हवामान बदलामुळे नष्ट होऊ शकते मानवजात? - निरंजन घाटे
दीड लाख वर्षांपूर्वी हवामानबदलामुळे आलेल्या हिमयुगाच्या संकटात तगून राहण्यासाठी आपल्या आदिपूर्वजांनी काय केलं, यासंदर्भातील संशोधनाचा हा मागोवा. पुढच्या हिमयुगाला तोंड देताना आपलं काय होणार, हा प्रश्न उभा करणारा...
अलीकडच्या काळात माणसामुळे प्राणी-वनस्पतींच्या किती जाती नष्ट
झाल्या, याचे हिशोब मांडले जातात. त्यात चुकीचं काही नाही. पण त्यापेक्षाही
महत्त्वाची एक गोष्ट आपल्याला सांगितली जात नाही, ती म्हणजे
एकेकाळी हवामानबदलामुळे मानवजात नष्ट होण्याची वेळ आली होती आणि ती आपल्यावर
पुन्हा येण्याची शक्यता आहे. आज पृथ्वीवर सात अब्जापेक्षा जास्त माणसं वास्तव्य
करत असताना या गोष्टीवर विश्वास ठेवणं जरा अवघडच जातं, पण तशा
पुराव्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; हेही खरंच.
आजकालच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वच सजीवांचा मूलभूत अभ्यास करणं
शक्य झालं आहे. सजीवांचा पायाभूत रेणू, म्हणजे डीएनएच्या विविध मार्गांनी
झालेल्या अभ्यासानुसार एक लाख ९५ हजार वर्षांपूर्वी किंवा त्याच्याही थोडं आधी
आपले आदिपूर्वज आफ्रिका खंडात सर्वत्र अवतरले. त्या काळात वातावरण चांगलं होतं.
खायची प्यायची भ्रांत पडायचं कोणतंही कारण नव्हतं; पण माणसाचं
पृथ्वीवर झालेलं अवतरण लवकरच मोठ्या संकटात येईल अशी चिन्हं लवकरच दिसू लागली.
याला कारण अर्थातच हवामान बदल!
एक लाख ९३ हजार वर्षांपूर्वी हिमयुगाची चाहूल लागणं सुरू झालं. हे
हिमयुग १ लक्ष २३ हजार वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे सुमारे ७० हजार वर्षं टिकून
होतं. या काळात आफ्रिका खंडाचं जलवायुमान कसं होतं, कुठल्या भूभागात
जलवायुमानात कोणते बदल, कसे आणि केव्हा घडले याची सविस्तर माहिती अपुर्या पुराव्यांमुळे
उपलब्ध नाही. तरीही अगदी अलीकडच्या काळातील विविध हिमयुगांची माहिती पडताळून त्या
काळात काय घडलं असणार, याचा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला आहे. त्यानुसार त्या हिमयुगात
हवेच्या सरासरी तापमानात निश्चितच घट झाली होती. पृथ्वीचं वातावरण अतिशय शुष्क
बनलं होतं. त्या काळातल्या वाळवंटांचा विस्तार खूप जास्त होता; त्यामानाने
आजची वाळवंटं किरकोळ ठरावीत. फार मोठ्या भूभागावर हिमाच्छादन होतं. एकूण
पृथ्वीवरचा फार मोठा भूभाग मानवाच्या राहण्याच्या दृष्टीने योग्य नव्हता.
त्याकाळात पृथ्वीवरच्या आदिमानवांच्या संख्येत खूप घट झाली. तेव्हाच्या मानवी
वंशवृक्षावर काही शेकड्यात मोजावेत एवढे सदस्य शिल्लक होते. त्यात वृद्ध जवळजवळ
नव्हतेच. प्रजननक्षम जोड्यांची संख्या अगदीच कमी होती. मुलं मोठी होऊन प्रजा
निर्माण करू शकतील याची कसलीच खात्री नव्हती. त्यातून एक गोष्ट लक्षात येते. ती
म्हणजे या अगदी कमी जोड्यांचे वंशज म्हणजे आज पृथ्वीवर असलेली सर्व माणसं. त्यांचे
हे पूर्वज आफ्रिकेच्या छोट्या भौगोलिक भूभागात वस्तीला होते. या निष्कर्षाप्रत
येण्यासाठी अनेक वैज्ञानिकांचे परिश्रम कारणीभूत ठरले आहेत. त्यातले एक प्रमुख
संशोधक म्हणजे कर्टीस डब्ल्यू. मारियन.
कर्टीस हे अरिझोना विद्यापीठात मानवी उत्क्रांती आणि सामाजिक बदल या
विषयांचे प्राध्यापक आहेत. याशिवाय ते ‘इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन ओरिजिन्स’चे सदस्य
आहेत. आधुनिक मानवाचं मूळ, प्रागैतिहासिक आफ्रिकेचं जलवायुमान,
पुरापर्यावरण,
तसंच
आफ्रिकेतल्या विविध पुरातत्त्वशास्त्रीय उत्खननांमध्ये सापडलेल्या हाडांच्या
अवशेषांचाही ते विशेष अभ्यास करतात. कर्टीसना सागरकिनार्यांच्या परिस्थितीकीच्या
अभ्यासात विशेष रस आहे. दक्षिण आफ्रिकेच्या किनारी पुरापर्यावरण, पुराजलवायुमानाचा,
पुरामानवशास्त्राचा
अभ्यास करणार्या अभ्यासगटाचे ते प्रमुख आहेत.
त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या किनार्याची निवड केली त्यालाही एक कारण
होतं. त्या काळात माणूस कालवं आणि सागरी गोगलगायी खायचा. त्यामुळे सागरकिनार्यालगत
वास्तव्य करणं त्याला सोयीचं असणार. प्राचीन सागरकिनार्याच्या जवळ पण लाटांच्या
मार्यापासून सुरक्षित असा मानवी आसरा कुठे मिळेल, याचा ते शोध घेत
होते. एक लक्ष २३ हजार वर्षांपूर्वी सरासरी तापमान वाढलं आणि लाटांचा जोरही वाढला,
त्यावेळी
त्याकाळच्या आदिमानवाची वस्ती सागरकिनार्याच्या पातळीवर असती तर त्याचे अवशेष
आजच्या काळात सापडले नसते. कारण ते लाटांच्या मार्यात टिकलेच नसते. त्यामुळे
सागरकिनार्याजवळ पण उंचावर असलेली ठिकाणं तपासायची असं त्यांनी ठरवलं. माणसाच्या
वंशाची सुरुवात आफ्रिकेत झाली, ती सहाराच्या दक्षिणेकडच्या भूभागातील
गवताळ प्रदेशात झाली, हे आता मान्य झालंय. (त्या भूभागाला सोहल असं म्हटलं जातं.) त्यामुळे
या भूभागात सागरकिनारा आणि डोंगरकडे यांचं सान्निध्य कुठे आहे, हे
शोधायला त्यांनी सुरुवात केली. त्यात त्यांना पीटर निल्सेन हे दक्षिण आफ्रिकेतील
मानवशास्त्रज्ञ मदत करत होते. निल्सेन यांनी अशी एकजागा हेरली. मोसेल बे नावाच्या
शहरालगत असलेली ही जागा दक्षिण आफ्रिकेच्या हिंदी महासागराच्या किनार्यालगत आहे. तिथे
एक टेकडी हिंदी महासागरात घुसलेली आहे. तिचा उभा कडा हिंदी महासागराच्या लाटा
झेलतो. निल्सेन यांनी त्या कड्याच्यामध्ये समुद्र सपाटीपासून थोड्या उंचीवर काही
गुहा हेरल्या होत्या. सागरकिनारा खूपच खडकाळ असल्यामुळे कर्टीस आणि निल्सेन त्या
कड्यावरून दोराच्या साहाय्याने खाली उतरले.
त्यातल्या एका गुहेत त्यांना आशेचा किरण दिसला. या गुहेजवळ अवसाद होते. त्यांच्यात काही आदिमानवी अवशेष सापडले. तिथे साठलेल्या वाळूच्या ढिगात आणि कॅल्शिअम कार्बोनेटच्या स्तंभांमध्ये एक शेकोटी म्हणजे आग पेटवल्याचे पुरावे, तसंच काही पाषाण अवजारं सापडली. बर्याच गुहांना पडलेल्या चिरांमधून पाण्याचे थेंब पडतात. त्यात खडकांमधील खनिजांमधलं कॅल्शिअम कार्बोनेट विरघळलेल्या स्वरूपात असतं. ते घन स्वरूपातही वरून खाली पडतं. त्याचे स्तंभ तयार होतात. खालून वर आणि वरून खाली लोंबकळणारे हे स्तंभ या गुहेतही होते. त्यातल्या खाली असलेल्या स्तंभांमध्येही ही अवजारं आणि राख अडकलेल्या स्वरूपात होते. याचा अर्थ हे अवशेष खूपच जुने होते.
दोघांना लॉटरी लागावी, तसा आनंद झाला. तिथे जवळच एक
शहामृगपालन केंद्र होतं. त्या केंद्राच्या मालकाला ही माणसं इथं काय करताहेत याचं
कुतूहल वाटलं. न राहवून त्याने काय चाललंय याची चौकशी केली. मग त्या किनार्यावरून
कड्याच्या तळापर्यंत जायचा रस्ता दाखवलाच, पण गुहेपर्यंत चढण्यासाठी १८० पायर्यांची
एक शिडीही तयार करून दिली. त्यामुळे पुढच्या वर्षी कर्टीस आणि निल्सेन तिथे
उत्खननाच्या तयारीनेच दाखल झाले. त्यानंतरच्या काही वर्षांत त्या गुहेत आणि जवळपास
मिळालेल्या पुराव्यांवरून एक लक्ष ६४ हजार वर्षांपूर्वीपासून ते ३५ हजार
वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळातील इथल्या पर्यावरणाची आणि मानवी व्यवहारांची बरीच
माहिती त्यांना गोळा करता आली. त्या कठीण काळात आपल्या पूर्वजांनी तग धरून कसे
दिवस काढले हे लक्षात आलं.
या अभ्यासातून बर्याच गोष्टी उघड झाल्या. त्यातली एक महत्त्वाची
गोष्ट, म्हणजे आधुनिक मानवाचे म्हणून गणले जाणारे बरेच गुणधर्म आदिमानवपूर्व
काळातच मानवी शाखांनी आत्मसात केलेले होते. उदा. जाणिवा, अहंभाव या गोष्टी
आपल्याला आधीच्या मानवी शाखांकडून मिळालेल्या देणग्या आहेत. आपल्या या पूर्वजांना
शारीरिक आधुनिकतेनंतर बर्याच काळानंतर वर्तणुकीतील आधुनिकता प्राप्त झाली होती.
आधी त्यांच्याकडे प्राथमिक स्वरूपात बुद्धिमत्ता होती. त्यामुळे प्रत्येक
गोष्टीमागचा कार्यकारणभाव काय असू शकेल, याची जाणीव करून घ्यावी, हा
प्रयत्न त्यांनी केल्यामुळेच ते तग धरू शकले.
आफ्रिका खंडातून मानवी पूर्वजांच्या जाती एक एक करून नष्ट होत असताना आपले नव्याने अस्तित्वात आलेले आदिमानवी पूर्वज दक्षिण आफ्रिकेच्या या भूभागात कसेबसे जगत होते. एव्हाना त्यांची आधुनिक मानव बनण्याकडे वाटचाल चालू झाली होती. इतरत्र असलेल्या आधुनिक मानवाच्या पूर्वजांना बदलत्या हवामानाला तोंड देणं जमलं नसताना या भूभागातले आदिमानवी पूर्वज जवळच्या सागरातील शंख-शिंपल्यातले प्राणी खात होते. त्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणात प्रथिनांचा पुरवठा होत होता. तसंच आजूबाजूला उगवलेल्या वनस्पतींमुळे कर्बोदकांचीही त्यांना कमतरता भासत नव्हती. त्या हिमयुगात हवामानात चढउतार होत होते, त्यानुसार सागराची पातळी कमी-जास्त होत होती. त्यानुसार ती माणसं आपला रहिवास बदलत होती. जोपर्यंत ते त्या किनार्याला धरून होते; तोपर्यंत त्यांना कसलीच ददात नव्हती. त्याला तसंच कारण होतं.
दक्षिण आफ्रिकेचा सर्वांत दक्षिणेच्या टोकाकडला हा भाग जगातल्या जैववैविध्य समृद्ध अशा ४-५ भागांपैकी एक आहे. वनस्पतींच्या विविधतेमध्ये तर तो अग्रभागी आहे. तो सागरकिनार्याला लागून पसरला आहे. त्याला ‘केप फ्लोरल रीजन’ म्हणतात. या ९० हजार चौरस कि.मी. परिसरात नऊ हजार जातींच्या वनस्पती आढळतात. यातल्या ६४% वनस्पती फक्त या परिसरातच आढळतात. केपटाऊनमध्ये क्रिकेटचे सामने असतात तेव्हा शहरानजिकचा ‘टेबल माऊंटन’ नावाचा पर्वत दाखवला जातो. या पर्वतावर असंख्य जातीच्या वनस्पती आढळतात. त्यातही फिन्बॉस आणि रेनोस्टरव्हेल्ड या भागांत झुडुपांच्या जेवढ्या जाती आढळतात तेवढ्या इतक्या छोट्या परिसरात जगात इतरत्र कुठेच सापडत नाहीत. मुख्य म्हणजे यातल्या अनेक झुडुपांची मुळं म्हणजे कंदमुळं असतात; किंवा त्यांची खोडं अन्न साठवून ठेवतात. त्यांचेही कंद बनतात. यांना जिओफाईट्स म्हणजे जमिनीखाली अन्न साठवणार्या वनस्पती असं म्हणतात. केप फ्लोरल रीजनमधल्या अशा कंदमुळं आणि खोडांचं वैशिष्ट्य म्हणजे हे कंद तंतूमय नसतात. त्यामुळे उर्जादायी कर्बोदकांचा प्रभावी उपयोग शरीराला करून घेता येतो. हे कंद आणि शंख-शिंपल्यातील प्राणी या भागात हिमयुगात टिकून राहतात याला आणखी एक कारण आहे. इथे दक्षिण ध्रुवाकडून येणारा थंड पाण्याचा प्रवाह खूप पोषक घटक आणतो. याच भागात मकरवृत्ताकडून येणारा उबदार पाण्याचा प्रवाह या थंड पाण्याच्या प्रवाहात मिसळतो. त्यामुळे इथे शंखशिंपल्यांची संख्या इतर किनारी भागापेक्षा खूप जास्त फोफावते. याचा त्या मोजक्या आदिमानवी पूर्वजांना खूप फायदा झाला.या परिस्थितीत एक महत्त्वाची बाब म्हणजे तेव्हा स्त्रिया पुरुषांच्या
मदतीशिवाय सहजगत्या अन्न मिळवू शकत होत्या. त्यामुळे बालसंगोपन सुलभ झालं होतं.
पुरुष देवमासे आणि सील्ससारख्या सागरी सस्तन प्राण्यांची शिकार करून त्यांच्या
प्रथिन पुरवठ्यात भर घालत असत. शिवाय सीलची कातडी वस्त्रांसाठी वापरली जात होती.
याआधी आदिमानवाने सागरी अन्नस्रोत वापरल्याचं इतकं प्राचीन उदाहरण दुसरीकडे कुठेही
मिळालेलं नाही. इस्रायलच्या भूशास्त्रीय सर्वेक्षण विभागाच्या मिरियम बार-मॅथ्यूज
आणि ऑस्ट्रेलियामधील वुलॅगाँग विद्यापिठातील झिनोबिया जेकब्ज यांनी केलेल्या
कालमापन प्रयोगांमधून दक्षिण आफ्रिकेतील आपले हे आदिपूर्वज एक लाख ६४ हजार
वर्षांपूर्वीपासून सागरी जीवांचा अन्नस्रोत म्हणून वापर करत होते. १ लाख १० हजार
वर्षांपूर्वी त्यांच्या या अन्नस्रोतात आणखी नवनव्या सागरी जीवांची भर पडलेली
होती. हे वाचायला सोपं वाटतं. पण सागरी कालवं आणि गोगलगायी भरती ओहोटीच्या मधल्या
आंतरभरतीच्या किनारी भागात राहतात. इथल्या निसरड्या खडकांमधून मार्ग काढत जाऊन हे
प्राणी वेचणं खूप अवघड होतं. तेव्हाच्या मानवाच्या शाकाहाराचे सज्जड पुरावे उपलब्ध
नाहीत; पण परिस्थितीजन्य पुराव्यांवरून त्याबद्दल तर्क करता येतो.
मांसाहाराचे पुरावे हाडं आणि शंख शिंपल्यांमुळे मिळतात.
गुहेत मिळालेली आदिमानवांची प्राथमिक स्वरूपाची अश्म अवजारं मुळात
एका मऊ खडकापासून बनलेली होती, पण तो खडक तापवून घट्ट आणि कडक करून मग
त्याची अवजारं तयार झाली असल्याचं या शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. अमेरिकेतील आणि
ऑस्ट्रेलियातील मूळ आदिवासी अगदी अलिकडच्या काळापर्यंत अशा प्रकारचा उद्योग करत
होते. यातून दोन गोष्टी सिद्ध होतात. एक म्हणजे या लोकांना अग्निच्या साहाय्याने
खडकांचे गुणधर्म बदलता येतात हे कळत होतं; म्हणजे ते बुद्धीचा वापर करत होते.
कच्चा माल निवडणं, आधी तो मंद विस्तवावर भाजणं, हळूहळू ते तापमान वाढवत नेऊन ३५० अंश
से.च्या आसपास स्थिर ठेवणं, ते ठराविक काळ स्थिर ठेवून मग
टप्प्याटप्प्याने कमी करत आणणं, या गोष्टी करण्यासाठी खरोखरच बुद्धी
लागते. दुसरं, म्हणजे हे तंत्र एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे जाण्यासाठी दोन
पिढ्यांत संवाद असणं आवश्यक होतं. त्यासाठी प्रात्यक्षिकांबरोबर प्राथमिक स्वरूपात
का होईना भाषेची आवश्यकता होती. याचा फायदा पुढे युरोपात पोचलेल्या मानवांना झाला.
त्यांना निअँडर्थल्सवर मात करून आपलं वर्चस्व प्रस्थापित करता आलं.
इथला आदिमानव केवळ तंत्रज्ञानातच प्रगत होता असं नाही, तर
त्याला इतरही गोष्टींमध्ये रस होता. त्यातली एक म्हणजे कला. या भागातल्या अगदी
सुरुवातीच्या थरात सापडणार्या तांबड्या लोहभस्माच्या साहाय्याने ते मानव आपल्या
अंगावर रंगीत पट्टे काढत असत. हा रंग पक्का बसावा म्हणून तो प्राणीज चरबीत कालवून
मग त्याने अंग रंगवलं जात असावं, असेही पुरावे मिळाले आहेत. मानवी
उत्क्रांतीचा हा असाधारण प्रवास साधारणपणे ९० हजार वर्षांत घडला तो पृथ्वीच्या
हवामानात बदल झाल्यामुळे.
हे सर्व अशासाठी सांगितलं, की आताही काही काळात पुन्हा आपल्यावर
याच्या उलट नष्ट व्हायची वेळ येणार आहे. त्यावेळी आपण काय करणार हा प्रश्न आहे.
आताचा जागतिक तापमान बदल हा सागरी पातळी वाढवणारा असणार आहे. जागतिक हवामान
बदलामुळे मौसमी पावसाच्या प्रदेशातील लोकांना यापुढे ‘नेमेची येतो मग पावसाळा,
हे
सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ हे म्हणता येईलच असं नाही. तसंच ‘आषाढस्य प्रथम दिवसे’
ढग दिसत नाहीत हेही आपण अनुभवतो आहोतच. हिमयुग आलं त्यावेळी आपल्या पूर्वजांची
संख्या काही शेकड्यांत होती. आता वातावरणात तापतंय तेव्हा ती अब्जांत आहे.
जागतिक हवामान बदलामुळे दोन्ही धृवांवरचं हिमाच्छादन पूर्णपणे
वितळेल. त्यामुळे सागराची पातळी एक ते दोन मीटर वाढेल. जगातील सर्व महत्त्वाची
शहरं समुद्राकाठी आहेत. त्यांची लोकसंख्याही प्रचंड आहे. ही शहरं ठप्प झाली तर काय
होतं, हे कोरोनाच्या काळात अनुभवाला आलंय. याचा आणखी एक परिणाम म्हणजे आज
कायमस्वरूपी गोठलेले भूभाग (पर्माफ्रॉस्ट) वितळतील. त्यामुळे दलदल निर्माण होईल.
त्यात इतके दिवस गोठून राहिलेल्या वनस्पती कुजतील. त्यामुळे हवेत मिथेन मिसळून
काचघर परिणामाला हातभार लागेल. त्यामुळे जागतिक पर्यावरण पूर्णपणे बदलेल. हा नवा
पाणथळ प्रदेश कोरडा होऊन जगाची ‘ब्रेड बास्केट’ बनेल. तर आजचे सुपीक प्रदेश
दुष्काळी बनलेले असतील. कॅनडाचा बराच मोठा भूभाग आणि रशियाचा सैबेरियाचा भूभाग इथे
अन्नाचा सुकाळ असेल; तर आज माणसं दाटीवाटीने राहत आहेत त्या भागांत अन्नाची वानवा असेल,
तिथे
अन्नासाठी दंगली होतील; असं भविष्यकाल शास्त्रज्ञ (फ्युचरॉलॉजिस्ट) म्हणतात.
यावर ते एक उपायही सुचवतात. लोकसंख्येचं स्थलांतरण. सुक्या किंवा
ओल्या दुष्काळी भागातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात सुपीक भागात हलवणं. यात असंख्य
अडचणी आहेत. कुणाला हलवणार? त्यांची निवड कशी करणार? त्यातले
किती लोक स्थलांतर करण्यास तयार होतील? दुसरा प्रश्न लोकसंख्या कमी करण्याचा.
निसर्ग आणि आपली वर्तणूक यामुळे ते हळूहळू घडू लागलंय. नवनवे विषाणूजन्य आजार,
तसंच
प्लॅस्टिक आणि अन्य प्रदूषणांबद्दल बरंच लिहिलं जातं. घातक प्रदूषणामुळे माणसाच्या
पुनरुत्पादन क्षमतेवरही विपरित परिणाम होतात. त्यामुळे जागतिक हवामान बदलामुळे
स्थलांतर करण्याची पाळी आपल्यावर ओढवेल त्यावेळी पुनरुत्पादन क्षमता असलेल्या
स्त्री-पुरुषांना अधिक पसंती दिली जाईल, असं म्हटलं जातं.
खरा प्रश्न या स्थलांतरानंतरचा आहे; कारण आपण हिमयुग
लांबवलं असलं तरी ते पूर्णपणे थोपवलेलं नाही, ते येणारच. ते
पूर्वीपेक्षा जास्त घातक असेल. याचं आणखी एक कारण म्हणजे पृथ्वीचा चुंबकीय धृव
स्थिर नाही. तो सध्या पूर्वीच्या ठिकाणाहून दूर जातोय. आजमितीस चुंबकीय अक्षाचं
उत्तर टोक पूर्वेकडे झुकत चाललंय. ते ४० अंश पूर्वेला सरकलं असून सध्या ते
सैबेरियाच्या उत्तरेकडील ध्रृवीय वर्तुळात आहे. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे
सूर्याकडून येणारी चुंबकीय प्रारणं पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाहीत तर
पृथ्वीपासून दूर वळवली जातात. याचाही पृथ्वीच्या वातावरणावर परिणाम होतोच. शिवाय
आज आपण ज्या इलेक्ट्रॉनिक साधनांवर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहोत, त्यांच्यावरही
याचा परिणाम होतो.
थोडक्यात, हवामान बदलामुळे हिमयुग आलं, ते पुन्हा येण्याची शक्यता खूपच आहे,
तसं
झालं तर आपण पुन्हा वंशविच्छेदाला सामोरे जाऊ. मात्र आपण आधीच आदिमानवाच्या मानाने
शारीरिकदृष्ट्या खूपच नाजूक झालो आहोत. हिमयुग येईल तोपर्यंत तर कृत्रिम
बुद्धिमत्तेवरच्या परावलंबित्वामुळे आपण आणखीच नाजूक झालेलो असू. त्यामुळे यावेळी
मानवजात वाचेल का, हा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला आहे.
निरंजन घाटे
०२०-२४४८३७२६
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा