सैनिकहो, तुमच्यासाठी - अनिल परांजपे

सीमेवर लढणारे सैनिक, त्यांचं शौर्य, त्यांचा त्याग म्हणजे आपल्या दृष्टीने देशभक्तीची परिसीमा.. आणि शत्रुराष्ट्राचे सैनिक म्हणजे?

मी अमेरिकेत असतानाची गोष्ट आहे. कारगिल युद्ध नुकतंच संपलं होतं. त्याचं गांभीर्य उशिरा का होईना पण कळलं होतं. आपापल्या ऐपतीप्रमाणे, किंवा दानतीप्रमाणे म्हणू या खरं तर, लोकांची देशभक्ती जागृत झाली होती. तो सोशल मीडियापूर्वीचा काळ होता. आमच्याकडे अमेरिकेत कारगिल युद्धाच्या बातम्या खूपच संक्षिप्तपणे आणि फारसं महत्त्व न देता पोचत होत्या. आधीच अमेरिकन वृत्तमाध्यमांची इतर जगातल्या बातम्यांबद्दलची उदासीनता आणि त्यात संदेशसाधनांच्या तुटपुंजेपणाचा फाल्गुनमास!

त्या दिवशी आमच्या ऑरेगन मराठी मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक सुरू होती. कुठला तरी कार्यक्रम येऊ घातला होता, त्याच्या तयारीसाठी सदस्य जमले होते. बैठकीत कारगिलचा मुद्दा निघाला. अपेक्षेप्रमाणे बर्याचजणांना ती एकबॉर्डर स्कर्मिशच वाटत होती. त्याची व्याप्ती आणि गांभीर्य याबद्दल थोडी चर्चा झाली. रीतसरपणे लोकांनीहो ना, हे पाकिस्तानी म्हणजे... मुसलमान म्हणजे... राजकारणी म्हणजे...’ असे नेहमीचे वांझोटे खडे फोडून घेतले. ‘आपल्या डिफेन्सच्या लॅब्ज म्हणजे कशा नालायक आहेत... देशाचा विचार कोणीच कसा करत नाहीवगैरे अत्यंतखोलातलंविश्लेषणही झालं. मंडळी देशाबद्दल इतकी कनवाळू मूडमध्ये आहेत म्हटल्यावर मी युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी मदत गोळा करण्याचा प्रस्ताव मांडला. ‘हो, देशासाठी एवढं तरी आपण केलंच पाहिजेम्हणत त्यावर लगेच एकमतही झालं.

आपण असं करू या, परवाच्या प्रोग्रॅमनंतर दारात एक पेटी ठेवू या.” अध्यक्षांची अतिशयइनोव्हेटिव्हकल्पना आली.

अं.. आपण जरा जास्त अॅक्टिव्हली नाही का काही करू शकणार? म्हणजे आत्तापासूनच लोकांना फोन करून, त्यांच्याकडून प्लेजेस घेऊन, मग त्यांना कार्यक्रमाच्या दिवशी तिथेच चेक आणायला सांगू म्हणजे सोपं जाईल. शिवाय लोकांना फार माहीत नाहीये या युद्धाबद्दल. फोनवरून त्यांना नीट माहिती पण देता येईल. त्यांना गांभीर्य कळलं की लोक देतील नीट पैसे. नुसती आयत्या वेळी पेटी ठेवली तर त्या वेळी लोकांकडे चेकबुक वगैरे नसतं आणि कॅशही फारशी नसते. मग पंचाईत होते.” मी एक प्रॅक्टिकल मुद्दा मांडला (असं मला वाटलं).

अरे, पण नाही तरी लोक किती देणार देऊन देऊन? पाच-दहा डॉलर्स फार तर फार!” अध्यक्षांनी झटकून टाकलं.

पाच-दहा डॉलर्स? फार तर फार? आयुष्याची राखरांगोळी करायला तयार असलेले आपलेच देशबंधू आणि त्यांच्यासाठी अमेरिकेतले सधन भारतीय पाच-दहा डॉलर्स पणाला लावायला किटकिट करतात आणि आपण ते निमूट ऐकून घ्यायचं? माझा पेशन्स संपला. आपण किती मुर्दाड असावं ते प्रत्येकाने आपलं आपण ठरवायचं, अशा निश्चयी सुरात मी म्हटलं, “या बाराजणांच्या आपल्या कमिटीतून आत्ताच्या आत्ता बसल्या बैठकीला बारा हजार डॉलर्स कमिट झाले नाहीत तर मला या कमिटीत राहण्याचीही इच्छा नाहीये!”

मगहो... नाही... नवऱ्याला विचारून सांगते... बायको काय म्हणेल ते...’ असं करत करत दोन हजार डॉलर्स तिथेच जमले. बैठकीतून मी निघालो, पण अतिशय कडवट चव तोंडात ठेवूनच. खरंच काही भरघोस करायचं असेल तर खूप लोकांकडे जायला लागणारेय, ही खूणगाठही मनाशी बांधली. सुदैवाने ती संधी लगेचच चालून आली.

पोर्टलंडच्या पायोनियर स्क्वेअरमधेइंडिया फेस्टिवलभरणार होता. तिथे एकाच्या स्टॉलमधला एक कोपरा मिळवला, पोस्टर्स तयार केली आणि उत्साहाने तिथे जाऊन बसलो. गर्दी भरपूर होती- भारतीय आणि अभारतीयही; पण पैसे फार जमेनात. दुपार झाली. पोर्टलंडच्या नेहमीच्या ढगाळ वातावरणाचा मागमूसही नव्हता. सूर्य दिवसभर भाजून काढत होता. शेवटी एका ठिकाणी उभे न राहता लोकांत फिरून, मिसळून पैसे जमवायचं ठरवलं. आमच्या स्टॉलच्या रांगेला काटकोनात खाद्यपदार्थांचे असंख्य स्टॉल्स होते. तिथे लागलेल्या रांगा आमच्याच स्टॉलवरून जात होत्या. रांगेतले लोक, बहुतेक भारतीय, आमच्याकडे बघत होते; पण खाण्याची रांग सोडून कुणी जवळ येत नव्हतं. शेवटी मीच तिथे गेलो. ओळखीचा एकजण दिसला. मराठीच होता. माझ्याच कंपनीत कामाला होता. बराचसा सीनियर. म्हटलं, याच्याचपासून सुरुवात करू.

हाय, हॅलोझाल्यावर त्याला विषय सांगितला. पैसे मागितले. तो क्षणभर विचारात पडला, पण लगेच सावरला आणि म्हणाला, “अरे, माझ्या वडिलांनी तिकडूनच पैसे दिलेत. मी त्यांना म्हटलं, माझ्याही नावाने देऊन टाका.” बोलताना त्याच्या चेहर्यावर मला चपखल उत्तर देऊन गप्प केल्याचा बेरड भाव होता. तरीही मी संयम ठेवून त्याला आणखी पाच-पन्नास डॉलर्स द्यायची विनंती केली. त्याने झुरळासारखं झटकलं. त्याचा वडापावच्या रांगेतला नंबर आला होता! कुठे तरी वाचलेलं आठवलं- भारतीय पायलट्सना प्रत्येक बाँबिंग सॉर्टीसाठी ५३० रुपयांचा भरघोस सरकारी भत्ता खास जिवाशी खेळण्याबद्दल मिळत होता. तेवढ्या रकमेत एक-दीड वडापाव आला असता! त्याने अनेक वडापाव घेतले होते. प्रत्येकी पाच डॉलर्सचा तो एक-एक वडापाव मला बाँबसारखा वाटायला लागला. माझा माझ्यावरचा ताबा सुटला. मी त्याला म्हटलं, “वडापावचे पैसे तू वडिलांना द्यायला लावत नाहीस हे नशीबच आहे त्यांचं!” तो अर्थातच उचकला. त्याच्याकडूनमाइंड योर बिझनेसचा सल्ला पदरात पाडून घेऊन मी विमनस्कपणे परत आलो.

माणूस आपल्या देशाशी असलेली नाळ अशी इतकी कापून टाकू शकतो? अगदी दुसर्या देशाचं नागरिकत्व घेतलं तरी? अगदी सगळं खानदान भारत सोडूनइकडेचआलं असलं तरी? आपल्याला ज्या देशाने, समाजाने घडवलं त्याच्याबद्दल थोडंसंही ममत्व किंवा उत्तरदायित्व वाटू नये? जाऊ द्या. या देश, समाज अॅब्स्ट्रॅक्ट कल्पना आहेत. नाही एखाद्याला झेपत. पण माणसं भयानक रीतीने मेलीयेत. त्यांची बायका-मुलं आता त्याच जगाशी एकटी झगडणारेत, ज्या जगाची जराही तोशीस आपल्या कुटुंबाला लागू नये म्हणून आपण इतके धडपडतो, ही पण सल वाटू नये? आणि तसं म्हणायचं झालं तर कुठली सामान्य माणसं आहेत का ही? ऐश करत मेलीयेत का? त्यांना आपल्यासारखे करंटे खरं तर कसली कपाळाची मदत करणार? त्यांना पैसे देणं ही मदत किंवा आदर नसतो, तर आपल्याला उतराई होण्याची संधी असते. या मस्तवालांना ते कधी कळेल? का हे आपल्या देशापासून, लोकांपासून इतके लांब राहायला लागल्यावर अंगीकारलेलं कोपिंग मेकॅनिझम असतं?... आधीच उन्हाने काहिली झालेली. विचारांनी डोकं आणखीनच भंजाळून गेलं. सगळं सोडून तिथून निघून जावंसं वाटायला लागलं.

कुणाच्या नावाने लिहायचा रे चेक?” या प्रश्नाने मी भानावर आलो. समोर माझा बॉस उभा होता. मी जरासं यंत्रवतच उत्तर दिलं असणार. त्याने काहीही न बोलता पाच हजार डॉलर्सचा चेक फाडून माझ्या हातात ठेवला. त्या एका उमद्या माणसाच्या कृपेने काही तरी अर्थपूर्ण रक्कम जमण्याची शक्यता निर्माण झाली. मला जरा हुरूप आला, पण विषण्णता काही जाईना.

असाच काही वेळ गेला. एक स्त्री आमच्या स्टॉलजवळ आली. ती साधारण पस्तिशीच्या आसपासची असावी. गोरी, नीटस. अंगात साधाच पंजाबी ड्रेस, त्यावर काहीसा विटका जर्किन, त्या उन्हातही घातलेला. तिच्या हातात कसलीशी प्लॅस्टिकची शॉपिंग बॅग होती, बरीच वापरलेली वाटत होती. ती हलक्या पावलांनी जवळ आली. तिने आम्ही लावलेली पोस्टर्स नीट वेळ देऊन वाचली. मला तिच्याकडून फार अपेक्षाच वाटली नाही. तरीही मी उसन्या उत्साहाने तिला माहिती द्यायला सुरुवात केली. मला अचानक थांबवून ती म्हणाली, “मी पैसे दिले तर चालतील?”

म्हणजे? का नाही? त्यासाठीच तर मी बसलोय इथे!” मी हसून म्हटलं.

पण मला फार मदत करता येणार नाही. तशी माझी परिस्थिती नाही. पंचवीस डॉलर्स चालतील?”

अहो, कितीही चालतील. तुम्ही देशासाठी हे करताय हेच मोठं आहे.” मी अगदी मनापासून म्हणालो.

तिने पंचवीस डॉलर्सचा चेक हातावर ठेवला. प्रतिक्षिप्तपणे मी तो सहज वाचला. ती मुस्लिम होती. मला एकदम शंका आली. वाईट वाटलं. मी विचारलं, “माफ करा, पण मघाशी तुमचे पैसे मी घेईन का म्हणून विचारलंत ते का? तुम्ही मुस्लिम आहात म्हणून?”

मुस्लिम म्हणून नाही, मी पाकिस्तानी आहे म्हणून.” ती सहजपणे म्हणाली.

काही क्षण, काही भेटी, काही संवाद आपल्याला समूळ हलवून बदलतात. तो असाच क्षण होता. मी अक्षरशः हादरलो. काही सेकंदांच्या अवघडलेल्या शांततेनंतर मी कसाबसा बोललो, “पाकिस्तानी? हे पैसे फक्त भारतीय सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी आहेत हे तुम्हाला माहिती आहे ना?” तिच्या अलौकिक माणुसकीपुढे माझं राष्ट्रप्रेम मला आयुष्यात पहिल्यांदाच अतिशय बेगडी आणि संकुचित वाटलं, तरीही तिला हे विचारणं भाग होतं.

हो. पाकिस्तानी सैनिकांसाठी कुणी पैसे गोळा करत असलं तर त्यांना वेगळे देईन मी.” ती काहीशा निरागसपणे म्हणाली.

त्यावर काय बोलायचं हे न कळून मी गप्प बसलो. मला त्या संभ्रमातून सोडवत ती म्हणाली, “गेलेला सैनिक नसतो, तो फक्त माणूस असतो. त्याला धर्म नसतो, देश नसतो. त्याला फक्त कुटुंब असतं. आणि त्यांना अतिशय दुःख असतं. बास. बाकी काही नाही. म्हणून तू कुणासाठी पैसे गोळा करतोयस ते महत्त्वाचं नाहीये. करतोयस हेच आणि एवढंच महत्त्वाचं आहे.”

मला अक्षरशः रडू कोसळलं. तिचा चेक खिशात वेगळा ठेवता ठेवता मी तिलाथँक यूएवढंच म्हणू शकलो. आणखी काही बोलून तिचं आणि तिच्या शब्दांचं पवित्र वलय दूषित करण्याची माझी इच्छा नव्हती. ती फक्त हसली, ते कळल्यासारखी आणि निघून गेली. मी नंतर बराच वेळ सुन्न बसून होतो. सैनिकांसाठी पैसे जमवता जमवता स्वत:साठी काही तरी फार मोठं जमलं होतं.

माझं बऱ्याच वेळा असं होतं, की वेळ निघून गेल्यावरअरे, खरं तर हे असं असं आपण म्हणायला पाहिजे होतंअसं वाटत राहतं. ती गेल्यावरही मी किती तरी वेळ असले विचार करत बसलो होतो. त्यातच एक विचार मनात चमकून गेला, की तिला म्हणायला पाहिजे होतं, ‘पाकिस्तानी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी कुठे पैसे पाठवायचे ते कळलं तर तेही करीन.’ पण नाही सुचलं तेव्हा. कसं सुचणार म्हणा... त्यासाठी तिच्याइतकं मोठं असावं लागतं!

अनिल परांजपे

                                                                  amparanjape@gmail.com

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८