स्वत:पलीकडे - वृषाली जोगळेकर

मी-माझं कुटुंब-माझे नातेवाईक या मर्यादित परिघाचं वर्तुळ ओलांडून दुसर्‍यांसाठी 

धडपडण्यात आनंद मानणार्‍या सामान्यांमधल्या कर्तबगारांची ओळख


सुजाता रायकर  

थॅलेसेमिया हा आजार झालेल्या व्यक्तीला आयुष्यभर दर ठराविक दिवसांनी रक्त घ्यावं लागतं. त्यासाठी दवाखान्यात अ‍ॅडमिट व्हावं लागतं. त्याशिवाय दररोजची काही औषधं असतात, नियमितपणे तपासण्या करून घ्याव्या लागतात. या सगळ्याचा खर्च काही हजारांमध्ये असतो. एका बाजूला हे आर्थिक ताण असतात, तर दुसरीकडे थॅलेसेमिया या आजाराबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे समाजाकडून होणारी उपेक्षा असते. या आजाराचा पेशंट घरी असेल तर चहुबाजूंनी अशी कोंडीत पकडल्यासारखी अवस्था होते. अशा वेळी कोणाचा दिलासा देणारा मदतीचा हात सोबतीला मिळाला तर परिस्थितीशी सामना करायला बळ मिळतं. मुंबईतल्या सुजाता रायकर गेली अनेक वर्षं एक-दोन नव्हे तर तब्बल १२० थॅलेसेमियाग्रस्त मुलांना आणि त्यांच्या पालकांना दिलासा देणारा मदतीचा भरभक्कम हात पुढे करत आहेत. भरभक्कम हात अशासाठी म्हटलं, की या मुलांच्या उपचारांची आयुष्याभरासाठी जबाबदारी सुजाताताईंनी घेतलेली आहे. याची सुरुवात कधी आणि कशी झाली हे बघायला थोडं मागे जायला हवं.

अत्यंत संवेदनाशील स्वभावाच्या सुजाताताई ‘मेक अ विश फाउंडेशन’ या संस्थेसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बालरुग्ण विभागात पाचेक वर्षं जात होत्या. तिथल्या कॅन्सर रुग्ण मुलांशी गप्पा मारणं, त्यांना गोष्टी सांगणं आणि त्यांचे खाऊ-खेळण्यांचे हट्ट पुरवणं असा त्यांचा त्या काळात कार्यक्रम असे. त्यामुळे काही काळासाठी तरी का होईना, मुलं आपल्या वेदना विसरत. त्या काळात मुलांकडून उपचारांनाही उत्तम प्रतिसाद मिळे. डॉक्टरही त्यामुळे खूष असायचे; पण मुलांचे पालक काही तितके खूष नसायचे. सुजाताताई त्यांच्याशी बोलायच्या. कोणी म्हणायचं, “ताई, या खाऊच्याऐवजी पोळीभाजी द्या नं.” कोणी म्हणायचं, “खेळण्यांऐवजी एक महिन्याची औषधं आणून द्या.” त्यांच्या या मागण्या रास्तच असायच्या. एकीकडे मुलांच्या चेहर्‍यावरचा आनंद, तर दुसरीकडे पालकांच्या जगण्याच्या लढाईच्या गरजा यामध्ये सुजाताताई अस्वस्थ व्हायला लागल्या. आपण करतोय ते योग्य की अयोग्य हेच त्यांना कळेनासं झालं आणि त्यांनी त्या कामातून बाहेर पडायचं ठरवलं.

नंतर त्या वेळ घालवण्यासाठी यजमानांच्या ऑफिसमध्ये जायला लागल्या; पण आपल्याला वेगळं काही करायचंय हे त्यांच्या मनाने घेतलं होतं. अशातच त्यांच्या एका मैत्रिणीने मुंबईतल्या नानासाहेब पालकर संस्थेत एका महिलेला मदतीची गरज आहे आणि त्यासाठी तू जाशील का असं विचारलं. सुजाताताई गेल्या. तिथे एक बाई आपल्या लहान मुलीला जवळ घेऊन अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत बसलेली होती. सुजाताताई तिच्या जवळ गेल्या, त्यांनी तिचा हात हातात घेतला आणि काय झालंय विचारलं. त्या बाईने मुलीला थॅलेसेमिया असल्याचं सांगितलं. तिच्या उपचारांसाठी ती गावाकडून मुंबईत आलेली होती. तिच्या नवर्‍याला आणि घरातल्या लोकांना उपचारांसाठी खर्च करावा असं वाटत नव्हतं. हे ऐकून सुजाताताई अस्वस्थ झाल्या; पण स्वत:ला सावरत त्यांनी त्या बाईला धीर दिला. तिला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि तिथलं दृश्य बघून त्या हतबुद्ध झाल्या. तिथे थॅलेसेमियाग्रस्त अनेक लहान मुलं होती. कोणी रक्त चढवून घेत होती, तर कोणी कसली कसली इंजेक्शन्स घेत होती. सगळी गरीब कुटुंबांतली होती. हे दृश्य बघितलं आणि सुजाताताईंनी मनोमन निर्णय केला, यापुढे याच मुलांसाठी काम करायचं.

आतापर्यंत या आजाराची फारशी माहिती सुजाताताईंनाही नव्हती. ती त्यांनी मिळवली. त्या दरम्यान त्यांच्या 

लक्षात आलं की या आजाराबद्दल समाजात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. या आजाराविषयी बरेच गैरसमज आहेत. ते दूर केले पाहिजेत. थॅलेसेमियाबद्दल जनजागृती आणि ज्यांना थॅलेसेमियाच्या उपचारांचा खर्च परवडत नाही अशा मुलांना, पालकांना आर्थिक आणि इतरही मदत करणं, अशी त्यांच्या कामाची दिशा आता नक्की झाली. एकेक करत थॅलेसेमियाग्रस्त १२० मुलं त्यांच्याशी जोडली गेली. त्यांच्या उपचारांचा सगळा खर्च सुजाताताई करतात. या कामासाठी त्यांचं सारं कुटुंब, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सुरुवातीपासून त्यांच्या पाठीशी उभे आहेत.

सुजाताताईंकडे येणार्‍या मुलांची संख्या जशी वाढायला लागली तशी त्यांनी ‘साथ ट्रस्ट’ची स्थापना केली. या ट्रस्टचं सगळं काम सुजाताताई एकहाती सांभाळतात. मुलांना आर्थिक मदत करण्याबरोबरच त्या मुलांच्या आईवडिलांशी, कुटुंबीयांशी संवाद साधतात; त्यांच्या अडचणी, प्रश्न समजून घेतात. थॅलेसेमिया या आजाराचे दोन प्रकार असतात- मायनर आणि मेजर. थॅलेसेमिया मायनरची लक्षणं नसतात. त्यामुळे बर्‍याचदा तो लक्षातही येत नाही. पण थॅलेसेमिया मायनर असलेल्या मुलामुलींचं लग्न झालं तर मात्र त्यांना होणार्‍या अपत्याला थॅलेसेमिया मेजर होण्याच्या शक्यता बरीच जास्त म्हणजे २५ टक्के असते. त्यामुळे लग्न ठरवताना थॅलेसेमिया मायनर आहे का नाही याची चाचणी करून घेणं आवश्यक आहे, असं सुजाताताई कळकळीने सांगतात.

थॅलेसेमिया मेजर हा एक आनुवंशिक रक्तदोष आहे. त्यामध्ये रक्तात नैसर्गिकपणे हिमोग्लोबिन तयार होत नाही. त्यामुळे रुग्ण हळूहळू थकत जातो. वारंवार बाहेरून रक्त देऊन हिमोग्लोबिनची पातळी सांभाळत राहणं गरजेचं असतं. सतत बाहेरून रक्त घेतल्यामुळे शरीरात अनावश्यक असे लोहाचे साठे तयार होतात. ते तब्येतीसाठी हानिकारक असतात. पोटात सुई खुपसून पंपाच्या साहाय्याने ते लोह काढावं लागतं. याशिवाय बाहेरून घेतलेल्या रक्तातून इतर रोगांचे संसर्ग होण्याच्या शक्यता असतातच. त्यासाठी प्रतिबंधात्मक औषधं घ्यावी लागतात. ही सगळी प्रक्रिया वेदनादायी तर आहेच, पण त्यासाठी वेळ, पैसा आणि माणसाची उमेद मोठ्या प्रमाणात खर्ची पडते. त्यातच हा आजार संसर्गजन्य आहे असा एक मोठा गैरसमज असतो. त्यामुळे घरातले लोक घाबरून जातात. शेजारीपाजारी, मित्रमैत्रिणी रुग्णापासून दूर राहायला लागतात. डॉक्टरांकडच्या सततच्या खेपांमुळे या मुलांच्या आईवडिलांचे कामावर खाडे होऊ लागतात आणि परिणामी नोकरी गमावण्याची वेळही येते.

हे विदारक चित्र सुजाताताई अनेकदा अनुभवतात. उपचारांसाठी आर्थिक मदत पुरवली तरीही दुर्दैवाने काही मुलांचा मृत्यू होतो. ते दु:ख पचवणं त्या कुटुंबाइतकंच सुजाताताईंनाही जड जातं. पण त्यातूनच आपल्या कामाची गरज किती आहे हे त्यांना आणखी प्रकर्षाने जाणवतं. त्यांनी साथ ट्रस्ट सुरू केला त्या वेळी अठरा वर्षांखालील मुलांसाठीच काम करायचं असं ठरवलं होतं. पण एकदा एका विशीतल्या थॅलेसेमियाग्रस्त मुलीचा त्यांना फोन आला. तिची अडचण ओळखून त्यांनी नियम मोडला आणि तिला मदत केली. अशा स्वरूपाचे अनुभव त्यांना अनेक वेळा येतात. साथ ट्रस्टचं सारंच काम नियमांच्या चौकटीत बसवण्यापेक्षा अधिकाधिक पेशंटफ्रेंडली कसं होईल याकडे सुजाताताई लक्ष देतात.

थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी सुजाताताईंचं घर आणि ट्रस्ट सदैव खुला असतो. दररोज सकाळी त्यांच्या घरीच पेशंट आणि त्यांची कुटुंबं यायला सुरुवात होते. त्यांच्या करुण कहाण्या ऐकत सुजाताताईंचा दिवस सुरू होतो. त्या त्या पेशंटला कुठली मदत हवी आहे हे समजलं की दिवसभर ती मदत मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड सुरू राहते. एखादं व्रत घेतल्यासारखं सुजाताताईंनी या कामाला वाहून घेतलेलं आहे. त्यांच्या या प्रवासाकडे बघताना मुकेश यांच्या ‘किसी का दर्द मिल सके तो ले उधार...’ या गाण्याची ओळ आठवल्याशिवाय राहत नाही.

 

सुजाता रायकर

९९२०७७९८७७ 


 ......................

दीपा परब

महिलांचं सक्षमीकरण म्हणजे बऱ्याचदा त्यांना शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभं करणं, इतकाच मर्यादित अर्थ घेतला जातो. ते तर आवश्यक आहेच; पण त्याच्याच बरोबरीने महिलांचं आरोग्य, त्यांना सर्व क्षेत्रांतील नोकरी-उद्योगात समान संधी, कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये समान अधिकार अशा अनेक गोष्टी येतात. याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजे संरक्षण. स्वत:चं, कुटुंबाचं आणि समाजाचं संरक्षण करण्यासाठी स्त्रीने समर्थ होणं. दीपा परब यांनी या गोष्टीचं महत्त्व नेमकेपणाने ओळखलं आणि पुण्यात महिलांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली, अगदी मोफत. आतापर्यंत जवळपास ६०० महिलांची टीम त्यांनी प्रशिक्षित केली आहे आणिरणरागिणी ग्रुप ऑफ बाउन्सर्सया नावाने या सगळ्याजणी अनेक महिलांचंच नव्हे तर पुरुषांचंही संरक्षण करत आहेतदीपाताई एक स्त्री म्हणून स्वत:च्या आयुष्यात अनेक बिकट प्रसंगांना सामोऱ्या गेल्या आहेत. परिस्थितीपुढे हार न मानता उलट आपण जे भोगलं ते इतर महिलांच्या वाट्याला येऊ नये हीच त्यांची या कामामागे असलेली खरी तळमळ आहे.   

खेळाडू असलेल्या दीपाताईंना लहानपणापासून पोलिस क्षेत्राबद्दल विशेष आकर्षण आणि मनात आदराची भावना होती. आपण पोलिस खात्यातच भरती व्हायचं असं त्यांनी ठरवलंही होतं आणि त्या दृष्टीने थोडंफार प्रशिक्षणही घेतलेलं होतं. पण मुलींनी पोलिस खात्यात काम करावं यासाठी त्या काळात कुटुंबीयांकडून प्रोत्साहन मिळणं तसं कठीणच होतं. दीपाताईंनाही ते मिळालं नाही आणि त्यांना तो नाद सोडून द्यावा लागला. मनात मात्र आपल्याला कधी तरी हे काम करायला मिळावं अशी सुप्त इच्छा कायम राहिली. त्या वेळी त्यांच्या कुटुंबात वडापाव आणि स्नॅक्सचा व्यवसाय होता. दीपाताईही त्यात मदत करत असत. गणपती उत्सवाच्या काळात रात्री उशिरापर्यंतसुद्धा हा स्टॉल चालू असे. ऱ्याचदा दीपाताई एकट्याच तो सांभाळत असत. अशा वेळी पोलिसांची चालू असलेली गस्त सुरक्षा देत असे. पोलिसांच्या जिवावर माणसं किती निर्धास्त वावरू शकतात हे त्या वेळी त्यांना जास्त जवळून बघता आलं.

दरम्यानच्या काळात त्यांनी ब्यूटी पार्लरचं प्रशिक्षण घेतलं. मुंबईत सिने कलाकारांच्या मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांनी कामही सुरू केलं. सिनेसृष्टीशी संबंध आला त्या वेळी सिने कलाकारांसोबत असणारे बाउन्सर्स त्यांना प्रत्यक्षात बघायला मिळाले आणि या क्षेत्राशी त्यांची ओळख झाली. त्या बाउन्सर्सशी बोलून त्यांनी या कामाची माहिती मिळवली आणि पोलिस होण्याचं स्वप्न आपण या कामातून काही प्रमाणात का होईना, पूर्ण करू शकतो याबद्दल त्यांची खात्री झाली. त्यांनी मुंबईत बाउन्सरचं काम सुरू केलं. महिला बाउन्सरला फारसं आव्हानात्मक काम दिलं जात नाही हे त्या वेळी त्यांच्या लक्षात आलं. आपणच महिला बाउन्सर्सची टीम तयार करावी आणि केवळ महिलांनाच नव्हे तर सगळ्याच समाजाला सुरक्षा पुरवावी असं त्यांनी ठरवलं.

दरम्यान त्या पुण्याला परतल्या होत्या. मुळात खेळाडू असल्याने त्यांनी महिलांना क्रिकेट आणि इतर खेळ शिकवणारी संस्था सुरू केली होती. त्यामुळे बाउन्सर्सना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्याकडे जागा होती; पण खरी अडचण वेगळीच होती. बाउन्सर म्हणून काम करायला आणि त्यासाठी प्रशिक्षण घ्यायला महिला तयार होत नव्हत्या. कशाबशा मुष्किलीने चार महिला तयार झाल्या आणि दीपाताईंनी त्यांना शिकवायला सुरुवात केली.

बाउन्सर म्हणून काम करताना उत्तम अर्थार्जन होतं हे समजल्यावर मग हळूहळू अनेक महिला दीपाताईंकडे

चौकशी करायला लागल्या. या कामाचं महत्त्व किती आहे हे दीपाताईंना पुरेपूर उमगलेलं असल्यामुळे त्यांनी या प्रशिक्षणाचे पैसे घ्यायचे नाहीत असं ठरवलं. समाजातील प्रतिष्ठित, उच्चभू्र लोकांच्या मोठमोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थितांच्या सुरक्षेसाठी बाउन्सर्सची टीम बोलावली जाते. पुरुष बाउन्सर्सच्या बरोबरीने अलीकडे महिला बाउन्सर्सनादेखील बोलावलं जातं. तसंच सार्वजनिक कार्यक्रमांमध्येदेखील सुरक्षेसाठी पोलिस असले तरीसुद्धा बाउन्सर्सनाही बोलावलं जातं. पोलिसांनाही त्यामुळे मदत होते. त्यामुळे या कामाला मागणी सतत वाढत आहे. दीपाताईंच्या टीममधील महिलांना त्याचे चांगल्यापैकी पैसे मिळतात. अशा कामांमधून मिळालेल्या पैशांपैकी प्रत्येकीकडून फक्त शंभर रुपये दीपाताई घेतात. मात्र, त्याचा विनियोग गरजू महिलेसाठीच केला जातो.

सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, जत्रा, यात्रा, लग्नसमारंभ, राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा-भाषणं, पुरस्कार सोहळे अशा अनेक ठिकाणी पुरुष बाउन्सर्सच्या बरोबरीने महिला बाउन्सर्स आता काम करतात. महिला बाउन्सर म्हणून काम करण्यासाठी नियमितपणे काही व्यायाम करणं आवश्यक असतं; अंगात चपळपणा, लवचिकता आणि ताकद असणं आवश्यक असतं. नजर चौफेर आणि तीक्ष्ण लागते. २५ ते ४५ वयोगटातल्या आणि विवाहित महिलांनाच दीपाताई प्रशिक्षण देतात. प्रत्येक कार्यक्रमाअगोदर दीपाताई मुलींचा एक वर्ग घेतात. त्या कार्यक्रमात कोणी, कुठली जबाबदारी घ्यायची, एकमेकींच्या संपर्कात कसं राहायचं अशा गोष्टी सांगतात आणि शिकवतात. सुरक्षेशी संबंधित नियमांची माहिती देतात. बाउन्सर्सचं काम करताना व्यक्तीला शारीरिक इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. काही वेळा महिला बाउन्सर्सशी लोक असभ्यपणे वागण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी स्वत:ची सुरक्षा करणं हेही गरजेचं ठरतं. दीपाताई प्रशिक्षणाच्या दरम्यान तेही शिकवतात

खर्या अर्थाने महिलांना सक्षम करणारी महिला बाउन्सर्सची टीम उभी करण्याबरोबरच दीपाताई कौटुंबिक वादविवाद सामोपचाराने मिटवण्यासाठी मदत करतात. दोन मुलींच्या शिक्षणाचा खर्च दीपाताईंनी उचललेला आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार १२० महिला मनोरुग्णांना दीपाताईंनी आतापर्यंत निरनिराळ्या सामाजिक संस्थांमध्ये दाखल केलेलं आहे. अशा अनेक इतर कामांमधूनही दीपाताई समाजासाठी काम करत आहेत.

दीपा परब

९६२३०१८४३५

 ......................

 सुरेंद्र दुगड 

अलीकडच्या काळात निसर्गापासून आपण सारेच दूर जात आहोत. मोकळ्या वातावरणात, डोंगरदर्यांत, रानावनात स्वच्छंदपणे भटकणं आपण विसरलो आहोत. त्यामुळेच रक्तदाब, मधुमेह आणि इतर आजार यांचं प्रमाण बरंच वाढलेलं दिसतं. शिवाय मानसिक ताणतणावही वाढलेले आहेत. हे सारे आजार संपूर्णपणे टाळणं कदाचित बदलत्या जीवनशैलीमुळे शक्य नसलं तरी ते नियंत्रणात ठेवणं नक्कीच शक्य आहे. त्यासाठी नियमितपणे जवळपासच्या डोंगरदर्यांमध्ये, रानावनांमध्ये भटकंती करायला हवी हे सुरेंद्र दुगड आणि त्यांच्या काही मित्रांना स्वानुभवातून पुरतं उमगलं. भटकंतीचं महत्त्व आणि फायदे आपल्याप्रमाणेच इतर लोकांनाही कळावेत आणि मिळावेत यासाठी त्यांनी पुण्यातून दर रविवारी निघणारे एक आणि दोन दिवसांचे ट्रेक सुरू केले. आज दोन हजारांच्या आसपास मंडळी त्याचा आनंद घेत आहेत. (अर्थातच ही गोष्ट लॉकडाऊन पूर्वीची!)

तसं म्हटलं तर वीकेंडला जवळपास छोट्या कौटुंबिक सहली करणारे बरेचजण असतात. त्यासाठी ॲग्रो टूरिझम, समुद्रकिनारे अशी ठिकाणं निवडली जातात. मात्र, त्यातून शरीराला फारसा व्यायाम मिळत नाही. हे लक्षात घेऊन सुरेंद्र आणि त्यांच्या टीमने ट्रेकची स्थळं ठरवायला सुरुवात केली. लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ट्रेक हा मुख्य हेतू असल्यानेना नफा, ना तोटाया तत्त्वावर प्रत्येक ट्रेकचा खर्च सर्वांनी समान विभागून घ्यायचा, हा नियम पहिल्यापासून नक्की केला. शिवाय ट्रेकसाठी सुट्टीचा रविवार निश्चित केला. त्यामुळे आपापली नोकरी-व्यवसाय सांभाळून प्रत्येकाला हे शक्य होतं.

साधारण वीसेक वर्षांपूर्वी सुरेंद्र दुगड नियमितपणे पर्वतीवर फिरायला जात असत. त्यांची तिथे येणार्या काही मंडळींशी ओळख झाली. त्यातले काहीजण नियमितपणे सिंहगडावरही जात असत. त्यांच्याबरोबर जाऊन बघावं असं म्हणत सुरेंद्रही त्यांच्याबरोबर गेले; पण तोवर ट्रेकिंगचा अनुभव अजिबातच नसल्याने त्यांना त्याचा बराच त्रास झाला. पाय तर दुखलेच; पण उलट्या, चक्कर येणं असेही त्रास झाले. या त्रासामुळे एखाद्याने हा ट्रेकिंगचा नाद कायमचा सोडून दिला असता. पण सुरेंद्र यांनी विचार केला, ज्याअर्थी इतर मंडळींना जमतंय त्याअर्थी मलाही जमेल. सराव करायला हवा. चार दिवसांनी ते पुन्हा गेले. या वेळी फारसा त्रास झाला नाही, उलट परत आल्यावर अधिक उत्साही वाटायला लागलं. दोन-चार वेळा असं जाऊन आल्यावर ट्रेकिंगमध्ये काही तरी वेगळी गंमत आहे हे लक्षात आलं. ट्रेकिंग किंवा कोणताही व्यायाम करताना त्यात सातत्य राखलं तर शरीरात एन्डॉर्फिन्स नावाचे स्त्राव तयार होतात. त्यामुळे मेंदू ताजातवाना होतो आणि मनात एक सकारात्मक भावना तयार होते.

मग फक्त सिंहगडच नव्हे, तर इतरही गडकिल्ल्यांवर फेरफटका सुरू झाला. अर्थात सुरुवातीला त्यातही अनेक अडचणी आल्या. स्वेटरमध्ये रानातले काटे शिरायचे. स्वेटर काढला तरी त्याची अडचण व्हायची. बरोबर नेमकं काय घ्यायला हवं आणि काय नको ते लक्षात यायचं नाही. पण अनुभवातून एकेका अडचणीवर मार्ग मिळत गेले आणि वेगवेगळे ट्रेक सुरू झाले. गेली वीस वर्षं दर रविवारी अव्याहतपणे हे ट्रेक सुरू आहेत

कात्रज ते सिंहगड, राजगड, तोरणा, पुरंदर असे गड झाले. मग फक्त गडकिल्लेच का, इतरही वेगळ्या वाटा शोधू, असा विचार सुरू झाला. नर्मदा नदीच्या परिक्रमेबद्दल ऐकलेलं होतं. भारतातल्या इतर नद्यांच्या परिक्रमा, पानशेत धरणाची परिक्रमा अशी वेगवेगळ्या दिशांची भटकंती सुरू झाली. भीमाशंकरचं जंगल, हरिश्चंद्रगडाभोवतीचं जंगल, कळसूबाई परिसरातलं जंगल अशी ठिकाणं पालथी घातली गेली. या सगळ्या भटकंतीत अनेक नवीन वाटा, दर्या सापडत गेल्या. दरम्यान एकमेकांच्या ओळखीने ग्रुप वाढायला लागला. मग सुरेंद्र यांनी सुधाकर कुलकर्णी आणि विजय बुटाला या दोन साथीदारांच्या समवेत सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन या नावाने त्याचं रीतसर नामकरण केलं. त्याबरोबरच सगळ्यांच्या सोयीसाठी काही नियम आणि संकल्पना नक्की केल्या. आता २००० सभासद याच्याशी जोडले गेले आहेत. स्वत:साठी फायदा मिळवणं हा हेतू नसल्याने या ट्रेक्सची कधीही जाहिरात केली जात नाही. व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे मेसेज पाठवले जातात.

प्रत्येक ट्रेक साधारण सात-साडेसात तासांचा असतो. दर रविवारी पहाटे बरोब्बर चार वाजता ट्रेक सुरू होतो. एका विशिष्ट जागी जमून सगळे निघतात. कोणाहीसाठी बस थांबत नाही, चार वाजता निघते. बसमध्ये बरोबर शिधा घेतलेला असतो. सराईत ट्रेकर्स ट्रेक सुरू झाला की झपाझप पुढे जाऊन स्वयंपाक सुरू करतात. शिवाय पुढे जाणारी मंडळी मागून येणार्या लोकांसाठी वाटेतल्या झाडांवर खडूने अथवा रंगीत रिबिनींच्या साहाय्याने मार्किंग करत जातात. एका ट्रेकमध्ये ४० ते २५० लोक समाविष्ट असतात. पूर्ण वर्षात ३५००-४००० लोक सह्याद्रीबरोबर ट्रेकिंग करतात. कुठल्याही ऋतूमुळे, हवामानातील बदलांमुळे, वैयक्तिक अथवा सामाजिक कारणांमुळे ट्रेकमध्ये खंड पडत नाही. पूर्ण वर्षात प्रत्येक ट्रेक वेगळ्या वाटेचा असतो. एका वर्षात तोच ट्रेक परत केला जात नाही.

सह्याद्री ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी पूर्वअट एकच : चालण्याचा, चढण्याचा थोडाफार सराव असणं गरजेचं आहे. किमान तीन-चार वेळा सिंहगड तरी चढलेला असावा अशी अपेक्षा असते. याचा हेतू एकच आहे. सराव नसताना कोणी ट्रेकिंगला आला आणि त्याला त्रास झाला तर दुर्गम भागात त्याला उपचार मिळणं कठीण असतं. ८ ते ८० वर्षं वयोगटातलं कुणीही सह्याद्रीबरोबर ट्रेक करू शकतं. या ग्रुपमध्ये काही डॉक्टर्स आहेत, तर काही सीए, काही सरकारी अधिकारी आहेत, तर काही शिक्षक. पण इथे सगळ्यांना समान वागणूक मिळते. ट्रेकमधलं कामही सगळेजण वाटून घेतात. कोणी बसचं व्यवस्थापन बघतं तर कोणी खाण्यापिण्याची व्यवस्था बघतं. ट्रेकमधली अनुभवी मंडळी त्या त्या ठिकाणाची माहिती देतात. तिथल्या निसर्गाचं वैशिष्ट्य, झाडंझुडपं, वेली, फुलं, पक्षी यांची विविधता अनुभवताना या माहितीचा उपयोग होतो. विद्यार्थ्यांमध्ये ट्रेकिंगची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना सवलती दिल्या जातात. पौर्णिमेच्या रात्री एखाद्या छोट्या गडावर तंबूमध्ये कुटुंबासमवेत निवास अशीही एक संकल्पना सह्याद्री ग्रुपतर्फे राबवली जाते, तर अमावास्येच्या रात्री आकाशदर्शनाचाही कार्यक्रम आखला जातो.

नियमितपणे ट्रेकिंग करणार्या व्यक्तींमध्ये अनेक सकारात्मक बदल होतात. त्यामुळेच आठवड्यातले बाकीचे दिवस कितीही धकाधकीचे असले तरी सर्व सभासद रविवारच्या ट्रेकची वाट बघत असतात. अत्यंत माफक दरात, शिस्तबद्ध पद्धतीने सुरेंद्र दुगड आणि आणि त्यांचे सहकारी हजारो ट्रेकर्सचा रविवार समृद्ध, संपन्न करतात.

सुरेंद्र दुगड

९०४९९२५२२२

.........................

 वृषाली जोगळेकर

 9881719852  

vrushali.jogalekar@uniquefeatures.in

 

 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८