हार मूळ उर्दू कथा - शिकस्त - अझहर अबरार : अनुवाद - सुकुमार शिदोरे
ती आपल्याजवळ हात-दीड हात लांबीची दोन सुती कापडं ठेवत असे. त्यातलं एक हिरव्या रंगाचं असे तर दुसरं भगव्या. मशिदीच्या पायर्यांवर बसायची तेव्हा ती हिरवं कापड इतक्या व्यवस्थितपणे गुंडाळून घ्यायची की वाटावं पावित्र्याचं मूर्तिमंत रूप आहे. जेव्हा मंदिरासमोर असायची तेव्हा भगवं कापड परिधान करून जणू एखाद्या देवीचं रूप धारण करायची. ती कोण होती, कुठून आली होती, हिंदू होती की मुसलमान- कोणालाही माहीत नव्हतं. तिची ओळख फक्त इतकीच होती की ती एक भिकारीण होती. भिकारणीला हिंदू किंवा मुसलमान असण्यात काय स्वारस्य? तिचा तर केवळ भीक मागून पोटातली आग शमवण्याशी मतलब होता. तशीही ती इतर भिकार्यांपेक्षा वेगळी होती. रंगरूपानेच नव्हे तर सवयी आणि स्वभावानेही. इतर भिकारी नवनव्या क्लृप्त्या वापरून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत. ही भिकारीण मात्र एखाद्या पुतळ्यासारखी उभी असायची. चेहर्यावर शांत भाव ठेवून टक लावून बघत राहायची. मशिदीच्या गेटबाहेर पडणारे नमाजी तिच्या झोळीत नाणी टाकायचे. सदैव चुपचाप असणार्या या बाईला कधी वाचा प्रदान झालेली होती की नाही, का परिस्थितीच्या आघातांमुळे तिच्या तोंडाला कुलूप लागलं होतं, कोणालाच ठाऊक नव्हतं.
दोन रंगांच्या कापडांचा वापर करून भीक मागायची ही अनोखी पद्धत न जाणे
ती कुठून शिकली होती, बहुधा ती तिच्याच डोक्यातून निघालेली होती. सार्या भिकार्यांची भिक्षापात्रंही
या भिकारणीपेक्षा निराळी होती. तसंच, काही भिकारी कव्वाली गायचे तर काही भजन.
कोणाकोणाजवळ तर गीतांचा खजिना असायचा. पण या भिकारणीचा मूकपणा हाच एक आवाज होता जो
सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचा. ती कापडांच्या रंगांच्या सहाय्याने कैक वर्षांपासून
मंदिरं आणि मशिदींच्या देवड्यांवर आपलं अस्तित्व दर्शवून देत होती. तिथेच तिचा हेतू
सफल झाला होता.
ते सणासुदीचे बहारदार दिवस होते. मशिदीबाहेर दुपारपर्यंत मुक्काम केल्यानंतर
भिकारणीने आपली झोळी हलवून पाहिली तेव्हा आतून नाण्यांचा खणखणाट ऐकू आला. मशिदीच्या
पायर्या उतरून आता भिकारीण एका नव्या जगात सामील व्हायला निघाली होती. नदीचा विशाल
किनारा, सुंदर वृक्षांच्या रांगा, फेरीवाल्यांचा कोलाहल आणि समर्पित श्रद्धाळूंचा
सागर. सगळ्यांची वस्त्रं एकाच रंगाची. दुरून पाहिलं तर असं वाटलं असतं की कोणीतरी मैदानावर
भगवी चादर अंथरलेली आहे. भिकारीण या भगव्या रंगाचा हिस्सा बनून गेली. तिथे दर्शन घेणारे
लोक दानपेटीत भरभरून दान करत होते. रांगेत बसलेल्या भिकार्यांनाही काही ना काही देऊन
जात होते. मंदिरांच्या घंटांचे असंख्य आवाज कानी पडत होते. एका रांगेत ठिकठिकाणी छोटी-मोठी
दुकानं होती. तिथे कुंकू, नारळ, फुलं, सुवासिक
अगरबत्त्या आदी वस्तू सजवून ठेवल्या होत्या. दुसर्या रांगेत मुलांच्या खेळण्यांची
दुकानं होती. मोठी जत्रा भरली आहे असं वाटत होतं. मोठमोठ्या मंदिरांच्या रांगा होत्या.
भिकारीण भगवं कापड लेवून आणि हात पसरून गणपती मंदिराच्या विस्तीर्ण पायर्यांवर अशा
प्रकारे स्थानापन्न झाली होती, की जणू कोणा मूर्तीकाराने अजिंठ्याहून तिथे
मूर्ती आणून ठेवली आहे, असं वाटावं. नजिकच पार्वती-मंदिर होतं. सकाळ-संध्याकाळ लोक तिथे डोकं
टेकवून आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करत. कपाळावर गंधाचे पट्टे ओढलेल्या
जटाधारी साधूंचा जमावही तिथे बसलेला दिसत होता. आजचा दिवस भिकारणीसाठी आनंदाचा उपहार
घेऊन आला होता. सकाळी मशिदीच्या पायर्यांपासून ते संध्याकाळी गणपती मंदिराच्या पायर्यांपर्यंतच्या
वेळात तिने खूप वस्तू गोळा केल्या होत्या. तिच्याजवळच्या दोन गाठोड्यांमध्ये आता धान्य,
बरेच
पैसे, काही नवे कपडे इत्यादी चीजा होत्या. अनेक महिन्यांनंतर तिला एवढी प्राप्ती
झाली होती. ती पाहून तिचं हृदय हर्षोल्हासाने उचंबळत होतं. तिच्यासाठी इतक्या चीजा
म्हणजे एखाद्या बक्षिसापेक्षा कमी नव्हत्या. आपले दोन्ही कुरूप हात वर करून ती सार्या
जगासाठी आशीर्वाद मागू लागली. भावनांचा सागर तिच्या मनात उचंबळू लागला. चेहर्यावरून
तिच्या या भावनांचा अंदाज बांधणं मुश्किल होतं.
संध्याकाळ होत होती. वातावरणात उत्साह अव्याहतपणे ओसंडत होता. दिवसभर
शहरात गोंगाट करणार्या भिकार्यांच्या टोळ्या थकूनभागून आपापल्या ठिकाणांकडे रवाना
झाल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरव्या आणि भगव्या रंगांच्या पताका लावलेल्या
होत्या. एकीकडे ईद-उल-फित्रची उत्साही गजबज होती, आसमंतात आनंद पसरला
होता, तर दुसरीकडे गणेशोत्सवाची धूम होती. भिकारणीचं हृदय धर्म आणि संप्रदायांचे
भेदभाव न करता तमाम माणसांकरिता प्रेमभावनेने ओतप्रोत भरलं होतं. रस्त्यावरून चालता
चालता अधूनमधून तिचे वृद्ध डोळे हा दिलखेचक देखावा पाहून चमकत होते. रस्त्यावर बायका,
मुलं,
म्हातारे-
सगळेच आपापल्या घरातून बाहेर पडून एकमेकांच्या सणांच्या शुभेच्छा देताना दिसत होते.
हे दोन सण तिच्यासाठी आनंदोल्हास घेऊन आले होते. ती सडकेच्या कडेला एका ठिकाणी थांबली,
तोंडावर
थोडं पाणी शिंपडून जरा वेळाने ती खाली बसली. तिने हिरव्या आणि भगव्या कापडांना सांभाळून
ठेवून दिलं.
संध्याकाळ होत असतानाच ती शहराच्या उपनगरातील झुग्गी-झोपड्यांकडे रवाना
झाली. तिला पाहताच सगळी मुलं कोंबड्यांच्या खुराड्यातून पिल्लं बाहेर पडतात तशी बाहेर
आली जशी. तिच्या जवळचं एवढं सामान पाहून आनंदाचा जल्लोष करत मुलांनी तिच्याभोवती मोठा
गोल केला. तिचा पोशाख ही मुलांसाठीही आकर्षणाची बाब होती. मुलांनी हट्ट धरला की तिने
दोन्ही रंगांचे कपडे घालावेत. तिने मुलांच्या हट्टापुढे गुडघे टेकले आणि ती कापडं परिधान
केली. मुलं तिला पकडून जोरजोरात फिरवू लागली. तिच्या खांद्यांवर झुलणार्या कापडांच्या
रंगांची एकमेकांत सरमिसळ झाली आणि त्यामुळे एक नवाच रंग समोर आला. हा रंग ना हिरवा
होता ना भगवा, पण त्यांतून एका नव्या रंगाची उत्पत्ती झाली, ज्यात बंधुभाव सामावलेला
होता.
तेवढ्यात अचानक किंकाळ्या आणि आरोळ्यांचे आवाज ऐकू आले. वस्तीमधले सगळे
आवाज, सगळ्या हास्यलहरी तात्काळ थंडावल्या. चारही बाजूंनी गोळ्या चालवल्याचे
आवाज आल्याने सगळे अवाक् झाले. कोणाला काही कळायच्या आत झोपड्यांच्या आजूबाजूला काही
लोक हातात पिस्तुल घेऊन जवळ येत आहेत, असं दिसून आलं. अंदाधुंद फायरिंग करत हे
लोक जवळ येत होते. सर्वत्र एकच धावपळ सुरू झाली. तेवढ्यात एक गोळी सणसणत घरानजिक आली आणि भिकारणीची छाती चिरून गेली. वेदनेने
चक्कर येऊन ती जमिनीवर कोसळली. सारी वस्ती हतबल होऊन गेली. हिरवी आणि भगवी कापडं अंगभर
ल्यालेली भिकारीण जमिनीवर पालथी पडली होती. सगळी मुलं- श्याम, सुखबीर
सिंग, सलीम, योगिता, अशी सगळी मुलं दूर उभी राहून तिच्याकडे एकटक पाहत होती. आता तिच्या कपड्यांचा
रंग एकच दिसत होता- दाट लाल. तिच्या अर्धोन्मिलित डोळ्यांवरून वाटत होतं, की ती
त्या कपड्यांकडे टक लावून पाहते आहे.
चहूबाजूंनी दाटून येणारा काळोख सूर्यकिरणांना नेस्तनाबूत करत होता. वृद्ध
भिकारणीच्या घरात मिणमिणत्या दिव्याची ज्योत वार्याशी लढता लढता हरून गेली होती.
सुकुमार शिदोरे
९४२२५२६६४८
sukumarshidore@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा