काही अनुभव पल्याडचे - नीलिमा कुलकर्णी



अमेरिका हा आजही कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला देश आहे. तिथल्या आरोग्यसेवेत काम करणाऱ्या काही व्यक्तींशी बोलून लिहिलेले हे अनुभव

आमच्या घरात, नात्यांत भरपूर डॉक्टर मंडळी आहेत. कोरोनाच्या साथीत स्वत:चं व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवून समाजासाठी योगदान देणारे हे स्वास्थ्य सेवक (हेल्थ केअर वर्कर्स) मला अगदी जवळून पाहायला मिळाले. तिशी आणि चाळीशीतील ही पिढी. त्या सगळ्यांकडून डॉक्टरांच्या बाजूचे अनुभव ऐकायला मिळाले.त्यातले हे काही प्रातिनिधिक अनुभव.

डॉ. मयूर परळकर

(गॅल ऑरेन्ज रीजनल मेडिकल सेंटर, मिडलटाऊन, न्यूयॉर्क)

अमेरिकेत कोव्हिडच्या सर्वाधिक केसेस झालेलं पहिलं राज्य म्हणजे न्यूयॉर्क! डॉ. मयूर परळकर हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रुममध्ये काम करतात. म्हणजे हॉस्पिटलमध्ये आलेला कोव्हिडचा पेशंट पहिल्यांदा त्यांच्याच संपर्कात येतो. या नव्या रोगासाठी लस नाही म्हणजे रोगाला प्रतिबंध करणारं असं काहीच नाही. ४ मार्चला न्यूयॉर्कमध्ये ११ जणांना लागण झाली तेव्हा आगामी संकटाची चाहूल लागली. ७ मार्चला न्यूयॉर्कच्या गव्हर्नरने आणीबाणी जाहीर केली.

सर्व डॉक्टर आणि नर्सेसच्या मनात पुढचं चित्र दिसू लागलं. डॉ. मयूर म्हणतात, “पहिली गोष्ट आम्ही केली ती म्हणजे माझं आणि बायकोचं मृत्युपत्र तयार केलं.” माझ्या अंगावर काटा आला. मृत्यू असा इतका जवळ आला होता. मयूरला आठ आणि सहा वर्षाची दोन लहान मुलं आहेत. अमेरिकेत दोन्ही पालक निवर्तले तर मुलं सरकारी कस्टडीत जातात. ते टाळण्यासाठी मृत्युपत्राद्वारे मुलांची कस्टडी विश्वसनीय व्यक्तीवर सोडणं आवश्यक असतं.

हॉस्पिटलमध्ये मास्क आणि इतर सुरक्षा साधनं कमी पडू शकतात, म्हणून मयूरने स्वत:साठी ती खरेदी केली. हॉस्पिटलमध्ये जाताना भीतीचं सावट मनात असायचं. इमर्जन्सीमध्ये आलेल्या कुठल्याही पेशंटमध्ये कोरोनाचं एक जरी लक्षण आढळलं किंवा तो नुकताच परदेशातून आलेला असेल तर तोपी.यू.आय.’ (पर्सन अन्डर ऑब्झर्वेशन) धरला जायचा. त्याला तपासणाऱ्या डॉक्टरला प्रोटेक्टिव्ह सूट, एन-९५ मास्क, पुन्हा त्यावर आणखी दोन प्लास्टिक शिल्ड, ग्लोव्हज असं नखनिशांत बंदिस्त व्हावं लागायचं. सुरवातीला कोव्हिडचे १५-२० पेशंट असत. हळूहळू इतर पेशंट कोव्हिडच्या भीतीने हॉस्पिटलला येईनासे झाले आणि इमर्जन्सीचे २००-२०० बेड्स कोव्हिड पेशंट्सनी भरू लागले. सगळीकडे कोव्हिडचं साम्राज्य, तेव्हा प्रोटेक्टिव्ह सूट बदलायला वेळच नसायचा. दिवसाचे १०-१२ तास सतत या वातावरणात काढावे लागायचे.

गंभीर आजारी लोकांची संख्या वाढू लागली. गव्हर्नरने ३०-४० हजार व्हेंटीलेटर लागतील असं सांगितलं. हॉस्पिटलने आपल्याकडच्या उपकरणांचा अंदाज घेतला आणि राशन करावं लागेल अशी सूचना दिली. राशन? म्हणजे कोणाला व्हेंटीलेटर द्यायचं आणि कोणाला नाही ते आपण ठरवायचं? डॉक्टर देवासारखा असतो, पण अशा पद्धतीने देव व्हायचं ही कुठल्याही डॉक्टरसाठी सर्वात अवघड गोष्ट होती. एक वृद्ध पेशंट आला. त्याला डीमेंशिया, इतर अनेक व्याधी, त्यात डायरिया झालेला आणि त्यात कोव्हिड- ताप, खोकला वगैरे. त्याला व्हेंटीलेटर न देण्याचा निर्णय डॉक्टरांच्या पॅनेलने घेतला. आणि तो निर्णय त्या पेशंटच्या कुटुंबाला सांगण्याची जबाबदारी मयूरवर आली. डॉ. मयूर म्हणतात, “माझ्या करिअरमधला तो सर्वात अवघड क्षण होता.” त्या गृहस्थांच्या दोन मुली होत्या, साधारण मयूरच्याच वयाच्या. त्याने त्या दोघींना समजावलं. तो निर्णय त्या कुटुंबाने स्वीकारला. पण त्याच दिवशी त्या वृद्धाचं निधन झालं, कठोर निर्णय घेण्याची वेळच आली नाही. त्यानंतर न्यूयॉर्कला पुरेसे व्हेंटीलेटर्स आले आणि तो प्रश्न सुटला. 

महिना झाला, गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. प्रेतं ठेवण्यासाठी शवागारं कमी पडायला लागली. डॉ. मयूर सांगत होते, “आयसीयूमध्ये सगळीकडे ट्यूब लागलेले पोल्स, आणि व्हेंटीलेटर्सची घरघर असायची. एक दिवस तर आयसीयूचे सगळे पेशंट बेशुद्ध होते, फक्त एकाचेच डोळे उघडे होते, पण पूर्ण थिजलेले. मरणासाठी लागलेली ती रांग बघताना डॉक्टर असून असहाय वाटत होतं. तो दिवस मी कधीही विसरणार नाही. असा प्रसंग माणसाला आपल्या मर्यादांची जाणीव करून देतो. इट मेक्स यू हम्बल. तिथून बाहेर पडून मी हात आणि तोंड धुवायला गेलो, तेव्हा लक्षात आलं, माझ्या ग्लोव्हजच्या खाली हातावरची थोडी जागा उघडी आहे. आणि भीतीची एक कळ अंगावरून सरसरून गेली. ती उघडी जागा मी कितीतरी वेळा खसखसून धुतली. डॉक्टरही शेवटी माणूसच असतो!”

त्यांची भीती अनाठायी नव्हती. त्यांची एक सहकारी मृत्यूमुखी पडली होती. दुसर्या एकीला लागण झाली होती, मग तिच्या आई-वडिलांनाही झाली. वडील त्यात दगावले. त्याच भीतीने मयूर आपल्या आईला सुरवातीपासूनच आजतागायत भेटलेले नाहीत. घरच्या लोकांच्या काळजीसाठी काही डॉक्टर आणि नर्सेस अनेक दिवस घरीच गेलेले नाहीत. मयूरच्या पत्नीला ते मान्य नव्हतं, म्हणून ते रोज घरी जातात. घरी गेल्यावर हॉस्पीटलचे कपडे, बूट सगळं वेगळं ठेवून, आंघोळ करून मगच ते घरात इतरांबरोबर मिसळतात.

या सर्व गोंधळात जेव्हा एखादा कोव्हिडचा पेशंट जेव्हा बरा होऊन घरी जातो तेव्हा बँडवरडोन्ट स्टॉप बिलीव्हिंगहे गाणं वाजवलं जातं आणि सर्वांच्या चेहर्यावर आशेचा किरण उमटतो.   

भारतातल्या कोरोनाच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं?” मी विचारलं.

ज्या पद्धतीने त्यांनी लॉकडाऊन केलं, धारावीचे प्रश्न हाताळले ते अतिशय कौतुकास्पद आहे. दुसरं म्हणजे बहुतेक लोक सूचना पाळतात. अमेरिकेत मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतं. गेले चार-पाच महिने डॉक्टर, नर्सेस, टेक्नीशियन आणि इतर कर्मचारी रोज १०-१२ तास अशी चिलखतं घालून वावरत आहेत, आणि इथे लोकांना शॉपिंगला जाताना मास्क घालावा लागला तर ते व्यक्तीस्वातंत्र्याचं सांगतात. अशा लोकांमुळे इतरांना त्रास होतो याची त्यांना खंत नसते. मला या लोकांच्या वागणुकीचा, उर्मटपणाचा राग येतो. एव्हरी लॉस्ट लाइफ इज अ ट्रॅजडी.” डॉ. मयूर म्हणाले.

अगदी खरं आहे, आणि अमेरिकेत अशा एक लाख ४५ हजार ट्रॅजडीज झाल्या आहेत. त्यातल्या काही टाळता आल्या असत्या.”

यातून काही चांगलंही बाहेर आलं आहे. कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याचं महत्व कळलं आहे. सोशल मिडीयावर एकमेकांना आधार देणारे डॉक्टरांचे ग्रुप तयार झाले आहेत. मुलांचा अभ्यास घेताना शिक्षकांबद्द्लचा आदर वाढला आहे. घरी जेवतो त्यामुळे हेल्दी फूड खाल्लं जातंय. दवाखान्यात अनेक संस्था अन्न आणून द्यायच्या. लोकांचा सेवाभाव तेव्हा अनुभवायला मिळाला.” डॉ. मयूर म्हणाले. डोन्ट स्टॉप बिलीव्हिंग, असा एक आशेचा किरण घेऊन आमची मुलाखत संपली

डॉ. अमोल रांगणेकर

(जी.आय.स्पेशालिस्ट, हिपॅटोलॉजिस्ट, जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटी, वॉशिग्टन डीसी)

अमोल लिव्हर स्पेशालिस्ट आहे. अमोलचे पेशंट म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लान्टसाठी वाट पहाणारे. हे पेशंट दवाखान्यात येतात तेव्हाच अतिशय आजारी असतात. त्यात कोव्हिडची लागण झाली असेल तर त्यांची आणखीनच विकल अवस्था होते. कधी कधी ते हॉस्पिटलमध्ये त्यांच्या दुखण्यासाठी भरती होतात आणि तिथेच त्यांना कोव्हिडचा संसर्ग होतो. सुरवातीला अशा काही केसेस झाल्या. त्यानंतर वेगळाच प्रश्न उभा राहिला. आजारी पेशंट कोव्हिडच्या भीतीने हॉस्पिटलमध्ये येईनासे झाले. मार्च-एप्रिलपासून ट्रान्सप्लान्टच्या केसेस खूप कमी झाल्या. जॉर्जटाऊन हे अमेरिकेतील आघाडीचं लिव्हर ट्रान्सप्लान्ट सेंटर आहे. त्या सर्जरीवर हॉस्पिटलचं मुख्य उत्पन्न अवलंबून असतं. परिणामी कोव्हिडमुळे हॉस्पिटलच्या उत्पन्नावर परिणाम झाला.

काही महिन्यांपासून लिव्हर डोनरसाठी वाट पहाणारे पेशंट, याकाळात डोनर मिळाला तरीही हॉस्पिटलमध्ये येण्याचं नाकारत होते. इथे येऊन कोव्हिडने एकटं मरण्यापेक्षा घरी कुटुंबाच्या सहवासात मरण्याचा निर्णय काही पेशंट घेत होते. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा परिस्थितीत पेशंट घरी राहण्याचा निर्णय घेतात ते थोडसं बरोबरच असतं, असं डॉ. अमोल म्हणतात. कारण पेशंट एकदा कोव्हिड पॉझिटिव्ह निघाला की इतर कुणाला त्याला भेटण्याची, पाहण्याची परवानगी नसते. कोव्हिडने जे पेशंट मरतात, त्यांच्या सोबत फक्त तिथल्या नर्सेस असतात. त्याच पेशंटच्या कुटुंबाला आय-पॅडवर पेशंटची अवस्था दाखवतात.

हे सगळेच डॉक्टर्स त्यांच्या नर्सेसबद्दल अतिशय आदराने बोलत होते. नर्सेस आपला शारिरीक आणि मानसिक ताण विसरून पेशंटची काळजी घेतात, त्यांना आधार देतात, त्यांच्या कुटुंबाला समजावतात. तुमच्या पेशंटच्या अखेरच्या क्षणी मी त्यांचा हात धरून बसले होते, ते एकटे नव्हते, असं सांगून सांत्वन करतात. व्हेंटीलेटरच्या घरघरीतून आणि स्वत:च्या मास्कमधून पेशंटला समजावं म्हणून मोठमोठ्याने बोलत राहतात. आधार देतात. नेहमीच्या नर्सिंगपेक्षा हे काम दुप्पट अवघड झालं आहे. यात काही नर्सेस स्वतःचं आयुष्यही गमावतात. एका आकडेवारीनुसार आत्तापर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे 851 नर्सेस आणि डॉक्टर मृत्युमुखी पडले आहेत.

समाजाच्या स्वास्थ्यासाठी झटणारे हे देवदूत! टाळ्यांचे गजर, ताटल्याचे आवाज या कशातच न सामावणारा त्याग करणार्या सर्व डॉक्टर, नर्सेस, टेक्नीशियन आणि त्या क्षेत्रातील इतर कर्मचार्यांना मानाचा मुजरा करावासा वाटतो

डॉ. प्रियांका

(संसर्गजन्य रोगतज्ज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट)

डॉ. प्रियांका प्रयोगशाळेत कोरोनाच्या टेस्टिंगचं काम करते. तिथे शंभर-एक तंत्रज्ञ आहेत. तिला दिवसाचे १०-१२ तास प्रोटिक्टिव गिअरमध्येच काम करावं लागतं. एन-९५ मास्क सतत वापरल्याने कधी कधी नाकाजवळ जखमा होतात. मग मास्क घालता येत नाही म्हणून फक्त एखादा दिवस सुटी मिळते.

सुरवातीला दिवसाला २०-२५ टेस्टस् असत, आता रोज जवळपास २००० टेस्ट सँम्पल्स येत असतात. म्हणजे ती आणि तिचे सहकारी दिवसचे दिवस त्याच कोव्हिडच्या वातावरणात राहतात. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत काम, घरी आल्यावर आंघोळ, नंतर जेवण, आणि झोप अशा दिनक्रमामध्ये जगाशी संपर्क तुटल्यासारखं झालं आहे. चार महिन्यात बाहेरच्या कोणाशीही संबंध नाही. लॅबमध्ये फोन वापरता येत नाही. लॅबच्या बाहेर सँपल घेतात तिथे ५००-७०० लोकांची रीघ लागलेली असते. सध्याच्या टेस्टिंगमध्ये १२ तासांत निकाल येतात आणि इतर सोपस्कार होऊन तीन-एक दिवसांत पेशंटपर्यंत पोहोचतात.

प्रियांकाच्या घरी तिचे आईवडील आहेत. पण ते साठीच्या वर असल्याने, त्यांच्या काळजीपोटी तिने आपली खोली वरच्या मजल्यावर हलवली आहे. इन्फेक्शनच्या भीतीने आईवडिलांच्या संपर्कात न येण्याचा ती आटोकाट प्रयत्न करते. जेवणाचं ताटसुद्धा दुरूनच त्यांच्याकडून घेते. तरी रोज ती घरी येईपर्यंत तिची आई वाट पाहत जागत बसलेली असते.

गेले ४-५ महिने हे लोक व्यक्तिगत आयुष्यं खुंटीवर टांगून, चिलखतं घालून दिवसाचे १०-१२ तास काम करताहेत! त्यांचे कष्ट, त्याग लक्षात घेऊन आपण आपली कर्तव्यं (मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता) चोखपणे पार पाडायला हवीत.

 

नीलिमा कुलकर्णी

रेस्टन, व्हर्जिनिया, यूएसए

                                                                                                                                   neelimakulkarni@yahoo.com

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८