दोस्त गुरुजी - अनिल अवचट : सुहास कुलकर्णी
दोस्त गुरुजी - अनिल अवचट : सुहास कुलकर्णी
ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचा आज जन्मदिन. समकालीनचे संपादक सुहास कुलकर्णी यांनी त्यांच्यावर लिहिलेला हा लेख, सुहास कुलकर्णी यांच्या अवलिये आप्त या पुस्तकात तो समाविष्ट केलेला आहे.
काही माणसं खूप आधीपासून आपल्या आयुष्याचा भाग असतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात बर्याच नंतर भेटतात. अनिल अवचट यांच्या बाबतीत माझं असंच झालं. शाळा-कॉलेजमध्ये असताना जी पहिली लक्षात राहतील अशी पुस्तकं वाचली, त्यात अवचटांची पुस्तकं होती. या अर्थाने अवचट आयुष्यात आले ते वयाच्या सोळाव्या-अठराव्या वर्षी. लेखक म्हणून. पण त्यांची प्रत्यक्ष भेट आणि संवाद सुरू होण्यासाठी त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षं जावी लागली. पण जेव्हा त्यांची भेट झाली, त्यानंतर हा आवडता लेखक मित्रच बनून गेला.
पूर्णिया, वेध, छेद, संभ्रम, कोंडमारा, धागे आडवे उभे, धार्मिक, माणसं, वाघ्या-मुरळी, प्रश्न आणि प्रश्न अशी पुस्तकं वाचतच आमची पिढी मोठी झाली. आपल्या मध्यमवर्गीय जगण्याच्या पलीकडे एक जग आहे, याची जाणीव या पुस्तकांनी करून दिली होती. आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर पडण्याची ऊर्मी त्यातून मिळाली होती. त्यामुळे या सर्व काळात त्यांच्याबद्दल सतत एक कृतज्ञतेची भावना मनात असे. आई-वडील आपल्याला चालायला-बोलायला शिकवतात, पण काही माणसं जगाकडे बघायला शिकवतात. त्यात अनिल अवचट नि:संशय!
मला आठवतं, ‘पूर्णिया’ हे बिहारचं अंतरंग दाखवणारं त्यांचं पुस्तक मी अधाशासारखं वाचलं होतं. तिथली समाजव्यवस्था, जमीनदारी, अस्पृश्यता, वेठबिगारी, कंगाली यांचं त्यांनी केलेलं वर्णन वाचून मुळापासून हादरलो होतो. अवचटांचं ते पहिलं पुस्तक. तेव्हापासून वाचक म्हणून मी त्यांच्या कच्छपिच लागलो. त्यांनी लिहायचं नि आपण वाचायचं. बास!
पुण्यात शिकायला आलो तेव्हा कॉलेजमध्ये अभ्यास मंडळं वगैरे उपक्रम आम्ही करत असू. तेव्हा त्यांच्या घरी गेल्याचं आठवतं. साल असेल १९८५-८६. कशासाठी गेलो होतो ते आठवत नाही, पण ती भेट आठवते. पत्रकारनगरमधील त्यांच्या घरात बाहेरच्या हॉलमध्ये एक मोठीच्या मोठी जाड सतरंजी घातलेली होती. घरात खुर्च्या-सोङ्गे वगैरे नेहमीची बैठकव्यवस्था नव्हती. घरात आलेल्याने सतरंजीवरच बसायचं. तेही आपल्यासोबतच बसणार. बोलणार. जसं त्यांचं घर साधंसं होतं, तसेच तेही अगदी साधे वाटले होते. दहा-वीस मिनिटांची ती भेट, पण त्यांच्या साधेपणामुळे लक्षात राहिली.
पुढे आम्ही मित्रांनी ‘युनिक फीचर्स’ ही माध्यमसंस्था सुरू केली. तेव्हा आम्ही विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या मुलाखती घेऊन दैनिकांना पाठवायचो. त्यात आमच्यापैकी कुणी त्यांचीही मुलाखत घेतली असणार. आमच्या माध्यमसंस्थेबद्दल कुतूहल वाटून ते एक-दोनदा आमच्या ऑफिसवर आल्याचं आठवतं. ते आले. गप्पा मारून, चौकश्या करून गेले. तेव्हा अनेक लेखक, सामाजिक कार्यकर्ते वगैरे ऑफिसला येत-जात. तरुण पोरांनी काही तरी नवा प्रयोग चालवलाय, या कुतूहलापोटी ही ज्येष्ठ मंडळी भेटायला यायची. अवचटही तसेच आलेले. मी ऑफिसात होतो, पण कामात होतो. मी भेटलोच नाही त्यांना. पुढे बर्याच वर्षानंतर त्यांची-माझी दोस्ती झाली. तेव्हा म्हणाले, ‘‘मी तुमच्या ऑफिसवर आलो होतो, पण तेव्हा तू माझ्याकडे बघितलंही नव्हतंस. असं का?’’ आधी काही तरी थातुरमातुर उत्तरं दिली; पण ते ऐकेनात. शेवटी मी त्यांना म्हटलं, ‘‘अहो, तुमचे माझ्यावर मोठे उपकार आहेत. एकलव्यासारखा मी तुमच्याकडून शिकत आलोय. माझ्या मनात तुमच्याविषयी केवळ कृतज्ञताच आहे. पण मला मोठ्या माणसांची भीती वाटते. त्यांच्यापासून दूरच राहिलेलं बरं, असं वाटतं. आपल्याला आवडणार्या माणसांजवळ गेलं, तर ती भ्रमनिरास करतात. मला तुमच्याबाबत विषाची परीक्षा नव्हती घ्यायची.’’ हे ऐकून ते हसले. म्हणाले, ‘‘माझ्या बाबतीत नाही ना झाला तुझा भ्रमनिरास?’’
त्यांची-माझी खरी ओळख झाली ती २०१० साली. दहा वर्षांपूर्वी. त्याआधी दोन वर्षांपूर्वी आमची भेट झाली होती, पण ती ओझरती. डॉ. प्रकाश आमटे यांचं आत्मचरित्र-‘प्रकाशवाटा’ आम्ही प्रकाशित केलं होतं. त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होणार होता. आमटे कुटुंबीयांचं काम माहीत असलेला, त्यांच्याशी वैयक्तिक नातं असलेला उद्घाटक आम्हाला हवा होता. अवचटांचं नाव पुढे आलं. त्यांना विचारलं. त्यांनी होकार दिला. कार्यक्रमाला आले, बोलले आणि गेले. याला काही भेट म्हणता येणार नाही.
खरी भेट झाली त्यानंतर दोन वर्षांनी. त्याची गोष्ट मोठी गमतीशीर आहे. अवचट जसे लेखक, तसेच ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’चे संस्थापकही. त्यांच्या पत्नीने, सुनंदाने सुरू केलेल्या या केंद्राच्या स्थापनेपासून ते त्यांच्यासोबत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ही संस्था वाढवली. या संस्थेच्या कामाबद्दल, तिच्या प्रवासाबद्दल अवचटांनी पुस्तक लिहावं, असं आमच्यात बोलणं चाललं होतं. तसं आम्ही त्यांना विचारलंही होतं. ते काही केल्या दाद देत नव्हते. पण अखेर त्यांनी मनावर घेतलं आणि पुस्तक लिहून काढलं. आम्ही खूष झालो. ज्या लेखकाची पुस्तकं वाचत आपण मोठे झालो, त्याचं पुस्तक प्रकाशित करायला मिळतंय याचा आनंद वाटत होता.
हस्तलिखित माझ्या हाती पडल्यानंतर मी ते झपाट्याने वाचून काढलं. झकास लिहिलेलं पुस्तक होतं ते. एखाद्या संस्थेचा इतिहास, विकास, कार्यशैली, वैशिष्ट्यं ठोकळेबाजपणा न येता कसा लिहावा, याचं हे पुस्तक उत्तम उदाहरण होतं. घटना, घडामोडी, किस्से, आठवणी, माणसांच्या गमती सांगत त्यांनी मुक्तांगणची गोष्ट सांगितली होती. पण या हस्तलिखितात काही दोषही जाणवत होते. अवचटांची तोवर तीसेक पुस्तकं प्रकाशित झालेली असली तरी ते प्रामुख्याने लेखसंग्रह होते. वेळोवेळी लिहिलेल्या लेखांंचं संकलन. हे पुस्तक त्यांनी सलगपणे लिहिलेलं होतं, पण लेखनकाळ मात्र सलग नव्हता. काही भाग अमेरिकेत दौर्यावर असताना लिहिला होता, तर काही भाग दुबई दौर्यात हाता-पायाचं फ्रॅक्चर होऊन तिथे अडकून पडलेले असताना लिहिलेला. उर्वरित भाग पुण्यात जमेल तसा. त्यामुळे लिहिताना अनवधानाने कुठे कुठे पुनरुक्ती झालेली होती. एखाद्या प्रसंगाचे तपशील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे होते. वाक्यरचना, शब्दयोजना याबाबतही हलक्या हातांनी संपादन करण्याची गरज होती.
पण एवढे मोठे लेखक; त्यांच्या हस्तलिखितावर काम करण्याची गरज आहे, हे त्यांना सांगणार कसं? पण चाचरत का होईना, त्यांना सांगितलं. त्यांना असं काही अजिबातच अपेक्षित नव्हतं. ते अगदी निश्चयाने आणि स्पष्टपणे म्हणाले, ‘‘माझ्या लिखाणाला आजवर कुणीही हात लावलेला नाही. मी जसं लिहिलं तसं छापून आलंय. तशी गरज आजवर कुणालाही वाटलेली नाही. अगदी श्री. पु. भागवतांनाही नाही.’’ त्यांनी स्वच्छ शब्दांत नकार दिला होता. एरवी माझा स्वभाव कुणाच्या परीक्षेला बसण्याचा नाही. पण मी त्यांना म्हटलं, ‘‘मी तुमच्या हस्तलिखितावर काम करतो आणि तुम्हाला दाखवतो. तुम्हाला माझं काम पटलं नाही, तर तुमचं पुस्तक आहे तसं छापूयात.’’ ते या प्रस्तावाला कसेबसे तयार झाले.
महिनाभर खपून मी त्यांच्या पुस्तकाचं संपादन पूर्ण केलं. त्यांचं त्यापूर्वीचं सर्व लिखाण मी वाचलेलं असल्यामुळे ते कसं लिहितात, कोणते शब्द वापरतात, कोणते अजिबात वापरत नाहीत, त्यांची वाक्यरचना कशी उलगडते, उद्गारवाचक चिन्हांशिवाय ते हवा तो परिणाम कसा साधतात, अशा सतराशे साठ गोष्टी मला माहीत होत्या. त्यांच्या शैलीला अजिबात धक्का न लावता, उलट त्यांची शैली अधिक उठावदार करत मी माझं काम पूर्ण केलं. दुरुस्त्या वगैरे करून टंकलिखित प्रूफ त्यांना बघायला दिलं. त्यांनी ते घरी जाऊन शांतपणे वाचलं. चार-आठ दिवसांनी प्रुफ घेऊन आले. पुस्तकभरात फक्त पाच-दहा दुरुस्त्या करून आणल्या होत्या त्यांनी. म्हणाले, ‘‘मी अख्खं पुस्तक वाचलं, पण मला त्यात कुठे संपादन केल्याचं दिसलं नाही. मी म्हटलं होतंच, की माझ्या मजकुराला हात लावण्याची गरज नाही.’’ मी हसलो. म्हटलं, ‘‘म्हणजे हे स्क्रिप्ट फायनल ?’ ते म्हणाले, ‘‘अर्थात! मी लिहिलं तेव्हाच ते फायनल होतं!’’
मी तेव्हा काही बोललो नाही. म्हटलं, कशाला यांच्याशी पंगा घ्या? उगाच यांचा पापड मोडायला नको! थोडे दिवस गप्प राहिलो. पुस्तक छापून झाल्यानंतर त्यांना म्हटलं, ‘‘रागावणार नसाल तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायचीय.’’ त्यांच्या हस्तलिखितावर मी पेन्सिलीने केलेलं काम त्यांना दाखवलं. त्यांना म्हटलं, ‘‘हे जरा बघा.’’ त्यांनी पानं उलटवली.. जिकडे-तिकडे दुरुस्त्या. बारीक बारीक गोष्टी निवडून दुरुस्तलेल्या. काही वाक्यं, काही मजकूर कापून त्याऐवजी नवा मजकूर लिहिलेला. ते पाहत राहिले. म्हणाले, ‘‘मी प्रुफवाचली तेव्हा मला असं वाटलं की माझं लिखाण जसंच्या तसं ठेवलं गेलं आहे. एवढं रंगकाम झाल्याचं माझ्या लक्षातच आलं नाही! तू एवढं काम करूनही माझ्या लक्षात आलं नाही, याचा अर्थ तू काम चांगलं केलंस. याच्यापुढे माझ्या लिखाणाचं संपादन करण्याचे सर्वाधिकार तुझ्याकडे!’’(त्यानंतर आजपर्यंत त्यांनी काहीही लिहिलं की ते माझ्याकडे पाठवतात आणि मत घेतात.)
या घटनेमुळे अवचटांनी स्वत:भोवती बांधलेली चिरेबंदी भिंत कोसळली आणि नवं नातं निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. नातं विणण्यात पुढाकार अर्थातच त्यांनी घेतला. त्यांचा अधूनमधून फोन येऊ लागला. थोड्या चौकश्या, थोड्या गप्पा होऊ लागल्या. मधूनच कधी तरी ते ऑफिसवर येऊ लागले. कधी घरी बोलावू लागले. वागणं अगदी साधंसुधं. पारदर्शक. मोकळंढाकळं. प्रेमळ. जीव लावणारं. त्यांच्या घरी गेलं की गप्पांमध्ये मध्येच बासरी काढणार, वाजवणार. मधेच एखादी गाण्याची लकेर घेणार. कधी मूडमध्ये असतील तर शास्त्रीय चीज म्हणून दाखवणार. हे अवचट मला माहीत नव्हते. त्यांचं ‘छंदांविषयी’ हे पुस्तक वाचलं होतं आणि त्यांचा छांदिष्टपणाही माहीत होता. पण तो असा समोरासमोर उलगडणं अंगावर रोमांच उभं करत असे. ऑफिसमध्येही येत तेव्हा पिशवीत ओरिगामीचे कागद, बासरी वगैरे असेच त्यांच्यासोबत. ‘अरे, आज एक नवं गाणं शिकलोय. बासरीवर वाजवून दाखवू?’ असं विचारणार आणि हौशी, शिकाऊ मुलाच्या उत्साहाने चुका करत करत वाजवून दाखवणार. कधी एखादं गाणं म्हणणार, कधी एखादी चीज गाऊन दाखवणार. ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है’ म्हणता म्हणता त्या गाण्याच्या आसपासची गाणी म्हणायला लागणार. मैफलच! ऑफिसमधील मित्रांना कळत नसे, की लेखक आलेत भेटायला आणि केबिनमधून गाण्याचे आवाज का येताहेत? नंतर त्यांनाही सवय होऊन गेली.
पण ज्यांना हा उपक्रम माहीत नसे त्यांची मोठी गंमत होत असे. एकदा एका कार्यक्रमानिमित्त कॉर्पोरेटमधील मोठे अधिकारी, प्रशांत जोशी मुंबईहून पुण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अवचट होते. कार्यक्रम संपल्यावर आम्ही सगळे ऑफिसमध्ये आलो. थोडं औपचारिक बोलणं झालं. पण औपचारिकता अवचटांच्या अंगात नाहीच अजिबात. त्यामुळे थोडी संधी मिळताच लागले की बुवाजी गायला! आम्हाला ते सवयीचं होतं, पण प्रशांत गोंधळले. तेही खरं तर अवचटांच्या लेखनाचे चाहते, त्यांचं सगळं वाचलेले वगैरे. थोड्या वेळाने अवचट त्यांना म्हणाले, ‘‘तुम्हाला नाही आवडत गाणी?’’ ते म्हणाले, ‘‘आवडतात की!’’ अवचट म्हणाले, ‘‘मग गा की!’’ थोड्या वेळाने पाहावं तर ते कॉर्पोरेट साहेब आणि अवचट एकत्र गायला लागलेले. धमालच सगळी! नंतर प्रशांत म्हणाले, ‘‘हा दिवस मी आयुष्यात कधी विसरणार नाही!’’
अवचटांचं हे असं सहज वागणं इतरांनाही सहज बनवतं. तुम्ही कोण आहात, कोणत्या पदावर आहात, किती पैसे बाळगून आहात वगैरे गोष्टी गळून जातात आणि तुमच्यातला निखळ माणूस फक्त उरतो. अशी किमया ते लीलया करून टाकतात. शिवाय ते असं मुद्दामून वगैरे करतात असं नाही. ते असेच आहेत, ते असेच वागतात.
अगदी सुरुवातीला ते ऑफिसात आले की मनावर दडपण असे, पण हळूहळू ते विरून गेलं. आले की अर्धा-पाऊण तास गप्पागोष्टी-गाणी करणार नि मग निघणार. कशासाठी आले होते हे, असा प्रश्न नंतर फिजूल बनत गेला. कामासाठीच कशाला भेटायचं, असा त्यांचा रोख असे.
पुढे पुढे त्यांचं ऑफिसात येणं वाढलं. फोनचं प्रमाणही वाढलं. मग रोजचा फोन सुरू झाला. दुपारी साडेतीन वाजता त्यांचा फोन येणार म्हणजे येणारच. फोन करण्याचं कारण काय? अर्थातच काहीही नाही. सहज गप्पा-चौकश्या. पाच-दहा मिनिटांचा फोन. मला फोन करायच्या आधी त्यांचा फोनवरूनच गाण्याचा एक क्लास असे. तिथे जे शिकलेलं असे तेही ते मला फोनवर गाऊन दाखवत. फोनवर असं काहीही घडे. कधी स्वत:च्या दौर्यांबद्दल सांगतील, तर कधी कुठल्या आमंत्रणांबद्दल. कधी कुठे केलेल्या भाषणाबद्दल सांगतील, तर कधी कुठल्या मुलाखतीबद्दल. कधी कोणत्या विषयावर लिहितायेत याच्याबद्दल बोलतील, तर कधी कुठल्या विषयाची माहिती मिळत नाही याबद्दल. कधी ओरिगामीच्या नव्या मॉडेलबद्दल, कधी चित्राबद्दल. कधी युरोप-अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांच्या भावलेल्या गोष्टीबद्दल, कधी किशोरी अमोणकरांच्या मैफिलीतल्या आठवणींबद्दल. गप्पांना आणि विषयांना मर्यादा नाही.
कधी पेपर-चॅनेलवरच्या बातम्या ऐकून माझ्याकडे विचारणा करणार. जगात काय चाललंय याची चर्चा करणार. स्थलांतरितांच्या प्रश्नापासून पर्यावरणीय प्रश्नांपर्यंत. आर्थिक धोरणांपासून राजकीय पक्षांच्या भूमिकांपर्यंत. अमेरिकन निवडणुकीपासून आपल्याकडच्या राजकीय साठमारीपर्यंत. राजकारणाच्या उथळीकरणापासून गरिबांच्या न सुटणार्या प्रश्नांपर्यंत. त्यांनी प्रश्नं विचारायचे आणि मी माझ्या बुद्धीने उत्तरं द्यायची, हे आता ठरून गेलंय. ‘तू माझी जगाची खिडकी आहेस बाबा,’ असं ते मला म्हणतात तेव्हा गंमत वाटते. ज्या माणसाने आपल्याला जगाकडे बघायला शिकवलं, तोच आपल्याकडून आजचं जग समजून घेतोय, ही गंमत नाही तर काय!
पण ही गंमतही कमी वाटावी अशी गंमत पुढे आहे. आम्ही दोघं कुठे भेटलोय, बोलणं चाललंय आणि तिथे तिसरा कुणी उपस्थित असेल तर तो अवचटांना ओळखत असतो. (ते पुण्याचे सार्वजनिक ‘बाबा’च आहेत ना!) पण आमचं नातं कळावं म्हणून मी म्हणतो, ‘‘हे आमचे गुरुजी आहेत. यांच्याकडून आम्ही खूप शिकलो.’’ हे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच अवचट माझ्याकडे हात दाखवत म्हणणार, ‘‘अहो, हेच आमचे गुरुजी आहेत. आमची जगाची खिडकी!’’ त्यांच्या या बोलण्याने अगदी संकोचायला होतं.
असो. तर सांगत होतो त्यांच्या-माझ्या फोन-संवादाबद्दल. आमची ही फोनाफोनी तेव्हा माझ्या आसपासच्या लोकांत ‘दुपारचा फोन’ या नावाने ओळखली जाऊ लागली. मी ऑफिसमध्ये असो, बाहेर असो; पुण्यात असो, देशात कुठेही असो- त्यांचा फोन येणारच. तेही पुण्यात असोत-नसोत, साडेतीनचा फोन ते करणारच. मी एखाद्या गावी आहे, असं म्हटलं तर तिथल्या चौकश्या करणार. तिथे ते केव्हा गेले होते, कोणता विषय तिकडे जाऊन लिहिला होता हे सांगणार. त्या विषयाबद्दल, अनुभवाबद्दल सांगणार. असं काहीही. त्यांचा स्वभाव खरं तर शिस्तीचा वगैरे अजिबात नाही, पण साडेतीनचा फोन मात्र घड्याळाला गजर लावून केल्यासारखा ते करत. कशासाठी? माहीत नाही. कदाचित त्यांनाही ते माहीत नसावं!
पण कुणालाही आश्चर्य वाटेल, या दुपारच्या फोनमधून एक नव्हे, दोन नव्हे, तीन पुस्तकं तयार झाली. मजा अशी, की ही पुस्तकं व्हावी असा विचारही अवचटांच्या मनात तोपर्यंत आलेला नव्हता. नेहमीप्रमाणे दुपारचा फोन चालला होता. अवचट म्हणाले, ‘‘अरे, आज एक गंमत झाली. घरात आवराआवरीत मला माझे जुने लेख सापडले. आधी ते माझे आहेत हे आठवतच नव्हतं, पण हळूहळू आठवायला लागलं. १९७० ते ७५ दरम्यानचे लेख आहेत हे.’’ मी म्हटलं, ‘‘याचा अर्थ मी जेमतेम शाळेत पोहोचलो होतो तेव्हाचे लेख आहेत हे. मला वाचायचेत ते लेख.’’
त्यांनी लेख पाठवले. मी ते वाचले. मग दोन दिवसांनी म्हणाले, ‘‘आणखी काही लेख सापडलेत, तेही पाठवतो.’’ तेही लेख वाचले. जुना खजिना सापडल्यासारखं झालं. तरुण असताना अवचट मनोहर, साधना, माणूस वगैरे साप्ताहिकांत रिपोर्टिंगवजा लिहीत; ते हे लेख होते. त्यांच्या कोणत्याही पुस्तकात समाविष्ट न झालेले. सत्तरच्या दशकातली राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक हालचाल त्या लेखांमध्ये प्रतिबिंबित झालेली होती. तीही अवचटांच्या रिपोर्ताज शैलीत. मी त्यांना म्हटलं, ‘‘या लेखांचं आपण पुस्तक करूयात.’’ ते म्हणाले, ‘‘इतक्या जुन्या लेखांचं पुस्तक?’’ मग आमचं काय काय बोलणं झालं. ते तयार झाले. आपल्याकडे पत्रकारांची एका विशिष्ट चौकटीत रिपोर्टिंग करण्याची पद्धत आहे. ती बाजूला ठेवून अवचटांनी कुठले कुठले कार्यक्रम, पत्रकार परिषदा, मुलाखती, बैठका, दौरे वगैरे ‘कव्हर’ करून रीतसर मोठे रिपोर्ताज लिहिले होते. ती शैली पुस्तकाच्या रूपाने पुढे आणली गेली. या पुस्तकाचं नाव- रिपोर्टिंगचे दिवस.
अवचटांची कधी ऑफिसमधे फेरी झाली किंवा मी त्यांच्या घरी गेलो, तर गप्पांच्या सोबतीला जसं त्यांचं गाणं-बजावणं चाललेलं असे, तसंच कधी ते चित्रं काढत, कधी ओरिगामीची मॉडेल्स, कधी लाकडाचं कोरीवकाम. त्यांचं जे चाललेलं असे त्यावर बोलणं होई. एकदा ते चित्र काढत बसले होते. त्यांचं चित्रं काढणं म्हणजे कसं? एकीकडे गप्पा चालू आणि दुसरीकडे कागदावर काही तरी आकार रेखाटत बसणं. जमलं तर पुढे जाणं, मन उडालं तर तो कागद टाकून देणं. त्यांची थोडीशी चित्रं मी ‘छंदांविषयी’ या पुस्तकात बघितली होती. मी त्यांना म्हटलं, ‘‘मला तुमची चित्रं बघायचीयत. दाखवाल?’’ म्हणाले, ‘‘कुठे कुठे माळ्यावर, कपाटावर, बॉक्सेसमध्ये असतील ती चित्रं. काढावी लागतील, शोधावी लागतील.’’ मी म्हटलं, ‘‘मी शोधतो.’’
मग जिकडे-तिकडे चढून सुटी चित्रं, अल्बम, वह्या असं सगळं गोळा केलं. रिक्षात घालून सगळा ऐवज ऑफिसात आणला. झटकून, पुसून, साफ करून बघण्याचं सत्र सुरू केलं. अचंबित व्हावं अशी होती ती चित्रं. केवढ्या वेगवेगळ्या शैलींतील! पोस्टकार्डाच्या आकारापासून फूट दोन फूट आकाराची. पेन्सिलची, पेनाची, स्केचपेनाची, रंगीत खडूंची, ऑइल पेस्टल्सची, पातळ-जाड रेषांची, चेहर्यांची, झाडांची, मोरांची, निसर्गाची, कशाकशाची. ती चित्रं पाहून मन हरखून गेलं. मनात आलं, हा आनंद इतरांनाही मिळायला हवा. पुस्तक व्हायला पाहिजे या चित्रांचं.
अवचटांना म्हटलं, तर ते अडून बसले. म्हणाले, ‘‘ही चित्रं मी माझ्या आनंदासाठी काढलीत. चित्रांचं प्रदर्शन करायचं नाही, असं मी पूर्वीच ठरवून टाकलंय. माझी चित्रं माझ्यापुरतीच राहू देत.’’ पण मी हट्ट सोडला नाही. पटवलंच त्यांना. अखेरीस ते तयार झाले. ‘माझी चित्तरकथा’ नावाचं देखणं पुस्तक तयार झालं. त्यांची चित्रं आणि त्यांचं चित्रांविषयीचं म्हणणं, असं ते पुस्तक आहे. मनोगतात त्यांनी या पुस्तकाच्या प्रक्रियेबद्दल छान लिहिलंय. पिझारो या दुर्लक्षित चित्रकाराचं प्रदर्शन भरवलं गेलं, तेव्हा तो म्हणाला होता, ‘लुक दे हॅव फ्रेम्ड देम’. त्याच चालीवर अवचटांनी लिहिलंय, ‘लुक, ही प्रिंटेड देम.’ आपल्याच गुरुजींकडून असं म्हटलं जायला नशीब लागतं!
याच चालीवर त्यांच्या लाकडाच्या शिल्पकलेवरील पुस्तक आकाराला आलं. त्यांनी केलेल्या शिल्पांचेही थोडे फोटो मी आधी पाहिलेले. मग त्यांच्या घरी गेलो असताना प्रत्यक्ष शिल्पं बघितली. या छंदाबद्दल सविस्तर लिहा असा लकडा त्यांच्यामागे लावला. पुस्तक होईल एवढा ऐवज आपल्याकडे आहे का, असं त्यांना वाटत होतं; पण लिहायला लागल्यावर त्यांनी भरभरून लिहिलं. आम्हीही मग शिल्पांची छान फोटोग्राफीकेली आणि ‘लाकूड कोरताना’ नावाचं सुबक पुस्तक तयार झालं.
आधी म्हटल्याप्रमाणे ही तीनही पुस्तकं त्यांच्या डोक्यात नव्हती. त्यांच्या-सोबतच्या घसटीतून ती तयार झाली. एरवी लिखाणाबाबत अवचट ङ्गार हट्टी आहेत. त्यांच्या मनात असेल तरच लिहिणार. ‘अमुक विषयावर लिहा’ असं म्हटलं तर ते लिहीत नाहीत. नाही म्हणजे नाही. ढिम्म हलत नाहीत. पण इथे त्यांनी माझ्या आग्रहाखातर पुस्तकंच लिहिली. मला वाटतं, ‘मुक्तांगणची गोष्ट’ प्रकाशित करताना ‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ म्हणत भिडेखातर हाती आलेलं हस्तलिखित आहे तसं छापून टाकलं असतं, तर त्यांच्याशी असे संबंधच तयार झाले नसते. येणं-जाणं, गाठीभेटी, फोनाफोनीही झाली नसती. मग पुस्तकं कुठली डोक्यात चमकायला! ‘मुक्तांगण’च्या वेळी लेखकाने स्वत:भोवतीची तटबंदी कोसळू दिली म्हणूनच हे सारं घडू शकलं.
हे घडू शकलं कारण मुळात अवचट मनाने मोकळे आहेत. त्यांची स्वप्रतिमाही ‘आपण बावळट आहोत’ अशीच आहे. तसं ते उघडपणे म्हणतातही आणि तसं त्यांनी लिहिलंही आहे. आपण कोणी थोर आहोत, अशी पोज अजिबात नाही. आवडतं म्हणून लिहितो, आनंद मिळतो म्हणून चित्रं काढतो, सुचतं म्हणून ओरिगामी करतो, असं ते सहजपणे म्हणतात. खरं तर त्यांनी जे आणि जेवढं लिहिलं आहे, ते पाहता ते नि:संशय मराठीतले महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांनी आयुष्यभर मिशनर्यासारखं वंचितांचं, गरिबांचं, कष्टकर्यांचं जगणं समाजासमोर आणण्याचं काम केलं. हे सर्व लिखाण प्रत्यक्ष बघून, फिरून, बोलून, लोकांमध्ये वावरून केलं आहे. त्यामुळे त्यात रूक्षपणा, बोजडपणा अजिबात नाही. माणसांच्या बोलण्यातून ते विषय उलगडत नेतात. प्रसंग, घटना, वास्तव यांचं चित्रमय वर्णन ते करत जातात. त्यामुळे वाचक त्यांचं बोट धरून ते सांगतात ते सगळं बघतात. ते जसं बोलतात तसंच लिहितात. ही शैली खासच. त्यांना तसं म्हटलं, तर ‘यात कौतुक करण्यासारखं काय आहे? मला यापेक्षा वेगळं लिहिताच येत नाही,’ असं म्हणून ते मोकळे होतात.
त्यांना जसं लिहिता येतं तसं ते लिहित राहिल्यानेच ते एवढं लिखाण करू शकले. थोडीथोडकी नव्हे, चाळीसेक पुस्तकं झालीत त्यांची. शिवाय चार-पाच पुस्तकं पाइपलाइनमध्ये आहेत. तीन-चार थीम्सवर लिखाण चालू आहे. असं असलं तरी त्यांच्यात एवढी पुस्तकं लिहिणार्याचा तोरा नाही, की लेखकपणाची झूल वगैरे भानगड नाही. त्यामुळे ते कुणाशीही सहजपणे संवाद साधू शकतात. संवादही कसा? गप्पा करत, गोष्टी सांगत, अनुभव सांगत. गाणंबिणं म्हणत. समोरच्यांना कळतच नाही, आता काय करायचं? पण त्यांना त्याची काही फिकीर नसते. कारण त्यांना यापेक्षा वेगळं, औपचारिक वागताच येत नाही.
त्यांच्या कुठल्याशा पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात मिलिंद बोकील यांनी अवचटांच्या लेखनाचं महत्त्व सांगणारं भाषण केलं होतं. पुढे ते ‘ललित’मध्ये सविस्तर छापूनही आलं. पाठोपाठ त्यांच्या आग्रहावरून त्यांच्या एका पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिली. हे दोन्ही लेख वाचून ते हरखून गेले होते. ‘म्हणजे मी खरोखरच काही चांगलं लिखाण केलंय तर!’ असं पुन्हा पुन्हा म्हणत राहिले. ‘चार दशकांत जन्माला आलेल्या पिढ्यांची समज घडवणारं काम तुम्ही केलंय’, असं कितीही वेळा सांगितलं तरी त्यांच्या मेंदूपर्यंत ते पोहोचतंच नाही जसं. खरं तर हे मराठीतले असे लेखक असतील, ज्यांची बहुतेक पुस्तकं वाचक वर्षांमागून वर्षं घेत आहेत आणि वाचत आहेत. माणसं, धागे आडवे-उभे, कोंडमारा, संभ्रम ही पुस्तकं केव्हाची आहेत? ऐंशीच्या दशकातली. पण येणार्या प्रत्येक पिढीतील शहाणी मुलं ही पुस्तकं वाचतातच वाचतात. ही गोष्ट मी स्वत: त्यांना कित्येकदा (अगदी कानीकपाळी ओरडून) सांगितली आहे. पण त्यावर ते अगदी निरागस (बावळट!) चेहरा करून विचारतात, ‘‘हो? असं आहे? याचा अर्थ मी काही तरी चांगलं लिहिलं आहे.’’ म्हणजे गाडी पुन्हा मूळ स्टेशनावर!
अवचटांएवढं काम केलेला माणूस खरं तर किती कॉलर टाइट करून वागला असता! पण त्यांच्या डीएनएमध्ये ती फॅकल्टीच नाही. त्यांनी आयुष्यभर अत्यंत विपरीत परिस्थितीत लिखाणकाम केलं. त्यांचं सगळं लिखाण हे फिरतीवर आधारित होतं. स्वत: नोकरी वगैरे करत नसल्याने उत्पन्नाचा स्रोत नव्हता. डॉक्टर पत्नीच्या उत्पन्नावरच घर चालणार. त्यामुळे सगळं काम काटकसरीत. एसटीच्या लाल डब्याने खडखडत गावोगावी जायचं, कुणाकुणाकडे राहायचं आणि लिहायचं. मानधन काय मिळणार? झाला खर्च निघाला तरी धन्य मानायचं! अशा परिस्थितीत तीस-चाळीस वर्षं काम करणं म्हणजे खायची गोष्ट नाही. या सर्व काळात ना त्यांना कुणी अभ्यासासाठी पैसा पुरवला, ना स्कॉलरशिप वगैरे. मिळाली असेल तर अपवादात्मक. सगळं काम स्वयंप्रेरणेने आणि स्वयंखर्चाने. असं काम केलेल्या माणसाने एरवी स्वार्थत्यागाचे किती धिंडोरे पिटले असते! पण हेही त्यांच्या गावी नाही. मला वाटलं म्हणून मी केलं, असं त्यांचं सिंपल म्हणणं असतं.
मराठीमध्ये रिपोर्ताज पद्धतीचं लेखन सर्वांत पहिल्यांदा करणं आणि हा फॉर्म रुजवणं हे अवचटांचं मराठी पत्रकारितेला/साहित्याला योगदान आहे. पण त्यावर त्यांचं म्हणणं काय असतं? ‘‘मी लिहायला लागलो तेव्हा असा काही लेखनप्रकार जगात आहे, हेच मला माहिती नव्हतं. फार लोक म्हणायला लागले तेव्हा मी शोधाशोध केली, तर कळलं, की रिपोर्ताज हा ङ्ग्रेंच शब्द आहे आणि या प्रकारचं लेखन करणारे लोक जगात आहेत. मी या सगळ्याला अनभिज्ञ होतो. मला जसं लिहिता येत होतं तसं मी लिहित होतो. पण माझ्या लिखाणाला तुम्ही रिपोर्ताज म्हणत असाल, तर म्हणा बुवा!’’
अवचट एक गंमत सांगतात. म्हणतात, ‘‘मी सामाजिक विषयांवरही लिहिलं आणि ललित लेखनही केलं. पण ललित लेखक मला लेखक मानत नाहीत आणि पत्रकार मला पत्रकार मानत नाही. अशी माझी अवस्था आहे.’’ त्यामुळेच ते कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमांना अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उद्घाटक वगैरे म्हणून जातात, तेव्हा वृत्तपत्रांमध्ये त्यांचं वर्णन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असं केलं जातं. मजाच सगळी!
पण अवचटांना असं एखाद्या वर्णनात बंदिस्त करणं अवघडच आहे. ते जसे पत्रकार, लेखक आहेत तसेच ते सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांच्या कामाची सुरुवात १९७२च्या दुष्काळावेळेस झाली. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच ते बिहारमध्ये दुष्काळात मदत करण्यासाठी गेले. पुढे ‘युवक क्रांती दल’ या समाजवादी तरुणांच्या संघटनेकडे ओढले गेले. एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, विनायकराव कुलकर्णी, आचार्य केळकर यांच्या संपर्कात आले. मे. पु. रेगे, गं. बा. सरदार, दि. के. बेडेकर यांच्याकडून बरंच काही शिकले. डॉ. कुमार सप्तर्षींसोबत आंदोलनं वगैरे केली. दलित पँथर, छात्र युवा संघर्ष वाहिनी, भूमिसेना, हमाल पंचायत वगैरेंशीही त्यांचे संबंध होते. नामदेव ढसाळ, राजा ढाले, काळुराम दोधडे हे त्यातले काही मित्र.
आयुष्यातला काही काळ या चळवळींसोबत राहिल्यानंतर आपला पिंड कार्यकर्त्याचा नाही, असं मानून ते तिथून बाहेर पडले. पण सामाजिक प्रश्नांवर अव्याहतपणे लिहीत राहिल्याने ते जोडलेलेही राहिले. त्यांनी जसं प्रश्नांवर लिहिलं, तसं कार्यकर्ते आणि त्यांच्या कामावरही लिहिलं. डॉ. अभय बंग, अरुण देशपांडे, डॉ. हिरेमठ, डॉ. हिम्मतराव बावस्कर, सुरेखा दळवी, राजेंद्र केरकर अशा किती तरी कार्यकर्त्यांना त्यांनी महाराष्ट्रासमोर आणलं, त्यांना ओळख दिली, प्रतिष्ठा दिली. हे एका अर्थाने सामाजिक कामच झालं.
आणि प्रत्यक्ष सामाजिक कामाबद्दल बोलायचं, तर त्यांनी उभं केलेलं ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र’ आहेच की. गेल्या पस्तीस वर्षांत किती तरी हजार लोकांना ‘मुक्तांगण’ने व्यसनांच्या भीषण जगातून बाहेर काढलं आहे, पुन्हा जीवनाच्या पटरीवर आणलं आहे.
‘मुक्तांगण’च्या काही कार्यक्रमांना मी गेलोय. कामामुळे लोकांना अवचटांबद्दल किती आदर वाटत असतो, ते मी बघितलंय. ‘मुक्तांगण’च्या पंचविसाव्या वाढदिवसानिमित्त एक मोठा कार्यक्रम झाला होता. त्याला हजारेक लोक आले होेते. बरेचसे आजी-माजी पेशंट्स होते. पेशंट्सचे नातेवाईक होते. हॉलच्या दरवाज्यासमोर अवचट स्वागत करायला उभे होते. माणसं यायची आणि त्यांच्या पाया पडूनच सभागृहात जायची. रांगेने येणार्या आणि वाकून नमस्कार करणार्यांकडे अवचट बघतही नव्हते. तरीही लोक वाकत होते आणि चेहर्यावर समाधान घेऊन पुढे सरकत होते. .
हा नजारा मी बघत होतो. मला अवचटांचं वागणं खटकलं. मुळात त्यांनी लोकांना पाया पडू देणंच खटकलं. मी नंतर केव्हा तरी त्यांना टोकलं, तर ते काय म्हणाले माहीत आहे? ते म्हणाले, ‘‘मलाही कुणी पाया पडणं मान्य नाही. मी सुरुवातीला मागे हटे. नको म्हणे. पण लोकांना माझं हे वागणं आवडत नसे. माझ्यामुळे त्यांचं जीवन बदललं, असं वाटत असल्यामुळे ते पाया पडून आपली कृतज्ञता व्यक्त करतात. ही भावना मी नाकारू नये असंं त्यांना वाटत असतं. पाया पडून त्यांना बरं वाटतं.’ एक क्षण थांबून ते पुढे म्हणाले, ‘‘पण ते पाया पडणं मी माझ्या अंगी लागू देत नाही.’’ ते दारासमोर स्तब्ध का उभे होते आणि पाया पडणार्यांकडे लक्ष का देत नव्हते, हे त्या दिवशी कळलं.
शिवाय ‘मुक्तांगण’चं श्रेयही कुणी त्यांना दिलं, तरी ते स्वत:कडे घेत नाहीत. ‘सुनंदाने हे काम अंगावर घेतलं आणि गंभीर आजारपणात शेवटच्या क्षणापर्यंत चालवलं. ती गेली म्हणून मला त्यात उतरावं लागलं. खरं तर मुलीने, मुक्तानेच ती जबाबदारी अंगावर घेतली. शिवाय पु.ल.-सुनीताबाईंनी देणगी वगैरे दिल्यामुळे मी या कामात ओढला गेलो. नाही तर माझा संबंध व्यसनींच्या जगावर लेख लिहिण्यापुरताच होता...’, असं त्यांचं म्हणणं! तीस वर्षं संस्था यशस्वीरीत्या चालवल्यानंतर कोण शहाणा माणूस असं बोलेल? अर्थातच, अवचट!
‘मुक्तांगण’ आज देशातील सर्वोत्तम व्यसनमुक्ती संस्थांपैकी एक आहे. त्यांनी व्यसनमुक्तीची स्वत:ची अशी अभिनव पद्धत विकसित केली आहे. त्यात अर्थातच अवचटांचा मोठा वाटा आहे. पण ते सारं श्रेय तिथे प्रत्यक्ष काम करणार्या कार्यकर्त्यांना देऊन मोकळे होतात. त्यांच्या बोलण्यातही ‘मुक्तांगण’चा उल्लेख क्वचितच येतो. कुणी त्यांच्या या कामाबद्दल कौतुकोद्गार काढू लागलं, तर हे गृहस्थ पिशवीत हात घालून कागद काढतात आणि ओरिगामीचं डिझाइन करण्यात गुंगून जातात.
हां, स्वत:च्या ओरिगामीतील कौशल्याबद्दल मात्र त्यांना बोलायला आवडतं. पण तेही किती? ‘हे डिझाइन माझं आहे, मी क्रिएट केलंय’ असं म्हणण्यापुरतं. मी गेली दहा वर्षं बघतोय, या माणसाने स्वतःची अशी कित्येक डिझाइन्स निर्मिली असतील! प्रत्येक डिझाइन आधीपेक्षा वेगळं. इतरांनी केलेली डिझाइन्स ते करून बघतात, पण त्यांचा सगळा भर स्वत:ची डिझाइन्स करण्यावर असतो. त्यांची डिझाइन्स दिसायला अगदी साधी आणि सुबक असतात. कमीत कमी घड्यांमध्ये त्यांचे मोर, गणपती, पक्षी, विदूषक, सांताक्लॉज, पिस्तुल, गुलाबाचं फूल, पेनस्टँड, हत्ती, घोडे, घोडेस्वार साकारतात. मोरही एकच एक प्रकारचे नाही. अनेक प्रकारचे. कुठले फुलोरा पसरलेले, तर कुठले आपल्या पिसांचा संभार डौलात घेऊन चाललेले. एकेक डिझाइन अचंबित करणारं.
पण त्यांनी बनवलेलं विंचवाचं डिझाइन पाहून मी हरखून गेलो होतो. बारीक बारीक घड्या घालून देखणा नांगीवाला विंचू त्यांनी बनवला होता. वरून-खालून-पुढून-मागून एकदम परफेक्ट. मी त्यांना म्हटलं, ‘‘हे तुमच्या डिझाइनमधलं एक नंबर!’’ ते म्हणाले, ‘‘तुला एवढं आवडलं? ठेवून घे तुझ्यासाठी.’’
एकदा मला म्हणाले, ‘‘तुला ओरिगामी आवडतेय असं दिसतंय. शिकणार असशील, तर मी तुला शिकवतो. हवं तर आधी सोपी-सोपी मॉडेल्स शिक.’’ ते माझ्या शक्तीबाहेरचं होतं. चित्र किंवा शिल्पांच्या बाबतीत मी किमान ‘हो’ तरी म्हटलं असतं. पण कागदाच्या जादुई घड्या घालून त्यातून मॉडेल तयार करण्याचं सेटिंग माझ्या मेंदूत नाही, हे मला माहीत होतं. पण माझा हा रडका प्रतिसाद पाहून ते खट्टू झाले नाहीत. त्यांचं नवं डिझाइन तयार झालं की ते हमखास माझ्याकडे घेऊन येतात आणि मला देतात. माझ्या खोलीत मी त्यांच्या या मॉडेल्सचं प्रदर्शनच तयार केलंय. त्यांनाही त्याचं कौतुक वाटतं. मॉडेल आणून दिलं की म्हणतात, ‘‘मांडा तुमच्या प्रदर्शनात!’’
खरं तर त्यांना माझ्या ऑफिसच्या खोलीतील एका कप्प्याच्या प्रदर्शनाचं कौतुक वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण त्यांनी स्वत: निर्माण केलेली मॉडेल्स थेट ओरिगामीच्या जन्मस्थानी, जपानमधील एका कायमस्वरूपी प्रदर्शनात ठेवली गेली आहेत. सन्मानाने! त्यांच्या मॉडेल्सची महती जपानपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांना तिकडे आमंत्रित केलं गेलं आणि गौरवलं गेलं. तिथल्या हौशी आणि तरबेज लोकांनी अवचटांकडून त्यांनी निर्मिलेली मॉडेल्स शिकून घेतली. हे म्हणजे जपानी लोकांनी भारतात येऊन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकवण्यासारखं होतं. पण अवचटांचं कामच तेवढं अव्वल आहे.
पुण्यात आणि मुंबईत एक वर्षाआड हौशी ओरिगामी कलावंतांच्या कलाकृतींचं प्रदर्शन भरतं. या दोन्ही प्रदर्शनांमध्ये अवचट उत्साहाने सहभागी होतात. त्यासाठी दोन-तीन महिने त्यांच्याकडे जोरदार लगबग चाललेली असते. या काळात त्यांच्या घरी जावं, तर लेखकाच्या खोलीचं रूपांतर ओरिगामी कलावंताच्या खोलीत झालेलं असतं. त्या छोट्याशा खोलीत मोठीमोठी खोकी पडलेली असतात. त्यात तयार झालेली ताजी (गरमागरम) मॉडेल्स ठेवलेली असतात. ते बसतात त्या कॉटवर कागदच कागद पसरलेले असतात. अर्धी-कच्ची मॉडेल्स आपलं भाग्य उजळण्याची वाट पाहत असतात. एका बाजूला टाकून दिलेल्या कागदांच्या कचर्याचा ढीग लागलेला असतो. या सगळ्या गदारोळात अवचट शांतचित्ताने स्वत:च्या मेंदूच्या घड्यांशी खेळत कागदाला घड्या घालत असतात. मोठा पाहण्यासारखा नजारा असतो हा!
पुण्यातल्या दोन-तीन प्रदर्शनांना मी गेलोय. अर्थातच त्यांच्या आग्रहाखातर. तिथे मोठंच्या मोठं प्रदर्शन लावून अवचट बसलेले असतात. एरवी ते लेखक म्हणून कार्यक्रमांची शोभा वाढवणारे, नामवंत वगैरे म्हणून लोकांना माहीत असतात. स्वाभाविकच त्यांच्याभोवती गराडा पडलेला असतो. छोटी मुलं आलेली असतात. ती दिसली की अवचटांचा नूर बदलतो. रुमालाचा उंदीर करून ते त्यांना खूश करतात. तो उंदीर जेव्हा उड्या मारायला लागतो, तेव्हा तिथले आबालवृद्धही उड्या मारायला लागतात. मग ते नाण्याच्या जादूचा हातखंडा प्रयोग करतात. रबरबँड, दोरे अशी सामग्री काढून आणखी खेळ रंगवतात. लोक तृप्त होऊन पुढे जातात. आपण हे सारं नाट्य त्यांच्या शेजारी बसून फक्त बघायचं.
मी त्यांच्या शेजारी बसलेला असल्याने कुणी त्यांना विचारतं, ‘‘हेही ओरिगामी करतात का?’’ त्यावर त्यांनी फक्त ‘नाही’, एवढं म्हटलं तरी पुरणारं असतं. पण ते डोळे मोठे करून सुरू करतात, ‘‘हे माझे प्रकाशक आहेत. माझे मित्र आहेत. त्यांना असं तसं समजू नका.’’ लोक विचित्र नजरेने बघायला लागतात. मी आपला कसनुसा होऊन त्यांच्या पुढच्या ‘शो’ची वाट पाहायला लागतो. गर्दी जमली की पुन्हा तोच प्रयोग. रुमालाच्या उंदरापासून ‘हे माझे मित्र आहेत..’ पर्यंत.
हा सगळा खेळ चाललेला असतो तेव्हा आपल्यातलं लेखकपण, सामाजिक कार्यकर्तेपण वगैरे ते विसरलेले असतात. हा पुण्यातला प्रतिष्ठित माणूस आहे, वर्षांत पन्नास-शंभर कार्यक्रमांना व्यासपीठावर असतो, पाच-पन्नास गौरवांनी सन्मानित आहे, ‘मुक्तांगण’चा संस्थापक आहे, हे त्यांच्या तिथल्या वावराकडे बघून कुणालाही कळू शकणार नाही. अगदी मजेशीर माणूस. शिवाय प्रदर्शन गुंडाळल्यानंतर ‘तुला घरी सोडायचं आहे का? चल, मी सोडतो’ असं म्हणून मित्राच्या भूमिकेत लीलया जाणार.
एवढ्या सगळ्या भूमिकांत मी अन्य कुठल्या माणसाला पाहिलेलं नाही. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांच्यानंतर अवचटच असावेत. लेखन, पत्रकारिता, चित्रकला, कोरीव काम, ओरिगामी, सामाजिक काम या गोष्टी तर अव्वल दर्जाच्या; शिवाय फोटोग्राफी, गाणं-बजावणं, कविता, बालवाङ्मय हे कडेकडेने. त्यांनी फोटोग्राफीचिक्कार केलीय. अगदी बॉक्स कॅमेर्याच्या काळापासून. एक रोल जपून जपून वापरत. ते आजही फिरतीवर जातात तेव्हा सोबत कॅमेरा असतोच. त्यामुळे फोटोंना काही कमतरता नाही. शिवाय यांना मित्रांच्या, परिचितांच्या घरी धडकण्याची भारी हौस. ज्याच्या घरी जातील, त्याच्या घरातील सर्वांचे फोटो काढणार म्हणजे काढणारच. प्रेम व्यक्त करण्याची ही त्यांची तर्हा. घरात-गॅलरीत उभं करणार आणि खटाखट फोटो काढणार. तीन मिनिटांत दहा-वीस फोटो. त्यातले त्यांना आवडणारे फोटो मोठ्या आकारात प्रिंट काढून ज्याच्या-त्याच्याकडे पोहोचते करणार. हे फोटो कधी डोकी उडालेले असतात, कधी हनुवटी कापलेले असतात. पण ते स्वत:च्या फोटोंवर खूष असतात. मोजून मापून फ्रेममध्ये स्पेस वगैरे बघून फोटो काढणं त्यांना मान्यच नाही. ‘माणसांचे मूड्स महत्त्वाचे, ते मिळवायला हवेत’, असं त्यांचं म्हणणं असतं. असा जिवंतपणा त्यांच्या फोटोंमध्ये असतो हे मात्र खरं. माझेही त्यांनी अनेक फोटो काढलेत. बरेचसे कापाकापी झालेले, काही वापरता येण्याजोगे. जिथे कुठे माझे लेख छापून येतात, त्यासोबत त्यांनी काढलेला माझा एक फोटो मी वापरत असतो. तो फोटो छापून आला आणि त्यांना दिसला की म्हणणार, ‘‘हा... माझा फोटो आहे।’’ एवढ्याशा गोष्टीनेही खूष होणारा हा निर्मळ मानाचा माणूस आहे.
संगीत ही गोष्टही त्यांना बरीच जवळची. त्यांना संगीताचा चांगला कान आहे आणि शास्त्रीय संगीताचं ज्ञानही आहे. अगदी किशोरी अमोणकरांपर्यंत अनेकांशी त्यांची संगीतप्रेमी या नात्याने ओळखपाळख होती. सिनेमाची गाणी कोणत्या रागावर बेतलेली आहेत आणि मुखडा काय आहे नि अंतरा काय आहे, या (मला न कळणार्या) गोष्टींबद्दल ते भरभरून बोलतात. त्यांच्यासोबत मी प्रवासात वगैरे असतो, तेव्हा तर तीन-चार तास कसे जातात कळतही नाही. गाणीच गाणी. गाण्यांचे गीतकार, संगीतकार, गायक, नट, राग असं सगळं जिभेवर. मध्ये मध्ये गाणी म्हणणार. गाडीत कुणी त्यातला दर्दी असेल तर प्रश्नच मिटला. मिळून गाणार. नुसती धमाल!
मधल्या काळात ते जमेल तसं गाणं गायलाही शिकत होते. अगदी बालसुलभ उत्साहाने. कधी कधी त्यांचा आवाज मस्त लागतो आणि ऐकताना मजा येते. बासरीचंही तसं. मूड असेल आणि फुंकर स्थिर असेल तर उत्तमच. कधी जमत नसेल तर बासरी बाजूला टाकून देणार. अर्थात, आपण चांगलं गातो आणि बासरीही चांगली वाजवतो असा त्यांचा समज असल्याने कुणी मित्र-मैत्रीण वगैरे आजारी पडल्याचं कळलं, की हे लगेच निघतात बासरी सोबत घेऊन. विचारपूस झाल्यानंतर गायला किंवा बासरी वाजवायला लागतात. त्यामागे आजारी माणसाचं मनोरंजन करावं, असा शुद्ध हेतू असतो. ‘मी अमुककडे गेलो होतो. त्याला बासरी वाजवून दाखवली. मी निघालो तेव्हा तो छान फ्रेश झाला होता,’ असं त्यांचं म्हणणं असतं.
हा दावा म्हणजे त्यांची चेष्टा करण्यासाठी माझ्या हाती लागलेलं कोलीतच. मी एकदा आजारी पडलेलो असताना त्यांनी घरी येऊन माझ्यावरही हा प्रयोग केला होता. तेव्हा मी त्यांना गमतीने म्हणालो, ‘‘तुम्ही बासरी वाजवून आलात की तुमचे मित्र लगेच बरे का होतात माहीत आहे?’’ त्यांचा निरागस प्रतिप्रश्न, ‘‘का?’’ मी त्यांना म्हटलं, ‘‘अहो, तो आणखी काही काळ अंथरुणात राहिला, तर तुम्ही पुन्हा जाऊन बासरी वाजवाल किंवा गाऊन दाखवाल... म्हणून!’’ त्यावर ते कसनुसे हसतात. असं बोललेलं त्यांना न आवडूनही दोस्तीखातर माफ करून टाकतात.
अवचटांचा मित्रपरिवार चिक्कार मोठा आहे. पुण्यात तर आहेच, पण महाराष्ट्रभर आहे. अगदी गावोगावी, देशात-परदेशातही. जिथे कुठे जातात तिथे कुठल्या तरी मित्राच्या घरी राहतात. हॉटेलमध्ये जाऊन बंद खोलीत एकट्याने राहणं, ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही. प्रत्येक गावात एकाहून अधिक मित्र. त्यामुळे अवचटांनी आपल्या घरी राहावं अशी स्पर्धाच त्यांच्यात चाललेली असते. आपण मित्रांना हवेसे आहोत, हे फीलिंग त्यांची तबियत खूष करून टाकतं. गेले की ऐसपैस राहतात. त्यांच्या आवडीचे पदार्थ केले जातात. भेटायला लोक येतात. गप्पाटप्पा होतात. एका बाजूला कधी गाण्याची लकेर, कधी ओरिगामीचा चाळा. मी फार नाही, पण थोडासा त्यांच्यासोबत कुठे कुठे गेलोय. एका पुस्तकाचा प्रकाशनदौरा आम्ही आखला होता. पुण्यापासून बेळगावपर्यंत. चार-पाच मुक्काम. आम्ही सहकारी त्या त्या गावी हॉटेलमध्ये वगैरे राहायचो. हे मात्र मित्रांच्या घरी. त्यातील बरेचजण त्यांच्या मुलांसारखे. त्यामुळे यांचे सगळे लाड पुरवले जायचे. त्यावरून त्यांना काही म्हटलं, की लाडोबा खूष.
मी बघितलंय, त्यांचा हा मित्रपरिवार, मुलं-मुली यांना अवचटांचा जाम लळा आहे. सगळे ‘बाबा, बाबा’ म्हणत त्यांच्या भोवती असतात. त्यांना भेटायला घरी येत असतात. फेसबुकवर त्यांच्याभोवती फेर धरून नाचत असतात. अवचटांनी एखादा अनुभव किंवा स्वत:ची कविता पोस्ट केली की ‘बाबा गे्रट’, ‘बाबा मस्त’ अशा कॉमेंट्सच्या सरी पडायला लागतात. पण माझे-त्यांचे संबंध असे नाहीत. आमची घसट वाढली तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘सगळे मला बाबा म्हणतात, तूही बाबाच म्हण’. मी म्हटलं, ‘‘मी नाही बाबा म्हणणार. मी तुम्हाला गुरुजी म्हणेन. तुम्ही माझ्यासाठी जे आहात तेच मी म्हणणार.’’ ते म्हणाले, ‘‘तू मला अहो-जाहो करतोस. किमान अरे-जारे तरी कर.’’ मी म्हटलं, ‘‘लोक तुम्हाला काही म्हणोत.. मी नाही तुम्हाला अरे-जारे करणार.’’ खरं तर त्यांच्या वयाच्या आसपासच्या काही मित्रांशी माझेही संबंध ‘अरे-जारे’चे आहेत. खुद्द त्यांचा धाकटा भाऊ, चित्रकार सुभाष अवचट हाही माझा मस्त मित्र आहे. त्याचं-माझं नातं ‘अरे-जारे’चं आहे. पण या गुरुजींना त्यांची इच्छा असूनही मी ‘अरे-तुरे’ करू शकत नाही.
पण याचा अर्थ आमचे संबंध कोरडे, औपचारिक किंवा व्यावहारिक आहेत का? अजिबात नाही. अगदी जवळचे आहेत, दोस्तीचे आहेत, मस्तीचे आहेत. त्यातील मस्ती त्यांना कधी कधी झेपत नाही. त्यांचं वय आणि सत्कार-सन्मानांनी तयार झालेली नव-स्वप्रतिमा यात त्यांची चेष्टा करणं, त्यांना टोकणं, अडचणीचे प्रश्न विचारणं, स्पष्ट बोलणं खटकत असणार. पण मी त्यांना म्हणतो, ‘‘मी आहे हा असा आहे. जमतंय का बघा. माझं प्रेम आहे म्हणूनच मी तुमच्याशी असा वागतो. मला तुमच्याशी कृत्रिम वागणं शक्य नाही.’’ मग ते नरमतात. म्हणतात, ‘‘बरं बाबा, तुला हवं तसं वाग. पण या म्हातार्याबरोबर चार गोड शब्द तरी बोलशील की नाही?’’
त्यांची-माझी भांडणंही होत असतात. म्हणजे वाद. धरणं बांधणं, उद्योग वाढणं, शहरीकरण, प्रदूषण, पर्यावरण हे आमचे वादाचे विषय. ‘तुमचं म्हणणं उदात्त आहे, पण ते व्यावहारिक नाही,’ असं माझं म्हणणं असतं. धरणं बांधावीच लागतील, शेती कोसळली तर शहरीकरण होणारच, उद्योग वाढल्याशिवाय रोजगार कसे वाढणार-प्रगती कशी होणार- पैसा कसा तयार होणार, असं मला वाटत असतं. माणसांना विस्थापित करू नये, जंगलांची नि निसर्गसंपत्तीची नासधूस करू नये, प्रदूषण होऊ नये वगैरे म्हणणं बरोबरच; पण नुसतं म्हणून काय उपयोग? असं काय काय आमच्यात चालत असतं. त्यांच्यावर लिहिलेल्या एका लेखात मी या अनुषंगाने काही टीकात्मक लिहिलं होतं. ‘गुंतागुंतीच्या सामाजिक व अर्थ राजकीय विषयांवर अवचटांची भूमिका भाबडी किंवा स्वप्नाळू असते’ असं काहीसं. त्यांना ते वाक्य चांगलंच लागलं. पण मी म्हटलं, ‘‘काय करू? आहे हे असं आहे.’’ तेव्हापासून आम्ही हे विषय परस्पर सहमतीने आणि सामंजस्याने टाळायला सुरुवात केली. कधी विषय पोचलाच तिथे, तर लगेच अवचट दोन्ही कानांवर हात ठेवून, डोळे मोठे करून म्हणतात, ‘‘हां... पण आम्ही बावळट! आम्हाला या विषयातलं काही कळत नाही ना! तुम्हाला ते जागतिकीकरण, अर्थ-राजकीय गुंतागुंत वगैरे समजतं. आम्ही गरीब बापडे... हा विषय असू देत.’’
मग मी समजावण्याच्या सुरात त्यांना म्हणतो, ‘‘अहो, तुमच्यासारख्या गुरुजी लोकांकडून आम्ही जग बघायला शिकलो. पण दरम्यानच्या काळात जग बदललंय. जुन्या भूमिका तपासून घ्यायला पाहिजेत. त्यामुळे तुम्ही जसा विचार करता तसाच विचार आम्हीही करायचा, असं होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या पूूर्वसुरींपेक्षा वेगळा विचार केला, तसाच आम्ही तुमच्यापेक्षा वेगळा विचार करणार. तुमच्यासारखाच विचार आम्ही करायला लागलो, तर याचा अर्थ तुम्ही आम्हाला सतत उलगडणारं जग बघायला शिकवलंच नाही, असा होईल.’’
पण या मुद्द्यावर आमचं काही जमत नाही. पण जमत नाही म्हणून दुरावा तयार होतो असंही नाही. ते एवढे मोठे लेखक, पण त्यांचं नवं पुस्तक छापून आलं, की ते आवर्जून मला आणून देतात. म्हणतात, ‘‘साहेब, मी एक छोटा लेखक आहे. जरा नजर टाका गरिबाच्या पुस्तकावर!’’ त्यांचं पुस्तक बघून मी त्यांना चांगलं म्हणावं, त्यांचं कौतुक करावं असं त्यांना वाटत असतं. लहान मुलं जशी शाबासकी मिळवण्यासाठी आतुर असतात, तसा चेहरा करून ते थांबलेले असतात. पण संपादकाची नजर आडवी येते. नेमकी मी काहीतरी खोडी काढतो. मुखपृष्ठाबद्दल, ब्लर्बबद्दल, फॉंटबद्दल, नजरेत सापडलेल्या चुकीबद्दल बोलून बसतो. मग ते खट्टू होतात. मग मी त्यांची समजूत काढत बसतो. अशी या नात्यातली गंमत.
अलीकडेच त्यांचं एक नवं पुस्तक आलं. ते घेऊन ते माझ्याकडे आले. उत्साहाने. पुस्तक दिलं. नेहमीची डायलॉगबाजी झाली. मी पुस्तक बघत असतानाच ते म्हणाले, ‘‘एक मिनिट पुस्तक दे बघू.’’ मी दिलं. काही तरी चमकून गेलं होतं त्यांच्या डोक्यात. खिशातलं पेन काढलं आणि मोठ्या ढोबळ्या अक्षरात लिहिलं, ‘सुहासदादा, तुझ्या दादागिरीचा मी एक बळी!’’ खाली सही : अनिल अवचट. मग आम्ही खूप हसलो. चारच दिवसांनी पुन्हा आले. म्हणाले, ‘‘परवाचं पुस्तक दाखव बघू.’ मी पुस्तक काढून दिलं. परवा लिहिलेल्या वाक्याच्या खाली त्यांनी नवं वाक्य लिहिलं. ‘जसा माझ्या बाबागिरीचा तू!’’ खाली सही : बाबा. मग आम्ही पुन्हा खूप हसलो.
तर असे आम्ही एकमेकांच्या हट्टांचे बळी बनून मजा करत असतो. खरं तर आमच्या वयांतलं, अनुभवांतलं आणि क्षमतांतलं अंतर पाहता त्यांनी माझी दादागिरी का खपवून घ्यावी? विशेषत: त्यांची बाबागिरी मी खपवून घेत नसताना? पण हे नाही म्हटलं तरी ‘व्यावहारिक’ प्रश्न आहेत. ते त्यांना लागू नाहीत. व्यवहार त्यांना जवळपास कळतच नाही म्हणा ना! व्यवहार कळला असता तर शिक्षणाने डॉक्टर होऊनही डॉक्टरी न करता ते लेखक झाले असते का? लाल डब्याच्या एसटीतून वर्षानुवर्षं रानोमाळ फिरले असते का? किती तरी प्रकारची चित्रं आणि शिल्पं बनवूनही ती माळ्यावर ठेवून दिली असती का? पु. ल. म्हणाले म्हणून ‘मुक्तांगण’ काढण्याच्या भानगडीत पडले असते का? नामवंतपणाची झूल बाजूला सारून मुलांसमोर ओरिगामी आणि जादूचे खेळ करायला गेले असते का? नक्कीच नाही. आणि गेलेच असते तर त्याची पुरेपूर किंमत त्यांनी वसूल केली असती. पण आमचे गुरुजी त्यातले नव्हेत. त्यामुळेच ते आपले आपण सुखी आहेत.
त्यांनी एका ठिकाणी लिहिलंय, की ‘मी काही उपेक्षित माणूस नाही. जगाकडून भरभरून मिळालेला माणूस आहे.’ ही समाधानाची आणि तृप्तीची भावनाच त्यांना व्यवहारिकतेपासून दूर ठेवत असेल. त्यांना जसं भरभरून मिळालंय, तसंच तेही त्यांच्यापर्यंत येणार्या प्रत्येकाला भरभरून देत असतात. त्यांच्यासोबत वावरताना ते पदोपदी जाणवतं. ते कुठेही गेले की त्यांच्याबद्दलची आपुलकी इतरांच्या डोळ्यांत दिसते.
एकदा गंमत झाली. मी त्यांच्यासोबत गाडीतून कुठे तरी चाललो होतो. एका मुख्य चौकात पोलिसांनी गाडी अडवली. मला कळेना, कोणताही नियम तोडलेला नसताना पोलिस गाडी बाजूला घ्यायला का सांगताहेत. मी वैतागलो. ते शांत होते. मी त्यांना म्हटलं, ‘‘तुम्ही थांबा गाडीत. मी जाऊन बघतो, पोलिस काय म्हणताहेत.’’ तोपर्यंत दोन-तीन पोलिस आलेच. म्हणाले, ‘‘गाडी साइडला लावा. मॅडमना भेटा.’’ अवचट उतरले. पोलिसांसोबत आमची वरात निघाली. रस्त्याच्या कडेला एक पोलिस इन्स्पेक्टर बाई उभ्या होत्या. अवचट पोचताच त्यांनी लवून नमस्कार केला. मी चकित. मग चहा पिण्याचा आग्रह. मला भानगड कळेना. त्या इन्स्पेक्टर बाई मला म्हणाल्या, ‘‘सरांची गाडी आम्ही कुठूनही ओळखतो. दिसली की थांबून त्यांना चहा देतो. यांनी ङ्गार लोकांचं कल्याण केलंय.’’ त्यांच्या बोलण्याचा संदर्भ ‘मुक्तांगण’चा होता. अर्थातच या सगळ्याकडे दुर्लक्ष करत अवचटांनी टेप लावली. ‘हे माझे मित्र आहेत’ वगैरे सांगण्याची. पुढे म्हणाले, ‘‘पण ङ्गार दादागिरी करतात! मी यांना ङ्गार घाबरतो!’’ एकापाठोपाठ एक असंबद्ध वाक्यं. इतरांना टोटल न लागणारी. शिवाय हे सगळं डोळे मोठ्ठे करून! त्या इन्स्पेक्टर बाई बुचकळ्यात पडलेल्या. काठीचे दोन फटके घातले तर हे बेणं सरळ होईल, अशा नजरेने त्या माझ्याकडे बघत होत्या. मी अवचटांना म्हटलं, ‘‘झालं असेल तर चला.’’ परत बाईंकडे बघून म्हणतात, ‘‘बघा कसे वागतात माझ्याशी!...’’ बाई पुन्हा माझ्याकडे आपादमस्तक पाहतात. अशी सगळी मजा!
सांगायचा मुद्दा असा की, अवचट लोकांनाही भरभरून देतात. माझेच दोन अनुभव सांगतो. एकदा ते ऑफिसात आले तेव्हा मी डोळे चोळत होतो. एक डोळा तळावलाही होता. म्हणाले, ‘‘काय झालं?’’ म्हटलं, ‘‘प्रॉब्लेम झालाय. डॉक्टरकडे गेलो. चष्मे बदलून बघितलं. पण त्रास होतोय.’’ कुणी काय म्हणावं? ‘‘पुन्हा एकदा दाखवून बघ कुणाला.’’ पण गुरुजींचं तसं नाही. ते मला त्यांच्या जुन्या ओळखीतल्या चष्मेवाल्याकडे घेऊन गेले. तिथे डोळे तपासून नवा चष्मा करवून घेतला. तोही सूट होईना. मग गाडीत घालून त्यांच्या डॉक्टर मैत्रिणीकडे घेऊन गेले. तिथे जाऊन टेप सुरू : ‘‘हा माझा मित्र...’’. त्या डॉक्टर मला ओळखत होत्या, त्यामुळे माझी पुढची बदनामी वाचली. पुढेही डोळ्यांना आराम मिळेपर्यंत त्यांनी माझा पिच्छा पुरवला. आपण असं काही केल्याचं नंतर त्यांच्या लक्षातही राहत नाही.
असेच एकदा भेटले तेव्हा मी एका कौटुंबिक विवंचनेत होतो. सहज त्यांच्याशी बोललो. खोटी पोलिस केस वगैरे भानगड होती. ते म्हणाले, ‘‘खोटी आहे ना? थांब, आपण मार्ग काढू.’’ त्यांनी थेट मुख्य पोलिस अधिकार्याला फोन केला आणि ‘माझा मित्र येईल त्याला मदत करा. ही खोटी केस आहे,’ असं एका दमात सांगून ते मोकळे झाले. त्यांनी असं काही करावं असं मनांतही नव्हतं, अपेक्षितही नव्हतं. पण हे मदत करून मोकळे, आणि नामानिराळेही!
‘मुक्तांगण’ नाव ऐकून पुण्याबाहेरचे किंवा महाराष्ट्राबाहेरचे कुणी मित्र, परिचित माझ्याकडे चौकशी करतात. अॅडमिशनसाठी. अवचटांना विचारलं, तर ते कधीही अडचणी सांगत नाहीत, टोलवाटोलवी करत नाहीत. केस जेन्युइन असेल तर ते मदत करायला एका पायावर तयार असतात. मी नेहमी बघतो, त्यांना सतत कुणाचे ना कुणाचे मदतीसाठी फोन येत असतात. आणि शक्य असेल तर ते प्रत्येकाला मदतही करत असतात.
पण जेव्हा मदत करता येत नाही तेव्हा मात्र अस्वस्थ होतात. एक दिवस ते ऑफिसमध्ये आले. त्यांचा काटा हललेला होता. अस्थिर दिसत होते. त्यांची विचारपूस केली. त्या दिवशी एका तरुण जोडप्याने आपल्या छोट्या मुलांसह आपल्या राहत्या घरातून उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी आलेली होती. त्या घटनेने ते हादरले होते. कोण कुठली अनोळखी माणसं, पण यांची घालमेल चालली होती. मी त्यांचं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होतो. पण मध्येच त्यांनी कुण्या बड्या पोलिस अधिकार्याला फोन केला. म्हणाले, ‘‘मला या सोसायटीत जायचंय. या मुलांनी आत्महत्या का केली हे समजून घ्यायचंय.’’ त्यांना परवानगी मिळाल्याच्या क्षणी ते तडक निघाले आणि तिकडे जाऊन पोहोचले. सोसायटीतील मंडळींशी बोलले. पुढे काय झालं माहीत नाही, पण त्या क्षणीची अस्वस्थता खूप काही सांगून जाणारी होती.
त्यांना असंच असहाय झालेलं मी पाहिलं, ते नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हा. सकाळी ही बातमी पुण्यात पसरल्यानंतर त्यांचे शेकडो संबंधित ‘साधना’ कार्यालयाजवळ जमले. मीही तिथे होतो. थोड्याच वेळात अवचट पोहोचले. दाभोलकर हे त्यांचे जवळचे मित्र, चळवळीतले सहकारी. मी त्यांना भेटलो. हात धरला. त्यांची नजर भ्रमिष्टासारखी वाटत होती. हात थंडगार आणि अनोळखी. मला पार करून ओढल्यासारखे ते पुढे गेले. घटनेच्या धक्क्याने ते हक्काबक्का झाले होते. हरवून गेले होते.
त्यांचं असं हरवून जाणं आणखी एका प्रसंगी दिसतं. दरवर्षी. समाजासाठी झटणार्या व्यक्तींना त्यांच्या दिवंगत पत्नीच्या नावे ‘संघर्ष सन्मान’ दिला जातो. या कार्यक्रमाच्या आधी-नंतर, दोन-तीन दिवस अवचट बदललेले असतात. आपल्या आपल्यात मग्न असतात. कार्यक्रमातही ते काही बोलत नाहीत. अस्थिर आणि अस्वस्थ असतात. त्यांच्या हातापायांतली शक्ती निघून गेलीय, अशा त्यांच्या हालचाली असतात. माझी-सुनंदाताईंची कधी भेट झाली नाही, पण अवचटांच्या जगण्याची सगळी ऊर्जा त्यांच्या ठायी होती असं वाटतं. त्यांच्या कवितासंग्रहातील सुनंदाताईंवर केलेल्या काही कवितांमधून ही गोष्ट जाणवते. खूप सुंदर कविता आहेत त्यातल्या काही. ‘मुक्तांगणची गोष्ट’ या पुस्तकाची अर्पणपत्रिकाही अशीच आहे-
आठवणींची प्रसन्न छाया
झाड संपले तरीही
दिवा दाखवी वाट संकटी
तेल संपले तरीही
खिन्न मनावर पडतो पाऊस
ऋतू पालटे तरीही
लागे रुखरुख घाली समजुत
शब्द पारखे तरीही.
या ओळी वाचल्या की कुणाच्याही मनात गलबलावं. ज्या माणसाने आपल्या आसपासच्या माणसांना एवढा आनंद दिला, त्या माणसाला त्याच्या सर्वांत प्रिय व्यक्तीची पुरेशी सोबत मिळू नये, याचं वाईट वाटत राहतं. त्यांची स्वतःची जखम तर केवढी असेल! हा एक विषय सोडला तर जगातल्या सगळ्या विषयांवर मी त्यांच्याशी बोलत आलोय. पण हा विषय बोलण्याची हिंमत मी अजून एकवटू शकलेलो नाही.
अवचटांचा संचार सर्वदूर आणि अनेक क्षेत्रांत असला आणि त्यामुळे त्यांचा परिवार मोठा असला, तरी चार भिंतींच्या आत त्यांचं एक छोटंसं कुटुंब होतंच. माझं त्यांच्या घरी येणं-जाणं सुरू झालं, तेव्हा त्यांच्या मुली मुक्ता आणि यशोदा यांची लग्नं होऊन गेलेली होती आणि अवचटांची आई ओतूरहून त्यांच्या घरी आलेली होती. अवचटांसोबतच्या नात्यामुळे आपोआपच मुक्ता-यशोदासोबत मैत्रीचं नातं राहिलं आणि मनात बंधुत्वाची भावना. यशोदा कुठेही भेटली की आत्मीयतेने हात घट्ट धरून बोलणार. अवचटांच्या आईशीही माझे अल्पावधीत छान संबंध तयार झाले होते. अवचटांकडे गेलो की आधी आजींकडे जायचं, थोड्या गप्पा करायच्या; काय वाचलं, काय आवडलं विचारायचं, तब्येतीची विचारपूस करायची, मगच पुढे जायचं असा शिरस्ता होता. आजींचं वाचन दांडगं होतं. त्यांना बर्या-वाईटाचीही उत्तम जाण होती. वयाची नव्वदी पार करूनही त्या सर्व वेळ वाचत आणि वाचलेल्या पुस्तकांबद्दल स्पष्टपणे मत नोंदवत. एका शब्दात किंवा जास्तीत जास्त एखाद्या वाक्यात. जी पुस्तकं त्या ‘पास’ करत, तीच पुढे अवचटांच्या खोलीत जात, इतका त्यांचा पुस्तकांवर कडक पहारा होता.
अवचटांच्या घराचं दार सर्वकाळ उघडं असतं. कधीही जायचं आणि दार ढकलून घरात वावरायचं. इतरांचं माहीत नाही, पण मी गेलो आणि अवचटांशी गप्पा चालू असल्या, की एखादा पदार्थ वाटीतून खोलीत येणारच. कधी कधी आजींच्या हातचा. एकदा दिवाळीच्या अल्याड-पल्याड त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी स्वत: बनवलेल्या ‘आजीच्या करंज्या’ त्यांच्यासमोर बसून खायला लावल्या होत्या. एका बाजूला त्यांचं हे मायेने वागणं-बोलणं आणि दुसर्या बाजूला सत्तर प्लस वयाच्या मुलाची त्यांना वाटणारी काळजी या दोन्ही गोष्टींचं मला अप्रूप वाटायचं. ‘तू लहान असलास तरी अनिलचा मित्र आहेस..’ असं म्हणायच्या मला. ‘अनिलचं फिरणं, लिहिणं, कार्यक्रम सतत चालूच आहेत. विश्रांती म्हणून नाही. त्याला सांग की फार दगदग करू नकोस’, असाही लकडा लावायच्या. मग मीही अवचटांच्या खोलीत गेलो की त्यांना सांगायचो, ‘‘अनिलची आई म्हणतेय की अनिलने दगदग जरा कमी करावी.’’ त्यांना कळायचं नाही, की मी असं का म्हणतोय!
अवचट ऑफिसमध्ये आले की अनेकदा अख्ख्या ऑफिसला पुरेल एवढा खाऊ घेऊन येतात. कधी भेळ, कधी भजी, कधी आणखी काही. आग्रहाने सर्वांना खायला लावतात. चहा मागवतात. ऑफिसच्या फ्रिजमध्ये आइस्क्रीम असलं तर ते आवडीने मटकवतात. मध्येच म्हणतात, ‘‘मी हे असलं काही इथे खाल्लं हे मुक्ताला सांगू नकोस. ती मला फार रागावते.’’ एखाद्या लहान मुलाने आईपासून काही लपवावं, असा त्यांचा आविर्भाव असतो. मग त्यांच्यासोबत कधी चकमकी उडाल्या, की चेष्टेने मीही त्यांना म्हणतो, ‘‘तुम्ही माझ्याशी नीट रहा. नाहीतर मुक्ताला सांगेन तुमचं इकडे काय चालतं ते.’’ मग ते म्हणणार, ‘‘साहेब, तुम्ही म्हणाल तसं वागतो. मुक्ताला तेवढं तुम्ही काही सांगू नका.’’ अशी मजा नेहमीचीच.
गेल्या काही वर्षांत त्यांची दोन-तीन छोटी मोठी ऑपरेशन्स झाली. त्यांची सगळी काळजी मुक्ता-यशोदा घेत असतात; पण या काळात ते एकटे पडल्यासारखे असतात. एका ऑपरेशनच्या आधी मी त्यांना भेटायला गेलो होतो. कुठल्या तरी विचारात गुंतलेले होते. म्हटलं, ‘‘काय चाललंय डोक्यात? कसल्या विचारात आहात?’’ तर म्हणाले, ‘‘माझं काही बरं-वाईट झालंच, तर या घराचं काय करायचं ते तुला सांगून ठेवतो. मुक्ता-यशोदाला तर सांगितलं आहेच.’’ मी त्यांना म्हटलं, ‘‘तुमच्यानंतर जे करायचं ते करायला मुक्ता-यशोदा सक्षम आहेत. तुम्ही काळजी करू नका.’’
ऑपरेशन होऊन बुवाजी बरे झाले की आपण त्या गावचेच नाही असं वागणार. पुन्हा आपापल्या कामात-आनंदात मस्त. पण कधी शुगर वाढली आणि टेस्टची वेळ आली की पुन्हा सुरू ः ‘‘तुझ्या लक्षात आहे ना काय करायचं ते?’’ मी त्यांना म्हणतो, ‘‘तुम्हाला काही धाड भरलेली नाही. अवचटांच्या मागच्या पिढ्या ठोक नव्वद वर्षं जगल्या आहेत. तुम्ही काळजी करू नका. मजा करा.’’ मग त्यांचा चेहरा उजळतो, उल्हसतो.
अवचटांबद्दल आणखी एक गोष्ट सांगायला हवी. त्यांच्या उत्साहाबद्दल आणि त्यांच्या ठायी असलेल्या कुतूहलाबद्दल. त्यांच्या आयुष्यभराच्या सामाजिक लेखनामागील ऊर्मी कष्टकरी लोकांविषयीची कळकळ होती हे खरं, पण त्यांचं जगणं समजून घेण्यासाठी कुतूहल आणि चिकाटीही आवश्यक होती. या तीनही गोष्टींच्या आधारे त्यांनी एक अख्खं जग आपल्यासमोर आणून ठेवलं. पण हे सगळं काम त्यांच्या पन्नाशी-साठीपर्यंतचं. पुढे वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांच्या मोकाट फिरतीवर मर्यादा येत गेल्या, तसतसं त्या प्रकारचं लिखाण कमी होत गेलं. या टप्प्यावर कुणी म्हणे, ‘आता अवचट संपले!’ पण संपतील नि थांबतील ते अवचट कसले? त्यांनी स्वत:तील उत्साहाला नवी वाट मिळवून दिली आणि नव्या फॉर्ममध्ये लिखाण सुरू केलं.
पूर्वी ते एखादी घटना घडली की उठून त्या ठिकाणी पोहोचत. लोकांकडून-कार्यकर्त्यांकडून विषय समजून घेत. आता त्यांनी कामाची पद्धत बदलून घेतली. एकेका विषयातले तज्ज्ञ, अभ्यासक, कार्यकर्त्यांना भेटून विषय समजून घ्यायचा आणि तो लिहायचा, असं त्यांनी सुरू केलं. या पद्धतीत आडवा-उभा प्रवास वाचला आणि खूप लोकांशी बोलणंही वाचलं. पण हाताशी माहिती तर भक्कम. या प्रकारच्या लिखाणातून ‘कुतूहलापोटी’ हे लोकप्रिय पुस्तक तयार झालं.
हे लिखाण करतानाचा उत्साह मी जवळून पाहत आलोय. एखाद्या विषयाने त्यांना खुणावलं की ते वाचन सुरू करतात. गुगल गुरुजींची ‘व्हर्च्युअल’ शिकवणी लावतात. मग अगदी काळजीपूर्वक ‘अॅक्चुअल’ गुरूचा शोध घेतात. त्याच्याकडे एक ना अनेकदा जाऊन विषय समजून घेतात. मित्रांकडे जाऊन ती माहिती सांगून मनात पक्की करून घेतात. आणि मग ‘नव-अवचट’शैलीत लिखाण. लिखाण झालं की पुन्हा मित्रांकडे जाऊन वाचून दाखवणार, सूचना अंतर्भूत करणार, आणि मग लेख गुरूकडे तपासायला देणार. तिकडून ‘ओके’ मिळाला की मग हे खूष! त्यांचा हा आनंद पाहण्यासारखा असतो. त्यांचे बहुतेक गुरू यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान. स्वत:च्या मुलांच्याही वयाचे. पण अजिबात संकोच न बाळगता त्यांच्यापुढे लहान मुलासारखं बसून ते शिकतात आणि मग लेख चांगला झाल्याचं सर्टिफिकेट मिळालं, की ते घेऊन नाचतात. वयाच्या सत्तरी-पंचाहत्तरीत एखादा नामवंत लेखक असा निर्मळ राहू शकतो का? पण अवचट आहेत तसे.
या गुरुकेंद्रित (तुलनेने स्वांतसुखाय) लिखाणासोबतच अवचटांना शक्य होईल तसं ते फिरतातही आणि त्यावर आधारित लिहितातही. कोकणातील खारङ्गुटीच्या जंगलांपासून विदर्भातल्या कोळशाच्या खाणींपर्यंत जाऊन ते प्रश्न समजून घेण्याची त्यांची धडपड असते. कधी ते शक्य होतं, कधी ते अधुरं राहतं. शिवाय काही वेगळं मौलिक काम करणारा माणूस त्यांना दिसला, की त्याच्या कार्यक्षेत्रात जाऊन सगळं समजून घेण्याची त्यांची खटपट असते. त्यांचं हे फिरणं, समजून घेणं आणि लिहिणं पूर्वीसारखं राहिलेलं नसलं, तरी या वयात त्यांचा हा उत्साह मात्र वाखाणण्यासारखा.
आता कोव्हिड संसर्गाने सर्वच थांबवलं, अन्यथा त्यांचा कुठे बाहेरगावी जायचा उत्साहही काहीच्या काही. महाराष्ट्रातून कुठूनही निमंत्रण येऊ देत, गुरुजी कधी नाही म्हणणार नाहीत. कुठे गेले की तिकडचे कार्यकर्ते, मित्र, परिचित सगळ्यांना भेटणार आणि भेटींनी तृप्त होऊन परतणार. पुस्तकांच्या प्रकाशनाचे दौरे असोत अथवा कुठल्या समारंभांची निमंत्रणं असोत, ते अगदी एका पायावर तयार असत. ‘तू येणार असशील सोबत, तर बिनाकामाचंही जाऊयात कुठे फिरायला’ ही ओपन ऑफरही नेहमीचीच. त्यांच्या पॉकेट डायरीतील पुढच्या दोन-तीन महिन्यांच्या तारखा कुणी कुणी ‘बुक’ केलेल्या असल्या, की यांची तब्येत एकदम खूष. आपण लोकांना हवे आहोत, ही जाणीव त्यांना आनंदी आणि उत्साही ठेवत असणार. हल्लीहल्लीच ते ‘बाहेरगावचे कार्यक्रम झेपत नाहीत रे’ असं म्हणू लागलेत. पण पुण्यातल्या कार्यक्रमांना अर्ध्या रात्रीच्या नोटिसने यायला तयार. आमच्या ‘युनिक स्कूल ऑफ जर्नालिझम’च्या तरुण पत्रकारांसमोर बोलायला तर उत्सुकच. ‘मला केव्हा बोलावणार?’चा सतत धोशा! आले की दोन-तीन तास भरभरून बोलणार.
तीन-चार वर्षांपूर्वी आम्ही त्यांना आमच्या ई-संमेलनाचं अध्यक्ष व्हावं अशी विनंती केली. मतकरी, ग्रेस, नेमाडे, महानोर हे त्यांच्या आधीचे अध्यक्ष. ‘एवढ्या मोठ्या लेखकांच्या रांगेत मी बसतो का?’ हा त्यांचा पहिला प्रश्न होता. मी त्यांना जे सांगायचं ते सांगितलं. त्यावर ‘‘मी कशाला हवा अध्यक्ष? आणखी मोठे लेखक आहेत की...’’ यावर त्यांची गाडी अडली होती. पण ‘तुमचं काही एक ऐकणार नाही. तुम्हाला हो म्हणावं लागेल’ असा ‘व्हेटो’ वापरल्यानंतर स्वारी नमली. पण एकदा मान्यता दिल्यानंतर त्या ई-संमेलनासाठी जे जे करावं लागलं, ते त्यांनी लहान मुलाच्या उत्साहाने केलं. स्वत:च्या लिखाणाबद्दल सविस्तर मुलाखत दिली, एकेका पुस्तकाबद्दलचे व्हिडिओज केले, आणखी काय काय! आम्ही करून थकलो तरी हे विचारतच होते. ‘‘आणखी काही करायचंय?’’ असा त्यांचा उत्साह.
मध्ये त्यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा झाला. फक्त नातेवाईक, मित्र आणि आप्त यांच्या उपस्थितीत. त्या कार्यक्रमात डॉ. आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना बोलतं केलं होतं. कार्यक्रमाआधी आठ दिवस अवचट मला म्हणाले, ‘‘तू बोलशील का त्या दिवशी?’’ मी म्हटलं, ‘‘तुम्हाला माहीत आहे, मी जाहीर कार्यक्रमात बोलत नाही.’’ मी बोलावं असं त्यांना वाटत होतं. माझ्या नकाराने ते दुखावल्यासारखे वाटले. मी त्यांना म्हटलं, ‘‘कशाला मला बोलण्याचा आग्रह धरता? मला तुमच्याबद्दल जे सांगायचं आहे ते मी लिहीन. तुमचं-माझं प्रेमप्रकरण काही पाच मिनिटांच्या बोलण्यातून मी सांगू शकणार नाही.’’
आता हा लेख वाचल्यानंतर ते खूष होतील आणि ‘साहेब, गरिबाबद्दल लिहिलंत. खूप उपकार झाले!’ असं ट्रेडमार्क वाक्य बोलतील, अशी आशा मी धरून आहे.
समकालीन प्रकाशित अनिल अवचट यांची पुस्तकं - मुक्तांगणची गोष्ट, रिपोर्टिंगचे दिवस, माझी चित्तरकथा, लाकूड कोरताना, कुतहलापोटी, माझ्या लिखाणाची गोष्ट, अगं अगं रेषे, आणखी काही प्रश्न
समकालीनचे संपादक सुहास कुलकर्णी यांनी त्यांच्यावर लिहिलेला हा लेख, सुहास कुलकर्णी यांच्या अवलिये आप्त या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे.
- सुहास कुलकर्णी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा