लॉकडाऊनमधले शिक्षणप्रयोग ; तुषार कलबुर्गी
अनुभव सप्टेंबर २०२१च्या अंकातून कोव्हिडकाळात शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला ; पण तो सगळ्यांनाच परवडणारा नाही . कोणाकडे स्मार्टफोन नाही , तर कोणाकडे स्मार्टफोन रिचार्ज करायला पैसे नाहीत . या दोन्ही गोष्टी असल्या तर घरी फोन एक आणि मुलं त्याहून जास्त . लॉकडाऊनमुळे अनेकांच्या खिशाला कात्री लागलेली असताना ऑनलाइन शिक्षणासाठी पैसा खर्च करणं कसं परवडणार ? मुलं शाळेत येऊ शकत नसतील तर शिक्षकांनी मुलांपर्यंत जायला हवं असा विचार करून पुण्यातील शिक्षक अमर पोळ यांनी नवा प्रयोग सुरू केला . शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या प्रयत्नांवर टाकलेला प्रकाश . आकाश यादव हा पुण्याच्या गुलटेकडीमधील मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये राहणारा आठवीतला मुलगा . सातवीपर्यंत जवळच्या महानगर पालिकेच्या शाळेत शिकला . आई - वडील दोघंही भाजी विक्री करतात . त्यातून त्यांचं घर चालतं . आकाशकडे त्याच्या ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन नाही . मुलाच्या शिक्षणासाठी मोबाईल घेऊ शकतील आणि दर महिन्याला दोनशे रुपयांचं रिचार्ज करू शकतील , अशी त्याच्या घरची परिस्थिती नाही . रोशनी , खुशी आणि मोहित हे तिघं भाऊ - बहीणही मीनाताई ठ...