फुलेल तेव्हा बघू

लेखक :  विनोदकुमार शुक्ल

भाषांतर : निशिकांत ठकार 

                                 अनुभव ऑगस्ट २०२२ 

हिंदीतील ज्येष्ठ प्रयोगशील लेखक विनोदकुमार शुक्ल यांच्या 'खिलेगा तो देखेंगे' या कादंबरीचं निशिकांत ठकार यांनी केलेलं भाषांतर नुकतंच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषेवर उलगडणाऱ्या या कादंबरीतील एक भाग. खास अनुभवच्या वाचकांसाठी.


तळ्याच्या वरच्या अंधारात आणि 

पाण्याच्या आतल्या अंधारात काही

विशेष फरक नसावा. त्यामुळे 

माशांना वरचा अंधारही पाणी वाटत 

असेल. पाण्यातल्या अंधारात पाणी होतं,

जमिनीवरच्या अंधारात पाणी नव्हतं.

फुलझाडाचं एखादं रोप लावून फूल फुलेल तेव्हा पाहू, असं म्हणून घरातले सगळेजण आपापली कामं सोडून त्यासमोर बसून राहत नाहीत. हे तर महिन्या दोन महिन्यांच्या भविष्यानंतर कळणार. वर्षांच्या भविष्याची तर अशी गोष्ट होती, की आंब्याची झाडं लावून बरेच दिवस जिवंत राहून लोक मरूनही जात. मरण्याच्या काही वर्षं आधी वाटायचं की आपण लावलेले आंबे खायला मिळतील. शेवटी आंबे न खाताच मरून जायचे. तळ्याच्या काठाकाठाने आंब्याची मोठमोठी झाडं होती. डबक्यांच्या आसपास झाडी उगवलेली होती.

गवळी लोक जनावरांना हाकलत मातादेवाला तळ्याच्या पलीकडच्या मैदानात आणून सोडत. त्यांची पैरण ठिपकेदार असायची किंवा मग गडद रंगांची. म्हशी चारण्याच्या काठीच्या एका टोकाला लाल-हिरव्या रंगांचे गुच्छ बांधलेले असत. खांद्यावर गाईच्या शेपटीच्या केसांची वळून तयार केलेली मोठी दोरी असायची. मारकुट्या गायीच्या पायाला हीच दोरी बांधून दूध काढायचे. फारच थोड्या गायी-म्हशींच्या गळ्यात पितळेच्या, काशाच्या किंवा लाकडाच्या घंटा होत्या. पितळ आणि कासे महाग झालेले होते. ओक्याबोक्या गळ्यातून गाय हंबरली म्हणजे कळायचं की गाय त्या बाजूला आहे. गल्लीतून मागून येणारी गाय किंवा म्हैस धक्का देऊन निघून जायची. ती येत असल्याचं कळत नव्हतं. जंगलात किंवा दाट झाडीत जनावरं हरवून जाण्याची भीती होती. त्यामुळे त्यांच्या गळ्यात घंटा बांधली जायची. मैदानात याची काही गरज नव्हती. एका झाडामागे एखादं वासरूही लपून राहत नसे. किंबहुना, मरतुकड्या गाय-वासरांची संख्या इतकी वाढली होती की त्यांना दुधासाठी पाळतच नसावेत- चामड्याच्या आणि हाडांच्या व्यवसायासाठी पाळत असावेत.

तीन किलोमीटर दूर एक हाड-गोदाम होतं. त्या दिशेने वारं आलं की घाण वास यायचा. अधूनमधून एक-दोन माणसं सायकलीवरून बाहेरच्या बाहेर हाडांचे मोडके सांगाडे गोदामाकडे घेऊन जात असलेली दिसायची.

मातादेवाला घरापासून विशेष लांब नव्हतं. पायी पायी दहा मिनिटांचा रस्ता होता. मुन्ना संध्याकाळी व्यायाम करायला मातादेवालाच्या आखाड्यात जात असे. मातादेवाला घरापासून लांब नसल्यामुळे घरी कोणाला त्याची काही काळजी नव्हती. मुन्नाला भूक लागली की अशक्तपणा जाणवायचा. पोटभर जेवल्यानंतरही दोन-तीन तासांनी त्याला पुन्हा पोटभर जेवायची इच्छा व्हायची. भूक लागली म्हणजे तो अगदीच गळून जातो हे सगळ्यांना माहीत होतं. भूक लागली की तो धापा टाकत खाली बसायचा. उभं राहणंही त्याला अगदी अशक्य व्हायचं. तो धापा टाकत असल्याचं दिसताच घरातलं कोणीही धावत जाऊन स्वयंपाकघरातून दोन चपात्या घेऊन यायचं. त्यासाठी एका लहान टोपलीत चपात्या ठेवलेल्या असायच्या. त्या टोपलीला चपात्यांची टोपली म्हणायचे. चपात्या कमी असल्या तरी मुन्नाच्या वाटच्या चपात्यांना कोणी हात लावत नसे. मुन्नी तर वाटीभर फराळाचं खाऊन दिवसभर उपाशी राहायची. मुन्नामुळे भात करण्याचं प्रमाण कमी झालं होतं; पण भात सगळ्यांनाच आवडायचा.

जेवण झाल्यावर मुन्ना पाणी पीत होता, काचेच्या ग्लासाने. त्याने तो हाताने घट्ट पकडलेला होता. “काचेचा ग्लास बाहेर नको काढत जाऊ.” गुरुजी पत्नीला म्हणाले. 

“दुसरे ग्लास उष्टे होते.” पत्नी म्हणाली. 

“एक ग्लास घासायला असा किती टाइम लागतो?” गुरुजी म्हणाले. 

डोळे मिटून गुरुजी आडवे झाले. डोळे मिटून फुलबाजीचा आवाज ऐकण्याला काही अर्थ नाही. फटाक्याचा अर्थ त्याचा मोठा आवाज असतो. कान बंद करून तो ऐकायचा म्हणजे फुलबाजीपेक्षाही खराब वाटतो. फुलबाजीला आवाज नसतो. कान बंद करूनही पाहिलं तरी छान दिसते. फटाके पाहण्यासाठी कान बंद करणं काही बरोबर नाही. बॉम्बचा स्फोट कसा असतो याची काही कल्पना नाही. वर्तमानपत्रात बॉम्बस्फोटाच्या बातम्या वाचून दचकायला होत नसे. फटाक्यांच्या आवाजाने मात्र दचकायला व्हायचं.

घरात साप शिरला तर दोन-तीन दिवस भीती वाटत राहायची. खाटेवर पाय खाली सोडून बसता यायचं नाही. मग साप दिसला नाही की त्याचा विसर पडायचा. घाबरल्याचंही आठवत नसे. संसाराच्या तुटक्या-मोडक्या सामानाबरोबरच भयंही गोळा होत असत. समोर मरणाऱ्या माणसाला पाहून आपलं मरण आठवत नसे. आपण जिवंत असल्याची जाणीव जन्मभर राहायची. जीवनाचे मापदंड अशा प्रकारचे होते.

घराला आग लागण्याच्या भीतीने खबरदारी म्हणून गुरुजींनी जशी पाण्याने भरलेली बादली आपल्या समाधानासाठी ठेवलेली होती, त्याचप्रमाणे मुन्नाच्या संरक्षणासाठी म्हणून त्याला पन्नास पैशांचं एक नाणं देऊन ते निश्चिंत झालेले होते. मुन्नाचा परीघ काही फार लांबलांबचा नव्हता. भूक लागायच्या आधीच घरी यायचा प्रयत्न तो करायचा. घरी यायला उशीर होणार असेल तर पन्नास पैशांची भजी खाण्याचा पर्याय होता.

एकदा घरी पोहोचण्याआधी दमल्यामुळे अर्जुनाच्या एका झाडाखाली तो बसून राहिला. पाहिजे तर भजी खाऊन घरापर्यंत जाऊ शकला असता; पण त्याला वाटलं की पन्नास पैसे वाचवून घरापर्यंत जाऊ शकू. कोणी तरी पोराने घरी जाऊन सांगितलं तेव्हा मुन्नी झोळीत चपात्या आणि तांब्याभर पाणी घेऊन गेली. चपात्या खायला घालून त्याला घरी घेऊन आली. छे छे! खायला घालणं म्हणजे काही दोरी नाही की खायला घातलं म्हणजे गळ्यात दोरी बांधली, मग दोरी धरून घरी आणलं. हरीण जंगलात स्वतंत्र असतं, हे ध्यानात घेतलं तर हरणाला बांधायची दोरी जरा जास्त लांब घ्यावीशी वाटते- त्याला जास्त लांबवर फिरता यावं म्हणून. स्वातंत्र्य पूर्णपणे कुठे संपतं? हात-पाय बांधून टाकले तरी ओरडण्याचं स्वातंत्र्य असतं. जीभ कापून टाकली तरी पूर्णपणे विचार बंद करणं कुठे शक्य होतं? ओरडण्याच्या आणि विचार करण्याच्या स्वातंत्र्याचा उपयोग नीट तऱ्हेने करता येत नव्हता.

मुन्नाचे केस विस्कटल्यासारखे असायचे. केस ओले करून जोराने विंचरले तरी ते उभे राहायचे. तो निरागस वाटायचा. त्याची ताकद आणि ताण यांची जाणीव त्याच्या आवळलेल्या ओठांवरून व्हायची. भुकेला असला तरी आवळलेल्या ओठांमुळे तो बिचारा वाटायचा. स्वभावाने तो भटक्या होता. घरात थांबून राहणं त्याला आवडत नसे. अधेलीच्या नाण्यामुळे तो लहान दोरीने बांधलेल्या हरणासारखा वाटायचा. त्याच्या खिशात पाच रुपये असते तर त्याची दोरी खूप लांब झाली असती. घरातून बाहेर पडताना तो आईला सांगून जायचा, 

“जातोय.”

“अधेली विसरला तर नाहीस ना?” आई मोठ्याने विचारायची.

“आहे, आई.” तो मोठ्याने म्हणायचा. 

नाण्याचा उपयोग तर वस्तीत होणार- मग दोन-चार माणसांची का वस्ती असेना. नाण्याच्या बदल्यात दोन-दोन चपात्या देऊ शकणारी. निर्जन ठिकाणी भुकेच्या त्रासातून वाचण्यासाठी कुणाची हत्याही करता येणार नाही. भूक सहन होत नसेल तर कुणाची तरी चपाती का नाही हिसकावून घेता येणार? चपाती हिसकावून घेण्याची वेळ यायच्या आधी लोकांना भीक मागणं बरं वाटायचं. भीक नाही मिळाली तर मरून जायचे. भीक मागणाऱ्यांसाठी जातीची सवलत होती. मुसलमानांच्या गल्लीत फकीर दिसायचा. खरेदी-विक्रीच्या बाबतीत जातीय सोय नव्हती. वस्तू स्वस्त असतील तर लोक कुणाकडूनही विकत घ्यायचे. चोरीच्या मालाचा खप जास्त होता, कारण हा माल स्वस्त आणि चांगला असायचा. 

गावाबाहेर देवार जातीची वस्ती होती. आधी हे लोक गावातल्या स्टेशनवर मुक्काम ठोकून असायचे. त्यांच्या वस्तीतला एक दाढीवाला फकीर भीक मागायला बाहेर पडायचा, तोच दुसऱ्या दिवशी साधू बनून भीक मागताना दिसायचा. तिसऱ्या दिवशी तो माकडाचा खेळ करताना आढळायचा. चौथ्या दिवशी चिंकारा ‘तारवाद्य' वाजवत शहरातून परत येत असायचा. पाचव्या दिवशी सायकलच्या कॅरियरला केकाटत असलेलं डुक्कर बांधून नेत असलेला दिसायचा. सहाव्या दिवशी कुदळ घेऊन मजुरीला निघालेला. सातव्या दिवशी नाही दिसायचा. आठव्या दिवशीही दिसत नसावा. 

प्रेमाने कोणी दोन शब्द बोललं तर सगळ्या जगात आपला कोणी शत्रू नाही असं वाटायचं. सर्वत्र दिसणाऱ्या आनंदामागे अक्षांश-रेखांशाच्या तारांचा झंकार असे. थोड्याच वेळात वातावरण सुखद होऊन जायचं. इकडच्या भागातल्या नद्या फारशा खोल नव्हत्या. खोल नदी आपल्या जोरकस प्रवाहाने स्वत:लाच आतून कापत जात होती. आजूबाजूला कापत गेल्यामुळे ती विस्तीर्ण व्हायची. मुन्ना-मुन्नीसाठी भूगोल वास्तवात दहशतीने भरलेला होता. माणूस स्वत:ला आतून कापत गेल्यामुळे पोकळ झाला होता आणि आजूबाजूने कापत गेल्यामुळे बारका होत चालला होता. खरं म्हणजे काल्पनिक अजगरांनी अक्षांश-रेखांशाप्रमाणे पृथ्वीला वेटोळं घातलं होतं. त्यांच्या काल्पनिक असण्याबद्दल संशय होता. पाऊस पडायला लागला म्हणजे वाटायचं, की घर कोसळेल, पूर येईल. नाही पडला तर प्यायला पाणी मिळण्याची पंचाईत. किती लांबच्या विहिरीवरून पाणी आणावं लागेल कोण जाणे! दुष्काळ पडेल ही शंका खऱ्यासारखी वाटायची. हवा-पाण्याचा फटका गरिबांना बसत असे. मजुरी करणाऱ्यांना पोट भरण्यासाठीच नव्हे तर श्वास घेण्यासाठीही कष्ट करावे लागत होते. धापा टाकतच त्यांचा दिवस सरायचा. 

मुन्ना-मुन्नी गप्पा मारत असतील, की पृथ्वीवर ज्या ठिकाणातून कर्करेषा जाते तिथे खोदलं तर एक जिवंत रेघ आढळेल. चुकून तिला कुदळ लागली तर रक्त निघेल. भीती वाटत असली तरी त्या रेघेला शिवावं असं त्यांच्या मनात नक्कीच आलं असेल. अचानक तिला शिवून ती दोघे नाचत-बागडत घरात शिरतील. कर्करेषा विजेच्या तारांप्रमाणे जात असेल तर त्यांचा पतंग त्यात अडकेल. दोन-तीन दिवस भूगोलाचं पुस्तक उघडायला त्यांना भीती वाटेल. आग विझवण्यासाठी ठेवलेल्या बादलीतलं पाणी उसळून समुद्र पसरेल.

चंद्र, सूर्य, तारे, आकाश घरातल्या सामानासारखे होते. चंद्र, सूर्य शाश्वत असले तरी ते इकडे-तिकडे व्हायचे. कधी कधी ते दिसले नाहीत तरी कुणाला काही वाटत नसे. गुरुजींच्या कुटुंबाला याचा काही फारसा त्रास नव्हता. चिमण्या खूप होत्या आणि त्या सगळ्या इतक्या सारख्या दिसायच्या की त्यांची संगत कधी सुटत नसे. मरण्याच्या वेळी घरातले किंवा जवळचे कोणी नसले तरी थोड्याशा प्रयत्नांनी चिमण्या दिसायच्या, त्यांचा चिवचिवाट ऐकू यायचा. आज पाहिलेली चिमणी लहानपणी पाहिलेलीच असायची. ठाण्याच्या खिडकीच्या बारमधून ती आत यायची. तिची ती हद्दच म्हणायची! शौचालयात जावं तर चिवचिव करत ती झरोक्यातून आत यायची. होऊन गेलेल्या गोष्टीपासून गुरुजींची सुटका होणं कठीणच होतं. बडगाव वगैरे इथून फार दूर नव्हतं. ते सगळं पुन्हा परत पाहायला जाणं म्हणजे साप असलेल्या खड्ड्यातून बाहेर पडल्यावर तो खड्डा पुन्हा पाहण्यासाठी त्या खड्ड्यात उतरण्यासारखं होतं. 

आकाश आत्मीय झालं होतं. घरच्या लोकांच्या तसबिरीत नित्य हजर असणारं. पण जो मध्ये असतो तोच मुख्य असतो. अशा तऱ्हेने आकाश मुख्य होतं. तसे ते सगळ्या निसर्गावर संतुष्ट होते. लुप्त होत चाललेल्या मैत्रीच्या नियतीत आपलं शत्रू होणं अटळ असेल, तर मग वाईट माणसांचे शत्रू का बनू नये? गुरुजी घरी परत आले. पत्नी काळजीने त्यांची वाट बघत होती. “मुन्ना केव्हापासून गेला आहे, तो अजूनपर्यंत आलेला नाही.” पत्नी म्हणाली. 

“किती वेळ झाला?”

“दोन तास झाले.” मुन्नी म्हणाली. ती रडवेली झाली होती. 

“नाणं होतं ना त्याच्याजवळ?” त्यांनी पत्नीला विचारलं.

“हो. जाताना मी विचारलं होतं त्याला.” पत्नी म्हणाली.

“आण. लगेच त्याची चपाती आणून दे.” गुरुजी म्हणाले.

“याच्यात आहे.” पुरचुंडी देत पत्नी म्हणाली. पुरचुंडी आधीच तयार करून ठेवलेली होती.

कुठे जावं? त्याला कुठे शोधता येईल? मातादेवालापाशी तो व्यायाम करायला जायचा; पण या वेळी नाही. तरी पण ते मातादेवालाच्या दिशेने निघाले. घरातली म्हातारी माणसं घरातून बाहेर येऊन घरासमोर बसायची ही वेळ होती. सगळी घरं मातीची आणि खापरांची होती. मातीच्या भिंती मुरमाड मातीनेच सारवलेल्या होत्या. चिकणमातीनेही सारवलेल्या होत्या. मुरमाडवाल्या भिंतींचा रंग भगवा होता. चिकणमाती पिवळी आणि पांढरी होती. म्हाताऱ्या आणि तरण्या बायकाही घरासमोर शेणाने सारवलेल्या अंगणात लहान लहान पोराबाळांना घेऊन बसलेल्या होत्या. काही घरांत पोपटाचे पिंजरे टांगलेले होते आणि अंगणात बसलेल्या बायकांच्या जवळही काही पिंजरे ठेवलेले होते. त्यामुळे प्रत्येक घरात पोपटाचा पिंजरा आहे असं वाटायचं. दोन-तीन घरांच्या छपरावर रिकामा मोडका, गंज लागलेला पिंजरा पडलेला दिसायचा. एक-दोन घरी कबुतरं पाळण्याचीही रीत होती. एखाद-दुसऱ्या घरी तितर पक्षीही पाळलेले असत.

एका राऊताने मुंगूस पाळलं होतं. त्या मुंगसामुळे राउताचं कोंदाशी भांडण झालं होते. कोंदाची कबुतरं कमी व्हायची. नंतर कुठे तरी जवळपास ती मारून टाकलेली दिसायची. कोंदा मुका होता, पण ताकदीचा होता. लोक म्हणायचे की कोंदा कबुतरांची विष्ठा लावून मांजा तयार करतो. राऊतचं म्हणणं होतं, कोंदा कबुतरांच्या रक्तानेही मांजा तयार करतो आणि त्यासाठी कबुतर मारतो. मुंगसाच्या गळ्यात घुंगरू अडकवलेला काळा दोरा बांधला होता. घुंगरांचा आवाज ऐकून मुंगसाने झडप घालण्याआधीच कबुतरांना-पक्ष्यांना उडता यायचं. त्यानंतर कबुतरांचं मरणं जरा कमी झालं. तरीही कबुतरं मरत होतीच. कोंदाच्या घरासमोर मांजा, चकरी, पतंग बहुधा टांगलेले असत. बाहेर एका मोठ्या दगडावर काचेचा थोडा चुराही होता. एका गंजलेल्या पिपात काचेचे तुकडेही ठेवलेले होते.

मातादेवालाच्या दोन्ही बाजूंना तळं होतं. शितलादेवीचं जुनं देऊळ होतं. आजूबाजूला लहान लहान चार-आठ दगडांच्या आडोशाला देवदेवतांच्या फुटलेल्या मूर्ती होत्या, तोडक्या-मोडक्या दोन-चार समाध्याही होत्या. समाध्यांच्या थोडं पुढे एक आखाडा होता. आखाड्यात मुलं व्यायाम करत होती. तळ्याच्या काठावर देवळाजवळ एक-दोन माणसं आपले कपडे धूत होती. गुरुजी सावधपणे पाहत होते. दूरवर निर्जन ठिकाणी तळ्याच्या पायरीजवळ त्यांना मुन्नासारखं कोणी तरी दिसलं. तो मुन्नाच होता. गुडघ्याभोवती अंगाची मुटकुळी केलेला. धापा टाकून टाकून दमलेला. घाबरून गुरुजींनी गडबडीत पुरचुंडी उघडली, तर दोन चपात्या पुरचुंडीतून खाली पडल्या. त्यांनी चपात्या उचलल्या. मुन्ना झोपल्यासारखा वाटत होता. बाबा चपाती घेऊन आले आहेत याचा त्याला पत्ता नव्हता.

“मुन्ना! मुन्नू बेटा!” गुरुजींनी मुन्नाला जागं केलं. मुन्नाच्या डोक्यावरून एक-दोन वेळा हात फिरवला. त्यांना त्याला दचकवायचं नव्हतं. “भूक लागली का रे?” त्यांनी विचारलं.

“हो.” मुन्ना म्हणाला.

“खाऊन घे.” गुरुजी म्हणाले.

हवेत पाण्याच्या वासाबरोबर मलमूत्राचाही वास होता. कुणास ठाऊक, जवळपास कोणी तरी हगून गेलं असावं. 

संध्याकाळ व्हायला लागलेली होती. समाधीजवळ ठिकठिकाणी उदबत्त्या खोचलेल्या होत्या. वारा थोडा जोराने आला तरी त्यांचा ठिणगीसारखा उजेड दिसल्यासारखा व्हायचा. देवळातली घंटाही अधूनमधून ऐकू येत होती. दूरवरच्या दृश्यात तलावाच्या काठी मुन्ना आणि गुरुजी धूसर झाल्यासारखे होते. तरीही बाप-लेक म्हणून ते ओळखू येत होते. जसजसा शांतपणा वाढू लागला तसतसं रातकिड्यांच्या आणि बेडकांच्या आवाजाकडे लक्ष जाऊ लागलं. 

शांतता आणखी वाढल्यावर मंद मंद थप्‌‍ थप्‌‍ आवाजाचा भास होऊ लागला. बहुतेक तळ्यात एक मगर असावी. मोठी कासवंही होती. ती बुडलेल्या पायरीपर्यंतही यायची. शांतता इतकी वाढली की मगर पोहत असण्याची शंका यायला लागली. मुन्ना आणि गुरुजी उठून उभे राहिले तेव्हा थपाक्‌‍ आवाज झाला. पायरीवरून उसळी मारून कोणी तरी पाण्यात उडी मारली असावी. मगर तर नसेल? एखादा मोठा मासा पाण्यातून उसळून वर आला असेल. तलावाच्या वरचा अंधार आणि पाण्यातला अंधार यांत काही फारसा फरक वाटत नव्हता. त्यामुळे माशाला वरचा अंधारही पाणीच वाटत असावा. चंद्र-चांदण्यांची पाण्यात पडणारी सावली माशांना ओळखीची वाटत असावी. ते पाण्यातलेच प्राणी वाटत असावेत. अंधारामुळे जर पाणी आकाशापर्यंत भरल्यासारखं वाटत असेल तर वरच्या चंद्र-चांदण्याही त्यात सावल्यांसारखे वाटत असतील. मातादेवालाच्या वाटेकडून वाद्यांचे आवाज येत होते. गावठी बँड होता. कुठलं तरी जुनं फिल्मी गाणं होतं. बिगुल बेसुरे होते. त्यांचा आवाज फाटल्यासारखा होता. नवी फिल्मी गाणी पण वाजवायचे; पण ती जास्तच बेसुरी असत. त्यांच्या बेसुरेपणाकडे फारसं लक्ष जात नव्हतं. नवी गाणी असल्यामुळे ओळखीचीही नसायची.

ज्या थोड्या घरांत बल्ब होते ते आता लागले होते. घरात एकच बल्ब लागलेला असे. जर बाहेरचा बल्ब लावलेला असेल तर आतला बंद असायचा. आतला लावलेला असेल, तर बाहेरचा बंद असायचा. बल्ब नेहमीच धूसर, धुरकट असायचे. संध्याकाळी छपरातून धूर बाहेर पडलेला दिसायचा. लाकडातून कमी धूर निघायचा. रेल्वे स्टेशन झाल्यामुळे दगडी कोळसा खूप स्वस्त मिळू लागला होता. जास्ती करून टपरी हॉटेलवाले हा कोळसा विकत घ्यायचे.

बँड मातादेवालाकडे चाललेला होता. बायका गात होत्या. नवरा मुलगा होता. एक गॅसबत्ती होती. बायका विहीर पूजायला आल्या होत्या. बँड थांबताच एकदम शांतता पसरली. एका राउती बाईने गॅसबत्ती डोक्यावर घेतलेली होती. गॅसबत्ती उतरवून तिने ती विहिरीच्या काठावर ठेवली. बँडवाले गप्पा मारत थोडे दूर अंधारात तळ्याकडे गेले. बहुतेक लघवी करायला गेले असावेत. तिकडेच उभ्या उभ्या त्यांनी बिड्या शिलगावल्या. त्या शिलगलेल्या अंधारात दिसत होत्या. सात बायका विहीर पूजायला लागल्या होत्या. नवऱ्या मुलाची आई म्हातारी होती. एका बाईच्या आधाराने ती विहिरीच्या बांधावर एक पाय आतल्या बाजूला सोडून बसली होती. नवऱ्या मुलाची आई म्हणाली, “पोरा, मी विहिरीत उडी मारीन.” बायका हसत थट्टा करत होत्या. नवरा मुलगा म्हणाला, “आई, मी तुझी सेवा करण्यासाठी नवरी आणतोय. विहिरीत उडी नको मारूस.” नवरा मुलगा लाजत होता. एकोणतीस-तीस वर्षांचा असावा. चष्मा लावलेला होता.

“खरं म्हणतोस ना?” एका बाईने विचारले.

“तुझी आई जीव देईल.” दुसरी बाई म्हणाली. 

“बोल ना!” कोणती तरी बाई मोठ्याने म्हणाली.

“झालं? आता मी उतरू?” नवऱ्या मुलाच्या आईने विचारलं. ज्या बाईने नवऱ्या मुलाच्या आईला आधार दिला होता ती खूप हसत होती. तिला खूप गंमत वाटत होती. तिने नवऱ्या मुलाच्या आईला उतरू दिलं नाही. 

“थांब गं जरा. नीट म्हणवून घेऊ दे.” ती म्हणाली. 

“खरंच पडली तर?” एक म्हणाली.

“मी उतरते.” नवऱ्या मुलाची आई पुन्हा म्हणाली. 

“आणखी एकदा म्हण.” तीन-चार बायका एकदमच नवऱ्या मुलाला म्हणाल्या.

“आई, विहिरीत उडी नको मारूस. तुझी सेवा करण्यासाठी तुला सून आणायला चाललोय.” नवरा मुलगा म्हणाला.

“सासूचे हात-पाय दाबून देईल ना?” एका बाईने विचारलं.

“हो” नवरा मुलगा म्हणाला. 

“घराबाहेर तर पडणार नाही ना?”

“नाही.”

“दोन वेळा जेवायला घालेल?”

“हो.” नवरामुलगा म्हणाला.

“कधी कधी केस विंचरून देईल?” या वेळी खूप बायका हसायला लागल्या होत्या.

“हो”

“कपड्यालत्त्यासाठी, औषधपाण्यासाठी त्रास देईल?”

“नाही देणार.”

“लग्नानंतरही तू तुझ्या आईचं ऐकशील?”

“ऐकीन.”

“सुनेकडून चुगल्या ऐकशील?”

“नाही ऐकणार.”

“चूल पेटवायला लावशील?”

“नाही लावणार.”

“तीर्थव्रत करवशील?” एकीने विचारलं. तेवढ्यात एकीने बँडवाल्याला खूण केली होती. रडतखडत बिगुल वाजायला लागला. थोडा थांबला. नंतर बडगावहून आलेला चार माणसांचा बँड एकदमच ढम्‌‍ ढम्‌‍ वाजू लागला. बायका गाणी म्हणू लागल्या होत्या. नवऱ्या मुलाच्या आईला गाणाऱ्या दोन बायकांनी आधार दिला. खाली उतरताच नवऱ्या मुलाची आईही गायला लागली. नवरा मुलगा आता घरी परत जाणार नाही. तो वऱ्हाडाबरोबर नवरीच्या घरी जाणार. लग्न झाल्यावर नवरीला घेऊन परत येणार.

गुरुजी मुन्नीच्या लग्नाचा विचार मनात आणायचं टाळत होते. मुलगी आपल्या आई-वडिलांच्या घरी असून नसल्यासारखीच असते. पोटी जन्माला का आली असेना, कुठे तरी सापडल्यासारखंच तिचं पालनपोषण केलं जायचं. एक-आध दिवस तिला खायला-प्यायला घालायचं. उद्या ती निघून जाणार. मुलीचा रोजचा रोज एक-आध दिवसासारखाच असायचा. मग लग्न करून द्यायचं, म्हणजे जणू घराबाहेरच काढलं जायचं. गुुरुजींनी नवऱ्या मुलाकडे लक्ष देऊन पाहिलं. नवरा मुलगा ठीकठाक आहे. सावळा आहे म्हणून काय झालं. चष्मा तर काय, आजकाल सगळेच लावतात. कमजोर वाटतोय. गात चाललेल्या बायकांच्या मागोमाग जाणं त्यांना बरं वाटत नव्हतं; पण गॅसबत्तीच्या उजेडामुळे सोय होत होती. गल्लीत गंमत बघण्यासाठी बायका-पोरांची गर्दी झालेली होती. गल्लीतल्या लहान लहान मुलीही गात गात बायकांमधे सामील झाल्या होत्या.

अक्तीच्या म्हणजे अक्षयतृतीयेच्या दिवशी घरोघरी बाहुला-बाहुलींची लग्नं व्हायची. काही दिवस आधीच मातीच्या बाहुला-बाहुली विकायला यायच्या. कोष्टी, देवांगन घरच्या स्त्रिया बाहुला-बाहुली तयार करायच्या. ही मंडळी कापड विणण्याचा व्यवसाय करीत. गावाकडे हीच मंडळी शिंपीकाम पण करीत. त्यांच्याकडे नव्या कापडाचे तुकडे उरायचे. बाहुलीसाठी नक्षीदार कापडाची साडी तयार व्हायची, तर रंगीत कापडाचे धोतर-सदरे बाहुल्यांसाठी तयार होत. चकचकीत बेगड कागदाचे डोळे, नाक आणि दागिने तयार व्हायचे. मुन्ना-मुन्नी दीना शिंप्याकडून दहा-दहा पैशाला बाहुला-बाहुली विकत आणत असत. मुली मोठ्या झाल्या तरी बाहुल्यांशी खेळत असत. मुलं मोठी झाल्यावर त्यांना मात्र बाहुल्यांचा खेळ आवडत नसे.

दीना शिंप्याचा रंग काळा होता. वय असेल चाळीस-पंचेचाळीस. उंची कमी होती. कुरळ्या केसांचा मधोमध भांग पाडलेला असे. तो कपडे छान शिवायचा, पण वेळ फार लावायचा. त्याला रस्त्यावर आलेला पाहून लांबूनच मुलं ओरडायची-

“दीना दीना

कपडे लीना

कभी न सीना

नंगा कीना 

नंगा दीना

कपडे ले के भागा दीना...”

लखन साव याने हे गाणं रचलं असणार असं दीनाला वाटत होतं. लखन भजनी मंडळीत हार्मोनियम वाजवत असे. दीना शिंप्याच्या चष्म्याची एक काडी तुटलेली होती. त्या जागी एक दोरा बांधलेला होता. त्याच्या घराच्या दरवाजाचा वरचा भाग चौकटीपासून उखडलेला होता. चौकटीला वाळवी लागलेली होती. त्याच्या चष्म्याच्या काडीच्या जागी दोरा बांधला असल्याचं लक्षात येताच असं वाटायचं, की दरवाज्याची चौकट तो वरच्या भागाला शिवून टाकेल आणि दरवाजा दुरुस्त होईल. जगातल्या सगळ्या दुरुस्त्या तो सुई-दोऱ्याने करू शकत होता. आपापसातल्या गप्पांत लहान मुलं म्हणायची, की ज्या कुणा माणसाचं बोट तुटलं असेल त्याचं बोट दीना शिवून नीट करून देतो. लहान लहान पोरी आपापसातल्या गप्पात म्हणायच्या-मूल होताना ज्या बाईचं पोट फाटतं, ते दीना शिवून ठीक करून देतो. भातुकलीतलं जगणं आणि खरंखुरं जगणं यांच्या अनुभवात लहानपणाचा काही उपयोग होत नव्हता, पण लहानपणीचे खेळ म्हातारपणापर्यंत आठवत राहायचे.

गुरुजींना लहानपणी पतंग उडवता आला नाही. कधी कधी मुन्नासाठी ते आपणहूनच कोंदाकडून पतंग घेऊन यायचे. मुन्ना पतंग उडवत असे. कोंदा कबुतराच्या रक्ताने मांजा बनवतो हे कोणी पाहिलेलं नव्हतं. कबुतराच्या रक्ताने मांजा पक्का होत असेल तर वडिलांच्या रक्तामुळेही पक्का होऊ शकेल. ते कोंदाला म्हणायचे, “माझ्यासमोर मांजाचा लगदा तयार कर. फक्त मुन्नाच्या दोऱ्यापुरता लगदा.” कोंदा काही कामानिमित्त बाजूला झाला की ते घाईघाईने आपलं कुठलं तरी बोट ब्लेडने कापायचे आणि मांजाच्या लगद्यात टप्‌‍ टप्‌‍ रक्त पाडायचे. कोंदा परत यायच्या आधी कसंबसं रक्त आणि आणि लगदा मिसळून टाकायचे. कोंदा त्याच लगद्याने मांजा माखायचा आणि ते खूष होऊन जायचे. त्यांचं मुन्नावर प्रेम होतं. थोडंफार रक्त ठीक आहे, पण जास्त रक्त गेलं तर?

घरी येईस्तोवर आठ-साडेआठ वाजायला आले होते. कंदिल घेऊन त्यांची पत्नी आणि मुन्नी दोघी दरवाज्याच्या चौकटीजवळ समोर बसल्या होत्या. शेजारच्या एक-दोन बायकाही होत्या. गुरुजी येत असलेले पाहून त्या निघून गेल्या.

“कुठे होता?” आत येत त्यांच्या पत्नीने विचारलं. 

“मातादेवालामध्ये होता. तिथे तळ्याच्या पायरीवर हा एकटाच बसलेला होता. माहीत नाही कसा, पण माझा अंदाज बरोबर निघाला. नाही तर शोधताच आलं नसतं. रात्रभर तिथेच पडून राहिला असता.”

“तिथल्या तळ्यात मगर आहे.” मुन्नीने मुन्नाचा हात धरून ठेवला होता.

“कुणी पाहिलेली नाही.” गुरुजी म्हणाले.

“तळ्यातल्या मगरीने तुला खाल्लं असतं म्हणजे?” मुन्नी म्हणाली.

“माझ्याजवळ दोन चपात्या असत्या तर त्या खाऊन मी मगरीशी लढलो असतो.” मुन्ना म्हणाला.

“नाण्याऐवजी तू चपात्याच घेऊन जात जा.” मुन्नी म्हणाली.

“बरोबरच आहे.” आई मुन्नीला म्हणाली.

“मी चपात्या घेऊन जाणार नाही.” मुन्ना म्हणाला.

“का?” गुरुजी म्हणाले.

“बरं नाही वाटत.”

“नाणं जवळ असूनही कुणी भजी नाही दिली तर काय करशील?”

“मी भजी घेऊन पळून जाईन.”

“लुटून पळून जाणं ही चांगली गोष्ट आहे का? पळून जायची शक्ती तरी असेल का?”

“शक्ती कमी व्हायच्या आधीच भजी घेऊन पळून जाईन. भजी खाईन, म्हणजे मग आणखी शक्ती येईल.”

“भांडण करशील तर मार खाशील.”

“भजी खाल्ल्यावर कमी मार पडेल, पण मी जास्त मार देईन.”

“गुंड व्हायचंय? आण ते नाणं परत!” गुरुजी रागाने म्हणाले.

“नाही देत!” म्हणत मुन्ना पळून गेला. थोड्या वेळाने तो परत आला. 

“मुन्ना, दे बेटा, नाणं माझ्याकडे दे.” त्याची आई म्हणाली. 

“नाही!”

“आई, नाणं मुन्नाजवळ जमा राहू दे. तो फालतू खर्च तर करत नाहीये. दोन चपात्या जास्तीच्या राहू देत.”

“हां, हे ठीक आहे. मुन्नाजवळ नाणंही राहील आणि चपात्याही असतील. डबल संरक्षण होईल!” खूष होऊन गुरुजी म्हणाले.

“कधी नाणं विसरला तर जवळ चपात्या तरी असतील.” मुन्नी म्हणाली. 

“चपात्या बाळगणं मला नाही आवडत.” मुन्ना म्हणाला. 

“पराठा ठेव जवळ.” आई म्हणाली.

“पराठा कशाला ठेव?” गुरुजी अचानक ओरडले.

“लाडू ठेव! पेढे-बर्फी ठेव!” गुरुजी रागाने बोलले.

“काय झालं? चपाती ठेवत जा ना.” मुन्नी मुन्नाला हळूच म्हणाली.

“नाही ठेवणार!” मुन्ना मोठ्याने म्हणाला, तेव्हा त्याने मुन्नीला ढकललं होतं. मुन्नी पडता पडता वाचली. 

“नको ठेवूस!” गुरुजी ओरडले. 

“गवत का नाही खात? गवत खाऊन बैलाला ताकद येते, भजी खाऊन नाही येत. भजी आवडतात असं का नाही सांगत? नाटक करतोय! भज्याच्या दुकानात बसून नाश्ता करायला बरं वाटतं. आम्ही सगळे मिळून जेवढ्या चपात्या खात नाही तेवढ्या तू एकटा खाऊन टाकतोस. दहा माणसांएवढं खातोस!” गुरुजी ओरडत होते. 


तेव्हा मुन्ना हळूच भिंतीला टेकलेला होता. खरं तर भिंत असल्यामुळेच टेकलेला होता. मग तो धापा टाकू लागला. तो टक लावून वडिलांकडे बघत होता. भिंतीला टेकता टेकताच तो घसरून खाली जमिनीवर बसला. त्याचं डोकं भिंतीला आपटलं होतं. पाय समोर पसरले गेले. जांघेत दोन्ही पसरलेले हात बांधले होते. आवळून धरलेले ओठ दातांखाली दाबले गेले होते. मुन्नीने धावत जाऊन चपाती आणली. गुरुजींनी पाहिलं, त्यांची पत्नी रडत होती. पत्नीला रडताना पाहून ते जास्तच कंटाळून गेले. 

“राहू दे.” त्यांनी मुन्नीला धमकावलं. “थोड्या वेळापूर्वी चार चपात्या खाऊन आला आहे... काही मरत नाही!”

“पाहू या भुकेला किती वेळ जिवंत राहतोय ते!” ते हळूच म्हणाले. त्यांनाही धाप लागली होती. थोडा वेळ ते भिंतीला टेकून उभे राहिले. मग मुन्नाच्या जवळ मुन्नासारखेच बसले. त्यांनी पण दोन्ही पाय पसरले होते. सावरून घेतलेलं धोतर दोन्ही हातांनी जांघेत दाबून धरलं होतं. ते थकल्यासारखे झाले होते. भुकेमुळे तेही जणू काही बिचारे झाले होते.

“जा, बिछान्यावर जाऊन पडा” पत्नी पुन्हा म्हणाली. लाकडी खोक्यावर कंदील ठेवलेला होता. त्याची वात कमी केलेली होती, त्यामुळे उजेड कमी होता. जर अंधार फार असेल तर कमी उजेडही काही कमी नसतो. “मी इथेच मुन्नाजवळ थांबेन. मी गेलो तर तुम्ही त्याला खायला घालाल.” गुरुजी म्हणाले. “कोणी नाही घालणार.” पत्नी हळूच म्हणाली. त्यांना वाटत होतं की मुन्ना ऐकत असावा. “माझा तुमच्यावर विश्वास नाही.” मुन्नी उठली आणि स्वयंपाकघरात चपाती ठेवून आली. परत येऊन मुन्नाजवळ तीही भिंतीला टेकून बसली. मुन्ना मध्ये होता. एका बाजूला गुरुजी होते, दुसऱ्या बाजूला मुन्नी होती. ही एकच भिंत रिकामी होती जी आता रिकामी नाहीय. दुसऱ्या बाजूच्या भिंतीला खाट उभी करून ठेवलेली होती. इकडे-तिकडे सामान होतं. एका कोपऱ्यात दगडी जातं होतं. “मी जाताच तुम्ही चपाती घेऊन याल.” मुन्नीकडे पाहत गुरुजी म्हणाले. 

“तुम्हाला शिवून बोलू का?” क्षणभर गप्प राहत पत्नी म्हणाली. 

“हो, शिवून बोल.” ते उभे राहिले, पण पत्नी आहे तेथेच उभी राहिली. दोन पावलं चालत ते पत्नीकडे गेले. तरीही पत्नीपासून ते एक हात अंतरावर होते.

“का नाही शिवत?” गुरुजी म्हणाले.

“मी नाही शिवणार. शपथ घ्यायलाच हवी का?” पत्नी म्हणाली.

“ठीक आहे.” गुरुजींनी हात पुढे घेत जोराने पत्नीचा हात धरला. पत्नीने हात सोडवून घेण्याचा थोडासा प्रयत्न केला. हातांत दोन-दोन बांगड्या होत्या. दोन्ही हातांच्या दोन्ही बांगड्या फुटल्या. गुरुजींनी हात सोडला तेव्हा बांगडीचे उरलेले तुकडे खाली पडले. त्यांनी पत्नीला किती तरी वेळा म्हटलं होतं की बडगावच्या बाजारात जाऊन बांगड्या घालून घे. मुन्नीलाही केसांच्या क्लिपा घ्यायच्या होत्या. खेळता खेळता मुन्नी बांगड्या मोजायला लागली की आईला राग यायचा. मुन्ना-मुन्नी लहान होते तेव्हा हातांत खूप बांगड्या होत्या. खूप बांगड्या असल्यामुळे हात छान दिसत होते. हातात जास्त बांगड्या असल्यावर वाटेने जाणाऱ्या कुण्या बाईला वा माणसाला मोजता येत नसत. दोन बांगड्या असल्यावर पाहताच कळतं की दोनच बांगड्या आहेत. बांगड्या मोजणं अशुभ समजलं जायचं. कोणी हातांतल्या बांगड्यांकडे लक्ष दिलं तर बायका पदराने हात झाकून घ्यायच्या. 

“एवढ्या सगळ्या चपात्यांचं काय करायचं?” पत्नीने विचारलं. 

“तुम्ही खाऊन घ्या.” गुरुजी म्हणाले. 

“मी तर दोनच चपात्या खाते, दहा नाही खात.” पत्नी दु:खाने म्हणाली.

“गाईला खायला घाल.”

“रात्री दहा वाजता गाईला शोधायला कुठे जाऊ? तुम्हीच जाऊन खायला घाला. घरात चपातीच नसली म्हणजे मग कोणी खायला सांगणारही नाही.” पत्नीही तिथेच लवंडलेली होती. मुन्ना जमिनीवर पसरून झोपी गेला होता. कंदीलाचा उजेड जवळपास नसल्यासारखाच होता. गुरुजींनी उठून कंदीलाची वात थोडी मोठी केली. 

गुरुजी मुन्नीला म्हणाले, “जा, तू झोप जा.”

“मला झोप येत नाहीये.” मुन्नी म्हणाली.

“नाही येत तर तिला जबरदस्तीने कशाला पाठवता?” पत्नी म्हणाली. ती पण जमिनीवर पसरलेली. झोपायला आलेली होती. 

“जा, दरवाजा बंद आहे की नाही पाहून ये.” आई म्हणाली. 

“सगळं बंद आहे.” मुन्नी म्हणाली. 

“तू जेवून घे.” मुन्नी आईला म्हणाली.

“इच्छा नाहीये.”

“कुणाला जेवायचं नसेल तर जा झोपा. कंदील विझवून टाका.” गुरुजी म्हणाले. थोड्या वेळाने गुरुजी उठले. त्यांना झोप येत नव्हती. समोरचा दरवाजा उघडून अंधारात त्यांनी गल्लीत डोकावून पाहिलं. दीना शिंप्याच्या घराकडून शिवणाच्या मशिनचा आवाज येत होता. जमान्यापूर्वीचे किती तरी वर्षांपासूनचे शिवायचे राहिलेले कपडे तो आत्ता रात्रभर शिवून पूर्ण करत होता. एक गाय घराच्या भिंतीला खेटून उभी होती. 

आधी त्यांचं लक्ष गाईकडे गेलं नव्हतं. रात्रीची वेळ अशी वाटत होती की खूप लांबून गर्दीचा आवाज हळूहळू ऐकू येत होता- “पकडा, पकडा! दीना, दीना! कपडा लीना, भागा दीना!” गर्दी नागडी असणार. बायका, माणसं, पोरं, पोरींची नागडी गर्दी असणार. शिवण्याच्या मशिनचा आवाज तर अशा प्रकारे येत होता, की ज्या लोकांनी कपडे दिलेले नव्हते किंवा ज्या लोकांकडे देण्यासाठी कपडे नव्हते त्या सर्वांसाठीही दीना कपडे शिवत असावा. लहान लहान पोरं तर नागडीच असायची. तरण्याताठ्या पोरी पण अर्ध्या नागड्याच फिरायच्या. कोष्ट्याची चार-पाच घरं असावीत. बहुतेक तेही काम करत असावेत. त्यांच्या घराबाहेर लांब लांब साड्यांचे धागे ताणले आणि विणले जात होते. सगळा अंधारच होता ज्यात काहीच दिसत नव्हतं. सगळं झाकून गेलं होतं. दीना अंधाराची बंडी, अंधाराची चड्डी, अंधाराचा ब्लाऊज शिवत होता. जणू काही विणकर अंधाराची साडी विणत होते. अंधारात एक कपडे घातलेला माणूस आणि एक नागडी तरुण पोरगी उभे असले तर कपडे आणि नागडेपणा यांचा काही थांग लागत नव्हता. अंधारातल्या मैदानात अंधारातलं आकाश होतं- ज्यात हे गाव होतं, मातीची घरं होती, अधूनमधून शेतं होती. अंधारातून वरून जर स्वर्ग खाली येत असेल तर तो स्वर्गही तसाच असेल, जसा हा नरक होता. 

“गाय बघता आहात का?” त्यांची पत्नीही उठून आली होती. 

“गाय कुठे आहे?” ते पाहिलेल्या गायीला लपूव पाहत होते. 

“नाही कशी? ती तिथे उभी आहे.” पत्नी म्हणाली. 

“मग मी काय करू?” गुरुजींनी दु:खाने विचारलं.

“आम्हाला कुणालाच जर खायची नाहीये तर गायीला चपाती देऊन मोकळे का होत नाही, म्हणजे तुम्हाला झोप लागेल.” दु:खी होत पत्नी म्हणाली. 

दोघांना गल्लीत पाहून गल्लीच्या कोपऱ्यावर उभी असलेली कुत्री एका मागोमाग मोठमोठ्याने भुंकू लागली. कुत्र्यांच्या सतत भुंकण्यामुळे दोघांना कसंसंच झालं.

“का भुंकताहेत?” पत्नीने विचारलं.

“आत चल.” गुरुजी म्हणाले.

आत येऊन त्यांनी कडी लावून दार बंद केलं. मुन्नी झोपली असल्याचं त्यांनी पाहिलं. मुन्नाला गाढ झोप लागलेली होती. त्याचं तोंड उघडं पडलेलं होतं. मुन्नाला ही सवयच होती. ही सवय नसती तर वाटलं असतं की तो चपाती खाण्याचं स्वप्न बघतो आहे. कंदील विझायला आला होता. चपात्यांची टोपली स्वयंपाकघरातून खोलीत आली असल्याचं त्यांनी पाहिलं. ती मुन्नीने आणलेली होती. मुन्नीने मुन्नाला खायला दिली नसावी, हे गुरुजींना माहीत होतं. मुन्नीने स्वत:ही खाल्लेलं नसणार. चपात्यांची टोपली पाहून पत्नीनेच ती उचलली आणि स्वयंपाकघरात ठेवायला घेऊन गेली. मागच्या परसदारी मुन्नीने तीन खाटा तयार केल्या होत्या. खोलीतली खाट खोलीतच होती. खडबड आवाज होईल म्हणून मुन्नीने ती नेली नसावी. मुन्नीला वाटलं असेल की ती आईजवळ झोपेल. मुन्ना आणि वडील रोजच्याप्रमाणे वेगळे वेगळे झोपतील.


- निशिकांत ठकार 

9823939946

________________________

पुस्तक : फुलेल तेव्हा बघू

लेखक : विनोदकुमार शुक्ल

भाषांतर : निशिकांत ठकार

मुखपृष्ठ : शिरीष घाटे

प्रकाशन : समकालीन प्रकाशन

पानं : 248 

किंमत : 300

पुस्तकासाठी संपर्क :  9370979287

_______________________________

• अनुभव ऑगस्ट २०२२च्या अंकाची पीडीएफ खरेदी करण्यासाठी लिंक : https://bit.ly/3daik8X

• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक : https://bit.ly/3JASplA

• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक : https://bit.ly/34GWmXn

• अनुभव मासिकातील इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगला भेट द्या : https://bit.ly/36zs3lP

• PDF अंक वार्षिक : ₹ ५००

• अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :

वार्षिक - ₹ १००० । द्वैवार्षिक - ₹ १८०० । त्रैवार्षिक - ₹ २५०० ।

#अनुभव  #मासिक #अनुभव_मासिक  

#युनिक_फीचर्स #युनिक #फीचर्स

#वाचालतरवाचाल #मराठी #म 

#Anubhav_Magazin #Unique_Feature 

#Magazine #MarathiMagazine #Marathi 

#Reading #Anubhav #Masik #Books


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८