिंग स्थापन करताना अहिल्याबाईंनी मशिदीला धक्का लावला नाही. वाराणसी शहरात एक हजारहून अधिक मंदिरं आणि दोनशे पन्नासहून अधिक मशिदी अस्तित्वात होत्या, अशी नोंद ब्रिटिश संशोधक जेम्स प्रिन्सेप यांनी केली आहे. मंदिराच्या परिसरात मुस्लिम बांधवांची दुकानंही मोठ्या संख्येने होती. 

भाविकांच्या दृष्टीने वाराणसीचं आणखी एक आकर्षण म्हणजे गंगा नदीवरचे घाट. काशीविश्‍वेश्‍वराच्या मंदिराजवळच हे घाट आहेत. त्यांची एकूण लांबी सातेक किलोमीटर आहे. इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात राजा-महाराजा आणि धनिकांनी दगडी पायर्‍या असलेले हे घाट बांधले आहेत. हरिश्चंद्र घाट, मनकर्णिका घाट, राजा घाट, दशाश्वमेध घाट, अहिल्या घाट, अस्सीघाट, चेतसिंग घाट, हनुमान घाट, मनमंदिर घाट, मुन्शी घाट, शीतला घाट ही इथल्या काही प्रसिद्ध घाटांची नावं. हरिश्चंद्र आणि मनकर्णिका घाटांवर अंत्यसंस्कार केले जातात. या घाटांवर 24 तास चिता जळत असतात असं ऐकलं होतं, आमच्या चार तासांच्या घाटावरच्या मुक्कामात ते प्रत्यक्ष बघायलाही मिळालं. अस्सी घाट म्हणजे शहरातील विचारवंत, चळवळे आणि कलाकारांचं गप्पा मारण्यासाठी एकत्र येण्याचं ठिकाण. दशाश्वमेध घाटावर गंगाआरती आणि हिंदूंचे विविध सण साजरे केले जातात. जवळपास सर्वच घाटांवर नावेतून नदीत जाण्याची व्यवस्था आहे. मल्लाह (नाविक) समाजातील लोक इथे नाव चालवण्याचं काम करतात. या समाजातील हजारो लोकांची रोजीरोटी या घाटांवरच अवलंबून आहे. घाटांवर शेकडो साधू ध्यानधारणा करत बसलेले दिसतात. हे साधू नेमके करतात काय, हा प्रश्‍न मला नेहमीच पडत आला होता. त्यामुळे न राहवून त्यातल्या एका बाबाजींना विचारलं, तर ते म्हणाले, ‘‘भगवान को याद करते हैं, खुश रहते हैं।’’ पण ‘तुमचा एक फोटो काढू का?’ असं विचारल्यानंतर मात्र ते जाम भडकले. ‘‘हम वैसे साधू नहीं हैं। ओरिजिनल है। फोटो निकालने के लिये हम यहाँ नहीं आते।’’ त्यांचा राग पाहून आम्ही तिथून काढता पाय घेतला. साधूजी पुन्हा ध्यानस्थ झाले. 

घाटावर आणि आजूबाजूच्या लोकांशी गप्पा मारल्या. बहुतेक लोकांमध्ये मोदी आणि योगींची क्रेझ असल्याचं दिसत होतं. रस्ते, पाणी, वीज, मंदिर निर्माण आणि कोरोना काळात मिळालेलं रेशनचं धान्य अशी कारणं ऐकायला मिळत होती. बाजारपेठेत आई-वडिलांना दुकानाच्या कामात मदत करणारी दोन शाळकरी मुलं भेटली. त्यांना सहज प्रश्न विचारला, ‘‘आप मुख्यमंत्री जी को जानते हो?’’ त्यातल्या एकाने लगेच उत्तर दिलं, ‘‘हाँ, योगी बाबा को सब पहचानते है। हमने उनको दो-तीन बार देखा भी है।’’ त्यालाच पुढचा प्रश्न विचारला, ‘‘ये जो मंदिर आपके यहाँ बन रहा है, उसका काम कौन कर रहा है?’’ ‘‘मोदीजी, वो है, तभी तो ये सब हो रहा है..’’ हाच अनुभव इतर ठिकाणीही येत होता. 

घाटावर वार्तांकनासाठी आलेल्या काही पत्रकारांशी बोलणं झालं. तेही मोदींचं कौतुक करत होते. त्यांना म्हटलं, ‘‘कोविड काळात गंगा नदीत अनेक मृतदेह वाहत होते. हे योगी सरकारचं अपयश नाही का?’’ त्यातला एकजण म्हणाला, ‘‘गंगा नदी में लाशे बहना कोई नयी बात नही है। अब महामारी से तो पूरी दुनिया त्रस्त है। योगी भी कितनी कोशिश करेंगे? ये तो विपक्ष वाले हैं की इसकी राजनीति करते हैं। असल में यूपी सरकारने आपके महाराष्ट्र से, और तो और अमेरिका से भी अच्छा काम किया हैं। यकीन नही होता तो आकडे देखिये।’’ 

‘गोदी मीडिया’ हा शब्दप्रयोग आजवर फक्त टीव्हीवर ऐकला होता. उत्तर प्रदेशात तो अनुभवायला मिळाला. ‘मोदींनी कित्येक वर्षं प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न सोडवला, काशी कॉरिडॉरचं काम हाती घेतलं. बाकी पक्षांनी काय केलं? फक्त राजकारण!’ असं या पत्रकारांचं म्हणणं होतं. त्यांच्यामते राज्यातली महागाई, बेरोजगारी, हिंदू-मुस्लिम तणाव यातल्या कुठल्याही समस्येला मोदी-योगी जबाबदारच नव्हते. भले शाब्बास!

राजकीय समीकरणांबद्दल वाराणसीतल्या आणखीही काही गोष्टींमध्ये आम्हाला रस होता. मल्लाह (नाविक) आणि बुनकर (विणकर) हे दोन इथले महत्त्वाचे समाज आहेत. त्यांच्या पारंपरिक व्यवसायांची परिस्थिती सध्या काय आहे, हे आम्हाला समजून घ्यायचं होतं. इथल्या बनारसी साड्या जगप्रसिद्ध आहेत. पूर्वी या साड्या हातावर विणल्या जायच्या. वाराणसीतील साठ टक्क्यांहून अधिक लोक स्वतःच्या घरीच बुनाईचं काम करायचे. हाताने एक साडी विणण्यासाठी चार दिवस ते आठ दिवस लागायचे. कुटुंबातल्या महिलाही या कामात सहभागी असायच्या. संपूर्ण कुटुंबाला रोजगार मिळवून देणारा हा व्यवसाय. पण अलीकडे या व्यवसायाला उतरती कळा लागल्याचं आमच्या कानावर येत होतं. वाराणसी जवळच्या बेनीपूर गावातले विनोदकुमार सांगत होते, ‘‘यांत्रिकीकरण झाल्यापासून रोजगारावर मोठा परिणाम झाला. पूर्वीइतक्या माणसांची गरज उरली नाहीये. मशीनमुळे साड्यांचं उत्पादन वाढलंय, पण त्याचा दर्जा आणि किंमत कमी झालीय. गेल्या वीस वर्षांत कच्च्या मालाचे भाव प्रचंड वाढलेत. साडीची किंमत मात्र आहे त्यापेक्षा कमी झालीय. विजेचे दर वाढलेत. एका साडीमागे आता आम्हाला फक्त शंभर ते दीडशे रुपये फायदा मिळतो. आम्हीसुद्धा किती दिवस या व्यवसायात टिकतोय सांगता येत नाही.’’

गेल्या 25 वर्षांपासून या कामात असणार्‍या फजलू-उर-रहमान अन्सारींची व्यथाही अशीच. ते म्हणाले, ‘‘वाराणसीमधील 90 टक्के मुस्लिम या कामात होते. आता ती संख्या दहा टक्क्यांवर आली आहे. परवडत नसल्याने अनेकांनी हा धंदा बंद केलाय. अनेक जण दुसर्‍या रोजगाराच्या शोधात बाहेर गेलेत. दोन वर्षांपूर्वी बनारसमधील विणकरांनी कच्च्या मालाची किंमत आणि वीज बिलाच्या प्रश्नांवर मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळेस योगी आदित्यनाथ यांनी या प्रश्नावर मार्ग काढू असं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतर काहीच झालं नाही. मुस्लिम समाजाला अडचणीत आणण्यासाठी, त्यांच्या रोजगाराचं साधन हिरावण्यासाठीच योगी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात की काय असंच आम्हाला वाटतं.’’ 

दुसरा प्रश्न आहे मल्लाह समाजाचा. इथल्या नाविक लोकांचा. उत्तर प्रदेशच्या एकूण लोकसंख्येपैकी साडेसतरा टक्के लोकसंख्या या समूहाची आहे. निशाद, बिंद, कश्यप, केवट या जातींमध्ये विखुरलेला मल्लाह समाज म्हणजे नदीबद्दलच्या माहितीचा खजिनाच. गंगा नदी हेच पिढ्यानपिढ्या त्यांच्या उत्पन्नाचं साधन आहे. मासेमारी, पर्यटनासाठी नावा चालवणं, वाळू उपसा करणं, नदीतील मृतदेह बाहेर काढणं, पुराच्या काळात शासन यंत्रणांना सहकार्य करणं अशी कामं हा समाज करत आलाय. पण योगी सरकारच्या काळात नदी स्वच्छता आणि संवर्धनाचं काम खाजगी कंपन्यांना दिल्यापासून हे लोक अडचणीत आले आहेत. खाजगी कंपन्या मल्लाह लोकांच्या ज्ञानाचा वापर करून पैसे कमावतात. या समाजातला अभ्यासक हरिश्चंद्र बिंद म्हणाला, ‘‘गंगा नदी कोणाच्या बापाची जहागीर नाही. तिच्या सहवासात वाढलेल्या तिच्याच लेकरांना दुर्लक्षित केलं जातं असेल तर हे चुकीचं आहे. आमच्या परंपरागत ज्ञानाचा वापर सरकारी कामातही केला जायला हवा. विकासाच्या नावाखाली आमचा सांस्कृतिक वारसा आणि रोजगार नष्ट करणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही.’’ हरिश्चंद्र हा बनारस हिंदू विद्यापीठात नाविक समाजाच्या समस्यांवर संशोधन करतोय. हा प्रश्न हाताळताना त्याने प्रियांका गांधींसोबतही काम केलंय. 

हरिश्‍चंद्रमुळे बनारस हिंदू विश्वविद्यालयातील आणखी काही विद्यार्थ्यांशी राजकारण आणि सामाजिक प्रश्नांवर गप्पा मारता आल्या. विद्यापीठ अजूनही सुरू झालेलं नसल्यामुळे ही मंडळी वैतागलेली होती. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेला मारुती मानव म्हणाला, ‘‘राजकीय नेता प्रचार करते है, तो हजारों की संख्या में जमी भीड चल जाती है, मगर विद्यापीठ शुरू करने का नाम लिया तो कोरोनाकी धमकी दी जाती है। बच्चों का और कितना नुकसान करोगे?’’ 

वर्षभर शेतकरी आंदोलन अनुभवल्यामुळे त्याच्या बोलण्याला व्यापक संदर्भ होता आणि धारही. ‘‘राज्य और देश मैं सांप्रदायिकता की जो आग लगाई जा रही थी, वो बुझाने का काम किसान आंदोलन ने किया हैं। यह दुसरा स्वतंत्रता आंदोलन हैं। अब किसान की एक नजर अपनी फसल पर हैं और दुसरी दिल्ली सरकार पर। सरकार कितनी भी कोशीश करें, किसान हार नहीं मानेगा।’’

कोविड काळात गंगा नदीत वाहत आलेल्या मृतदेहांबद्दल आम्ही या तरुणांनाही विचारलं. असे कित्येक मृतदेह स्वतः बाहेर काढल्याचं मारुती आणि त्याचे मित्र सांगत होते. ‘‘इन लाशों की गिनती करना मुश्कील था, हमने गंगा किनारे इतनी लाशें कभी नहीं देखी थी। इन लाशों का कुछ अता-पताही नहीं था।’’ असं राज साहनी या युवकाने सांगितलं. मल्लाह समाजाच्या शेकडो युवकांनी असे हजारो मृतदेह नदीतून बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याचंही मारुतीने सांगितलं. वाराणसी शहरात भेटलेल्या सामान्य लोकांच्या विचारांमध्ये आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या बोलण्यात जमीनआस्मानाचा फरक होता. जणू दोन पूर्ण वेगळ्याच प्रांतांबद्दल बोलणं चाललं असावं, असं वाटत होतं.

हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना भेटल्यावर ही दरी आणखी लख्खपणे जाणवली. हिंदू युवा वाहिनी ही हिंदू युवकांचं संघटन असलेली संस्था. गेली 30 वर्षं योगी आदित्यनाथांचं या संघटनेवर वर्चस्व आहे. मुख्यमंत्री होण्याआधी योगी आदित्यनाथ या संघटनेचे प्रमुख होते. उत्तर प्रदेशमध्ये संघटनेचे लाखो कार्यकर्ते आहेत, असं म्हटलं जातं. गोव्यातल्या वादग्रस्त सनातन संस्थेचंही हिंदू युवा वाहिनीला पाठबळ आहे, असं प्रदेश उपाध्यक्ष मनीष पांडे यांनी आम्हाला सांगितलं. गोरक्षण हे या वाहिनीच्या प्राधान्यावर असलेलं काम. गाईंची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचा संशय आला की त्या वाहनाचा पाठलाग करायचा, त्याची तपासणी करायची आणि वाहनात गाई सापडल्या तर चालकाला चोप द्यायचा ही मोडस ऑपरेंडी पांडे यांनी समजावून सांगितली. या कामासाठी योगी सरकारकडून त्यांचं कौतुक तर होतंच, पण रीतसर मोबदलाही दिला जातो म्हणे! युवा वाहिनीने अँटी रोमिओ स्न्वाडही स्थापन केलाय. लव्ह जिहादबाबतही युवा वाहिनीचे कार्यकर्ते आक्रमकपणे बोलतात. आपण करतो ते योग्यच, असं अर्थातच त्यांचं म्हणणं होतं. योगींबद्दल बोलतानाही पांडेजींनी सांगितलं, ‘‘योगीजी भले ही साधू आदमी हो, लेकिन उनके एक हाथ में माला है और एक हाथ में भाला। जो जैसा काम करेगा उसे वैसी ही सजा मिलेगी।’’ जोशात आणखीही बरंच काही ते बोलत राहिले, ‘‘गांधीजी, अहिंसा सब बकवास है। मोदीजी उनको प्रणाम करते है वो उनका विचार है। लेकीन हमारे लिए नथुराम ही महान है।’’




काहीही वाद न घालता आम्ही त्यांचं बोलणं ऐकत होतो. मोदी आणि तळागाळातल्या या कार्यकर्त्यांना समोरासमोर आणून प्रश्‍न विचारता आले तर किती मजा येईल, अशी फँटसी रंगवत आम्ही त्यांचा निरोप घेतला.

वाराणसीपासून तीस किलोमीटर अंतरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेलं नागेपूर हे गाव असल्याचं समजलं होतं. ज्या गावाच्या विकासाची जबाबदारी थेट पंतप्रधानांवर आहे, ते गाव कसं आहे, हे पाहावं म्हणून तिकडे मोर्चा वळवला. 

नागेपूर हे साधारण अडीच हजार लोकसंख्येचं गाव. खेडेगावच. गावाच्या हद्दीतून आत गेल्यावर अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला सरसोची पिवळीधमक पिकं दिसत होती. काही ठिकाणी गव्हाची शेतीसुद्धा होती. शेतीला पाणीपुरवठा करणारी नहर म्हणजेच छोट्या कालव्यासारखी सोय या रस्त्याला लागूनच असलेली दिसून आली. रस्त्यांवर खेळणारी लहान मुलं आमच्या चेहर्‍याकडे टकामका पाहत होती. दोन-तीन दिवसांनी गावात कोणतातरी उत्सव होता. त्यासाठी पैसे मागत ती आमच्या मागे मागे येऊ लागली. सोबत आलेल्या रिक्षावाल्या काकांनी त्यांच्या हातावर दहा रुपये टेकवल्यावर ती धूम पळाली. 

गावात काही महिला घरासमोरच्या अंगणात कामं करत बसलेल्या दिसल्या. घरं विटांनी बांधलेली, पण प्लास्टर न केलेली होती. रस्ते डांबरी आणि रुंद दिसत होते. आम्ही दिवसभर गावात होतो, पण तरुण मुलं-मुली फारशी दिसली नाहीत. बहुतेक जण शिकायला किंवा कामाला बाहेर गेलेले असावेत, असा आम्ही अंदाज बांधला. या गावातले लोक प्रामुख्याने विणकर आहेत. त्यांच्याशी थोडंफार बोलणं झालं. मागील काही वर्षांत कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि यांत्रिकीकरणामुळे या व्यवसायातील नफा कमी झाल्याचं इथले लोक सांगत होते. 

इथे राहणार्‍या निर्मलादेवी म्हणाल्या, ‘‘महिलांओ के लिये इधर ज्यादा रोजगार के अवसर ही नहीं हैं। हम जितना कमा लेते हैं उसमें बच्चों को संभाल पाना भी मुश्कील लगता हैं।’’ निर्मलादेवींच्या पतींना शारीरिक व्यंग होतं. त्यांच्या बारा वर्षांच्या मुलीचा काही महिन्यांपूर्वी कडबा कुट्टी यंत्रात अडकून मृत्यू झाला होता. घरच्या परिस्थितीबद्दल आम्हा अनोळखी लोकांशी बोलतानाही त्यांचा आवाज गहिवरून येत होता.  

निर्मलादेवींशेजारी राहणार्‍या लीलावती ताई वाढत्या वीजबिलाने त्रस्त होत्या. ‘‘गाव में रस्ते, पाणी, बिजली ठीक हुआ है, पर ये बिजली की किमत इतनी बढायी है की पुछो मत..’’

‘‘वाराणसीमध्ये बनारसी साड्यांसाठीचं सुविधा केंद्र उभारण्यात आलं आहे. पण ग्रामीण भागातील विणकरांना त्याचा काहीच फायदा होत नाही’’, असं या गावात आम्हाला भेटलेले कार्यकर्ते नंदलाल मास्तर यांनी सांगितलं. नंदलाल विणकरांच्या मुलांसाठी शाळा चालवतात. इतर सामाजिक कामांतही ते आघाडीवर असतात. त्यांच्या शाळेत आजूबाजूच्या सात-आठ गावांतून तीनशे-साडेतीनशे मुलं शिकायला येतात. कष्टकरी कुटुंबातील मुलं शिक्षणाच्या धारेतून बाजूला पडू नयेत, यासाठी नंदलाल यांची धडपड सुरू आहे. उत्तर प्रदेशातील कोणत्याच सरकारने गेल्या 20 वर्षांत विणकरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचं नंदलाल यांचं म्हणणं होतं. ते उद्वेगाने म्हणतात, ‘‘हमें रस्ते और बिजली से जादा रोजगार की जरूरत है। बिचोलिये (दलाल) और सरकार इन दोनों ने मिलकर हमारा काम पुरी तरीके से खत्म कर दिया है। नयी सरकार हमें बुनकरी का प्रशिक्षण देने की सोच रही है, जो काम हम बरसों सें करते आये हैं उस काम का प्रशिक्षण हमें देंगे? ये कितना गुस्सा दिलाने का काम है..! बुनकारी खतम हुयी तो छोटे बच्चे काम करने लगेंगे जो की बहोत भयानक चीज साबित होगी।’’

नंदलाल यांच्याकडून आणखीही माहिती समजली. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा नाहीत. रोजगार तर नाहीच. 

फिरत फिरत ग्रामपंचायतीच्या कार्यालयापाशी आलो. कार्यालय रंगीबेरंगी होतं. त्याच्या भिंतीवर सरपंच आणि इतर सदस्यांच्या नावाबरोबर त्यांचे मोबाइल नंबरही टाकलेले होते. लोकांच्या संपर्कात राहण्यासाठीचा हा फंडा उत्तर प्रदेशात बर्‍याच ठिकाणी पाहिला. 

गावात पटेल आणि राजभार लोक संख्येने जास्त असल्याची माहिती मिळाली. राजभार समाजातील नागरिक आरक्षणाच्या मुद्द्यांवरून योगी सरकारवर नाराज होते. दीपक कुमार हा राजभार समाजातला युवक. थोडंफार राजकीय ज्ञान असलेला. आरक्षण न मिळाल्याने तो सरकारविरोधातील नाराजी उघडपणे बोलून दाखवत होता. तो म्हणाला, ‘‘हमारे यहाँ रोजगार की कोई संधी उपलब्ध नहीं है। इधर के बच्चे ज्यादा पढे तो भी बुनकरी में ही वापस आते है। अब तो सिर्फ गाँव नही, राज्य छोडकर जाने की नौबत यहा के लोगों पर आयी है। इधर मोदी आये, योगी या फिर और कोई - ये हाल ऐसा ही रहेगा।’’

लालबहादूर नावाचे गावकरी म्हणाले, ‘‘कंपनीया बंद हो गयी, लेबर काम कम हुआ- लेकिन फिर भी हम इसी सरकारको वोट देंगे। अब सत्यानाश करवा के लेना हैं - तो इसी सरकार को चुनना जरुरी है..’’

मोदींनी दत्तक घेतलेल्या गावची स्थिती ही अशी आहे. नागेपूरला लागून असणार्‍या बेणीपूर गावची स्थितीही वेगळी नाही असं कळलं. 

वाराणसी टीव्हीवर पाहिली होती. या अभ्यासदौर्‍यात स्थानिक नागरिकांच्या, अभ्यासकांच्या नजरेतून प्रत्यक्ष वाराणसीचं वेगळं दर्शन घडलं. जुनं ते सोनं म्हणत वाराणसीच्या मंदिर संस्कृतीचं, तिथल्या परंपरेचं कौतुक करणारे लोक काशी कॉरिडॉरमुळे व्यथित आहेत तर इथे काहीतरी भव्यदिव्य घडतंय या कल्पनेने काही लोक आनंदीही आहेत. नागरिकांच्या जगण्यात यामुळे किती फरक पडणार याचं उत्तर काशी कॉरिडॉरच्या पूर्ततेनंतरच मिळेल.

_____________________

- योगेश जगताप स्नेहल मुथा हे युनिक स्कूल ऑफ जर्नालिझमचे विद्यार्थी असून योगेश ‘सलाम पुणे’ प्रकल्पात पत्रकार म्हणून काम करतो. स्नेहल मुक्त पत्रकार आहे.

9561190500 & 9309818167

yogeshjagtap8819@gmail.com 

muthasnehal535@gmail.com





• अनुभव जानेवारी २०२२च्या अंकाची पीडीएफ खरेदी करण्यासाठी लिंक : https://bit.ly/3HXUGXT

• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://bit.ly/3JASplA

• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक : https://bit.ly/34GWmXn

• अनुभव मासिकातील इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगला भेट द्या : https://bit.ly/36zs3lP

• PDF अंक वार्षिक - ₹ ४००

• अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :

वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० ।



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८