शेतकऱ्याचं जगणं कवितेतून मांडणारे ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचा आज जन्मदिवस. समकालीन प्रकाशनाचे संपादक सुहास कुलकर्णी यांनी त्यांच्यावर लिहिलेला हा लेख, सुहास कुलकर्णी यांच्या 'अवलिये आप्त' या पुस्तकात समाविष्ट केला आहे. ना. धों. महानोर यांच्या जन्मदिनानिमित्त वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत.



ना. धों. महानोर कुणाला माहीत नाहीत? गेल्या शंभर वर्षांतील अव्वल मराठी कवींच्या प्रभावळीतील हे महत्त्वाचं नाव आहे. मर्ढेकरांना जसं मराठी नवकाव्याचं प्रवर्तक मानलं जातं, तसंच महानोर हे शेतकऱ्याचं जगणं कवितेतून मांडणारे पहिले कवी मानले जातात. पहिले, महत्त्वाचे आणि लोकप्रिय.

पहिले, कारण महानोरांची कविता येईपर्यंत आपल्याकडे प्रामुख्याने शहरी कवींचाच पगडा होता. महानोर आपल्या कवितेत ग्रामीण आणि शेतकरी जगणं, झोपडी-पाडे, पीक-पाणी, गुरं-ढोरं, पांदीचे रस्ते नि पाणमळे, ऊन-पाऊस, नक्षत्रं-आभाळ-तारे, पशुपक्षी, पाखरांचे थवे, फुलं-पानं, बोरी-बाभळी असं स्वत:चं अख्खं शेतकरी जगच घेऊन आले. अशी कविता त्याआधी नव्हती.

ते महत्त्वाचे कवी आहेत, कारण त्यांनी कवितेत निव्वळ निसर्ग आणला नाही. शेतकऱ्याचं जगणं, त्याची सुख-दु:खं, संसारातले प्रश्न, प्रेम-शृंगार, रडणं-कुढणं, दुष्काळ-उद्ध्वस्त होणं असं सगळं शेतकरी भावजीवन त्यांनी कवितेत आणलं. त्यामुळे त्यांना रानकवी किंवा निसर्गकवी असं म्हटलं जात असलं, तरी ते तेवढ्याच मर्यादेत बसणारे कवी नाहीत.

तिसरं, ते लोकप्रिय कवी आहेत हे सांगण्याचं कारण नाही, कारण त्यांच्या अनेक कविता गेली पन्नास वर्ष लोकांच्या ओठी आहेत. असं भाग्य अर्थातच फार कमी कवींना लाभतं. त्यांची ‘जैत रे जैत' चित्रपटांतील गाणी आणि ‘रानातल्या कविता' नि ‘पक्ष्यांचे लक्ष थवे' या संग्रहातील अनेक कविता आपल्यात जणू वसतीलाच आलेल्या आहेत.

सहसा कुठलाही वाचक कविता-कथा-कादंबरी वगैरे आपलं आपलं वाचत असतो आणि त्यातून समृद्ध होत असतो. लेखकाने लिहिलं, आपण वाचलं, आपल्याला आवडलं (किंवा नाही आवडलं) या पद्धतीने हा प्रवास होत राहतो. एक वाचक या नात्याने महानोरांसोबत माझा संबंध बरीच वर्षं असा आणि इतकाच होता. अगदी अलीकडे पाच-सात वर्षांपर्यंत. पण त्यांचा प्रत्यक्ष संबंध आल्यानंतर ‘कवी आणि वाचक' यापल्याड नातं तयार होत गेलं. एकमेकांना सहज फोनाफोनी, जमेल तशा गाठीभेटी, निरोपानिरोपी आणि त्यांची पुस्तकं प्रकाशित करण्याच्या निमित्ताने त्यांचं जवळून दर्शन, असं जुळून येत गेलं. खरंतर त्यांच्या-माझ्या वयात अंतर सज्जड पाव शतकाचं. आणि कवी म्हणून तर ते काहीच्या काही मोठे. भलतेच नामवंत वगैरे. पण तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात कमालीचा साधेपणा, आपलेपणा आणि अनौपचारिकता. त्यामुळे एरवी ‘मोठ्या' माणसासोबत वागताना जे अवघडलेपण असतं, ते इकडे शून्य.

अर्थात याचं श्रेय त्यांनाच. त्यांची-माझी ओळख-भेट झाल्यानंतर कधीतरी वाटे, त्यांच्याशी फोनवरून बोलावं. पण संकोचामुळे फोन करवत नसे. मग अचानक कधीतरी त्यांचाच फोन येई. ‘काही काम नाही... शेतावर आहे. तुमची आठवण आली, म्हणून फोन केला...' पुढे अर्धा तास गप्पा. शेती- पाण्याच्या, दुष्काळ-अतिवृष्टीच्या, सरकारी धोरणांच्या, उद्ध्वस्त होणाऱ्या खेड्यांच्या. फोनवर पलीकडून बोलणारे दुसरे-तिसरे कुणी नसून खरोखरच कविवर्य ना. धों. महानोर आहेत, हे खरं वाटत नसे. एका धुंदीतच त्यांचं बोलणं ऐकत असे मी.

मग पुन्हा थोड्या दिवसांनी फोन. पुन्हा गप्पा. बहुतेक वेळा स्वगतासारख्या. मग थोड्या इकडच्या तिकडच्या चौकश्या. त्यांच्या या फोन-गप्पांतून नातं बांधलं जाऊ लागलं. पाहता पाहता हा ज्येष्ठ कवी त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक सुख-दु:खासह, पुस्तकांसह, कवितांसह आणि अगदी जवळच्या मित्रांसह जोडला गेला.

मनात येतं, हे कसं काय घडलं बुवा?

मी खरंतर फार साहित्यिक वर्तुळात वगैरे वावरणारा माणूस नाही. आपण बरं आणि आपलं काम बरं, असं मानणारा. कवी संमेलनं, साहित्य संमेलनं, प्रकाशन समारंभ, साहित्यिक गाठीभेटी वगैरेच्या वाऱ्यालाही न फिरकणारा. त्यामुळे साहित्यिक वगैरे मंडळींसोबत फार उठबस नाही की त्यांच्या विश्वात रमणं नाही. मी राजकीय-सामाजिक विषयांवर पत्रकारी लिखाण करणारा असल्याने माझं वावरक्षेत्रही वेगळं. त्यामुळेही असेल कदाचित, पण महानोरांशी कधी संबंध आला नव्हता. ते राहायला अजिंठ्याजवळच्या पळसखेडला. त्यांचा वावर जळगाव-औरंगाबाद-मुंबई असा. पुण्यातल्या सार्वजनिक कार्यक्रमांतही त्यांची हजेरी असे, पण अशा कार्यक्रमांना जाण्याचा उत्साह माझ्यात कधीच नव्हता.

शिवाय महानोरांची प्रतिमा ‘लिव्हिंग लिजेंड' अशी. एवढा मोठा माणूस लांबचाच वाटणार ना! शिवाय जो माणूस आपल्याला त्यांच्या कवितेतून गवसला आहे; त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची गरज काय, असंही वाटे. आणि अगदी खरं सांगायचं तर ते दोन वेळा विधान परिषदेत आमदार झालेले असल्याने त्यांच्याबद्दल मनाच्या कोपऱ्यात एक किंतुही होता. लेखक-कवींनी आपलं काम करावं; राजकारणात कशाला जावं, अशी पूर्वी बाळबोध समज होती. दुसरी गोष्ट म्हणजे, महानोरांसारखा संवेदनशील कवी काँग्रेससारख्या ‘सत्ताबाज' लोकांच्या कळपात का आहे, असंही वाटे. ज्या काळात काँग्रेस आपल्या मूळ हेतूंपासून भरकटली, त्या काळात महानोर (राज्यपालनियुक्त का असेना) आमदार होते. त्यामुळे ‘कवी' महानोरांचं हे ‘राजकीय' रूप काही मानवत नसे. असं कशाकशामुळे त्यांच्यापासून दुरावा राहिला. पण जेव्हा त्यांच्यासोबत जान-पहचान झाली, तेव्हा आपण किती गैरसमजात होतो, हे लख्खपणे कळलं.

महानोरांशी पहिला संबंध कसा आला, ते आधी सांगतो. आम्ही ‘युनिक फीचर्स'वाले प्रामुख्याने राजकीय-सामाजिक विषयांत रमणारे. पण स्वत:चं काही म्हणणं असणाऱ्या लेखकांकडे, साहित्याच्या नव्या प्रवाहांकडे लक्ष ठेवून असणारे. 2011मध्ये साहित्य संमेलनाच्या भल्या-बुऱ्या गोष्टींबद्दल बोलत असताना अचानक हुक्की आली आणि आपणच एक डिजिटल साहित्य संमेलन भरवूयात, असं ठरलं. या संमेलनाला अध्यक्ष निवडायचा; पण तो मानाने. निवडणुकीच्या राजकारणामुळे जे लेखक कधीच मुख्य संमेलनाचे अध्यक्ष होणार नाहीत, अशांना आपण अध्यक्ष करायचं, असं ठरलं. त्यानुसार रत्नाकर मतकरी, भालचंद्र नेमाडे, कवी ग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली तीन संमेलनं आम्ही भरवली. चौथ्या वर्षी महानोरांना अध्यक्षपदासाठी विनंती करावी, असं वाटत होतं. त्यापूर्वी आमचा-त्यांचा फारसा संबंध आलेला नसल्याने मनात धाकधूक होती. पण फोन झाला, त्यांना कल्पना सांगितली, आधीच्या तीन अध्यक्षांबद्दल सांगितलं. मांडव न घालता, लोकांना गोळा न करता, जेवणावळी न घालता महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवून आणणारं, एकेका साहित्यिकाभोवती रचलेलं व्हर्च्युअल संमेलन करण्याची कल्पना त्यांना आवडली. दोनच दिवसांनी ‘तुम्ही काहीतरी वेगळं करताय, मुद्द्याचं बोलू बघताय, तर मी तुमच्यासोबत असायला हवं,' असं म्हणत त्यांनी होकार दिला. आम्ही खूष झालो.

मग फोनाफोनी सुरू झाली. ई संमेलनात नेमकं काय करायचं, त्यात त्यांचा रोल काय, व्हिडिओ शूटिंग कुठे-कसं करायचं, प्रत्यक्ष कार्यक्रमात काय करायचं, वगैरे ठरवाठरवी झाली. संमेलनाचा हा नवा प्रकार त्यांना आवडला. ते उत्साहात होते. शूटिंग वगैरे करून ते सगळं इंटरनेटवर टाकायचं होतं. ते म्हणाले, ‘मी पुण्यात येणार आहे. तेव्हा तुम्हाला हवं ते माझ्यासोबत करून घ्या.' सगळा सरळ साधा मामला.


त्याप्रमाणे ते पुण्यात आले. फोनवर म्हणाले, ‘मला तुम्हा सर्व मित्रांना भेटायचं आहे. तुमच्या ऑफिसवरच येतो.' आले. गप्पा-टप्पा झाल्या. ‘वन टेक ओके' शूटिंग पार पडलं. लेखकाविषयीच्या प्रेमातून भरणारं हे छोटं संमेलन मोठ्या संमेलनाहूनही महत्त्वाचं का आहे, असं काहीसं ते बोलले. तंत्रज्ञानाचा उपयोग भाषेबद्दलचं प्रेम वाढवण्यासाठी करण्याच्या आमच्या कल्पनेचंही त्यांनी कौतुक केलं. त्यांचं बोलणं ऐकून आम्ही तृप्त झालो.

मग प्रत्यक्ष कार्यक्रम. महानोरांना येणं-जाणं सोईचं व्हावं म्हणून ई संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नाशिकमध्ये घ्यायचा ठरला. महानोर केव्हा येतील, कोणत्या हॉटेलमध्ये राहतील, त्यांना काय सोयी-सुविधा लागतील वगैरे व्यावहारिक प्रश्न होते. त्यांना विचारलं तर सहजपणे म्हणाले, ‘तुम्ही मंडळी पुण्याहून येणार ना? तुम्ही जिथे रहाल, तिथेच एक खोली माझ्यासाठी घ्या. माझी वेगळी व्यवस्था नको. तुमच्यासोबतच राहीन दोन दिवस.'

ठरल्याप्रमाणे नाशिकमध्ये पोहोचले. हॉटेलमधील त्यांच्या खोलीत गेलो तर ते आणि त्यांच्या पत्नी सुलोचनाबाई अवघडून बसले होते. हा गावाकडचा गडी; पाच-पन्नास एकरात मोकळाढाकळा वावरणारा. त्यांना हॉटेलमधील खोलीत वावरणं गैरसोयीचं असणार. पण त्यांच्या तोंडून नाराजीचा शब्द निघाला नाही. तरुण मंडळींना भेटण्याच्या, त्यांच्या उपक्रमात सहभागी होण्याच्या आनंदासमोर या गोष्टी त्यांच्या दृष्टीने गौण असणार.

संध्याकाळी प्रेक्षकांसोबत झकास संवाद आणि निवडक कवितांचं वाचन असा कार्यक्रम झाला. महानोरांनी तो हातखंडा रंगवला. शूटिंग झालं, ते इंटरनेटवर अपलोड झालं आणि संमेलनाचा औपचारिक भाग संपला. आणि तिथून महानोर दादांसोबतचा अनौपचारिक नात्याचा भाग सुरू झाला. अगदी अल्लद.

नाशिकच्या या दोन दिवसांच्या वास्तव्यात भावलेली गोष्ट म्हणजे, महानोरांचं आम्हा सगळ्यांशी अगदी जिव्हाळ्याने बोलणं-वागणं. म्हटलं तर आपला संबंध या कार्यक्रमापुरता आहे, असा विचार करून ते वागले असते, तरी ते गैर नव्हतं. पण त्यांना आमच्याबद्दल कुतूहल होतं. युनिक फीचर्स, अनुभव मासिक, समकालीन प्रकाशन वगैरेंबद्दल त्यांनी आस्थेने विचारपूस केली. हल्लीच्या काळात असं काम करणं किती अवघड आहे, असं वडिलकीने बोलले. स्वत: कवी-साहित्यिक असूनही सामाजिक-पत्रकारी कामाबद्दल त्यांना सर्वांत जास्त उत्सुकता होती. या तरुणांना आपली काही मदत होईल का, असाही ते विचार करत असावेत. म्हणाले, ‘हवी असतील तर माझी दोन पुस्तकं तुम्हाला प्रकाशित करायला देतो.' आम्ही काय तयारच होतो. महानोरांसारखा मोठा लेखक ‘समकालीन'शी जोडला जाणार होता.

त्याप्रमाणे वर्षभरात ‘या शेताने लळा लाविला' हे पुस्तक प्रकाशित झालं. आणखी वर्षभराने ‘आठवणींचा झोका'. महानोर 1978 ते 84 आणि 1990 ते 96 असे बारा वर्ष आमदार होते. या काळात त्यांनी विधिमंडळात जे शेतीपाण्याचे आणि साहित्य-संस्कृतीचे प्रश्न धसास लावले, त्याची पुस्तकरूपी नोंद व्हावी अशी त्यांची इच्छा होती. बरीच छाननी करून, जोडणी करून, जुने दस्तावेज खंगाळून त्यांनी मेहनतीने बाड तयार केलं. त्यावर भरपूर संपादकीय संस्कार करून एक आटोपशीर पुस्तक आम्ही प्रकाशित केलं : विधिमंडळातून. त्यानंतर वर्षभरात त्यांचं आऊट ऑफ प्रिंट असलेलं ‘गपसप' हे पुस्तकही आम्ही काढलं. नंतर ‘गावातल्या गोष्टी' हा कथासंग्रह आणि व्यक्तिचित्रण मालिकेतील यशवंतराव चव्हाण, पु.ल. देशपांडे आणि शरद पवार यांच्यावरील छोटेखानी पुस्तकं प्रकाशित झाली. पाहता पाहता पाचच वर्षांत सात-आठ पुस्तकांचा पल्ला गाठला गेला.

या पुस्तकांचं काम चालू असताना महानोरांमधील नेटकेपणा आणि अनाग्रही स्वभाव या दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. त्यांची कामाची पद्धत म्हणजे, पुस्तकाला आवश्यक फोटो, चित्रं, मनोगत, ब्लर्बवरील मजकूर, असं सगळं पहिल्या भेटीतच देऊन टाकणार. सोबत आठवणीसाठी एक यादी. असा नीटनेटकेपणा!

पुस्तकाविषयीची ठरवाठरवी झाली की ते त्या विषयातून बाहेर पडणार. ‘अस्संच पाहिजे नि तस्सच पाहिजे' असला आग्रही कारभार त्यांच्या स्वभावात नाही. एरवी नाव कमावलेल्या ‘सेलेब्रिटी' लोकांमध्ये हा गुण बराच बोकाळलेला असतो. पण महानोर पिंडाने शेतकरी असल्याने त्यांचे पाय जमिनीवर असावेत. पावसापाण्याच्या लहरीपुढे त्यांच्यातील हट्ट आणि आग्रह जणू गळूनच गेले असावेत. ‘मी पुस्तक दिलं. आता कधी, केव्हा, कसं काढायचं ते तुम्ही बघा. माझं काही म्हणणं नाही', असं ते हमखास म्हणणार. शिवाय हे केवळ बोलण्यापुरतं नाही. ठरल्या वेळेत पुस्तक येत नसलं, तरी ते एका शब्दाने चौकशी करणार नाहीत. आपणहून कळवलं तर म्हणणार, ‘अहो, पुस्तक प्रकाशनात वेळा न पाळल्या जाण्यामागे किती कारणं असतात, मला माहीत आहे. आमच्या रामदास भटकळ- सर्जेराव घोरपडेंपासूनच्या काळापासून मी बघत आलोय. जमेल तसं पुस्तक येऊद्यात!' याला म्हणतात अनाग्रहीपणा.

आम्ही प्रकाशित केलेल्या त्यांच्या पहिल्या पुस्तकात शेतीविषयक तांत्रिक माहिती बरीच होती. आम्ही त्याबद्दल बरेचसे अनभिज्ञ होतो. त्यांना म्हटलं, ‘संपादन झाल्यानंतरची मुद्रणप्रत तुम्ही बघून घ्या.' तर म्हणाले, ‘खरं तर तशी गरज काही नाही. पण म्हणताय तर बघून घेऊ.' ते पुण्यात आले आणि दिवसभर बसून मजकूर वाचून-तपासून गेले. ते आले ते केवळ आमच्या इच्छेपोटी. त्यांचं-आमचं पहिलंच पुस्तक असल्याने हा उपक्रम राबवणं आम्हाला आवश्यक वाटत होतं म्हणून. आमचं काम बघून आवर्जून म्हणाले, ‘हे काम करायला विशेष कौशल्य पाहिजे. तुम्ही काम चांगलं केलंत.'

त्यानंतर पुढचं पुस्तक त्यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणांचं होतं. त्यातही संपादनाचं बरंच काम करावं लागलं होतं. त्यामुळे त्याही पुस्तकाची मुद्रणप्रत आम्ही त्यांना बघायला लावली. पण त्यानंतरच्या पुस्तकांवेळीस जेव्हा त्यांना पुस्तक, त्याचं कव्हर वगैरे बघून घेण्याबद्दल सुचवलं, तेव्हा त्यावर त्यांचं उत्तर एकच : ‘पुस्तक तुमच्यावर सोपवलंय. तुम्ही चांगलंच करणार. आता मला त्यात ठेवू नका.' विश्वास म्हणजे विश्वास! तरीही आपण मराठीतील एका श्रेष्ठ लेखकाचं पुस्तक काढतोय, याचं भान ठेवून आम्ही त्यांचे (आता पुण्यात राहायला आलेले) मित्र कवी-समीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्याने पुढे जातो. ‘चंद्रकांतने बघितलं ना, मग ते पुरेसं आहे,' असं म्हणून महानोर ग्रीन सिग्नल देतात.

चंद्रकांत पाटील हे महानोरांचे पन्नास-पंचावन्न वर्षांपासूनचे मित्र. त्यांच्याशीही आमची अगदी अलीकडेपर्यंत प्रत्यक्ष ओळख-भेट नव्हती. पण ते आमच्या कामावर लक्ष ठेवून असावेत. एकदा महानोरच म्हणाले, ‘तुमच्याकडे पुस्तक देण्याबद्दल चंद्रकांतने सुचवलं.' नंतर कळलं की त्यांच्याशी बोलूनच महानोरांनी आमच्या ई-संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं. याचा अर्थ महानोरांशी तयार झालेल्या बंधामागे चंद्रकांत पाटील यांचे अदृश्य हात होते तर! आता ते स्पष्ट झाल्याने त्यांना याबद्दल ‘थँक्स' म्हणायलाच हवं. त्यांच्या अनुषंगाने आणखीही काही सांगायचंय, पण ते पुढे सांगतो.

महानोरांशी आम्हा मित्रांचा संबंध आला तो असा. पण हा संबंध महानोरांमधील अकृत्रिम स्वभावामुळे तात्पुरता किंवा औपचारिक राहिला नाही. विशेषतः माझा त्यांच्याशी जो निरपेक्ष संवाद सुरू झाला, त्याची जातकुळी न सांगता येणारी. आमच्या दोघांचा पिंड वेगवेगळा असूनही हे एक वेगळंच नातं जुळलं खरं.

अधूनमधून सहज गप्पा मारण्यासाठी येणारा त्यांचा फोन म्हणजे माझ्यासाठी ‘कोणती पुण्ये अशी येती फळाला' या श्रेणीतला. फोनवर त्यांच्या तोंडून कविता ऐकण्यासारखा तर दुसरा आनंद नाही. विशेष म्हणजे ते अगदी अपवादाने स्वत:च्या कवितांचा उल्लेख करतात. बोलता बोलता ना. घ. देशपांडेंच्या कवितेच्या ओळी म्हणणार. कधी कवी अनिल यांच्या. कधी आरती प्रभू, तर कधी बहिणाबाई. जात्यावरच्या पारंपरिक ओव्या आणि ‘वही' प्रकारातली लोकगीतं हा तर महानोरांचा वीक पॉईंटच. त्याबद्दल रंगून-दंगून बोलणार. आपण फक्त ऐकत रहायचं.

महानोरांचे फोन जसे आनंदून टाकतात, तसेच अस्वस्थही करून सोडतात. ते हाडाचे शेतकरी असल्याने त्यांचं अवघं विचारविश्व शेतीतल्या कामांनी आणि पाऊसपाण्याने व्यापलेलं आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत निसर्गाने असे काही रंग दाखवायला सुरुवात केली आहे, की सगळी शेतीच बेभरवश्याची झाली आहे. कधी पाठोपाठचं अवर्षण आणि दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट तर कधी अवकाळी पाऊस. प्रत्येक वेळी झोडपला जातो तो शेतकरीच. निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यावर काय दुरवस्था ओढवलेली असते, हे महानोरांच्या फोनवरून कळते. हे फोन आपलं मन ढवळून काढणारे असतात. उदास करून टाकतात. शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय काय घडत असतं! कधी विहिरी आटून जातात, तर कधी मोसंबीची बाग जळून जाते. कधी सीताफळ हातचं गेल्याचं बघावं लागतं, कधी केळीची बाग पावसाने झोडपून निघते. अशा बातम्या पेपरमध्ये वाचणं वेगळं आणि महानोरांच्या तोंडून ऐकणं वेगळं. पावसाची वाट पाहणं किंवा पावसाने उतमात केल्याचं पाहणं हे शेतकऱ्यासाठी किती छळदायी असतं, ते महानोरांच्या बोलण्यातून कळतं. हे बोलणं जसं शेतकऱ्याचं असतं, तसंच ते आतून विदीर्ण झालेल्या कवीचंही असतं. मग त्यांच्या बोलण्याचा शेवट असतो : ‘आता काय सांगायचं आणखी? आम्हाला आता याची सवयच करून घ्यायला लागतेय. कारण पूर्वी अधूनमधून असा प्रसंग येई; आता परिस्थिती पाठच सोडत नाही.' त्यांच्या बोलण्यातली अस्वस्थता आपल्याला पोखरून टाकते.

गेली दोन दशकं महाराष्ट्र शेतकऱ्यादच्या आत्महत्यांनी झाकोळून गेलेला आहे. अस्मानी संकट शेतकऱ्याचा कणा मोडून काढत असतानाच सुलतानी संकटही त्यास कारणीभूत आहे, हे महानोर पुरते ओळखून आहेत. त्यामुळेच ते सरकारी धोरणं, त्यांच्या अंमलबजावणीतील संवेदनहीनता आणि झारीतले शुक्राचार्य याबद्दल कडवटपणाने बोलतात, लिहितात. हजारो लोकांच्या आत्महत्या होऊनही आपली सरकारी यंत्रणा ढिम्म कशी राहू शकते, याबद्दल ते खंतावलेले असतात. पण त्यापुढे जाऊन ते तरी काय करू शकणार? त्यामुळे,

‘ही चिमणपाखरं तुझ्याविना,

ज्या दुनिया माहीत नाही,

हा काळोखाचा रस्ता आपुला नाही,

राजा, रस्ता आपुला नाही'

अशा ओळींतून ते शेतकऱ्यांना आत्महत्येपासून दूर राहण्याचं आवाहन करतात. शेतकरी आपल्या पातळीवर काय करू शकतात, हे लेख-पुस्तक लिहून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण प्रश्न फार मोठा आहे, आणि त्याची खोली कशी वाढत चालली आहे याबद्दल ते बोलतात, तेव्हा फार असहाय्य व्हायला होतं.

त्यामुळेच जून-जुलैमध्ये जळगाव परिसरात पाऊस पडल्याच्या बातम्या वाचल्या की मी महानोरांना फोन करतो. ‘काय म्हणतोय पाऊस?' असं विचारलं की ते म्हणतात, ‘पेपरमध्ये पडलाय. अजून आमच्या भागाचा रस्ता त्याला सापडायचाय. कुठला पाऊस नि कुठलं काय हो? सगळी कामं करून रानं तयार करून ठेवलीत, पण पावसाचं दर्शन नाही. वाट बघायची आणि काय!' मग कधी पुण्यात चांगला पाऊस पडल्याच्या बातम्या आल्या की महानोरांचा फोन येतो, ‘तुम्ही पुणेकर लोक पाऊस अडवून बसलात. थोडा आमच्याकडेही येऊद्यात की!'

पाऊसपाणी बरं झालं आणि शेतात पिकं डोलू लागली, की महानोरांचा आवाजही बदलतो. गप्पांचे विषयही बदलतात. त्यांना जसं शेतीबद्दल बोलायला आवडतं, तसंच त्यांच्या जीवाभावाच्या माणसांबद्दलही. महानोरांचा खरा सूर लागतो तो यशवंतराव चव्हाण, पु. ल. देशपांडे, बा. भ. बोरकर किंवा शरद पवारांबद्दल बोलताना. पवार आणि महानोर तर समवयीन मित्रच. चाळीस वर्षांची सोबत. त्यांच्या एकत्र वावरण्याचे, काम करण्याचे एकेक किस्से ऐकण्यासारखे. पवार विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी औरंगाबाद ते नागपूर शेतकरी दिंडी काढली होती. त्यातल्या गोष्टी, यशवंतरावांना झालेली अटक, इंदिरा गांधींनी तडकाफडकी केलेली सुटका, पवारांमधील संघटन गुण, पवारांचा राजकीय प्रवास, त्यातील पेचप्रसंग, त्यांनी घेतलेले महत्त्वाचे राजकीय निर्णय वगैरेबद्दलची फर्स्ट हँड माहिती महानोर तुम्हाला ऐकवतात. महानोरांची विधानपरिषदेवर साहित्यिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड होणं, त्यांचं पवारांसोबत इस्त्रायलला जाणं, जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष बनून मॉरिशसला जाणं, वगैरे सगळं ऐकण्यासारखं. पवारांच्या आग्रहामुळे एका रात्रीत मनाविरुद्ध अमेरिकेला जाण्याचा किस्साही गंमतीशीर. तो त्यांनी पुस्तकातही लिहिला आहे. महानोरांची किश्श्यांची पोतडी अशी पवारांच्या आठवणींनी भरलेली असते.

यात दोघांच्या दोस्तीचे ताजे किस्सेही असतात. उदाहरणार्थ, महानोर पंचाहत्तर वर्षांचे झाले तेव्हा पवार थेट महानोरांच्या गावी शेतावर जाऊन थडकले आणि मग तिथे अचानक एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला. थोड्या दिवसांनी मात्र पवारांनी आग्रहपूर्वक मुंबईत सत्काराचा एक मोठा कार्यक्रम बांधला. तब्येतीमुळे अन्य कार्यक्रम रद्द केलेले असूनही महानोर या कार्यक्रमाला मात्र जाऊन आले. ‘शरदरावांचा आग्रह मोडू शकत नाही. अन्यथा आता प्रवासाची दगदग होते. कार्यक्रम वगैरे नको वाटतात', असं महानोरांचं म्हणणं असतं.

महानोरांना आपल्या मित्राचा आग्रह जसा मोडवत नाही, तसाच त्याचा उपमर्द झालेलाही पाहवत नाही. 2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीस ‘महाराष्ट्रासाठी पवारांनी काय केलं?' असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील बड्या नेत्यांनी केला, तेव्हा महानोर शांत बसू शकले नाहीत. त्यांनी एक लेख लिहिला आणि असा अनाहूत प्रश्न विचारणाऱ्यांना तडकावलं. हे सगळं चाललेलं असताना त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं, तेव्हा सार्वजनिक सभ्यतेचा भाग म्हणून ते लेखामध्ये जे लिहू शकत नव्हते, ते सगळं बोलून मोकळे झाले. कोणीही उठावं आणि महाराष्ट्रात येऊन असा प्रश्न विचारावा हे कसं खपवून घेता येईल, असं ते सात्त्विक संतापाने बोलत होते.

त्या निवडणुकीत सत्तेच्या आशेने पवारांसोबतची बरीच नेते मंडळी भाजपकडे जात होती. केवळ सत्तेसाठी मारल्या जात असलेल्या उड्या पाहून महानोर अस्वस्थ झाले होते. सत्तेसाठी लोक फार लाचावले आहेत, त्याने राजकारणाची नासाडी होतेय, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणाले, “तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे,

लाचावले मन लागलिसी गोडी

ते जीवे न सोडी ऐसे झाले

यातली दुसरी ओळ बदलून मी ही नवी ओळ त्याला जोडली आहे. पटते का बघा!

लाचावले मन लागलिसी गोडी

दुडीवर दुडी चढाओढी”

या ओळी त्यांच्या तोंडून येतात त्यामागे सात्विक संताप तर असेलच; पण त्याबरोबर पवारांबद्दलचं प्रेमही असणार.

यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी बोलताना तर महानोर थकतच नाहीत. या दोघांचं नातं म्हणजे अक्षरश: एक परिकथाच आहे. ही परिकथा महानोरांकडूनच ऐकावी. यशवंतरावांसारखा महाराष्ट्राचा आणि देशाचा मोठा नेता एका अनोळखी तरुण पोराच्या केवळ कविता वाचून प्रेमात पडतो आणि पुढे या दोघांमध्ये बाप-लेकाचं नातं तयार होतं, हे केवळ अकल्पनीय आहे. यशवंतराव कराडचे, महानोर जळगावजवळच्या एका बारीकश्या दुर्लक्षित खेड्यातले. दोघांमध्ये वयाचं अंतर तीस-पस्तीस वर्षांचं. एकजण मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री वगैरे आणि दुसरा शेतमजूर अल्पशिक्षित आई-वडिलांचा शेतकरी कवी. पण यशवंतरावांवर महानोरांच्या शब्दांनी मोहिनी घातली आणि मधली अंतरं जणू विरघळून गेली.

त्यांच्या नात्याबद्दलच्या एक-दोन गोष्टी तेवढ्या सांगतो. महानोर ऐन तरुणपणी समाजवादी चळवळीशी जोडलेले होते. पण त्यांना यशवंतरावांबद्दल आकर्षण होतं. मात्र स्वभावाने बुजरे असल्याने ती ओढ मनात धरून दहा-पंधरा वर्षं ते दुरूनच दर्शन घेत राहिले. अखेरीस 1974 मध्ये इचलकरंजीच्या साहित्य संमेलनात दोघांची पहिल्यांदा भेट झाली. पण ती कशी? कवी संमेलनात महानोरांनी म्हटलेल्या कविता भलत्याच गाजल्याचं कळल्याने यशवंतरावांनी त्यांना रात्रीच्या खासगी मैफलीत बोलावून घेतलं आणि कविता म्हणायला लावल्या. या मैफलीत बा. भ. बोरकर, कवी अनिल, इंदिरा संत, विंदा-बापट-पाडगावकर असे दिग्गज कवी सहभागी झाले होते. त्यांच्यासमोर महानोर म्हणजे वयाची तिशीही न गाठलेले नवथर कवी. मैफल आटोपल्यावरही यशवंतरावांनी महानोरांना थांबवून घेतलं आणि रात्रीचे तीन वाजले असले तरी त्यांची खासगी विचारपूस केली. एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात एवढी प्रतिभा घेऊन जन्माला आलेल्या त्या तरुणाबद्दल यशवंतरावांना उत्सुकता वाटत होती. नंतरही जिथे कुठे यशवंतराव जात तिथे महानोरांबद्दल सांगत. त्यांच्या कवितांच्या ओळी सहजपणे म्हणून दाखवत. विचार करून बघा, देशाचा एवढा मोठा नेता एका नवोदित कवीच्या कविता तोंडपाठ म्हणून दाखवतोय! अजबच सगळं!

पुढे या दोघांचा पत्रव्यवहार सुरू झाला. ही पत्रं सर्वस्वी खासगी स्वरूपाची. ओलाव्याने ओतप्रोत भरलेली. एकमेकांच्या कौटुंबिक आणि संसारिक प्रश्नांवर बोलणारी. ही पत्रं वाचताना आणि त्याबद्दल महानोरांकडून ऐकताना या दोघांमधील अजब नात्याचा थांग आपल्याला लागतो.

महानोरांचे वडील गेले तेव्हाही यशवंतराव दूर पळसखेडला समाचाराला गेले. सोबत मुख्यमंत्री वसंतदादा, दहा-वीस मंत्र्यांचा ताफा आणि बरीच पुढारी मंडळी. हे सगळे दिवसभर शेतावरच्या घरी थांबले. यशवंतराव आस्थेने सर्व कुटुंबाशी बोलले. सांत्वन करून निघताना घरासमोरच्या एका छोटेखानी सभेत लोकांना म्हणाले, ‘या कवीला तुम्ही सांभाळा.' जणू महानोर हे यशवंतरावांच्या मनातील एक हळवा कोपराच बनून गेले होते. या माणसातील कवी जपून ठेवायला हवा, असा त्यांनी ध्यासच घेतला होता जसा.

1978 मध्ये महानोरांना विधानपरिषदेत आमदारकी मिळाली तेव्हाही ‘तुम्ही शेतीपाण्याच्या आणि साहित्याच्या पलिकडे राजकारणात लक्ष घालू नका. तो तुमचा प्रांत नाही. स्वत:तला कवी जपा.' असंच त्यांनी अधिकाराने सांगितलं होतं. एका निवडणुकीत शरद पवारांनी महानोरांना औरंगाबादमधून लोकसभेला उभं करायचं ठरवलं, तेव्हाही ‘तुमची इच्छा नसेल तर तुम्ही या भानगडीत पडू नका,' असं यशवंतराव म्हणाले होते. ‘तुम्ही निवडून याल, आम्ही निवडून आणूही, पण तुम्ही यात गुंतू नका,' असंच त्यांचं म्हणणं होतं. महानोरांना राज्यसभेत नियुक्त करण्याचं घाटत होतं, तेव्हाही यशवंतरावांचे शब्द लक्षात ठेवून आणि स्वत:च्या मनाचा कल पाहून तिकडे न जाण्याचा निर्णय महानोरांनी घेतला. ‘राजकारण करायला माणसं खूप मिळतील, तुम्ही कवितेचा प्रांत सोडून तिकडे येण्याची गरज नाही.' हेच यशवंतरावाचं त्यांना सांगणं होतं. एखादा बाप मुलाला जसं समजून-सांभाळून असतो, तसं यशवंतरावांनी महानोरांचं जणू पालकत्व स्वीकारलं होतं. या दोघांमधील नात्याबद्दल महानोरांनी ‘यशवंतराव चव्हाण आणि मी' असं एक छोटेखानी आठवणीपर हृद्य पुस्तक लिहिलंय. त्या दोघांच्या नात्यातील पदर पुस्तकातून वाचणं खासच; पण ते प्रत्यक्ष महानोरांकडून ऐकण्याचं भाग्य ज्यांना लाभलंय, त्यातला मी एक.

महानोरांना ऐकणं म्हणजे स्वगतपर गप्पांची पर्वणीच असते. हा माणूस शेतीत आणि कवितेत आकंठ बुडालेला असल्याने बोलण्यातले विषय हेच. शेतीवाडीवर बोलता बोलता तुकाराम-बहिणाबाई-ना. घ.-बालकवी यांच्या कवितांसह काय काय सांगणार आणि जात्यावरच्या गाण्यांपासून भारूड-गौळण-वहीपर्यंत बोलणार. हे सगळं बोलणं इन्स्टंट. त्यांना किती कवींच्या किती कविता तोंडपाठ आहेत, त्यांनाच माहीत. ‘अहो त्या अमुक तमुकने म्हणून ठेवलं नाहीये का...' असं म्हणत लगेच कविता म्हणणार. त्याला जोडून एखाद्या लोकगीतातल्या ओळी ऐकवणार. त्यांची आई पहाटे उठून जात्यावर दळण दळताना जी गाणी म्हणत असे, त्यावर महानोरांचा पिंड पोसला गेला असल्याने त्यांना त्याबद्दल मोठंच ममत्व आहे. एका तासाच्या गाण्यात जन्मापासून स्वत:च्या मरणापर्यंतचं वर्णन करणारं आणि स्वत:च्या जगण्याविषयीचं तत्वज्ञान सांगणारं काव्य अन्य कुठल्या वाङ्मयात नाही, असं महानोरांचं म्हणणं आहे. एका ओवीमध्ये गाणारी स्त्री हयात आहे, पण ती आपला मृत्यू झाला आहे असं कल्पून आपल्या आयुष्याबद्दल कुटुंबियांना गाण्यातून सांगते, ही गोष्ट त्यांना खास वाटते. त्यामुळे याबद्दल बोलताना महानोर दादांचा आवाज एकदम ठाम बनतो. लोकसंस्कृतीबद्दलचा अभिमान आवाजात फुलून येतो. खेड्यातल्या पुरुषांनी सवाल-जवाबामधून गायलेली गाणी म्हणजे ‘वही' हा प्रकार. त्यातल्याही गंमतीजंमती सांगताना महानोर दादा गुंगून जातात. बोलता बोलता थांबतात, हसतात आणि ‘अहो काय सांगायचं? किती किती म्हणून आहे त्यात...' असं म्हणत पुढच्या किश्श्यावर जातात. हीच त्यांची गप्पांची रीत.

कधी त्यांचा जाहीर सत्कार झाला किंवा त्यांना पुरस्कार मिळाला आणि त्यांच्याशी बोलणं झालं, तर ते मजेशीर असं काही सांगून जातात. म्हणतात, ‘अहो, मी सुरुवातीला लिहीत होतो तेव्हा सगळे मला बळेच निसर्गकवी म्हणायचे आणि हा निसर्गकवी टिकणार नाही, असंही म्हणायचे. कविता सामाजिक पाहिजे, दु:ख सांगणारी पाहिजे, आसपास प्रतिबिंबित करणारी पाहिजे, असं त्याकाळचे समीक्षक लिहीत. प्रत्यक्षात कमी लिहूनही माझी कविता टिकली. तिला लोकांचं प्रेम मिळालं. कित्येकांना माझ्या कविता तोंडपाठ असतात. यशवंतरावांपासून आजपर्यंत असं चालूच आहे. याचा अर्थ रसिकांनी आमच्या त्या समीक्षकांना खोटं पाडलं की नाही!' ते असं म्हणतात तेव्हा त्यांच्या आवाजाची पट्टी बदललेली असते. मग एका दमात म्हणणार, ‘माझ्या कवितेत शेतकऱ्याचं जगणं-मरणं आहे, त्याचं सुखदु:ख आहे, रडणं-कुढणं आहे, दुष्काळ आहे; नापिकी आहे, शब्द भुंडे पडतील असं वास्तव आहे... आता काय सांगायचं?'

त्यांच्या बोलण्यात येणारं ‘आता काय सांगायचं?' हे एखादं गाणं समेवर आल्यासारखं येत राहतं.

शिवाय त्यांच्या बोलण्यात काही ठराविक शब्द किंवा वाक्यं येतातच येतात. त्यावर त्यांचा जसा कॉपी राइटच! त्यांच्या बोलण्यात ‘दु:खाची झळ छाताडावर घेत जगणारी माणसं' जशी येतात, तशीच ‘आकाशाएवढे प्रश्न आणि जमिनीच्या खोलपर्यंत मुळं पसरलेलं दु:खही' येतं. त्यांच्या बोलण्यात ‘दूरस्थपणे राहणारी माणसं' जशी येतात, तशीच कुसुमाग्रजांचे शब्द उसने घेऊन ‘साध्या तुटल्याफुटल्या माणसांचं दु:खही' येतं. एखादी लय पकडून येणारे जोडशब्द हेही त्यांच्या बोलण्याचं एक वैशिष्ट्यच. हा अर्थातच त्यांच्यातील कवितेचा परिणाम असणार.

महानोरांकडून खुसखुशीत गप्पा ऐकण्याचा वार्षिक प्रसंग येतो, तो मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू होते तेव्हा. गेली कित्येक वर्षं नियमितपणे त्यांचं नाव चर्चेत येतं आणि त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं, असं कुणीकुणी म्हणू लागतं. त्यांच्यासारख्या ज्येष्ठांना निवडणुकीतून अध्यक्षपद नको असल्याने अखेरीस ती पद्धत बाजूला ठेवली गेली. तरीही महानोर अध्यक्ष बनायला तयार नसतात. दोन-चार नावांमधून कुणाचीच निवड होऊ नये, असं त्यांचं म्हणणं आहे. जी काय निवड होईल ती एकमताने व्हावी, असं ते म्हणत आले आहेत. अर्थात, तरीही आता ते अध्यक्षपद स्वीकारतील का, हा प्रश्नच आहे. पण ते असो.

संमेलनाध्यक्षपदाच्या चर्चा सुरू झाल्या की महानोरांशी बोलावं. साहित्य वर्तुळातील खास इरसाल किस्से ऐकायला मिळणार याची खात्रीच! अमुक संमेलनात काय झालं होतं, नि तमुक वेळेस काय झालं होतं, असं ते तीस-चाळीस वर्षांचं तरी सहज सांगू शकतात. उदाहरणार्थ, त्यांच्याकडून कळलेली ही एक हकीगत पाहा. 2010च्या पुण्यातील संमेलनाचे उद्घाटक विंदा करंदीकर यांचं अचानक निधन झाल्याने महानोरांवर संमेलनाच्या उद्घाटनाची जबाबदारी आली होती. तेव्हा नेमकं काय घडलं हे बाहेर फार कुणाला माहीत नसावं. हा किस्सा महानोरांच्या तोंडूनच ऐकावा असा. त्यातले तपशील (खासगी असल्याने) सोडा; पण ‘माझ्या हातचा कवितेचा दिवा आता महानोरांच्या हाती आहे. त्यांच्या हस्ते उद्घाटन करा!' असं आजारी पडलेल्या विंदांनी संयोजकांना सांगितल्याचं महानोर आपल्याला सांगतात, तेव्हा ऐकतानाही भारी वाटतं. मराठी कवितेचा दिवा ज्याच्या हाती आहे तो माणूसच दस्तुरखुद्द आपल्याला सांगतोय, याचीही गंमत वाटते.

2020च्या उस्मानाबाद संमेलनाचं उद्घाटकपद त्यांनी स्वीकारल्याची बातमी कळली, तेव्हा अध्यक्षपद घ्यायला राजी नसलेले हे गृहस्थ उद्घाटनाला कसे तयार झाले, असा प्रश्न मला पडला होता. फोन केल्यावर मागच्या-पुढच्या गोष्टींमध्ये गुंफलेली ‘अंदर की बात' ऐकायला मिळाली. संमेलनाच्या आदल्या दिवशी बोलणं झालं, तेव्हा तर त्यांची गाडी फॉर्मात होती. फादर फ्रान्सिस दिब्रिटोंच्या अध्यक्ष बनण्यावर कुणा संघटनेचा आक्षेप होता, आणि आंदोलनाचा एक भाग म्हणून महानोरांनी संमेलनाला जाऊ नये, असा दबाव त्यांच्यावर आणला जात होता. अर्थातच, लेखकाला त्याच्या धर्माच्या आधारावर नाकारण्यास किंवा स्वीकारण्यास महानोर तयार नव्हते. ‘लेखन करणे हाच लेखकाचा धर्म असतो. लेखकाला अन्य कुठल्या चौकटीत बसवण्याची गरज नसते,' अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे दबाव आणणाऱ्यांसमोर आपले साहेब बधायला तयार नव्हते. वयाच्या या टप्प्यातही ताठपणे उभे राहणारे महानोर बघण्यासारखे नि ऐकण्यासारखे.

‘इतरांचं सोडा, आपल्यात काही (अंतर) नाही. तुम्हाला म्हणून सांगतो...' अशी सुरुवात करत महानोर दादांनी अशा किती गोष्टी सांगितल्यात आजपर्यंत! त्यांना उभी करणारी वा. ल. कुलकर्णींसारखी माणसं, रामदास भटकळांसारखे त्यांचे प्रकाशक, लताबाई-हृदयनाथ-आशा भोसले ही मंगेशकर भावंडं, भंवरलाल जैन-विनायकदादा पाटील-जब्बार पटेल हे स्नेही, पुल-सुनिताबाई-मेधा पाटकर असे आप्त, इंदोरचे कवी भालचंद्र लोवलेकरांपासून पुरुषोत्तम पाटील आणि गावा-खेड्यातून येणाऱ्या नव्या कवी-लेखकांपर्यंत अनेकांबद्दल ते सांगत आलेत. ‘प्रतिष्ठान' मासिकातील दिवस, त्यात केलेले प्रयोग, स्वत:चं कवितेतर लिखाण, पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहण्याचे आणि लोक मागे लागले की पळून गायब होण्याचे किस्से असंही बरंच काही. आमदार असताना त्यांनी मांडलेली ‘पाणी अडवा, पाणी जिरवा' योजना, महाराष्ट्रात कला अकादमी स्थापण्याबद्दलचा आग्रह, साहित्य संस्कृती मंडळ व विश्वकोश मंडळाची पुनर्रचना, आणि नियतकालिकांसाठीची मदत योजना हेही त्यांचे आवडीचे विषय. त्यांच्या या गोष्टी ऐकून साहित्यिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील गेल्या पन्नास वर्षांचा माझा गृहपाठ विनासायास होऊन गेला आहे.

महानोरांचा एक विशेष म्हणजे ते जेवढं स्वगतपर बोलतात, तेवढंच ते ऐकूनही घेतात. अगदी मनापासून. आत्मीयतेने. ही आत्मीयता तुमच्यातली नेमकी गोष्ट हेरून त्यांच्यात उतरलेली असते. तुमचं काय चाललंय, तुम्ही काय छापताय-लिहिताय यावरही त्यांचं नेमकं लक्ष असतं. एक उदाहरण सांगतो. त्यांची-माझी ओळख झाल्यानंतर वर्षभरातच मी त्यांच्या भागात भरपूर वाचल्या जाणाऱ्या एका दैनिकात राजकीय सदर लिहीत होतो. कधीतरी रविवारी सकाळी त्यांचा-माझा फोन झाला, तर म्हणाले, ‘आज एकाच दिवशी दुसऱ्यांदा भेट होतेय आपली!' मला कळेना. मग माझ्या लेखातलं काय काय सांगायला लागले, तेव्हा माझी ट्यूब पेटली. हे गुरुजी माझे लेख तिकडे वाचताहेत हे तोपर्यंत माझ्या गावीही नव्हतं.

समाजातल्या दुर्लक्षित घटकांबद्दल आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्यांबद्दल शिकल्या-सवरलेल्या वर्गाला सांगत राहणं, हे आम्ही आमचं काम मानत आलोय. महानोरांना आमच्या या कामाचं मोठं अगत्य. पाण्याच्या आणि शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नात अख्खं आयुष्य खर्ची घातलेल्या सांगली जिल्ह्यातील संपतराव पवार यांच्या आत्मचरित्राचं काम आमच्याकडे चाललं होतं, तेव्हा त्याबद्दल त्यांनी केवढं रस घेऊन ऐकलं होतं! पुस्तक प्रकाशित झाल्यावर आवर्जून मागवून घेतलं आणि अभिप्रायही दिला. अशी कितीतरी उदाहरणं.

फोन झाला की ते विचारणार, ‘नवीन काय चाललंय?' की जे चाललंय ते आपण सांगणार. मधे वर्षभर आम्ही बाबा आमटेंच्या ‘आनंदवना'सोबत एका कामात गुंतलो होतो. पाठोपाठचे दुष्काळ आणि ग्रामीण भागाची उखडलेली अर्थव्यवस्था याचा अभ्यास करणं आणि तिथल्या गरजा ओळखून प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मदत करणं, असं डोक्यात होतं. त्यासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वर्षभर फिरत होतो. कधीतरी महानोरांशी या प्रकल्पाबद्दल बोलणं झालं तर उत्साहाने त्याबद्दल बोलायला लागले. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात फिरत असताना त्यांचा फोन झाला होता. तिथे शेती-पाण्याची परिस्थिती काय आहे, याबद्दल त्यांना सांगितलं. त्यांच्याकडे त्या भागाची आपण अचंबित व्हावं अशी माहिती होती. नगरला लागून असलेल्या डोंगररांगा, सीना नदीचा प्रवाह, तालुक्याची सामाजिक घडण, सिंचनाचे प्रश्न असं बरंच काही त्यांना माहित होतं. त्यांना म्हटलं, ‘तुम्ही जळगावकडचे. तुम्हाला इकडची कशी माहिती?' तर त्या भागात ते केव्हा फिरले होते, कुणासोबत होते, तिकडचे आमदार-खासदार कोण, त्यांनी कोणते प्रकल्प केले-केले नाहीत, अशा माहितीचा धबधबा सुरू.

अलीकडे निवडणुकांच्या निमित्ताने ‘युनिक फीचर्स'मधील आम्हा मित्रांची बरीच भ्रमंती सुरू आहे. गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश अशी कुठे कुठे. दौऱ्यावर असताना कधी त्यांचे फोन येत. इकडे आहे, तिकडे आहे; इकडे गेलो होतो, तिकडे गेलो होतो, असं त्यांना सांगणं होई. मग ते फोनवर विचारू लागले, ‘काय भटके विमुक्त कुठे आहेत सध्या?' आम्ही कुठे आहोत, काय बघतोय, काय करतोय याबद्दल त्यांना कौतुक आहे, असं त्यांच्या बोलण्यातून वाटे.

मला आठवतंय, दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांना तब्येतीच्या तक्रारी सारख्या सुरू होत्या. त्यामुळे दमून गेल्यासारखे झाले होते ते. थकल्या आवाजाने फोन येई. ‘अहो काय सांगायचं...' म्हणत त्रास सांगत. असं झालं, तसं झालं, सांगत. मोकळेपणाने. आपलेपणाने. थोड्या दिवसांनी होणाऱ्या फोनवर त्यांच्या आवाजात हुशारी वाटली आणि तसं म्हटलं तर म्हणत ‘थोडं वाटतंय बरं'. असं वर-खाली चालू असतानाच त्यांचं मोठं ऑपरेशन करावं लागलं. एक दिवस फोन आला. म्हणाले, ‘कुणालाच काही माहिती नाही, पण असं असं झालं म्हणून तातडीने ऑपरेशन करावं लागलं. हॉस्पिटलच्या बेडवरूनच तुम्हाला फोन करतोय. तुम्हाला बाहेरून कुठून कळायच्या आधी मुद्दामून फोन केला. इकडे मुलगी, चंद्रकांत (पाटील) वगैरे आहेत. तुम्ही हातातली कामं टाकून येण्याची गरज नाही.' मी अवाक. एवढं मोठं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी आठवणीने मला फोन करण्याने मी गहिवरून गेलो. त्यांचं जीव लावणं ते असं. थेट.

एक प्रसंग खासगी स्वरूपाचा. सांगावा की न सांगावा, असा विचार करायला लावणारा. पण सांगतो, कारण त्यातून महानोरांचं एक गुणवैशिष्ट्य झळाळून समोर येतं. मी तेव्हा मध्यप्रदेशात इंदोरला होतो. तिकडून पुण्याला परतताना अचानक पळसखेडला जाऊन थडकावं आणि त्यांना सरप्राईज द्यावं, अशा विचारात होतो. तर नेमका त्यांचाच फोन आला. मी आपला खुशीत त्यांच्याशी बोलायला लागलो. ‘तुम्हाला कसं कळलं की मी तुमच्या आसपास आहे' असं गंमतखोरी करत म्हणालो. एरवी आपण बोलताना ते अजिबात अडवत नाहीत. पण त्यांनी मला मध्येच थांबवलं. त्यांच्या कुटुंबातलीच एक व्यक्ती अचानक गेली होती. तपशील सांगताना त्यांचा आवाज खोल गेलेला होता. अगदी जड आवाजात ते म्हणाले, ‘अचानकच सगळं घडलं. काही कळायच्या आत. इथे घरात सर्वत्र माणसंच माणसं आहेत. फार अस्वस्थ वाटतंय, म्हणून खोलीतून बाहेर येऊन तुम्हाला फोन करतोय.' ते पुरते कोसळले होते. ‘मी आयुष्यात कुणाचं काही वाईट केलं नाही, पण माझ्यावर आयुष्यभर संकटं का कोसळतात हे मला काही कळत नाही', असं बरंच काही अर्धा-पाऊणतास बोलले. मी नि:शब्द होऊन त्यांचं दु:ख ऐकून घेत राहिलो. काय करणार? माझ्या वडिलांच्या वयाचा हा माणूस, मी त्यांचं काय सांत्वन करणार? ‘दादा, धीराने घ्या' एवढं म्हणण्याची पात्रताही माझ्या वयाने दिलेली नव्हती. पण ते मात्र वयातलं दोन दशकांचं अंतर कापून मनातली खळबळ माझ्याशी बोलत होते. वयातलं अंतर असं विरघळवून टाकणं सोपं असतं की काय?

जेमतेम पाच-सात वर्षांपूर्वी ओळख-भेट झाल्यानंतरच्या काळात महानोरांसोबतच नातं असं अलगद व्यापत गेलं. आधी सांगितल्याप्रमाणे या नात्यात एक मुख्य पात्र होतं, ते म्हणजे महानोरांचे परममित्र चंद्रकांत पाटील. त्यांच्याशीही आमची थेट ओळख-भेट नव्हती. त्यांनी आमच्यासाठी महानोरांवर एक फर्मास लेख तेवढा लिहिला होता. पण त्यांच्याशी निकटचा संबंध आला तो दुसऱ्याच एका पुस्तकप्रकल्पाच्या निमित्ताने. मराठीतील महत्त्वाचे प्रयोगशील लेखक श्याम मनोहर यांच्यावर एक समीक्षात्मक पुस्तक प्रकाशित करण्याची त्यांची कल्पना होती. श्याम मनोहर यांचं सुरुवातीपासूनचं लिखाण मी वाचलेलं. अगदी आवडीने. त्यामुळे असं पुस्तक होणं आवश्यकही वाटत होतं. शिवाय श्याम मनोहर हे माझे शिक्षक. कॉलेज काळात त्यांच्या संपादकत्वाखाली मी विद्यार्थी संपादक म्हणून काम केलेलं. ओळख तेव्हापासूनची. त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर तेव्हापासूनचा. त्यामुळे पुढचा-मागचा (म्हणजे व्यावसायिक) विचार न करता पुस्तक करायचं ठरवलं.

ते पुस्तक झालं आणि या पुस्तकाने एक गंमतीशीर दालन खुलं केलं. चंद्रकांत पाटील यांनी श्याम मनोहरांशी संबंधित दोन इंटरेस्टिंग पुस्तकं संपादित केली होती आणि मी ती वाचलेलीही होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि महानोर यांच्या मैत्रीप्रमाणेच चंद्रकांत पाटील आणि श्याम मनोहर यांचीही दोस्ती असल्याचं कळलं होतं. पण जेव्हा चंद्रकांत पाटील-श्याम मनोहर यांनी पुस्तकाच्या प्रकाशनाला महानोरांना बोलावण्याची कल्पना सुचवली, तेव्हा ‘येतील का महानोर?' असा प्रश्न आम्हाला पडला. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ते माझ्यावर सोडा. महानोर येईल.'

त्याप्रमाणे तब्येत मऊ असतानाही महानोर आले. कार्यक्रम झाला. तोपर्यंत कळलं होतं की महानोर-पाटील-श्याम मनोहर हे तिघेही एकमेकांशी छान जोडलेले आहेत आणि भास्कर लक्ष्मण भोळे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, नामदेव ढसाळ, अशोक शहाणे (आणि आधीच्या पिढीतील नारायण सुर्वे) असा त्याचा वाढीव परीघ आहे. मग लक्षात आलं की ही सगळी ‘लिटिल मॅगझिन' चळवळीची किंवा बंडखोर साहित्याची आपल्याकडची संस्थापक मंडळी आहेत आणि या साऱ्या बंडखोर मंडळींचे ‘अँकर' चंद्रकांत पाटील आहेत.

मग कोणत्या ना कोणत्या कारणाने चंद्रकांत पाटील यांचं येणं-भेटणं-बोलणं वाढलं. भेटीत त्यांच्याकडून या मित्रांचे गोष्टी-किस्से ऐकणं हा एक अनुभवच. त्यांच्या या आणि अन्य मित्रांबद्दल त्यांनी ‘चौकटी बाहेरचे चेहरे'या पुस्तकात झकास लिहिलंय. महानोरांवरील लेख वाचल्यावर या दोघांचं मैत्र किती अजब आहे हे कळतं.

पाटील खरं तर महानोरांपेक्षा वयाने दोन-तीन वर्षांनी लहान, पण महानोरांच्या कविता प्रकाशात आणण्याचं श्रेय त्यांचं. ही गोष्ट पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वीची. तेव्हा महानोर हे अगदी बुजरे तरुण होते व आपल्या कविता (तेव्हाच थोडं फार नाव झालेल्या) चंद्रकांत पाटील यांनी वाचाव्यात, अशी इच्छा धरून होते. पाटील यांनी कविता वाचल्या आणि प्रयत्नपूर्वक छापूनही आणल्या. आधी ‘साभार परत' आलेल्या कविता योग्य मार्ग सापडताच प्रकाशात आल्या. बहुतेकांना माहीत नसेल, की तेव्हा महानोरांचं नाव नामदेव धोंडो महारनोर होतं. पण पाटलांनी आपल्या अधिकारात त्यांचं आडनाव बदलून टाकलं. महारनोरचं महानोर केलं आणि नामदेव धोंडो ऐवजी ना. धों. असं करायला लावलं. ना. धों. धामणस्कर याच्या चालीवर ना. धों. महानोर हे नाव लवकर रुजेल या आशेवर. झालंही तसंच. महानोरांचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या ओठांवर रुळलं. महानोरही असे भारी की आपल्या मित्राने दिलेल्या नावानेच ते आयुष्यभर वावरले. अशी या दोघांची दोस्ती.

या दोस्तीचे ताजे अंक आम्हाला सध्या पहायला-ऐकायला मिळत आहेत. एकमेकांच्या सुखदु:खात आणि कठीण प्रसंगात या वयात एकमेकांसोबत घट्टपणे राहणारे मित्र विरळाच म्हणायचे. पण आता मनात येतं, वयाची पंचाहत्तरी उलटूनही एकमेकांच्या जिवाला जीव देणाऱ्या या माणसांनी तरुणपणी काय धमाल केली असेल! अर्थात, ही मंडळी त्यांच्या आजोबा वयात असताना का होईना आपल्या वाट्याला आली, हे आपलं नशीबच असं वाटून जातं.

नेमकं केव्हा ते आठवत नाही, पण प्रत्यक्ष ओळख परिचय व्हायच्या बरीच वर्षं आधी, म्हणजे किमान पंधरा-एक वर्षांपूर्वी महानोरांचं स्वहस्ताक्षरात ‘अनुभव'च्या संपादकांच्या नावे मला एक पत्र आलं होतं. त्यात त्यांनी ‘अनुभव'चा दर्जा आणि त्यासाठी घेतल्या जात असलेल्या कष्टांचं कौतुक केलं होतं. आजच्या काळात असं मासिक काढण्याचं व्रत घेतल्याबद्दलही त्यांनी लिहिलं होतं. शिवाय शासनाने चांगल्या नियतकालिकांना किमान लाखभर रुपयाची मदत करण्याविषयी आमदार असताना प्रयत्न केल्याचंही कळवलं होतं. का माहीत नाही, ‘अनुभव' चालवण्याचा आर्थिक ताण त्रास देत असल्यामुळे असेल कदाचित, मी त्यांना तुटक भाषेत पत्र लिहिलं होतं. ‘अनुभव'ला शासनाची मदत मिळत नाही आणि मिळाली तरी ती वर्षातील एक अंक काढण्याइतकीही नाही, असं काहीसं मी तडकपणे लिहीलं होतं. त्यावर त्यांचं मला काही उत्तर आलं नाही.

आता वाटतं, की पंधरा वर्षांपूर्वीच त्यांना प्रेमाने पत्रोत्तर दिलं असतं, तर कदाचित महानोर दहा वर्षं आधीच भेटले असते.

पण झालं ते झालं. आहे त्यात काय कमी मजा आहे?


- सुहास कुलकर्णी

suhas.kulkarni@uniquefeatures.in






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८