निळू दामले : शोधत सुटलेला माणूस - सुहास कुलकर्णी

 


निळू दामले हे मराठीतले महत्त्वाचे पत्रकार आहेत. रूढ चाकोरी मोडून स्वतःची वेगळी वाट शोधत त्यांनी आपली पत्रकारिता केली आहे. सर्व माध्यमांमध्ये चिक्कार काम करूनही त्यांच्या नावावर पंचवीसेक पुस्तकं आहेत. बहुतेक पत्रकारी. त्यांच्यासारखं झंगड काम केलेला पत्रकार महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही सापडणं अवघड आहे.

निळू दामले हे एक भन्नाट प्रकरण आहे. त्यांचं वागणं, बोलणं, वावरणं, लिहिणं सगळंच भन्नाट आहे. त्यांचं एकूण आयुष्यही अनेक भन्नाट गोष्टींनी भरलं आहे. एखाद्या माणसाच्या आयुष्यात एवढी वळणं कशी येऊ शकतात, असं वाटून जावं असं. अमुक पद्धतीनेच जगायचं, अमुक लक्ष्य गाठायचंच असा हट्टीपणा त्यांच्यात नसल्याने त्यांचं आयुष्य अनेक वळणं घेत इथपर्यंत आलंय. पण ते या पूर्वायुष्याबद्दल बोलत बसलेत, किंवा जुन्या आठवणी काढून मन रमवत आहेत, असं इतक्या वर्षांत मी एकदाही बघितलेलं नाही. ते सर्वार्थाने आज आणि उद्यामध्ये गुंतलेले असतात. नाना विषय घेऊन वाचन, अभ्यास करत नि हिंडत असतात. क्षणाचीही उसंत नसलेला हा माणूस आहे.

सत्तरी पार केलेले निळू दामले हे स्वत:ची स्वतंत्र वाट चाललेले मराठीतले महत्त्वाचे पत्रकार आहेत. पन्नासेक वर्षांपासून ते पत्रकारितेत आहेत. या काळात त्यांनी रीतसर नोकरी म्हटली, तर एकाच ठिकाणी केली. दैनिक मराठवाड्यात. तीही जेमतेम पाच-सहा वर्षंच. बाकीचा सर्व काळ ते स्वतंत्रपणेच काम करत आलेत. स्वत:च्या मर्जीने, स्वत:च्या पद्धतीने. त्यामुळेच दैनिकं, साप्ताहिकं, मासिकं, सायं दैनिकं आणि वृत्तवाहिन्या अशा सर्वच माध्यमप्रकारात चिक्कार कामं करूनही आज त्यांच्या नावावर तब्बल पंचवीस पुस्तकं आहेत. त्यातील बहुतेक पुस्तकं देश-परदेशात फिरून. एकेका प्रश्नाचा शोध घेणारी, पत्रकारी कौशल्य वापरून लिहिलेली आहेत. असं आणि एवढं काम मराठी पत्रकारितेत आजवर कुणीही केलेलं नाही. शोधायला गेलं तर अखिल भारतीय पातळीवरही एवढं काम केलेला पत्रकार दिसत नाही. पुस्तकं लिहिलेले पत्रकार देशात भरपूर आहेत, पण जतपासून जेरुसलेमपर्यंत आणि लातूरपासून लंडनपर्यंत हिंडून अनेक विषयांवर इतकं विस्तृत लिहिलेला पत्रकार मला तरी माहीत नाही. अशा या भन्नाट माणसाला मी गेली तीस वर्षं अगदी जवळून पाहतोय. त्याचा संपादक म्हणून, प्रकाशक म्हणून आणि मित्र म्हणून.

निळू दामलेंची आणि माझी पहिली भेट १९८९ची. त्याआधी मी त्यांचं फक्त नाव वाचून होतो. ते ‘दिनांक’ या एकेकाळी गाजलेल्या साप्ताहिकाचे संपादक होते, एवढंच मला माहीत होतं. आमची भेट झाली तेव्हा माझ्यावर ‘किर्लोस्कर’ मासिकाच्या संपादनाची जबाबदारी होती. श्री. भा. महाबळ आमचे संपादक. त्यांना भेटायला निळू दामले आले होते. महाबळांनी मला त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं आणि माझी ओळख करून दिली. कुणीतरी नवं पात्र दिसतंय अशा नजरेने निळू दामलेंनी माझ्याकडे पाहिलं होतं. कारण त्यांचा आणि मनोहर-किर्लोस्कर मासिकांचा संबंध जुना. त्या मानाने मी तिथे नवा होतो. ही आमची पहिली भेट. मी ‘किर्लोस्कर’मध्ये असेपर्यंत निळू दामलेंनी तिथे एखाद-दुसरा लेख लिहिला असेल. त्यांनी पाठवलेला एक लेख मला आजही आठवतोय. विश्‍वनाथ प्रताप सिंह यांच्या अनुषंगाने तो लिहिला होता. तो लेख लक्षात राहण्याचं कारण विषय हाताळण्याची आणि लिखाणाची अनौपचारिक शैली. व्ही पी सिंगांनी आपल्या बंडाला भ्रष्टाचारविरोध, सामाजिक न्याय वगैरे मुलामे चढवले असले, तरी मुळात राजीव-व्हीपी यांच्या सत्तासंघर्षातून हा सारा उद्योग चाललाय, असं काहीतरी त्यांनी लिहिलं होतं. मी राजकारण गंभीरपणे घेणारा असल्याने मला हा अ‍ॅप्रोच खटकला होता. पण त्यांची शैली वेधक होती. कट्ट्यावर बसून मित्राने गप्पा माराव्यात तसा साधेपणा त्यांच्या लिखाणात होता. त्याकाळी वृत्तपत्रीय लिखाणात बरीच औपचारिकता असे. भाषण दिल्याप्रमाणे लोक लिहीत. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या लिखाणात फ्रेशनेस होता.

दोनच वर्षांनी आम्ही मित्रांनी ‘युनिक फीचर्स’ सुरू केलं. त्याच्याच आसपास कधीतरी मुंबईत निखिल वागळे यांचं ‘महानगर’ हे सायंदैनिक सुरू झालं. थोड्याच दिवसांत आम्ही ‘महानगर’शी जोडले गेलो आणि त्यांच्यासाठी काहीबाही लिहू लागलो. लवकरच ‘महानगर’च्या पुण्याच्या कार्यालयाची जबाबदारीच आम्ही स्वीकारल्याने या दैनिकाचा भागच बनलो. तेव्हा निळू दामले ‘महानगर’च्या कोअर टीमचा भाग होते. ‘महानगर’ ही त्याकाळची जबरदस्त सक्सेस स्टोरी होती. एकट्या मुंबईत रोज लाखभर अंक खपत. वागळेंचा बेधडक स्वभाव, आक्रमक पत्रकारितेचा आग्रह, बड्या लेखकांचा सहभाग आणि संपूर्ण अंकाला लाभलेली अनौपचारिकता यामुळे ‘महानगर’ने वृत्तपत्राचा बाजच बदलून टाकला होता. अंकाची अनौपचारिकता निळू दामलेंच्या सरळ साध्या लिखाणासारखीच होती. नंतर कळलंच की ‘महानगर’ची भाषा आणि शैली घडवण्यात त्यांचा वाटा होता. विजय तेंडुलकर आणि निळू दामले यांनी ‘महानगर’मधील पत्रकारांचे रीतसर वर्ग वगैरे घेऊन ही गोष्ट प्रत्यक्षात आणली होती. ही भाषाशैली नव्या पिढीला जवळची वाटणारी असल्याने तिचा स्वीकार झपाट्याने होत गेला. आम्ही ‘युनिक फीचर्स’मध्येही या शैलीचा अंगिकार केला. कुणी मान्य करो न करो, तेंडुलकर आणि निळू दामलेंनी तेव्हा जे काम केलं, त्यातून हा बदल घडला. आम्ही या दोघांच्या वर्गात जाऊन बसलेलो नसलो, तरी ‘महानगर’च्या हाताळणीलाच गुरू मानून एकलव्यासारखे शिकलो होतो. एका अर्थाने अप्रत्यक्षपणे त्यांचं शिष्यत्व आम्ही पत्करलं होतं.

पण निळू दामलेंचं वागणं-बोलणं असं की आम्ही त्यांच्याकडून काही शिकतोय, वगैरे सांगण्याची सोय नाही. एकदम अनौपचारिक. बिनधास्त. कुणाला खरं वाटणार नाही, पण आमच्या वयात तब्बल वीसेक वर्षांचं अंतर असलं तरी त्यांचे-माझे संबंध एकेरीतले. अरेजारेचे. सुरुवातीपासून. खरंतर माझ्या जन्माच्या वेळीस त्यांनी लिखाण सुरू केलं होतं आणि मी शाळेत जात होतो, तेव्हा ते संपादक बनलेले होते. पण का कुणास ठाऊक, त्यांना कधी ‘अहोजाहो’ करावंसं वाटलं नाही. त्यांच्या आसपासचे सर्व छोटे-मोठे लोकही त्यांचा उल्लेख ‘निळू’ असा एकेरीच करत. त्यांना दामले, दामले सर, दामले साहेब असं म्हणणारं तेव्हा कुणीच नव्हतं. त्यांनी स्वत: या फॉर्मेलिटीला केव्हाच फाट्यावर मारलेलं असल्याने त्यांना कशानेच काही फरक पडणार नव्हता. स्वत:बद्दल इतका बेफिकीर (की नाफिकीर?) माणूस मी तेव्हापर्यंत पाहिला नव्हता. अर्थातच त्यांचं हे वागणं ओढून ताणून नव्हतं. गेली तीस वर्षं बघतोय, त्यांचं हे वागणं जसंच्या तसं टिकून आहे.

‘महानगर’च्या काळातला एक किस्सा सांगतो. १९९४-९५ साली शिवसैनिकांनी ‘महानगर’वर जीवघेणा हल्ला केला होता. अर्थातच टार्गेट निखिल वागळे होते. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी देशभरातील पत्रकार-संपादकांनी शिवसेना भवनाच्या चौकात धरणं धरली होती. कुलदीप नय्यर-निखिल चक्रवर्तींपासून गोविंद तळवलकरांपर्यंत देशभरातील मोठे संपादक तिथे हजर होते. पाच-सातशे पत्रकारही जमले होते. आम्ही ‘युनिक’ मित्रही पुण्यातून गेलो होतो. आमच्यासमोर सुमारे पाच हजार आक्रमक शिवसैनिक हल्ला करण्याच्या आविर्भावात येऊन आदळत होते. या सगळ्या समरप्रसंगी निखिल वागळे आणि निळूभाऊ दोघेही निवांत होते. निळूभाऊ म्हणाले, ‘भूक लागली असेल तर चला काही तरी खाऊन येऊयात.’ म्हटलं, ‘या गदारोळात खायला कुठे मिळणार?’ म्हणाले, ‘खायचंय ना.. मग चला!’ निखिल, निळू आणि आम्ही दोघे-तिघे बाहेर पडलो आणि चालत-चालत दोन गल्ल्या पार करून एका हॉटेलात शिरलो. हे हॉटेल शिवसेना भवनाच्या शेजारच्या इमारतीत होतं. आसपासचं उन्मादी वातावरण पाहून माझी तर पटाटली होती, पण निखिल-निळू जणू काही घडलेलंच नाही, अशा आविर्भावात वावरत होते. त्यातील निखिल निर्भय वाटत होते आणि निळूभाऊ बेफिकीर. तेव्हा या दोघांमधील ही गुणवैशिष्ट्यं लोभस वाटली होती खरी, पण इतक्या वर्षांतही ती आत्मसात मात्र करू शकलो नाही. निर्भयता कदाचित कमावता येऊ शकते, पण बेफिकिरी अंगभूतच असणार. निळूभाऊंकडे पाहून तरी तसंच वाटत होतं.

निळूभाऊंकडे ही बेफिकिरी आणि बिनधास्तपणा कुठून आला असेल? मी त्यांना जितका जाणून आहे त्यावरून हे स्वभाववैशिष्ट्य उपजतच आहे, असं वाटतं. अनेकांचा स्वभाव असा असू शकतो; पण संस्कारांचा भाग म्हणून, समाजाचा दाब म्हणून माणसं आपल्या स्वभावाला मुरड घालतात. बेफिकिरी ही गोष्ट आपल्याकडे दुर्गुणच मानली जाते. कारण बेफिकीर शब्दाचा अर्थ आपल्याकडे बेजबाबदार असा घेतला जातो. पण परिणामांची चिंता न करता कृती करणारा असा अर्थ घेतला, तर तो निळूभाऊंना तंतोतंत लागू पडतो. मग तो दुर्गुण न बनता गुण बनतो. निळूभाऊंच्या आयुष्याकडे पाहिलं तर त्यांच्या बहुतेक कृतींना हा गुण (किंवा स्वभावविशेष म्हणा) कारणीभूत ठरताना दिसतो. त्यांनी आपल्या मूळच्या स्वभावाला अजिबात मुरड घातली नाही; उलट त्याला मोकाट सोडलं! त्यामुळेच कदाचित ते पत्रकारितेत स्वत:ची स्वतंत्र वाट निर्माण करू शकले आणि त्यावरून चालत राहू शकले.

अनेकांना माहीत नसेल की निळू दामलेंच्या करिअरची सुरुवात पत्रकार म्हणून नव्हे, तर सामाजिक-राजकीय कार्यकर्ता म्हणून झाली आहे. कॉलेजचं शिक्षण धड चालत नसल्याने त्यांनी मुंबईत बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये (क्लार्कची) नोकरी धरली होती. त्याकाळात मुंबईत कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांची मोठी चलती होती. कसे कोणास ठावूक, तेव्हा विशीतले निळूभाऊ त्यांच्याकडे खेचले गेले आणि त्यांचे कार्यकर्ते बनले. वर्षभरात लोकसभेची निवडणूक होती. जॉर्ज विरुद्ध सका पाटील अशी ऐतिहासिक लढत झाली आणि त्यात जॉर्ज जिंकले. या लढाईत निळूभाऊ जॉर्ज यांच्या फौजेतील सैनिकाच्या भूमिकेत होते. निवडणुकीनंतर ते जॉर्जच्या सांगण्यावरून गुजराथमधील कच्छच्या सत्याग्रहात उतरले. ताश्कंद करारात गमावलेला भूभाग देशाला परत मिळावा, या मागणीसाठी ‘कच्छ की धरती, देश की धरती’ असे नारे देत ते जेलमध्ये गेले. थोडे थोडके नव्हे, दोन महिने.

या भानगडीत बीपीटीतील त्यांची नोकरी गेली आणि ते पूर्णवेळ समाजवादी चळवळीत गुंतले. पन्नालाल सुराणा या समाजवादी कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत गेले. तिकडे दलित समाजासाठी काढलेल्या शेती सहकारी सोसायटीच्या कामात उतरले. अंगी संवादकौशल्य असल्यामुळे जिकडे तिकडे भाषणं करत फिरू लागले. त्याच काळात सोलापूरच्या वैशंपायन कॉलेजमध्ये कॅपिटेशन फी विरोधातील आंदोलन झालं. त्याचं नेतृत्व ‘युक्रांद’च्या डॉ. कुमार सप्तर्षींकडे होतं. पण ते जेलमध्ये गेल्याने ते निळूभाऊंकडे आलं आणि ते विद्यार्थी चळवळीशी जोडले गेले. पाच-सहा वर्षं या कामात रमल्यानंतर ते औरंगाबादहून प्रकाशित होणार्‍या ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक अनंतराव भालेराव यांच्या संपर्कात आले. भालेराव हे स्वातंत्र्यसैनिक आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचे सेनानी होते. निळूभाऊ यथावकाश ‘मराठवाडा’त पत्रकार म्हणून रुजू झाले. अशारीतीने कार्यकर्ता म्हणून आयुष्याला सुरुवात करून ते पत्रकारितेत आले.

तो काळ होता १९७२चा. तेव्हा महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा गद्धेपंचविशीतील निळूभाऊ मराठवाड्यात भरपूर फिरले. त्यांनी दुष्काळावर पुष्कळ लिहिलं. ‘मराठवाडा’सह इतरत्रही. विशेषत: श्री. ग. माजगावकरांच्या ‘माणूस’ साप्ताहिकात. तेव्हाच मानवतचं हत्याकांड झालं. निळूभाऊंनी त्याचाही फॉलोअप घेतला. लगेच पुढे गुजरातमध्ये विद्यार्थ्यांचं नवनिर्माण आंदोलन सुरू झालं. ते कव्हर करण्यासाठी निळूभाऊ पुन्हा एकदा गुजरातमध्ये गेले. त्यावरही भरपूर लिहिलं. विद्यार्थी आंदोलनाचं लोण गुजराथेतून बिहारमध्ये गेलं. निळूभाऊ मग बिहारमध्ये गेले. तीन महिने तिकडेच राहिले. तिकडे जे दिसत होतं त्यावर लिहीत राहिले. चिक्कार. ‘मराठवाडा’साठी तर ते लिहित होतेच, पण ‘माणूस’ आणि ‘मनोहर’साठीही लिहित होते. एरवी मराठी पत्रकार हिंदीत वगैरे लिहित नाहीत. पण निळूभाऊंनी ‘दिनमान’ आणि ‘रविवार’ या तेव्हाच्या प्रमुख साप्ताहिकांसाठीही लिहिलं. पुढे १९७५ मध्ये इंदिरा गांधींच्या कृपेने देशात आणीबाणी जाहीर झाल्यानंतर अनंतराव जेलमध्ये गेले आणि ‘मराठवाडा’ची धुरा आपल्या सहकार्‍यांवर सोपवून गेले. निळूभाऊ त्यातले एक. रोजचे अग्रलेख लिहिणं आणि दैनिक चालवणं ही काही खायची गोष्ट नसते. पण वयाची तिशी गाठत असतानाच ही जबाबदारी निळूभाऊंवर येऊन पडली आणि त्यांनी ती निभावलीही.

१९६७ ते १९७७ या दहा वर्षांच्या काळात एक राजकीय-सामाजिक कार्यकर्ता ते संपादक असा निळूभाऊंचा प्रवास झाला. हा प्रवास ज्या पार्श्‍वभूमीवर झाला ते कळलं, तर कुणीही आश्‍चर्याने चाट पडावं. मुंबईत गिरगावातील चाळीत एका निम्नमध्यमवर्गीय शिक्षकाच्या पोटी जन्माला आलेले निळूभाऊ मॅट्रिकनंतर चक्क पांडुरंगशास्त्री आठवलेंच्या तत्त्वज्ञान विद्यापीठात विद्यार्थी म्हणून रुजू झाले होते. चांगले मार्क मिळालेल्या गरीब विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश दिला जाई व त्यांची मुंबईतील एका कॉलेजमध्ये मोफत शिक्षणाची सोयही केली जाई. पांडुरंगशास्त्री हे निळूभाऊंच्या वडिलांचे जवळचे स्नेही होते. त्यामुळे निळूभाऊंना तिथे प्रवेश मिळाला व पाहता पाहता ते तिथल्या धार्मिक-आध्यात्मिक वातावरणाचा भाग बनले. आरत्या आणि स्तोत्रं म्हणू लागले. गीतेचं वाचन करू लागले. गीतेवरील प्रवचनं ऐकू लागले. पण स्वतंत्र वृत्तीच्या निळूभाऊंना हे वातावरण फार काळ पचणं अवघडच होतं. झालंही तसंच. कुठल्यातरी कारणाने वाद होऊन ते तिथून बाहेर पडले. तसं न होतं तर पुढे हे गृहस्थ नीळकंठशास्त्री दामले या नावाने प्रसिद्ध पावले असते. नशीबच महाराष्ट्राचं! कारण आजच्या निळूभाऊंना त्या रोलमध्ये ‘जक्स्टापोज’ करून पाहायचं धाडस कुणी केलं, तर बेफाम अद्वातद्वा बोलणारे, सात्विक संतापाने अपशब्दांची लाखोली वाहणारे आणि जगावर सतत रागावलेले शास्त्री महाराज अशी प्रतिमा उभी राहील. त्यामुळे निळूभाऊंनी तत्त्वज्ञान विद्यापीठातून कलटी मारली, हे एक बरंच झालं म्हणायचं!

गंमत सोडा; पण कुठे पांडुरंगशास्त्री आठवलेंचं तत्त्वज्ञान आणि कुठे समाजवादी मंडळींचा गोतावळा! टोटल न लागणारी ही दोन टोकं. पण निळूभाऊंनी अल्पावधीत हा प्रवास केला खरा. अर्थात, हा प्रवास फार विचारपूर्वक वगैरे झाला नाही, असं निळूभाऊंचं म्हणणं आहे. म्हणजे धर्म-अध्यात्म नाकारून समाजवादी विचार स्वीकारला, असं घडलं नाही. काळ जसा उलगडत गेला तसं घडत गेलं. जे पटेल तेच करायचं, रीत आहे म्हणून काही करायचं नाही, ही बंडखोरी त्यांच्यात असल्यानेच तसं घडलं असणार.

पुढे आम्ही ‘अनुभव’ मासिक सुरू केलं, तेव्हा निळूभाऊंनी ‘दिनांक’चे वीसेक अंक मला दिले होते. हा लेख लिहिताना ते अंक पुन्हा एकदा चाळले, तेव्हा त्या प्रयोगाचं महत्त्व नव्याने पटलं. त्या प्रयोगावर स्वतंत्रपणे लेख लिहिला जाऊ शकतो, त्यामुळे त्याबद्दल इथे लिहिण्याचा मोह आवरतो. पण मुद्दा असा की मराठी राजकीय साप्ताहिक काढण्याचा जो पहिला आणि दमदार प्रयोग झाला, त्यात निळूभाऊ होते आणि तिथेही त्यांनी अशोक शहाणेंच्या नेतृत्वाखाली अंकाचं स्वरूप, विषयांची निवड, भाषेची सहजता, अनौपचारिक लेखनशैली या सगळ्याची एक प्रयोगशाळाच चालवली होती.

हे बोलणं किती सोपं! नोकरी गेलेला हा माणूस, उठून इंग्लंडला कसा गेला असेल? तेही त्या काळी. नुसता इंग्लंडला नाही गेला, युरोपभर फिरला. किती दिवस? तब्बल तीन महिने! पैशाची जुळवाजुळव कशी करावी? कुणाकडून तरी पाच हजार रुपये उसने घेतले आणि निघाले. आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसले... तेही थेट इंग्लंडच्याच. इंग्लंड फिरून झाल्यावर जर्मनी, इटली, फ्रान्स, ऑस्ट्रिया असं बरंच काही. बहुतेक वेळा रात्री रेल्वेने प्रवास करायचा (कारण त्यामुळे रात्रीच्या मुक्कामाचा प्रश्‍न सुटायचा.) आणि दिवसभर इकडे तिकडे फिरायचं, बरंचसं निरुद्देश. जे दिसेल ते पाहायचं. जिथे वाटेल तिथे थांबायचं. अनिर्बंध. हीच ती बेफिकिरी.

ही युरोपची ट्रिप झाल्यानंतर एका वर्षी युरोपमध्ये आणि दुसर्‍या वर्षी अमेरिकेत असे दौरे करायचा चस्काच लागला त्यांना. बायको नोकरी करणारी, त्यामुळे तिच्या पैशावर घर चालत होतं. आणि इकडे साहेब मिळतील ती कामं करून पैसे गोळा करत नि विमानात बसत. विमानाचं भाडं कमी पडावं म्हणून दोन-तीन ठिकाणी विमानं बदलून जाण्याचा फंडा वापरत. त्या त्या देशांचे टूरिस्ट व्हिसा मिळवायचे, तिकडे थोडे दिवस फिरायचं आणि पुढच्या विमानात बसायचं, अशी त्यांची आयडिया. त्यातून फिरणं-बघणंही होई आणि खर्चही कमी होई. जग फिरणारा आणि बरंच काही बघितलेला माणूस आहे, हे कळल्याने जिकडचे-तिकडचे लोक गप्पा मारायला उत्सुक असत आणि फुकटात खायला-प्यायला घालत म्हणे. म्हणजे तोही खर्च वाचला.

तर १९८१-८९ या काळात निळूभाऊंची जगभ्रमंती चालली होती. शिवाय विजय तेंडुलकरांसोबत त्यांनी ‘दूरदर्शन’साठी ‘दिंडी’ नावाची एक मालिकाही तयार केल्याचं मला माहीत आहे. कारण त्यावरील त्यांचा लेख ‘किर्लोस्कर’च्या दिवाळी अंकात छापल्याचं मला आठवतंय. जेव्हा बहुसंख्य मराठी पत्रकारांनी टीव्हीचा कॅमेरा हातातही धरला नव्हता, तेव्हा निळूभाऊंनी एक अख्खी टीव्ही मालिका बनवण्याचा अनुभव मिळवलेला होता!

१९९०च्या दशकात माझा आणि निळूभाऊंचा खरा संबंध आला. तेव्हा ते ‘महानगर’मध्ये गुंतलेले होते. बातम्या, लेख, अग्रलेख याबद्दल तिथे नाना प्रयोग सुरू होते. उदाहरणार्थ, विजय तेंडुलकरांचं म्हणणं होतं. की अग्रलेखात निष्कर्ष सांगण्याची गरज काय? आपण जे सांगतोय तेच सत्य आहे, हे सांगण्याचा अट्टाहास का? निळूभाऊ ‘महानगर’मध्ये एक आड एक दिवस अग्रलेख लिहीत. त्यांनी तेंडुलकरांचं म्हणणं आपल्या अग्रलेखांत आणण्याचा प्रयत्न केला. ‘जे चाललंय ते असं असं दिसतंय. पण निष्कर्ष तुमचा तुम्ही काढा’, अशा चालीवर हे अग्रलेख असत. अनेक वेळा हे अग्रलेख शेंडा-बुडखा नसलेले आहेत, असं वाटे. याउलट निखिल वागळे जे अग्रलेख लिहीत ते सडेतोड आणि थेट असत. ते वाचकावर प्रभाव पाडत. पण निळूभाऊंनी आपला वसा सोडला नाही. ‘लोकप्रियता गेली गाढवाच्या ुुत’ असं म्हणत ते आपले बिननिष्कर्षाचे अग्रलेख लिहित राहिले. स्वतःला जे योग्य वाटतं तेच करण्याचा आणखी एक नमुना.

पुढे सात-आठ वर्षांनी ‘महानगर’चा प्रभाव कमी होऊ लागला आणि ‘महानगर’मधील ‘वागळेपर्व’ संपत गेलं. परिस्थिती अशी कुस बदलत असल्याचं पाहून निळूभाऊंनीही आपल्या कामाच्या शैलीत बदल घडवून आणला. एकेका विषयाचा माग काढून त्यावर पुस्तक लिहिण्याचा फंडा त्यांनी आत्मसात केला.

बर्‍याच वर्षांपूर्वी म्हणजे १९७२ नंतर कधीतरी त्यांनी मानवत हत्याकांडावर ‘पारध’ नावाची एक कादंबरी लिहिली होती. (मी ती वाचलेली नाही; पण ‘ती एक बंडल कादंबरी आहे’ असं स्वत: निळूभाऊंचंच म्हणणं आहे.) त्या कादंबरीनंतर वीस-पंचवीस वर्षं निळूभाऊ लिखाणकामात असले तरी पुस्तक लिहिण्याची उसंत त्यांना नसावी. ती संधी त्यांना ‘फोर्ड फाऊंडेशन’च्या ‘मीडिया साऊथ एशिया’ प्रकल्पातून मिळाली. टेलिव्हिजनचा भारतीय समाजावर आणि संस्कृतीवर काय परिणाम होत आहे, याचा शोध त्यात त्यांनी घेतला होता. अर्थातच पत्रकारी शैलीने. लातूर आणि वाराणसी अशा दोन एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या शहरात जाऊन त्यांनी हा शोध घेतला होता आणि सतराशे साठ गोष्टी हुडकून खुमासदार पद्धतीने नोंदवल्या होत्या. त्यातून टेलिवर्तन हे पुस्तक आकाराला आलं. या पुस्तकाला विजय तेंडुलकरांची प्रस्तावना होती. निळू दामले हे काय प्रकरण आहे, हे कळण्यासाठी ती प्रस्तावनाही मुळातून वाचायला हवी. सर्व्हे करून, हिंडून-फिरून, शेकडो मुलाखती घेऊन एखाद्या विषयावर कसं लिहावं, याचा हे पुस्तक म्हणजे उत्तम नमुना होता. एखादा मोठा विषय लेखकाने आपल्या आवाक्यात कसा आणावा, याचंही ते उदाहरण होतं. हीच पद्धत निळूभाऊ विकसित करत गेले आणि पुस्तकं लिहिण्याची एक नवी शैली त्यांनी मराठीत आणली.

आजतारखेला त्यांची पंचवीसेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातील दोन की तीन कादंबर्‍या आहेत. त्या हौशी म्हणता येतील या दर्जाच्या. त्या त्यांनी का लिहिल्या ते त्यांनाच माहीत. कदाचित हा फॉर्म हाताळून बघण्याची हौस हेच कारण असावं. आणखी एक शक्यता. पत्रकार म्हणून तुम्हाला फार अद्वातद्वा लिहिता येत नाही. सभ्यतेच्याकायद्याच्या मर्यादा असतात. कादंबरीत मात्र पात्रांमार्फत हवं ते बोलता येतं. मनातली उबळ बाहेर काढता येते. निळूभाऊंचा मूळ स्वभाव बंडखोर. जगावर रागावलेला. आसपास जे घडतं आहे त्यावर तडक प्रतिक्रिया देणारा. त्यामुळे त्यांना कादंबरी हा फॉर्म सोयीचा वाटला असणार. पण या फॉर्ममधून ते फार काही जोरकसपणे मांडू शकले असं नाही. दहा-पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या एका कादंबरीचं टंकलिखित मला वाचायला दिलं होतं. ‘तुझं मत सांग’ अशा आमंत्रणासह. मी वाचलं. मला त्यात काही दम दिसला नाही. पत्रकारी लिखाणाच्या फॉर्मवर मिळवलेली हुकुमत कादंबरीत अजिबातच नव्हती. शिवाय कादंबरीतून फार मौलिक असं काही सांगितलंही जात नव्हतं. मी म्हटलं, ‘कादंबरी लिहिलीस हे आपल्यात खासगीत असू देत. छापू नकोस.’ निळूभाऊ म्हणाले, ‘‘च्यायला, कोणताही मित्र माझ्या कादंबरीला चांगलं म्हणायला तयार नाही.’’ मग म्हणाले, ‘‘तुमच्या लक्षात येत नाहीये, की तुमच्यामुळे मराठी साहित्य एका कादंबरीकाराला मुकणार आहे...’’ हे सगळं हसत खेळत. चेष्टेत. नंतर कळलं, एरवी निळूभाऊंवर प्रेम असणारे आणि त्यांच्या लिखाणाचं कौतुक करणारे त्यांचे घट्ट मित्र विजय तेंडुलकरही याच मताचे होते. निळूभाऊंच्या जवळच्या मंडळींनी भिडेखातर त्यांना प्रोत्साहन दिलं नाही ते बरंच, अन्यथा मराठीच्या मानगुटीवर एक कादंबरीकार येऊन बसला असता. कधीतरी तेंडुलकरांशी निळूभाऊंच्या कादंबरी लेखनाच्या धाडसाविषयी माझं बोलणं झालं, तेव्हा ते एकच वाक्य म्हणाले, ‘निळूला फार वाटतं कादंबरी लिहावी असं; पण त्याची घडण वेगळी आहे.’

कादंबरी लेखनाची निळूभाऊंनी केलेली ही झटापट बाजूला ठेवा, कारण ती फार महत्त्वाची नाही. महत्त्वाची गोष्ट आहे त्यांनी लिहिलेली पत्रकारी पुस्तकं. त्यांच्या पुस्तकांपैकी तब्बल दहाएक पुस्तकं धर्म आणि हिंसा या विषयाभोवतीची आहेत. अफगाणिस्तान, पुन्हा अफगाणिस्तान, इस्तंबुल ते कैरो, मालेगाव बाँबस्फोट, लंडन बाँबिंग, जेरुसलेम, धर्मवादळ, पाकिस्तान, सिरीया, ओसामा ही ती पुस्तकं. यातलं एखादं पुस्तक सोडलं तर प्रत्येक पुस्तक प्रचंड फिरून, शोध घेऊन लिहिलेलं आहे. ज्या काळात पत्रकारितेत टेबलमेड स्टोरीजचं राज्य प्रस्थापित झालंय, त्याच काळात निळूभाऊ पायाला चाकं लावून जगभर फिरताहेत आणि लिहीताहेत. माझ्या माहितीप्रमाणे पाकिस्तानवरील पुस्तक सोडलं तर प्रत्येक पुस्तक ‘ओरिजिनल’ आणि ‘फर्स्टहँड’ माहितीवर व अनुभवावर आधारित आहे. पाकिस्तानात जाण्याचाही त्यांनी बराच प्रयत्न केला, पण त्यांचा तिकडे शिरकाव होऊ शकला नाही. पण या विषयाने निळूभाऊंचा ताबा घेतलेला असल्याने नाना पुस्तकं अभ्यासून त्यांनी हे पुस्तक लिहिलं.

त्यांनी लिहिलेल्या किमान चार-पाच पुस्तकांच्या विचार विनिमयात किंवा लेखन प्रक्रियेत माझा संबंध राहिलेला आहे. पाकिस्तानच्या पुस्तकासारखं अभ्यास करून लिहिलेल्या पुस्तकाचं सोडा, पण ते स्वतः फिरून पुस्तक लिहितात तेव्हाही त्यांना दिलेले ‘इनपुट्स’ त्यांनी धुडकावून लावले नाहीत. किंवा ‘तू काय मला सांगतोस, मी प्रत्यक्ष बघून आलोय’, असंही ते कधी म्हणत नाहीत. त्यांच्यापर्यंत येणारी माहिती, दृष्टिकोन, अ‍ॅप्रोच ते कधी नाकारत नाहीत. माझा तरी असाच अनुभव आहे. ‘अनुभव’ मासिकासाठीही त्यांनी गेल्या वीस वर्षांत भरपूर लिहिलं. प्रत्येक लेखाच्या वेळीस हाच अनुभव आला आहे.

तर सांगत होतो त्यांच्या पुस्तकांबद्दल. धर्म आणि हिंसा या विषयावरील त्यांची पुस्तकं प्रामुख्याने मुस्लिम जगाबद्दलची आहेत. त्याशिवाय अमेरिकेत फिरून त्यांनी ‘बदलता अमेरिकन’ हे पुस्तक लिहिलंय. ‘सुकाळ-दुष्काळ’ या पुस्तकात त्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचा दुष्काळाचा प्रश्न चीन, दक्षिण कोरिया आणि इथिओपिया या देशांच्या संदर्भात मांडला आहे. त्यामुळे हे पुस्तक एकाच वेळेस अत्यंत स्थानिक तपशील देतं आणि त्याच वेळेस पाण्याच्या प्रश्‍नाचे जागतिक संदर्भही सांगतं. असा उद्योग करणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण निळूभाऊ ती लीलया करतात. ‘उस्मानाबादची साखर’ असं सर्वस्वी अनाकर्षक शीर्षक असलेलं आणि उटपटांग मुखपृष्ठ असलेलं पुस्तकही साखरेचा धंदा, कारखान्यांतील ढिसाळपणा आणि सुनियोजन अशा प्रश्नांचा तपशीलवार उलगडा करणारं आहे. ‘माणूस आणि झाड’ हे बर्‍याच आधीचं आणि ‘सकस आणि सखोल’ हे अगदी अलिकडचं पुस्तक. ही सर्व पुस्तकं पाहिली की लक्षात येतं, की एखाद्या विषयाने निळूभाऊंना घेरलं की वाचून, अभ्यास करून आणि फिरून ते त्या विषयाला घेरतात आणि विषयाला जितकं नेमकं आणि टोकदार करता येईल तेवढं करतात. तेवढ्याच विषयात उतरतात. त्या विषयाचा समग्र आणि सर्वांगीण ऊहापोह त्यांच्या पुस्तकात सापडेल असं नाही. पण त्यांनी ठरवलेला दृष्टिकोन मात्र ते संपूर्ण ताकदीनिशी आपल्यासमोर ठेवतात. त्यांनी जेवढं पाहिलेलं, अनुभवलेलं किंवा मिळवलेलं असतं, तेवढं ते आकर्षकपणे वाचकाला सांगतात. ‘अमुक विषय मला महत्त्वाचा वाटला म्हणून मी शोधला आणि तुम्हाला सांगितला, असा त्यांचा रोकडा दृष्टिकोन असतो. लिखाणाच्या या पद्धतीमुळे त्यांचं लिखाण उत्स्फूर्त वाटतं. या शैलीमुळे एखादा विषय समजून घेण्यासाठी उत्सुक असलेला सामान्य वाचक तर त्यांची पुस्तकं विनात्रास आणि रूचीने वाचू शकतोच, पण त्या-त्या विषयातील तज्ज्ञमंडळी निळूभाऊंच्या पुस्तकांकडे ‘ओरिजिनल सोर्स’म्हणून पाहू शकतात. त्यांच्या पुस्तकात फर्स्टहँड माहिती असल्यामुळे ती जास्त विश्‍वासार्ह असते. शिवाय निळूभाऊंचं कोणतंही लिखाण हे अमुक एक निष्कर्ष सांगणारं नसतं. त्यामुळे आपलं ऑर्ग्युमेंट रेटण्याचा आटापिटा त्यात नसतो. या अर्थाने कोणतीतरी वैचारिक भूमिका घेऊन ते लिहीत नाहीत. मिळालेल्या माहितीला ते कोणताही रंग चढवत नाहीत. ‘मला हे दिसतं, त्याचा तुम्हाला लावायचा तो अर्थ लावा.’ असं त्यांचं म्हणणं असतं. ‘मी काही विचारवंत नाही की कुठल्या एका विषयाचा तज्ज्ञ नाही. मी एखादा विषय समजून घेतो, तेव्हा माझी भूमिका पत्रकाराची असते,’ असं त्यांचं सांगणं असतं. ‘पत्रकाराचं काम परिस्थिती टिपण्याचं असतं. विषय समजून घेण्याचं असतं. त्यासाठी फिरायचं, लोकांशी बोलायचं, त्यांच्यात वावरायचं. तेवढं केलं की तुम्हाला काहीएक सत्य कळतं. ते वाचकाला सांगायचं’, अशी त्यांची भूमिका असते. यावर आणखी टोकलं की निळूभाऊ सटकतात. म्हणतात, ‘‘अरे, ददला खाज आहे म्हणून मी फिरतो. मी काही तुमच्या विद्यापीठातला प्राध्यापक नाही. लांब चेहरा करून गंभीरपणे आपल्याला काही सांगता येत नाही. मी सांगतो तेवढं घ्या. याहून जास्त अपेक्षा करू नका.’ हे असं तिरीमिरीत बोलताना निळूभाऊंचे चेहरे पाहण्यासारखे असतात.

हे खरंच आहे की निळूभाऊ हे कुणी विचारवंत, तज्ज्ञ किंवा अभ्यासक नाहीत. त्यांची तशी स्वप्रतिमाही नाही. पण त्यांनी जी पुस्तकं लिहिली आहेत, ती त्या-त्या विषयाचा अभ्यास केल्याशिवाय किंवा तज्ज्ञता प्राप्त केल्याशिवाय लिहिता येण्यासारखीही नाहीत. मुस्लिम देशांतील घडामोडींबद्दल किंवा दुष्काळ, साखर, वनस्पती शरीरशास्त्र, अभियांत्रिकी अशा विषयांबद्दल (ज्यांवर त्यांनी पुस्तकं लिहिलीयत) आपण त्यांना काही विचारलं, की ते त्या विषयांतील तज्ज्ञता आजमावून आहेत, हे क्षणात कळतं. या विषयांवर अचानक बोलणं निघालं तर ‘थांब, मी जरा पुस्तकं बघून उद्या तुला सांगतो’, असं कधी त्यांच्या तोंडून निघणार नाही. त्यांनी जेवढं पाहिलं-वाचलं असेल, ते धडाधड सांगणार. भान विसरून, उतू गेल्यासारखं. पण बोलताना ते काय सांगतात? माहिती! या अर्थाने ते पत्रकारच आहेत. अभ्यासू पत्रकार. अर्थात अभ्यासू पत्रकार हा शब्द बरोबर नाही. कारण पत्रकार अभ्यासू नसेल, तर तो पत्रकार कसा असू शकतो? त्यामुळे निळूभाऊंचं दुसरं वर्णन होऊ शकत नाही. ते अंतर्बाह्य पत्रकारच आहेत!

त्यांच्या लिखाणाच्या प्रेरणाही पत्रकारीच आहेत. उदाहरणार्थ, त्यांचं कोणतंही पुस्तक घ्या. अमुक एका विषयात कुतूहल निर्माण झालं, प्रश्‍न पडले म्हणून ते त्या विषयात घुसलेले दिसतात. पॅलेस्टिनी तरुण मुलं आत्मघातकी हल्ले कसे काय करतात, स्वत:ला मारून कसे काय घेतात, असा प्रश्‍न त्यांना पडला म्हणून त्यांनी थेट जेरूसलेम गाठलं. लंडनमध्ये बाँबहल्ले झाल्यानंतर इंग्लंडमधील समाजमनाला आणि सामाजिक मान्यतांना जो धक्का बसला, तो समजून घेण्यासाठी ते लंडनभर फिरले. दहशतवादाचे अनेक पदर त्यांनी शोधून काढले; तपासले. अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर ते तिथे पोहोचले. मालेगावमध्ये मशिदींबाहेर बाँबस्फोट झाल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या वा जायबंदी झालेल्या लोकांच्या घरोघरी गेले व त्यांचे कोलमडलेले संसार पाहिले. त्यांच्या प्रत्येक पुस्तकाबद्दल असं बरंच सांगता येण्यासारखं आहे. पण थोडक्यात सांगायचं तर अमुक ठिकाणी नेमकं काय घडलं आहे, जे सांगितलं जात आहे त्यात किती तथ्य आहे, संबंधित माणसं काय बोलत आहेत, या आणि अशा गोष्टी ते शोधत आले आहेत. त्या त्या ठिकाणची माणसं हा त्यांचा सोर्स आहे. या बाजूची किंवा त्या बाजूची. याचा अर्थ प्रेरणाही पत्रकारी आणि माहिती मिळवण्याची नि लिहिण्याची पद्धतही पत्रकारी.

अर्थातच हा पागलपणा अलीकडचा नाही. ते एकदा सांगत होते, औरंगाबादला ‘मराठवाडा’ दैनिकात काम करत असताना (म्हणजे १९७२-७८) तिकडे जातीय दंगल उसळली होती. जसं कळलं तसं रिपोर्टिंग करण्यासाठी ते दंगलग्रस्त भागात घुसले. हे ठीकच; पण कसे? मुलाला सांभाळायला कोणी नसल्यामुळे त्याला स्वतःच्या खांद्यावर बसवून! हे दृश्य बघून पोलिसांनी त्यांना थांबवलं. मुलाला कसं घेऊन जाता, विचारलं. त्यावर आपल्या साहेबांचं म्हणणं, : ‘माणूस मरायचा तर घरात पडूनही मरेल. तुम्ही फिकीर करू नका. काही होणार नाही पोराला.’’ कुणी म्हणेल, हा आगाऊपणा कुणी का करावा? स्वत:च्या पोराच्या जिवाशी कुणी का खेळावं? पण लक्षात घ्या, हे शहाण्या माणसाला पडणारे प्रश्‍न आहेत. हे प्रश्‍न निळूभाऊंना तेव्हाही पडले नव्हते आणि आजही पडत नाहीत. आपण तेव्हा जे केलं तेही बरोबरच होतं, आणि आज जे करतो तेही बरोबरच आहे, असं त्यांचं ठाम म्हणणं असतं.

आपल्या पागलपणाबद्दल ठाम असण्याचं एक वेगळं उदाहरण सांगतो. पुण्याजवळ अब्जावधी रुपये खर्चून उभा राहिलेला लवासा सिटी प्रकल्प जेव्हा वादग्रस्त बनला तेव्हाची गोष्ट. या प्रकल्पाच्या परवानगीसाठी कायदेशीर पळवाटा काढल्या गेल्या आहेत इथपासून ते प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या त्यांच्या पुर्नवसनामध्ये अन्याय होत आहेत, इथपर्यंत लवासावर अनेक आरोप सुरू झाले. घेणं ना देणं, पण त्यावेळी निळूभाऊ या प्रकरणात उतरले. लवासा प्रकल्पाच्या बाजूने पुस्तक लिहिण्याचं त्यांनी ठरवलं. मला हे कळलं तेव्हा मी त्यांना धोक्याची कल्पना दिली. ‘या भानगडीत पडू नकोस. नवी शहरं उभी राहायला पाहिजे वगैरे स्वतंत्रपणे लिही. लवासात भानगडी झालेल्या आहेत आणि त्याचं समर्थन करून तू अडचणीत येशील. आयुष्यभर केलेलं काम धोक्यात आणशील,’ असं काय काय मी सांगून बघितलं. त्यावरून आमच्यात खूप खडाजंगी झाली, वादावादी झाली, पण साहेब बधले नाहीत. त्यांनी पुस्तक लिहिलंच. माझ्याप्रमाणेच विजय तेंडुलकर यांचेही या साहसाबद्दल आक्षेप होते. पण निळूभाऊंनी कोणाला जुमानलं नाही. नंतरही जेव्हा केव्हा हा विषय निघतो, तेव्हा ते आपला किल्ला आक्रमकपणे लढवतात. आपल्या भूमिकेबद्दल काहीच्या काही ठाम असतात. आप्त आणि मित्रांना सोडा, सगळ्या जगाला ङ्गाट्यावर मारण्याचं धैर्य निळूभाऊंमध्ये आहे.

त्या धैर्याचं आणखी उदाहरण सांगतो. या प्रकरणाचं वर्णनही घेणं न देणं असंच करावं लागेल. मुंबईत फुटपाथवर झोपलेल्या बेघर लोकांना सलमान खानच्या गाडीने चिरडलं, तेव्हा बराच गदारोळ झाला. आरडाओरडा झाला, लोक हळहळले; पण नंतर प्रकरण थंड पडलं. या प्रकरणात गरीबांना न्याय मिळणं अवघड आहे, असं लक्षात आल्यानंतर निखिल वागळेंच्या सोबतीने निळूभाऊ मुंबई हायकोर्टात गेले आणि त्यांनी सलमानच्या विरोधात केस दाखल केली. त्यानंतर चौकशीला वेग आला आणि प्रकरण धसास लागलं. ‘‘या भानगडीत तू कशाला पडलास’’ असं मी जेव्हा विचारलं, तेव्हा ‘‘कोणीही येऊन माणसं मारावीत आणि त्यावर काहीही कारवाई होऊ नये, असं कसं चालेल? रस्त्यावरच्या माणसांच्या आयुष्याला काही किंमत आहे का नाही, च्यायला’’ असं त्यांचं त्यावर उत्तर. त्यांचं म्हणणं अर्थातच बरोबर होतं. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत होतं. पण निळूभाऊ वाटणं मनात ठेवून थांबले नाहीत. किंवा आणखी कुठल्या संघटनेला केस करायला सांगावी वगैरे असाही विचार त्यांनी केला नाही. त्यांना वाटलं आणि ते केस करून मोकळे झाले. असं का? कारण अंगी मुरलेली बंडखोरी आणि त्यासाठी किंमत मोजावी लागण्याची तयारी.

असला वेडाचार करायला निळूभाऊंसारखा झंगड माणूसच हवा. हा झंगडपणा केवळ डोकं सटकण्यातून आलेला नाही. आयुष्यभर असंच जगत आल्यामुळे निळूभाऊंचं स्वतःचं असं तत्वज्ञान तयार झालं आहे. पत्रकारितेबाबत बोलायचं झालं तर त्यांचं म्हणणं असं की, ‘पत्रकारितेला शॉर्टकट नसतो. विश्‍वासार्ह पत्रकारितेसाठी जोखीम पत्करावीच लागते. आपल्याला हवी ती माहिती कुणी घरी किंवा ऑफिसात आणून देणार नसतो. उलट अशी माहिती चालत आली, तर त्यात हितसंबंध गुंतलेले असण्याची शक्यता असते. त्यामुळे विश्‍वासार्ह माहिती मिळवायची तर तुम्हाला फील्डवर जायलाच हवं. मग फील्डवर आग लागलीय की शांतता आहे, हा प्रश्‍न महत्त्वाचा नाही. कारण फील्डवर दिसणारं वास्तव आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपला इगो आणि कम्फर्ट झोन घरात पेटीत बंद करून फील्डवर जायचं असतं. मी यात हयगय करत नाही, म्हणून मला गोष्टी सापडतात!’

फील्डवर राहण्याची नशा निळूभाऊंवर अशी काही हावी आहे की ते सतत कुठल्या ना कुठल्या दौर्‍यावर असतात. कुठल्या ना कुठल्या विषयांचा माग घेत फिरत असतात. देश तर ते आडवा-उभा फिरलेच आहेत, पण जगातले चाळीस-पन्नास देशही ते हिंडलेत. आणि त्यांचं फिरणं कसं? पर्यटकासारखं नाही. बिहारमध्ये गेले तर तीन महिने तिकडेच राहिले, असं. माहितीच्या अधिकाराच्या लढाईत ते अरुणा रॉय यांच्यासोबत राजस्थानात फिरले तेही असेच. गावोगावी. गुजरातची तर त्यांना बारीकसारिक माहिती आहे. असे कितीतरी भाग! पण विचार करा...असं फिरायचं तर खर्च किती होत असेल? पैसे किती लागत असतील? कुठून आणत असतील ते एवढे पैसे? त्यांना विचारलं तर म्हणतात, ‘साला, खिशाला खार लावूनच फिरतोय मी. आम्हाला च्यायला कोण पैसे देणार? मी काही मोठा नामवंत लेखक नाही, की मला कुठली पगाराची नोकरी नाही. आपल्याकडे अशा अभ्यासाला कुणी पैसेही देत नाही. प्रकाशकही खर्च उचलत नाहीत. रॉयल्टीचा अ‍ॅडव्हान्स देण्याचं औदार्य दाखवण्यापुढे त्यांची मजल जात नाही. माझं प्रत्येक पुस्तक मला एक लाख रुपयांनी खड्ड्यात टाकतं. पण मला मजा येते म्हणून मी हे करतो.’

पण असं स्वत:च्या हिंमतीवर काम करण्याचा वसा घेतल्यामुळेच ते पत्रकारितेत एक वेगळी वाट तयार करू शकले, हेही खरंच. या वाटेने पुढे कुणी चालेल की नाही माहीत नाही, पण असा मार्ग स्वीकारता येऊ शकतो, एवढं मात्र त्यांनी सिद्ध करून ठेवलं आहे. पण ही वाटचाल करताना त्यांनी स्वत:वर बंधनं घालून घेतली नाहीत. जी माणसं भेटली त्यांना स्वीकारत आणि नाकारत ते स्वत:ची वाट तयार करत गेले. म्हणजे बघा; हा माणूस एका धर्मपरायण वातावरणातून स्वयंप्रेरणेने बाहेर पडला आणि स्वयंप्रेरणेनेच जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या मूळच्या समाजवादी नेत्याशी जोडला गेला. तिथून चळवळीत गेला आणि पुढे ध्येयवादी पत्रकारिता करणार्‍या अनंतराव भालेरावांशी जोडला गेला. तिथून त्याने बिगर वैचारिक बांधिलकीचं साप्ताहिक काढलं आणि नंतर फ्रीलान्स पत्रकारितेत स्वत:ला झोकून दिलं. पुढे स्वत:च्या मर्जीने पुस्तकं लिहिली. या प्रवासात त्याला शेतीतज्ज्ञ श्री. अ. दाभोलकर, अभियांत्रिकी तज्ज्ञ सी. एम. पंडित, पाणीतज्ज्ञ विलासराव साळुंखे, पत्रकार-लेखक विजय तेंडुलकर, अनंतराव भालेरावांप्रमाणेच ‘माणूस’चे श्री. ग. माजगावकर अशी मोठी माणसं भेटली. त्यांच्याकडून तो खूप काही शिकला, पण त्यांच्यात तो अडकला नाही. यातील कुणाचाही तो भक्त झाला नाही. या प्रत्येकाच्या मर्यादा त्याने ओळखल्या. जग या माणसांपाशी संपत नाही याचं भान त्याने राखलं. म्हणूनच कापुश्‍चिन्स्की, मुराकामी, मार्क्वेझ,

फेनमन अशा कित्येकांना त्याने स्वत:त घेतलं आणि पचवलं. युरोप-अमेरिकेतील लेखक-पत्रकार-संपादक-शास्त्रज्ञ-इतिहासकार-विचारवंत त्याच्या जिभेवर नाचत असतात, इतकं त्याने सामावून घेतलं. पण म्हणून या सार्‍यांचा त्याने अनुनय केला नाही. ही कसरत सोपी नाही. सेल्फ मेड माणसाचंच ते लक्षण आहे.

मी असं का म्हणतो, ते सांगतो. निळूभाऊ तरुणपणी समाजवादी चळवळीत वावरत असले, तरी पुढे त्यात टिकले नाहीत. १९८१मध्ये ते पहिल्यांदा इंग्लडला गेले तेव्हा तिथले समाजवादी भारतातील समाजवाद्यांंप्रमाणे गरीबीला कवटाळून बसलेले नाहीत असं त्यांना दिसलं. गरीबीचा प्रश्‍न सोडवणं वेगळं आणि गरिबीला कुरवाळत राहणं वेगळं, असं त्यातून त्यांचं मत बनलं. पुढे भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली तेव्हा निळूभाऊ समाजवाद्यांप्रमाणे संतापले नाहीत. कल्याणकारी अर्थव्यवस्था वगैरे आवश्यक आहे, पण अर्थव्यवस्थेचा आकार वाढवायला हवा, त्यासाठी भांडवली गुंतवणूक आवश्यक आहे, असं ते मानू लागले. पर्यावरणाची काळजी वगैरे ठीक आहे, पण भाबडा पर्यावरणवाद त्यांनी नाकारला. देशात पैसा तयार होणं गरजेचं आहे, त्यासाठी धरणं बांधावी लागतील, खाणी खणाव्या लागतील, वीज तयार करावी लागेल, कारखाने उभे करावे लागतील, असं ते म्हणू लागले. विकास करताना आणि त्यासाठी धोरणं आखताना चुका होतील, त्याचे परिणाम वाईट होतील, या भीतीपोटी पुढचं पाऊल न टाकणं त्यांनी अमान्य केलं. चुका झाल्या तर निस्तरू; पण देशाने धाडसं करायला हवीत, असं ते म्हणू लागले. तरुणपणचा समाजवादी माणूस कुठे आणि आजचा हा माणूस कुठे? स्वत:त बदल घडवत गेलेला हा माणूस आहे.

गंमत अशी की, समाजवाद्यांमध्ये वाढलेला हा माणूस नंतरच्या काळात सर्वच वैचारिक धारणांपासून मुक्त झाला. विचारधारा हा जगण्याचा एक पैलू आहे, तो शेवट नाही, असं निळूभाऊ मानू लागले. कोणतीही एक (किंवा अनेक) विचारधारा माणूस आणि जग समजून घ्यायला अपुर्‍या आहेत, असं त्यांना वाटू लागलं. जगात पुढे काय घडेल याचे ठोकताळे विचारधारांकडे असतात, पण जग तसंच उलगडतं, असं नाही. याअर्थी जगात पुढे काय घडेल हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे आपण जग समजून घेण्याच्या शक्यता खुल्या ठेवायला हव्यात, त्या विचारसरणींनी बंद करून टाकता कामा नयेत, या मतापर्यंत ते आले. ही गोष्ट त्यांनी स्वत: स्वीकारली आणि आपण कोणत्याही समाजमान्यतांना सहमत नाही, असं स्वत:लाच सांगितलं. त्यामुळेच नव्या कल्पनांकडे, नव्या विचारांकडे आणि नव्या शक्यतांकडे ते जास्त मोकळेपणाने पाहू लागले. माणसाने एकाच एक दिशेने विचार करणं आणि स्वत:ला त्यात बांधून घेणं हे नैसर्गिक नाही. उलट ‘काँट्रॅडिक्शन इज फन’ म्हणजे विसंगतीमध्येच मजा आहे, असं ते म्हणू लागले. आयुष्य हे संधींनी आणि अनिश्चिततांनी भरलेलं आहे. त्यांचा शोध घेत जाण्याची मजा आपण लुटायला हवी, या निर्णयापर्यंत ते आले. यातील बहुतेक गोष्टी या रूढ नाहीत आणि सर्वमान्य नाहीत. पण ‘मी कुणाला बांधलेला नाही, त्यामुळे कुणाला आवडेल असं बोलायलाही मी बांधलेला नाही’, असं म्हणत त्यांनी सगळ्या बंधनांपासून स्वत:ला मुक्त करून टाकलं आहे. आणि म्हणूनच ते स्वत:ची स्वतंत्र वाट चालू शकले आहेत. त्यासाठी आयुष्यात जी किंमत मोजायची ती त्यांनी आनंदाने मोजली आहे. निळू दामले हे एक ‘सेल्फमेड’ प्रकरण आहे, असं म्हटलं ते त्यामुळे.

निळूभाऊंची घडण अशी झाल्यामुळे ते जसं स्वतंत्र आणि मजबूत लेखनकाम करू शकले, तसंच सभोवतालच्या जगाला फटकून एकाकी चालत राहिल्यामुळे आत्ममग्नही बनले. आपण आणि आपलं लिखाण यात त्यांनी स्वत:ला बुडवून घेतल्याने त्यांचं सारं लक्ष आपल्या कामावर केंद्रित राहिलं. त्यातून एकारलेपणही आलेलं असावं. मराठीत एकही चांगला संपादक झाला नाही, बहुतेक संपादक ढुढ्ढाचार्य होते किंवा कमी क्षमतेचे होते, असं ते बेधडक सांगतात. कुणी पत्रकार तरी बरा होऊन गेला की नाही, असं विचारलं तर पटकन त्यांना कुणाची नावं आठवत नाहीत. अशोक जैन आणि अरुण साधू यांच्या पलीकडे त्यांची गाडी हलत नाही. जगन फडणीसांची आठवण करून दिली तर त्यांनीही चांगलं काम केलं, असं सर्टिफिकेट ते देतात. याचा अर्थ बाकीच्यांनी आपल्या हयाती फुकटातच घालवल्या असा घायचा की काय? राष्ट्रीय पातळीवरही वेद मेहता, खुशवंतसिंग, विनोद मेहता, रघुवीर सहाय एवढेच पत्रकार त्यांना बरे वाटतात. बाकी सगळे ‘बुलशिट’! (हा त्यांचाच शब्द!) स्वातंत्र्योत्तर भारतात एकही विचारवंत झाला नाही; महाराष्ट्रात तर नाहीच नाही, असं बिनदिक्कत म्हणणार. त्यातल्या त्यात मे.पु. रेगे आणि य. दि. फडके यांच्यावर मेहेरबान होणार. आपण नावं सुचवू लागलो, की तोंडं वेडीवाकडी करून त्यांचा दर्जा ठरवणार. जे लोक त्यांच्या संपर्कात आले किंवा वाचनात आले, तेवढेच थोर, बाकी सगळे ‘बकवास’, असा त्यांचा अ‍ॅप्रोच असतो. नवे लेखक, नवे पत्रकार, नवे कार्यकर्ते, नवे प्रयत्न याबद्दल निळूभाऊ अनभिज्ञ असतात, की खरोखरच त्यांना ही माणसं फिजूल वाटतात, माहीत नाही.

इतरांचं कशाला, मी माझाच अनुभव सांगतो. माझा-त्यांचा तीस वर्षांचा संबंध आहे. पण इतक्या वर्षांत त्यांनी मला एखाद्याही लेखाबद्दल शाबासकी दिलीय, असं आठवत नाही. शाबासकी तर सोडाच, दखलही घेतलेली आठवत नाही. त्यांना पुस्तकं पाठवा, ‘अनुभव’चे अंक पाठवा, दिवाळी अंक पाठवा, संपादित कोश पाठवा... त्याबद्दल वर्षानुवर्षं एक शब्दही बोलणार नाही. अंकातला अन्य कुणाचा एखादा लेख वाचून त्यांनी मत दिलंय किंवा एखाद्या पुस्तकाचा विषय वाचून दोन शब्द बोललेत, असंही आठवत नाही. कुणाला वाटेल किती खत्रुड स्वभावाचा माणूस आहे हा! तर तंसही नाही. ते स्वत:च्या पुस्तकांबद्दल आणि कुठेकुठे छापून आलेल्या लेखाबद्दलही बोलत नाहीत. अगदी ताजं उदाहरण सांगतो. अलिकडेच त्यांचं ‘सकस आणि सखोल’ नावाचं एक पुस्तक आम्ही ‘समकालीन’मार्फत प्रकाशित केलं. त्याच्या पहिल्या प्रती त्यांना पाठवल्या. पुस्तक मिळाल्यानंतर त्याबद्दल एका शब्दाचीही प्रतिक्रिया त्यांच्याकडून मिळाली नाही. त्यांचं हे वागणं बघून कुणालाही वाटावं, की इतका क्रिएटिव्ह आणि प्रॉडक्टिव्ह हा माणूस, पण त्याच्यात इतरांबद्दल अ‍ॅप्रिसिएशन कसं नाही? आसपासच्या माणसांबद्दल त्याच्या मनात प्रेम-ओलावा-आस्था-गुंतवणूक या भावनाच नाहीत की काय?

तर ते तसंही नाहीये. निळूभाऊ हा कामात, अभ्यासात आणि लिखाणात आकंठ बुडालेला माणूस आहे. त्याच्यासाठी त्यापलिकडचं जग जणू अस्तित्वातच नाही. पण याचा अर्थ ते निरस जीवन जगतात असं नाही. सिनेमा ही गोष्ट त्यांच्या रक्तात भिनलेली आहे. कान्स, बर्लिन, टोरंटो वगैरे जगातील महत्त्वाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवलेले सिनेमे ते निवडून बघत असतात. ‘नेटफ्लिक्स’ सारख्या प्लॅटफॉर्म्समुळे हे वेड आणखीनच वाढत चाललंय. त्यांचा सिनेमाचा नाद शाळा-कॉलेजमध्ये असल्यापासूनचा. चालणार्‍या सिनेमांची तिकिटं मिळवून ‘ब्लॅक’ करायची आणि मग मिळालेल्या पैशांतून आपल्याला हवे ते सिनेमे बघायचे, असले उद्योग करण्यापर्यंत या बाबाने लहानपणी मजल मारली होती. सिनेमाबद्दल बोलायला लागले की भरभरून बोलणार. स्टीव्हन स्पीलबर्गच्या पहिल्या सिनेमापासून मार्टिन स्कॉर्सेसीच्या ताज्या सिनेमापर्यंत आणि ‘द टू पोप’सारखा सिनेमा काढणार्‍या फर्नांडो मिरेलेससारख्या ब्राझिलियन दिग्दर्शकापासून नव्या दमाच्या इराणी दिग्दर्शकांबद्दल अचंब्याने आणि कौतुकाने बोलणार. (पण इथेही मराठी, देशी किंवा हिंदी सिनेमाबद्दल शब्द बोलणार नाहीत. विचारलं तर वेगवेगळे चेहरे आणि हावभाव बघायला मिळण्याची खात्री.)

गेली काही वर्षं ते स्वत:ही छोट्या-छोट्या डॉक्युमेंटरीज करताहेत. इन्स्टाग्रामवर त्यांच्या चाळीसेक डॉक्युमेंट्री उपलब्ध आहेत. त्यांना फोटोग्राफीचीही आवड. निवडक पाच-सहाशे फोटो त्यांनी तिथे अपलोड केले आहेत. स्वयंपाक हाही त्यांचा खूप आधीपासूनचा आवडीचा विषय आहे. तीस-चाळीस वर्षांपूर्वी निळूभाऊंच्या घरी गेलेले कुणीकुणी भेटतात, तर निळूभाऊंनी स्वतः बनवून खिलवलेल्या पदार्थांविषयी सांगत असतात. या अर्थाने निळूभाऊ हा आयुष्य भरभरून जगणारा माणूस आहे.

लिहिणं, वाचणं, ङ्गिरणं, शिकवणं, धबाधबा बोलणं, सिनेमे पाहणं, आणि आपल्याला हवं ते करणं असं निळूभाऊंचं जगणं आहे. हे जगणंच त्यांना इतकं व्यापून आहे, की बहुतेक इतरांसाठी त्यात जागाच उरत नसणार. पण त्यांच्या झोनमध्ये येणारी नवी कल्पना-नवा संकल्प-नवा उपक्रम कुणाच्या डोक्यात असेल, तर त्यात उतरायला ते एका पायावर तयार असतात. वीस वर्षांपूर्वी आम्ही ‘अनुभव’मासिक सुरू केलं तेव्हा त्यात पहिल्या अंकापासून ते लिहिताहेत. उत्साहाने. न थकता. कधी लेख, कधी सदरं, कधी रिपोर्ताज, कधी दिवाळी अंकातील खास लेख. स्वत:च्या इच्छेनुसार; आमच्याही इच्छेनुसार आणि कधी गरजेनुसार. उदा. कधी अंकाचं प्लॅनिंग विस्कटतं, ठरवलेला लेख ऐनवेळी रद्द होतो, की निळूभाऊंना हाक मारावी. विषय सांगितला की लगेच त्यांची बोटं लॅपटॉपवर चालायला लागतात आणि दोन-चार तासात लेख हातातही येतो. याचा अर्थ त्यांना इतरांच्या अडचणींचे कन्सर्न्स असतात. मदतीला धावून जायला ते तत्पर असतात. मित्रांसाठी हातातली कामं बाजूला ठेवण्यात त्यांना विशेष काही वाटत नाही.

वर्ष-दोन वर्षांपूर्वी आम्ही तरुण पत्रकारांसाठी एक अनौपचारिक पत्रकारी शाळा सुरू केली. या कल्पनेबद्दल माझं-निळूभाऊंचं अनेक वर्षं बोलणं चालू होतं. पण कामाच्या रगाड्यात अशी शाळा सुरू करणं शक्य होत नव्हतं. थोडी उसंत मिळाली तेव्हा ही कल्पना प्रत्यक्षात आली. या उपक्रमाबद्दल त्यांचा उत्साह अक्षरश: उतू जात असतो. विद्यार्थ्यांसाठी रीडिंग मटेरियल तयार करणं ही कामाची पहिली पायरी. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन ‘सकस आणि सखोल’ हे पुस्तक लिहून दिलं. ‘मुलांशी बोलायचं असेल तर केव्हाही सांग’, अशी खुली ऑफर असतेच. येतात आणि बोलतातही. तरुण पोरांना दिव्यदृष्टी देऊन जातात. बोलण्याची रीत तीच. कट्ट्यावर मित्रांबरोबर गप्पा मारल्यासारखी. बोलताना ते समकालीन भारतीय मीडियाच्या नावाने भरपूर बोटं मोडतात, चांगल्या पत्रकारितेचे पाठ देतात आणि मळलेली वाट सोडण्याचा हट्ट धरून बसतात. मुंबई ही तर मीडियाची राजधानी. तिथे वृत्तपत्र-वृत्तवाहिन्यांचे नवे पत्रकार निळूभाऊंना भेटू इच्छितात. ते सगळ्यांना भेटतात, बोलतात, चांगल्या पत्रकारितेला प्रवृत्त करतात. ‘निळूभाऊंना भेटलो. चांगला पर्स्पेक्टिव्ह मिळाला,’ असं कुणी कुणी सांगत असतं.

या झंगडपणाचा पाया त्यांनी स्वत:च्या नादात राहणं हा आहे. त्यांचंच आवडतं एक उदाहरण आहे. कुठल्या एका देशात एका छोट्याशा घरात एक माणूस राहतो. त्याच्याकडे सातशे वाद्यं आहेत आणि तो ती आपली आपली वाजवत असतो. स्वत:साठी. हा माणूस निळूभाऊंना आवडतो. असा नाद पाहिजे माणसाला, असं ते म्हणतात.

निळूभाऊ असेच आहेत. शोधक, झंगड आणि नादिष्ट.

 

सुहास कुलकर्णी

suhas.kulkarni@uniquefeatures.in

... 

निळू दामले

९८२०९७१५६७

damlenilkanth@gmail.com

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८