भटकंती प्राचीन घाटमार्गाची : प्रणव पाटील

भटकंती प्राचीन घाटमार्गाची : प्रणव पाटील


अनुभव मार्च २०२२

प्राचीन काळी सह्याद्रीच्या डोंगररांगातील घाटांमधून अनेक व्यापारी मार्ग कोकणातील कल्याण, सोपारा, चौल या बंदरांकडे जात. पुढे इतर अनेक रस्ते तयार होत गेले, तसे हे डोंगरांमधले घाटमार्ग विस्मृतीत गेले. कुसूर घाट हा सह्याद्रीतला असाच एक प्राचीन व्यापारी मार्ग. या घाटात फेरफटका मारून तो मार्ग आणि तिथल्या पठारावर राहणार्‍या माणसांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न.

कार्ले लेणी ज्या डोंगरात आहेत, त्याच्या उत्तरेला आंध्रा नदीचं खोरं आहे. त्यावरून या भागाला आंदर मावळ असं म्हटलं जातं. पुण्याहून जुन्या महामार्गाने लोणावळ्याला जाऊ लागलं की उजव्या हाताला कान्हे गाव आहे. या गावातून टाकवे गावाकडे जाणार्‍या रस्त्याने पुढे गेल्यास आंध्रा नदीवर टाटांनी बांधलेलं ठोकळवाडी धरण दिसतं. या धरणाच्या कडेने जाणार्‍या रस्त्यावर माउ नावाचं लहानसं वड्या-वस्त्यांचं गाव आहे. या गावाजवळच्या मोरमारे वाडीतून मागच्या डोंगरावर पक्का रस्ता गेलेला दिसतो. या रस्त्याने डोंगर घाटातली वळणं घेत आपण डोंगरवाडीत पोहोचतो. डोंगरवाडी ही महादेव कोळी लोकांची लहानशी वाडी आहे. वाडीत काही पक्की घरं आहेत, तर काही कुडाच्या भिंतींची. 

हा सगळा प्रवास करत आम्ही सकाळी या वाडीत पोहोचलो, तेव्हा पुरुषमाणसांची कामाला जायची लगबग सुरू होती. बायका डोक्यावर फडक्याची चुंबळ बांधून पाण्यासाठी निघाल्या होत्या. या वाडीतून पुढे मातीचा कच्चा रास्ता आहे. या रस्त्याने पुढे आलं की डोंगरावर पसरलेल्या प्रचंड मोठ्या पवनचक्या फिरताना दिसतात. इथेच एका उंचवट्यावर लहानसं दगडी बांधणीतलं शिवमंदिर लागतं. मंदिराच्या रचनेवरून ते फारसं जुनं नसल्याचं लक्षात येतं. मंदिराच्या जागेवरून या डोंगराची दक्षिणेकडची निमुळती होत गेलेली नाळ दिसते आणि विरुद्ध बाजूला डोंगराचा जंगलाने व्यापलेला हिरवागार पठारी भाग दिसतो. 

या मंदिराच्या उतारावर डावीकडे पठारावर उतरत्या छपराचं, परंतु भक्कम बांधकाम असणारं बैठं घर दिसलं. घरामागे शेणामातीने सारवलेल्या भिंतींचा आडवा मोठा गोठा आणि सभोवताली असणारा झाडझाडोरा या घराच्या सौंदर्यात भर घालत होता. या घराचं चित्र कॅमेर्‍यात टिपत आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळत त्या घराकडे निघालो. शेडगे आडनावाच्या गवळी धनगरांची ही लहान वाडी. घरातल्या महिलांनी थंडगार पाणी देऊन आम्ही कुठून कसे आलो वगैरे चौकशी केली. त्यातल्या जुन्या पिढीतल्या महिलांनी मावळी वळणाची कासोट्याची साडी नेसली होती. कष्टाने रापलेल्या त्यांच्या हातांवर वेगवेगळ्या नक्षी गोंदलेल्या खुणा होत्या. दुपारी सगळी पुरुषमंडळी कामासाठी गावात गेल्यामुळे घरात लहान मुलं आणि महिलाच होत्या. घरात फारसं सामान नव्हतं. गरजेपुरत्या वस्तू असल्यामुळे घर मोकळंढाकळं वाटत होतं. सुरवातीला त्यांना आम्ही जमीन विकत घ्यायला आलेली शहरी माणसं वाटून त्या काहीशा बावरलेल्या होत्या. कोरोनाच्या काळात या मावळी भागात पुण्यामुंबईच्या अनेक पैसेवाल्या लोकांनी जमिनी घेतल्या. त्यामुळे तिथे जमिनीचे व्यवहार करून देणार्‍या एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे कुठलाही नवा माणूस जमिनी घ्यायलाच आला आहे, असंच सगळ्यांना वाटतं. आम्ही फक्त डोंगरी भाग आणि कुसूर घाट बघायला आलोय, अशी या बायकांची खात्री पटल्यावर त्यांची भीती निवळली आणि जुनी ओळख असल्यासारख्या त्या आमच्याशी बोलू लागल्या. त्यांच्या बोलण्यातून कळलं की इथे मुलांच्या शाळेचा मोठाच प्रश्न आहे. कुटुंबातील काहीजण मुलांच्या शाळेसाठी वडगावला स्थलांतरित झाले आहेत. पाण्याचा प्रश्नही तेवढाच गंभीर आहे. उन्हाळ्यात या महिलांचा सगळा दिवस लांबून पाणी आणण्यातच जातो. त्यांच्या घरातला मोठा मुलगा जनरल मोटर्समध्ये कामाला होता. पण कंपनी बंद पडल्यामुळे त्यांच्यापुढे मोठाच प्रश्न उभा राहिला असल्याचंही कळलं. 

डोंगरावरच्या भागाची माहिती करून घेत पुन्हा मातीच्या रस्त्याला लागलो. पठारी भागाकडे जाणार्‍या या रस्त्याकडेला करवंदाच्या जाळ्यांचं रान माजलेलं होतं. मध्ये मध्ये लागणार्‍या शेतांच्या कडेला फणस, आंबा, जांभळीच्या झाडांची दाट सावली होती. पठारावर जिथे जिथे वनखात्याची जागा होती, तिथे घनदाट जंगलाचा पट्टा होता. डोंगरवाडीपासून पुढे पाच किलोमीटरवर अशाच घनदाट जंगलाचा भाग आहे. या जंगलात सटवाईचं नव्याने बांधलेलं मंदिर दिसलं. मंदिराच्या पुढे सुपे आडनावाच्या डोंगरकोळ्यांची आणखी एक लहान वाडी होती. तिला सटवाईची वाडीच म्हणतात. दुपारच्या वेळेला वाडीत फारसं कुणी नव्हतं. जंगलात काही स्त्री-पुरुष कोयते घेऊन झाडाचे फाटे तोडून आणायला चालले होते. वनखात्याच्या माणसांनी त्यांना पाहिलं असतं तर चांगलाच दंड वसूल केला असता. एकंदर वनखात्याबद्दल पठारावरच्या लोकांमध्ये भीतीची आणि तिरस्काराची भावना असल्याचं अनेकांच्या बोलण्यातून येत होतं. 


जंगलातून जाणार्‍या पाण्याच्या ओहोळात अजूनही पाण्याची बारीक धार वाहत होती. त्यामुळे परिसरात गारवा होता. सटवाई मंदिराच्या आजूबाजूची जागा साफसूफ करून उतारूंची सोय केलेली वाटत होती. त्याला न्याय देण्यासाठी आम्हीही थोड्या वेळ तिथे टेकलो. सटवाई ही पुरुष सहचर नसलेली मातृदेवता. त्यामुळे या भागात ‘म्हसोबाला नाही बायको अन् सटवाईला नाही नवरा’ असं गमतीने म्हंटलं जातं. मंदिरात मध्ययुगीन काळातली दगडी शिळेतली सटवाईची उठावदार मूर्ती आहे. या मूर्तीच्या पोटात असणार्‍या दोन खोलगट भागांत सुपारी लावून कौल घेतला जातो. नवीन कामाची सुरुवात करताना सटवाईला कौल लावून देवाची इच्छा जाणून घेण्याची प्रथा या भागात आहे. महाराष्ट्रात बहुतेक घरांमध्ये बाळाच्या जन्मानंतर पाचवीची पूजा केली जाते, ती या सटवाईचीच असते. या वेळी सटवाई बाळाचं विधिलिखित लिहिते, अशी लोकश्रद्धा आहे. यामुळे या परिसरात लहान मुलांच्या जन्मानंतर देवीचं दर्शन घ्यायची पद्धत आहे. 

मंदिराला वळसा घालून पुन्हा मातीच्या रस्त्याने प्रवास सुरू केला. तिथून पुढे पठाराचा समतल भाग पाहून आपण डोंगरावर आहोत की सपाटीवर असा प्रश्न पडला. कुठे, रानात चरत असलेल्या गायी-म्हशी आडव्या जात होत्या, कुठे म्हशींचा कळप सावलीला बसलेला दिसत होता. वनखात्याची जागा सोडून गवळी धनगरांनी कसलेल्या भातखाचराच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. ठिकठिकाणी मोठ्या डेरेदार झाडांवर पावसाळ्यासाठी गवताच्या पेंढ्यांचे भारे राखून ठेवलेले होते. थोड्या वेळाने पुन्हा घनदाट जंगल लागलं. 

बाहेरच्या टळटळीत उन्हात आणि या थंडगार जंगलाच्या तापमानात कमालीचा फरक होता. सदाहरित जंगलाच्या या भागात जुनी, प्रचंड मोठी खोडं असणारी अनेक झाडं होती. सापासारख्या वेटोळ्या मारलेल्या महावेली त्या झाडांशी एकरूप झालेल्या होत्या. जमिनीवर वर्षानुवर्षं साचलेल्या पाल्यापाचोळ्याचा ढीग होता. झाडांच्या बुंध्याशी असणारी मोठाली वारुळं जंगलाच्या अस्पर्श जैवविविधतेची साक्ष देत होती. या भागात मला पहिल्यांदाच पांढर्‍या फुलपाखरांचं दर्शन झालं. 

याच जंगलात वाघजाई देवीचं अलीकडे नव्याने बांधलेलं खोलीवजा मंदिर दिसलं. या मंदिरात शेंदराने माखलेला तांदळा वाघजाईचं अस्तित्व दाखवत होता. पठारावर राहणार्‍या गुराख्यांच्या गुरांची राखण करणारी वनदेवी म्हणून ती पूजली जाते. मावळातल्या बहुतेक घाटवाटांवर वाघजाईची ठाणी आहेत. अशा मंदिरांमध्ये सहसा कुठलीही मूर्ती नसते. वाघजाईचं अस्तित्त्व अनघड पाषाणातच पाहिलं जातं. गुरांना घेऊन रानोमाळ फिरणारे गवळी धनगर त्यांच्या आजारी पडलेल्या किंवा हरवलेल्या गुरांसाठी या देवीला नवस करतात. स्थानिकांच्या लोकपरंपरेत वाघजाईच्या पूजेला मोठं महत्त्व आहे. 

वाघजाई मंदिराला मागे टाकून पुढे निघालो, तेव्हा जंगलात डावीकडे चढावर छोटीशी वाडी दिसली. लहान मुलांचा गलका ऐकून तिकडे मोहरा वळवला. या वाडीतल्या घरामागे उतारावर वरईचं पीक काढलेलं दिसत होतं. इथे राहणार्‍या बापू शेडगे याने गार पाणी आणि ताक देऊन आमचं स्वागत केलं. कुठल्यातरी गणपती मंडळाचा भगवा टीशर्ट, डोक्यावर स्थानिक धनगर घालतात तशी टोपी आणि बारकी चड्डी घातलेला बापू हा तरणाबांड मुलगा होता. त्याच्या घराबाहेरच्या झाडाखाली घोंगडीवर विसावत गप्पा सुरू झाल्या. भोवती बागडणार्‍या लहान मुलांना पाहून मी विचारलं, ‘‘मुलं कितवीला आहेत? कुठल्या शाळेत जातात?’’ त्यांचं उत्तर ऐकून मला धक्काच बसला. ‘‘अवो, इथं दोन वरीस कुनीच सालेला गेलेलं नाय. तो कोरुना आला तवापासून नायच.’’ शाळा ऑनलाईन सुरू नाही का असं विचारल्यावर त्यांचं उत्तर होतं, ‘‘इथं मोबाईलला रेंजच नाही, तर पोरं कुठून शिकणार? पूर्वी एक मास्तर सटवाईच्या वाडीला आठवड्यातून दोन दिवस यायचा. आता तोही येत नाही.’’ 


यानंतर काय बोलावं हे मला कळेना म्हणून विषय बदलून विचारलं, ‘‘या डोंगरवाटेने खाली कोकणात किती लोक जातात?’’ त्यावर बापू म्हणाला, ‘‘आता आमी धनगर सोडून कुनी या वाटेनं जात नाय. आमी बी लय दिस खाली गेलो नाय पर जातू कावा तरी एकांद्या टायमाला. पाऊसकाळात तर ती वाट लय धोकादायक असते.’’ आमचं बोलणं चालू असताना घरातल्या बायका कोण कुठली मुलं आमची चौकशी करताहेत, या भावनेने आमच्याकडे कौतुकाने बघत उभ्या होत्या. त्यातल्या म्हातार्‍या बायकांना विचारलं, तुम्हाला काय लागलं खुपलं, तर दवाखाना कुठाय? त्यावरही बापूनेच उत्तर दिलं. म्हणाला, ‘‘चार महिन्यामागं इथं आमच्यातला एक शिक्षक साप चावून मेला. राती त्याला साप दोन वेलेला चावला. डोंगर उतरून खाली घेऊन गेले. पण जातांना वाटेतच मेला तो.’’ यावरही आमच्याकडे बोलण्यासारखं काही नव्हतं. 

बापूच्या घराला वळसा मारून आम्ही पठाराच्या टोकाकडे निघालो. या वाडीपासून पुढे काही अंतरावर पुन्हा जंगलाचा पट्टा लागला आणि नंतर झाडांची दाटी कमी होत होत गवताळ भाग समोर आला. वार्‍यावर लाटांसारखं पुढेमागे होणारं गवताचं रान बघून मला क्षणभर माणदेशातच आल्यासारखं वाटलं. या पठारी भागात मध्येच लाल माती आणि नंतर काळी करडी, जांभळट माती लागत होती. काही ठिकाणी चालताना मला स्फटिकांचे चमकणारे दगड मिळाले. त्यातल्या एकात मध्ये जांभळा चमकणारा दगड आणि भोवती पांढरं स्वच्छ स्फटिकाचं आवरण होतं. या गवताळ भागात मोठमोठे शिलाखंड कुणीतरी सगळीकडे पसरून ठेवले असावेत तसे पडलेले होते. पावसाळ्यात वेगाने येणार्‍या ओहोळाच्या कडेला ते पाण्याच्या पांढर्‍या रेषांच्या खुणा घेऊन पडून होते. सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांना वेगवेगळे आकार पडले होते. जवळच झुडपांमध्ये वानरांची छोटी टोळी सावलीत बसून एकमेकांच्या डोक्यात हात घालून केसातल्या उवा काढताना दिसली. मला बघताच त्यांनी जागा बदलली आणि लांब जाऊन पुन्हा आपलं काम करू लागले. इथे फारशी मोठी झाडी नव्हती. पण दोनतीन झाडांच्या सावलीत वाघोबाचं एक दगडी मंदिर उभं होतं. पक्क्या बांधकामातलं हे मंदिर पाहून इतक्या लांबवर बांधकामाचं साहित्य कसं आणि कुठून आणलं असेल असा प्रश्न पडला. मंदिरामध्ये वाघाची फारशी उठावदार नसलेली शेंदूर लावलेली शिळा होती. वाघापासून आपल्या गुरांचं रक्षण व्हावं, म्हणून गुराखी वाघालाच देव मानून त्याची पूजा करतात. अशी मंदिरं भारतभर डोंगरदर्‍यात रानोमाळ आहेत. मावळी मुलखातही अशी बरीच मंदिरं आहेत. त्यांचं एक समान वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक मंदिरं घाटमार्गावरच आहेत. 

या मंदिरापासून काही अंतरावरच दगडी बांधणीतलं मोठं घर आणि गुरांचा गोठा होता. घरासमोर हिरड्याचं झाड आणि गरजेपुरत्या झाडाझुडपांचा बगीचा राखलेला दिसला. घराबाहेर गाईंचा कोंडाळा आणि सोबत भला मोठा ढवळा बैल उभा होता. घरात जुन्या लाकडाच्या भक्कम मेढी छताला आधार देऊन उभ्या होत्या. पठारावरच्या सगळ्या घरांप्रमाणे इथेही गरजेपुरत्याच वस्तू होत्या. घराच्या जाड भिंतीत एक देव्हारा आणि कपाट कोरलेलं होतं. दारांच्या लाकडी चौकटीवर पानाफुलांची नक्षी कोरलेली होती. घरात गेल्यागेल्या जाणवला तो तिथला थंडावा. पठार आणि खालच्या रहाळातल्या सगळ्यात जाणत्या वयस्कर माणसाचं ते घर होतं. त्यांचं नाव धोंडिबा आखाडे. वय अवघं पंच्याहत्तर वर्षं. अजूनही सपासप झाडाच्या शेंड्यावर चढणारे हे आजोबा कुठल्याच अंगाने थकलेले दिसले नव्हते. स्वच्छ पांढरं धोतर आणि पांढरी बंडी घातलेले धोंडिबा वारकरी होते. आजूबाजूच्या मुलखातली सगळी बारीक सारीक माहिती त्यांना होती. एकेकाळी ते या घाटाने ते रोज खालच्या गावांमधे दूध, लोणी विकायला जात. एवढंच नव्हे, तर वर्षातले चार महिने ते आपल्या गुरांना घेऊन कुसूर घाटातच मुक्काम करत. धोंडिबांनीही आमची विचारपूस करता करता ताकाचे पेले हातात दिले. 

पठाराच्या एका टोकाला असणार्‍या त्यांच्या घरात अजूनही वीज पोहोचलेली नाही. बैलगाडी जुंपून बरंच लांबून पाणी आणावं लागतं. साहजिकच आपल्या शहरी समजेला प्रश्‍न पडतो, ही मंडळी इथे का राहतात? न राहवून मी त्यांना हा प्रश्‍न विचारला. धोंडिबा म्हणाले, ‘‘आमी या मुलखातलीच माणसं. आमच्या किती पिढ्या इथे खपल्या कुणास ठावूक. आता आम्ही दुसरीकडे राहायला कसं जाणार? पूर्वी आमची लोकं जनावरं घेऊन पार कोकणात कल्याण पातूर जायची. पण आमचा राहीचा ठिकाणा हाच होता.’’ त्यांच्याकडे जुन्या वस्तू, कागदपत्रं बघायला मिळतील, असं मला वाटत होतं. तसं त्यांना म्हणालो, तर त्यांचं म्हणणं पडलं, ‘‘पूर्वी आम्ही एका जागी राहायचो नाय. त्यामुळे घर लुटलं जायचं. थोडं फार होतं ते आमची काही माणसं खाली कोकणात राहायला गेली त्यांनी नेलं.’’ असं म्हणून त्यांनी पूर्वीच्या काळच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. ‘‘पूर्वी आमची माणसं चांगल्या स्थितीत होती. आम्ही रानवट दिसत असलो तरी मनानं आमची माणसं लय दिलदार हायेत.’’ काही वेळ अशा गप्पा झाल्यावर त्यांना पुढच्या रस्त्याची माहिती विचारली. या डोंगरावरुन ढाक बहिरी डोंगरावर, एवढंच नव्हे तर भीमाशंकरलाही जायला रस्ता आहे, असं धोंडिबांनी सांगितलं. डोंगरावरचं जंगल, तिथल्या वाटा, जंगलातली जनावरं अशी बरीच माहिती दिली. रानडुकरांच्या आणि सांबरांच्या त्रासाला कंटाळून धोंडिबांनी शेती सोडून दिली असल्याचंही आम्हाला कळलं. 

सध्या या डोंगरावरून जाणारी पायवाट धोकादायक झाल्यामुळे कुसूर गावातून जुन्या घाटवाटेवरून जाण्याचा सल्ला त्यांनी आम्हाला दिला. या पठारावरच्या शेवटच्या टोकावर जाऊन आम्ही डोंगराखालचं कुसूर गाव, ढाकचा किल्ला डोळ्यात साठवायचा प्रयत्न केला. या डोंगराच्या दुसर्‍या नाळेवर सांबरांचा कळप हिंडताना दिसला. दुसर्‍या दिवशी कुसुर गावातून प्राचीन घाटमार्गावर जायचं ठरवून आम्ही माघारी फिरलो. वाटेत रानडुकरांचा लहान कळप प्रचंड वेगाने पलीकडच्या रानात घुसताना दिसला. श्‍वास रोखून या ताकदवान जनावरांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही डोंगरउतार झालो. 

दुसर्‍या दिवशी डोंगराकडेने असलेल्या रस्त्याने वडेेशर, बोरिवली, दहुली, कुसवली या वाड्या मागे टाकून आम्ही कांब्रे गावात पोहचलो. आदल्या दिवशी फिरून पाहिलेल्या डोंगराचा उभा कातळ कडा या गावच्या मागे आहे. या कातळातच कुसूर घाटाकडे जाणार्‍या आणि येणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी कोरलेल्या प्राचीन लेणी आहेत. कांब्रे गावची वस्ती मागे टाकून लेण्यांकडे जाणारा रस्ता डोंगरपायथ्याच्या जंगलातून जातो. हा रस्ता जिथे संपतो, तिथे कातळात उभी चढण आहे. इथून चढून लेण्यांपर्यंत जाण्यासाठी शिडीचा नाहीतर रोपचा आधार घ्यावा लागतो. वर चढण्यासाठी असलेल्या खाचांमध्ये हातापाय रोवत चढून गेल्यानंतर आडवा रस्ता डोंगराला कपारीतून घासून गेलेला आहे. या कपारींचा छतासारखा उपयोग करून काही दगडी भिंती बांधून खोल्या केल्याच्या खुणा दिसतात. पण आता त्यांची बरीच पडझड झालेली आहे. इथल्या कपारीत सलग चार पाण्याच्या टाक्या खोदलेल्या दिसतात. मुख्य लेणी असणारी जागा दुसर्‍या कपारीत असल्यामुळे पहिल्या कपारीतून तिकडे जाण्यासाठी साधारण पंधरा फुटांचा बोगदा काढलेला आहे. एकावेळी एकच माणूस जाईल असा. या बोगद्यातून रांगत पुढे गेल्यानंतर थोड्या उंचावर असलेल्या दुसर्‍या कपारीत जाण्यासाठी चार-पाच पायर्‍या कोरलेल्या आहेत. 

ही सगळी कसरत करत आम्ही अखेर लेणींपाशी पोहोचलो. ही लेणी चांगल्या अवस्थेत होती. तिच्या प्रवेशद्वारावर द्वारशाखा कोरलेली होती. इथेही लेण्यांबाहेर तीन पाण्याच्या टाक्या असून पावसाचं पाणी जाण्यासाठी केलेली रचनाही आहे. सध्या त्यात पाणी नव्हतं. या लेण्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं धार्मिक चिन्ह, खुणा, मूर्ती किंवा शिलालेखही नसल्यामुळे या लेणी कोणत्या पंथाच्या आहेत, ते कळत नव्हतं. या लेण्यांसमोरचा कपारीचा उघडा भाग नंतर कुणीतरी दगडी भिंत बांधून उपयोगात आणल्याचं दिसत होतं. या लेण्यांतून समोरच आंध्र नदीवरचं धरण आणि त्याच्या भोवतीचा टापू स्पष्ट दिसत होता. काहीवेळ या लेणींमध्ये घालवून आम्ही कुसूर गावाकडे निघालो . 

कुसूर या गावामुळेच तिथल्या घाटाला कुसूर नाव पडलेलं आहे. कुसूर हे पांढरी फुलं येणार्‍या एका वनस्पतीचंही नाव. ती वनस्पती या गावात अन् घाटात असल्यामुळेच त्याला हे नाव पडलं आहे का कोण जाणे! कुसूर गावाचा परिसर मोठा आहे. पण तिथली लोकसंख्या मात्र जास्त नाही. मुख्य गावात तुर्डे या एकाच आडनावाच्या लोकांची वस्ती आहे, तर मोरमारेवाडीत महादेवकोळी लोकांची वस्ती आहे. या गावात पोचलो तेव्हा बरीच दुपार झाली होती. डोंगरातून घाटाकडे जाणार्‍या वाटेसाठी कुठेही माहिती फलक नव्हते. गावात चौकशी केल्यावर शिवाजी देशमुख हे आमच्याबरोबर वाटाड्या म्हणून यायला तयार झाले. बारीक अंगकाठीचे शिवाजी देशमुख मूळचे घाटाखालचे. परंतु एकदोन पिढ्यांपूर्वी ते घाटावर येऊन वसले आहेत. घाटाखाली त्यांचे बरेच नातेवाईक असल्यामुळे घाटाची वाट त्यांच्या पायाखालची होती. गाव मागे टाकून एका विहिरीजवळून गर्द झाडीतून ते आम्हाला घेऊन एका पायवाटेने जुन्या घाटाच्या दिशेने निघाले. 

हा रास्ता पायवाटेचा असला तरी इंग्रज काळापर्यंत त्यावरून बैलगाड्याही जायच्या असं देशमुखांनी सांगितलं. त्यावेळी या घाटातून जाणार्‍या गाड्यांवरचा महसूल किती होता, याची माहिती जुन्या गॅझेटियर्समधून मिळते. देखभाल आणि डागडुजी न केल्यामुळे आज हा रस्ता पायवाटेपुरताच शिल्लक राहिला आहे. पावसाच्या पाण्यामुळे डोंगरातून निसटलेले दगडधोंडे रस्ता अडवून बसले आहेत. 

घाट उतरताना वाघजाई आणि वाघोबा या देवतांची उघड्यावरची ठाणी लागली. वाघोबा म्हणून पूजल्या गेलेल्या शिळेवर एक वीर दोन वाघांशी लढताना दाखवला आहे. आपला प्रवास सुरक्षित पार पडावा, यासाठी प्रवासी या देवतांचं दर्शन घेऊन पाखळ पूजा बांधत. घाटवाटांवर प्रवाशांची आणि जनावरांची पाण्याची सोय केली जाई. देशमुखांनी आम्हाला लव्हाळीत लपून बसलेल्या चार दगडात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या दाखवल्या. परंतु सध्या त्या पूर्ण बुजलेल्या अवस्थेत होत्या. देशमुखांच्या चालीने चालताना मला दम लागत होता. शिवाय पायात दगडधोंडे आणि वरून मध्ये येणारी झाडंझुडपं त्यामुळे मी मागे पडतोय हे पाहून त्यांनी कंबरेला फलटणीत अडकवलेला कोयता काढला आणि रस्त्यातलं गवत, झुडपं साफ करत चालायला सुरुवात केली. 

घाटातल्या जंगलात आंबा आणि कोकम या दोन झाडांची संख्या सर्वाधिक दिसली. मध्येच नाचणीचं शेत म्हणून ओळखलं जाणारं लहानसं पठार लागलं. ही जागा कुसूर गावातील बहिरोबाच्या मंदिराची. घाटउतारावर सगळीकडे कारवीचं रान आहे. कारवीला नऊ वर्षांनी निळ्या रंगाचं फूल येतं. त्यामुळे स्थानिक लोक तिला निळी म्हणतात. या कारवीच्या काड्यांनी कुडाच्या भिंती बांधल्या जातात. 

घाटात बर्‍याच दगडांवर सुरुंगाच्या खुणा दिसत होत्या. वडगावच्या मराठा-इंग्रज युद्धात इंग्रजांना पराभवाचा सामना करावा लागला. या युद्धावेळी इंग्रजांना घाटावर मोठ्या तोफा चढवता आल्या नाहीत. त्यामुळेच त्यांचा पराभव झाला, असं काही इतिहास अभ्यासक मानतात. या लढाईचं अपयश धुवून काढण्यासाठी इंग्रजांनी पुण्याकडे जाणारे दोन चांगले घाट रस्ते दुरुस्त करायचं ठरवलं. त्यातला पहिला घाट म्हणजे आपण आज मुंबईला जाण्यासाठी वापरतो तो खंडाळ्याचा बोरघाट. दुसरा हा कुसूर घाट. पुढे बोरघाट मोठा झाल्यामुळे मुख्य वाहतूक त्या घाटाकडे वळवली गेली आणि कुसूर घाटाकडे दुर्लक्ष झालं. 

तरीही स्थानिकांनी हा जुना घाट वर्दळीचा ठेवला. पूर्वी घाटावरच्या लोकांना देशावरच्या तळेगाव किंवा वडगावपेक्षा घाटाखालच्या कर्जतचा बाजार जवळचा वाटायचा. डोंगरावरच्या धनगरांनाही घाटाखाली दूध, लोण्यासाठी चांगलं गिर्‍हाईक मिळायचं. 

प्राचीन काळी या मार्गावर कसा व्यापार चालत असे याचे लिखित पुरावे मिळत नाहीत. पण इथून होणारा व्यापार नक्कीच फायद्याचा असणार याची साक्ष घाट मार्गावरील लेणी देतात. घाटाच्या शेवटच्या टप्यावर प्राचीन काळापासून प्रवाशांची तहान भागवत आलेली गार आणि स्वच्छ पाण्याची चार टाकं आहेत. पूर्वी पाच टाकं होती. त्यातलं एक टाकं बुजत गेल्याची माहिती देशमुखांनी पुरवली. कातळातली एवढी मोठी टाकी खोदणं सामान्य माणसाला शक्य नाही. त्यामुळे पाच पांडवांनीच ही टाकी खोदली असल्याचं इथल्या लोककथा सांगतात. पांडवांनी एका रात्रीत ही टाकी आणि कांब्रे लेणी खोदली. सकाळ होताच ते गुप्त झाले अशी आख्यायिका इथे ऐकायला मिळते. 


घाटाखाली कर्जत तालुक्यातलं भिवपुरी हे गाव लागतं. याशिवाय हुमगाव, मांडवणे, कराळवाडी ही गावंही जवळच आहेत. पण तो रस्ता कुठे जातो हे पाहून पुढे न जाता आम्ही मागे वळलो. घाट चढताना मी देशमुखांना विचारलं, ‘‘सध्या तुमच्या इथले किती लोक हा घाट वापरतात?’’ ते म्हणाले, ‘‘आता पूर्वीसारखा हा रस्ता कोणी वापरत नाही, म्हणून तर इतकं रान माजलं आहे. आम्ही तरुणपणी खालच्या गावातून बाजार करून डोक्यावर दहा-वीस किलो वजनाच्या पिशव्या घेऊन घाट चढायचो. आता मात्र कधीतरीच जाणं होतं.’’ 

घाटात मध्येच थांबवून त्यांनी मला पांढर्‍या खोडाची झाडं दाखवली. ‘‘हे झाडं नेमकं कशाचं आहे माहीत नाही. पण रात्री ठाकर येऊन याचा चिक काढतात. खोडाला उभा काप मारला की त्यातनं चीक पाझरतो. पावसाळ्याच्या दिवसात खालचे कातकरी घाटात येत जात असतात. ते वरती मासे पकडतात आणि ते खाली विकायला घेऊन जातात. त्यांच्यात पकडणारे वेगळे आणि ते वाहून नेणारेही वेगळे असतात.’’ या घाटाकडे येताना ठोकळवाडी धरणाकडेला कुडाच्या भिंतींच्या बारक्या झोपड्या दिसल्या होत्या. त्या कुणाच्या याचा उलगडा मला झाला. या भागात कातकर्‍यांना त्यांच्या घरापुरतीही स्वतःची जागा नसते. ते कुठेही उघड्यावर बारक्या झापा टाकून राहतात. पावसाळ्यात कोकणातून वर येऊन मासे पकडणं आणि इतर वेळी शिकार करणं ही त्यांची कामं. कुसूर घाटावर राहणार्‍यांचे जसे घाटाखालच्या लोकांशी संबंध आहेत, तसेच खालच्या ठाकर, कातकर्‍यांचेही आहेत. 

आम्ही घाट चढताना खाली उतरणारे दोन धनगर भेटले. ते खाली नातेवाईकांकडे चालले होते. घाटाखालून देहू आळंदीला जाणार्‍या दिंड्या अजूनही कुसूर घाटातूनच येजा करतात, असंही देशमुखांकडून कळलं. घाट चढून पुन्हा कुसूर गावात आलो, तेव्हा माळरानावर माजलेलं गवत कापत ओळीने बायका बसल्या होत्या. रानात गवताच्या पेंढ्यांचा भलामोठा ढीग उभा केला होता. देशमुखांनी सांगितलं, ‘‘या भागातून गवताच्या पेंढ्या शहरातल्या गोठ्यांकडे पाठवल्या जातात. एका गवताच्या पेंढीला तीन रुपये दर मिळतो. गावात फारसं कोणी शेती करत नाही. एकतर इथे पाऊसकाळ खूप. त्यात धुकं, त्यामुळे भातपीक काळं पडतं.’’ मग इतर हंगामात शेती होते का असं विचारल्यावर त्यांनी घराच्या अंगणात पडलेल्या डिझेल इंजिनकडे बोट दाखवून सांगितलं, ‘‘या दिवसात इंजिनने धरणातलं पाणी खेचून इथं शेती व्हायची. इथून वाशी मार्केटला ट्रक भरून भाजी जायची. पण डिझेल महागल्यावर ते बी बंद झालं. आता माणसं मुंबईतल्या लोकांच्या बंगल्यांवर कामाला जातात.’’ 

• 

इतक्या वर्षांपासून या डोंगरावर राहणार्‍या लोकांची पाण्याची, रस्त्याची, विजेची सोय अजूनही झालेली नाही. शिक्षण-आरोग्य वगैरे तर लांबच. रोडावत चाललेली शेती आणि त्यामुळे करावं लागणारं स्थलांतर ही इथली मोठी समस्या आहे. कधीकाळी व्यापारी मार्गावर असणारी ही गावं आज दुर्गम ठरली आहेत. नव्या व्यवस्थेत तिथला जुना गावगाडा मोडकळीस आलेला आहे. पण अजूनही स्थानिकांनी वापरात ठेवलेला घाट पुढेमागे पुन्हा बांधला गेला, तर वाहतुकीसाठी हा रस्ता खुला होईल. स्थानिकांना नव्या रोजगाराच्या संधीही तयार होतील. तशी एखादी संधी येईपर्यंत या पठारावरचे लोक आडवाटेला आहेत तसे पडून राहणार.. 


प्रणव पाटील 

युनिक स्कूल ऑफ जर्नलिझमचा विद्यार्थी 

असून इंडॉलॉजी हाही त्याच्या अभ्यासाचा विषय आहे. 

९८५०९०३००५

pranavpatil26495@gmail.com

________________________________________________________________________________


• अनुभव जानेवारी २०२२च्या अंकाची पीडीएफ खरेदी करण्यासाठी लिंक : https://bit.ly/3HXUGXT

• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://bit.ly/3JASplA

• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक : https://bit.ly/34GWmXn

• अनुभव मासिकातील इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगला भेट द्या : https://bit.ly/36zs3lP

• PDF अंक वार्षिक - ₹ ४००

• अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :

वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० ।


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८