जग थांबतं तेव्हा.. - गौरी कानेटकर
चार महिन्यांच्या लॉकडाऊन काळात एका पत्रकाराने लिहिलेल्या नोंदी -‘जग थांबतं तेव्हा..’ समकालीन प्रकाशनामार्फत पुस्तकरूपात वाचकांसमोर येत आहेत. या संकटकाळाला आपण समाज म्हणून, सरकार म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही कसं तोंड दिलं याचा आरसा समोर धरण्याचा हा प्रयत्न आहे. या पुस्तकाचं हे मनोगत.
गेले चार महिने आपण सगळेच एक अभूतपूर्व काळ अनुभवतो आहोत. एक विषाणू जगभर लोकांना संसर्ग देत पसरतोय, लाखो लोक मृत्युमुखी पडलेत, त्याच्या भीतीने सगळे देश लॉकडाऊन मोडमध्ये गेलेत, जग ठप्प झालंय. असा अनुभव आपल्यापैकी कुणालाच याआधी आलेला नाही.
दुसरं महायुद्ध ही अलीकडच्या
काळातली सर्वांत संहारक आणि मानवजातीवर सर्वाधिक परिणाम करणारी घटना होती असं मानलं
जातं;
पण तरीही जगाच्या कानाकोपऱ्यात त्या महायुद्धाचे
प्रत्यक्ष परिणाम झाले नव्हते. त्यानंतरच्या सत्तर वर्षांत शीतयुद्धं
झाली, नागरी युद्धं पेटली, दहशतवाद फोफावला,
विविध रोगांच्या-विषाणूंच्या अनेक साथी येऊन गेल्या;
पण या सर्व घडामोडी एखाद्या देशापुरत्या-काही देशांपुरत्या
किंवा फार तर एखाद्या खंडापुरत्या मर्यादित होत्या. आफ्रिकेतल्या
रोगाचा भारतातल्या खेड्यापाड्यांशी संबंध आला नव्हता, किंवा सीरियातल्या
नागरी युद्धाची झळ दक्षिण अमेरिकेतल्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली नव्हती.
त्या अर्थाने कोरोना व्हायरसचा प्रसार अभूतपूर्व आहे. कमी-अधिक प्रमाणात जगातल्या जवळपास सर्व देशांमध्ये कोरोनाने शिरकाव केलाय. कोणत्या ना कोणत्या प्रकारे जगातल्या प्रत्येक माणसाच्या जगण्यावर कोरोनाचा किंवा त्याला रोखण्यासाठी केल्या गेलेल्या लॉकडाऊनचा परिणाम झालाय. अमेरिकेतल्या बड्या मल्टिनॅशनलच्या सीईओंपासून मुंबईत पाणीपुरी विकणार्या यूपीच्या भय्यापर्यंत सार्यांना सध्या कोरोनाने ग्रासलेलं आहे.
जगात कोरोनाबाधित पहिला
रुग्ण २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात चीनमध्ये सापडला. त्यानंतर जानेवारीच्या अखेरीस आपल्याकडे कोरोनाचा
पहिला रुग्ण आढळला. चीनसारखं संकट भारतावर येणार नाही,
असं मानलं जात असतानाच मार्चमध्ये रुग्णांचं प्रमाण हळूहळू वाढू लागलं
आणि हे वादळ आपल्याकडेही थडकणार हे नक्की झालं. तेव्हाच हे काही
तरी वेगळं, आजवर कधीही न अनुभवलेलं घडतं आहे याची जाणीव होत होती.
मन नोंदी करत होतं.२० मार्चला महाराष्ट्रात खासगी
ऑफिसेस बंद करण्याची घोषणा झाली. साहजिकच आम्हालाही आमच्या युनिक
फीचर्स आणि समकालीन प्रकाशन या दोन्ही संस्था काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा
लागला. त्या वेळी सर्वांचीच पहिली प्रतिक्रिया होती : असं कसं
होऊ शकतं? सगळा देशच बंद? म्हणजे काय?
जग बंद पडलं तर हातावर पोट असलेली माणसं काय करणार? उपासमारीने मरणार? कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायला
आपली व्यवस्था पुरी पडणार का?
असे किती तरी प्रश्न अचानक
समोर येऊन ठेपले होते. आमचे मुख्य संपादक सुहास कुलकर्णी यांनी
मला सुचवलं, “आपल्या आसपास जे घडतंय ते अभूतपूर्व आहे,
आपल्यासह सर्व जगाला आणि मानवजातीला व्यापून टाकणारं आहे. या प्रसंगाला एक व्यक्ती म्हणून आपला प्रतिसाद कसा असतो, एक समाज म्हणून त्याला आपण कसे सामोरे जातो आणि आपलं सरकार त्याला कसं तोंड
देतं याचं डॉक्युमेंटेशन करण्याची ही चांगली संधी आहे. या घडामोडींची
जमेल तशी नोंद ठेवणं हे पत्रकार म्हणून आपलं काम आहे. तू लिहितेस
का बघ.”
मला ही कल्पना आवडली. नाही
तरी घरात बसून राहावं लागणार होतं. कोरोनाशिवाय त्या वेळी दुसरा
विषयच डोक्यात नव्हता. म्हटलं, ‘चला,
नोंदवूया जे दिसतं ते.’ त्यानंतर दोनच दिवसांत
२१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला. मग नोंदी लिहिण्याचा विचार आणखी
पक्का झाला आणि मी लिहायला लागले- या नोंदीचं पुढे काय होईल याचा
विचार न करता. मधल्या काळात अनेकदा माझी गाडी बंद पडायची.
हे आपण कशाला करतोय, हे वाचून कुणाला काय मिळणार
आहे; सगळ्यांना सगळं माहीत आहेच, मग आपण
वेगळं काय लिहितोय, असे अनेक प्रश्न पडायचे.
वाटायचं, त्यापेक्षा तेवढ्या वेळात दुसरं एखादं
काम पूर्ण होऊन जाईल. पण सुहास कुलकर्णींनीच ‘डॉक्युमेंटेशन म्हणून लिही, बाकी विचार करू नकोस,’
असं समजावत मला लिहितं ठेवलं. नोंदी पूर्ण झाल्यावर
त्या वाचून त्यात सुधारणा सुचवल्या आणि त्याचं पुस्तक करूयात, असा आग्रहही धरला. त्यामुळे हे पुस्तक तयार झालं याचं
श्रेय त्यांना.
कोरोना संकटाच्या काळात
माध्यमांमधून आपल्यावर बातम्यांचा, माहितीचा, आरोप-प्रत्यारोपांचा आणि उलटसुलट तर्कांचा एवढा भडिमार झाला आहे की कोरोना हा शब्दही
आता नकोसा वाटतो आहे. या विषयाबद्दल नको तेवढं माहीत झालं असताना
आणखी एक पुस्तक कशाला, असं कुणाला वाटू शकतं. आधी म्हटल्याप्रमाणे मलाही लिहिताना तसं वाटत होतं. पण
कोरोना काळात घरी येणारा एखाद-दुसरा पेपर (तोही कधी येत होता, कधी नव्हता), टीव्हीवरच्या बातम्या आणि व्हाट्सपवरून फिरणारे खरे-खोटे
संदेश, एवढ्यापुरतेच वाचकांचे माहितीस्रोत मर्यादित होते.
पण त्यापलीकडे देशातली-जगातली अनेक माध्यमं-पत्रकार कोरोना आणि लॉकडाऊनसंदर्भातल्या बातम्या खोलात जाऊन देत होते.
तज्ज्ञांच्या मुलाखती येत होत्या. नवनवी संशोधनं
बाहेर पडत होती. अशी जी माहिती सहजी लोकांपर्यंत पोहोचत नाही
ती पत्रकारांकडे येत असते. ते सगळं खंगाळून त्यातले महत्त्वाचे
मुद्दे नोंदवण्याचा प्रयत्न इथे केला आहे.
दुसरं असं, की
लॉकडाऊनचा आणि अनलॉकिंगचा काळ आपल्यासाठी सध्या ताजा आहे. त्या
काळात काय घडलं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे; पण आणखी काही
वर्षांनी कोरोनाचा हा हल्ला काहीसा विस्मृतीत जाईल, तेव्हा त्या
काळात काय घडलं होतं हे कळण्यासाठी या नोंदी उपयोगी ठरतील असं वाटतं. एरवी, युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत आपल्याकडे डॉक्युमेंटेशनचं
प्रमाण फार कमी आहे, अशी खंत नेहमी व्यक्त केली जाते.
ती कमतरता भरून काढण्याचा हा खारीचा प्रयत्न.
या नोंदी तीन-चार स्तरांवर लिहिल्या आहेत. एक, माझ्या आसपास, घरीदारी, शेजारी आणि माझ्या मनात घडणार्या वैयक्तिक गोष्टी. दुसरा प्रकार आहे तो आपल्या समाजात, मी राहते त्या पुणे शहरात, महाराष्ट्रात आणि देशात घडणार्या गोष्टी. आणि तिसरा थोडाफार संदर्भ आहे तो जागतिक घडामोडींचा. कोरोनाकाळात आपण व्यक्ती म्हणून कसे वागलो-आपल्यावर त्याचा काय परिणाम झाला, समाज म्हणून आपली प्रतिक्रिया काय होती-समाजावर कसा परिणाम झाला आणि सरकारी पातळीवर या संकटकाळाला कसा प्रतिसाद दिला जात होता, असेही तीन स्तर या नोंदींमध्ये आहेत.
१८ मार्च ते ३१ जुलै
अशा जवळपास चार महिन्यांमध्ये लिहिलेल्या या नोंदी आहेत. लिखाणाचा
फॉर्म डायरीसारखा असल्याने एका अर्थाने लॉकडाऊन काळातल्या घुसमटीला वाट करून देण्याचा
तो एक मार्गही होता. त्यामुळे आसपास घडणार्या घटनांवरची माझी मतंही मी या नोंदींमध्ये नोंदवली आहेत, मनात उमटणारे प्रश्न नोंदवले आहेत. त्यात काही घटनांचा उल्लेख राहिलेला असू शकतो. काही घटना
मनाला भिडल्यामुळे त्या जास्त अधोरेखित झाल्या असण्याची शक्यता आहे. कदाचित कुठे तपशिलात काही चूक झालेली असू शकते. दुसरी
गोष्ट म्हणजे इथे नोंदवलेली मतं पूर्ण वैयक्तिक आणि उत्स्फूर्त आहेत; त्यापैकी काही मतं वाचकांना पटणार नाहीत, अशीही शक्यता
आहे. पण हे एका व्यक्तीने तिच्या मर्यादांसह केलेलं वैयक्तिक
डॉक्युमेंटेशन आहे याची नोंद वाचकांनी घ्यावी अशी विनंती आहे. हा दस्तावेज वाचक आणि विशेषतः तरुण पत्रकारांना उपयोगी पडेल अशी आशा आहे.
या पुस्तकाला ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांची प्रस्तावना लाभणं हा माझ्या दृष्टीने आनंदाचा आणि अभिमानाचा विषय आहे. त्यांच्या प्रस्तावनेमुळे पुस्तकातील अस्पर्शित मुद्द्यांबद्दल अधिक स्पष्टता येईल. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमधील घडामोडींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाचकांना मिळेल याची खात्री वाटते.
गौरी कानेटकर
९६५७७०८३१०
gauri.kanetkar@uniquefeatures.in
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा