कोरोनाशी दुहेरी लढाई - अभय जगताप



मार्चचा दुसरा आठवडा होता. सुट्टी घेऊन सातारा जिल्ह्यातील आमच्या गावी यात्रेसाठी गेलो होतो. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बरीच बंधनं होती. गर्दी टाळत देवदर्शन घेतलं आणि फोन वाजला. कोरोनाच्या संदर्भात कस्तुरबा रुग्णालयात सोमवारी बैठक आहे आणि त्यात हजर राहणं आवश्यक आहे, असा ऑफिसच्या सहकाऱ्यांनी निरोप दिला. मी बृहन्मुंबई मनपामध्ये अभियंता आहे. कस्तुरबा रुग्णालयाचं परीरक्षण माझ्या खात्याकडे असल्याने ही बैठक महत्वाची होती. सोमवारी सकाळी कस्तुरबाला पोहोचलो. आणि मग काय, तिथून खेचलोच गेलो कोरोनाविरुद्धच्या संघर्षात!

पुढील तीन महिने आम्ही विविध पातळ्यांवर ही लढाई लढत होतो. कस्तुरबा रुग्णालयात आवश्यक त्या वाढीव सोयी करून घेणं, तेथील आपत्कालीन कक्षामध्ये नेमून दिलेल्या दिवशी कक्षप्रमुख म्हणून व्यवस्था हाताळणं, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्णांचा माग काढणं, रुग्ण आणि त्यांच्या परिवारासाठी विलगीकरणाची व्यवस्था करणं, प्रतिबंधित क्षेत्राचं नियमन, प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना व्यवस्था पुरवणं, या सर्व कामासाठी विविध खात्यातील कर्मचाऱ्यांना कामं नेमून देणं, त्यांना कामासाठी प्रवृत्त करणं, त्यांच्या अडचणी सोडवणं, त्यांच्या राहण्या-जेवण्याची व्यवस्था करणं, बेस्ट प्रशासनाशी संपर्क राखत घरून येणाऱ्या कामगारांसाठी बसगाड्या उपलब्ध करून देणं, साहित्य खरेदी करणं आणि त्याचबरोबर तब्बल १००० खाटांचं तात्पुरतं रुग्णालय उभं करणं, अशी विविध कामं आम्ही सगळेच करत होतो.

खातेप्रमुख या नात्याने जबाबदारी होती, कामाचा ताण होताच. त्यात काही सहकार्यांना या काळात कोरोनाची लागण झाली. त्यांचं मनोधैर्य टिकवणं, त्यांची व्यवस्था पाहणं, त्याच बरोबर अन्य सहकार्यांचा उत्साह टिकवून ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेणं हे अत्यंत जिकिरीचं काम होतं. रोज घरी न येता ऑफिसजवळच्या एका हॉटेलमध्ये रात्रीचा मुक्काम करत होतो. विश्रांती, सुट्टी हे शब्दच हरवले होते. रोज अनेकांना भेटणं व्हायचं, अनेक ठिकाणी जावं लागायचं. डॉक्टर-नर्स-वार्डबॉय यांच्याशी वारंवार संपर्क यायचा. अगदी विलगीकरण कक्षातही जाणं व्हायचं. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सर्व खबरदारी घेत होतो. तरी माशी कुठे शिंकली तेच समजलं नाही.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस अंगात कणकण जाणवू लागली. लगेच सावध झालो, स्वतःला इतरांपासून वेगळं केलं, पॅरासीटेमॉल गोळी घेतली आणि झोपलो. दुस-या दिवशी घशामध्ये किंचित खवखव वाटायला लागली. कणकण सुद्धा वाढली. त्यातच आमच्या सहाय्यक आयुक्तांच्या स्वॅब टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना त्याआधी दोन-तीन दिवसांपासून ताप येत होता. मी कामानिमित्त कायम त्यांच्या संपर्कात होतो. एकत्र प्रवास, एकत्र बैठका, जेवण सुद्धा आम्ही बर्याचदा एकत्र घ्यायचो. त्यामुळे साहजिक मनात शंका आली. लगेच मनपाच्याच दवाखान्यात गेलो, चेस्ट स्कॅन केलं. त्यात हलकं इन्फेक्शन आढळून आलं. डॉक्टरांचं म्हणणं पडलं, की हे कोविडमुळेच असेल असं नाही, परंतु चाचणी केली पाहिजे.

थोडासा ताप आणि खोकला असल्यामुळे दवाखान्यातून दिलेली औषधं सुरू केली. कपालभाती आणि श्वसनाचे व्यायाम सुरू केले. माझा लहान भाऊ कोविड रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून काम करत होता. मागच्या महिन्यात त्याला कोरोना संसर्ग झाला होता, पण तो १५ दिवसांत पूर्ण बरा झाला होता. त्याच्या अनुभवावरून वाफ घेण्यास सुरुवात केली. दोन दिवस असेच गेले. शेवटी टेस्ट करायचं ठरवलं.

त्याआधी तब्बल तीन वेळा स्वॅब टेस्ट केली होती आणि ती निगेटिव्ह आली होती. पण आताची परिस्थिती वेगळी होती. आता लक्षणं स्पष्ट होती. शेवटी अंदाज खरा ठरलाच. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यातल्या त्यात हे चांगलं होतं, की कुटुंबातील सर्वांची हे सत्य स्वीकारण्याची मनाची तयारी झालेली होती. तरीही व्हिडीओ कॉलवर बायकोशी बोलताना तिच्या डोळ्यांत साठलेलं पाणी पाहून थोडेसे का होईना डोळे पाणावले होते. पण धीर सोडणं योग्य नव्हतं.

औषधं चालू होती, पण पुढचे तीन दिवस ताप वाढत राहिला. मग मात्र वोकहार्ड रुग्णालयात दाखल झालो. सुरुवातीच्या तपासण्या झाल्यानंतर मला १६३७ क्रमांकाच्या खाटेवर नेऊन सोडण्यात आलं. आता पुढील काही दिवस १६३७ हीच माझी ओळख असणार होती. ताप वगळता बाकी रक्तदाब, रक्तशर्करा, ऑक्सिजन पातळी, नाडीचे ठोके सामान्य होते. त्यामुळे फार चिंतेचं कारण नव्हतं. पण रुग्णालयातील वातावरण वेगळंच वाटतं. तरी शेजारच्या खाटेवरील गृहस्थ बोलके होते. त्यांनी लगेच गप्पा मारायला सुरुवात केली. त्यामुळे ताण कमी झाला. डॉक्टर, नर्स यांचंही बोलणं धीर देणारं होतं. योग्य ते औषधोपचार आणि विश्रांती यामुळे तिसऱ्याच दिवशी माझा ताप उतरला. खोकला सुद्धा खूपच कमी झाला होता. श्वसनाचे व्यायाम वगैरे सुरू होतेच. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा कोर्स पूर्ण केला. आणि परत एकदा कोरोना टेस्ट करून घेतली. आपणच उभ्या केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात जाऊन परत टेस्ट करण्याचा आनंद होताच. शिवाय या खेपेस तो आनंद अनुभवू शकत होतो.

... आणि तो दिवस उजाडला. दुपारी जेवणाची तयारी करत होतो. इतक्यात फोनवर डॉक्टरांचा मेसेज आला, निगेटिव्ह. तो शब्द त्या क्षणाला इतका पॉझिटिव्ह वाटला म्हणून सांगू! त्याच आनंदात पटापट सामान आवरलं आणि घरी निघालो. गेल्या पंधरा दिवसांचा एकांतवास आज संपत होता. माणसांची सवय असणारा, माणसांमध्ये रमणारा मी परत माणसांमध्ये निघालो होतो.

अभय जगताप

ठाणे

९८६९१७६८५८

 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८