कोरोनासोबत जगताना - मुकेश माचकर
१.
“हॅलो, गीताताई बोलताय ना?”
“हो ताई, मीच बोलतेय, कशा आहात तुम्ही? साहेब
कामावर जायला लागले का? बेबी कशी आहे?”
“आम्ही सगळे मजेत आहोत. सुरक्षित आहोत. तुमच्याकडे काय परिस्थिती?”
“आमच्याकडे काही विचारू नका ताई. निम्मं कामगार नगर खाली झालंय. लोक घाबरून
गावाला निघून गेलेत. आम्हीच थोडे शिल्लक आहोत. त्यात या कोरोनाला ऊत आलाय आमच्या मागच्या
गल्लीत सापडला होता एक पेशंट. सगळीकडे पत्रे मारून बंद केलं होतं पोलिसांनी. कंटेनमेंट
का काय म्हणतात ना, ते. दोन दिवसांपासून खोललेत पत्रे.”
“बरं मी काय म्हणते गीताताई, कामावर येण्याचं कसं काय कराल?”
“आम्ही काय रिकामेच बसलोय ना हो ताई. आमचे हे, मुलं, सगळेच
घरात. फार तारांबळ झाली. दोन महिने काम नाही, पगार नाही. कसंतरी
करून ढकलतोय दिवस. काम सुरू करायचंच आहे. सोसायटीवाल्यांनी परमिशन दिली का पण?”
“हो, आम्ही सगळ्यांनी भांडून मिळवलीये परमिशन. आम्हा दोघांचं वर्क फ्रॉम होम
सुरू आहे, बेबीची शाळा ऑनलाइन सुरू आहे. ते सांभाळून कशी करायची हो बाकीची कामं.
मी काय म्हणते, आता पुढच्या सोमवारपासून तुम्ही यायला सुरुवात करा. पण, सेफ्टी
म्हणून एक करा. तुमची टेस्ट करून घ्या. तुमचा एरिया कसा दाट वस्तीचा पडतो ना,
अस्वच्छता
असते खूप, शिवाय तुमच्याकडे पेशंटही खूप सापडत होते ना गेले बरेच दिवस. सोसायटी
म्हणते कामावर येणार्यांना टेस्ट करून सर्टिफिकेट आणायला सांगा. कराल ना तेवढं. सगळ्यांच्या
सेफ्टीसाठी आवश्यक आहे ते.”
“ताई, बरोबरच आहे सोसायटीचं. आम्ही इथे ज्या कामवाल्या बायका आहोत ना,
त्या
सगळ्यांनी मिळून नगरसेवकाला सांगून टेस्टिंग कँप लावलाय. आमची-आमच्या फॅमिलीची,
सगळ्यांची
टेस्ट करून घेणार आहोत. पण, तुम्ही सगळे लोकही टेस्ट करून घ्याल ना!
तुमच्या सोसायटीत विमानातनं किती लोक आले दोन महिन्यांपूर्वी. विमानातनंच आला म्हणतात
हा गतकाळ्या कोरोना. आमच्यासारख्या कामं करणार्या बायामाणसांना सोसायट्यांमध्ये लागण
झाली आणि आमच्या वस्त्यांत पसरला. परत तसं नको ना व्हायला? तुम्हीही सगळ्यांनी
टेस्ट करून सर्टिफिकेट घ्या. ज्यांच्याकडं तसं सर्टिफिकेट असेल त्यांच्याकडंच काम करायचं,
असं
आम्ही बायांनी ठरवलंय. सगळ्यांच्या शेफ्टीसाठी एवढं केलंच पाहिजे, नाही
का!” ?
२.
रांग मुंगीच्या गतीने पुढे सरकत होती.
सदानंद चरफडत होता. त्याने घड्याळाकडे पाहिलं. गेला अर्धा तास तो या लायनीत
उभा होता. समोर एकच खिडकी उघडी होती. पासचं एक्स्टेन्शन, नवा पास,
तिकीट
सगळं काही एकाच ठिकाणी चाललं होतं, तेही सॅनिटायझेशन करून, फिजिकल
डिस्टन्स पाळून.
अत्यावश्यक सेवेतल्या माणसांसाठी रेल्वेगाड्या सुरू झाल्यानंतर सदानंदच्या
साहेबांनी सगळ्यांना मेसेज पाठवला होता, ‘आतापर्यंत १० टक्के उपस्थिती आणि बाकीचे
वर्क फ्रॉम होम करून काम चालवलं आपण, पण आता उपस्थिती वाढली पाहिजे, वर्क
फ्रॉम होमचे लाड बास झाले.’
वर्क फ्रॉम होममध्ये लाड काय आहेत, हे सदानंदला कळलं
नाही. उलट ऑफिसात ठरल्या वेळी या आणि जा हे सोपं होतं. वर्क फ्रॉम होम हा कामाच्या
वेळांपलीकडे चालणारा ताप होता. पण हे साहेबांना सांगणार कोण?
सदानंद आठ तारखेपासूनच ऑफिसला जायला लागला होता. रिक्षा मिळवणं किंवा
इतर वाहनाने जाणं किती अवघड आहे हे लक्षात आल्यावर एका मित्राची बाइक मिळवून तो बाइकने
४२ किलोमीटरचा एका बाजूचा प्रवास करून ऑफिसला पोहोचत होता. अजून मुंबई पूर्वपदावर आलेली
नसल्याने ट्रॅफिक नव्हतं आणि वेगाने ऑफिसला पोहोचता येत होतं, हेच
त्यातल्या त्यात समाधान होतं.
आता लोकल सुरू झाल्यानंतर तर त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. त्याचं
घर आणि ऑफिस दोन्ही रेल्वे स्टेशनांपासून वॉकिंग डिस्टन्सवर होतं. मित्राची बाइक किती
दिवस वापरणार? काही नुकसान झालं तर तो ताप वेगळाच. म्हणूनच तो प्रवास सुरू करण्याच्या
नेहमीच्या वेळेच्या अर्धा तास आधी स्टेशनवर पोहोचला होता. नेहमीच्या वेगाने ही रांग
१५ मिनिटांत संपली असती, त्याचा नंबर लागला असता आणि तो परफेक्ट
वेळेत ऑफिसात पोहोचला असता.
आता भलतीच पंचाईत झाली होती.
अजून १५ मिनिटांत तिकीट मिळणार होतं, त्यामुळे आता परत
जाऊन बाइक घेऊन ऑफिसला जाण्यात अर्थ नव्हता. २० मिनिटांची ट्रेन पकडूनही उशीर होणार
होताच, त्यापेक्षा जास्त उशीर बाइकवरून गेल्यावर झाला असता. रांगेत उभं राहण्यावाचून
गत्यंतर नव्हतं.
तो नऊच्या ऑफिसला नऊ पस्तीसला पोहोचला. टेबलावर पोहोचताच दत्ता शिपायाने निरोप दिला, ‘साहेबांनी बोलावलंय.’ ‘बोंबला,’ असं मनाशी म्हणून तो साहेबांच्या केबिनमध्ये गेला. साहेब म्हणाले, “काय हे सदा, कोरोनाच्या संकटाआड आपला कामचुकारपणा किती काळ दडवणार आहोत आपण. आतापर्यंत काही सोय नव्हती, तेव्हा समजण्यासारखं होतं. पण आता सरकारने ट्रेनची व्यवस्था केली आहे, तुम्ही स्टेशनच्या जवळ राहता, आपलं ऑफिस स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे. गर्दी गजबज काही नाही. तरीही वेळेवर येता येत नाही म्हणजे कमाल आहे.”
“सर, मी वेळेवरच पोहोचलो होतो स्टेशनवर. गर्दी फार होती. एकच विंडो खुली आहे आणि खूप वेळ लागतोय सगळ्या गोष्टींना.”“म्हणजे सरकारने लोकल सर्व्हिस सुरू करूनही चूकच केली म्हणताय का?
तुमच्या
जागी मी असतो, तर या अशा फुटकळ सबबी सांगण्याऐवजी मोठी रांग पाहिल्यावर लगेच निर्णय
घेतला असता आणि बाइकने ऑफिसला पोहोचलो असतो. त्यासाठी कामाची आंच असावी लागते.”
हे ऐकून सदाने हातातली फाइल कपाळावर का मारून घेतली, ते साहेबांना
कळणं शक्य नव्हतं! ?
३.
सुरेश घरातलं शेवटचं भांडं विकून परत आला, तेव्हा त्याच्या
हातात तांदळाचा दोन किलोचा पुडा, एक मसाल्याची पुडी, मीठ
आणि किलोभर बटाटे होते. आता आठवडाभराचा प्रश्न मिटला होता. चहापासून कालवण,
भातापर्यंत
काहीही शिजवण्यासाठी एक पातेलं होतं, चहा पिण्यासाठी कप होता, काहीही
खाण्यासाठी दोन बशा पुरेशा झाल्या असत्या. बायको-मुलांना भावांच्या कुटुंबांबरोबर गावी
धाडून तो एकटाच थांबला होता. कधीतरी सलून उघडायला परवानगी मिळेल, तेव्हा
आपल्या खोपटंवजा दुकानात गर्दीच गर्दी उसळेल आणि आपण भरपूर कमाई करून सगळ्यांना परत
आणू असं त्याला वाटत होतं.
अचानक बाहेर काय गडबड झाली, ते कळेना.
रिक्षा चालवता चालवता नेताजींचा कार्यकर्ता बनलेला आणि मार्केटमध्ये दोन गाळे भाड्याने देण्याइतका मालदार झालेला नत्थू नौटंकी (हे गल्लीने त्याला दिलेलं नाव) पांढरे कपडे घालून हातात कसला तरी बोर्ड घेऊन ‘चायनावालो हाय, हाय’ ‘नहीं चलेगा नहीं चलेगा, चायना का माल नहीं चलेगा’ अशा घोषणा देत येत होता. सोबत त्याच्या आगेमागे फिरणारी नाक्यावरची दोन-चार रिकामटेकडी पोरं, वस्तीतला एक गंजडा भिकारी आणि अशीच पलटण होती. सुरेशच्या घरासमोरच्या मोकळ्या जागेत नत्थू पोहोचला आणि त्याच्यात कसलं वारं संचारलं कोण जाणे! त्याने पोरांकडच्या गोणत्यातला एक टीव्ही काढून आपटला. त्याच्या फ्रेममधून काच निसटली. मग दोन मोबाइल त्यात टाकले. चीनमध्ये कुणी पाहिले असते तर त्यांना ड्रॅगनचीच आठवण आली असती, अशा लाल क्रुद्ध डोळ्यांनी तो इकडेतिकडे पाहात म्हणायला लागला, ‘भारतमातेवर प्रेम असेल तर चिनी वस्तू वापरू नका. इथे आणून जाळून टाका. आत्मनिर्भर बना. चिनी वस्तू वापरणं म्हणजे आपल्या आईच्या काळजात सुरी खुपसणं.’
सुरेशच्या डोळ्यांसमोर त्याची स्वत:ची आई तरळून गेली. त्याच्या अंगात
काय संचारलं कोण जाणे, त्याने आत जाऊन शेवटची कप-बशीची जोडी आणली आणि नत्थूच्या समोर खाडकन्
आपटली, म्हणाला, ‘चिनी मातीच्या वस्तू फेकून दिल्या बघ मी. भारतमातेसमोर त्यांची काय मातब्बरी.’
आता आपल्यापाशी जेवण करण्यासाठी, चहा पिण्यासाठी कसलंही
भांडं उरलेलं नाही, हे त्याच्या लक्षात आलं तेव्हा खूप उशीर झाला होता. तोंडात चहापत्ती जाऊ
नये अशा बेताने, कोरा चहा पातेल्यातच कोमट करून पिताना त्याने मनातल्या मनात चीनचा उद्धार
केला.
मुकेश माचकर
९३२६४७३३४४
mamanji@gmail.com
उत्कृष्ट आणि मर्मभेदी!
उत्तर द्याहटवाजबरदस्त
उत्तर द्याहटवावर्षानुवर्षे चालू असलेला संघर्ष. कोरोनाच्या संकटाने अडचणीत अजूनच भर... यथार्थ वर्णन....
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा