वर्तमानाच्या नोंदी : दोन पक्ष - - सुहास कुलकर्णी
वर्तमानाच्या नोंदी
आसपास घडणाऱ्या घटना घडामोडींचा संदर्भ समजून सांगणारी टिपणं.
दोन पक्ष
काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे भारतातल्या सर्वाधिक जुन्या पक्षांपैकी पक्ष. काँग्रेसचं एकेकाळी देशभर वर्चस्व होतं, तर कम्युनिस्टांचं काही थोड्या राज्यांमध्ये. आज हे दोन्ही पक्ष पूर्णपणे गळफटले आहेत.
काँग्रेसचा विचार करता त्यांची परिस्थिती कम्युनिस्टांपेक्षा बरी आहे. देशभर या पक्षाचं अजूनही अस्तित्व आहे आणि संख्येने कमी का असेना, पण त्यांचे आमदार-खासदार निवडून येत आहेत. काही राज्यांमध्ये अजूनही ते प्रमुख पक्षाच्या भूमिकेत आहेत. पण कम्युनिस्ट मात्र केरळ वगळता देशभरातून जवळपास हद्दपार झालेले आहेत. बंगालात सलग पस्तीस वर्षं सत्ता गाजवून विक्रम केलेले कम्युनिस्ट तिथेही जवळपास नामशेष झालेले आहेत. एखादा पक्ष स्वत:ची सत्ता आणि प्रतिमा कशी घालवून बसू शकतो, याचं कम्युनिस्ट पक्ष हे उत्तम उदाहरण ठरावं.
एकेकाळी भारतातल्या कामगार चळवळीचं नेतृत्व करणारा आणि बिगर काँग्रेस-बिगर भाजप राजकारणाचा अध्वर्यू पक्ष आज निस्तेज आणि निष्प्रभ बनलेला आहे. स्वतंत्रपणे लढा किंवा आघाडी करून लढा, पक्षाची स्थिती दुरुस्त व्हायला तयार नाही.
कम्युनिस्टांचं अपयश निवडणुकीतील पराजयापलिकडेही आहे. बंगाल-त्रिपुरामधील सत्ता गेल्यानंतर या पक्षाच्या हातापायातील शक्ती गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू या राज्यांमध्येही कम्युनिस्टांची काही एक ताकद होती. या सर्व राज्यांतून पक्ष सर्वस्वी उखडला गेला आहे. कार्यालयं, जुने कार्यकर्ते, तुरळक नवी भरती याच्यापलिकडे पक्षाचं अस्तित्व राहिलेलं नाही. नाही म्हणायला किसान सभा या संघटनेमार्फत काही राज्यांमध्ये आंदोलनं-चळवळी केल्या जातात. पण त्याचा पक्ष उभारणीला काहीही उपयोग होताना दिसत नाही.
त्यामुळे हा पक्ष आपलं चळवळेपण गमावून नावापुरता उरला आहे. कम्युनिस्टांचे दोन प्रमुख पक्ष. त्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष आधीच उतरणीला लागला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष थोडी ताकद बाळगून होता. पण २००९ साली काँग्रेससोबत काडीमोड घेतल्यानंतर या पक्षाचीही घसरण सुरू झाली. आजघडीला या पक्षाचे लोकसभेत ५४४ पैकी फक्त ३ खासदार आहेत आणि देशभरातील ४०३६ आमदारांपैकी फक्त ८८ आमदार. त्यातीलही ६६ आमदार एकट्या केरळातील आहेत. उरलेल्या २२ पैकी १६ त्रिपुरातील आहेत. म्हणजे उर्वरित देशभरातून फक्त ६. पक्षाच्या या जबरदस्त पीछेहाटीला कोण, का आणि कसे जबाबदार आहे याची चर्चा करण्याची ताकदही हा पक्ष आता गमावून बसला आहे.
अलिकडेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोची फेररचना करण्यात आली. सीताराम येच्युरी यांच्याकडे पक्षाचं सर्वोच्च सचिवपद कायम राहिलं. शिवाय राज्याराज्यांतून नवे चेहरे समाविष्ट करण्यात आले. या फेरबदलानंतर नेत्यांच्या ज्या मुलाखती किंवा संबंधित बातम्या आल्या, त्या पाहता हा पक्ष गेल्या दशकाप्रमाणेच ‘डीप स्लीप’मध्ये राहील, असं दिसत आहे. तेच ते घिसंपिटं बोलणं आणि तोच तो (केविलवाणा) दुर्दम्य आशावाद. १९२५मध्ये पक्षाची स्थापना झाल्यापासून ज्या विचारधारेविरुद्ध हा पक्ष उभा राहिला, त्याचं राष्ट्रव्यापी वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतरही त्याविरुद्ध लढण्याचं एकही हत्यार या पक्षाकडे असल्याचं दिसत नाही. आजच्या भारतीय मतदारांची मनोवस्था, त्यांनी कम्युनिस्टांना सर्वस्वी नाकारण्यामागील कारणं, नवा पर्यायी विचार आणि तडाखेबंद कार्यक्रम याची सर्वस्वी वानवा जाणवते आहे. अर्थातच जो पक्ष स्वत:च्या अस्तित्वाचा हेतू गमावून बसतो आणि स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं बळ घालवून बसतो, तो इतिहासजमा होत असतो.
कम्युनिस्टांमध्ये पूर्वी एकमेकांविरुद्ध भांडण्याची तरी खुमखुमी होती. आता तीही उरलेली नाही. वाद घालायला पक्षात माणसं तरी हवीत ना! पक्ष नव्या परिस्थितीचं आकलन करून नवा विचार करायला तयार नाही, त्यामुळे पक्षाकडे कार्यक्रम नाही, म्हणून पक्षाकडे तरुण पिढी आकर्षित होत नाही, म्हणून पक्ष उभा राहत नाही... असं हे दुष्टचक्र आहे. देशात आज सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणापासून कामगार कायद्यांना पातळ करण्यापर्यंत आणि धार्मिक उन्मादाचं राजकारण करण्यापासून ते प्रचंड विषमता तयार होण्यापर्यंत अनेक गोष्टी घडत आहेत. परंतु याबद्दल काही जोरकस करावं असं वाटण्याइतपत कम्युनिस्टांमध्ये प्राण शिल्लक राहिलेला नाही. भारताच्या राजकारणात एकेकाळी महत्त्वाची भूमिका पार पाडणार्या या पक्षाची आज ही अशी अवस्था झालेली आहे.
काँग्रेसची परिस्थिती अजून इतकी दयनीय झालेली नाही. तिथे अजूनही माणसं-कार्यकर्ते-नेते शिल्लक आहेत. जी २३ हा बंडखोर नेत्यांचा गट तयार होणं हे त्याचं लक्षण आहे. पण निर्णय घेण्याबाबतची स्पष्टता नसणं, अत्यंत संथगतीने वाटचाल करणं आणि राजकीय आव्हानाला भिडण्यासाठी आवश्यक व्यूहरचना नसणं यामुळे काँग्रेसही जबरदस्त उतरणीला लागला आहे. राज्यसभेचे माजी उपसभापती पी जे कुरियन हे काँग्रेसचे जुने जाणते, निष्ठावान आणि हुशार नेते. त्यांची हल्लीच एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्या मुलाखतीत ते जे बोलत आहेत, ते पाहता काँग्रेस पक्ष किती खोल गाळात अडकला आहे हे कळतं. ज्या राहुल गांधींच्या हाती पक्षाची सूत्रं आहेत, त्यांना अध्यक्षपदी स्वीकारायला काँग्रेसजन तयार नाहीत आणि राहुल अध्यक्ष न बनता पक्ष स्वत:च्या हाती ठेवू पाहत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. शिवाय राहुल यांच्या क्षमतांविषयीही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहेच.
असं असताना जणू काही घडलेलंच नाही असं मानत सोनिया-राहुल-प्रियंका गांधी हे ए. के. अँटनी आणि अंबिका सोनी यांच्यासारख्या जुनाट नेत्यांसोबत पक्षात ऊर्जा भरण्याच्या चर्चा करत आहेत. निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांचं काय करायचं, इतका साधा प्रश्न हा पक्ष सहा महिने सोडवू शकत नाही, अशी पक्षाची अवस्था आहे. मुळात प्रशांत किशोर यांचा सल्ला घ्यायचा का, त्यांना पक्षात घ्यायचं का, त्यांना पद द्यायचं का, त्यांना राज्यसभेवर घ्यायचं का हेच ठरत नाहीये. या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या प्लॅनबद्दल चर्चा करण्यासाठी सर्व पक्षनेते १३ मे ला जयपूरला भेटणार आहेत. या चर्चेत जी-२३ गटाचे लोक किती असणार, त्यांची मतं विचारात घेतली जाणार का, असे अनेक प्रश्न आहेत. पण काही का असेना जी २३ मुळे आणि प्रशांत किशोरमुळे काँग्रेसमध्ये काहीतरी हालचाल घडते आहे. हा पक्ष अजून जिवंत असल्याचं हे लक्षण आहे.
काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे भारतीय राजकारणातील एकेकाळचे दोन महत्त्वाचे पक्ष. त्यांची ही अवस्था पाहून भाजपचं नेतृत्व मात्र आणखी दोन निवडणुका जिंकण्याच्या तयारीला नक्कीच लागलेलं असेल.
- सुहास कुलकर्णी
suhas.kulkarni@uniquefeatures.in
• अनुभव जानेवारी २०२२च्या अंकाची पीडीएफ खरेदी करण्यासाठी लिंक : https://bit.ly/3HXUGXT
• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://bit.ly/3JASplA
• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक : https://bit.ly/34GWmXn
• अनुभव मासिकातील इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगला भेट द्या : https://bit.ly/36zs3lP
• PDF अंक वार्षिक - ₹ ४००
• अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :
वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० ।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा