योगस्थ - डॉ. समीर कुलकर्णी | अनुभव दिवाळी २०१४


आज गुरुजी गेल्याला तीन आठवडे होतील.
त्या वैयक्तिक हानीशी मला अजूनही जमवून घेता आलेलं नाही.
आपल्याला गुरुजींविषयी लिहायला हवं, या आंतरिक ओढीनं मी कॉम्प्युटरसमोर बसलोय.
माझ्यासमोर त्यांचं आयुष्य पसरून राहिलेलं आहे. त्यातल्या अगदी छोट्या भागाशी, जोदेखील सतरा-अठरा वर्षांचा आहे, मी प्रत्यक्ष संबंधित आहे. बाकी चरित्रात्मक गोष्टी ऐकून, गुरुजींशी झालेल्या बोलण्यातून किंवा त्यांच्या मुलाखतींतून मला तपशिलानं माहिती आहेत. तशा त्या अनंत जणांना माहिती असणार आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाची गुरुजींविषयी एक स्वतःची अशी ‘स्टोरी’ असणार आहे याचीही मला खात्री आहे. गुरुजींच्या अस़ंख्य मुलाखती देशापरदेशांतल्या साध्या प्रकाशनांपासून ते पार ‘टाइम’पर्यंत वेगवेगळी मासिकं, पाक्षिकं, साप्ताहिकं, दैनिकातनं छापून आलेल्या आहेत. त्यांचं मोठेपण सांगणारे उदंड लेख लिहिले गेलेले आहेत ...
या सगळ्याच्या पल्याड जाणारं माझ्याकडे काही आहे का, जे मी मांडायलाच हवंय?
मला एवढं नक्की माहिती आहे, की गुरुजींबाबतच्या एकाही गोष्टीची मला दंतकथा करायची नाही, अकारण मोठेपणा देत त्यांना देवत्व चिकटवायचं नाही, त्यांच्या लाभलेल्या सहवासाचं प्रदर्शन मांडायचं नाही किंवा त्यांच्या निमित्तानं मी, अशी तुतारीही फुंकायची नाही... आणि तरीही मला त्याच्याविषयी लिहायचंच आहे.
मग काय लिहिणारे मी? असं काय आहे, जे मला ‘लिहायला हवं’ असं आतून बजावतंय?
स्टीफन किंग हा लेखक ‘ऑन रायटिंग’ नावाच्या त्याच्या पुस्तकात लिहितो,
‘तुम्हाला एखाद्या माणसाचा शोध घ्यायचा असला तर स्वतःकडे वळा. जुने दिवस खणा. स्वतःत पसरलेली त्या माणसाची पाळंमुळं शोधायचा प्रयत्न करा. त्या मुळांच्या आसपासची माती स्वच्छ केलीत की तुमच्या लक्षात येईल ज्या माणसाला आपण बाहेर शोधू बघत होतो त्याचं लख्ख चित्र आपल्या आतच सापडलेलं आहे.’
कॉम्प्युटरच्या कोर्‍या स्क्रीनकडे बघत तेच करण्याचा मी प्रयत्न करतोय.
•••

साधारण वीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट. वैद्यकीय शिक्षण संपत आलं होतं.
‘माणसाच्या आयुष्यातल्या रोगग्रस्त काळाला महत्त्व देऊन केवळ रोगोपचारांचा विचार करण्याइतकाच माणूस निरोगी असल्याचा काळ आपण विचारात घेतला, त्या दिवसांत तो का निरोगी राहिला होता हे तपासलं तर आपल्याला आरोग्याची किल्ली सापडू शकेल का?’
या कित्येक काळ सतावणार्‍या प्रश्‍नाचं उत्तर शोधत मी जिमपासून ते आध्यात्मिक प्रोग्रॅम्सपर्यंत विंडो शॉपिंग करत तेव्हा हिंडत होतो. साबणाच्या बुडबुड्यासारखं तात्पुरतं समाधान, काही तरी कळलं आहे असा भ्रम आणि सोशल गॅदरिंग्जमधे बोलण्याला विषय याव्यतिरिक्त हातात काहीही लागत नव्हतं.
फिरत फिरत, टक्केटोणपे खात, ह्याच्या त्याच्या सल्ल्यानं शेवटी मी योग या दरवाज्यात येऊन उभा राहिलो. इतर गोष्टी केल्या तशी हीही करून बघू, एवढाच माफक उद्देश मनात होता.
‘योग शिकावा असा विचार करतोय...’ असं म्हणताक्षणी थोरल्या भावानं त्याच्याकडे असलेलं बी.के.एस. अय्यंगार यांनी लिहिलेलं ‘लाइट ऑन योग’ नावाचं पुस्तक मला आणून दिलं. सुंदर फोटो, उत्कृष्ट ले-आऊट, स्पर्श करायलाही छान वाटावं अशी मऊशार पानं... झकास प्रत होती ती.
भावानं त्यावर लिहिलं होतं, ‘हे वाचायचं नाही तर अभ्यासायचं पुस्तक आहे. याचा अभ्यास साधला तर जगातलं इतर कुठलंही पुस्तक वाचण्याची यत्किंचितही आवश्यकता नाही.’
‘अरे, मग आधी नाही का द्यायचंस हे?’ त्यानं लिहिलेली कॉमेंट वाचून मी विचारलं.
‘वेळ यावी लागते. ते सोड. तू यातनं शिकायला सुरुवात कर. यातल्या सूचना नीट पाळल्यास तर तू चुकूच शकत नाहीस.’ चर्चा न लांबवता तो निघून गेला.
झालं. अभ्यास सुरू केला. लवकरच त्यातल्या प्राथमिक शारीरिक गोष्ट जरा जमताहेत असं वाटायला लागलं. साधी साधी आसनं करताना मजाही यायला लागली.

‘पुस्तकाचं ठीक आहे, पण तू गुरुजींकडे, इन्स्टिट्यूटला का जात नाहीस? लोक जगभरातनं शिकायला येतात इथे आणि तुला गावातल्या गावात जाता येईना का?’ एक दिवस भावानं भरीला घातलं.
त्याचं म्हणणं खरं होतं. पुढे त्यानं चार-पाच वेळा रेटलं. तरी मी बरीच चालढकल केली. आपल्याला जायचंय पण जमत नाहीये, वेळ नाहीये, असली नानाविध कारणं शोधली. जाण्याविषयी सारखं बोलून इतरांकडून स्वतःचं फालतू सांत्वनही करवून घेतलं. प्रत्यक्षात मात्र न जाण्यामागे खरं कारण वेगळंच होतं. ज्याला सामोरं जाण्याची मला भीती वाटत होती.
कॉलेजच्या दिवसांत वाचनामुळे दोन माणसांबद्दल माझा बुद्धिभेद झाला होता. इतरांची (म्हणजे लेखकांची) मतं उधार घेऊन मी ती स्वतःची बनवली होती. लेखकांना दूषण देण्याचं कारण नाही. दोष माझाच होता.
त्यातले पहिले विनोबा भावे.
हा एक बावळट आणि समकालीन प्रश्‍न न समजू शकणारा हेकट म्हातारा आहे, हा शून्यात वगैरे जातो, म्हणून त्यांची त्या काळी प्रचंड टिंगल-टवाळी केली जात असे. विनोबांवर वाटेल ते बोलण्याची तेव्हा ‘कॅफे’ बुद्धिवंतांच्यात फॅशन होती. त्या फॅशनचा मी बळी ठरलो. विनोबांच्या साहित्यातलं अक्षरही न वाचता ‘ते प्रतिगामी आहेत’ वगैरे कॉमेंट्स मारायला शिकलो; ज्या किती मूर्ख आणि बावळट होत्या हे कळायला पुढे दहा वर्षं जावी लागली.
दुसरे बी.के.एस. अय्यंगार.
ज्यांच्याकडे आसनं शिकायला गेलात तर ते तुम्हाला मारतात, अंगावर बसतात, पाठ मोडून टाकतात असं बोललं जायचं. मान्यवर लेखकांच्या लिखाणातनं तसे उल्लेखही यायचे. (पंचाण्णवव्या वाढदिवशी गुरुजींनीच त्यांच्या बी.के.एस.या आद्याक्षरांचा जुन्या काळी प्रसिद्ध असलेला फुलफॉर्म सांगितला- बीट, किक, शाऊट अय्यंगार)
एक अत्यंत रागीट, कडक योगी, ज्याला आपण नुसते दिसलो तरी आपल्याला लाथ बसेल, अशी गुरुजींची प्रतिमा डोक्यात तयार झाली होती. तिला भिऊन मी इन्स्टिट्यूटला जाणं टाळत होतो.
पण भावाचा आग्रह. शेवटी धीर गोळा केला आणि घेतली अ‍ॅडमिशन.
सतरा-अठरा वर्षांपूर्वी मी इन्स्टिट्यूटमधे (रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्स्टिट्यूट, रिमयी) पोहोचलो तेव्हा गुरुजी साधारण ऐंशीच्या अलीकडे होते. सर्वसाधारण योगवर्गाला शिकवणं त्यांनी बंद केलं होतं, तरी दुपारी घेतल्या जाणार्‍या मेडिकल बॅचला योगोपचार करताना ते नक्की नजरेस पडायचे. इतर वेळी त्यांचा सराव सुरू असायचा. त्यासाठी नियमितपणे ते त्यांच्या ठरलेल्या वेळी प्रॅक्टिस हॉलमधे यायचे. मॅट्स, बोल्स्टर, विटा वगैरे मागवून आसनं घालायला लागायचे. ते सराव करत असले तर शक्यतो त्यांच्या आसपास जायचं नाही, हे न ठरवताही माझ्याकडून पाळलं जायचं. ते काही बोलले नाहीत, त्यांनी काही सूचना दिली नाही तरी त्यांचं आसपास असणं सतत जाणवायचं. त्यांच्या उपस्थितीचा नकळत दाब यायचा.
‘देह हे माझ्यासाठी मंदिर आहे आणि आसनं ही त्यात वसणार्‍या ईश्‍वरासाठीच्या प्रार्थना.’ त्यांच्या ह्या वाक्याच्या आठवणीसोबत हॉलमधे अतिशय एकाग्रतेनं आणि लक्षपूर्वक साधना करणारे गुरुजी आजही नजरेसमोर येतात.
पण तेंव्हा मात्र मी त्यांना लांबूनच बघायचो. किती तरी दिवस.
•••

तसा मी प्रशांत अय्यंगारांचा विद्यार्थी. त्यांच्या वर्गात शिकताना योग या विषयाबद्दलचं भय माझ्या मनातून नाहीसं झालं. योगाचा शरीराशी संबंध आहे, पण तो मर्यादित. शरीरापरे जाणारं ते एक संपूर्ण दर्शन आहे याची जाणीव त्यांच्यामुळे मला झाली. ज्या प्रश्‍नाच्या मागे मी हिंडत होतो त्याचं बहुतांश उत्तर मला त्यांच्या शिकवण्यातनं मिळालं.
त्यांनी एक दिवस वर्गात आम्हाला एकपाद राजकपोतासन करायला सांगितलं.
(कपोत- कबूतर. कबुतराप्रमाणे छाती फुलारून एका पायाची कमरेशी दुमड घालत आसनाचा पाया स्थिर करायचा. दुसरा पाय मागे पसरवून तो गुडघ्यातून दुमडून डोक्याकडे आणायचा. हात खांद्यावरून मागे नेत उंचावलेल्या पायाला धरायचं आणि तो पाय डोक्याच्या दिशेने घेऊन यायचा. जरासं अवघड आसन आहे हे.)
चेहेरा वेडावाकडा ताणून, श्‍वास रोधत, दात-ओठ आवळून आम्ही पाय डोक्याकडे ओढत होतो. प्रशांत सरांनी काही वेळ आमची ती यातायात बघितली.
‘एक मिनिट. सगळेजण आसन सोडा.’ अनपेक्षितपणे त्यांनी सूचना दिली.
‘इकडे या!’ असं म्हणून चालत चालत ते हॉलमधल्या एका फोटोच्या दिशेनं गेले.
इन्स्टिट्यूटमधे ‘लाइट ऑन योग’मधे असलेले गुरुजींचे सगळे फोटो मोठे करून लावलेले आहेत. त्यातल्या एकपाद राजकपोतासनाच्या फोटोपाशी प्रशांत सर जाऊन उभे राह्यले. मागोमाग आम्ही. त्यांनी गुरुजींच्या राजकपोतासनाच्या दिशेनं हात केला. आम्ही करत असलेलं आसन गुरुजींनी कसं केलं होतं ते दिसत होतंच. देखणेपणा, सौंदर्य, ‘हठयोग प्रदीपिकेत स्वात्माराम ज्याला ‘अंगलाघव’ म्हणतो ते-ते सगळं स्पष्टच होतं. काही सांगायची आवश्यकताच नव्हती.
‘डोन्ट लुक अ‍ॅट द पोझ...’ आमच्या नजरांसमोर प्रशांत सरांच्या वाक्यानं चिरेबंदी आडसर उभा केला. मग बघायचं काय, असा प्रश्‍न स्वाभाविकपणेच मनात उभा राह्यला.
गुरुजींच्या चेहर्‍याकडे लक्ष द्या.
कपाळावर कुठेही आठी नाहीये बघा. डोळे शांत, निर्मळ. त्यात संपूर्ण शरीर, सगळे अवयव, त्यातली पेशी न् पेशी ताणरहित असल्याचं प्रतिबिंब किती स्वच्छपणे दिसतंय ते तपासा. ती शांतता समजून घ्या. त्यांच्या शरीराच्या प्रत्येक पेशीत असलेली संवेदनशीलता या अवघड स्थितीतही किती सजग, सहज आणि समग्र आहे हे जाणवतंय का तुम्हाला? आपण आसनं करतो आणि गुरुजी योग साधतात... हा त्यांच्यातला आणि आपल्यातला खरा फरक आहे.’

तीव्र क्षमतेचा टॉर्च घेऊन कुणी तरी आसमंत उजळवून टाकणारा प्रकाश टाकावा असं मला झालं.
•••

दुसर्‍या दिवशी कुणीही नसतानाची वेळ साधून मी त्या हॉलमधे पोहोचलो. एकेक करून आसनातले गुरुजींचे फोटो अक्षरशः तपासत गेलो. प्रशांत सर म्हणत होते ते विलक्षण खरं होतं. हॉलमधे लावलेल्या एकाही फोटोत त्यांच्या असण्यातली शांतता गढूळलेली नव्हती की एकाही आसनात त्यांचा एखादा अवयव, अवयव कशाला, त्वचासुद्धा किंचितही ढळलेली नव्हती. (हे फोटो काढलेत साधारण एकोणीसशे पन्नास-पंचावन्नच्या आसपास; फोटोशॉपनं टचअप करण्याच्या पूर्वीच्या काळात. त्यामुळे चलाखीची कुठलीही शक्यता नाही.) कोणत्याही फोटोतलं डोकं कोणत्याही फोटोला चिकटवलं तर विसंगत वाटू नये इतकी एकसारखी निर्मळता. तेच निवांतपण. शीर्षासनाचा फोटो उलटा करून बघितला तर समस्थिती आणि समस्थिती तशी करून बघितली तर शीर्षासन, इतकं सगळं संवादी.
‘आपण आसनं करतो आणि गुरुजी योग साधतात ’ इतकी नेमकी जाणीव देणारं वाक्य मी अभावानंच ऐकलेलं आहे.

मला आठवतंय, त्या वेळी गुरुजींनी उत्तरायुष्यात केलेल्या पादांगुष्ठ धनुरासनाचा फोटो मी रंगून बघत होतो. इतकं देखणं आसन घालणारा हा माणूस इथे शेजारी, अक्षरशः दहा पावलांवर राहतो; आत्ताही तो त्या घरात आहे, या कल्पनेनंच मला विलक्षण वाटलं होतं.
नेमका तेवढ्यात गुरुजींच्या खळखळून हसण्याचा आवाज कानावर पडला. घराच्या दाराबाहेर येत ते आतल्या कुणाला तरी काही सांगत होते आणि मनापासून हसत होते. लुंगीसारखी घातलेली वेष्टी, सिल्कचा कुडता, मागे वळलेले पांढरे शुभ्र केस, रागीट भिवया, भ्रूमध्यापासून वर जाणारं लांबलचक लालजर्द श्रीचरण. नुसता चेहराच नव्हे तर संपूर्ण शरीरच त्या मनमोकळ्या हसण्यात भागीदार झालेलं.
खाली येऊन मी त्यांना नमस्कार केला.
‘नमस्कार...नमस्कार!’ ते घाईनं म्हणाले. पुढे लक्षात आलं, आपण गुरुजींना कधीही नमस्कार केला तर ते अतिशय प्रेमानं लागोपाठ दोनदा नमस्कार-नमस्कार असं म्हणतात.
‘प्रॅक्टिस करता नं नियमित?’ आशीर्वादाचा हात खाली घेत त्यांनी विचारलं. त्यांचा- माझा यत्किंचितही परिचय नसताना त्यांनी विचारलेला हा पहिला प्रश्‍न. मी नुसतीच होकारार्थी मान डोलावली आणि बाजूला झालो.
मान वळवून तेही आधी सुरू होतं त्या संभाषणात शिरत पुन्हा मोठ्यांदा हसले.
जीवनाला संमुख असलेल्या, जगण्याला रसरशीतपणे सामोर्‍या जाणार्‍या गुरुजींची मला भुरळ पडल्यासारखंच झालं.

‘गुरुजींना योग येतो. त्यांना पतंजली आतून कळलेला आहे. आंधळेपणानं जरी तू त्यांच्यामागे गेलास तरी कुठल्या कुठे जाशील. स्वतःची जबाबदारी असल्यासारखं भावानं, ‘लाइट ऑन योगसूत्राज ऑफ पतंजली’ हे गुरुजींचं पुस्तक मला भेट देताना सांगितलं.
पुढे मग चाळा लागल्यासारखा मी त्यांच्या इतरही पुस्तकांचा मन लावून अभ्यास करायला सुरूवात केली. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या योगवर्गांच्या असंख्य सी.डी., डीव्हीडी बघितल्या. त्यातला शब्द न् शब्द जीव लावून ऐकला. ते समजावून घेण्याचा, रोजच्या सरावात आणण्याचा जीव लावून प्रयत्न केला. ते प्रॅक्टिसला म्हणून हॉलमधे आले की त्यांचं निरीक्षण करण्यात तासन् तास घालवले.
वारंवार स्वतःला बजावलं, आपल्याला गुरुजींकडनं शिकता यायला हवा तो जिवंत जगण्याशी असलेला अनुबंध. तो योग.
•••

गुरुजींना औपचारिक शिकवताना मी पहिल्यांदा ऐकलं ते त्यांच्या पंचाऐंशीव्या वाढदिवसाला, त्यांनी घेतलेल्या योगवर्गाच्या वेळी. इन्स्टिट्यूटच्या जिन्यात बसून मी तो सगळा वर्ग ऐकला होता. त्या वेळी त्यांनी जे मांडलं होतं त्याचा माझ्या स्मरणात असलेला साधारण गोषवारा...
‘आपण आपल्या शरीरांतर्गतच चातुर्वण्य व्यवस्था निर्माण केलेली असतेे. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. आपल्याकडून डोक्याला ब्राह्मणाचा दर्जा दिला जातो. का, तर तिथून बुद्धीचं काम होतं म्हणून. मान, छाती, पोट या सगळ्यांकडे या देहाबाबतची सगळी व्यापारी कामं सोपवलीयत आपण. काही तरी घ्यायचं त्यातून. पोषणासाठी आवश्यक ते मिळवायचं आणि नको ते टाकून द्यायचं. हातांकडे बघाल तर तुमच्या लक्षात येईल, हात म्हणजे शरीरातला क्षत्रिय गट. त्यांचं काम संरक्षणाचं. आक्रमण झालं तर प्रत्युत्तर त्यांनी द्यायचं. आणि पाय म्हणजे शूद्र. त्यांनी आयुष्यभर देहाचं ओझं वाहायचं. विनातक्रार. पण ही व्यवस्था मोडायला हवी, असा तुम्ही विचार केलाय कधी?’
ते काय सांगू पाहताहेत हे नक्की समजत नव्हतं. चातुर्वर्ण्याची ते पारंपरिक मांडणी करताहेत का, असं वाटून क्षणभर मनाला गाठही पडली होती.
‘कधी तरी डोक्याला पायाचं काम करायला लावावं, पोटाला हाताच्या सोबतीनं जायला सांगावं... असा प्रयत्न करून बघितलाय? डू यू हॅव दोज इंटरनल कनेक्शन्स? आपण जेंव्हा शीर्षासन करतो...गो टू शीर्षासन’
स्टेजवरच्या विद्यार्थ्याला गुरुजींनी शीर्षासनात जायला सांगितलं. इतकी दणकट सूचना मी कधीही ऐकलेली नव्हती. त्यातला जोर आणि नेमकेपणा इतका विलक्षण होता, की केवळ त्या राकट आवाजानंच शीर्षासन आकाराला यावं तसं झालं. आसनातल्या विद्यार्थ्याच्या डोक्याकडे निर्देश करत ते समजावून सांगायला लागले-
‘आपण शीर्षासन करतो म्हणजे काय करतो? फक्त डोक्यावर उभं राहतो? बॅलन्स सांभाळतो? ते तर करतोच एका पातळीवर. पण त्यापेक्षाही पुढे जात आपण डोक्याला सांगतो, की पायाला काय काम करावं लागतंय याचा अनुभव घे. बघ, संपूर्ण शरीराचा तोल सांभाळणं ही किती विलक्षण गोष्ट आहे आणि ती पाय कशी विनातक्रार करताहेत. एवढी सगळी वर्षं. ज्या वेळी आपण पायाकडे डोक्याची जबाबदारी सोपवतो तेव्हा आपण पायांना काय सांगतो? त्यांना सांगतो, तुम्ही अवकाशात बघा. तुमच्या त्वचेला सेन्सेटिव्हिटीचे डोळे फुटू द्यात. त्याच्या मदतीनं या स्थळाचा, या काळाचा अंदाज घ्या. आपण टाइम आणि स्पेसमधे स्वतःला कसे पोझिशन करतो हे समजावून घ्या... इतर वेळी किती सहजपणानं मेंदू तुमच्यासाठी हे काम करत असतो, कधी लक्षात तरी येतं का तुमच्या? जेंव्हा रोल्स इंटरचेंज होतात तेंव्हा प्रत्येक रोलचं महत्त्व आपल्याला समजून येतं. जस्ट सी. वी चे़ंज द कॉन्टेक्स्ट अँड एन्टायर अंडरस्टँडिंग चेंजेस. धिस इज व्हॉट पतंजली टेल्स यू व्हेन ही सेज, ‘वितर्कबाधने प्रतिपक्षभावनम्...’
जिन्यात माझ्या आसपास बसलेली काही पाश्‍चात्त्य मंडळी नोट्स लिहून घेण्याच्या खटपटीत होती. गुरुजींच्या बोलण्याच्या वेगाशी त्यांच्या लिहिण्याचा वेग जुळत नव्हता. तरीदेखील ते त्यांचा हट्ट सोडत नव्हते. मला मजा वाटली.
‘वी फेल टु अंडरस्टँड दीज इंट्रिकसीज बिकॉज वी आर नॉट सेन्सेटिव्ह. कॅन यू सी, फील, परसिव्ह? अनलेस अँड अनटिल एव्हरी सिस्टीम, एव्हरी ऑर्गन, एव्हरी सेल इन यूर बॉडी वर्क्स इन कोऑर्डिनेशन... एव्हरिथिंग विल बी फ्रॅगमेंटेड. आसनं ही केवळ शारीरिक गोष्ट नाही, तर ती आपल्या बुद्धीला, मनाला, विचारांना आकार देणारी, संपूर्ण शरीरांतर्गत सुसंवाद निर्माण करणारी एकात्म प्रक्रिया आहे. इट चेंजेस द टेक्श्‍चर ऑफ यूर चित्त. कल्चर्स योर इंटेलिजन्स आणि शार्पन्स योर सेन्सिटिव्हीटी...’
एखाद्या धबधब्यासारखे गुरुजी बोलत होते. एकाच वेळी अनंत गोष्टी त्यांना सांगायच्या होत्या. माझ्या शेजारी बसलेल्या त्या मुलीनं शेवटी नोट्स घेण्याचा हट्ट सोडला. वही मिटून घेतली आणि ती समोर बघू लागली.
‘गुरुजींची जेस्चर्स त्यांच्या शब्दांपेक्षा किती तरी जास्त बोलतात, नाही?’ थोड्या वेळानं वळून बघत ती म्हणाली.
•••

पुढे ‘पातंजल योगसूत्र परिचय’ या गुरुजींच्या ग्रंथाचा अनुवाद करताना मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा मला या घटनेची आठवण झाली. तीच ऊर्जा, तोच जोम.
‘सॅम के, लाइफ इज लाइक अ‍ॅमेझॉन रिव्हर.’ हाताची हालचाल इतकी जोरकस की समोर अ‍ॅमेझॉनच उभी राहावी.
‘इट फ्लोज इनसेसन्टली. प्रकृत्या अपूरात.... युवर ट्रान्सलेशन शुड बी दॅट फ्लोइंग अँड व्हायब्रंट.’
अनुवाद, अनुवादच कशाला, जे काही असेल ते... ती कला असेल, जगणं असेल किंवा हातात घेतलेलं कुठलंही साधं काम असेल. ते जिवंत, प्रवाही आणि स्पंदनशीलपणे साधायला हवं. किती नेमकी सूचना!

घरी आल्यावर भावाला गुरुजींनी हे शिकवलं ते सांगितलं. सेन्सेटिव्हिटीबद्दलचं त्यांचं म्हणणं कसं ‘अमेझिंग’ होतं... असं सगळं सांगत होतो.
‘गुरुजींचे शब्द कधीही ऐकू नकोस. ते ऐकशील तर गंडशील. त्यामागची इंटेन्सिटी, प्युरिटी ऐकायचा प्रयत्न कर. त्यांच्या शब्दांच्या आत न दिसणारे शब्द असतात. ते वाच. ते ऐक. त्यातले अंतर्ध्वनी तुझ्यापर्यंत पोहोचू देत. त्यांच्या शब्दांच्या प्रवाहात वाहून जायला होतं. ते टाळ. ही इज मच मोर बियाँड वर्ड्स... बहुतेकांच्या हे लक्षात येत नाही. यहुदी मेन्युहिनला हे समजलं होतं. ते गुरुजींना म्हणाले होते, ‘माय बेस्ट व्हायोलिन टीचर!’ ते का म्हणाले ते उकलून बघ. ही हॅज पॅराफ्रेज्ड इट ब्युटिफुली....’ दादा अगदी सहजपणानं सांगत होता.
‘अरे, हे सगळं तुला कळतंय तर तू का नाही येत क्लासला? तू का नाही शिकत योग?’
‘या जन्मी योग नाही!’ त्यानं विषयाला पूर्णविराम दिला.

यहुदी मेन्युहिन यांनी गुरुजींना एक घड्याळ भेट म्हणून दिलं. त्यावर लिहिलंय, ‘टु माय बेस्ट व्हायोलिन टीचर एव्हर.’ ते घड्याळ मागे एकदा मला बघायला मिळालं. भावाची आठवण झाली आणि मेन्युहिन यांनी हे असं का लिहिलं असावं असा विचार करायला लागलो. यहुदी मेन्युहिन हे जगद्विख्यात व्हायोलिनवादक. गुरुजींच्या अगदी सुरूवातीच्या शिष्यांपैकी एक. त्यांची ‘लाइट ऑन योग’ या ग्रंथाला सखोल विवेचन करणारी प्रस्तावना आहे.
ते गुरुजींना म्हणतात, की आजवरचे तुम्ही माझे सर्वोत्तम व्हायोलिन गुरू. गुरुजींनी त्यांना व्हायोलिन कसं वाजवावं याचं तंत्र शिकवलं असण्याची शक्यता काहीच नाही. त्यात मेन्युहिन आधीपासूनच कमालीचे निष्णात होतेच. मग?
व्हायोलिनवादनाचं तंत्र हा व्हायोलिनवादनातला एक भाग आहे, जो महत्त्वाचा आहे परंतु संपूर्ण नाही. गुरुजींनी मेन्युहिन यांना आपल्या शरीराचं, आपल्या जाणिवेचं, संवेदनशीलतेचं व्हायोलिन हे विस्तारित रूप आहे, व्हायोलिनची आणि आपली होणारी भेट, त्यातून निर्माण होणारे स्वर ही योगिक कृती आहे याचं भान दिलं असणार...
वादनाच्या कलेबद्दलची त्यांची संवेदनशीलता तीव्र आणि तीव्रतम करत कलेतून आपण समग्रतेनं कसे अभिव्यक्त होऊ शकतो, ही जाणीव त्यांच्या ठायी विकसित केलेली असणार....
कलेचा संबंध जीवनाच्या स्पंदनशील ऊर्जेशी कसा असतो हे त्यांच्या नजरेला आणत, तो संबंध आसनांच्या सरावातून  देहाच्या पातळीवर पुनर्स्थापित कसा करता येतो हे त्यांना शिकवलेलं असणार...
कला उन्नत होत होत शेवटी उदात्ततेच्या आणि आत्मशोधाच्या वाटेकडे कशी जाते याचं दर्शन मेन्युहिन यांना गुरुजींनी घडवलं असणार....
गुरुजींबद्दल मेन्युहिन यांच्या शब्दांपेक्षा अधिक चांगलं आणि सुयोग्य लिहिणं अवघड आहे.

गुरुजींच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही एक पोथीच्या आकाराची डायरी केली होती. तिच्या पहिल्या पानावर गुरुजींच्या हस्ताक्षरात  छापलेलं होतं,
‘योग हा कुठलाही धर्म नाही. योग हे धर्माचं आणि धर्मामागचं शास्त्र आहे. या शास्त्राच्या अभ्यासानं साधकाला स्वतःच्या धर्माचं अधिक सुयोग्यपणे आकलन होतं.’ मेन्युहिन यांच्या नेटक्या शब्दांप्रमाणेच, नेमक्या भाषेत संपूर्ण योग या विषयाचा परीघ आवाक्यात घेतलेला आणि तरीही वैयक्तिक कुवतीनुसार विस्ताराची प्रचंड क्षमता गर्भित असलेला.
आम्ही घेतलेल्या एका मुलाखतीत गुरुजी म्हणाले होते,
‘योगाबद्दल सूचना देण्याकरता कोणती भाषा वापरायची, ती कशी वापरायची, तिच्यावरचे आघात कसे हवेत ज्यायोगे हवा तो परिणाम साधता येईल, हे सगळं शिकवताना मी तपासत गेलो, निश्‍चित करत गेलो. त्यातून मग ही विशिष्ट नेमकी भाषा आकाराला आली. जवळपास तीस- चाळीस वर्षं लागली मला योगासाठी अचूक अशी भाषा घडवायला.
कोणत्याही कलेत पारंगत व्हायचं तर कष्ट तर लागणारच की.’
•••

माझ्यासमोर अजूनही कॉम्प्युटर तसाच आहे. तो जागा राहावा म्हणून अधूनमधून मी निरर्थकपणे पॅडवरनं बोट फिरवतो आहे; पण अजूनही मला काय लिहावं ते सुचत नाहीये. काय लिहावं म्हणण्यापेक्षा काय निवडावं आणि काय वगळावं याचा माझा निर्णयच होत नाहीये. आठवणारी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे असंच वाटतंय. ते तसं होता कामा नये हे कळतंय, पण...
डेस्कटॉपवरची एक फोटोफाइल मी उघडतो.
त्यात गुरुजींचे बेल्लूरचे फोटो आहेत. वृक्षारोपण करताना, शाळेत मुलांची आसनं बघताना, पूजा करताना, पतंजलींच्या मूर्तीला नमस्कार करताना आणि काही आसनं करताना... एकामागोमाग मी ते पुनःपुन्हा बघत राहतो.
ती वाट घेऊन खोल जाता येतंय का ते चाचपू लागतो.

‘किती अविश्‍वसनीय आहे या माणसाचं आयुष्य!’ पहिला फोटो पाहताना मनात उमटलेला विचार.
कर्नाटकातल्या बेल्लूर नावाच्या कुठल्या तरी एवढ्याशा खेड्यात गरीब घरात जन्म झालेला, लहानपणी टी.बी वगैरे- सारखे रोग झालेला एक मुलगा आरोग्य लाभावं म्हणून आपल्या थोरल्या बहिणीच्या यजमानांकडे, म्हणजे गेल्या शतकातल्या म्हैसूरस्थित थोर योगी टी. कृष्णमाचार्यांकडे जातो. त्यांच्या सल्ल्यानं आसनांकडे वळतो.
दोन वर्षांनी ते त्याला डॉ. गोखले नावाच्या माणसाच्या विनंतीवरून संपूर्ण अनोळखी असलेल्या पुणे या शहरात ‘योग शिकव’ म्हणून जायला सांगतात. तिथे त्याच्या नात्यातलं तर सोडाच, माहितीतलंही कुणी नाही. तिथली भाषासुद्धा त्याला येत नाही.
बरं, ते सांगतात आणि हा एकही प्रश्‍न न विचारता ती आज्ञा शिरसावंद्य मानतो. उठतो. एक छोटी पत्र्याची पेटी, दोन कपडे, दुसर्‍याने काढून दिलेलं तिकीट घेऊन थेट पुण्यात येऊन पोहोचतो. तिथे डेक्कन जिमखाना नावाच्या क्लबवर शिकवायला सुरुवात करतो. जवळच्याच एका लॉजमधे राहतो. तिथले त्याचे सहोदर कोण, तर गामा-गुंगासारखे पहिलवान! सगळंच अतर्क्य!
काही दिवसांनंतर तिकडे घरच्यांना वाटतं, याचं लग्न करायला हवं. म्हणून मग याचं रमामणी नावाच्या एका मुलीशी लग्न होतं, ज्यांची पुढे योगसाधनेत, विशेषतः आसन आणि प्राणायाम तंत्र निश्‍चित करताना मौलिक मदत होते. त्यांच्या नावानं सुरू झालेली योगशिक्षण संस्था जगद्विख्यात होते.
यातली प्रत्येक गोष्ट चित्रपटात शोभू शकेल अशी आहे. काही आखीव-बेतीव नसलेलं असं आयुष्य जगणं कसं शक्य आहे? कुणी मला ‘तुला हवं तसं कॅरॅक्टर लिही, हवं तसं. कुठूनही कुठेही जाऊ देत त्याला. काहीही करू देत’ अशी मोकळीक दिली तरी माझ्याकडनं असं लिहिलं जाणार नाही.
प्रत्यक्षात ह्या माणसाच्या वाट्याला आलेलं हे वास्तव आहे.

इथवरच्या अशा प्रवासाचा धक्का जरा विरतोय न विरतोय तोच पुढच्या फोटोसोबत प्रश्‍नांची उतरंड माझ्यावर कोसळते.
उधार आणलेल्या भांड्याकुंड्यांनी संसार सजवणार्‍या, आत्यंतिक माफक आवक असलेल्या या माणसाला पैसे मिळवण्यासाठी आपण इतर काही करावं असं कधीच वाटलं नसेल? पदरात पाच मुली आणि एक मुलगा असलेल्या या गृहस्थानं संसाराचा गाडा हाकण्यासाठी ‘जाऊ द्यावी ही योगाची भानगड आणि धरावी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीत नोकरी’ असा विचार कधी केला नसेल? (त्या काळी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी, खडकी इथे त्यामानाने सहज नोकर्‍या मिळत, असं सांगितलं जातं, म्हणून हे उदाहरण.) जगण्यासाठी बेसुमार यातायात करत, ह्याला योग शिकव, त्याला योग शिकव अशी सायकलवरनं रोज वीस-पंचवीस मैलाची रपेट मारणार्‍या, त्या काळी विक्षिप्त म्हणवल्या जाणार्‍या या साध्या माणसाकडे योगाविषयीची ही अपरंपार निष्ठा आणि त्यासाठी आयुष्य पणाला लावण्याची हिंमत आली कुठून? आणि त्याच्या त्या हिमतीला बळ द्यावं, हे समंजसपण त्या पत्नीला लाभलं कुठून? कशाच्या बळावर या लौकिकार्थानं अशिक्षित असलेल्या माणसानं कुठल्याही अडथळ्याला न जुमानता आणि प्रलोभनाला बळी न पडता केवळ योगावरच लक्ष केंद्रित केलं? कुणाचीही विशेष मदत नसताना कसा काय देशापरदेशांत जाऊन, हजारोंच्या संख्येनं कलात्मक ‘डेमॉनस्ट्रेशन्स’ देत, योगाचा झेंडा एकट्याच्या जिवावर इतका उंच उचलून धरला? इतका, की आज साठ-सत्तर देशांमधले लाखो विद्यार्थी योगाभ्यासाच्या प्रेमात पडतात आणि आपली आयुष्यं योगाच्या कारणी लावण्याचं निश्‍चित करतात.

काय उत्तर आहेत या प्रश्‍नांची? केवळ अचंबित करणार्‍या गोष्टी आहेत या.
बरं, शिकवायाला लागले आणि अल्पावधीत नाव झालं, यश चालत आलं असंही नाही. झगडणं, लढणं सुरू होतंच.
त्यात शिकवण्याचा विषय योग. मिस्टिकल, आध्यात्मिक, गूढ, सामान्यांच्या आवाक्यात येऊ शकत नाही अशी प्रसिद्धी असलेला. त्यामुळे त्यातल्या आधीच्या, स्वतःला तज्ज्ञ समजणार्‍या मंडळींनी नाकं मुरडलेली असणारच.
‘पूर्वीच्या काळी कुणालाही काही शिकवताना मला जे अभिप्रेत असायचं ते मी आधी करून दाखवायचो. कारण तेंव्हा माझ्याकडे पुरेसे शब्द नव्हते, योग्य अभिव्यक्ती नव्हती. त्यामुळे त्या काळात माझी दुपेडी साधना सुरू होती. एकीकडे मी आसनांचा निरंतर सराव करत होतो; त्याच वेळी जे शिकवायचं आहे त्याची भाषा घडवण्याचाही प्रयत्न करत होतो. कारण त्याशिवाय माझ्या शिकवण्यात नेमकेपणा आला नसता. जे मला जाणवलेलं, अनुभूतीला आलेलं आहे ते  सुस्पष्टपणे मी समोरच्याला सांगू शकलो नसतो. माझं सांगणंच बरोबर नसलं तर समोरच्याला त्याचा कसा काय अनुभव येणार?’ गुरुजींचं ऐकताना हे अगदी एकरेषीय वाटतं, पण प्रत्यक्षात ते किती कठीण आहे ह्याची कल्पना योगशिक्षण देणार्‍या आणि घेणार्‍यांना नक्की असते.
स्वतःच्या अनुभवाला केंद्रस्थानी ठेवत योग शिकवण्याच्या गुरुजींच्या पद्धतीला तेंव्हा विरोध झाला असणार हे निश्‍चित.
‘हे अध्यात्म नाहीच. ही शारीर पातळीवरची कसरत आहे नुसती. हा माणूस कसला आध्यात्मिक आणि योगाभ्यासी, हा तर निव्वळ कसरतपटू!’ अशी अवहेलनाही तथाकथित आध्यात्मिक मंडळींकडून पदरात आलेली असणार.

कुणी काहीही बोललं तरीे गुरुजी मात्र आपल्या भूमिकेवरून तिळमात्रही कधी ढळले नाहीत. त्यांच्या अनुभुतीला आलं होतं ते आणि त्यांना योग्य वाटत होतं तेच ते शिकवत राह्यले. ग्रंथातलं वचन आहे म्हणून त्यांनी कधी आंधळेपणानं ते प्रमाण मानलं नाही की पतंजलीनं सांगितलंय म्हणजे ते योग्यच असणार असा भाबडा विश्‍वास ठेवून ते कधी त्यामागे गेले नाहीत. त्या वचनांची त्यांनी सातत्यानं स्वतःच्या शरीराच्या, चित्ताच्या आणि भानाच्या प्रयोगशाळेत कसून तपासणी केली. त्यातून सामोरे येणारे निष्कर्ष पुनःपुन्हा तपासले आणि त्या निष्कर्षांतून विकसन करत ते स्वतःचाच नव्हे तर सगळ्यांसाठीचा योगमार्ग प्रशस्त करत गेले.
हिमालयातल्या गुहांत राहाणार्‍या साधुसंन्याशांना, घरदार सोडून अरण्यवासात साधना करणार्‍या साधकांनाच प्राप्त होऊ शकतो, अशी ख्याती असणारा योग गुरुजींनी साध्या, सामान्य माणसाच्या आवाक्यात आणून ठेवला. हे गुरुजींचं श्रेय.

उत्तरायुष्यात, सत्तरच्या दशकात टी. कृष्णमाचार्य पुण्यात आले होते. गुरुजींनी आदरानं त्यांना स्वतः शिकवत असलेल्या योगवर्गाला नेलं. गुरुजींनी शिकवलेला तो वर्ग बघताना भारून गेलेल्या टी. कृष्णमाचार्यांनी शेवटी विचारलं,
‘सुंदरू (गुरुजींचं नाव), कुठून शिकलास रे हे सगळं?’

मागे अभीनं-त्यांच्या नातीनं गुरुजींची एक मुलाखत घेतली होती. त्यात गुरुजी म्हणाले,
‘एक तर माझी मातृभाषा कानडी. औपचारिक शिक्षण काही नाही. मी शिकवत होतो ते पुण्यात, मुंबईत, परदेशांत. तेही शिकलेल्या विद्वान लोकांना. त्यामुळे माझ्याकडून काही चुकलं असतं तर योग या विषयाला, माझ्या गुरूंना बोल लागला असता- जे मला कधीही खपलं नसतं. त्यामुळे सातत्याने अभ्यास करत राहणं, स्वतःच्या प्रत्ययाला काय येतंय ते तपासणं, आपल्या अनुभवाशी प्रामाणिक राहणं आणि ते मांडणं हे माझ्यासाठी आद्य कर्तव्य होतं. त्यामुळे अभ्यासात, साधनेत पडणारा खंड ही मला न खपणारीच गोष्ट होती, आणि आजही तेच आहे.’
सातत्यानं, सातत्यानं आणि सातत्यानं अभ्यास हीच जगण्याची एकमेव रीत म्हणून गुरुजींनी त्या वयात आणि त्या काळापासून स्वीकारलेली होती, असं आज अंतरावरून विचार करताना लक्षात येतं. ‘अभ्यासोनि प्रकटावे’ हा रामदासांचा कित्ता त्यांनी जसाच्या तसा गिरवलेला आहे. महर्षी पतंजली योगसूत्रात ‘सार्वभौमा महाव्रतम्’ असा उल्लेख करतात. गुरुजींसाठी योग हे शब्दशः महाव्रत होतं. कोणत्याही काळात, कशाही अवस्थेत त्याचं पालन व्हायलाच हवं आणि होणार, हा त्यांनी स्वतःला दिलेला शब्द होता, जो त्यांनी अक्षरशः अखेरच्या श्‍वासापर्यंत पाळला.
•••

गुरुजी जाण्याआधी दीड-दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट.
त्यांना घरीच औैषधं सुरू होती परंतु लक्षणांना म्हणावा तसा उतार नव्हता.
‘दोन विपरीत दंडासन बेंचेस आण बघू शवासनासाठी.’ त्यांनी जवळच उभ्या असलेल्या अभीला सांगितलं.
विपरीत दंडासन या आसनासाठी गुरुजींनी स्वतः आकाराला आणलेले दोन लाकडी बेंचेस त्यांच्या खोलीत आणले गेले. विशिष्ट पद्धतीनं ते जो़डून मधे तयार होणार्‍या जागेत लोड, सुती ब्लॅकेट्स योग्य पद्धतीनं ठेवली की सगळ्याचा खालून अतिशय मृदू आधार तयार होतो. या रचनेवर शवासन करताना पाठीला असलेल्या आधारानं छाती विस्तारली जाते. श्‍वसन अधिकाधिक मोकळं आणि सुलभ होतं.
गुरुजी हलके हलके शवासनात स्थिर झाले.
‘मी आसनात असतो तेंव्हा मी आसनच असतो’ ह्या त्यांच्या म्हणण्याचा जिवंत प्रत्यय येऊ लागला.
अभी आणि आणखी कुणी मदत लागली तर जवळ असावं म्हणून तिथेच आसपास घुटमळत होते. गुरुजींनी मधे डोळे उघडले तेंव्हा खोलीतच उभी असलेली ही मुलं त्यांना दिसली. हातानंच त्यांनी ‘तुम्ही जा’ असं खुणावलं आणि पुन्हा डोळे मिटून घेतले. मुलांचा पाय तिथनं निघाला नाही. गुरुजींनी जा असं सांगितलेलं असूनदेखील ती तिथेच रेंगाळली.
भरपूर वेळ केलेल्या शवासनानंतर गुरुजींनी डोळे उघडले तेंव्हा त्यांना ही मुलं अजूनही तिथेच उभी असलेली दिसली.
‘मी तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसला जा म्हणून सांगितलं ना मघाशीच, मग का इथे थांबलायत? तुम्ही इथे असे थांबलात तर मी माझी प्रॅक्टिस बंद करीन.’ हे सांगताना गुरुजींचा स्वर तीक्ष्ण होता. त्यात ही मुलं स्वतःच्या साधनेचा वेळ गमावून इथे थांबलीयत याविषयी तीव्र नाराजीही प्रकटली होती.
काही दिवसांनी मी त्यांना बघायला गेलो तेंव्हा या घटनेचा उल्लेख झाला. बरं वाटत नसतानाही गुरुजींनी ऐकवलं,
‘पतंजलीनं सांगितलंच आहे, इन हिज ओन वर्ड्स. अभ्यास हॅज टु बी दीर्घकाल, निरंतर अँड विथ रेव्हरन्स...देन अँड देन इट विल बी डीप रूटेड. फर्स्ट चॅप्टर- समाधिपाद, फॉर्टीन्थ सूत्र. ‘स तु दीर्घकालनैरंतर्यसत्कारासेवितोदृढभूमिः...’
हे सांगताना चेहर्‍यावर उमटलेला, ‘एवढं तरी आपण करायला नको का?’ असा साधा-सरळ भाव.

कॉम्प्युटरच्या या फोल्डरमधला शेवटचा फोटो गुरुजींनी खुर्चीवर केलेल्या कपोतासनाचा आहे. वय जाणवतंय, पण हात ज्या मार्दवानं आणि संवादशील उत्सुकतेनं पायाच्या दिशेनं आलेले आहेत, ते अजूनही इतके सुरेख दिसताहेत की हे गृहस्थ आता नाहीत यावर विश्‍वास ठेवायला मन तयार होत नाही.
काही शब्द तरी लिहून ठेवावेत म्हणून मी स्क्रीनवरच्या नोट्समधे सुरुवात करतो,
‘गुरुजींचं वर्णन कमीत कमी शब्दांत करायला सांगितलं तर केवळ तीनच शब्द पुरेसे आहेत- जिवंत, प्रवाही आणि स्पंदनशील.’
•••

गुरुजी त्र्याण्णव वर्षांच्या आसपासचे असतानाची गोष्ट.
योगोपचारांसाठी आलेल्या, पाठीच्या दुखण्यानं हैराण झालेल्या एका रुग्णाला गुरुजी मदत करत होते. त्याच्या शेजारी उभं राहून त्याची उभं राहण्याची, निजण्याची, बसण्याची पद्धती कशी सुधारता येईल, त्याच्या पाठीच्या कण्याला कोणत्या प्रॉपचा आधार दिला की त्याचं श्‍वसन सुधारेल यासाठी वेगवेगळे उपाय करून बघत होते. प्रसंगी स्वतःचा हात, पाय, शरीर सगळ्याचा वापर करून अभिप्रेत असलेली स्थिती साधत होते.
शेजारी अभी हात मागे बांधून बघत होती.
‘अभी, यू पीपल कॅन नेव्हर हेल्प एनीबडी...’ खूप प्रयत्नांनंतर त्या रुग्णाला गुरुजींनी आसनात स्थिर केलं आणि अभीकडे वळून ते म्हणाले. आपले आजोबा असं का म्हणताहेत ते अभीला कळेना.
‘तुम्ही सगळे स्पर्शाला घाबरणारे लोक आहात.’ एकीकडे त्या रुग्णावर लक्ष ठेवत गुरुजी उत्तरले.
‘विदाऊट टच हाऊ कॅन यू अंडरस्टँड समबडीज पेन?’
‘कमॉन, सी...’ अभीला पुढे बोलावून तिचा हात हातात घेत त्यांनी रुग्णाच्या पाठीला स्पर्श केला.
‘कॅन यू फील इट? आधी पाठ कशी अ‍ॅजिटेटेड होती. इट वॉज अँग्री. आता ती कशी हळूहळू शांत होत जातेय...कॅन यू परसिव्ह?’ अभी आपली संवेदनशीलता पणाला लावत आजोबा सांगताहेत ते समजावून घेण्याचा प्रयत्न करत होती.
सुरुवातीला वेदनेनं पिळवटणारा रुग्णाचा चेहरा थोडा सैलावला. त्याच्या श्‍वासाची लय मंदावली. गुरुजी त्याच्या डोळ्यांवर हात ठेवत पुटपुटले,
‘रिलॅक्स... द मूमेंट यू टच द पेशंट, यू कॅन फील द व्हायब्रेशन्स इन हिज बॉडी. त्या वेळी आपलं शरीर टाकून द्यायचं आणि त्याच्या शरीरात जायचं. नथिंग मिस्टिकल. हे मी माझं सांगत नाहीये. पतंजली टेल्स धिस... ‘बंधकारण शैथिल्यात्प्रचारसंवेदनाच्च चित्तस्य परशरीरावेशः।’
मधेच वळून रुग्णाचं डोकं हलक्या हातानं उचलून गुरुजींनी त्याखाली उशी सरकवली आणि रुग्णानं एकदम मोठा श्‍वास घेतला.
‘रुग्णाच्या शरीरात प्रवेश करून त्याला काय होतंय, कुठे दुखतंय, कशामुळे तो आजार उद्भवतोय हे आतून समजावून घ्यायचं. होणार्‍या यातना त्याच्या देहातून सहन करायच्या आणि मग त्या कशा कमी करता येतील याचा विचार करायचा. तसं केलंत तरंच तुम्ही नेमका उपचार सुचवू शकता. हे असं कंबरेेमागे हात बांधून रुग्णाला मदत करता येत नाही अभी. यू हॅव टु टच हिम. डोन्ट बी अफ्रेड ऑफ टच.’

‘गुरुजी, या सगळ्याचं पेटंट घ्यावं असं नाही कधी वाटलं तुम्हाला, या सगळ्या प्रॉप्सचं?’ मी विचारलं.
‘कशासाठी? परमेश्‍वरानं ज्या गोष्टी आपल्याला दिल्या त्याचं घेतलं त्यानं कधी पेटंट? वारा, पाणी, हवा सगळं सगळ्यांचं आहे, तशी ही प्रॉप्सही सगळ्यांसाठी आहेत. परमेश्‍वर जर कशावर आपलं नाव घालत नाही, हक्क सांगत नाही, तर मी का त्याच्यापेक्षा मोठा आहे स्वतःचं नाव घालायला? ज्या कुणाला दुःख भोगायला लागतं त्याविषयी आपल्या मनात करुणा नको? हाऊ अ‍ॅम आय गोइंग टु हेल्प यू, हा विचार नको?’ गुरुजींना माझ्या प्रश्‍नामागचा उद्देश लक्षातच आला नव्हता.
‘बॉडी इज माय फर्स्ट प्रॉप...शरीर हे माझं पहिलं साधन आहे.’ हे वाक्य गुरुजी वरच्या घटनेआधी साधारण पन्नास वर्षांपूर्वी म्हणाले होते..

‘इतकी वर्षं तरी अण्णा राहिले कसे, असंच मला वाटतं.‘ गुरुजी गेले त्या दिवशी गीताताई (गुरुजींची मुलगी) सांगत होत्या. ‘इतकं वापरलंय हे शरीर अण्णांनी, की... कुणीही म्हटलं, गुरुजी, मला असं होतंय, की हे उठले, निघाले, गेलेच मदतीला...सतत कष्ट...सतत कष्ट...’
•••

वीसशे चौदा. ऑगस्ट. गुरुजींचं घर.
गुरुजींची तब्येत गेले काही दिवस फारशी बरी नाही. त्यांची हॉस्पिटलला जायची मुळीच इच्छा नाही. डॉक्टरांनी घरीच उपचार सुरू केलेत. मात्र, तब्येतीत सुधारणा दिसण्यापेक्षाही ती खालावते आहे हे निश्‍चित. त्यामुळे सगळ्यांच्या मनात साशंकता आहे.
‘आता जे काही करायचं त्याचा निर्णय तुम्ही घ्यायचात. हॉस्पिटलमधे जायचं-नाही ते मी ठरवणार नाही. तुम्ही योग्य समजाल, कराल ते ठीक.’ एके संध्याकाळी त्यांनी आपल्या मुलांना आणि नातवंडांना जवळ बोलावून सांगितलं.
हे सांगताना गेल्या शहाण्णव वर्षांत मी दवाखान्याचं तोंड बघितलेलं नाही तर आता कशाला, असं अहंकाराचं सूचन करणारा हट्ट नव्हता. माझ्याबद्दलचा निर्णय मीच घेईन, इतर कुणीही त्यात ढवळाढवळ करता कामा नये, असा दुराग्रह नव्हता आणि आता ठरवणारे तुम्हीच, तुम्ही कराल ते खरं, हा अवलंबित्वाचा भावही नव्हता. निव्वळ निखळ सूचना...
वरवर पाहता ही गोष्ट महत्त्वाची नाही, कुणीही असंच करेल असं वाटू शकतं. मात्र, मला विशेष मोल वाटतं ते त्या अवघड क्षणातही उपस्थित असलेल्या भानाचं. एकीकडे जगण्याचा सुटत चाललेला दोर आणि दुसरीकडे ज्याविषयी केवळ कल्पनाच केलेली आहे असा अनागत... दोघांच्या बरोबर मधला संक्रमणावस्थेतला हा क्षण. त्या क्षणाला भान टिकणं, त्या भानाचा आधार घेत स्वतःकडे अंतरावरून बघणं, निर्णयापर्यंत पोहोचणं आणि अलिप्तपणे निर्णय अमलात आणणं ही किती अवघड गोष्ट असणार याचा आपण अंदाजच करू शकतो; तोदेखील वैयक्तिक स्मृतीच्या मर्यादित परिप्रेक्ष्यातूनच.
महर्षी पतंजली मानवप्राण्यात जीवनाबद्दल असलेल्या आसक्तीला, ओढीला, मरणभयाला अभिनिवेष म्हणतात. (अनु)राग, द्वेष, अस्मिता आणि अविद्या या क्लेशांच्या साखळीतला अभिनिवेष हा पहिला आणि महत्त्वाचा क्लेश.
‘ते स्वरसवाही विदुषोऽपि तथारूढोभिनिवेशः॥२-९॥’ अतीत अनागताच्या संक्रमणकालात नित्यनूतन, नित्यचिन्मय असलेल्या वर्तमानात हे महात्मेही (विद्वान, ज्ञानी, सुज्ञ, शहाणे) जीवनाला घट्ट धरू  बघतात. त्यामुळे त्यांची (विद्वान, ज्ञानी, पंडितांची) अभिनिवेश या क्लेशातून सुटका होत नाही असं महर्षी पतंजली स्पष्टपणे बजावतात.

वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे मृत्यूला सामोरे जाण्याचे प्रसंग माझ्यावर वारंवार येतात. माणसं जगतात कशी यापेक्षा ती मरतात कशी, मृत्यूला सामोरी कशी जातात यावरनं त्यांच्या जगण्याची, त्यातल्या मूल्यांची, मुळांची आणि खोलीची परीक्षा केली तर ती अधिक समंजस ठरतेे असं माझा अनुभव सांगतो.
या परीक्षेत भले भले अडखळतात.

आयुष्यभर स्वतःभोवती वलय निर्माण करून, जीवनाचा वेगळा अन्वय केवळ आपल्यालाच समजलेला आहे आणि इतर सगळं जग केवळ उथळ, वृथा आहे असा डंका पिटणारे महाभाग अत्यंत केविलवाणेपणाने मृत्यूसमोर उभे राहतात. त्या दरवाज्यासमोर गेलं की जीवनभर वागवलेला आणि त्यामुळे त्वचेत भिनून गेलेला त्यांचा अवघा तात्त्विक आव गळून पडतो. घेतलेली कवचं, घातलेले मुखवटे झडून जातात. त्या टप्प्यावर मृत्यूनं परत जावं यासाठी ते वाटेल ती गोष्ट करायला तयार असतात. काहीही पणाला लावायला त्यांची यत्किंचितही ना नसते. तसं करताना आपली विद्वत्ता, शहाणपण, तर्कनिष्ठता अशा सगळ्या गोष्टींना आपण मातीत घालतो आहोत याचं त्यांना थोडंसंही भान नसतं. केवळ आपण जगलो पाहिजे आणि जिवंत टिकलो पाहिजे, एवढंच त्या क्षणाला त्यांच्यासाठीचं परमध्येय असतं.
हे सगळं पाहताना महर्षी पतंजली अभिनिवेशाला-मरणभयाला क्लेशांत पहिलं स्थान का देतात हे लख्ख समजून येतं.

या विपरीत, जगण्यात अपार संघर्ष करावे लागूनही त्या संघर्षांचा यत्किंचितही बडिवार न माजवणारी, कोणताच कांगावा न करणारी, कोणतंही श्रेय न लाभलेली अनामिक माणसं त्यांच्यातल्या उपजत साधेपणानं मृत्यूचा स्वीकार करतात तेंव्हा त्यांच्यातली ती अबोल भव्यता जाणवून नतमस्तक व्हायला होतं. मृत्यूच्या प्रकाशात त्यांचं अवघं जगणं उजळून निघतं.

‘योग जगावं कसं हे तर शिकवतोच शिकवतो पण त्यापेक्षाही योग मरावं कसं हे शिकवतो हे योगाचं मोठेपण.’ प्रशांत अय्यंगार त्यांच्या योगवर्गात हे असंख्य वेळा उद्धृत करतात तेंव्हा ते अभिनिवेशावर बोलतात असं मला वाटतं.
गुरुजींनी या पायरीवर स्वतःच्या देहाबद्दल निःसंग होत, तो परक्याचा असल्याप्रमाणे इतरांच्या हाती सोपवून दिला आणि पुढच्या टप्प्यावर अभिनिवेश या क्लेशाचा उंबरा कायमकरता सहजपणे ओलांडला.

वैद्यकीय कारणांसाठी त्यांना हॉस्पिटलला नेण्याचा निर्णय निश्‍चित झाला.
•••

हॉस्पिटलमधे पोहोचल्यावर गुरुजींना तपासायला, भेटायला म्हणून डॉक्टर आलेे.
केले जाणारे उपचार कोणत्या दिशेनं असणार आहेत, त्यांचा काय परिणाम अपेक्षित आहे, त्यासाठी किती वेळ लागू शकतो, क्वचितप्रसंगी वेगळं काय घडू शकतं हे सगळं त्यांनी सविस्तर समजावून सांगितलं.
‘काहीही लागलं तर इथल्या कुणालाही सांगा. सगळ्यांना मी सूचना देऊन ठेवलेल्या आहेत. वाटलं तर मला फोन करा. मोबाइल नंबर दिलेलाच आहे.’ नमस्कार करून निघताना डॉक्टरांनी सोबतच्या लोकांना आश्‍वस्त केलं.
त्रास होत होता तरी गुरुजींनी हे सगळं लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतलं.
‘डॉक्टर, तुम्ही एवढे कष्ट घेताय... थँक्यू... थँक्यू, सर! एक गोष्ट नक्की, हे जे शारीरभोग आहेत ते असणारच आहेत. ते भोगूनच संपवावे लागतात. मात्र, ते सगळे या बाहेरच्या देहाशी संबद्ध आहेत. देहाचं वस्त्र बदलण्याची वेळ झाली असेल तर बदलायचं वस्त्र. आतमधे मात्र मी पूर्ण शांत आणि निवांत आहे.’
त्यांच्या या म्हणण्यावर डॉक्टरच कशाला, इतर कुणीही काय बोलणार?
अकल्पनीय वाटलं तरी गुरुजींचं हे सांगणं तोंडदेखलं नव्हतं हे नक्की. ती त्यांची सवय नाही. योगशिक्षकांनासुद्धा ते कायम बजावायचे-
‘तुम्हाला जे येतंय तेच शिकवा. ज्याची स्वतःला अनुभूतीच नाही असं काही तरी बोलू-शिकवू नका. ती फसवणूक. आयुष्यात मी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचा मला अनुभव आहे. ज्याचा अनुभव नाही ते मी कधीही शिकवलेलं नाही.’ इतकं स्पष्ट सांगणारा, स्वतःच्या अनुभूतीला महत्त्व देत स्वतःशी नितांत प्रामाणिक असलेला हा माणूस.

त्या अर्थानं ‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही, नाही मानियले बहुमता...’ असं विधान करत, स्वतःच्या जगण्याला केंद्रस्थानी आणून निर्भीड अभिव्यक्ती करणार्‍या तुकोबांच्या शौर्याची परंपरा आजोबांनी योगमार्गात चालवली. नुसती चालवली असं नव्हे तर जोपासली आणि मोठीही केली. इतकी, की आजोबांनी आखून दिलेल्या योगाभ्यासाची पद्धत त्यांच्या नावानं शब्दकोशात जाऊन बसली.
तेच आजोबा आज डॉक्टरांना सांगताहेत, ‘मी आतमधे पूर्ण शांत आणि निवांत आहे’. याचा एकच अर्थ आहे,
ते खरंच आतून शांत आणि निवांत आहेत.
•••

हॉस्पिटल. आय.सी.यू.
बेडवर शांतपणे डोळे मिटून निजलेले गुरुजी आणि शेजारी खुर्चीवर बसलेली अभी. पलीकडच्या काउंटरवर ठेवलेले मेडिकल रिपोर्ट्स सांगताहेत की त्यांची तब्येत गंभीर आहे. जे काही उपचार चाललेले आहेत त्याला देहाकडून माफक प्रतिसाद मिळतो आहे.
थोडा वेळ जातो. गुरुजी डोळे उघडतात आणि नातीकडे बघतात. त्यांच्या चेहेर्‍यावर प्रसन्न हसू उमटतं.
‘काही हवंय ताता?’ अभी पुढे वाकत विचारते. हात आणि मान हलवत आजोबांचा तत्पर नकार येतो.
‘मी विचार करत होतो अभी... गेल्या पंच्च्याण्णव वर्षांत परमेश्‍वरानं ज्या कामासाठी मला पाठवलं होतं ते माझ्याकडून किती झालं?’ गुरुजी  एकटक अज्ञाताचा वेध घेत पुटपुटतात. आधी अभीच्या लक्षातच येत नाही ते काय म्हणताहेत ते. क्षणभरानं स्वतःला तपासणारा तो चेहरा पाहताना तिच्या मनात येतं, हे आजोबा आपल्या परिचयाचे आहेत.
आसनं शिकवताना कितीदा तरी, कितीदा तरी कशाला, कायम हेच करायला तर ते सांगतात,
‘बी वॉचफुल. जानुशीर्षासन करताय तर त्यात तुमचा दुमडलेला गुडघा कसा आहे, ताठ केलेला गुडघा कसा आहे, पो़ट कसं वळतंय, छाती कोसळतीय का, कुठे ओढ बसतेय आणि कुठे निष्क्रियता भरून राह्यलीय? यू हॅव टु ऑब्झर्व. नुसतं तेवढंच बघून थांबू नका. जानुशीर्षासनातली ती ऊर्जा, ती चेतना तुमच्या शरीरातून कशी वाहतेय याचंही निरीक्षण करा. त्या प्रवाहाला कुठे अवरोध होतो आहे, कुठे ती एनर्जी पुरेशा क्षमतेनं पोहोचतेय... जिथे ती पोहोचत नाहीये... टेक युवर माइंड देर. तो चैतन्याचा प्रवाह... इट शुड फ्लो लाईक अ रिव्हर. प्रकृतीच्या अभिव्यक्तीतून जन्माला आलेला जीवनाचा प्रवाह आणि शरीरांतर्गत वाहणारा विश्‍वचेतनेचा प्रवाह एकमेकांशी सुसंगतपणे प्रवाही असले पाहिजेत. योग इज टु युनाइट, टू योक, टु जॉईन... योग म्हणजे नात्यात असणे... अनुभव घ्या त्याचा. त्याच वेळी बी अलर्ट, व्हिजिलंट अँड वॉचफुल...’
योग शिकण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक शिष्याला आणि विद्यार्थ्याला, ‘सातत्यानं आणि खबरदारी घेत साधना करा’ हे बजावणार्‍या आपल्या आजोबांचा योगसाधनेचा धागा या टप्प्यावरही सुटलेला नाही हे जाणवून अभीला गहिवरून येतं. ती त्यांचा हात हातात घेते.
‘मी देवाला सांगितलंय, तुला माझ्याकडून आणखी काही काम करून घ्यायचंय तर ठेव मला इथे.’ आजोबा काय सांगू बघताहेत याचा तिला पूर्ण अंदाज आलाय. मृत्यूकडे संकेत करणारं पुढचं बोलणं ऐकायची ताकद तिच्याकडे नाही.
कशीबशी ती थोडा वेळ तिथे थांबते. नर्स आल्याचं निमित्त करून आय.सी.यू.च्या बाहेर पडते.
•••
वीस ऑगस्ट. पहाट. अजून फटफटायलासुद्धा वेळ आहे.
माझ्या बेडशेजारी ठेवलेल्या मोबाइलचा प्रकाश डोळ्यांवर येतो. झोप चाळवते. फोन उचलताना पहिला विचार मनात येतो; बहुतेक अभी. ती असली तर आपण काय ऐकणार आहोत याची कल्पना आहे. खरं सांगायचं तर गेल्या दीड-दोन दिवसांत तिचा आलेला प्रत्येक फोन त्या शंकेसकटच घेतला गेलाय.
‘सॅम के...’ अभीचाच फोन. पुढे शब्द नाही. केवळ हुंदका आवरल्याचा आवाज. काही क्षणांची शांतता आणि मग गदगदलेला स्वर.
‘सॅम के ताता...’ अभीला जसं यापलीकडे काहीही सांगायचं नाहीये.

डोळ्यांसमोर अभीचा चेहेरा येतो. जे घडलं त्याचा तिला किती त्रास होत असणार याची कल्पना करणं फार अवघड नाही. नुसत्या अभीलाच नाही, तर घरातल्या इतरही सगळ्यांना... विद्यार्थ्यांना, शिष्यांना, आप्तस्वकीयांना, साध्या माणसापासून ते राजघराण्यापर्यंत जोडलेल्या असंख्य सुहुदांना, गांभीर्यानं योगसाधना करणार्‍या देशविदेशातल्या योगसाधकांना...सगळ्यांनाच शोकात लोटून देणारी बातमी आहे ही.

‘निघतो.’ दीर्घ शांततेनंतर मी अभीला सांगतो तेंव्हा माझं आवरून झालेलं आहे. बाहेर पडताना बायकोचा प्रश्‍न कानावर येतो,
‘गुरुजी?’
‘हं...थोड्या वेळापूर्वी...’
•••

हे आठवताना नकळत कॉम्प्युटरच्या की-पॅडवरचे माझे हात बाजूला होतात. चेहरा ओंजळीत लपतो. डोळे ओलावतात.

जन्माला आलेल्या देहाबाबतचं एकमेव शाश्‍वत सत्य म्हणजे मृत्यू, हे कितीदा तरी बोललं जातं. पूर्णपणे आकलन झाल्यासारखं एकमेकांना सांगितलंही जातं. ‘मरण कल्पनेसी थांबे तर्क जाणत्याचा ’असं माडगूळकर म्हणतात त्याचा कधी ना कधी आपल्याला रोकडा प्रत्यय आलेला असतो.
तरीही माणूस जाणं, मृत्यू म्हणजे नक्की काय, या कोड्याचा आपल्याला पूर्णपणे उलगडा झालेला नाही.
मृत्यू हे चेतनेचं अस्तंगत होणे, अशी जरी आपण व्याख्या करत असलो तरी चेतनेचा आपल्याला कुठे प्रत्यक्ष अनुभव आहे? जिवंत असणे हा चेतनेचा अनुभव नाही तर तो चेतनेचा व्यक्त परिणाम.
ही चेतना, चैतन्य म्हणजे काय आहे? मृत्यूसोबत ते जातं म्हणजे कुठे जातं? मुळात ते येतं कुठून?
मृत्यू म्हणजे, हृदयक्रिया बंद पडली; यकृत, मूत्रपिंड, मेंदू वगैरे अवयवांची कामं थांबली, श्‍वसन होईना...अशी मृत्यूनं होणार्‍या परिणामांची आपण वर्णनं करतो. हे सगळे मृत्यूमुळे काय झालं याचे तपशील आहेत. मात्र, यांची फक्त गोळाबेरीज म्हणजे मृत्यू नाही.
ओंकाराप्रमाणे यात अजून अर्धी मात्रा अधिकची आहे. ती कशाची?

कठोपनिषदातल्या बाळ नचिकेतानं यमाला विचारलेल्या मृत्यूबाबतच्या सत्याचा प्रश्‍न म्हणजे मानवाला न उलगडलेल्या या कोड्याला भेदण्याचाच तर प्रयत्न असतो.
‘क्षणतत्क्रमयोः संयमाद्विवेकजं ज्ञानम् ॥पा.यो.सू.३-५३॥’
‘ज्याला आपण काळ म्हणून संबोधतो ती प्रत्यक्षात क्षणांची मालिका असते. एक क्षण, त्यापाठोपाठ दुसरा, असा तो क्षणांचा अप्रतिहत वाहणारा प्रवाह असतो. लागोपाठच्या दोन क्षणांच्या दरम्यान असलेल्या अवकाशावर आणि त्यातल्या संबंधांवर संयम करत क्षणांच्या या अनुक्रमाचं भान सातत्यपूर्ण रीतीने राखल्यास योगी स्थल, काल, अवकाशाच्या बंधनांतून आणि त्याच्या मर्यादांतून मुक्त होतो. याच संयमातून त्याला विवेकातून उपजणार्‍या, निर्माण होणार्‍या ज्ञानाची प्राप्ती होते.’
पातंजल योगसूत्रावरच्या स्वतःच्या भाष्यात हे लिहून जाणारा माणूस क्षणांदरम्यानच्या अवकाशातून वीस ऑगस्टला पुन्हा कधीही न परतण्यासाठी निघून गेला. एका विचित्र शून्यतेनं मी समोरच्या स्क्रीनकडे बघत थांबलो.
•••
खरं म्हणजे गुरुजींचा देहान्त ही अकाली झालेली गोष्ट नाही. या बातमीत अनपेक्षित काही नाही.
ज्या देहानं पंचाण्णव-शहाण्णव वर्ष अपार कष्ट उपसले त्या देहाला या मुक्कामावर काही ना काही होणार हे अपेक्षित आहे. काही होऊ नये अशी मनोमन इच्छा असते, पण काहीतरी होणार याची आतून निश्‍चित जाणीव असते. एकीकडे बुद्धीच्या पातळीवर हे सगळं कळलेलं असलं तरी हृदयातली भावना भिन्न भाषा बोलते.

प्रख्यात इंग्रजी लेखक पी. जी. वुडहाऊस यांची मुलगी त्याच्या आधी कालवश झाली. तिच्या दफनाच्या वेळी कॉफिनवर माती लोटताना वुडहाऊस पुटपुटला होता,
‘आय थॉट शी वॉज इम्मॉर्टल... माझी कल्पना होती की ही अमर आहे म्हणून.’
गुरुजींबाबतही हेच होतं.

तसं म्हटलं तर गुरुजींचा मृत्यू मी पहिल्यांदा नाही तर दुसर्‍यांदा अनुभवत होतो. पहिल्यांदा त्यांची तब्येत विशेष खालावली त्या दिवशी. मनात. नंतर प्रत्यक्ष. तरीही....
वैद्यकीय व्यवसाय करताना कुणाच्याही मृत्यूचा प्रसंग थोडा प्रयत्न केला तर दोनदा जगता येतो असं मला वाटतं.
एक, प्रसंग घडण्याआधी. होणारी घटना, उमटणार्‍या प्रतिक्रिया यांची काही अंशी तरी कल्पना करता येते. यातनं काय करायचं आहे आणि काय टाळायचं आहे हे ठरवून ठेवता येतं. यामुळे ऐन वेळची अनागोंदी थोडी तरी टळते.
आणि दुसरा अनुभव प्रत्यक्ष प्रसंगाचा. दुर्दैवानं बहुतेक वेळा कल्पनेत पाहिलं होतं त्यातलंच बरचसं प्रत्यक्षात घडतं. पडलाच तर थोडाफार तपशिलांचा फरक पडतो, पण गाभा फारसा बदलत नाही.
गुरुजींच्या देहातल्या बर्‍याचशा व्यवस्थांनी ज्या दिवशी एकत्र खालच्या दिशेनं सूर मारला तेंव्हाच त्यांच्या मृत्यूची कल्पना माझ्यासमोर तरळली होती. मात्र, तेंव्हा डॉक्टर आणि योगाचा विद्यार्थी या दोन भूमिकांदरम्यान माझी प्रचंड ओढाताण झाली होती. कधी तर्कावर भावना कुरघोडी करत होती तर कधी तर्क अपेक्षेला कोपर्‍यात ढकलून देत होता. मधूनच ‘कशाला आपण हा फुकट खटाटोप करतो आहोत’ असं वाटून तीव्र उदासीनता लपेटून घेत होती.

विनोबा गीताप्रवचनात सांगतात, ‘मन आणि बुद्धी यात बुद्धीनं निर्णय घ्यायला हवा आणि मनानं तो अमलात आणायला हवा. प्रत्यक्षात आपण मनानं निर्णय घेतो आणि बुद्धीला तो राबवणं भाग पाडतो.’
या उक्तीचं स्मरण करून मनाला वेगळं ठेवत, स्वतःशी वारंवार झगडा करत मी ते चित्र पूर्ण केलं होतं.

गुरुजींच्या मृत्यूमुळे आपण किती दुःखी होऊ याचं एक माप माझ्या मनात नक्की होतं. मात्र, अपेक्षा केली होती त्यापेक्षा किती तरी अधिक प्रमाणात वेदना झालेली आहे, असं जेंव्हा स्वतःकडे बघताना लक्षात आलं, तेंव्हा, ‘हे असं का’, एवढाच प्रश्‍न फेर धरत होता. काय घडू शकेल याच्या जवळपास सगळ्या शक्यता आधीच तपासून बघितल्या होत्या तरीही का हे असं? अहंकाराला डंख लागला होता.
आयुष्याला स्पर्श केलेल्या माणसाचं आपल्यातलं ‘असणं’ स्वतःलाही इतकं अपरिचित असावं? का ते इतकं परिचित आहे की त्याला गृहीत धरण्यापर्यंत आपली मजल गेलीय? त्याच्या असण्याची जागृत जाणीवही लयाला गेली आहे? ही शक्यता अधिक. कारण गुरुजींच्या नसण्यानं झालेलं दुःख, स्वतःचा एखादा अवयव गमावल्याइतकं आहे हे सत्य.
गुरुजींच्या मृत्यूनं आपलाही थोडा मृत्यू झालेला आहे याची झालेली जाणीव, बसलेला तो धक्का अपरंपार आहे. आपला अंदाज चुकलाय तो तिथे. आणि या सगळ्यासोबत वुडहाऊससारखं आपल्यालाही वाटतंय-
‘ही वॉज इम्मॉर्टल...’

ही माझी एकट्याचीच गोष्ट नाहीये तर जगभरातल्या लाखो योगाभ्यासींची ही आहे हे नक्की.
•••

मी इन्स्टिट्यूटमधे पोहोचलो. गुरुजींचा मृतदेह ते ज्या खोलीत बसायचे तिथेच ठेवलेला होता.
तो कसा दिसेल अशी कल्पना केली होती त्यापेक्षाही तो पवित्र आणि निर्मळ दिसत होता.

‘वर्तमानात जर तुम्ही स्वतःचा, स्वतःच्या भानाचा तोल राखू शकलात तर तुम्ही कालातीततेत अवस्थित झालात.’
गुरुजींचं हे वाक्य त्यांचं अंत्यदर्शन घेताना मला आठवत होतं.

प्रॅक्टिस हॉलमधे शवासन करताना बघितलेले गुरुजी, शवासनातले त्यांचे असंख्य फोटो, शवासनाकरता त्यांनी सुचवलेले किती तरी प्रॉप्स आणि प्रत्यक्ष समोर ठेवलेल्या त्यांच्या देहाची अंतिम भूशरणता यामधे असलेल्या सूक्ष्मशा फरकांचे  तपशील मनात घोटाळत होते. नव्वदाव्या वाढदिवसाच्या वेळी काढलेले शवासनाचे फोटो बघताना डिझायनर मित्र म्हणाला होता, ‘फार तर फार दोन सेकंद या शवासनाकडे सलग बघता येतं. इट्स हाँटिंग...’

क्षणभर मनात तरळून गेलं,
‘हे शव... हे शवासन नाही. शवासनातली स्वतःच स्वतःकडे बघण्याची साक्षीभावाची प्रक्रिया यात नाही. चेतनेची विश्रांतावस्था आणि चेतेनेचा अभाव यातला हा फरक आहे. देहाला जिवंतपण देणारं चैतन्य इथे कायमकरता अंतर्धान पावलेलं आहे. हे आहे शहाण्णव वर्षं जीर्ण झालेलं केवळ देहाचं वस्त्र. जगण्याच्या जिवंतपणातून तुटलेलं, त्या स्पर्शाला पारखं झालेलं.’

 बातमी अजून वार्‍यावर पसरायची होती.

घरातली आणि इतर थोडी अशी मर्यादितच माणसं होती. घरातल्या सगळ्यांना आपला रक्ताचा माणूस गेला आहे याचं दुःख तर साहजिकपणे होतंच. पण यापलीकडे समकालीन युगातल्या एका योगस्थ महापुरूषाच्या अंतिम प्रयाणाचे आपण साक्षीदार आहोत याचं भान त्या कुणाकडनंही कधी सुटलं नव्हतं. हॉस्पिटलमधे गेल्यापासून आपल्या वडिलांचे, आजोबांचे हे शेवटचे दिवस आहेत, अपरिहार्यपणे काही काळात त्यांना त्यांचा लौकिक देह मृत्यूच्या स्वाधीन करावा लागणार आहे हे यातल्या प्रत्येकाला आतून समजून आलेलं होतं. त्या घटनेला उणेपणा येईल असं काहीही आपल्याकडून होता कामा नये याची किती खबरदारी या लोकांनी घेतली याचा मी जवळून साक्षीदार होतो. हाक दिली असती तर जिथे अक्षरशः हजारो शिष्य आणि आप्तस्वकीयांनी स्वतःला स्वतःच्या सर्व क्षमतांसह सादर केलं असतं, तिथे ही सगळी मंडळी त्या दिवसांचं, गुरुजींचं खासगीपण जपत अपार साधेपणानं, संयतपणानं सगळं करत होती.

गुरुजींना ज्या हॉस्पिटलमधे ठेवलेलं होतं तिथे ते गेल्यानंतर दोन-तीन दिवसांनी कारणपरत्वे जाणं झालं. कुणाची तरी वाट बघत खुर्चीवर बसलो होतो तेंव्हा एक बोहरी बाई शेजारी येऊन टेकल्या. त्यांचा नातेवाईक बर्‍याच दिवसांपासून तिथेच अ‍ॅडमिट होता. त्यामुळे गुरुजी हॉस्पिटलमधे असण्याच्या काळात आमची चेहेर्‍यानं ओळख झाली होती.

‘तुमच्या पेशंटचं सॅड झालं नं?’ शोक प्रदर्शित करत त्या म्हणाल्या. मी मान डोलावली.
‘कोण होते? आजोबा?’ बाईंनी मायेनं विचारलं.
‘हं- आजोबाच. पण त्यापेक्षाही गुरुजी... योगाचे.’
‘ते परवा पण एक योगाचार्य गेले ना... पेपरला आलं होतं. टी.व्ही.ला पण खूप वेळा...’
‘तेच ते...’ मला लक्षात आलं, बाईंना कल्पना नाही.
‘म्हणजे?’ त्यांचा स्वर चकित होता.
‘तुमच्या पेशंटच्या पलीकडच्या खोलीत होते ते तेच. योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार...’
‘डोन्ट टेल मी... दॅट आजोबा... ही वॉज योगाचार्य? ही वॉज सच अ सिंपल मॅन... हिज फॅमिली ऑल्सो.... योगाचार्य वॉज सो फेमस... ही हॅज सो मेनी फॉलोअर्स नं?....’ पुढचे काही क्षण त्या बाईंच्या काही केल्या पचनीच पडेना की आपल्या शेजारच्या खोलीत असणारे योगाचार्य अय्यंगारच होते म्हणून.
‘अरे, अ‍ॅटलिस्ट आय शूड हॅव... दर्शन तरी घेतलं असतं एवढ्या मोठ्या माणसाचं.... सच अ सिंपल मॅन...’ बाई दुःखानं चुटपुटत राह्यल्या.

मृत्यूची जडशीळ सावली इन्स्टिट्यूटच्या सर्वांगाला खेटून पसरली होती. सारी माणसं शोकात बुडून अचल झाली होती.
पावसात वळचणीला आलेल्या पाखरांसारखी इथे-तिथे स्तब्ध बसून होती.

केंव्हा तरी अमेरिकेहून पुतणीचा व्हॉट्सॅप आला, ‘गुरुजी ?????? काय झालं?’ काय कळवणार तिला? मुंबईहून मित्राचा टेक्स्ट, ‘व्हेरी सॉरी, गुरुजींची बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून फ्लॅश होतीय. मोठा माणूस गेला रे!’

आता पूर्ण उजाडलं होतं. माणसांची रीघ लागायला सुरूवात झाली होती.
•••

कॉम्प्युटरवर मी आधी लिहिलेल्या ‘जिवंत, प्रवाही आणि स्पंदनशील’ या शब्दांखाली शाळकरी मुलासारखा एक प्रश्‍न लिहितो. ‘गुरुजी जायला नको होते असं राहून राहून आपल्या मनात येतंय, कारण...?’

या उत्तरातनं हाती काही लागेल असं वाटून मी लिहियला सुरूवात करतो,
‘गुरुजी जायला नको होते असं मनात येतं, कारण जीवनरसानं परिपूर्ण आणि सळसळत्या ऊर्जेनं जगणार्‍या माणसांची संख्या सध्याच्या जगात हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकीच आहे. अशा माणसांच्या जाण्याचा संबंध वयाशी नसतो, तर केवळ त्यांच्या असण्याने, दिसत राहण्याने दिलासा लाभतो, जगण्यावरची श्रद्धा अभंग टिकते म्हणून ते असावेत असं वाटत राहतं. पण खरं तर हे म्हणणारा आपला स्वार्थच.’
‘स्व’च्या आणि केवळ ‘स्व’च्याच अवकाशात जगणारा, स्वतःतच मश्गुल आणि मग्न असलेला समाज अशी आज आपण ओळख तयार करतो आहोत. आणि ही ओळख हे आपल्याला मोठेपणाचंही द्योतक वाटतंय. मी, माझं, मला... यापल्याड सामान्य जगण्याचा परीघ विस्तारत नाही. आपल्या जगण्याचा कुणाच्या आयुष्याला स्पर्श होणार नाही आणि इतर कुणाच्या आयुष्याचा प्रवाह आपल्या जगण्यात मिसळणार नाही याची खबरदारी घेत, भिंती घालून आज आपण जगतो आहोत. आपल्याव्यतिरिक्त कुणालाही सामावून घ्यावं लागू नाही अशा बेतानं सगळं जगणं आखतो आहोत.
अशा वेळी स्वतःपरे जात लाखोजणांच्या आयुष्याला स्पर्श करणारा, इतरांना आपल्या आयुष्यात सामावून घेत, त्यांच्या भल्याकरता जिवाचं रान करणारा गुरुजींसारखा दुर्मिळ माणूस जातो तेंव्हा लक्षात येतं की या माणसाची मुळं आपल्यातही किती खोलवर पसरलेली होती. त्याच्या जाण्यानं किती विस्तीर्ण परिघातल्या माणसांना धक्का बसलाय!
मग आपल्यातल्या प्रत्येकाला स्वतःतलं काही तरी गमावल्याचं दुःख होतं. त्या माणसाशिवाय जगत राहण्याची कल्पना दुःसह्य वाटते.’

मी हे पुनः पुन्हा वाचतो. हे आपल्याला कागदावर आणायलाच हवं असं होतं.
शीर्षक लिहिण्यासाठी हात उचलून मी की-पॅड दाबायला सुरुवात करतो. स्क्रीनवर उमटतं- ‘गुरुजी’. पुन्हा बराच वेळ त्याकडे बघत मी बसून राहतो. वाटतं, हे प्रचलित असलं तरी फार वैयक्तिक संबोधन होईल. अधिक खोलवरचं काही हवं. मी तो शब्द खोडून टाकतो आणि दुसरा लिहितो... योगस्थ.

मनात येतं, हे गुरुजींचं आपल्या मनातलं चित्र. एकाच वेळी प्रवाही तरी स्वतःच्या भानात स्थिर असलेल्या, विलक्षण उंचीवर पोहोचूनही साध्याच राहिलेल्या माणसाचं हे वर्णन.
आता पुढचं लिहिणं त्यामानानं सोपं आहे.
- डॉ. समीर कुलकर्णी

• • • • •  • अनुभव मासिक छापील अंक वार्षिक वर्गणी - ₹६५० • अनुभव मासिक PDF अंक वार्षिक वर्गणी - ₹३००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८