कोरोनाव्हायरस, आपण आणि मानसतीर्थयात्रा - आशिष महाबळ

 


कोरोनाव्हायरसचं संकट अभूतपूर्व असलं तरी तेदेखील निसर्गचक्राचाच एक भाग आहे. जर आपण हे समजून घेतलं तरच उद्याच्या संकटांना तोंड देण्याची तयारी आपण करू शकू. ते समजून घेण्यासाठी गरज आहे मानसतीर्थयात्रेची. अर्थात स्वमनात वाकून पाहण्याची. 

कोरोनाव्हायरसचं थैमान पाहून शिव रुद्रावतार धारण करतो तो हाच का, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. काही लोक असंही म्हणताहेत, की निसर्गाला मानवाच्या अत्याचारानंतर पुनर्बांधणीची ही संधी आहे आणि अनेक ठिकाणी तसं होताना आपल्याला दिसतं आहे.

खरंतर निसर्गबाह्य काहीच नसतं. निसर्ग प्रयोगशील असतो, पण हे प्रयोग विशिष्ट ध्येयांकडे मार्गक्रमण करणारे नसतात. सुरुवातीचे जीव एकपेशियांपासून बहुपेशीय बनले ते त्यांना मिळालेल्या योग्य परिस्थितीमुळे. त्यानंतरचे जीव पाण्यातून बाहेर येऊन जमिनीवर राहू लागले ते त्यांना अशाच आपोआप घडणार्‍या प्रयोगांमधून लाभलेल्या बदलांमुळे. होता होता पृथ्वीवरील जीवसृष्टीची मानवात परिणती झाली. मानवाने आधीच्या प्राण्यांपेक्षा जास्त साधनं वापरूनस्वतःच्या शरीराबाहेरही उत्क्रांती घडवून आणली, पण हाही खरंतर निसर्गाचा एक प्रयोगच.

आपल्याला कुठे पोहोचायचं आहे हे आपण ठरवू शकतो, पण ते एका मर्यादित प्रमाणात. निसर्गात खूप जास्त अनित्य घटक असतात. जोपर्यंत आपण इतर वस्तीयोग्य ग्रहांवर जाऊ शकत नाही तोपर्यंत वसुंधरेला आपल्या आणि इतर जीवांच्या जगण्यालायक ठेवणं हे आपल्या गरजेचं आहे. जंगलतोडीमुळे आपण जास्त प्रकारच्या प्राण्यांच्या वसाहतींच्या जवळ पोहोचलो आणि त्यामुळे वाघळांसारख्या प्राण्यांशी सख्य असलेले विषाणू आपल्या जवळ पोहोचले आणि त्यातूनच सध्याचं कोरोनाव्हायरस प्रकरण उद्भवलं. ही सर्व निसर्गाची आपसूक पडणारी पावलं आहेत. हे किंवा असं आधी अनेक ठिकाणी झालं असणार आणि नंतरही अनेक ठिकाणी होणार. प्रत्येक गोष्टीतून आपण आपल्या तात्कालिक तरीही अनेक वर्षांच्या आयुष्यात धडे घेत पुढे सरकत राहायचं.

लॉकडाऊनच्या पहिल्या महिन्यात अनेकांनी कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांवर नजर ठेवली, सांगितलेल्या गोष्टी पाळल्या. पण ते फार काही टिकलं नाही. लवकरच अनेकांना तो तुरुंगवास भासू लागला. बाहेर जेवायला जाणं, सिनेमे पाहणं, मित्र-मैत्रिणींना भेटणं अशा सर्व नेहमीच्या आणि अध्याहृत असलेल्या गोष्टी बंद झाल्या होत्या. काही लोकांनी सकारण अधूनमधून नियम तोडणं सुरू केलं, तर काही लोकांनी सरळ म्हटलं, की नियम पाळण्याने काही होत नाही. अविवेकी वागणं हे जणू अनेकांच्या स्वभावातच असतं. स्वभाव आणि निसर्ग या दोन्ही शब्दांना इंग्रजीत ‘नेचर’ असं म्हणतात आणि त्यात काहीच वावगं नाही हेच यावरून दिसतं. त्यामुळे कोरोना व्हायरस पसरतच राहिला.

बहुतांश लोक नियम पाळतात. नियम न पाळणारे अपवाद असतात - काही टक्के केवळ. काही टक्के लोक नियम जरा जास्तच काटेकोरपणे पाळतात. मी अनेक बाबतीत कोणी घालून दिलेले नियम न पाळणार्‍यांपैकी आहे. कोरोना व्हायरसबाबत मात्र मी नियम काटेकोरपणे, चक्क एखाद्या व्रताप्रमाणे, पाळायचा प्रयत्न करतो आहे. ते का, याबद्दल थोडं इथे नमूद करणार आहे.

काही आवश्यक सेवेतील लोकांना वेगळे नियम लागू होतात हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते जेव्हा बाहेर जातात, योग्य काळजी घेऊन इतरांच्या संपर्कात येतात, तेव्हा ते नियम तोडतात असं नाही. त्याच प्रमाणे कोणाला मदतीची आवश्यकता असेल तर सर्व काळजी घेऊन नक्कीच पुढे व्हा. नियम पाळायचे आहेत ते भीतीपोटी नसून काळजीपोटी आहेत. त्यातही वेगवेगळ्या ठिकाणी किती केसेस आहेत त्यावरूनही हे नियम बदलणार. साधारण ठोकताळ्याप्रमाणे पाच टक्के चाचण्या पॉझिटिव्ह असतील तर अत्युच्च काळजी घ्यायला हवी, शून्य असल्यास पुन्हा केसेस दिसत नाहीत तोपर्यंत हवं ते करायला अर्थातच सर्व मोकळे.

प्रत्येक रोगासाठी ‘आर झिरो’ या नावाने ओळखला जाणारा एक आकडा असतो - हा आकडा एका व्यक्तीमुळे किती व्यक्तींना तो रोग होऊ शकेल हे दर्शवतो. कोव्हिडबद्दल आपल्याला अजूनही हा आकडा नेमका कळलेला नाही. अनेक ठिकाणी याचा प्रादूर्भाव वेगवेगळ्या प्रकारे झालेला आहे, पण ज्या प्रमाणात झाला आहे त्यावरून याचं मूल्य दोन तरी असावं असं दिसतं आहे. म्हणजे कोव्हिड प्रत्येक व्यक्तीपासून आणखी दोन व्यक्तींना होऊ शकेल असा आहे. म्हणजे कोव्हिड प्रत्येक व्यक्तीपासून आणखी दोन व्यक्तींना होऊ शकेल असा आहे. काही लोकांमध्ये बाह्य लक्षणं दिसत नसल्यामुळे तो नकळत आणि सहजरित्या पसरू शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुदा काही प्रभावी प्रसारकांमुळे कोव्हिड जास्त पसरला आहे. म्हणजे अनेक लोक फार काही रोग पसरवत नाहीत, पण काही लोक खूप जास्त पसरवतात. इतिहासात इतर रोगांबाबतही अशी अनेक उदाहरणं आहेत - टायफाईड मेरी, ट्युबरक्युलॉसीस वगैरे. (संदर्भ :१)

‘लक्षणविरहित प्रसार’ आणि ‘अतिप्रभावी प्रसार’ या दोन बाबी एकत्र केल्या तर तुम्हाला कोणामुळे संसर्ग होऊ शकेल हे कळणं कठीण होतं- तुम्ही किराणा आणायला गेले असताना तुमच्या शेजारून जाणारा दुकानातील कर्मचारी, तुमचा एखादा सहकारी, की इतरांना भेटत असलेले तुमचे पती/पत्नी? किरणोत्सारात हाफ-लाइफ म्हणून एक प्रकार असतो. एखाद्या किरणोत्सारी पदार्थातील अर्धे अणू किती वेळात दुसर्‍या अणूंमध्ये रूपांतरित होतात हे या आकड्यावरून कळतं. आश्चर्याची गोष्ट अशी की नेमके कोणते अणू बदलतील आणि केव्हा हे आपण सांगू शकत नाही, पण तेवढ्या वेळात अर्धे होतील हे मात्र नक्की. तद्वतच आपण प्रभावी प्रसारक कोण आणि लक्षणविरहित प्रसारक कोण हे सांगू शकत नाही. ते कळलं असतं तर आपण विवक्षित काळजी घेऊ शकलो असतो. अशा व्यक्तींची लक्षणं जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत कोणतीही व्यक्ती, आपण स्वतः सुद्धा, या प्रकारात मोडू शकतो हे धरूनच वागायला हवं.

एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी, की कोव्हीड-१९ साध्या फ्लू सारखा नाही, तर त्यापेक्षा कितीतरी पटीने संसर्गजन्य आहे, उपचार न झाल्यास तो जास्त दिवस टिकतो, हॉस्पिटलायझेशनची टक्केवारी जास्त आहे, मृत्युही जास्त पटीने होतात. (संदर्भ :२) प्रत्येकाला याची बाधा होईलच असं नाही आणि प्रत्येकात लक्षणं तीव्र असतीलच असं नाही. एकूण काय तर कोव्हीड-१९ व्हायची शक्यता कमी असेल, झाल्यास त्यापासून आपण वाचू पण, पण डिसऑर्डर्स असलेले आणि प्रतिकारशक्ती कमी झालेले लोक आपल्यामुळे दगावू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी अजून एखादी लस किंवा रामबाण औषध उपलब्ध नाही. ज्या चाचण्या आहेत त्यातही ३० टक्के निगेटिव्ह्ज चुकीचे असू शकतात. म्हणजे चाचणीद्वारे तुम्हाला कळलं, की तुम्हाला कोरोनाव्हायरसची लागण झालेली नाही तरीही त्यातील ३० टक्के लोकांना झालेली असू शकते.

शंभरातील ९९ टक्के लोकांना काहीच होणार नाही. कदाचीत हजारात ९९९ लोकांना पण काही होणार नाही. पण कोणत्या एका व्यक्तीला होईल ते सांगणं कठीण आहे. आपल्या ओळखीच्या, आपल्या आजूबाजूच्या कोणालाही होऊ शकतो आणि ती रिस्क घ्यायची की काही दिवस अजून (शक्य असल्यास) घरी राहायचं, हे आपणच ठरवायला हवं. पण इतर अनेक बाबतीत आपण असं म्हणतो तेव्हा फक्त आपलाच जीव धोक्यात असू शकतो. समजा तुम्ही कोणाला न जुमानता माउंट एव्हरेस्टवर जायचं ठरवलं तर जास्तीत जास्त तुम्ही मराल, पण कोव्हिडच्या बाबतीत तुम्ही धोका पत्करल्याने इतरांचे जीव जाऊ शकतात हे तुम्ही लक्षात घेतलं तर कदाचित नियम पाळण्याबद्दलचे तुमचे विचार बदलतील.

सांघिक प्रतिकारशक्तीबद्दल आपल्याला अजून पुरेसं माहीत नाही. २०, ४०, ७० अशी वेगवेगळी टक्केवारी त्याबद्दल सांगितलेली आढळते. कदाचित चांगली प्रतिकारशक्ती प्राप्त झाली तरी त्यानंतरही कोणा एकाला कोव्हिड होईल की नाही आणि झाल्यास तो किती घातकी असेल ते सांगणं कठीण आहे. एक साधा हिशोब करायचा: कोरोनासंबंधीचे नियम पाळल्याने आपलं काय आणि किती नुकसान होतं आहे? आणि नियम न पाळून - म्हणजेच अनावश्यक गोष्टींसाठी बाहेर जाऊन, इतरांना भेटून - आपण काय आणि किती ‘साध्य’ करणार आहोत? त्यामुळे इतर लोकांचं संभाव्यत: नुकसान होणार असेल किंवा त्यांना हानी पोहोचणार असेल तर ते टाळण्याची आपल्याला संधी असताना आपल्यातील कमकुवतपणामुळे आपण इतरांना दुःखाच्या खाईत लोटायला हवं का?

मला खरंतर प्रवास करायला खूप आवडतं. महिन्या-दोन महिन्यात एक तरी चक्कर कुठेतरी असते. गेले काही महिने मात्र केवळ व्यायामासाठी पायी फिरायला आणि किराणा आणण्याकरता मी काही वेळा बाहेर पडलो आहे. बराचसा व्यायाम देखील घरातच होतो. यात स्वतःच्या जीवाची जितकी काळजी आहे तितकीच इतरांच्या जीवांची आहे.

व्यावहारिक पातळीवर आपण हे उपाय करू शकतो. पण त्याहीपलीकडे जाऊन आपल्या वागणुकीत काही अर्थपूर्ण बदल घडवून आणले जाऊ शकतात का? या संदर्भात तत्त्वज्ञानातील तीन संकल्पना मी येथे उद्धृत करू इच्छितो. (त्यांच्याकडे वळण्याअगोदर मी हेही नमूद करतो, की सध्या शाळा आणि वाचनालय, बगीचे वगैरेसारख्या सार्वजनिक जागा बंद असल्यामुळे अनेकांचा वेळ त्यांच्या घरातील मुलांना किंवा वृद्धांना मग्न ठेवण्यात किंवा त्यांची काळजी घेण्यात जात असणार. अशा लोकांजवळ जास्त वेळ नसणार, उलट त्यांच्या आवश्यक कामांना पुरेसा वेळ मिळत नसणार. खालील काही गोष्टी त्या लोकांना लागू होत नाहीत. तसंच रुग्ण, बेरोजगार, स्थलांतरित मजूर, आदी याला अपवाद आहेत, याचीही मला जाणीव आहे.)

अनेक लोक पैसे मोजून विपश्यनेला जातात. तिथे मौनव्रत धारण करायचं असते, मित्रांपासून संबंध तुटलेला असतो. विपश्यनेमुळे खूप फायदा होतो असं त्याचा अनुभव घेतलेले लोक म्हणतात. ध्यानधारणेचे गुण गाणारे तर बरेच असतात. शक्य असल्यास सद्य परिस्थितीला ध्यानधारणेची, विपश्यनेची आयती आणि मोफत संधी समजता येईल. इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे सगळ्यांच्या भेटीगाठी खरेतर या दिवसांमध्ये जरा जास्तच होत आहेत. प्रत्यक्ष भेटी टाळण्याने इतरांना मदत होऊ शकणार असून केवळ बंडखोरी म्हणून नियम धाब्यावर बसवत असाल तर केवळ तुम्हाला झळ पोचलेली नाही म्हणजे तुमच्या दृष्टीने ते महत्वाचं नाही असं मानणंच आहे.

तीर्थयात्रांना भारतीय तत्त्वज्ञानात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तीर्थ हा शब्द ‘तृ’ या संस्कृत धातुपासून आला आहे. ‘तृ - तरति’चा वापर नदी पार करण्याबद्दल आहे, भूलोक पार करून स्वर्गलोकी जाण्याची ही ‘पोर्टल्स’ असतात. उदाहरणार्थ एखादं मंदिर, एखादी समाधी (बहुतांश तीर्थक्षेत्रांना पाण्याची नदी ओलांडून जावं लागतं). पण ही झाली स्थावर तीर्थं. तीर्थाचा दुसरा प्रकार म्हणजे जंगम तीर्थ. उदाहरणार्थ एखाद्या मंदिरातील संन्यासी, किंवा कुटुंबातील ज्ञानी. तीर्थाचा शेवटचा प्रकार असतो मानस तीर्थ, अर्थात मनाचा निग्रह. अंतर्मनात डोकावून पाहणं महत्त्वाचं - बाहेरचं सर्व मिथ्या आहे, आतलं मात्र सत्य आहे. हा भाग मला मान्य नाही, पण तुम्ही मानत असाल तर स्वतःच्या मनात वाकून पाहण्याची आणि आत्मज्ञान मिळवण्याची ही एक उचित संधी आहे. बाह्य व्यत्यय मोजके आहेत, एकांतवास जास्त मिळतो, एकाग्रता जास्त साध्य होऊ शकते. मन स्थिर ठेवण्यासाठी हे योग्य. सध्या स्थावर तीर्थांना जायला नको, जंगम तीर्थांना भेटायला नको, पण मानस तीर्थयात्रांद्वारे कोरोनाव्हायरसचा हा करूण सागर आपण करुणासागराने नक्कीच भरू शकू.

अमेरिकन कवी वॉल्ट व्हिटमन याच्या ‘लीव्ह्ज ऑफ ग्रास’मध्ये एक उत्तम कविता आहे. त्यात देवाच्या तोंडी असल्यासारखं एक वाक्य आहे : आय गिव्ह नथिंग अ‍ॅज ड्यूटीज/व्हॉट अदर्स गिव्ह अ‍ॅज ड्यूटीज, आय गिव्ह अ‍ॅज लिव्हिंग इम्पल्सेस. (मी कोणावर काही जबरदस्ती करत नाही, पण त्यांनी जे करायला हवं तसं करण्याची त्यांना मी अंतःप्रेरणा देतो.) 

अशीच अंतःप्रेरणा सगळ्यांना लाभेल अशी मला आशा आहे. मला स्वतःला माझा प्रवास पुन्हा सुरू करायला नक्कीच आवडेल, पण सर सलामत तो प्रवास पचास.

ब्रह्मांडातील अब्जावधी तार्‍यांभोवती असलेल्या अब्जावधी ग्रहांवर कितीतरी वेळा जीवनिर्मिती झाली असेल. काही ठिकाणी उत्क्रांत झाली असेल आणि अशा किंवा इतर घटनांमुळे नष्ट पण झाली असेल. नवनाथ कथासारात हनुमान मच्छिंद्रनाथाला म्हणतो, की तुझ्या-माझ्यासारखे ९९ आधी होऊन गेले आणि पुढे होत राहणार. दुसर्‍या टोकाला मॅट्रिक्समध्ये निओला तेच सांगण्यात येतं - हे रहाटगाडगं असंच चालणार. तसाच हा प्रकार समजू या. निसर्ग आपल्या मार्गाने जात राहणार. होत असलेल्या गोष्टीही निसर्गाचाच भाग आहेत. काहीही निसर्गाच्या विरुद्ध नसतं, कारण आपण सगळेही निसर्गाचाच भाग आहोत. पण आपल्या अल्पशा जीवनात आपण आपल्या निग्रहामुळे शक्य ते बदल घडवून आणू शकलो तर एका विशिष्ट दिशेने या दिशाहीन निसर्गाला थोडंतरी ढकलू शकतो. ते आपण करायला हवं, किंबहुना तसं करण्याची आपली अंतःप्रेरणा हवी. हे नुसतं सांगून कोणी मानेल असं नाही, पण हे सांगितल्यामुळे तुमच्या मेंदूतील काही केमिकल्सची योग्य देवाण-घेवाण झाली तर कदाचित या कोरोनाव्हायरसच्या लढतीत तुम्ही सच्चे लढवय्ये बनू शकाल. पण जोपर्यंत धोका आहे तोपर्यंत अत्यावश्यक नसल्यास आपण अंतर राखू शकलो तर उत्तम. हे दिवस पण सरतील, सुरक्षित लशी टोचून घेता येतील, पुन्हा बाहेर जाता येईल... आणि निमित्त कोरोनाचं असलं तरी या मानसतीर्थयात्रेसाठी एकवटलेलं मनोबळ भविष्यात अशा आणि इतर अनेक बाबींसाठी सदोदित आपली साथ देईल.

आशिष महाबळ

mahabal.ashish@gmail.com

 ...

संदर्भ

१. https://www.sciencedirect.com/science/
article/pii/S1201971211000245

२. https://www.vox.com/science-and-health/2020/3/18/21184992/
coronavirus-covid-19-flu-comparison-chart

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८