सलाम कट्टा साधतोय कष्टकऱ्यांशी थेट संवाद : टीम सलाम पुणे

सलाम कट्टा साधतोय कष्टकऱ्यांशी थेट संवाद : टीम सलाम पुणे 


अनुभव मार्च २०२२

पुण्याच्या वस्त्यांमधल्या कष्टकरी माणसांसाठी हक्काचं एक व्यासपीठ असावं,  यासाठी ‘सलाम पुणे’ अंक सुरू झाला. वस्तीतल्या लोकांशी थेट संवाद साधता यावा यासाठी सलाम कट्ट्याचं आयोजन केलं जात. त्याबद्दल..


पुण्याच्या वस्त्यांमधल्या कष्टकरी माणसांसाठी हक्काचं एक व्यासपीठ असावं, त्यांच्या उपयोगाचा मजकूर त्यांना वाचायला मिळावा, राहणीमान सुधारण्याच्या धडपडीत त्यांना मदत मिळावी या हेतूने ‘सलाम पुणे’ हा अंक मितानिन फाउंडेशनमार्फत  सुरू झाला. ‘सलाम’चे अंक शहरातल्या वेगवेगळ्या वस्त्यांमधल्या १५ हजार वाचकांपर्यंत पोहोचत आहेत.   

‘सलाम पुणे’ चा पहिला-दुसरा अंक आम्ही वस्त्यांमध्ये घराघरांत जाऊन पोहोचवत होतो. विशेषतः तरुण मुला-मुलींना या अंकाबद्दल खूप उत्सकता वाटायची. धडपड्या लोकांच्या यशकथा तर त्यांना आवडायच्याच, पण त्याबरोबर ‘सल्ला मार्गदर्शन’ हा विभाग वाचण्यातही त्यांना रस असायचा. वस्त्यांमधला सर्वांत जिव्हाळ्याचा प्रश्‍न म्हणजे तरुणांना नोकरी-धंदा कसा मिळेल? ‘रोजगार सल्ला देताय ते खूप चांगलं आहे, पण फक्त माहिती वाचून नोकरी मिळेल का? तुम्ही ज्यांची माहिती दिलीय, ते प्रत्यक्ष कुठे भेटतील? ते आम्हाला नोकरी देतील का?’ असे प्रश्‍न या तरुण मंडळींकडून यायचे. शिवाय ज्यांच्या यशकथा छापल्या आहेत त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याकडून काही सल्ला घ्यावा, असंही त्यांना वाटत असायचं. 

‘सलाम पुणे’ने सुरुवातीपासूनच यूट्यूब माध्यमातही काम चालवलं आहे. वस्तीतले धडपडे, चांगली कामं, यशकथांसाठी आम्हीच वस्तीत जाऊन शूटिंग करायचो आणि त्याचं एडिटिंग करून यूट्यूबवर टाकायचो. तेही लोकांना आवडत होतं. पण तरीही प्रत्यक्ष संवाद साधता येईल, असे कार्यक्रम घ्यायला हवेत अशी मागणी सतत यायची. त्यातूनच ‘सलाम कट्टा’ जन्माला आला. सल्ला-मार्गदर्शन आणि सोबत मनमोकळा संवाद असं या ‘सलाम कट्ट्या’चं स्वरूप पक्कं करण्यात आलं. ‘सलाम पुणे’च्या अंकात ज्या व्यक्तींवर, संस्थांबद्दल माहिती दिली असेल किंवा यूट्यूब चॅनेलवर ज्यांची स्टोरी प्रकाशित झाली असेल, त्यापैकी शक्य त्या लोकांना वेगवेगळ्या वस्तीतल्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी घेऊन जायचं असं आम्ही ठरवलं. 

सर्वांत जास्त विचारणा नोकरी-धंद्याबाबत होत असल्याने पहिला कार्यक्रम ठरला ‘ले छलाँग’ फाउंडेशनसोबत. ही संस्था वस्तीतल्या तरुण मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते. कोथरूडमधील लक्ष्मीनगर वस्तीतल्या खेळघर या संस्थेच्या साथीने आम्ही हा कट्टा आयोजित केला. ले छलांग फाउंडेशनचे मनीष ठोकरे आणि मनोज कदम यांनी वस्तीतल्या २५-३० तरुण-तरुणींना मार्गदर्शन केलं. मुलाखतीची तयारी कशी करायची, शिक्षण कमी असेल तर कुठल्या प्रकारचा जॉब मिळेल, घरबसल्या काही काम करता येईल का, नोकरीच्या ठिकाणी इंग्रजी बोलणं कंपल्सरी असतं का, कपडे कशा प्रकारचे घालावेत, पगाराची अपेक्षा किती सांगावी असे अनेक प्रश्‍न या मुलांनी ले छलाँगच्या दादांना विचारले. कार्यक्रम संपल्यावरही या दोघांभोवती मुलांचा गराडा पडलेला होता. सलाम कट्ट्याची किती गरज आहे, हे या दृश्यावरून कळत होतं. ले छलाँगसोबत घोरपडे पेठेत आणखीही एक कट्टा रंगला. या कार्यक्रमात छलाँगच्या माध्यमातून नोकर्‍या मिळालेल काही तरुण उपस्थित होते. त्यांनीही इच्छुक मुलांशी गप्पा मारल्या. 

‘सलाम कट्टा’चा आणखीही एक कार्यक्रम हिट झाला, तो म्हणजे अभिनेत्री आणि नृत्यांगना वैष्णवी ढोरेशी गप्पांचा. जनता वसाहतीमधील कार्यकर्त्या संध्या बोम्माना यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात वैष्णवीने नृत्याचं लाइव्ह प्रात्यक्षिक दिलं. मुलींना शिकू द्या, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात मुक्तपणे काम करू द्या, हे वैष्णवीने स्वतःच्या उदाहरणातून महिला आणि मुलींना सांगितलं. मुली इतक्या खूश होत्या की कार्यक्रम संपल्यावर त्यांनी वैष्णवीची गळाभेटच घेतली. भरतनाट्यम कुठे शिकता येईल, दिल्लीसारख्या शहरात राहून कसं वाटतं, तू एवढी फेमस असूनही इतकी साधी कशी, असे मनात येतील ते सगळे प्रश्‍न मुलींनी तिला विचारले. तिनेही मोकळेपणाने त्यांची उत्तरं दिली. टॅलेंट असेल तर आपल्यालाही अशा वेगळ्या क्षेत्रात करियर करता येऊ शकतं, अशी ठिणगी त्यानिमित्ताने मुलींच्या मनात नक्कीच पडली असेल. 

‘सलाम कट्टा’साठी आमचे बरेच प्लॅन्स आहेत. आरोग्याबद्दल, आहाराबद्दल, उपयोगी योजनांबद्दल नव्या करियर वाटांबद्दल माहिती देणारे अनेक कार्यक्रम वस्त्यांमध्ये करता येऊ शकतात. त्यांचा लोकांना थेट उपयोग होऊ शकतो. त्यातून वस्तीतले प्रश्‍न सुटायला, चांगलं जगण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकायला नक्की मदत होईल, असं आम्हाला वाटतं. आणि तेच ‘सलाम पुणे’चं उद्दिष्ट आहे. 

हा उपक्रम इथून पुढे पुण्यातील वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये राबवला जाईल. या खटाटोपाला तुमच्यासारख्या सुजाण वाचक मंडळींच्या मदतीची गरज आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क - आनंद अवधानी : ९८२३०१७८१२

_________________________________________________

आर्थिक मदतीसाठी बँक तपशील

MITANIN FOUNDATION

JANATA SAHAKARI BANK LTD. PUNE

ACCOUNT NO. - 007230100003294

IFSC – JSBP0000007

(देणगीची रक्कम बँकेत जमा केल्यावर ९९२२४३३६०७ या व्हॉट्सप क्रमांकावर आपलं नाव, पत्ता आणि पाठवलेली रक्कम असे तपशील पाठवावेत, ही विनंती. त्यायोगे देणगी जमा झाल्यावर पावती पाठवणं सोयीचं होईल.)

___________________________________________________________________________________



• अनुभव जानेवारी २०२२च्या अंकाची पीडीएफ खरेदी करण्यासाठी लिंक : https://bit.ly/3HXUGXT

• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://bit.ly/3JASplA

• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक : https://bit.ly/34GWmXn

• अनुभव मासिकातील इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगला भेट द्या : https://bit.ly/36zs3lP

• PDF अंक वार्षिक - ₹ ४००

• अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :

वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० ।




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८