निसर्गात माणसाची माणसाची ढवळाढवळ - निरंजन घाटे

कोरोना संसर्गामुळे निसर्गचक्रातल्या मानवी हस्तक्षेपावर नव्याने चर्चा सुरू झाली. पृथ्वीचा गेल्या काही हजार वर्षांचा इतिहास निसर्ग आणि मानव यांच्यातल्या संघर्षानेच लिहिला गेला आहे. त्यामागच्या कारणांचा हा मागोवा.

आपली एक सर्वसाधारण समजूत असते, ती म्हणजे आपले पूर्वज निसर्गाशी तादात्म्य पाळून जगत होेते. त्यांच्यामुळे पर्यावरणावर कोणताही परिणाम होत नव्हता. यात बदल झाला तो सतराव्या-अठराव्या शतकातल्या औद्योगिक क्रांतीमुळे. त्यानंतर पृथ्वीच्या पर्यावरणावर झपाट्याने परिणाम झाला आणि मानवी उद्योगधंद्यांनी केलेल्या प्रदूषणामुळे आपल्यावर जागतिक हवामानबदलाचं संकट ओढवलं. या समजुतीमधला उत्तरार्ध जितका खरा आहे, तितकाच पूर्वार्ध गैरसमजुतीवर आधारलेला आहे, असं आता हळूहळू पर्यावरणतज्ज्ञ म्हणू लागले आहेत. या पर्यावरणतज्ज्ञांचं नेतृत्त्व विल्यम रुडिमन हे निवृत्त जलवायुमानतज्ज्ञ करत आहेत. ते शार्लोट्सव्हिल इथल्या व्हर्जिनिया विद्यापीठात पर्यावरण विषयाचे प्राध्यापक होते. त्यांनी मानव आणि पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा विशेष अभ्यास करण्यात आपलं आयुष्य खर्ची घातलं.

रुडिमन यांच्या मते गेल्या तीन-चार शतकांत माणसामुळे अनेक सजीव जाती नष्ट झाल्या असल्या तरी त्या आधीच्या सहा हजार वर्षांत आपल्या पूर्वजांमुळेही बरेच पशुपक्षी या पृथ्वीतलावरून कायमचे नाहीसे झाले आहेत. ऑस्ट्रेलियातील उड्डाणरहित राक्षसी पक्षी, आशियातले मॅमथ्स, खड्गदंत वाघ, अमेरिकेतील घोडे हिमयुग आणि माणूस या दोहोंच्या करामतीमुळे बारा हजार वर्षांपूर्वीच नाहीसे झाले. तेव्हा पृथ्वीवरील मानवी लोकसंख्या सुमारे एक ते सव्वाकोटी असावी असा एक अंदाज आहे. सध्याच्या सात अब्जाहून थोड्या जास्तच लोकसंख्येच्या मानाने हा आकडा खरं तर नगण्य आहे. सहा हजार वर्षांपूर्वीच्या मानवाने प्राणीजाती नष्ट केल्या असतील तर त्यांनीही काही प्रमाणात त्या काळातील हवामान बदलायला हातभार लावला असणारच, असा तर्क करायला हरकत नाही, असं रुडीमन यांचं म्हणणं आहे.

सुमारे ७००० वर्षांपूर्वी माणसाने शेतीसाठी वृक्षतोड सुरू केली. आपला लिखित इतिहास त्यावेळी अजून सुरू व्हायचा होता. कारण माणसाला शब्द अक्षरबद्ध करायची कला अजून अवगत झाली नव्हती. त्याकाळात वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साइड आणि मिथेन वाढीस माणसाने हातभार लावायला सुरुवात केली होती. मात्र तेव्हा वातावरणाचं सरासरी तापमान वाढवणार्या या वायूंचं प्रमाण घातक नव्हतं. उलट हे वायू वातावरणात मिसळत राहिल्यामुळे हिमयुगाचं आगमन टळलं. एवढंच नाही तर त्यानंतरच्या काळात पृथ्वीचं वातावरण मानवाच्या दृष्टीने योग्य त्या प्रमाणात उबदार तसंच स्थिर राहिलं.

त्या काळात पृथ्वीवर तुरळक प्रमाणात शेती केली जात होती. अशी ठिकाणं विखुरलेली होती. इतक्या कमी प्रमाणात आणि दूरदूरच्या भौगोलिक ठिकाणी होणाऱ्या शेतीचा पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ होण्याइतका परिणाम जाणवला असेल हे बर्याच वैज्ञानिकांना पटत तर नाहीच, पण ते त्या कल्पनेवर प्रखर टीकाही करतात. रुडिमननी त्यांचे हे विचार इ. . २००३ मध्ये प्रसिद्ध केले, त्यावर तेव्हापासून चर्चा चालूच आहे. याबद्दल बोलतांना रुडिमन म्हणतात, ‘बहुतेक सर्व नवे विचार, विशेषत: वादग्रस्त विचार, जर त्यात तथ्य नसेल तर अल्पकाळातच मागे पडतात; पण माझी कल्पना अजूनही चर्चेत आहे, आणि माझी बाजू घेणारे वाढताहेत, त्यातच जे नवे पुरावे पुढे येत आहेत, त्यामुळे माझी खात्री आहे की एक ना एक दिवस माझं म्हणणं नक्कीच स्वीकारलं जाईल.’ हे त्यांचे उद्गार २०१० मधले होते. त्यालाही आता दहा वर्षं झाली. त्यानंतरच्या काळात निरनिराळ्या ठिकाणहून पुढे आलेल्या पुराव्यांमुळे रुडिमनच्या विचारांना पुष्टीच मिळते आहे, आणि ते काही काळातच थोड्या फार सुधारणांसहित स्वीकारले जातील असं दिसतं. ते पुढे म्हणतात, ‘गेल्या काही हजार वर्षांत हरितगृह परिणामांसाठी जबाबदार असलेल्या वायूंच्या वाढीसाठी कुठलंही नैसर्गिक कारण ठामपणे सांगता येत नाही. ही स्पष्टीकरणं मांडताना कुठलाही ठोस पुरावाही दिला जात नाही. त्यामुळे हे म्हणणं स्वीकारणं जरासं अवघडच जातं.’

गेल्या शतकामध्ये कार्बन-डाय-ऑक्साईड आणि इतर हरितगृह परिणाम निर्मात्या प्रदूषकांनी वातावरणाचं तापमान सरासरीने ०.७ से.ने वाढवलं आहे. हे मानवी उद्योगांमुळे घडलं ही बाब आज कुणीही नाकारू शकत नाही. ही दर शतकातील तापमान वाढ औद्योगिक काळाचं फळ आहेच, असं आपण ठामपणे म्हणू शकू का, हा विचार रुडिमन यांच्या मनात विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात घर करू लागला. त्याला कारणही तसंच घडलं. व्हस्तोक या अंटार्क्टिकावरील स्थानकाजवळ हिमथरात विंधन (ड्रिलिंग) करून हिमक्रोड म्हणजे बर्फाचे वरवंटे काढण्यात आले. त्यातून गेल्या चार लाख वर्षांतील वातावरण बदलावर प्रकाश पडला. त्यात कार्बन-डाय-ऑक्साइड आणि मिथेन यांच्या पातळीत झालेला बदलही उघड झाला. हिमथरात अडकलेल्या हवेच्या बुडबुड्यातल्या वायूघटकांचा अभ्यास करता येऊ लागल्यावर हे शक्य झालं. यामुळे गेल्या चार हिमयुगांदरम्यानच्या आंतर हिमयुगीन काळातील वातावरण कसं होतं, हे जाणून घेणं पुरावातावरण तज्ज्ञांना शक्य झालं. त्यातून बरीच आश्चर्यकारक माहिती उघडकीस आली.

गेल्या एक लाख वर्षांत हिमयुगाच्या आगमनाबरोबर तसंच गमनाबरोबर हवेच्या घटकात नियमित बदल घडल्याचं दिसून येतं. हिमयुगांसाठी पृथ्वीची भ्रमणकक्षा आणि आस यांत होणारे बदल कारणीभूत असतात, हे बराच काळ शास्त्रज्ञांना ठाऊक होतं. या बदलांमुळे पृथ्वीवर पोचणार्या सूर्यप्रकाशात कमी जास्त बदल घडतो. आपण सध्या दोन हिमयुगांमधील काहीशा उबदार कालखंडात वावरत आहोत; याचा फार मोठा परिणाम मानवी व्यवहारांवर आणि प्रगतीवर झाला, हेही आपण इथे लक्षात ठेवायला हवं.

पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या अक्षात- याला स्वांग (स्व + अंग) परिभ्रमण असं म्हणतात- आणि सूर्याभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे सूर्यापासूनच्या अंतरात होणाऱ्या बदलांमुळे पृथ्वीवर हिमयुगांचं गमनागमन होतं, त्यालामिलँकोविच चक्रअसं म्हटलं जातं. या संकल्पनेत अलिकडे थोडा बदल झाला असला तरी त्यामुळे या संकल्पनेला विसरून चालणार नाही. पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणाची कक्षा तिरकी आहे. हा जो उभ्या दांड्यापासून होणारा या तिरक्या कक्षेचा कोन आहे याचंही एक चक्र आहे. ते ४१ हजार वर्षांचं आहे. तो अक्ष क्षितिजसमांतर रेषेशी काटकोनाजवळच्या अंशात म्हणजे उभ्या दांड्याजवळ कमीत कमी कोन करतो तेव्हा दोन्हा ध्रृवीय प्रदेशातील हिमवृष्टीचं प्रमाण वाढू लागतं. त्यामुळे पृथ्वीवर हिमयुगाच्या आगमनायोग्य परिस्थिती निर्माण होते.

इथे आणखी एक घटक लक्षात घ्यावा लागतो, तो म्हणजे आज जरी पृथ्वीच्या अक्षाचं उत्तर टोक धृवाच्या दिशेने रोखलेलं असलं, तरी ते सर्वकाळ तसंच नव्हतं. आज आपण ज्या तार्याला धृव म्हणतो, त्या दिशेने ते कायमस्वरूपी रोखलेलं नव्हतं आणि भविष्यकाळातही असणार नाही. ही गोष्ट जनसामान्यांना फार क्वचितच सांगितली जाते. पृथ्वीच्या अक्षाचं टोक स्थिर नसतं. ते एका वर्तुळाकार मार्गावर फिरतं. एकेकाळीव्याधहा आपला उत्तरेकडचा स्थिर तारा होता. ही भ्रमंती करण्यास अक्षाच्या उत्तर टोकास २२ हजार वर्षं लागतात; मग पुन्हा तो पूर्वपदावर येतो. पृथ्वीची भ्रमणकक्षाही लंबवर्तुळाकार असल्यामुळे ती जेव्हा सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्यावेळी ऋतूंमध्ये बदल होतो. उन्हाळा कमी तीव्र होतो आणि हिवाळ्याची तीव्रता वाढते. हा सूर्याभोवती फिरण्याचा पृथ्वीचा मार्ग दर एक लाख वर्षांनी कमी जास्त होतो; याचाही पृथ्वीच्या जलवायुमानावर (क्लायमेट) परिणाम होत असावा असा अंदाज आहे. मात्र तो नक्की कसा आणि किती प्रमाणात होतो, हे अजून कोडंच आहे.

हिमयुगातील झपाट्याने होणारे बदल आणि आंतरहिमयुगीन कालखंडातील उष्णकाळ यांची सुरुवात सुमारे २५ लाख वर्षांपूर्वी झाली असावी असे पुरावे उपलब्ध आहेत. आधी पृथ्वी बरीच उबदार होती. सुमारे साडेपाच कोटी वर्षांपूर्वी भारताच्या तळाने तिबेटच्या पठाराच्या तळाला धडका मारायला सुरुवात केली, त्यामुळे तिबेटचं पठार वर उचललं जाऊ लागलं. मधला समुद्र भारतीय भूभागाच्या आणि तिबेटच्या पठाराच्या मध्ये चिमटला गेला. भूखंडं पृथ्वीच्या गाभ्याच्या वरच्या भागातील अर्धप्रवाही म्हणजे दाट पाकासारख्या शिलारसावर तरंगतात. त्यांच्या तरंगण्यात आणि पाण्यावर तरंगणार्या हिमनगात एक साम्य असतं. ज्याप्रमाणे हिमनगाचं टोक तेवढं पाण्यावर दिसतं आणि उरलेला ९०% भाग पाण्याखाली असतो, त्याचप्रमाणे भूखंडाचा अल्पसा भाग शिलारसावर तरंगताना दिसतो.

भारतीय द्विपकल्प आणि तिबेटच्या पठाराच्या धडकांमुळे त्यांच्या मधला समुद्र (टेथिस) चिमटून त्याचा तळ उचलला गेला. उचलला जात असताना त्याला घड्या पडल्या. हाच तो आपला हिमालय. त्यामुळे हिमालयातल्या उंच पर्वतशिखरांवर सागर तळाच्या सजीवांचे अवशेष अश्र्मीभूत स्वरुपात-जीवावशेष म्हणून सापडतात. हे उत्थान आजही चालू आहे. त्यामुळे अफगाणिस्तान ते म्यानमार या पट्ट्यात सातत्याने भूकंप होत असतात. हिमालयाचं उत्थान साडे पाच ते सहा कोटी वर्षांपूर्वी सुरू झालं असलं तरी वातावरणावर परिणाम होईल एवढी उंची गाठायला त्याला सुमारे अडीच ते तीन कोटी वर्षांचा कालावधी लागला असावा. सुरुवातीस ही उंची झपाट्याने म्हणजे प्रतिवर्षी ४ ते ५ सें.मी. या वेगाने वाढली असावी. पुढे हा वेग दोन ते अडीच सें.मी.वर स्थिरावला. आजही याच वेगाने हिमालय उचलला जातोय. मधूनच हिमालयात कडे कोसळून या उंची वाढण्यावर थोडंसं नियंत्रण ठेवतात. हे सगळं सविस्तर सांगायचं कारण म्हणजे साधारणपणे अडीच ते तीन कोटी वर्षांपूर्वी या हिमालयाच्या उंचीचा भारतीय जलवायुमानावर परिणाम व्हायला सुरुवात झाली.

हिमालयाच्या उत्थानामुळे उत्तर ध्रृवीय प्रदेशातून येणारे गार वारे अडवले जाऊ लागले. त्याचबरोबर हिंदी महासागरातून-त्याच्या छोट्याशा अरबी समुद्र या भागातून भारतीय उपखंडावर पाण्याने ओथंबून भरलेले ढग यायचे ते अडवले जाऊ लागले. सुमारे २५ लक्ष वर्षांपूर्वी हिमालयाने गाठलेल्या उंचीमुळे भारतात पावसाळा हा नवा ऋतू सुरू झाला आणि तिकडे मंगोलियातला पाऊस कमी झाल्यामुळे गोबीच्या वाळवंटाची सुरुवात झाली. तर तिबेटच्या पठारावरची आर्द्रता कमी झाली आणि तो प्रदेश शुष्क बनला.

हे आशियापुरतं मर्यादित होतं. जागतिक पातळीचा विचार केला तर काय दिसतं? दर २२ हजार वर्षांनी वातावरणातलं मिथेनचं प्रमाण वाढलेलं दिसतं. पृथ्वी या काळात सूर्याच्याजवळ आलेली असल्यामुळे उत्तर गोलार्धात पावसाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे वनस्पतींची अधिक प्रमाणात वाढ होते. त्याचप्रमाणे नद्यांना पूर येतात. सरोवरांची पातळी वाढते. त्यात पडलेल्या वनस्पती कुजतात. त्याचा परिणाम म्हणून वातावरणामध्ये मिथेनचं प्रमाण वाढतं. तर आर्क्टिक भूप्रदेशातला कायमस्वरूपी गोठलेला प्रदेश या काळात वाढलेल्या तापमानामुळे दलदलीचा बनतो. तिथेही खुरट्या वनस्पती वाढतात. त्यामुळेही वातावरणात मिथेनचं प्रमाण वाढतं. अलिकडच्या काळात मात्र यात बदल झालेला आढळतो. सुमारे ११ हजार वर्षांपूर्वी मिथेनचं प्रमाण सर्वाधिक वाढलं होतं. त्यावेळी वातावरणामध्ये दर अब्ज कणात ७०० कण मिथेनचे होते. त्यानंतर हे प्रमाण दर अब्जास ४५० इतकं खाली आलं. पण ते कमी होण्याचं प्रमाण अचानक कमी झालं. खरंतर आजही ते दर अब्जात ४५० असायला हवं होतं. मग रुडिमननी भूतकाळातल्या मिथेनचं प्रमाण तपासायला सुरुवात केली तेव्हा दिसून आलं, की सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी ते कमी व्हायचं थांबलंच, आणि त्यात वाढ व्हायला सुरुवात झाली.

वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईडचं प्रमाण कमी-जास्त का होतं, हे विज्ञानाला न सुटलेलं एक कोडंच आहे. सध्या कार्बन-डाय-ऑक्साईड वाढीबद्दल औद्योगिक क्रांतीला दोष दिला जातो, पण औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली त्या काळात वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साइडचं प्रमाण जेवढं असायला हवं होतं त्यापेक्षा जास्त होतं. व्हस्तोक केंद्राजवळ काढलेल्या हिमक्रोडांमधल्या कार्बन-डाय-ऑक्साईडची पातळी तापमानाशी निगडीत होती, असं दिसून आलं. हिमयुग चालू असतं तेव्हा कार्बन-डाय-ऑक्साईडचं वातावरणातील प्रमाण दर दशलक्षांत २८० ते ३०० एवढं असतं, हिमयुग संपतं तेव्हा ते कमी व्हायला लागतं, असं या क्रोडांमधल्या बुडबुड्यांच्या अभ्यासावरून लक्षात येतं. असं असलं तरी सुमारे ७००० वर्षांपूर्वी कार्बन-डाय-ऑक्साईड कमी होता होता एकदम त्याचं प्रमाण वाढायला लागलं; आणि औद्योगिकीकरणास सुरुवात व्हायच्या आधीच ते जेवढं असायला हवं त्यापेक्षा दर दशलक्ष भागात ४० ने जास्त होतं; म्हणजे आधीच्या तीन आंतरहिमयुगीन कालखंडांपेक्षा हे काहीतरी वेगळंच घडलं होतं.

या जास्तीच्या हरितगृहकारक वायूंचं वाढतं प्रमाण पृथ्वीच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाचं ठरणारं होतं. मिथेन आणि कार्बन-डाय-ऑक्साईड यांच्या अतिरिक्त प्रमाणामुळे पृथ्वीचं सरासरी तापमान सरासरीनं ०.७ से. जास्त झालेलं होतं. हे विसाव्या शतकातील या वायूंच्या निर्मितीएवढंच होतं. हे कोडं सोडवण्यासाठी रुडिमननी मग स्टीफन व्हावरुस आणि जॉन कुट्झबाख यांची मदत घ्यायचं ठरवलं. हे मॅडिसन विस्कॉन्सिन विद्यापीठामध्ये जलवायुमानाची प्रतिरूपं (क्लायमेट मॉडेल्स) बनवतात. त्यांची या क्षेत्रातल्या निवडक तज्ज्ञांमध्ये गणना केली जाते. रुडिमन यांनी त्यांच्या मदतीने दाखवून दिलं, की ज्या काळात खरंतर तापमान वाढणं अपेक्षित होतं त्या काळात ते कमी होत गेलं. उत्तर कॅनडा आणि सैबेरियावर हिमाच्छादन वाढत गेलं. जग नव्या हिमयुगाच्या उंबरठ्यावर उभं होतं. अशा परिस्थितीत मिथेन आणि कार्बन-डाय-ऑक्साईड यांच्या प्रमाणात एकाएकी वाढ व्हायचं कारण काय असावं? हा आंतरहिमयुगीन काळ आधीच्या आंतरहिमयुगीन काळांपेक्षा वेगळा कसा? यासाठी आपले पूर्वज तर जबाबदार नव्हते ना?

भूमध्यसागराच्या पूर्वेस असलेल्या प्रदेशात सुमारे ११ हजार वर्षांपूर्वी अगदीच बाळबोध स्वरुपाच्या शेतीची सुरुवात झाली. त्याच सुमारास पण थोड्या उशिराने चीनमध्येही शेती अवतरली. अमेरिकेत शेती पोहोचायला मात्र बराच उशीर झाला. अमेरिका खंडातल्या शेतीमुळे हरितगृह परिणामास जबाबदार वायू तर फारच मोठ्या प्रमाणावर वातावरणात मिसळले असणार. अरण्याची मोठ्या प्रमाणावर तोड झाली की फार मोठ्या प्रमाणावर कार्बन-डाय-ऑक्साईड वायू वातावरणात मिसळतो. याचं कारण लाकडाचे ओंडके कुजताना किंवा लाकूड जळताना कार्बन-डाय-ऑक्साईड मुक्त होत असतो. तसंच भातशेतीत मोठ्या प्रमाणावर पाणी साठवलं जातं तेव्हा मिथेन वायू वातावरणात खूप जास्त प्रमाणात मिसळतो. पाणथळ प्रदेशात किंवा दलदलीतून जेवढा मिथेन बाहेर पडतो तसाच तो भातशेतीतूनही बाहेर पडतो.

प्राचीन काळातील शेतीबद्दलची अधिक माहिती मिळवायला हवी, असं रुडिमनना वाटू लागलं. साधारणपणे पाच हजार वर्षांपूर्वी आशिया खंडात एकाएकी भाताची शेती वाढीस लागली. त्याच सुमारास युरोपमध्ये अन्नधान्यांचं उत्पादन करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू झाली. तिथे प्रामुख्याने बार्ली आणि गहू यांचं उत्पादन होत होतं. साधारणपणे साडेसात हजार वर्षांपूर्वी ही जंगलतोड सुरू झाली, ती ५००० वर्षांपूर्वी हळूहळू कमी होऊ लागली. ही जंगलतोड नक्की किती झाली ते सांगणं अवघड आहे. पण रुडिमन यांच्या मते हे प्रमाण खूप जास्त होतं. हे प्रमाण किती असावं याची कल्पनाडूम्स डे बुकया पुस्तकावरून येते. या पुस्तकात अकराव्या शतकातल्या इंग्लंडमधल्या जनगणनेची हकीकत आहे. विल्यम द काँकररनेही जनगणना करावी, हा फतवा काढला होता. त्यावेळी इंग्लंडची लोकसंख्या १५ लाख होती. त्यांनी इंग्लंडमधली ८५% झाडी कापून तिथे शेती करायला सुरुवात केली होती; असं दिसून येतं. रुडिमन यांचं हे म्हणणं २००३ मध्येक्लायमेटिक चेंजया नियतकालिकाच्या एकसष्ठाव्या खंडात (पृ. २६१) प्रसिद्ध झालं तेव्हा त्यांच्यावर बरीच टीका झाली.

रुडिमनचे सगळ्यात मोठे टीकाकार म्हणजे फॉर्च्युनॉट जूझ. ते स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांच्यामते पृथ्वीवर कार्बन-डाय-ऑक्साईडची इतकी वाढ व्हावी एवढी अरण्यंच त्या काळात असणं शक्य नव्हतं. पृथ्वीवरची त्या काळात अस्तित्वात असलेली सर्वच्या सर्व झाडंझुडपं जरी माणसाने तोडली असती तरी सुद्धा कार्बन-डाय-ऑक्साईडचं प्रमाण त्या क्रोडांनी दाखवल्याइतकं वाढलं नसतं. 

जूझचं हे म्हणणं रुडिमन आता मान्य करतात, पण त्याला स्वत:ची पुस्तीही जोडतात. जंगलतोड होत असतानाच त्याजागी भातशेती सुरू करण्यात येत होती. या दोहोंचा एकत्र परिणाम होऊन तापमान वाढू लागलं. त्यातच शेतीसाठी मोकळ्या केलेल्या जागेत पीक काढून घेतल्यावर तण जाळणं हा कचरा साफ करायचा सोपा मार्ग ठरला. त्यामुळे हरितगृह परिणाम करणारे वायू निर्माण करणारं एक चक्रच सुरू झालं. याबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही. सर्वच जलवायुमानशास्त्रज्ञ पृथ्वीवर हिमयुगांच्या गमनागमनासाठी केवळ पृथ्वीच्या कक्षेतील फरकाला पूर्णपणे जबाबदार धरणं चुकीचं ठरेल, हे मान्य करतात. म्हणजे मग आद्य शेतकर्यांनी किती कार्बन-डाय-ऑक्साईड आसमंतात सोडला हा प्रश्न उरतो.

व्हावरुस आणि कुट्झबाख यांच्या मदतीने रुडिमन यांनी ज्या प्रतिरूपांचा अभ्यास केला त्यावरून मानवी हस्तक्षेपामुळे सागरांचं तापमान पूर्वीच्या आंतरहिमयुगीन काळातील सागरांच्या तापमानांपेक्षा सरासरीने जास्त होतं आणि आहे, हे स्पष्टपणे दिसून येतं. यामुळेसुद्धा कार्बन-डाय-ऑक्साईडची पातळी दोन प्रकारे वाढू शकते; असा दावा रुडिमन करतात. सागराचं तापमान जास्त असतं त्यावेळी त्यात कार्बन-डाय-ऑक्साईड वायू कमी प्रमाणात मिसळतो. ‘उन्हाळ्याच्या दिवसात सोड्याची बाटली फ्रीजमध्ये नसेल तर ती उघडताच त्यातील कार्बन-डाय-ऑक्साईड जसा फसफसतो तसंच निसर्गातही घडतं’, असं उदाहरण याबाबत रुडिमन देतात. सागराच्या पाण्याचं सरासरी तापमान जास्त असेल तर धृवीय प्रदेशातलं हिमाच्छादन कमी होतं. त्यामुळे सागरी पाण्यातील कार्बन-डाय-ऑक्साईड जास्त प्रमाणात वातावरणात मिसळतो. हे तापमान कमी असतं त्यावेळी धृवीय प्रदेशातील हिमाच्छादन वाढतं. तेव्हा वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईड मोठ्या प्रमाणात या हिमाच्छादनात विरघळतो किंवा बुडबुड्यांच्या स्वरुपात अडकून पडतो. याचा वातावरणावर नक्की परिणाम होतो पण त्याचं प्रमाण किती, केवळ या घटकांमुळे आंतरहिमयुगीन वातावरणावर परिणाम होऊन सध्याच्या आंतरहिमयुगीन काळाची व्याप्ती वाढली का, हे ठामपणे सांगणं शक्य नाही, हे रुडिमन मान्य करतात; मात्र त्यांचा परिणाम नक्कीच होतो, असंही ते म्हणतात.

या विचारांमुळे आणखी एका प्रश्नाची उकल व्हायलाही मदत झाली. त्यामुळे तोपर्यंत झालेल्या रुडिमनच्या संशोधनाला पुष्टी मिळाली. रुडिमननी पहिल्यांदा त्यांचा सिद्धांत मांडला त्यानंतर जे क्रोड काढले गेले त्यातून हवामानशास्त्रज्ञांना गेल्या आठ लाख वर्षांतील जलवायुमानाची कल्पना आली. त्यामुळे पाच आंतरहिमयुगीन कालखंडांवर प्रकाश पडला. त्यामुळे सध्याचा आंतरहिमयुगीन काळ हा अपवादात्मक आहे, हेही दिसून आलं.

हा वाद लवकर संपेल अशी चिन्हं नाहीत, हे खरं असलं तरी रुडिमनचं पारडं हळूहळू जड होत चाललं आहे. तंत्रज्ञानाची प्रगती होतेय तसतसे आणखी पुरावे उघड होतील आणि आपलं म्हणणं सिद्ध होईल, अशी रुडिमनना खात्री वाटते. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी उत्खननातूनही नवनव्या गोष्टी उघड होत आहेत. त्यांचाही अर्थ लावणं चालू आहे. हे असले वाद लवकर सुटत नाहीत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डार्विनप्रणीत उत्क्रांतीवाद. त्यामानाने हा वाद सौम्य वाटतो. पण माणसांची पृथ्वीच्या जलवायुमानातील ढवळाढवळ आजची नाही, हे सत्य या निमित्ताने चर्चेत आलं, हेही नसे थोडके. 

निरंजन घाटे

०२०-२४४८३७२६

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८